व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तत्त्वांची तुमची निवड

तत्त्वांची तुमची निवड

तत्त्वांची तुमची निवड

तुम्ही तत्त्वांचे पालन करणारे आहात का? की नैतिक मूल्यांचे पालन करणे तुम्हाला जुन्या काळचे वाटते? वास्तविक पाहता, प्रत्येकाची काही न काही तत्त्वे असतात आणि प्रत्येकाला ती महत्त्वाची वाटत असतात. एका मराठी शब्दकोशानुसार, तत्त्व याची व्याख्या “व्यक्‍तिगत वर्तनाचा नियम” अशी करण्यात आली आहे. तत्त्वे आपल्या निर्णयांवर प्रभाव पाडतात, जीवनाची दिशा ठरवतात. तत्त्वांचा एखाद्या दिशादर्शक साधनासारखा उपयोग होतो.

उदाहरणार्थ, येशूने त्याच्या अनुयायांना मत्तय ७:१२ येथील सुवर्ण नियमाचे पालन करायला सांगितले, जेथे म्हटले आहे: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” कन्फ्यूशसचे अनुयायी ली आणि जेन या तत्त्वांचे पालन करतात ज्यात चांगुलपणा, नम्रता, आदर आणि विश्‍वासूपणा हे गुण सामील होतात. जे धार्मिक वृत्तीचे नाहीत असे लोकही काही तत्त्वांचे किंवा मार्गदर्शकांचे पालन करतात.

कोणती तत्त्वे निवडावीत?

परंतु, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तत्त्वे ही चांगली आणि वाईटही असू शकतात. उदाहरणार्थ, गेल्या एक दशकापासून किंवा आणखी काही वर्षांपासून कितीतरी लोकांमध्ये मी-पणाची वृत्ती वाढत आहे. मी-पणा ही संज्ञा पुष्कळांना ठाऊक नाही आणि ती आपल्याला लागू होत नाही असे त्यांना वाटते परंतु वर्तनाचे उच्च दर्जे त्यागल्यावर ही वृत्ती आपोआप लोकांमध्ये येते. मी-पणा या नावाने ही वृत्ती लोकांना परिचित असली किंवा नसली तरी ती स्वार्थीपणा तसेच सहसा भौतिक गोष्टींबद्दलची हाव यातून प्रदर्शित होते. “आमची दोनच तत्त्वे आहेत. एक म्हणजे, मागणी पूर्ण करणे. आणि दुसरे, पैसा बनवणे,” असे चीनमधील एका दूरदर्शन अधिकाऱ्‍याने म्हटले.

मी-पणा एखाद्या चुंबकासारखा असू शकतो. चुंबकाचा दिशादर्शकावर कसा परिणाम होतो? दोन्ही वस्तू शेजारी-शेजारी असल्यास, दिशादर्शकाचा काटा चुकीची दिशा दाखवतो. त्याचप्रमाणे, मी-पणामुळे एका व्यक्‍तीचा नैतिक दिशादर्शक, किंवा योग्य वर्तनाचा नियम चुकीची दिशा दाखवू लागतो आणि बाकीच्या सर्व गोष्टींना त्या व्यक्‍तीच्या इच्छेपुढे दुय्यम स्थान मिळते.

पण मी-पणाची वृत्ती काही नवीन नाही हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल का? हीच वृत्ती एदेन बागेत आपल्या पहिल्या पालकांनी दाखवली; त्यांनी निर्माणकर्त्याने दिलेल्या वर्तनाच्या नियमाला झुगारून दिले. यामुळे त्यांचा नैतिक दिशादर्शक बदलला. आदाम आणि हव्वेची संतती असल्यामुळे आपल्यामध्ये हीच वृत्ती आली आहे ज्याला आपण “मी-पणा” या नावाने ओळखू लागलो आहोत.—उत्पत्ति ३:६-८, १२.

बायबल भविष्यवाणीनुसार, “कठीण दिवस येतील” त्या “शेवटल्या काळी” ही वृत्ती खासकरून सगळीकडे दिसून येते. पुष्कळ लोक “स्वार्थी” आहेत. म्हणून, आपल्यावरही मी-पणाची वृत्ती दाखवण्याचा दबाव येतो यात काही नवल नाही.—२ तीमथ्य ३:१-५.

कदाचित ओलफ नावाच्या एका तरुणाने यहोवाच्या साक्षीदारांच्या एका युरोपियन शाखा दफ्तराला दिलेल्या पत्रातील मजकुराशी तुम्ही सहमत असाल: “आमच्यासारख्या तरुणांना खासकरून नैतिक शुद्धता राखणे फार कठीण आहे. म्हणून आम्हाला बायबलच्या तत्त्वांना जडून राहायला तुम्ही वारंवार आठवण करून देत जा.”

ओलफचा दृष्टिकोन समजूतदारपणाचा आहे. ईश्‍वरी तत्त्वे तरुणांना आणि वृद्धांना देखील वर्तनाच्या उच्च दर्जांचे पालन करायला मदत करू शकतात. ते मी-पणाच्या वृत्तीचा प्रतिकार करायलाही मदत करू शकतात. बायबलमधील तत्त्वे तुम्हाला खरोखर कशी मदत करू शकतात याविषयी तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असेल तर पुढील लेखही पाहा.

[४ पानांवरील चित्रे]

आज अनेक लोक इतरांच्या गरजांची कदर करत नाहीत