व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला “सत्याचा आत्मा” मिळाला आहे का?

तुम्हाला “सत्याचा आत्मा” मिळाला आहे का?

तुम्हाला “सत्याचा आत्मा” मिळाला आहे का?

“[पिता] तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.”—योहान १४:१६.

१. येशूने आपल्या शिष्यांसोबत माडीवरच्या खोलीत घालवलेल्या शेवटल्या काही तासांत कोणती महत्त्वाची माहिती त्यांना दिली?

प्रभुजी, आपण कोठे जाता?” येशूने आपल्या प्रेषितांसोबत घालवलेल्या शेवटल्या काही तासांत त्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्‍नांपैकी हा देखील एक होता. (योहान १३:३६) त्यांची सभा काही काळ चालल्यानंतर येशूने त्यांना सांगितले की आता त्याची पित्याकडे जाण्याची वेळ आली होती. (योहान १४:२८; १६:२८) तो आता फार काळ शारीरिक रूपात त्यांच्यासोबत राहून त्यांना मार्गदर्शन व त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणार नव्हता. पण त्याने त्यांना असे म्हणून दिलासा दिला की: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी [किंवा “साहाय्य करणारा,” पं.र.भा. तळटीप] म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.”—योहान १४:१६.

२. आपण गेल्यावर काय पाठवण्याची येशूने त्याच्या शिष्यांना प्रतिज्ञा केली?

तो साहाय्य करणारा कोण आहे व तो त्यांना कशाप्रकारे साहाय्य करेल हे येशूने त्यांना सांगितले. त्याने त्यांना म्हटले: “ह्‍या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हाला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो. . . . मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. . . . तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.”—योहान १६:४, ५, ७, १३.

३. (अ) “सत्याचा आत्मा” आरंभीच्या ख्रिश्‍चनांसाठी केव्हा पाठवण्यात आला? (ब) पवित्र आत्मा कोणत्या एका महत्त्वाच्या मार्गाने त्यांच्याकरता एक “कैवारी” ठरणार होता?

ही प्रतिज्ञा सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी पूर्ण करण्यात आली; प्रेषित पेत्राने देखील या गोष्टीला दुजोरा दिला: “त्या येशूला देवाने उठविले ह्‍याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.” (प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३) पेन्टेकॉस्टच्या दिवशी ओतण्यात आलेल्या पवित्र आत्म्याने त्या आरंभीच्या ख्रिस्ती लोकांकरता बऱ्‍याच गोष्टी साध्य केल्या; याविषयी आपण नंतर पाहणारच आहोत. पण येशूने अशी प्रतिज्ञा केली की “सत्याचा आत्मा” त्यांना ‘ज्या गोष्टी येशूने सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देणार होता.’ (योहान १४:२६) येशूचे सेवाकार्य, त्याच्या शिकवणुकी, इतकेच काय त्याचे नेमके शब्द देखील त्यांच्या आठवणीत आणून ते लिहून ठेवण्यास मदत करणार होता. हे खासकरून वृद्ध प्रेषित योहानाला सहायक ठरणार होते कारण त्याने पहिल्या शतकाच्या शेवटास आपले शुभवर्तमान वृत्त लिहिण्यास घेतले; याच शुभवर्तमानात येशूने त्याच्या मृत्यूचा स्मारकविधी स्थापन करतेवेळी शिष्यांना दिलेले बहुमोल मार्गदर्शन देखील सापडते.—योहान, अध्याय १३-१७.

४. ‘सत्याच्या आत्म्याने’ प्रारंभीच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे मदत केली?

येशूने त्या प्रारंभीच्या शिष्यांना अशीही प्रतिज्ञा दिली की आत्मा त्यांना ‘सर्व गोष्टी शिकवेल’ आणि ‘त्यांना मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.’ आत्मा त्यांना शास्त्रवचनांतील गहन गोष्टी समजण्यास मदत करेल आणि त्यांच्या विचारांत, समजुतींत आणि उद्देशांत एकता राखेल. (१ करिंथकर २:१०; इफिसकर ४:३) अशारितीने, पवित्र आत्म्याने त्या प्रारंभीच्या ख्रिश्‍चनांना सामूहिक ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ या नात्याने कार्य करून वैयक्‍तिक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न’ पुरवण्यास समर्थ केले.—मत्तय २४:४५.

आत्मा साक्ष देतो

५. (अ) सा.यु. ३३ साली, निसान १४ च्या रात्री येशूने आपल्या शिष्यांकरता कोणते नवे द्वार खुले केले? (ब) येशूची प्रतिज्ञा पूर्ण करण्यात पवित्र आत्मा कोणती भूमिका बजावणार होता?

सा.यु. ३३ साली निसान १४ च्या रात्री, येशूने शिष्यांना याविषयी कल्पना दिली की तो त्यांना नंतर नेईल आणि ते त्याच्यासोबत व त्याच्या पित्यासोबत स्वर्गात राहतील. त्याने त्यांना सांगितले: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते; मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे.” (योहान १३:३६; १४:२, ३) ते त्याच्यासोबत त्याच्या राज्यात शासन करतील. (लूक २२:२८-३०) ही स्वर्गीय आशा त्यांना मिळण्यासाठी त्यांनी देवाचे आध्यात्मिक पुत्र म्हणून ‘आत्म्यापासून जन्म घेणे’ आणि ख्रिस्तासोबत राजे व याजक म्हणून स्वर्गात सेवा करण्याकरता अभिषिक्‍त होणे आवश्‍यक होते.—योहान ३:५-८; २ करिंथकर १:२१, २२; तीत ३:५-७; १ पेत्र १:३, ४; प्रकटीकरण २०:६.

६. (अ) स्वर्गीय पाचारणास केव्हा सुरवात झाली आणि किती जणांना अशाप्रकारे पाचारण करण्यात आले? (ब) ज्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी कशात बाप्तिस्मा घेतला?

हे ‘स्वर्गीय पाचारण’ सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुरू झाले आणि प्रामुख्याने १९३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत संपले असे दिसून येते. (इब्री लोकांस ३:१) पवित्र आत्म्याद्वारे आत्मिक इस्राएलचा भाग होण्याकरता ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या १,४४,००० असून त्यांना “माणसांतून [मानवजातीतून, NW] विकत घेतलेले आहेत.” (प्रकटीकरण ७:४; १४:१-४) यांनी ख्रिस्ताच्या आत्मिक शरीरात, त्याच्या मंडळीत आणि त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला आहे. (रोमकर ६:३; १ करिंथकर १२:१२, १३, २७; इफिसकर १:२२, २३) त्यांचा पाण्यात बाप्तिस्मा झाला व त्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले त्यानंतर त्यांनी एक बलिदानाचा मार्ग पत्करला आहे अर्थात मृत्यू होईपर्यंत विश्‍वासू जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी पत्करला आहे.—रोमकर ६:४, ५.

७. स्मारकविधीत यथायोग्यपणे केवळ अभिषिक्‍त ख्रिस्तीच सांकेतिक प्रतिके का ग्रहण करतात?

आत्मिक इस्राएली या नात्याने हे अभिषिक्‍त ख्रिस्ती यहोवा व ‘देवाचे इस्राएल’ यांच्यात करण्यात आलेल्या नव्या करारात सामील होते. (गलतीकर ६:१६; यिर्मया ३१:३१-३४) हा नवा करार ख्रिस्ताने ओतलेल्या रक्‍ताद्वारे अंमलात आला. येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना करताना याविषयी उल्लेख केला. लूकच्या अहवालाप्रमाणे: “त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुति करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्‍तांत नवा करार आहे. ते रक्‍त तुम्हांसाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:१९, २०) शेषवर्ग, किंवा १,४४,००० जनांपैकी अद्याप पृथ्वीवर असलेलेच केवळ ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीत यथायोग्यपणे सांकेतिक भाकरी व द्राक्षारस ग्रहण करू शकतात.

८. आपल्याला स्वर्गीय पाचारण झाले आहे हे अभिषिक्‍तांना कसे कळते?

आपल्याला स्वर्गीय पाचारण झाले आहे हे अभिषिक्‍तांना कसे कळते? त्यांना पवित्र आत्म्याकडून याची सुस्पष्ट साक्ष मिळते. प्रेषित पौलाने त्यांना असे लिहिले: “कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. . . . तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.” (रोमकर ८:१४-१७) आत्म्याची साक्ष इतकी जबरदस्त असते की ज्यांना आपल्या स्वर्गीय पाचारणासंबंधी किंचितही शंका असेल ते असा निष्कर्ष काढू शकतात की त्यांना हे पाचारण झालेले नाही आणि त्यामुळे हे लोक स्मारकविधीत प्रतिके ग्रहण करणार नाहीत.

पवित्र आत्मा व दुसरी मेंढरे

९. शुभवर्तमानांत आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात कोणत्या दोन वेगवेगळ्या गटांचा उल्लेख करण्यात आला आहे?

आत्मिक इस्राएलचे सदस्य होण्याकरता ज्यांना पाचारण केले जाईल त्यांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन येशूने त्यांना ‘लहान कळप’ म्हणून संबोधले; या लहान कळपाला नव्या कराराच्या ‘मेंढवाड्यात’ घेतले जाते. पण त्यांच्या तुलनेत ‘दुसऱ्‍या मेंढरांची’ संख्या अमर्याद होती व येशूने म्हटले की त्याला या मेंढरांनाही एकत्रित करायचे आहे. (लूक १२:३२; योहान १०:१६) अंतसमयादरम्यान एकत्रित केलेल्या या दुसऱ्‍या मेंढरांचा “मोठा लोकसमुदाय” बनणार होता ज्यांना ‘मोठ्या संकटातून’ बचावून परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा होती. सा.यु. पहिल्या शतकाच्या शेवटी योहानाला झालेल्या दृष्टान्तात हा मोठा लोकसमुदाय व आत्मिक इस्राएलाचे १,४४,००० सदस्य यांच्यातला फरक दाखवण्यात आला होता हे विशेष लक्षवेधक आहे. (प्रकटीकरण ७:४, ९, १४) दुसऱ्‍या मेंढरांनाही पवित्र आत्मा मिळतो का आणि जर मिळत असेल तर त्याचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो?

१०. दुसरी मेंढरे कोणत्या अर्थाने “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेतात?

१० पवित्र आत्मा दुसऱ्‍या मेंढरांच्या जीवनात देखील निश्‍चितच महत्त्वाची भूमिका बजावतो. यहोवाला केलेले आपले समर्पण चिन्हांकित करण्याकरता ते “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेतात. (मत्तय २८:१९) ते यहोवाचे सार्वभौमत्व मान्य करतात, ख्रिस्ताला आपला राजा व तारणकर्ता मान्य करून त्याच्या अधीन होतात आणि देवाच्या आत्म्याच्या किंवा त्याच्या कार्यकारी शक्‍तीच्या मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात अवलंब करतात. तसेच “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” अर्थात, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे गुण संपादन करण्याचा दिवसेंदिवस अधिकाधिक प्रयत्न करतात.—गलतीकर ५:२२, २३.

११, १२. (अ) अभिषिक्‍त जनांना अतिशय खास प्रकारे शुद्ध करण्यात आले आहे असे आपण का म्हणू शकतो? (ब) दुसऱ्‍या मेंढरांना कशाप्रकारे पवित्र व शुद्ध केले जाते?

११ दुसऱ्‍या मेंढरांनी देवाच्या वचनाला व त्याच्या पवित्र आत्म्याला आपले शुद्धीकरण किंवा, पवित्रीकरण देखील करू दिले पाहिजे. अभिषिक्‍त जनांना तर आधीच एका अतिशय खास प्रकारे शुद्ध करण्यात आले आहे कारण त्यांना ख्रिस्ताची वधू म्हणून नीतिमान व पवित्र घोषित करण्यात आले आहे. (योहान १७:१७; १ करिंथकर ६:११; इफिसकर ५:२३-२७) भविष्यवक्‍ता दानीएल याने त्यांना ‘मानव पुत्राच्या’ अर्थात येशू ख्रिस्ताच्या अधीन राज्य प्राप्त होईल असे ‘परात्पर देवाचे पवित्र जन’ म्हणून संबोधले. (दानीएल ७:१३, १४, १८, २७) आधी मोशे आणि अहरोन यांच्याद्वारे यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले होते: “मी परमेश्‍वर तुमचा देव आहे म्हणून आपणांस पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्‍या कोणत्याहि जातीच्या प्राण्यामुळे आपणांस विटाळू नका.”—लेवीय ११:४४.

१२ “पवित्रीकरण” या शब्दाचा अर्थ मुळात “शुद्ध करण्याची, अलिप्त करण्याची अथवा यहोवा देवाच्या सेवेकरता अथवा त्याच्या उपयोगाकरता वेगळे करण्याची क्रिया; पवित्र, किंवा शुद्ध केलेली स्थिती.” १९३८ सालीच टेहळणी बुरूज यात असे विधान करण्यात आले की योनादाब वर्ग म्हणजे दुसरी मेंढरे यांत समावेश होणाऱ्‍यांना “याची जाणीव असली पाहिजे की मोठ्या लोकसमुदायाचा भाग बनून पृथ्वीवर राहण्याची आशा बाळगणाऱ्‍यांकडून अर्पण [समर्पण] आणि पवित्रीकरण करण्याची अपेक्षा केली जाते.” प्रकटीकरणाच्या पुस्तकात मोठ्या लोकसमुदायाच्या दृष्टान्ताबद्दल आपण असे वाचतो, की त्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत” आणि “ते अहोरात्र [यहोवाच्या] मंदिरात त्याची [“पवित्र,” NW] सेवा करितात.” (प्रकटीकरण ७:९, १४, १५) पवित्र आत्म्याच्या साहाय्याने दुसरी मेंढरे पवित्रतेसंबंधी यहोवाच्या अपेक्षांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या परीने होईल तितका प्रयत्न करतात.—२ करिंथकर ७:१.

ख्रिस्ताच्या बांधवांचे बरे करणे

१३, १४. (अ) येशूच्या शेरडेमेंढरांच्या दृष्टान्तानुसार मेंढरांचे तारण कशावर अवलंबून आहे? (ब) या अंतसमयात दुसऱ्‍या मेंढरांनी ख्रिस्ताच्या बांधवांना कशाप्रकारे साहाय्य केले आहे?

१३ ‘या युगाच्या समाप्तीविषयी’ भविष्यवाणी करताना येशूने शेरडेमेंढरांचा दृष्टान्त दिला व त्यात त्याने दुसरी मेंढरे व लहान कळपाच्या आपसांतील घनिष्ट संबंधाकडे लक्ष वेधले. या दृष्टान्तात ख्रिस्ताने स्पष्टपणे दाखवले की ‘माझे बंधू’ असे त्याने ज्यांना संबोधले त्या अभिषिक्‍तांप्रती दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यांची कशी वागणूक आहे यावर त्यांचे तारण अवलंबून आहे. त्याने म्हटले: “तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांस म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. . . . मी तुम्हास खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्‍या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.”—मत्तय २४:३; २५:३१-३४, ४०.

१४ “ज्याअर्थी तुम्ही ह्‍या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले” हे ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांचे साहाय्य करण्याच्या प्रेमळ कृत्यांच्या संदर्भात म्हटले आहे. सैतानाच्या जगाने त्यांना परक्यांसारखे वागवले आणि त्यांच्यातील काहींना तुरुंगात डांबले. त्यांना अन्‍नाची, पुरेशा वस्त्रांची आणि आरोग्य सवलतींची वाण सोसावी लागली. (मत्तय २५:३५, ३६, तळटीप, NW) १९१४ सालापासून सुरू झालेल्या अंतसमयात, कित्येक अभिषिक्‍त बांधवांना अशा परिस्थितीतून जावे लागले आहे. यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक इतिहास दाखवून देतो की दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या त्यांच्या निष्ठावान सोबत्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमुळे या गरजू अभिषिक्‍त बांधवांना पाठबळ व साहाय्य दिले आहे.

१५, १६. (अ) दुसऱ्‍या मेंढरांनी खासकरून ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील अभिषिक्‍त बांधवांना कोणत्या कार्यात साहाय्य केले आहे? (ब) अभिषिक्‍त जनांनी दुसऱ्‍या मेंढरांविषयी वाटणारी कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्‍त केली आहे?

१५ या अंतसमयात पृथ्वीवर असलेल्या ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना खासकरून ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविण्याचे’ देवाने आज्ञापिलेले कार्य पूर्ण करण्याकरता दुसऱ्‍या मेंढरांनी सक्रिय मदत केली आहे. (मत्तय २४:१४; योहान १४:१२) पृथ्वीवरील अभिषिक्‍त जनांची संख्या दर वर्षी घटत चालली आहे पण दुसऱ्‍या मेंढरांची संख्या उत्तरोत्तर वाढून आता लाखोंच्या घरात गेली आहे. यांपैकी हजारो पूर्ण वेळेचे सुवार्तिक म्हणून—पायनियर व मिशनरी यानात्याने राज्याची सुवार्ता “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पसरवत आहेत. (प्रेषितांची कृत्ये १:८) इतरजण आपल्या परीने होईल तितका या साक्षकार्यात सहभाग घेतात आणि या कार्याला आनंदाने आर्थिक हातभार लावतात.

१६ ख्रिस्ताचे अभिषिक्‍त बांधव त्यांच्या दुसऱ्‍या मेंढरांतील निष्ठावान सोबत्यांच्या या साहाय्याची मनापासून कदर करतात! दास वर्गाने १९८६ साली पुरवलेल्या “शांतीच्या राजकुमाराच्या” शासनाधीन जागतिक सुरक्षितता (इंग्रजी) या पुस्तकात त्यांच्या भावना सुंदर रितीने व्यक्‍त करण्यात आल्या होत्या. त्यात असे म्हटले आहे: “दुसऱ्‍या महायुद्धापासून ‘युगाच्या समाप्तीविषयीच्या’ येशूच्या भविष्यवाणीची पूर्तता बऱ्‍याच प्रमाणात ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाने’ बजावलेल्या भूमिकेमुळेच शक्य झाली आहे . . . मत्तय २४:१४ यातील [येशूच्या] भविष्यवाणीची पूर्णता करण्यात उस्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय, बहुभाषिक ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ शतशः आभार!”

“आपणावाचून पूर्ण होऊ नये”

१७. प्राचीन काळातील ज्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांचे पृथ्वीवर पुनरुत्थान केले जाईल ते कशाप्रकारे ‘अभिषिक्‍तांवाचून पूर्ण केले जाणार नाहीत’?

१७ अभिषिक्‍तांपैकी एक या नात्याने, ख्रिस्ताच्या आधी होऊन गेलेल्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांच्या संदर्भात प्रेषित पौलाने असे म्हटले: “ह्‍या सर्वांबाबत त्यांच्या विश्‍वासाविषयी चांगली साक्ष दिली असताहि त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ति झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी [अभिषिक्‍तांसाठी] पूर्वीच नेमिले होते.” (इब्री लोकांस ११:३५, ३९, ४०) हजार वर्षांच्या काळात ख्रिस्त व स्वर्गात त्याचे १,४४,००० बांधव राजे व याजक या नात्याने कार्य करून ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे फायदे या पृथ्वीकरता लागू करतील. अशा रितीने दुसरी मेंढरे शरीर व आत्म्याने ‘पूर्ण केले जातील.’—प्रकटीकरण २२:१, २.

१८. (अ) बायबलमधील माहितीच्या आधारावर दुसऱ्‍या मेंढरांना काय समजायला मदत होते? (ब) दुसरी मेंढरे कोणती आशा बाळगून “देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची” वाट पाहात आहेत?

१८ या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर, ख्रिस्त व त्याच्या अभिषिक्‍त बांधवांवर आणि यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेत त्यांच्या कळीच्या भूमिकेवर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत इतका भर का देण्यात आला आहे हे दुसऱ्‍या मेंढरांच्या मनात स्पष्ट झाले पाहिजे. म्हणूनच दुसरी मेंढरे हर्मगिदोनाच्या वेळेस व हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान “देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची” वाट पाहात असताना अभिषिक्‍त दास वर्गाला कोणत्याही संभाव्य मार्गाने मदत करण्यास एक बहुमान समजतात. ते ‘नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळण्याची’ प्रतीक्षा करू शकतात.—रोमकर ८:१९-२१.

स्मारकविधी प्रसंगी आत्म्यात एकजूट

१९. ‘सत्याच्या आत्म्याने’ अभिषिक्‍तांकरता व त्यांच्या सोबत्यांकरता काय साध्य केले आहे आणि मार्च २८ च्या संध्याकाळी ते कोणत्या खासप्रकारे एकजूट होतील?

१९ सा.यु. ३३ साली निसान १४ च्या रात्री शेवटली प्रार्थना करताना येशूने म्हटले: “मी . . . विनंती करितो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीहि तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्‍वास जगाने धरावा.” (योहान १७:२०, २१) देवाने प्रेमापोटी आपल्या पुत्राला अभिषिक्‍त जनांच्या आणि जगातील आज्ञाधारक मानवजातीच्या तारणाकरता त्याचे जीवन अर्पण करण्याकरता पाठवले. (१ योहान २:२) ‘सत्याच्या आत्म्याने’ ख्रिस्ताच्या बांधवांना व त्यांच्या सोबत्यांना एक केले आहे. मार्च २८ रोजी सूर्यास्तानंतर, हे दोन्ही गट ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मरणार्थ आणि यहोवाने आपला प्रिय पुत्र, ख्रिस्त येशू याच्याद्वारे आपल्याकरता केलेल्या सर्व उपकारांच्या स्मरणार्थ एकत्र होतील. या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यातील एकता अधिक बळकट होवो आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ होवो जेणेकरून यहोवा ज्यांच्यावर प्रीती करतो अशांपैकी असण्याचा त्यांचा आनंद स्पष्टपणे प्रकट होईल.

उजळणी

• “सत्याचा आत्मा” आरंभीच्या ख्रिश्‍चनांवर केव्हा पाठवण्यात आला आणि तो कशाप्रकारे त्यांच्याकरता “साहाय्य करणारा” ठरला?

• आपल्याला स्वर्गीय पाचारण झाले आहे हे अभिषिक्‍तांना कशाप्रकारे कळते?

• देवाचा आत्मा दुसऱ्‍या मेंढरांवर कशाप्रकारे कार्य करतो?

• दुसऱ्‍या मेंढरांनी ख्रिस्ताच्या बांधवांकरता काय केले आहे आणि ते ‘अभिषिक्‍तांवाचून पूर्ण का केले जाणार नाहीत’?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी “सत्याचा आत्मा” शिष्यांवर ओतण्यात आला

[२३ पानांवरील चित्र]

दुसऱ्‍या मेंढरांनी प्रचार करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे ख्रिस्ताच्या बांधवांना साहाय्य केले आहे