व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“डोंगरावर वसलेले नगर”

“डोंगरावर वसलेले नगर”

“डोंगरावर वसलेले नगर”

“तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही,” असे येशूने त्याच्या शिष्यांना डोंगरावरील त्याच्या प्रसिद्ध प्रवचनात सांगितले.—मत्तय ५:१४.

पुष्कळ यहुदी व गालिली शहरे खाली दऱ्‍यांऐवजी डोंगरांवर वसलेली असायची. असे उंच ठिकाण निवडण्यामागचे कारण होते, संरक्षण. इस्राएली लोकांच्या वस्त्यांवर सैन्यांचे आक्रमण हे व्हायचेच शिवाय, दरोडेखोरांच्या टोळ्या देखील दरोडा टाकायच्या. (२ राजे ५:२; २४:२) डोंगरावर जवळजवळ बांधलेल्या घरांमुळे लोक अगदी धैर्याने अशा हल्ल्यांचा सामना करू शकत होते; हेच जर ते खाली असते तर त्यांना जमले नसते, संरक्षणासाठी त्यांना त्यांच्या शहराभोवती खूप उंच भिंत बांधावी लागली असती.

यहुदी घरांच्या भिंतींना चुन्याचा गिलावा असल्यामुळे, एखाद्या डोंगरावरील चुना लावलेली, जवळजवळ बांधलेली ही घरे कित्येक किलोमीटर दूरवरून दिसत होती. (प्रेषितांची कृत्ये २३:३) आणि पॅलेस्टाईनमधील रखरखीत उन्हात, डोंगरांवरील ही शहरे एखाद्या दीपस्तंभासारखी चमकत असत; भूमध्यप्रदेशातील काही शहरे आजही अशीच चमकतात.

खऱ्‍या ख्रिश्‍चन व्यक्‍तीची काय भूमिका आहे हे आपल्या अनुयायांना शिकवण्यासाठी येशूने गालिली व यहुदी ग्रामीण भागाच्या या ठळक पैलूचा उपयोग केला. तो त्यांना म्हणाला: “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ख्रिस्ती लोक सत्कर्मे करीत नसले तरी, त्यांचे उत्तम आचरण हे लपत नाही.—मत्तय ६:१.

यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनांच्या दरम्यान खासकरून आपल्याला त्यांचे हे उत्तम आचरण पाहायला मिळते. स्पेनमधील एका वृत्तपत्राने, अलीकडेच झालेल्या एका अधिवेशनाच्या संदर्भात असे म्हटले: “इतर पंथांतील लोकांची धार्मिक विषयांमधील आस्था कमी होत चालली आहे परंतु यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत उलट घडत आहे. देवाचे वचन बायबल याची व्यावहारिकता त्यांना गमवायची नाही त्यामुळे ते त्यानुसार आचरण करतात.”

स्पेनच्या वायव्येकडे असलेले एक स्टेडियम साक्षीदार नेहमी वापरतात; त्या स्टेडियमची देखभाल करणारे थॉमस, देवाचे वचन आपल्या जीवनात लागू करणाऱ्‍या लोकांची खूप प्रशंसा करतात. त्यांना सेवानिवृत्ती मिळाली तेव्हा ती त्यांनी काही आठवडे पुढे ढकलली; कारण, त्या स्टेडियममध्ये होणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाला त्यांनाही उपस्थित राहायचे होते. अधिवेशनानंतर, लहानांपासून थोरांपर्यंत असे पुष्कळ उमेदवार, इतकी वर्षे त्यांना सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्‍त करायला आणि शुभेच्छा द्यायला गेले तेव्हा तर थॉमस यांना राहावलेच नाही. त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले: “तुम्हा लोकांबरोबर माझी ओळख झाली हा माझ्या जीवनातील सर्वात उत्तम अनुभव आहे.”

डोंगरावर वसलेले शहर लगेच दिसते कारण एकतर ते उंचावर असते आणि दुसरे कारण म्हणजे पांढऱ्‍या रंगाचे कोणतेही घर उन्हात चकाकते. तसेच, खरे ख्रिस्ती हे इतरांपासून वेगळे दिसतात कारण, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि दया याविषयीच्या उच्च शास्त्रवचनीय दर्जांचे पालन करण्याचा ते प्रयत्न करतात.

शिवाय, ख्रिस्ती लोक आपल्या प्रचार कार्याद्वारे सत्याचा प्रकाश चमकवतात. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही; . . . तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्‌द्विवेकाला आपणास पटवितो.” (२ करिंथकर ४:१, २) या ख्रिश्‍चनांनी जिथे जिथे प्रचार केला तिथे तिथे लोकांनी त्यांचा विरोध केला तरीपण यहोवाने त्यांच्या सेवेवर आशीर्वाद दिला; म्हणूनच, सा.यु. ६० च्या सुमारास पौल असे लिहू शकला की, “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार होत होता.—कलस्सैकर १:२३.

आज, यहोवाचे साक्षीदार येशूने आज्ञापिल्याप्रमाणे, ‘त्यांचा प्रकाश लोकांसमोर पाडण्याची’ जबाबदारीही अगदी गांभिर्याने पार पाडत आहेत. प्रचाराद्वारे आणि छापील साहित्यांद्वारे यहोवाचे साक्षीदार संपूर्ण जगभरातील २३५ देशांमध्ये राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करीत आहेत. होता होईल तितक्या लोकांपर्यंत बायबल सत्याचा प्रकाश पडावा म्हणून त्यांनी सुमारे ३७० भाषांमध्ये आज बायबल प्रकाशने उपलब्ध केली आहेत.—मत्तय २४:१४; प्रकटीकरण १४:६, ७.

अनेक ठिकाणी साक्षीदारांनी, जेथे प्रचार कार्यावर बंदी आहे किंवा आता घालण्यात आली आहे अशा देशांमधून स्थलांतर केलेल्या लोकांच्या भाषा शिकण्याचे नवीन आव्हान स्वीकारले आहे. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेतील अनेक मोठमोठ्या शहरांत, चीन व रशियातील असंख्य लोक राहायला आले आहेत. या नव्यानेच आलेल्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करता यावा म्हणून स्थानीय साक्षीदारांनी चीनी, रशियन आणि इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर, शेते “कापणीसाठी पांढरी” आहेत तोपर्यंत होता होईल तितक्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करता यावा म्हणून, अनेक भाषांचे क्रॅश कोर्सेस घेतले जात आहेत.—योहान ४:३५

यशया संदेष्ट्याने भाकीत केले: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.” आपले आचरण आणि आपली सेवा या दोन्ही मार्गांनी यहोवाचे साक्षीदार सगळीकडच्या लोकांना ‘परमेश्‍वराच्या मंदिराच्या डोंगराकडे’ येण्यास मदत करीत आहेत जेणेकरून त्यांना देवाच्या मार्गांविषयीचे शिक्षण मिळेल व ते त्याच्या मार्गांत चालायला शिकतील. (यशया २:२, ३) याचा आनंदी शेवट असेल असे येशूने दाखवले; हे सर्व लोक मिळून ‘स्वर्गातील पिता’ यहोवा देव याचे ‘गौरव करतील.’—मत्तय ५:१६; १ पेत्र २:१२.