व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाने आम्हाला सहनशक्‍ती दाखवायला व धीर धरायला शिकवले

यहोवाने आम्हाला सहनशक्‍ती दाखवायला व धीर धरायला शिकवले

जीवन कथा

यहोवाने आम्हाला सहनशक्‍ती दाखवायला व धीर धरायला शिकवले

आरीस्टॉटलीस आपॉस्टोलीडीस यांच्याद्वारे कथित

कॉकसस पर्वतांच्या उत्तरेकडील पायथ्याशी प्याटीगॉर्स्क नावाचे शहर वसलेले आहे. औषधी पाण्याचे झरे आणि सुखावह हवामानाकरता सुप्रसिद्ध असलेल्या या रशियन शहरात १९२९ साली ग्रीक निर्वासितांच्या कुटुंबात माझा जन्म झाला. स्टॅलिनप्रणीत पक्षशुद्धीचा, दहशत आणि जातीय संहाराचा भयानक काळ ओसरल्यावर दहा वर्षांनी आम्ही पुन्हा निर्वासित बनलो आणि आम्हाला पुन्हा एकदा ग्रीसला परतावे लागले.

ग्रीसच्या पायरीअस शहरात राहायला गेल्यानंतर “निर्वासित” या शब्दाचा एक नवीनच अर्थ आम्हाला कळू लागला. आम्हाला इथे अगदी परक्यासारखे वाटू लागले. माझ्या भावाला आणि मला सॉकरेटिस व ॲरिस्टॉटल या दोन सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्यांची नावे दिली असूनही या नावाने क्वचितच आम्हाला कोणी हाक मारायचे. सर्वजण आम्हाला रशियन पोरं म्हणून संबोधायचे.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काही काळातच माझ्या प्रिय आईचा मृत्यू झाला. ती आमच्या घराचे सर्वस्व होती; ती गेल्यामुळे आमच्यावर जणू आभाळ कोसळले. काही काळापासून ती आजारी असल्यामुळे तिने मला घरातली बरीचशी कामे करायला शिकवले होते. नंतरच्या जीवनात मला या शिकलेल्या गोष्टी खूप कामी पडल्या.

युद्ध आणि सुटका

युद्ध, नात्झींचा अंमल आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्यांकडून अहोरात्र बॉम्बवर्षाव यामुळे प्रत्येक दिवस जणू हा शेवटचाच असेल असे आम्हाला भासायचे. सर्वत्र दारिद्र्‌य, उपासमार आणि मृत्यूचे साम्राज्य होते. वडील, भाऊ व मी अशा तिघांचे पोट भरण्याकरता वयाच्या ११ व्या वर्षापासूनच मला माझ्या वडिलांसोबत खूप कष्ट करावे लागले. ग्रीक भाषा नीट येत नसल्यामुळे, तसेच युद्ध आणि त्याच्या नंतरच्या दुष्परिणामांमुळे माझे शालेय शिक्षणही अर्धवटच झाले.

१९४४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ग्रीसवरील जर्मन अंमल संपुष्टात आला. त्यानंतर काही काळातच मी यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आलो. त्या काळच्या दुःखद परिस्थितीत देवाच्या राज्यातील उज्ज्वल भविष्याची आशा माझ्या अंतःकरणाला भिडली. (स्तोत्र ३७:२९) याच पृथ्वीवर शांतीमय परिस्थितीत सार्वकालिक जीवनाची देवाने दिलेली प्रतिज्ञा माझ्या जखमांकरता वेदनाहारक ठरली. (यशया ९:७) १९४६ साली माझ्या वडिलांनी व मी यहोवाला केलेल्या आमच्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला.

पुढच्या वर्षी मला माझी पहिली नेमणूक मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला. पायरीअसमध्ये सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्‍या मंडळीत मला ॲडव्हर्टाइजिंग सर्व्हंट (नंतर ज्यांना मॅगझीन सर्व्हंट म्हणण्यात येऊ लागले) म्हणून सेवा करायची होती. आमचे क्षेत्र पायरीअसपासून जवळजवळ ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या इल्युसिसपर्यंत होते. त्याकाळी आमच्या मंडळीत बरेच आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती सेवा करत होते. मला त्यांच्यासोबत कार्य करण्याची आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची सुसंधी मिळाली. मला त्यांच्या सहवासात राहायला खूप आवडायचे कारण प्रचार कार्य करण्यासाठी लागणाऱ्‍या कष्टदायक प्रयत्नांविषयी त्यांच्याजवळ सांगण्यालायक असंख्य अनुभव होते. त्यांच्या जीवनावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती, आणि ती म्हणजे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्याकरता खूप सहनशक्‍ती आणि चिकाटी दाखवावी लागते. (प्रेषितांची कृत्ये १४:२२) आज या भागात यहोवाच्या साक्षीदारांच्या ५० पेक्षा अधिक मंडळ्या पाहून मला खूप आनंद होतो!

अनपेक्षित आव्हान

काही काळानंतर पॅट्रस शहरात राहणाऱ्‍या एका सुंदर, उत्साही ख्रिस्ती तरुणीशी माझी ओळख झाली. तिचे नाव एलिनी. १९५२ सालच्या शेवटी आमची मागणी झाली. पण दोन-तीन महिन्यांनंतर एलिनी खूप आजारी पडली. डॉक्टरांनी तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान केले आणि तिची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. बराच प्रयत्न केल्यानंतर शेवटी आम्हाला अथेन्स येथे एक डॉक्टर सापडले जे—त्याकाळात पुरेशी साधने उपलब्ध नसूनही—आमच्या धार्मिक विश्‍वासांचा आदर करून रक्‍ताविना शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. (लेवीय १७:१०-१४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या भावी पत्नीच्या प्रकृतीविषयी थोड्या साशंकतेनेच आशादायक निदान दिले पण तिचा आजार पुन्हा उलटण्याची शक्यता असल्याचेही सांगितले.

आता मी काय करावे? परिस्थिती बदलल्यामुळे मागणी तोडून मोकळे व्हावे का? नाही! मागणी करताना, मी एक वचन दिले होते आणि माझे हो म्हणजे हो असावे अशी माझी इच्छा होती. (मत्तय ५:३७) माघार घेण्याचा मी क्षणभरही विचार केला नाही. मोठ्या बहिणीच्या सुश्रृषेनंतर एलिनीला थोडे बरे वाटू लागले. १९५४ साली डिसेंबरमध्ये आमचे लग्न झाले.

तीन वर्षांनंतर एलिनीचा आजार पुन्हा उलटला आणि पुन्हा त्याच डॉक्टरांना तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करणे भाग पडले. या वेळी त्यांनी मेंदूत आणखी खोलपर्यंत जाऊन ट्यूमर पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या पत्नीचे अर्धे शरीर लुळे पडले आणि तिची वाचाशक्‍ती जवळजवळ गेल्यातच जमा झाली. आता आम्हा दोघांना अगदी अनोळखी आव्हानांना सामोरे जायचे होते. माझ्या प्रिय पत्नीला अगदी साधेसे काम देखील अशक्यप्राय झाले होते. तिची स्थिती खालावत चालली होती आणि त्यामुळे आमच्या दररोजच्या जीवनात आम्हाला मोठे बदल करावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला असाधारण सहनशक्‍ती दाखवून धीराने वागावे लागले.

आईने दिलेले धडे मला जीवनाच्या या वळणावर अत्यंत उपयोगी ठरले. दररोज सकाळी मी स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवत असे आणि एलिनी स्वयंपाक करत असे. कित्येकदा आम्ही पूर्णवेळेचे सेवक, आमच्यासोबत बायबल अभ्यास करणारे आणि गरजू ख्रिस्ती बांधवांना घरी जेवायला बोलावत असू. आम्ही तयार केलेले पदार्थ खूपच रुचकर आहेत असे ते सर्वजण नेहमी म्हणायचे! एलिनी आणि मी घरातली इतर कामे देखील मिळून करायचो, त्यामुळे आमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असायचे. अशी ही आव्हानात्मक जीवनशैली ३० वर्षे चालणार होती.

आजारपणातही आवेशी

माझ्या पत्नीचे यहोवावरील प्रेम आणि सेवाकार्यातील तिचा आवेश किंचितही कमी झाला नाही हे पाहून माझ्या आणि इतरांच्या मनावर देखील मोठा परिणाम झाला. कालांतराने, सतत प्रयत्नांमुळे एलिनी काही मोजक्या शब्दांत स्वतःला व्यक्‍त करण्यास समर्थ झाली. तिला रस्त्यावर लोकांना थांबवून त्यांना बायबलमधून सुवार्ता सांगायला खूप आवडायचे. मी कामानिमित्ताने बाहेर जायचो तेव्हा तिला देखील सोबत न्यायचो आणि रहदारी असलेल्या एखाद्या फुटपाथजवळ गाडी उभी करायचो. ती कारची खिडकी उघडून ठेवायची आणि येणाऱ्‍या जाणाऱ्‍यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके द्यायची. एकदा तर तिने दोन तासांत ८० नियतकालिके दिली! कित्येकदा ती मंडळीजवळ उपलब्ध असलेली सर्व जुनी मासिके संपवून टाकायची. एलिनी इतर प्रकारच्या प्रचार कार्यातही नियमित सहभाग घेत होती.

असहाय्य स्थितीत असूनही त्या सर्व वर्षांत माझी पत्नी प्रत्येक सभेला माझ्यासोबत असायची. तिने एकही अधिवेशन किंवा संमेलन कधी चुकवले नाही; ग्रीसमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी असल्यामुळे आम्हाला दुसऱ्‍या देशात प्रवास करून जावे लागले तरीसुद्धा तिने अधिवेशन चुकवले नाही. तिला स्वतःला इतक्या अडचणी असूनही ती ऑस्ट्रिया, जर्मनी, सायप्रस आणि इतर अनेक देशांत अधिवेशनांना उपस्थित राहिली. एलिनीने कधीही कशाविषयीही तक्रार केली नाही; यहोवाच्या सेवेतील माझ्या वाढत्या जबाबदाऱ्‍यांमुळे कधीकधी तिची गैरसोय व्हायची, पण तिने कधी तक्रार केली नाही की कधी ती हट्टीपणाने वागली नाही.

माझे विचाराल, तर या परिस्थितीमुळे मला सहनशक्‍ती दाखवण्याचे आणि धीर धरण्याचे जणू दीर्घकालीन प्रशिक्षण मिळाले. कित्येकदा मला यहोवाच्या मदतीचा अनुभव आला. मंडळीतले भाऊ व बहिणी आम्हाला कोणत्याही मार्गाने मदत करण्यासाठी बरेच त्याग करायचे आणि डॉक्टरांनीही आम्हाला अतिशय चांगले साहाय्य पुरवले. त्या सर्व कठीण वर्षांत, आमच्या परिस्थितीमुळे पूर्णवेळची नोकरी करणे माझ्यासाठी शक्य नव्हते तरीसुद्धा आम्हाला आवश्‍यक वस्तूंची कधीही कमतरता भासली नाही. आम्ही जीवनात नेहमी यहोवाच्या कार्याला व सेवेलाच सर्वाधिक प्राधान्य दिले.—मत्तय ६:३३.

त्या परीक्षेच्या काळात आम्हाला कशामुळे तग धरून राहता आले असे बरेच जण विचारतात. मागे वळून पाहताना मला जाणीव होते की बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास, देवाला मनःपूर्वक प्रार्थना, ख्रिस्ती सभांत नियमित उपस्थिती आणि प्रचार कार्यात आवेशी सहभाग यामुळेच आमची सहनशक्‍ती आणि धीर वाढत गेला. स्तोत्र ३७:३-५ यांतील प्रोत्साहनदायक शब्दांची आम्हाला नेहमी आठवण होत असे: “परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग . . . परमेश्‍वराच्या ठायी तुला आनंद होईल; . . . आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.” (स्तोत्र ३७:३-५) आम्हाला अतिशय सहायक ठरलेले आणखी एक वचन स्तोत्र ५५:२२ हे होते: “आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” आपल्या पित्यावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्‍या मुलाप्रमाणे आम्ही आमचे सर्व भार यहोवावरच टाकायचो आणि पुन्हा तो स्वतःवर घेण्याचा कधी प्रयत्न करत नव्हतो.—याकोब १:६.

एप्रिल १२, १९८७ रोजी माझी पत्नी आमच्या घरासमोर प्रचार कार्य करत होती; एक मोठे लोखंडी दार तिच्यामागे जोराने बंद झाले. ती समोरच्या फुटपाथवर फेकली गेली ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेमुळे ती पुढची तीन वर्षे बेशुद्धावस्थेत होती. १९९० सालच्या सुरवातीला तिचा मृत्यू झाला.

यहोवाची पूर्ण शक्‍तीने सेवा करणे

१९६० साली मला नीकेआ, पायरीअस येथे काँग्रीगेशन सर्व्हंट म्हणून सेवा करण्यास नेमण्यात आले. तेव्हा पासून पायरीअसच्या कितीतरी मंडळ्यांत सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला आहे. मला स्वतःची मुले नसली तरीही, मला कित्येक आध्यात्मिक मुलांना सत्यात स्थिरावण्यास मदत करण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांपैकी काही आता मंडळीत वडील, सेवासेवक, पायनियर सेवक आणि बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत.

१९७५ साली ग्रीसमध्ये लोकशाही पुन्हा स्थापन करण्यात आल्यावर यहोवाच्या साक्षीदारांना पुन्हा एकदा खुलेआम आपली अधिवेशने भरवणे शक्य झाले, आता त्यांना जंगलात एकत्र होण्याची गरज नव्हती. परदेशांतील अधिवेशने आयोजित करताना आम्हापैकी काहींना मिळालेला अनुभव आता खूपच उपयोगी पडला. अशारितीने मला कित्येक वर्षांपर्यंत कित्येक अधिवेशन समितींवर कार्य करण्याची सुसंधी मिळाली.

मग १९७९ साली अथेन्स शहरापासून थोड्या अंतरावर ग्रीसमधील पहिले संमेलन गृह बांधण्याची योजना आखण्यात आली. मला या मोठ्या बांधकाम प्रकल्पात मदत करण्यास व त्याचे समायोजन करण्यास नेमण्यात आले. या कामातही बरीच सहनशक्‍ती दाखवण्याची आणि धीर धरण्याची गरज होती. आत्मत्यागी वृत्तीच्या बंधूभगिनींसोबत तीन वर्षे काम केल्यामुळे आमच्यात प्रीती व एकोप्याचे मजबूत बंधन निर्माण झाले. या प्रकल्पातील अनुभवांच्या आठवणी माझ्या हृदयावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

तुरुंगवासियांच्या आध्यात्मिक गरजा भागवणे

काही वर्षांनंतर आणखी एक सुसंधी चालून आली. कोरीडालोस येथे माझ्या मंडळीच्या क्षेत्राजवळच ग्रीसमधील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक तुरुंग आहे. एप्रिल १९९१ पासून मला यहोवाच्या साक्षीदारांचा सेवक या नात्याने या कारागृहाला दर आठवडी भेट देण्यास नेमण्यात आले. तेथे इच्छुक असणाऱ्‍या तुरुंगवासियांसोबत बायबल अभ्यास व ख्रिस्ती सभा चालवण्यास परवानगी आहे. अशा कितीतरी तुरुंगवासियांनी स्वतःच्या वर्तनात लक्षणीय बदल केले आहेत आणि याद्वारे देवाच्या वचनातील अद्‌भुत शक्‍तीचा पुरावा दिला आहे. (इब्री लोकांस ४:१२) याची कारागृहाच्या कर्मचारी वर्गावर तसेच इतर तुरुंगवासियांवर उत्तम छाप पडली आहे. मी ज्यांच्यासोबत अभ्यास केला होता अशा काही तुरुंगवासियांची सुटका झाली असून आता ते सुवार्तेचे प्रचारक बनले आहेत.

काही काळ मी तीन कुख्यात अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांसोबत अभ्यास करत होतो. त्यांनी जसजशी आध्यात्मिक प्रगती केली तसतसा त्यांच्यात बदल होऊ लागला. ते दाढी करून, केस नीट विंचरून इतकेच काय, तर ग्रीसमध्ये सर्वात जास्त उष्णता असते त्या ऑगस्ट महिन्यात टाय लावून अभ्यासाला येऊ लागले! तुरुंगाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य वॉर्डन आणि इतर काही कर्मचारी आपापल्या कार्यालयातून खास हे अनोखे दृश्‍य पाहायला बाहेर आले. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना!

कारागृहाच्या महिलांच्या विभागात आणखी एक प्रोत्साहन देणारा अनुभव आला. एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. या स्त्रीला खुनाच्या आरोपावरून जन्मठेप झाली होती. तुरुंगात या स्त्रीला तिच्या दंगेखोर वागणुकीमुळे सर्व ओळखत होते. पण ती बायबलमधून शिकत असलेल्या सत्यामुळे लवकरच तिच्या वागणुकीत इतके आश्‍चर्यजनक बदल होऊ लागले की बऱ्‍याच जणांनी म्हटले की ती सिंहासारखी होती पण आता कोकऱ्‍यासारखी झाली आहे! (यशया ११:६, ७) लवकरच तुरुंगाची महिला अधिकारी तिचा आदर करू लागली आणि तिच्यावर भरवसा करू लागली. या स्त्रीने उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि यहोवाला समर्पण करण्याची पायरी देखील तिने गाठली हे पाहून मला अत्यंत आनंद वाटला.

आजारी आणि वयोवृद्धांना साहाय्य

माझ्या पत्नीने तिच्या आजारपणाला दीर्घकाळपर्यंत दिलेल्या लढ्याने मला आजारी आणि वयस्क लोकांच्या गरजांबद्दल अधिक संवेदनशील बनवले आहे. अशा लोकांना प्रेमळ साहाय्य पुरवण्यास आपल्या प्रकाशनांत प्रोत्साहन देण्यात यायचे तेव्हा माझा उत्साह अधिकच जागृत होत असे. हे सर्व लेख मी अगदी जपून ठेवले. टेहळणी बुरूज जुलै १५, १९६२ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या, “वयस्क व आजारी असणाऱ्‍यांविषयी विचारशीलता दाखवणे,” या पहिल्या लेखापासून काही वर्षांनंतर माझ्याजवळ जवळजवळ १०० पानांची फाईलच तयार झाली होती. यातील बऱ्‍याच लेखांत असे सांगण्यात आले होते की प्रत्येक मंडळीने आजारी व वयोवृद्ध बंधूभगिनींना मदत करण्यासाठी संघटितरित्या प्रयत्न केले पाहिजेत.—१ योहान ३:१७, १८.

त्यानुसार वडिलांनी आजारी व वयोवृद्धांच्या गरजा विचारात घेऊन त्यांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्‍या बंधूभगिनींचा एक गट तयार केला. या स्वयंसेवकांचे आम्ही वेगवेगळ्या संघांत विभाजन केले—उदाहरणार्थ काही दिवसा साहाय्य करण्याच्या स्थितीत होते, इतरजण रात्री मदत करण्यास तयार होते, काहींनी आपल्या वाहनांतून त्यांना नेण्याआणण्याची जबाबदारी स्वीकारली तर काहीजण २४ तास मदत करण्यास उपलब्ध होते. हा शेवटला संघ एखाद्या वायुवेग पथकासारखा होता.

या सर्व प्रयत्नांचे परिणाम प्रोत्साहन देणारे होते. उदाहरणार्थ एकदा एक आजारी बहीण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. ही बहीण एकटीच राहात होती. पण दररोज तिला भेट द्यायला जाणाऱ्‍या बांधवांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. आम्ही जवळच राहणाऱ्‍या एक बहिणीला कळवले. या बहिणीजवळ कार होती आणि तिने त्या आजारी बहिणीला लगेच—केवळ दहा मिनिटांत जवळच्या इस्पितळात पोचवले! डॉक्टरांनी नंतर सांगितले की लवकर आल्यामुळेच ती वाचली.

आजारी व वयस्क बंधू-भगिनी या स्वयंसेवकांच्या गटाला मनापासून आभार व्यक्‍त करतात; त्यामुळे ही सेवा अतिशय समाधान देणारी आहे. देवाच्या नव्या व्यवस्थीकरणात या बंधू-भगिनींसोबत अगदी वेगळ्या परिस्थितीत आपण राहू शकू ही आशा दिलासा देणारी आहे. आणि त्यांच्या कठीण परिस्थितीत त्यांना मिळालेल्या साहाय्यामुळे ते शेवटपर्यंत टिकून राहू शकले ही जाणीव देखील समाधानदायक आहे.

धीर धरल्यामुळे आशीर्वाद मिळाले

आता मी पायरीअसच्या एका मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे. वाढते वय आणि आरोग्याच्या समस्या असूनही, मंडळीच्या कार्यांत मी सक्रिय सहभाग घेऊ शकतो याचा मला आनंद वाटतो.

गेलेल्या वर्षांत अनेक परीक्षा, कठीण आव्हाने आली आणि अनेक अनपेक्षित घटना घडल्या; या प्रसंगांना तोंड देताना असाधारण मनोबल बाळगण्याची आणि धीर धरण्याची गरज होती. पण यहोवाने सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मला नेहमी सामर्थ्य पुरवले. स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांची मला पुनःपुन्हा प्रचिती आली आहे: “माझा पाय घसरला, असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्‍वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१८, १९.

[२५ पानांवरील चित्र]

माझी पत्नी एलेनी हिच्यासोबत, १९५७ साली तिची दुसरी शस्त्रक्रिया झाल्यावर

[२६ पानांवरील चित्र]

१९६९ साली जर्मनीतील न्युरेम्बर्ग येथील अधिवेशनात

[२८ पानांवरील चित्र]

आजारी व वयोवृद्धांना मदत करण्यास पुढे आलेले बंधूभगिनी