आपल्या परीने बुद्धिमान
आपल्या परीने बुद्धिमान
“प्रौढांना तर बुद्धी असतेच, परंतु मुलांनाही त्यांच्या परीने बुद्धी असते,” अशी नायजेरियात एक म्हण आहे. नायजेरियातील एडवीन नावाच्या एका ख्रिस्ती वडिलांना या म्हणीची सत्यता पटली.
एकदा, एडवीन यांना घरातील मेजाखाली एक पत्र्याचा डबा दिसला.
त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना बोलावले आणि विचारले, की “हा डबा कोणाचा आहे?”
आठ वर्षांच्या ईमॅन्वेलने म्हटले, “माझा आहे.” हा १२ सेंटीमीटरचा व वरच्या भागावर कापून छेद केलेला चौकोनी पत्र्याचा डबा, यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्यासाठी देणगी टाकण्याचा डबा आहे असे त्याने पटकन सांगितले. तो म्हणाला: “मी दररोज तर राज्य सभागृहात जात नाही म्हणून मी विचार केला, की एक लहानसा डबा बनवीन आणि ज्या दिवशी मी खाऊ घेणार नाही त्या दिवशी ते खाऊचे पैसे मी या डब्यात टाकीन.”
ईमॅन्वेलच्या वडिलांनी, वार्षिक प्रांतीय अधिवेशनाला जाता यावे म्हणून घरीच पैसे साठवण्यासाठी एक डबा ठेवला होता. पण मध्येच काहीतरी तातडीचे काम निघाल्यामुळे त्यांनी ते साठवलेले पैसे वापरले होते. आपण साठवत असलेले पैसे दुसऱ्या कोणत्याही कामासाठी खर्च होणार नाहीत म्हणून ईमॅन्वेलने एक जुना पत्र्याचा डबा पूर्णपणे बंद करून टाकण्यासाठी एका वेल्डरकडे नेला. हा डबा कोणत्या कारणासाठी वापरला जाणार आहे हे त्या वेल्डरला समजल्यावर त्याने भंगारातील सामानातून ईमॅन्वेलसाठी एक डबा बनवून दिला. ते पाहून ईमॅन्वेलचा पाच वर्षांचा धाकटा भाऊ मायकल याने, आपल्यालासुद्धा एक डबा हवा असे सांगितले.
आपल्या मुलांचे एडवीन यांना आश्चर्य वाटले आणि ते डबे कशासाठी बनवून घेतले होते त्याविषयी मुलांना विचारले. मायकल म्हणाला: “मला त्यात दान टाकायचंय.”
ईमॅन्वेल, मायकल आणि त्यांची नऊ वर्षांची बहीण उचे हे तिघेही, खाऊसाठी दिलेल्या पैशातील काही पैसे त्या डब्यात टाकत होते; त्यांच्या पालकांना याबद्दल काहीही माहीत नव्हते. पण या चिमुरड्यांना ही कल्पना कशी सुचली होती? त्यांना जेव्हापासून कळायला लागले होते, तेव्हापासून त्यांच्या पालकांनी त्यांना राज्य सभागृहातील दानपेटीत काही पैसे टाकण्यास शिकवले होते. या शिक्षणाचा मुलांनी चांगला उपयोग केला होता.
हे डबे भरल्यानंतर फोडले तेव्हा त्यांतून ३.१३ (यु.एस.) डॉलर इतकी रक्कम त्यांना मिळाली! ज्या देशात वार्षिक कमाई, काही शेकडो डॉलर इतकी आहे त्या देशांत ही रक्कम काही लहान नव्हती. अशा प्रकारच्या स्वेच्छिक देणग्या, संपूर्ण जगातील २३५ देशांत चाललेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्याला हातभार लावतात.