व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वच्छतेचा नेमका अर्थ काय?

स्वच्छतेचा नेमका अर्थ काय?

स्वच्छतेचा नेमका अर्थ काय?

अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांदरम्यान युरोप आणि अमेरिकेतील धक्केदायक अस्वच्छ परिस्थितींमुळे त्या काळातील मिशनरी, ज्याला “स्वच्छतेचा धर्मोपदेश” म्हणता येईल तिचा प्रचार करत होते. या शिकवणीत घाणीची तुलना पापाशी करण्यात आली होती परंतु स्वच्छतेमुळे देवाच्या समीप जाणे शक्य होते असे सांगितले जात होते. कदाचित यामुळेच इंग्रजीतील “क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस” (अर्थात, स्वच्छता म्हणजे देवपण) हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

विल्यम आणि कॅथरीन बुथ यांनी स्थापलेल्या साल्व्हेशन आर्मी या गटाचे हे तत्त्व होते. हेल्थ ॲण्ड मेडिसीन इन दि इव्हॅनजेलिकल ट्रेडिशन या पुस्तकानुसार, त्याचे सुरवातीचे एक घोषवाक्य होते: “सोप, सूप ॲण्ड साल्व्हेशन.” (साबण, सूप आणि तारण) त्यानंतर, लुई पाश्‍चर आणि इतरांनी आजारपण आणि जिवाणू यांच्यातील संबंध ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवल्यावर चांगल्या जन-आरोग्य योजना राबवण्याकरता अधिकच प्रोत्साहन व वैज्ञानिक आधार मिळाला.

यानंतर लगेच काही पावले उचलण्यात आली. उदाहरणार्थ कोर्टात साक्षीदाराने बायबलचे चुंबन घेण्याची प्रथा आणि शाळा व रेल्वे स्थानकांमध्ये एकाच ग्लासातून पाणी पिण्याची प्रथा बंद करण्यात आली. धार्मिक विधींमध्येही एकाच प्याल्याऐवजी प्रत्येकासाठी एक प्याला ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. होय, त्या काळातील अग्रेसरांना स्वच्छतेबद्दल लोकांची मनोवृत्ती बदलण्यात बरेच यश मिळाले. स्वच्छतेसंबंधी लोकांच्या मनोवृत्तीत इतका बदल झाला की एका लेखिकेने या परिवर्तनामुळे लोक “स्वच्छतेच्या प्रेमात पडले आहेत” असे म्हटले.

परंतु, हे ‘प्रेम’ उथळ निघाले. काही काळातच व्यापाऱ्‍यांनी सर्वसाधारण साबणाला सौंदर्य प्रसाधन करून टाकले. चलाख जाहिरातींमुळे ग्राहकांना असा विश्‍वास करण्यास भाग पाडण्यात येऊ लागले की, व्यक्‍तिगत स्वच्छतेची विशिष्ट साधने वापरल्याने एका व्यक्‍तीला समाजात उच्च स्थान मिळते आणि इतरजण तिचा हेवा करू लागतात. टीव्हीद्वारे आजही या कल्पनेला प्रोत्साहन दिले जाते. जाहिरातींमध्ये व दूरदर्शन मालिकांमध्ये झळकणारे आकर्षक नट व नट्या प्रत्यक्षात कधी घरातला केर काढताना, अंगण झाडताना, कचरा फेकताना किंवा पाळीव प्राण्यांची घाण साफ करताना दिसत नाहीत.

लोक असाही तर्क करतात की, बाहेर जाऊन नोकरी केल्याने निदान दोन पैसे मिळवतात येतात, घरकाम किंवा साफसफाई करत बसण्यात काय लाभ? काहीच आर्थिक फायदा होत नसल्याने कशाला स्वच्छता राखण्याची चिंता करावी? यामुळे काही लोकांचे असे मत बनले आहे की, वैयक्‍तिक स्वच्छता पुरेशी आहे.

स्वच्छतेविषयी देवाचा दृष्टिकोन

स्वच्छतेविषयी लोकांना जागरूक करण्याच्या त्या सुरवातीच्या प्रयत्नांमुळे लोकांच्या राहणीमानात निश्‍चितच सुधार घडून आला. आणि तसे घडणे अपेक्षितच होते कारण स्वच्छता हा पवित्र आणि शुद्ध देव यहोवा याचा गुण आहे; तोच स्वच्छतेचा उगम आहे. आपल्या सर्व मार्गांमध्ये पवित्र आणि शुद्ध राहण्याद्वारे स्वतःचा फायदा करून घ्यायला तो शिकवतो.—यशया ४८:१७; १ पेत्र १:१५.

या बाबतीत यहोवा एक आदर्श आहे. स्वच्छता त्याचप्रमाणे त्याचे इतर अदृश्‍य गुण, देवाच्या दृश्‍य निर्मितीतून स्पष्ट झळकतात. (रोमकर १:२०) कोणत्याही नैसर्गिक गोष्टीमुळे कायमचे प्रदूषण होत नाही हे आपल्याला दिसून येते. परिस्थितीकीतील असंख्य चक्रांद्वारे पृथ्वीची अद्‌भुतरित्या सफाई होत असते आणि त्यामुळे ती स्वच्छ, आरोग्यदायी जीवनाकरता रचलेली आहे. ही स्वच्छता केवळ स्वच्छ मन असलेल्या रचनाकाराचे कृत्य असू शकते. यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की, देवाच्या उपासकांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूत स्वच्छ असावे.

स्वच्छतेचे चार पैलू

देवाच्या उपासकांनी चार पैलूंमध्ये स्वच्छता राखली पाहिजे; बायबल या पैलूंची ओळख करून देते. प्रत्येक पैलूचा आपण विचार करूया.

आध्यात्मिक. स्वच्छतेचा हा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे असे म्हटले जाऊ शकते कारण एका व्यक्‍तीला सार्वकालिक जीवन मिळण्याशी याचा संबंध आहे. परंतु, या पैलूकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आध्यात्मिकरित्या स्वच्छ असण्याचा अर्थ, खरी आणि खोटी उपासना यांच्यातील देवाने ठरवलेल्या मर्यादेबाहेर कधीही जाऊ नये कारण कोणत्याही खोट्या उपासनेचा प्रकार देवाच्या नजरेत अशुद्धच आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका’; ‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.’” (२ करिंथकर ६:१७) शिष्य याकोबानेही अगदी स्पष्ट शब्दांत असे म्हटले: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे . . . स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.”—याकोब १:२७.

देवाच्या खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करण्याबद्दल त्याने आपली नापंसती स्पष्टपणे दर्शवली आहे. खोट्या उपासनेत सहसा अशुद्ध प्रथा आणि तिरस्करणीय मूर्ती व देवतांचा समावेश होतो. (यिर्मया ३२:३५) त्यामुळे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा अशुद्ध उपासनेत कसलाही सहभाग असू नये अशी त्यांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.—१ करिंथकर १०:२०, २१; प्रकटीकरण १८:४.

नैतिक. याबाबतीत देखील देवाने शुद्ध आणि अशुद्ध यांच्यातील भेद स्पष्ट केला आहे. संपूर्ण जग इफिसकर ४:१७-१९ येथील वर्णनानुसार झाले आहे: “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, . . . ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” ही अनैतिक विचारसरणी असंख्य स्पष्ट व अस्पष्ट मार्गांनी व्यक्‍त होते त्यामुळे ख्रिश्‍चनांनी सावध राहावे.

देवावर प्रेम करणाऱ्‍यांना ठाऊक आहे की, वेश्‍याव्यवसाय, समलिंगी संबंध, विवाहाआधीचे लैंगिक संबंध आणि अश्‍लील चित्रे या गोष्टी यहोवाने ठरवलेल्या नैतिक शुद्धतेच्या दर्जाचे उल्लंघन करणाऱ्‍या आहेत. परंतु, मनोरंजनाच्या आणि फॅशनच्या दुनियेत या गोष्टी अगदी सामान्य आहेत. त्यामुळे ख्रिश्‍चनांनी यांबद्दल सावध असावे. शरीराचे प्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालून ख्रिस्ती सभांना किंवा सामाजिक मेळाव्यांमध्ये गेल्याने शरीराकडे लोकांचे लक्ष अनावश्‍यकपणे आकर्षित होऊ शकते त्याचप्रमाणे चांगले आचरण ठेवण्यात ती व्यक्‍ती उणी पडत आहे हे त्यावरून स्पष्ट होते. यामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये अशुद्ध जगिक विचारसरणीचा शिरकाव तर होतोच परंतु अशा पेहरावामुळे इतरांच्या मनातही अशुद्ध विचार येऊ शकतात. या संदर्भात, ख्रिश्‍चनांनी “वरून येणारे ज्ञान” प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.—याकोब ३:१७.

मानसिक. मन हे अशुद्ध विचारांचे आगार नसावे. येशूने अशुद्ध विचाराविषयी ताकीद देत असे म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८; मार्क ७:२०-२३) हे शब्द, अश्‍लील चित्र आणि चित्रपट पाहणे, अश्‍लील लैंगिक कृत्यांविषयी वाचणे आणि असभ्यतेची छटा असलेल्या गीतांचे बोल ऐकणे यांनाही लागू होतात. ख्रिश्‍चनांनी अशुद्ध, अपवित्र भाषण व कृत्ये करण्यास उत्तेजन देणाऱ्‍या अशुद्ध विचारांना थारा देऊन दूषित होण्याचे टाळावे.—मत्तय १२:३४; १५:१८.

शारीरिक. पवित्रता आणि शारीरिक स्वच्छता यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचे बायबलमध्ये दाखवले आहे. उदाहरणार्थ, पौलाने लिहिले: “प्रियजनहो, . . . देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) यामुळे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी, स्वतःचे शरीर, घर आणि परिसर आपल्या परिस्थितीनुसार स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करावा. धुण्यापुसण्यासाठी किंवा आंघोळीसाठी पाण्याची टंचाई असते अशा ठिकाणी देखील ख्रिश्‍चनांनी आपल्या परीने स्वच्छ व नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करावा.

शारीरिक स्वच्छता राखणे म्हणजे कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करणे, अति मद्यपान करणे तसेच शरीराला दूषित करणाऱ्‍या व हानीकारक असलेल्या अंमली पदार्थांचा उपयोग करणे टाळले पाहिजे. गीतरत्नामध्ये वर्णिलेल्या मेंढपाळाने, शुनेमकरीणीच्या वस्त्रांच्या मोहक सुवासाची तारीफ केली. (गीतरत्न ४:११) व्यक्‍तिगत स्वच्छता राखणे हे एक प्रेमळ कृत्य आहे कारण भोवतालच्या लोकांना आपण आपल्या दुर्गंधीने त्रस्त करू इच्छित नाही. परफ्यूम वापरणे चांगले आहे परंतु रोजच्या रोज आंघोळ करण्याला आणि स्वच्छ कपड्यांना तो पर्याय नाही.

संतुलित दृष्टिकोन ठेवणे

शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत लोक अतिरेक करू शकतात. एका बाजूला पाहिले तर, स्वच्छतेच्या बाबतीत अतिरेक केल्याने जीवनातला आनंद हिरावू शकतो; आपला मौल्यवान वेळही त्यात वाया जाऊ शकतो. आणि दुसऱ्‍या बाजूला पाहिले तर, गच्चाळ आणि अस्ताव्यस्त घरांची दुरुस्ती करणे महागात पडू शकते. या दोन्ही टोकाच्या भूमिका न घेता, व्यावहारिक आणि संतुलित पद्धतीने घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले जाऊ शकते.

साधे राहणीमान. लहानमोठ्या वस्तूंनी गजबजलेल्या घरांची किंवा खोल्यांची साफसफाई करणे कठीण असते आणि अशा दाटीच्या ठिकाणी जमणारा केरकचरा देखील चटकन लक्षात येत नाही. साध्यासुध्या आणि दाटीवाटी नसलेल्या घरांची स्वच्छता करायला जास्त वेळ लागत नाही. बायबलमध्येही साध्या राहणीमानाचा सल्ला देण्यात आला आहे: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:८.

नीटनेटकेपणा राखा. घर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी त्यामध्ये राहणाऱ्‍या सर्वांची आहे. अस्ताव्यस्त घरांची सुरवात अस्ताव्यस्त खोल्यांपासून होत असते. नीटनेटकेपणा म्हणजे सर्वकाही आपापल्या ठिकाणी असणे. उदाहरणार्थ, बेडरूमची फरशी ही मळीण कपडे ठेवण्याची जागा नव्हे. शिवाय, जमिनीवर पडलेल्या खेळण्यांमुळे आणि वस्तूंमुळे अपघात होऊ शकतात. घरामध्ये होणारे पुष्कळसे अपघात गलिच्छ सवयींचा परिणाम असतात.

स्पष्टतः, स्वच्छता आणि ख्रिस्ती जीवनशैली यांच्यात एक अतूट संबंध आहे. धार्मिक जीवनमार्गाविषयी बोलताना संदेष्टा यशया ‘पवित्र मार्गाचा’ उल्लेख करतो. पुढे तो असा गंभीर विचार मांडतो की, “त्याने अपवित्र जन जाणार नाहीत.” (यशया ३५:८) होय, आताच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावल्यामुळे एक भक्कम पुरावा मिळेल की, एक स्वच्छ, परादीस पृथ्वी लवकरच स्थापित करण्याच्या देवाच्या अभिवचनावर आपला विश्‍वास आहे. मग, या देखण्या ग्रहाच्या सर्व कानाकोपऱ्‍यात सगळे लोक यहोवा देवाने ठरवलेल्या स्वच्छतेच्या परिपूर्ण दर्जांचे आटोकाट पालन करून त्याचे गौरव करतील.—प्रकटीकरण ७:९.

[६ पानांवरील चित्र]

स्वच्छ घर त्यामध्ये राहणाऱ्‍या प्रत्येकाची जबाबदारी असते

[७ पानांवरील चित्र]

पृथ्वी, स्वतःची सफाई स्वतः करणारा अद्‌भुत ग्रह आहे