व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्यांच्यावर देवाचे प्रेम आहे अशांपैकी तुम्ही आहात का?

ज्यांच्यावर देवाचे प्रेम आहे अशांपैकी तुम्ही आहात का?

ज्यांच्यावर देवाचे प्रेम आहे अशांपैकी तुम्ही आहात का?

“ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील.”—योहान १४:२१.

१, २. (अ) यहोवाने मानवजातीवर आपले प्रेम कसे दाखवले? (ब) सा.यु. ३३ साली निसान १४ रोजी येशूने कशाची स्थापना केली?

यहोवा, त्याने निर्माण केलेल्या मानवांवर प्रेम करतो. किंबहुना त्याने मानवजातीच्या जगावर “एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याचा काळ जवळ येत आहे. यहोवाने “तुम्हांआम्हांवर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले,” याविषयी विशेषतः या काळात खऱ्‍या ख्रिस्ती जनांनी अधिकच जाणीव बाळगावी.—१ योहान ४:१०.

सा.यु. ३३ सालच्या निसान १४ तारखेला रात्री येशू व त्याचे बारा प्रेषित जेरूसलेम येथील एका घराच्या माडीवर वल्हांडण सण पाळण्यास एकत्रित झाले होते. हा सण इस्राएली लोकांच्या ईजिप्तमधून झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा केला जात असे. (मत्तय २६:१७-२०) हा यहूदी सण साजरा केल्यानंतर येशूने यहुदा इस्कर्योत याला बाहेर घालवले आणि त्यानंतर स्मारक भोजनाची स्थापना केली. हाच स्मारक भोज ख्रिस्ती लोकांकरता ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी असणार होता. * आपले शरीर व रक्‍त यांस चिन्हांकित करणारी प्रतीके किंवा बोधचिन्हे म्हणून बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षरसाचा उपयोग करून येशूने उरलेल्या प्रेषितांसोबत हे शांती भोजन केले. या प्रसंगी त्याने काय काय केले हे मत्तय, मार्क व लूक या समांतर शुभवर्तमानाच्या अहवालांत वाचायला मिळते. तसेच प्रेषित पौलानेही याविषयी लिहिले व या विधीला “प्रभूभोजन” हे नाव दिले.—१ करिंथकर ११:२०; मत्तय २६:२६-२८; मार्क १४:२२-२५; लूक २२:१९, २०.

३. माडीवरच्या घरात येशूने आपल्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटल्या काही तासांचा योहानाने दिलेला वृत्तान्त इतर वृत्तान्तांपेक्षा कोणत्या महत्त्वपूर्ण अर्थाने वेगळा आहे?

एक लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी की प्रेषित योहानाने भाकर व द्राक्षारस शिष्यांमध्ये फिरवण्याविषयी अजिबात उल्लेख केला नाही. याचे कारण कदाचित असे असावे की त्याने आपले शुभवर्तमान वृत्त लिहिले तेव्हा (सा.यु. ९८ च्या सुमारास) ही प्रथा आरंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये चांगलीच रुढावलेली होती. (१ करिंथकर ११:२३-२६) पण येशू आपल्या मृत्यूचा स्मारकविधी स्थापन केल्यानंतर काय काय बोलला व त्याने काय केले यासंबंधी देवाच्या प्रेरणेने केवळ योहानानेच आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ही रोचक माहिती योहानाच्या शुभवर्तमानाच्या तब्बल पाच अध्यायांत सामावली आहे. ही माहिती वाचल्यावर देव कशाप्रकारच्या व्यक्‍तींवर प्रेम करतो यासंबंधी काहीही शंका उरत नाही. तर आता आपण योहान १३-१७ अध्यायांचे परीक्षण करू या.

येशूच्या अनुकरणीय प्रेमावरून धडा घेणे

४. (अ) येशूने आपल्या शिष्यांसोबत असताना स्मारकविधी स्थापन केला त्या प्रसंगी कोणत्या खास विषयावर जोर देण्यात आला हे योहानाने कशाप्रकारे स्पष्ट केले? (ब) यहोवा येशूवर प्रीती करतो याचे एक मुख्य कारण कोणते आहे?

या अध्यायांत येशूने आपल्या शिष्यांना सोडून जाण्याआधी दिलेल्या मार्गदर्शनात प्रीती हा एक प्रमुख विषय असल्याचे दिसून येते. किंबहुना “प्रीति” हा शब्द वेगवेगळ्या रूपात या अध्यायांत जवळजवळ ३१ वेळा आढळतो. येशूचे आपला पिता यहोवा याच्यावर असलेले प्रेम, तसेच त्याच्या शिष्यांवर असलेले त्याचे प्रेम या अध्यायांइतके बायबलमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी स्पष्ट केलेले नाही. तसे तर येशूला आपल्या पित्यावर असलेले प्रेम सगळ्याच शुभवर्तमानांतील त्याच्या जीवन वृत्तान्तांवरून दिसून येते पण “मी पित्यावर प्रीति करितो” हे येशूचे स्पष्ट विधान केवळ योहानाच्या वृत्तान्तातच आपण वाचतो. (योहान १४:३१) येशूने असेही म्हटले की यहोवा त्याच्यावर प्रीती करतो आणि का करतो हे देखील त्याने स्पष्ट केले. त्याने म्हटले: “जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली तशी मीहि तुम्हावर प्रीति केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:९, १०) होय, यहोवा आपल्या पुत्रावर प्रेम करतो कारण तो त्याच्या पूर्णपणे आज्ञेत राहिला. येशू ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांकरता हा किती उत्तम धडा आहे!

५. येशूने आपल्या शिष्यांबद्दल प्रेम कसे व्यक्‍त केले?

प्रेषितांसोबत येशूच्या शेवटल्या भेटीविषयी योहानाने दिलेल्या वृत्तान्तात अगदी सुरवातीलाच, येशूचे आपल्या अनुयायांवर किती प्रेम होते हे स्पष्ट होते. योहान सांगतो: “वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्‍या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्‍या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.” (योहान १३:१) त्या संस्मरणीय संध्याकाळी त्याने इतरांची प्रेमळपणे सेवा करण्यासंबंधाने आपल्या शिष्यांना एक अविस्मरणीय धडा दिला. त्याने त्यांचे पाय धुतले. खरे तर येशूचे आणि आपल्या बांधवांचे पाय धुण्याकरता त्यांच्यापैकी प्रत्येकाने स्वेच्छेने पुढे यायला हवे होते, पण त्यांनी तसे केले नाही. तेव्हा येशूने हे क्षुद्र काम स्वतः केले आणि मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी प्रभु व गुरू असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१४, १५) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आपल्या बांधवांची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने पुढे झाले पाहिजे आणि असे करण्यात त्यांना आनंद वाटला पाहिजे.—मत्तय २०:२६, २७, तळटीप; योहान १३:१७.

नव्या आज्ञेचे पालन करा

६, ७. (अ) स्मारकविधीच्या स्थापनेसंबंधी योहान कोणती महत्त्वाची माहिती पुरवतो? (ब) येशूने आपल्या शिष्यांना कोणती नवीन आज्ञा दिली आणि ही कोणत्या अर्थाने नवीन होती?

निसान १४ रोजी जेरूसलेममधील एका माडीच्या घरावर काय घडले हे सांगणाऱ्‍या अहवालांपैकी केवळ योहानाच्याच अहवालात यहुदा इस्कर्योत बाहेर गेल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. (योहान १३:२१-३०) चारही शुभवर्तमानांचा ताळमेळ लावल्यास असे दिसून येते की विश्‍वासघातकी यहूदा बाहेर गेल्यानंतरच येशूने आपल्या मृत्यूचा स्मारकविधी स्थापित केला. त्यानंतर तो बराच वेळ आपल्या विश्‍वासू प्रेषितांशी बोलला व लवकरच तो त्यांचा निरोप घेणार असल्यामुळे त्याने त्यांना बरेच मार्गदर्शन व सूचना दिल्या. स्मारकविधीला उपस्थित राहण्याची तयारी करताना, त्या प्रसंगी येशूने काय म्हटले याचे आपण अत्यंत उत्सुकतेने परीक्षण केले पाहिजे; कारण देव ज्यांच्यावर प्रेम करतो अशा लोकांपैकी असण्याची आपली निश्‍चितच इच्छा आहे.

आपल्या मृत्यूचा स्मारकविधी स्थापित केल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना दिलेली पहिलीच सूचना नवीन होती. त्याने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) ही आज्ञा नवीन होती असे येशूने का म्हटले? त्या संध्याकाळी काही वेळानंतर येशूने याचे स्पष्टीकरण दिले व म्हटले: “जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१२, १३) मोशेच्या नियमशास्त्राने इस्राएल लोकांना “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वत:सारखी प्रीति कर” अशी आज्ञा दिली होती. (लेवीय १९:१८) पण येशूची आज्ञा याच्या पुढे गेली. ख्रिस्ती लोकांनी एकमेकांवर ख्रिस्ताने त्यांच्यावर जशी प्रीती केली त्याप्रमाणे प्रीती करायची होती, अर्थात, आपल्या बांधवांसाठी जीवही द्यायला तयार राहायचे होते.

८. (अ) स्वार्थत्यागी प्रेमात काय सामील आहे? (ब) आज यहोवाचे साक्षीदार कशाप्रकारे स्वार्थत्यागी प्रेम प्रदर्शित करतात?

स्मारकविधी जवळ आला असता, आपण वैयक्‍तिकरित्या व मंडळी यानात्याने खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचे ओळखचिन्ह, अर्थात ख्रिस्तासारखी प्रीती खरोखर दाखवत आहोत किंवा नाही यासंबंधी आत्मपरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. अर्थात ख्रिस्तासारखी आत्मत्यागी प्रीती दाखवण्याचा अर्थ, वेळ आल्यास आपल्या बांधवांचा विश्‍वासघात करण्यापेक्षा त्यांच्यासाठी आपला जीवही धोक्यात घालावा लागू शकतो; काहीवेळा असे घडले आहे. पण सहसा मात्र ख्रिस्ती प्रेम दाखवण्याकरता आपल्या बांधवांना व इतरांना मदत करण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी आपल्या स्वार्थांचा त्याग करण्याची गरज असते. या बाबतीत प्रेषित पौलाचा उत्तम आदर्श आपल्यापुढे आहे. (२ करिंथकर १२:१५; फिलिप्पैकर २:१७) सबंध जगात यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या आत्मत्यागी वृत्तीसाठी, बांधवांना व शेजाऱ्‍यांना मदत करण्यासाठी आणि बायबलमधील सत्य सहमानवांपर्यंत पोचवण्याकरता आपली शक्‍ती खर्च करण्यासाठी वाखाणले जाते. *गलतीकर ६:१०.

जतन करण्याजोगी नाती

९. देव व त्याचा पुत्र यांच्यासोबत आपला मोलाचा नातेसंबंध राखण्याकरता आपण काय आनंदाने करतो?

यहोवा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांनी आपल्यावर प्रेम करावे यापेक्षा मोलवान बहुमान कोणता असू शकतो? पण हे प्रेम अनुभवण्याकरता आपल्यालाही काही करणे आवश्‍यक आहे. शिष्यांसोबत त्या शेवटल्या रात्री येशूने म्हटले: “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील; मीहि त्याच्यावर प्रीति करीन व स्वतः त्याला प्रगट होईन.” (योहान १४:२१) देवासोबत व त्याच्या पुत्रासोबतचा नातेसंबंध आपल्याला मोलाचा वाटत असल्यामुळे आपण आनंदाने त्यांच्या आज्ञा पाळतो. यांत स्वार्थत्यागी प्रीती दाखवण्याच्या नवीन आज्ञेचा आणि ख्रिस्ताने त्याच्या पुनरुत्थानानंतर दिलेल्या ‘उपदेश व साक्ष’ देण्याच्या तसेच सुवार्तेचा स्वीकार करणाऱ्‍यांना ‘शिष्य बनवण्याचा’ प्रयत्न करण्याच्या आदेशाचा समावेश होतो.—प्रेषितांची कृत्ये १०:४२; मत्तय २८:१९, २०.

१०. अभिषिक्‍त जनांना आणि “दुसरी मेंढरे” यांना कोणते बहुमोल नातेसंबंध उपभोगण्याची संधी आहे?

१० नंतर, त्याच रात्री विश्‍वासू प्रेषित यहूदा (तद्दय) याने विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात येशूने म्हटले: “ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.” (योहान १४:२२, २३) ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याकरता पाचारण करण्यात आलेल्या अभिषिक्‍त जनांचा अद्याप पृथ्वीवर असताना देखील यहोवा व त्याच्या पुत्रासोबत अतिशय जवळचा नातेसंबंध आहे. (योहान १५:१५; १६:२७; १७:२२; इब्री लोकांस ३:१; १ योहान ३:२, २४) तसेच, पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा असलेले त्यांचे ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ साथीदार आज्ञाधारक राहिल्यास ते देखील “एक मेंढपाळ” येशू ख्रिस्त याच्यासोबत व त्यांचा देव यहोवा याच्यासोबत बहुमोल नातेसंबंध उपभोगतात.—योहान १०:१६; स्तोत्र १५:१-५; २५:१४.

“तुम्ही जगाचे नाही”

११. येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या गंभीर वस्तूस्थितीविषयी सावध केले?

११ आपल्या मृत्यूच्या आधी विश्‍वासू शिष्यांसोबत शेवटच्या भेटीत येशूने त्यांना एका गंभीर वस्तूस्थितीविषयी सावध केले: देव ज्या व्यक्‍तीवर प्रीती करेल त्या व्यक्‍तीचा जगात द्वेष केला जाईल. त्याने म्हटले: “जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते. दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेहि पाळतील.”—योहान १५:१८-२०.

१२. (अ) येशूने त्याच्या शिष्यांना, जग त्यांचा द्वेष करेल असे का सांगितले? (ब) स्मारकविधी जवळ येत असता सर्वांनी कशावर मनन केले पाहिजे?

१२ या ११ प्रेषितांनी व त्यांच्यानंतरच्या सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी जगाच्या द्वेषामुळे निराश होऊन हिंमत हारू नये म्हणून येशूने ही ताकीद दिली. त्याने पुढे म्हटले: “तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्‍या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभाबहिष्कृत करितील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला व मलाहि ओळखले नसल्यामुळे ते असे करितील.” (योहान १६:१-३) एका बायबल शब्दकोशात केलेल्या स्पष्टीकरणानुसार या ठिकाणी ‘अडखळणे’ असे भाषांतर केलेल्या मूळ क्रियापदाचा अर्थ “ज्याच्यावर भरवसा केला पाहिजे व ज्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे त्याच्याविषयी एखाद्या व्यक्‍तीच्या मनात अविश्‍वास निर्माण करणे व तिला त्याचा विश्‍वासघात करण्यास प्रवृत्त करणे किंवा आज्ञा पाळण्यापासून परावृत्त करणे; मार्गभ्रष्ट करणे.” स्मारकविधी जवळ येत असता सर्वांनी भूतकाळातील व सध्याच्या विश्‍वासू जनांच्या जीवनावर मनन करून परीक्षेतही खंबीर राहण्याच्या त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. विरोध किंवा छळामुळे निराश होऊन यहोवाचा व येशूचा कधीही विश्‍वासघात करू नका तर त्यांच्यावर भरवसा ठेवत राहण्याचा व त्यांच्या आज्ञांचे पालन करत राहण्याचा निर्धार करा.

१३. आपल्या पित्याला प्रार्थना करताना येशूने आपल्या अनुयायांकरता काय विनंती केली?

१३ जेरूसलेममधील माडीवरच्या खोलीतून बाहेर पडण्याआधी शेवटच्या प्रार्थनेत येशूने आपल्या पित्याला म्हटले: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१४-१६) आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांच्यावर त्याची पाखर आहे आणि ते जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो त्यांना बळ देतो.—यशया ४०:२९-३१.

पित्याच्या व पुत्राच्या प्रीतीत राहा

१४, १५. (अ) ‘अधोगतीला लागलेल्या द्राक्षीच्या वेलाच्या’ तुलनेत येशूने स्वतःला काय म्हटले? (ब) ‘खऱ्‍या द्राक्षवेलाचे’ “फाटे” कोण आहेत?

१४ निसान १४ च्या रात्री येशूने आपल्या विश्‍वासू शिष्यांसोबत केलेल्या जिव्हाळ्याच्या संभाषणात त्याने अविश्‍वासू इस्राएलच्या ‘हीन जातीच्या द्राक्षालतेच्या’ तुलनेत स्वतःला “खरा द्राक्षवेल” म्हणून संबोधले. त्याने म्हटले: “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.” (योहान १५:१) कित्येक शतकांआधी संदेष्टा यिर्मया याने यहोवाने आपल्या अविश्‍वासू लोकांना संबोधून म्हटलेले शब्द लिहिले होते: “मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षालता लाविली, ती तू माझ्यासमोर परदेशची हीन जातीची द्राक्षालता कशी झालीस?” (यिर्मया २:२१) तसेच संदेष्टा होशेय याने असे लिहिले: “इस्राएल हा अधोगतीला लागलेला द्राक्षीचा वेल आहे. तो स्वतःसाठी फळे देत राहतो. . . . त्यांचे हृदय बेईमान आहे.”—होशेय १०:१, २, NW.

१५ खऱ्‍या उपासनेचे फळ उत्पन्‍न करण्याऐवजी इस्राएलाने धर्मत्याग केला व स्वतःकरता फळे उत्पन्‍न केली. आपल्या विश्‍वासू शिष्यांसोबत शेवटच्या वेळी भेटण्याआधी येशूने ढोंगी यहूदी धर्मपुढाऱ्‍यांना बजावून सांगितले: “मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा [राष्ट्र] त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४३) हे नवे राष्ट्र १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनलेले ‘देवाचे इस्राएल’ असून त्यांची तुलना येशू ख्रिस्ताच्या अर्थात ‘खऱ्‍या द्राक्षवेलाच्या’ ‘फाट्यांशी’ करण्यात आली.—गलतीकर ६:१६; योहान १५:५; प्रकटीकरण १४:१,.

१६. येशूने ११ विश्‍वासू प्रेषितांना काय करण्याचे प्रोत्साहन दिले आणि या अंतसमयात विश्‍वासू शेषवर्गासंबंधी आपण काय म्हणू शकतो?

१६ येशूने त्या माडीवरच्या खोलीत उपस्थित असलेल्या ११ प्रेषितांना सांगितले: “माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.” (योहान १५:२,) यहोवाच्या लोकांच्या आधुनिक इतिहासावरून हेच दिसून येते की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा विश्‍वासू शेषवर्ग आपले मस्तक ख्रिस्त येशू याच्यासोबत एकतेत राहिला आहे. (इफिसकर ५:२३) त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले व फाट्यांची काटछाट करण्यात आली तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. (मलाखी ३:२, ३) १९१९ पासून त्यांनी राज्याचे भरपूर फळ उत्पन्‍न केले आहे, सुरवातीला इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या रूपात आणि १९३५ नंतर सतत वाढत जाणाऱ्‍या त्यांच्या सोबत्यांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ रूपात.—प्रकटीकरण ७:९; यशया ६०:४, ८-११.

१७, १८. (अ) येशूच्या कोणत्या शब्दांमुळे अभिषिक्‍तांना व दुसऱ्‍या मेंढरांना यहोवाच्या प्रीतीत राहण्यास मदत होते? (ब) स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने आपल्याला कोणती मदत मिळेल?

१७ येशूचे पुढील शब्द सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाच नव्हे तर त्यांच्या सोबत्यांनाही लागू होतात: “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली तशी मीहि तुम्हावर प्रीति केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.”—योहान १५:८-१०.

१८ आपण सर्व देवाच्या प्रीतीत राहू इच्छितो आणि ही गोष्ट आपल्याला भरपूर फळ उत्पन्‍न करणारे ख्रिस्ती होण्याची प्रेरणा देते. यासाठी आपण ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचलतो. (मत्तय २४:१४) तसेच आपण वैयक्‍तिक जीवनात “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” प्रदर्शित करण्याचाही शक्य तितका प्रयत्न करतो. (गलतीकर ५:२२, २३) ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने असे करण्याचा आपला निर्धार अधिकच पक्का होईल कारण या प्रसंगी आपल्याला देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यावर दाखवलेल्या महान प्रेमाची आठवण करून दिली जाईल.—२ करिंथकर ५:१४, १५.

१९. पुढच्या लेखात मदतदायी ठरणाऱ्‍या कोणत्या गोष्टीविषयी चर्चा करण्यात येईल?

१९ स्मारकविधीची स्थापना केल्यानंतर येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना प्रतिज्ञा दिली की त्याचा पिता त्यांच्याकरता एक “कैवारी, म्हणजे पवित्र आत्मा” पाठवेल. (योहान १४:२६) हा आत्मा कशाप्रकारे अभिषिक्‍त जनांना आणि दुसऱ्‍या मेंढरांना यहोवाच्या प्रीतीत राहण्यास मदत करतो याचे पुढच्या लेखात परीक्षण केले जाईल.

[तळटीपा]

^ परि. 2 बायबलच्या आधारावर केलेल्या कालगणनेनुसार २००२ साली निसान १४ ही तारीख गुरूवार, मार्च २८ रोजी सूर्यास्ताच्या वेळी सुरू होते. त्या संध्याकाळी सबंध जगातील यहोवाचे साक्षीदार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्याकरता एकत्र होतील.

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पुस्तक, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी) अध्याय १९ व ३२ पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

• येशूने आपल्या शिष्यांना प्रेमळ सेवेविषयी कोणता व्यवहारोपयोगी धडा दिला?

• स्मारकविधीचा काळ कोणत्या बाबतीत आत्मपरीक्षण करण्याचा उत्तम काळ आहे?

• जगाकडून द्वेष व छळ केला जाण्याविषयी येशूने दिलेला इशारा वाचल्यावर आपल्याला अडखळण का होऊ नये?

• “खरा द्राक्षवेल” कोण आहे? “फाटे” कोण आहेत आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

येशूने त्याच्या प्रेषितांना प्रेमळ सेवा करण्याविषयी एक अविस्मरणीय धडा दिला

[१६, १७ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ताचे शिष्य आत्मत्यागी प्रीती दाखवण्याच्या त्याच्या आज्ञेचे पालन करतात