सत्कृत्यांमुळे देवाचे गौरव होते
सत्कृत्यांमुळे देवाचे गौरव होते
आपले उत्तम आचरण आणि अनुकरणीय कार्ये यांच्याद्वारे खरे ख्रिस्ती देवाचे गौरव करतात. (१ पेत्र २:१२) अलीकडील वर्षांत इटलीत झालेल्या काही घटनांवरून आपल्याला हे पाहायला मिळते.
१९९७ सालच्या सप्टेंबर महिन्यात, मार्श आणि उंब्रियाच्या अनेक भागांत झालेल्या मोठ्या भूकंपामुळे जवळजवळ ९०,००० घरे उद्ध्वस्त झाली. यहोवाच्या साक्षीदारांचे गट लगेचच सहविश्वासू बंधूभगिनींना आणि इतरांना मदत करायला धावून गेले. भूकंपग्रस्तांना ट्रेलर, स्लिपिंग बॅग, स्टोव्ह, जेनरेटर, आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यात आल्या. मदत पुरवण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न लोकांच्या चटकन नजरेत आले.
ईल चेंत्रो नावाच्या वृत्तपत्राने असा अहवाल दिला: “भूकंपग्रस्त भागात मदत साम्रगी घेऊन येणारे सर्वात पहिले होते [टेरामोच्या प्रांतातील] रोसेटोचे यहोवाचे साक्षीदार. . . . यहोवाला विश्वासू असलेले हे लोक वेळोवेळी प्रार्थनेसाठी एकत्र जमतातच शिवाय अगदी व्यवहार्य मार्गाने कार्य देखील करतात; कोण कुठल्या धर्माचा आहे हे न पाहता ते सर्व पीडितांना मदत करतात.”
भूकंपाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या शहरांपैकी एका शहराचे अर्थात नोकेरा उंब्राच्या महापौरांनी साक्षीदारांना असे लिहिले: “नोकेराच्या लोकांना केलेल्या साहाय्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक व व्यक्तिगतपणे आभार मानतो. माझ्याबरोबर इतरही नागरिक आभार व्यक्त करतात याची मला खात्री आहे.” शिवाय, अंतःप्रदेश मंत्रालयाने, काँग्रेगात्योना क्रेशत्याना डे टेस्टीमोनी डी झाओवाला (यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीला), “उंब्रिया आणि मार्शमधील तातडीच्या प्रसंगी केलेल्या कार्याबद्दल व मनःपूर्वक साहाय्याबद्दल” एक प्रशस्तीपत्र आणि एक पदक बहाल केले.
२००० सालच्या ऑक्टोबरमध्ये, उत्तर इटलीच्या पिडमोन्ट भागाला एका विनाशकारक पुराचा फटका बसला. पुन्हा एकदा साक्षीदार मदतीला धावून गेले. त्यांची ही उत्तम कार्ये देखील लोकांच्या नजरेत आली. पिडमोन्ट भागाने त्यांना, “पूरग्रस्त भागातील पिडमोन्ट रहिवाशांसाठी अमूल्य स्वयंसेवा केल्याबद्दल” बक्षीस दिले.
येशूने आपल्या शिष्यांना अशी सूचना दिली: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) आध्यात्मिक व इतर मार्गांनी आपल्या शेजाऱ्यांना मदतदायक ठरतील अशी “सत्कर्मे” करून यहोवाचे साक्षीदार स्वतःचे नव्हे तर आपला देव यहोवा, याचे गौरव आनंदाने करतात.