व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले

ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले

ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले

“माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे.”२ करिंथकर १२:७.

१. आज लोकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

तुम्ही सतत एखाद्या परीक्षेला तोंड देत आहात का? असल्यास तुम्ही एकटे नाहीत. या ‘कठीण काळात’ विश्‍वासू ख्रिश्‍चनांना तीव्र विरोध, कौटुंबिक समस्या, आजारपण, आर्थिक चिंता, भावनिक समस्या, प्रिय जनांचा मृत्यू आणि इतर अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१-५) काही देशांत तर अनेकांना दुष्काळ आणि युद्ध यांसारख्या जिवावर बेतणाऱ्‍या समस्यांना तोंड द्यावे लागते.

२, ३. आपल्याला सोसाव्या लागणाऱ्‍या काट्यासमान समस्यांमुळे कशाप्रकारची नकारात्मक वृत्ती आपल्यात येण्याची शक्यता आहे आणि यात कोणता धोका आहे?

अशा प्रकारच्या समस्या येतात, आणि अनेक समस्या एकाच वेळी येतात तेव्हा एखादी व्यक्‍ती यामुळे भारावून जाण्याची शक्यता आहे. नीतिसूत्रे २४:१० काय म्हणते याकडे लक्ष द्या: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” होय, समस्यांमुळे आपण निराश झालो तर या समस्यांना तोंड देण्याकरता अत्यंत आवश्‍यक असलेली ताकद आपण गमावून बसू आणि शेवटपर्यंत टिकून राहण्याचा आपला निर्धार देखील कमकुवत होण्याची शक्यता आहे. कशाप्रकारे?

निराश झाल्यामुळे आपण वस्तुनिष्ठ दृष्टीने विचार करण्यास असमर्थ होतो. उदाहरणार्थ, आपल्या समस्या खूपच मोठ्या आहेत असा विचार करून आपल्याला स्वतःची कीव येऊ लागते. काहीजण कदाचित देवाकडे अशी तक्रार करतील, “हे सर्व तू माझ्या वाट्याला का येऊ दिलेस?” अशी नकारात्मक वृत्ती एखाद्या व्यक्‍तीच्या मनात बळावल्यास त्याचा आनंद आणि विश्‍वास हळूहळू कमी होऊ शकतो. समस्यांमुळे देवाचा सेवक इतका निराश होऊ शकतो की शेवटी तो ‘विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध’ देखील लढण्याचे सोडून देईल.—१ तीमथ्य ६:१२.

४, ५. आपल्यावर येणाऱ्‍या काही समस्यांत सैतानाची कोणती भूमिका असते, पण आपण कशाची खात्री बाळगू शकतो?

आपल्या समस्यांकरता यहोवा देव निश्‍चितच कारणीभूत नाही. (याकोब १:१३) काही परीक्षा तर केवळ आपण त्याला विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपल्यावर येतात. किंबहुना, जो कोणी यहोवाची सेवा करतो तो स्वतःला देवाचा मुख्य शत्रू दियाबल सैतान याचे निशाण बनवतो. आपल्याजवळ फार कमी वेळ उरला आहे हे ‘या युगाचे दैवत’ अर्थात दुष्ट सैतान जाणतो आणि त्यामुळे जो कोणी यहोवावर प्रीती करतो त्याला यहोवाची सेवा करण्यापासून परावृत्त करण्याचा तो प्रयत्न करत आहे. (२ करिंथकर ४:४) सबंध जगभरातील आपल्या बंधूवर्गावर सैतान होईल तितक्या समस्या आणण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:९) अर्थात आपल्या सर्वच समस्या सैतानामुळे आलेल्या नसतात, पण आपल्यावर आलेल्या समस्यांचा फायदा उचलून तो आपल्याला अधिकच कमजोर बनवण्याचा प्रयत्न करतो.

पण सैतान किंवा त्याची हत्यारे कितीही भयानक असली तरीसुद्धा आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो! हे आपण खात्रीने का म्हणू शकतो? कारण आपल्या बाजूने लढणारा यहोवा आहे. त्याने आपल्या सेवकांना सैतानाच्या कुयुक्‍त्‌यांविषयी पूर्ण कल्पना दिली आहे. (२ करिंथकर २:११) देवाचे वचन खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सोसाव्या लागणाऱ्‍या परीक्षांविषयी आपल्याला सविस्तर माहिती देते. प्रेषित पौलाच्या बाबतीत पाहू जाता, बायबलमध्ये “शरीरात एक काटा” हा वाक्यांश वापरला आहे. का? देवाचे वचन या वाक्यांशाचा अर्थ कशाप्रकारे स्पष्ट करते ते आता आपण पाहू या. याचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की समस्यांवर विजय मिळवण्याकरता यहोवाच्या मदतीची गरज केवळ आपल्यालाच नाही.

परीक्षा काट्यांसमान का आहेत

६. पौलाने “शरीरात एक काटा” असे म्हटले तेव्हा त्याला खरे तर काय म्हणायचे होते आणि तो काटा काय असावा?

अत्यंत कठीण परीक्षांना तोंड दिलेल्या पौलाला असे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले की: “माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.” (२ करिंथकर १२:७) पौलाच्या शरीरात असलेला हा काटा कशाला सूचित करत असावा? खोलवर रूतलेला काटा निश्‍चितच अत्यंत वेदनामय असतो. त्याअर्थी हे रूपक, पौलाला शारीरिक वा मानसिक, अथवा दोन्ही प्रकारचे दुःख देणाऱ्‍या एखाद्या गोष्टीस सूचित करत असावे. कदाचित पौलाला डोळ्यांचा विकार किंवा इतर व्याधी असावी. किंवा पौलाच्या प्रेषित असण्याविषयी शंका घेणाऱ्‍यांशी अथवा त्याच्या प्रचार व शिकवण्याच्या कार्यावर आक्षेप घेणाऱ्‍यांशी या काट्याचा संबंध असावा. (२ करिंथकर १०:१०-१२; ११:५, ६, १३) काटा कोणताही असो, पण तो तसाच राहिला; तो काढून टाकण्याचा मार्ग नव्हता.

७, ८. (अ) ‘ठोसे मारणे’ या शब्दांचा काय अर्थ होतो? (ब) आज आपल्याला त्रस्त करत असलेल्या कोणत्याही काट्यांना तोंड देणे का महत्त्वाचे आहे?

तो काटा पौलाला ठोसे मारत होता याकडे लक्ष द्या. पौलाने या ठिकाणी वापरलेले ग्रीक क्रियापद “मूठ” या शब्दापासून आलेले आहे. मत्तय २६:६७ या वचनात तो शब्दशः अर्थाने, तर १ करिंथकर ४:११ यात लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे. त्या वचनांत बुक्क्या मारण्याचा अर्थ समजतो. सैतानाला यहोवा व त्याच्या सेवकांबद्दल वाटणारा तीव्र द्वेष लक्षात घेता आपण खात्री बाळगू शकतो की पौलालाही एक काटा ठोसे मारत होता याचा दियाबलाला आनंदच वाटला असेल. आज आपल्याला शरीरात एखादा काटा सहन करावा लागतो तेव्हाही सैतानाला तसाच आनंद होतो.

म्हणून, अशा काट्यांना कसे तोंड द्यायचे हे पौलाप्रमाणे आपल्यालाही माहीत असणे आवश्‍यक आहे. यावर आपले जीवन अवलंबून आहे! आठवणीत असू द्या, यहोवा आपल्याला अशा एका नव्या जगात सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो, जेथे काट्यांसारख्या समस्या पुन्हा कधीही आपल्या मार्गांत येणार नाहीत. हे अद्‌भुत प्रतिफळ मिळवण्यास आपली मदत करण्यासाठी देवाने त्याचे पवित्र वचन बायबल यात अनेक उदाहरणे दिली आहेत; ही उदाहरणे देवाच्या विश्‍वासू सेवकांची आहेत ज्यांनी त्यांच्या शरीरात रुतलेल्या काट्यांना यशस्वीरित्या तोंड दिले. ते देखील आपल्यासारखेच सर्वसाधारण, अपरिपूर्ण लोक होते. या महान ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेल्या काहींविषयी विचार केल्यास ‘नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावण्यास’ आपल्याला मदत होऊ शकते. (इब्री लोकांस १२:१) त्यांनी काय काय सहन केले यावर मनन केल्यास, सैतानाने आपल्याविरुद्ध वापरलेल्या कोणत्याही काट्यासमान समस्यांना आपण तोंड देऊ शकतो याबद्दल आपला आत्मविश्‍वास वाढेल.

मफीबोशेथला पीडणारे काटे

९, १०. (अ) मफीबोशेथच्या शरीरात कोणत्या अर्थाने एक काटा होता? (ब) दाविदाने मफीबोशेथशी कशाप्रकारे दयाळू व्यवहार केला आणि आपण दाविदाचे अनुकरण कसे करू शकतो?

दाविदाचा मित्र असलेल्या योनाथानचा पुत्र मफीबोशेथ याचे उदाहरण लक्षात घ्या. मफीबोशेथ पाच वर्षांचा असताना त्याचा पिता योनाथान व आजोबा अर्थात शौल राजा मारले गेले आहेत अशी बातमी आली. मफीबोशेथची दाई घाबरली. ती “त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला.” (२ शमुवेल ४:४) लहानपणापासून मोठे होईपर्यंत हे अपंगत्व मफीबोशेथकरता एखाद्या काट्याप्रमाणेच ठरले असेल.

१० काही वर्षांनंतर राजा दाविदाने योनाथानविषयी त्याला असलेल्या अतीव प्रेमामुळे मफीबोशेथवर दया केली. दाविदाने शौलाची सर्व मालमत्ता त्याला दिली आणि शौलाचा सेवक सीबा याला त्याच्या जमिनीची देखरेख करण्यास नेमले. तसेच दाविदाने मफीबोशेथला सांगितले: “तू नित्य माझ्या पंक्‍तीस भोजन करावे.” (२ शमुवेल ९:६-१०) दाविदाच्या या दयाळु व्यवहारामुळे मफीबोशेथला सांत्वन मिळाले असेल आणि त्याच्या अपंगत्वामुळे वाटत असलेले दुःखही काहीसे सुसह्‍य झाले असेल यात शंका नाही. हा किती उत्तम धडा आहे! आपण देखील काट्यासमान समस्यांना तोंड देत असलेल्यांशी दयाळूपणे वागले पाहिजे.

११. सीबाने मफीबोशेथविषयी काय दावा केला पण त्याचा हा दावा खोटा होता हे आपण का समजू शकतो? (तळटीप पाहा.)

११ कालांतराने मफीबोशेथला शरीरातल्या आणखी एका काट्याला तोंड द्यावे लागले. त्याचा सेवक सीबा याने राजा दाविदाजवळ मफीबोशेथविषयी कुटाळकी केली. त्या वेळी दावीद आपल्या पुत्राच्या, अबशालोमच्या बंडाळीमुळे जेरूसलेमधून पलायन करत होता. सीबाने दाविदाला सांगितले की दाविदाचे राज्यत्व स्वतः बळकावण्याच्या इराद्यानेच मफीबोशेथ पलायन न करता जेरूसलेममध्येच राहिला होता व अशारितीने त्याने राजा दाविदाचा विश्‍वासघात केला होता. * दाविदाने सीबाच्या या कुटाळकीवर विश्‍वास ठेवला आणि मफीबोशेथची सर्व मालमत्ता सीबाच्या हवाली केली!—२ शमुवेल १६:१-४.

१२. मफीबोशेथने आपल्याला आलेल्या अनुभवांबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला आणि त्याने आपल्याकरता कशाप्रकारे एक उत्तम आदर्श मांडला?

१२ शेवटी, मफीबोशेथ स्वतः दाविदाला भेटला तेव्हा त्याने त्याला सर्व हकीगत सांगितली. वास्तविक पाहता, मफीबोशेथ दाविदाकडे जाण्याचीच तयारी करत होता, पण सीबाने त्याला फसवले व त्याच्याऐवजी स्वतः जाण्याचे सुचवले. झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाविदाने काही कारवाई केली का? काही प्रमाणात. त्याने मालमत्तेची विभागणी करून त्या दोघांना अर्धा अर्धा हिस्सा दिला. ही गोष्ट देखील मफीबोशेथला काट्यासारखी सलण्याची शक्यता होती. तो अगदीच निराश झाला का? दाविदाचा निर्णय अन्यायी होता अशी त्याने तक्रार केली का? नाही, त्याने नम्रपणे राजाच्या इच्छेला मान दिला. त्याने आशावादी दृष्टिकोन बाळगून, इस्राएलचा हक्कदार राजा सुरक्षित परतला याविषयी आनंद मानला. अपंगत्व, आपल्याविषयी केलेली कुटाळकी, आणि निराशा यांसारख्या समस्यांना तोंड देण्याविषयी मफीबोशेथने अप्रतिम आदर्श मांडला.—२ शमुवेल १९:२४-३०.

नहेम्याने परीक्षांना तोंड दिले

१३, १४. नहेम्या जेरुसलेमचे तट बांधण्याकरता परतला तेव्हा त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

१३ सा.यु.पू. पाचव्या शतकात जेरूसलेमच्या कोट पडलेल्या शहरात परतल्यावर नहेम्याला ज्या लाक्षणिक काट्यांना तोंड द्यावे लागले त्यांचा विचार करा. जेरूसलेम शहराला बचावाचे कोणतेच साधन नव्हते आणि बंदिवासातून परत आलेले यहूदी असंघटित, निराश आणि यहोवाच्या नजरेत अशुद्ध होते. राजा अर्तहशश्‍त याने त्यांना जेरूसलेमचा कोट बांधण्याची परवानगी दिली असली तरीसुद्धा, नहेम्याला लवकरच याची जाणीव झाली की त्याने हाती घेतलेले काम जवळपासच्या प्रदेशांच्या सुभेदारांच्या डोळ्यात खुपत होते. “कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांस फार वाईट वाटले.”—नहेम्या २:१०.

१४ परदेशी विरोधकांनी नहेम्याच्या कामात खंड पाडण्याचा आपल्याकडून जमेल तो प्रयत्न केला. धमक्या, खोटे आरोप, निंदानालस्ती, भिववणे तसेच त्यांना निराश करण्यासाठी हेर पाठवणे हे सर्वकाही त्याला सतत सलणाऱ्‍या काट्यांप्रमाणेच वाटले असेल. पण त्याने या शत्रूंच्या डावपेचांपुढे हात टेकले का? नाही! त्याने देवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि आपला संकल्प खचू दिला नाही. अशारितीने, जेरुसलेमचा कोट बांधून पूर्ण झाला तेव्हा यहोवाने नहेम्याला दिलेल्या प्रेमळ साहाय्याचा तो एक भक्कम पुरावा ठरला.—नहेम्या ४:१-१२; ६:१-१९.

१५. यहुद्यांमध्ये असलेल्या कोणत्या समस्या नहेम्याला अतिशय दुःख देत होत्या?

१५ प्रांताधिपती असल्यामुळे नहेम्याला देवाच्या लोकांमध्ये उद्‌भवणाऱ्‍या अनेक समस्यांना देखील तोंड द्यावे लागले. या अडचणी त्याच्या मनाला काट्यांप्रमाणे बोचत होत्या कारण यांमुळे यहोवाशी असलेल्या लोकांच्या नातेसंबंधावर याचा विपरीत परिणाम होत होता. धनिक निर्धनांकडून पैसा उकळत होते आणि कर्ज फेडण्यासाठी व पर्शियन राष्ट्राला कर भरण्यासाठी त्यांच्या गरीब बांधवांना आपापल्या जमिनी गहाण ठेवाव्या लागत होत्या इतकेच काय तर मुलांना देखील गुलामीत विकण्याची त्यांच्यावर पाळी आली होती. (नहेम्या ५:१-१०) अनेक यहुदी शब्बाथाचे उल्लंघन करत होते आणि लेवियांना व मंदिराला सहकार्य करत नव्हते. तसेच काहींनी “अश्‍दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी” विवाह केला होता. ही परिस्थिती पाहून नहेम्याला कितीक वेदना होत असाव्यात! पण या काट्यांमुळे तो कधीही मार्गभ्रष्ट झाला नाही. देवाच्या धार्मिक नियमांचे आवेशाने समर्थन करणारा म्हणून त्याने पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करून दाखवले. नहेम्याप्रमाणे, आपणही इतरांच्या अविश्‍वासू आचरणामुळे कधीही स्वतःला यहोवाची निष्ठावान सेवा करण्यापासून परावृत्त होऊ देऊ नये.—नहेम्या १३:१०-१३, २३-२७.

इतर अनेक विश्‍वासू जनांनी तोंड दिले

१६-१८. इसहाक व रिबेका, हन्‍ना, दावीद आणि होशे यांना कौटुंबिक समस्यांनी कशाप्रकारे त्रस्त केले?

१६ काट्यांप्रमाणे असलेल्या दुःखदायक समस्यांना तोंड दिलेल्या इतर अनेक जणांची उदाहरणे बायबलमध्ये दिली आहेत. या काट्यांपैकी कौटुंबिक समस्या या सर्वसामान्य होत्या. एसावच्या दोन बायका त्याच्या आईवडिलांच्या अर्थात “इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या.” रिबकेने तर म्हटले की त्या दोघींमुळे तिला जीव नकोसा झाला होता. (उत्पत्ति २६:३४, ३५; २७:४६) हन्‍नाचाही विचार करा. तिला मूल नसल्यामुळे तिची सवत पनिन्‍ना तिला “मनस्वी चिडवी.” घरात कदाचित ती हन्‍नाला सतत टोमणे देत असेल. पण इतक्यावर न थांबता, ते सर्वजण शिलोला सण साजरा करण्याकरता जायचे तेव्हा पनिन्‍ना तिला चारचौघांसमोर म्हणजे नातेवाईकांसमोर आणि ओळखीच्या इतर लोकांसमोर देखील हिणवायची. हन्‍नाला आधीच टोचत असलेला काटा तिच्या शरीरात आणखी खोलवर दाबण्यासारखे हे होते.—१ शमुवेल १:४-७.

१७ दाविदालासुद्धा आपला सासरा अर्थात राजा शौल याच्या निरर्थक मत्सरामुळे काय काय सहन करावे लागले याचा विचार करा. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दाविदाला एन-गेदीच्या अरण्यात गुहांमध्ये राहणे भाग पडले; अतिशय धोकेदायक चढण असलेल्या खडकाळ डोंगरदऱ्‍यांतून त्याला मार्ग काढावा लागत असे. शिवाय, त्याने शौलाचे कधीही कोणत्याच प्रकारे नुकसान केले नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध ही अन्यायी वागणूक त्याला निश्‍चितच अतिशय दुःखदायक वाटली असेल. तरीसुद्धा दाविदाला कित्येक वर्षांपर्यंत अशाचप्रकारे निराश्रिताप्रमाणे जगावे लागले—केवळ शौलाच्या मत्सरीपणामुळे.—१ शमुवेल २४:१४, १५; नीतिसूत्रे २७:४.

१८ संदेष्टा होशेय याच्या कुटुंबातील परिस्थितीची कल्पना करा. त्याच्या पत्नीने जारकर्म केले. तिच्या या अनैतिकतेमुळे, सहस्र काटे हृदयात रुतल्याप्रमाणे त्याला वेदना झाल्या असतील. शिवाय जारकर्मामुळे तिला दोन अनौरस मुले झाली तेव्हा तर त्याला आणखीनच दुःख झाले असेल!—होशेय १:२-९.

१९. मीखाया संदेष्ट्याला कोणता छळ सोसावा लागला?

१९ शरीरात आणखी एक काटा म्हणजे छळ. संदेष्टा मीखाया याला आलेला अनुभव लक्षात घ्या. दुष्ट राजा अहाब याने अनेक खोट्या संदेष्ट्यांना बोलावले आणि त्यांच्या खोट्या भविष्यकथनांवर विश्‍वास ठेवला यामुळे निश्‍चितच नीतिप्रिय मीखायाला अनेक यातना झाल्या असतील. हे सर्व संदेष्टे ‘असत्य वदविणाऱ्‍या आत्म्याच्या प्रेरणेने’ बोलत असल्याचे मीखायाने सांगितले तेव्हा त्या खोट्या भविष्यवक्‍त्‌यांच्या प्रमुखाने काय केले? त्याने चक्क ‘[मीखायाच्या] तोंडात मारली!’ रामोथ-गिलादास पुन्हा हस्तगत करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल अशी यहोवाने ताकीद दिली तेव्हा अहाबची प्रतिक्रिया आणखीनच वाईट होती. त्याने मीखायाला तुरुंगात डांबण्याचा व शिक्षेचे अन्‍नपाणी देण्याचा हुकूम सोडला. (१ राजे २२:६, ९, १५-१७, २३-२८) याशिवाय, यिर्मयाचे उदाहरण आणि त्याच्या क्रूर छळणाऱ्‍यांनी त्याला किती पीडिले हे देखील आठवणीत असू द्या.—यिर्मया २०:१-९.

२०. नामीला कोणत्या काट्यांना तोंड द्यावे लागले आणि तिला काय प्रतिफळ मिळाले?

२० प्रिय व्यक्‍तींचा मृत्यू ही आणखी एक दुःखदायक परिस्थिती आहे जी काट्याप्रमाणे भासू शकते. नामीला तिच्या पतीच्या व दोन मुलांच्या मृत्यूचे दुःख सहन करावे लागले. या जखमांचे वण अद्याप ओले असताना ती बेथलेहेमात परतली. तिने आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितले की त्यांनी तिला नामी नव्हे तर मारा म्हणावे, जेणेकरून या नावातून तिच्या कटू अनुभवामुळे ती किती दुःखी आहे हे कळेल. पण शेवटी मात्र यहोवाने तिच्या सहनशीलतेबद्दल तिला प्रतिफळ दिले; तिला झालेला नातू मशीहाचा पूर्वज बनला.—रूथ १:३-५, १९-२१; ४:१३-१७; मत्तय १:१, ५.

२१, २२. ईयोबाला काय काय गमवावे लागले आणि त्याची काय प्रतिक्रिया होती?

२१ ईयोबाला जेव्हा त्याच्या दहा लाडक्या मुलामुलींच्या अकस्मात अपघाती मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्याला किती जबरदस्त धक्का बसला असेल याची कल्पना करा. इतकेच नव्हे तर त्याची सर्व गुरेढोरे व नोकरचाकर देखील तो गमावून बसला. खरोखर त्याच्यावर आभाळ कोसळले! आणि या धक्क्यातून तो सावरतो न सावरतो तोच सैतानाने त्याला एका भयंकर आजाराने ग्रस्त केले. हा असाध्य रोग आता आपला जीव घेणार असेही ईयोबाला वाटले असेल. त्याचे दुःख इतके असह्‍य झाले की आता केवळ मृत्यूमुळेच यातून सुटका मिळू शकेल असे त्याला वाटू लागले.—ईयोब १:१३-२०; २:७, ८.

२२ हे सर्व कमी होते की काय, म्हणून त्याच्या बायकोनेही दुःखाने व्याकूळ होऊन त्याला म्हटले: “देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” आधीच दुखण्याने पिडीत असलेल्या ईयोबाला हा काटा किती वेदनादायक वाटला असेल! यानंतर, ईयोबाचे तीन मित्र त्याचे सांत्वन करण्याऐवजी त्याच्यावर दिखाऊ तर्कवितर्कांचा भडिमार करू लागले; त्याने काहीतरी गुप्त पातके केली असतील आणि त्यामुळे त्याच्यावर ही संकटे ओढवली आहेत असा आरोप ते करू लागले. त्यांच्या या चुकीच्या वादविवादांमुळे ईयोबाला बोचणारे काटे त्याच्या शरीरात जणू आणखीनच खोलवर रूतत गेले. शिवाय, आपल्यावर ही भयंकर संकटे का येत आहेत याची ईयोबाला जराही कल्पना नव्हती हे देखील आठवणीत असू द्या; तसेच त्याचा जीव वाचवला जाईल हे देखील त्याला माहीत नव्हते. पण तरीसुद्धा, “ह्‍या सर्व प्रसंगात ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.” (ईयोब १:२२; २:९, १०; ३:३; १४:१३; ३०:१७) हे सर्व काटे मार्गात असतानाही ईयोबाने आपली सचोटी कधीही सोडली नाही. त्याचे उदाहरण आपल्याला किती दिलासा देते!

२३. आपण ज्या विश्‍वासू जनांविषयी चर्चा केली आहे त्यांना शरीरात काट्याप्रमाणे ठरलेल्या वेगवेगळ्या समस्यांना कशामुळे तोंड देता आले?

२३ आतापर्यंत आपण पाहिलेली उदाहरणे इतक्यावरच संपत नाहीत. बायबलमध्ये आणखी बरीच उदाहरणे आहेत. या सर्व विश्‍वासू सेवकांना वेगवेगळ्या प्रकारच्या लाक्षणिक काट्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्यापुढे आलेल्या समस्या विविध प्रकारच्या होत्या! पण या सर्वांत एक गोष्ट सारखी होती. यांपैकी कोणीही यहोवाची सेवा करण्याचे सोडले नाही. त्यांच्यावर कष्टदायक परीक्षा आल्या तरीही, यहोवाने पुरवलेल्या सामर्थ्याने त्यांनी त्या सर्व परीक्षांवर विजय मिळवला. कशाप्रकारे? पुढील लेख या प्रश्‍नाचे उत्तर देईल आणि आपल्या जीवनातही एखादी समस्या शरीरात काट्याप्रमाणे बनली असेल तर आपण कशाप्रकारे तिला तोंड देऊ शकतो हे देखील त्यात सांगितले जाईल.

[तळटीप]

^ परि. 11 मफीबोशेथसारख्या उपकारांची जाणीव राखणाऱ्‍या, नम्र मनुष्याने असे महत्त्वाकांक्षी कारस्थान रचणे त्याच्या स्वभावाच्या विरोधात ठरले असते. आपले वडील योनाथान यांच्या विश्‍वासूपणाबद्दलही त्याला माहीतच असेल. राजा शौलाचा पुत्र असूनही, योनाथानने हे ओळखले होते की दाविदाला इस्राएलचा राजा होण्याकरता खुद्द यहोवाने निवडले होते. (१ शमुवेल २०:१२-१७) देवाला भिणारा आणि दाविदाचा निष्ठावान सेवक या नात्याने योनाथानने आपला मुलगा मफीबोशेथ याला राज्यसत्तेचे स्वप्न पाहण्याचे धडे निश्‍चितच दिले नसते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपल्यापुढे येणाऱ्‍या समस्यांची तुलना शरीरात रुतलेल्या काट्यांशी का करता येईल?

• मफीबोशेथ व नहेम्या यांना कोणत्या काट्यांसमान समस्यांना तोंड द्यावे लागले?

• शरीरातील काट्यासमान समस्या सहन करणाऱ्‍या स्त्रीपुरुषांच्या बायबलमधील उदाहरणांपैकी तुम्हाला कोणते उदाहरण विशेष हृदयस्पर्शी वाटले आणि का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

मफीबोशेथला अपंगत्व, त्याच्याविषयी केलेली कुटाळकी आणि निराशा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले

[१६ पानांवरील चित्र]

नहेम्याला विरोध असूनही तो खंबीर राहिला