व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निकदेम याच्याकडून धडा घ्या

निकदेम याच्याकडून धडा घ्या

निकदेम याच्याकडून धडा घ्या

“जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३) हे आमंत्रण मासे धरणाऱ्‍या काही नम्र लोकांनी आणि तुच्छ लेखलेल्या एका जकातदाराने लागलीच स्वीकारले. त्यांनी सर्वकाही मागे सोडून येशूला अनुसरले.—मत्तय ४:१८-२२; लूक ५:२७, २८.

येशूचे हे आमंत्रण आजही दिले जात आहे आणि अनेकांनी याला प्रतिसाद दिला आहे. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करायला आवडत असलेले काहीजण ‘आत्मत्याग करून स्वतःचा वधस्तंभ उचलायला’ मागेपुढे पाहतात. येशूचे शिष्य बनण्याची जबाबदारी आणि बहुमान स्वीकारण्यास ते इच्छुक नाहीत.

काहीजण येशूचे आमंत्रण स्वीकारायला आणि यहोवा देवाला स्वतःचे समर्पण करायला मागेपुढे का पाहतात? एकेश्‍वरवादाच्या यहूदी-ख्रिस्ती कल्पनेशी लहानपणापासून परिचित नसलेल्यांना एका व्यक्‍तिगत, सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची पूर्ण समज मिळायला बराच वेळ लागेल हे समजण्याजोगे आहे. परंतु, हा देव खरा आहे अशी खात्री पटल्यावरही काहीजण येशूच्या पावलांवर चालायला कचरतात. आपण यहोवाचे साक्षीदार बनलो तर नातेवाईक, मित्रमैत्रिणी काय म्हणतील याची त्यांना भीती वाटत असावी. इतरांना, आपण ज्या काळात राहात आहोत त्या काळाच्या निकडीचा विसर पडतो आणि ते पुन्हा नाव आणि पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. (मत्तय २४:३६-४२; १ तीमथ्य ६:९, १०) कोणतेही कारण असो, येशूचा अनुयायी होण्याचा निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्‍यांना येशूच्या काळातील धनवान यहूदी नेता निकदेम याच्या अहवालातून धडा घेता येईल.

सुसंधींचा बहुमान

येशूने त्याच्या पृथ्वीवरील सेवेला सुरवात करून केवळ सहा महिनेच झाले होते तेव्हा निकदेमाने हे ओळखले की येशू ‘देवापासून आलेला शिक्षक’ आहे. सा.यु. ३० च्या वल्हांडण सणी, येशूने जेरूसलेममध्ये नुकत्याच केलेल्या चमत्कारांनी प्रभावित होऊन निकदेम रात्रीचा येशूकडे येऊन त्याच्यावर त्याचा विश्‍वास असल्याचे कबूल करतो. त्याला या शिक्षकाविषयी अधिक जाणूनही घ्यायचे होते. त्या वेळी, देवाच्या राज्यात प्रवेश करायला ‘नव्याने जन्म’ घेण्याची गरज आहे हे गहन सत्य येशू निकदेमाला सांगतो. या प्रसंगी येशू असेही म्हणतो: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१-१६.

निकदेमासमोर किती अद्‌भुत भविष्य! तो येशूचा जवळचा सहकारी बनू शकत होता आणि पृथ्वीवरील येशूच्या जीवनाचे विविध पैलू प्रत्यक्षात पाहू शकत होता. यहूद्यांचा शासक आणि इस्राएलमध्ये शिक्षक यानात्याने, निकदेमाला देवाच्या वचनाचे बऱ्‍यापैकी ज्ञान होते. येशू हा देवाने पाठवलेला शिक्षक आहे हे त्याने ओळखले यावरून त्याला सूक्ष्मदृष्टी असल्याचेही दिसून येते. निकदेमाला आध्यात्मिक गोष्टींबद्दल रस होता आणि तो अत्यंत नम्र मनुष्य होता. यहूद्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचा सदस्य एका साध्या सुताराच्या मुलाला तो देवाने पाठवलेला आहे असे स्वीकारतो हे किती अवघड असावे! येशूचा शिष्य बनण्यासाठी हे सर्व गुण असणे महत्त्वाचे होते.

नासरेथच्या या मनुष्याबद्दल निकदेमाची जिज्ञासा कमी होत नाही. अडीच वर्षांनंतर, मंडपांच्या सणात निकदेम सन्हेद्रिनच्या एका सभेत उपस्थित होता. त्या वेळी, निकदेम अद्याप “त्यांच्यापैकी एक होता.” मुख्य याजकांनी आणि परुश्‍यांनी येशूला धरायला कामदार पाठवले होते. कामदार त्यांच्याकडे परत येऊन म्हणाले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” मग परुशी त्यांना हिणवून म्हणाले: “तुम्हीहि फसला आहा काय? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परूश्‍यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” निकदेमाला आणखी शांत बसवले नाही. तो म्हणाला: “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करितो ह्‍याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करिते काय?” यावर इतर परुशी त्याच्यावर उलटले आणि म्हणाले: “तुम्हीहि गालीलातले आहा काय? शोध करुन पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्‌भवत नाही.”—योहान ७:१, १०, ३२, ४५-५२.

सुमारे सहा महिन्यांनंतर, सा.यु. ३३ च्या वल्हांडणाच्या दिवशी, वधस्तंभावरून येशूचा मृतदेह उतरवताना निकदेम पाहतो. मग तो सन्हेद्रिनच्या आणखी एका सदस्यासोबत, अरिमथाईकर योसेफासोबत मिळून येशूच्या देहाला दफनासाठी तयार करतो. याकारणास्तव, निकदेम गंधरस आणि अगरु यांचे सुमारे शंभर रोमन रत्तल मिश्रण अर्थात ३३ किलो इतके मिश्रण घेऊन येतो. हे अत्यंत महागामोलाचे होते. शिवाय, त्याच्या बरोबरचे परुशी येशूला “ठक” असे संबोधत असताना त्याच व्यक्‍तीशी जवळीक असल्याचे दाखवणे म्हणजे धाडसीपणाचे होते. दफनासाठी येशूचे शरीर लवकर तयार करून त्या दोघांनी येशूला जवळपासच्या एका नवीन कबरेत ठेवले. त्या वेळी देखील, निकदेमाची ओळख येशूचा शिष्य अशी केलेली नाही!—योहान १९:३८-४२; मत्तय २७:६३; मार्क १५:४३.

त्याने पाऊल का उचलले नाही

निकदेमाने स्वतःचा ‘वधस्तंभ उचलून’ येशूला का अनुसरले नाही हे योहानाने आपल्या अहवालात प्रकट केलेले नाही. परंतु, त्याने काही सुगावे दिले आहेत ज्यावरून हा परुशी निर्णय घ्यायला का कचरत होता याचे कारण आपल्याला मिळू शकते.

सर्वात प्रथम, योहानाने सांगितले हा यहूदी नेता येशूकडे “रात्रीचा” आला होता. (योहान ३:२) एका बायबल विद्वानानुसार, “निकदेम येशूकडे रात्रीचा आला, त्याला भीती वाटत होती म्हणून नव्हे तर येशूसोबत त्याला निवांत बोलता यावे, लोकांची गर्दी नसावी म्हणून.” परंतु, योहानाने ज्या संदर्भात अरिमथाईकर योसेफ “येशूचा एक शिष्य असून यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता” असे सांगितले त्यातच त्याने निकदेमाविषयी म्हटले की, तो “[येशूकडे] पहिल्याने रात्रीचा” आला होता. (योहान १९:३८, ३९) यामुळे, “यहूद्यांच्या भीतीमुळे” निकदेम येशूकडे रात्रीचा आला असण्याची शक्यता आहे कारण त्याच्या काळातील इतरांना येशूसोबत कोणतेही संबंध ठेवण्याची भीती होती.—योहान ७:१३.

तुम्हीसुद्धा नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा सहकर्मचारी काय म्हणतील या भीतीमुळे येशूचे शिष्य बनण्याचा निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई करत आहात का? एक नीतिसूत्रे म्हणते, “मनुष्याची भीती पाशरूप होते.” मग या भीतीला कसे तोंड द्यावे? तेच नीतिसूत्र पुढे म्हणते: “पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” (नीतिसूत्रे २९:२५) यहोवावरील तो भरवसा वाढवण्यासाठी तुम्ही अडचणीत असता तेव्हा देव तुमचे रक्षण करील याचा तुम्ही स्वतः अनुभव घेतला पाहिजे. यहोवाला प्रार्थना करून तुमच्या उपासनेतील अगदी लहानसहान निर्णय घ्यायलाही तुम्हाला धैर्य देण्याची विनंती करा. हळूहळू, यहोवावर तुमचा विश्‍वास आणि भरवसा इतका वाढेल की, देवाच्या इच्छेनुरूप अगदी मोठे निर्णय देखील तुम्ही घेऊ शकाल.

कदाचित पुढारी वर्गातील सदस्य या नात्याने निकदेमाचे पद आणि प्रतिष्ठा देखील त्याला स्वतःचा त्याग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये बाधा आणत असावेत. त्या वेळी, कदाचित सन्हेद्रिनचा सदस्य असण्याचे पद त्याला अधिक प्रिय असावे. समाजात प्रतिष्ठेचे स्थान गमवावे लागेल किंवा बढतीच्या संबंधाने काही त्याग करावे लागतील म्हणून ख्रिस्ताचा अनुयायी होण्यासाठी पाऊल उचलायला तुम्ही कचरता का? यातल्या कोणत्याही गोष्टींची तुलना, विश्‍वाच्या त्या सर्वोच्च व्यक्‍तीची सेवा करण्याच्या बहुमानाशी करता येणार नाही, जो त्याच्या इच्छेनुरूप असलेल्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास तयार असतो.—स्तोत्र १०:१७; ८३:१८; १४५:१८.

निकदेमाची धनसंपत्ती हे त्याच्या दिरंगाई मागचे आणखी एक कारण असावे. परुशी यानात्याने तो, “धनलोभी” असलेल्या इतरांच्या प्रभावात आला असावा. (लूक १६:१४) गंधरस आणि अगरु ह्‍यांचे महागडे मिश्रण तो आणू शकला यावरून तो श्रीमंत होता हे कळते. आज काहीजण ख्रिश्‍चन होण्यामधील जबाबदाऱ्‍या घेण्याचा निर्णय पुढे ढकलत राहतात कारण त्यांना आपल्या भौतिक वस्तूंची चिंता लागून असते. परंतु, येशूने आपल्या अनुयायांना असे म्हटले: “ह्‍यास्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्‍याची चिंता करीत बसू नका. . . . तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:२५-३३.

त्याला पुष्कळ त्याग करावे लागणार होते

मनोरंजक गोष्ट अशी की, केवळ योहानाच्या शुभवर्तमानात आढळणाऱ्‍या निकदेमाच्या अहवालात तो शेवटी येशूचा अनुयायी बनला की नाही याविषयी काहीच सांगितलेले नाही. एका आख्यायिकेनुसार, निकदेमाने येशूला स्वीकारले, बाप्तिस्मा घेतला, यहूदी त्याचा छळ करू लागले, त्याला पदच्यूत करण्यात आले आणि शेवटी जेरूसलेममधून घालवण्यात आले. प्रत्यक्षात काय घडले हे आपल्याला ठाऊक नसले तरी एक गोष्ट मात्र पक्की होती की: येशू या पृथ्वीवर होता तेव्हा दिरंगाई केल्यामुळे त्याला बऱ्‍याच संधी मुकाव्या लागल्या.

निकदेम प्रभूला प्रथम भेटला तेव्हाच जर तो येशूचे अनुसरण करायला तयार झाला असता तर तो त्याचा एक जवळचा शिष्य बनला असता. निकदेमाचे ज्ञान, समज, नम्रता आणि आध्यात्मिक गरजांची जाणीव यांमुळे तो एक उल्लेखनीय शिष्य बनला असता. त्याला थोर शिक्षकाची प्रभावी भाषणे ऐकायला मिळाली असती, येशूच्या दृष्टान्तांमधून महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले असते, येशूने केलेले अद्‌भुत चमत्कार पाहायला मिळाले असते आणि जाण्याआधी आपल्या प्रेषितांना येशूने दिलेल्या सल्ल्यातून मजबुती मिळवली असती. पण हे सर्व त्याला मुकावे लागले.

निकदेमाने निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यामुळे त्याचे बरेच नुकसान झाले. “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे,” या येशूच्या प्रेमळ निमंत्रणाचाही तो फायदा मिळवू शकला नाही. (मत्तय ११:२८-३०) स्वतः येशूकडून हा विसावा अनुभवण्याची संधी त्याने मुकली!

तुमच्याबद्दल काय?

१९१४ पासून येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा बनला आहे. त्याच्या उपस्थितीदरम्यान काय घडेल याविषयी सांगताना तो असेही म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) अंत येण्याआधी जागतिक प्रचाराचे हे कार्य पूर्ण केले पाहिजे. अपरिपूर्ण मानव यात सामील होतात याचा येशू ख्रिस्ताला आनंद होतो. तुम्हीसुद्धा या कार्यात सामील होऊ शकता.

येशूला देवाने पाठवले आहे हे निकदेमाने ताडले होते. (योहान ३:२) बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हीसुद्धा हे मानत असाल. बायबलच्या दर्जांनुसार असण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवनशैलीत बदल केले असतील. शिवाय, बायबलची अधिक माहिती घेण्याकरता तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना देखील उपस्थित राहत असाल. तुमचे हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. तरीपण, निकदेमाच्या बाबतीत पाहिल्यास, येशूला देवाने पाठवले आहे ही केवळ समज बाळगणे पुरेसे नव्हते तर त्याने अधिक कार्य करायला हवे होते. त्याने ‘आत्मत्याग करून दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून येशूला अनुसरायचे होते.’—लूक ९:२३.

प्रेषित पौल आपल्याला काय सांगतो त्याकडे विशेष लक्ष द्या. त्याने लिहिले: “आम्ही त्याच्यासह कार्य करिता करिता विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये; कारण तो म्हणतो: ‘अनुकूलसमयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले;’ पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.”—२ करिंथकर ६:१, २.

तुम्हाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा विश्‍वास निर्माण करण्याची वेळ आताच आहे. त्यासाठी, बायबलमध्ये तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींवर मनन करा. यहोवाला प्रार्थना करा, आणि तुम्हाला असा विश्‍वास प्रदर्शित करता यावा म्हणून त्याच्याकडे मदत मागा. त्याच्या मदतीचा तुम्हाला प्रत्यय येईल तेव्हा त्याच्याबद्दल तुमची कृतज्ञता आणि प्रेम वाढेल व तुम्ही ‘आत्मत्याग करून दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून येशूला अनुसरायला’ प्रवृत्त व्हाल. तर मग, तुम्ही आताच पाऊल उचलाल का?

[९ पानांवरील चित्र]

सुरवातीला, निकदेमाने धाडसाने येशूची बाजू घेतली

[९ पानांवरील चित्र]

विरोध असतानाही, निकदेमाने दफनासाठी येशूचा देह तयार करण्यात मदत केली

[१० पानांवरील चित्र]

व्यक्‍तिगत अभ्यास आणि प्रार्थना यांमुळे पाऊल उचलण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळू शकेल

[१० पानांवरील चित्र]

येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची सुसंधी तुम्ही स्वीकाराल का?