व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वच्छता किती महत्त्वपूर्ण?

स्वच्छता किती महत्त्वपूर्ण?

स्वच्छता किती महत्त्वपूर्ण?

स्वच्छतेचा वेगवेगळ्या लोकांकरता वेगवेगळा अर्थ होतो. उदाहरणार्थ, एका लहान मुलाला त्याच्या आईने हात आणि तोंड धुवायला सांगितले तर त्याला वाटेल नळाखाली बोटे धरली व ओठांवरून ओला हात फिरवला की पुरे. पण त्याच्या आईला त्याच्यापेक्षा जास्त कळते. म्हणून, ती त्याला पुन्हा बाथरूममध्ये नेते; त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून ती त्याचे हात आणि तोंड साबणाने चांगले चोळून धुते.

अर्थात, जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्‍याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असत. आज, काही शाळांच्या आवारात इतका केरकचरा असतो की ते खेळण्याचे किंवा व्यायामाचे ठिकाण असण्याऐवजी उकिरडाच वाटतो. आणि वर्गाबद्दल काय म्हणता येईल? ऑस्ट्रेलियातील एका माध्यमिक शाळेचा देखभालकर्ता, डॅरेन, याने असे निरीक्षण केले: “आजकाल तर वर्ग देखील घाणेरडे असतात.” “कचरा उचला” किंवा “स्वच्छता राखा” असे कोणा विद्यार्थ्याला सांगणे म्हणजे त्याला शिक्षा वाटते. काही शिक्षक खरोखरच शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना साफसफाई करायला लावतात ही मोठी समस्या आहे.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्‍तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्‍न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”

तरीपण, काहींच्या मते स्वच्छता हा व्यक्‍तिगत मामला आहे आणि इतरांनी त्याच्यात पडू नये. पण हे खरे आहे का?

अन्‍नाच्या बाबतीत स्वच्छता फार महत्त्वाची आहे; मग ते अन्‍न बाजारातून विकत आणलेले असो, रेस्टॉरंटमधले असो नाहीतर एखाद्या मित्राच्या घरचे असो. आपण जे अन्‍न खातो ते हाताळणाऱ्‍यांनी किंवा वाढणाऱ्‍यांनी खूप स्वच्छता पाळली पाहिजे. घाणेरडे हात—त्यांचे किंवा आपले—यांमुळे बऱ्‍याच रोगांना आमंत्रण मिळते. आणि इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा सर्वाधिक स्वच्छता जेथे असली पाहिजे त्या दवाखान्यांबद्दल काय? द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन यात वृत्त दिल्यानुसार, डॉक्टर आणि नर्सेस हात धूत नसल्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना होणाऱ्‍या संसर्गांचा इलाज करायला ४६,००० कोटी रुपयांइतका खर्च का होऊ शकतो याचे स्पष्टीकरण मिळते. त्यामुळे, दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या गलिच्छ सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा करणे योग्यच आहे.

आपला पाणी पुरवठा, मुद्दामहून किंवा अविचारीपणामुळे कोणी दूषित केला तर त्याचेही भयंकर परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे, अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्यांनी आणि इतरांनी वापरून टाकलेल्या सुया जेथे दिसतात अशा समुद्रकिनाऱ्‍यावर अनवाणी चालणे किती सुरक्षित आहे? कदाचित प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःला हा प्रश्‍न विचारणे अधिक महत्त्वाचे असेल की, आपल्या स्वतःच्या घरात स्वच्छता राखली जाते का?

घाणीला पिटाळून लावणे (इंग्रजी), या आपल्या पुस्तकात सुएलन हॉय विचारतात: “स्वच्छतेच्या बाबतीत आपण आजही पूर्वीइतकेच जागरूक आहोत का?” त्यांचे उत्तर: “कदाचित नाही.” त्यांच्या मते, बदलणारी सामाजिक मूल्ये याचे मुख्य कारण आहे. लोक अधिकाधिक वेळ घराबाहेर राहतात आणि म्हणून पैसे देऊन इतरांकडून साफसफाई करवून घेतात. त्यामुळे, स्वच्छ वातावरण ठेवणे ही एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात प्राधान्याची गोष्ट राहिलेली नाही. एक मनुष्य म्हणतो: “मी बाथरूम साफ करत नाही—स्वतःला साफ करतो. माझं घर घाण असलं म्हणून काय झालं, मी तर स्वच्छ आहे.”

परंतु, स्वच्छता म्हणजे फक्‍त बाह्‍य स्वरूप नाही. तर स्वच्छता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्त्व आहे. ती मनाची व अंतःकरणाची अवस्था देखील आहे ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो. ते कसे हे आपण पाहू या.