व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज

देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज

देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज

“देवानेच आम्हाला . . . सेवक होण्यासाठी आवश्‍यक पात्रता दिली.”—२ करिंथकर ३:५, ६, NW.

१, २. कधीकधी प्रचारकार्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले आहेत, पण हे सहसा निष्फळ का ठरतात?

तुम्हाला एखादे काम करण्यास सांगण्यात आले आहे असे समजा. पण ते काम तुम्हाला करताच येत नाही. त्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य तुमच्यासमोर ठेवलेले आहे, आवश्‍यक अवजारे आहेत. पण काय उपयोग? त्यांचा कसा उपयोग करायचा हे तर तुम्हाला माहीतच नाही. आणि दुर्दैवाने हे काम लगेच करायचे आहे. कारण बरेच लोक त्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला कसे वाटेल? अगदी वैफल्यग्रस्त वाटेल, नाही का?

ही केवळ एक काल्पनिक परिस्थिती नाही. एक उदाहरण लक्षात घ्या. अधूनमधून ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसनी घरोघरचे प्रचार कार्य संघटित स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला आहे. पण सहसा, काही आठवड्यांत किंवा काही महिन्यांत त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. का? कारण ख्रिस्ती धर्मजगताने आपल्या अनुयायांना या कार्यासाठी प्रशिक्षित केले नाही. आणि निरनिराळ्या लौकिक महाविद्यालयांत आणि सेमनरींमधून प्रशिक्षण घेऊनसुद्धा, या प्रचार कार्यासाठी स्वतः पाळक देखील पात्र नाहीत. असे आपण का म्हणू शकतो?

३. दुसरे करिंथकर ३:५, ६ यात कोणती संज्ञा तीन वेळा वापरण्यात आली आहे आणि तिचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ती सुवार्ता गाजवणाऱ्‍या प्रचारकाची खरी पात्रता काय हे देवाच्या वचनात स्पष्टपणे सांगितले आहे. प्रेषित पौलाला असे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले: “कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्याची आवश्‍यक पात्रता आपल्याकडे आहे असे नव्हे, तर आपल्या अंगची आवश्‍यक पात्रता देवाकडून आलेली आहे; त्यानेच आपल्याला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी आवश्‍यक पात्रता दिली.” (२ करिंथकर ३:५, ६, NW) या ठिकाणी तीनदा वापरलेल्या “आवश्‍यक पात्रता” या शब्दांकडे लक्ष द्या. यांचा काय अर्थ होतो? वाईन्स एक्सपॉसिटरी डिक्शनरी ऑफ बायबल वड्‌र्स यात असे म्हटले आहे: “वस्तूंच्या संबंधाने वापरताना [मूळ ग्रीक शब्द] ‘पर्याप्त’ असा अर्थ सूचित करतो; व्यक्‍तींच्या संबंधाने वापरताना त्याचा अर्थ ‘कार्यक्षम,’ ‘योग्य’ असा होतो.” त्याअर्थी, ज्याच्याजवळ “आवश्‍यक पात्रता” आहे तो कार्यक्षम असून विशिष्ट काम हाती घेण्यास योग्य आहे असे सूचित होते. होय, सुवार्तेचे खरे सेवक हे कार्य करण्यास पात्र आहेत. ते प्रचाराकरता कार्यक्षम, लायक किंवा योग्य आहेत.

४. (अ) पौलाच्या उदाहरणावरून हे कशाप्रकारे दिसून येते की ख्रिस्ती सेवाकार्य केवळ निवडक लोकांपुरतेच मर्यादित नाही? (ब) कोणत्या तीन माध्यमांनी यहोवा आपल्याला सेवक होण्याकरता आवश्‍यक पात्रता पुरवतो?

पण ही पात्रता कशामुळे मिळते? वैयक्‍तिक गुणांमुळे? बुद्धिमत्तेमुळे? सुप्रसिद्ध महाविद्यालयांतून खास विषयांवर मिळवलेल्या सखोल ज्ञानामुळे? प्रेषित पौलाकडे या सर्व गोष्टी होत्या. (प्रेषितांची कृत्ये २२:३; फिलिप्पैकर ३:४, ५) पण त्याने नम्रपणे कबूल केले की सेवक म्हणून त्याच्याकडे असलेली पात्रता त्याला उच्च शिक्षणाच्या विद्यालयांतून नव्हे तर यहोवा देवाकडून मिळाली होती. ही पात्रता केवळ मोजक्या निवडक लोकांनाच मिळू शकते का? पौलाने करिंथ येथील मंडळीला लिहिताना, “आपल्या अंगची आवश्‍यक पात्रता” असे म्हटले. (तिरपे वळण आमचे.) यावरून निश्‍चितच असे सूचित होते की यहोवाने आपल्या सेवकांना जे काम दिले आहे ते करण्याकरता त्या सर्वांनी कार्यक्षम आणि समर्थ व्हावे म्हणून तो लागेल ती मदत पुरवतो. आज यहोवा खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आवश्‍यक पात्रता मिळवण्याकरता कशाप्रकारे मदत करत आहे? यासाठी तो ज्या तीन माध्यमांचा उपयोग करतो त्यांविषयी आपण चर्चा करू या: (१) त्याचे वचन, (२) त्याचा पवित्र आत्मा आणि (३) त्याची पृथ्वीवरील संघटना.

यहोवाचे वचन आपल्याला पात्रता देते

५, ६. पवित्र शास्त्राचा खऱ्‍या खिश्‍चनांवर कोणता प्रभाव पडतो?

देवाचे वचन आपल्याला सेवाकार्य करण्याकरता लागणारी पात्रता कशाप्रकारे देते? पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रिरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) लोकांना देवाच्या वचनातून शिकवण्याचे ‘चांगले काम’ करण्याकरता पवित्र शास्त्र आपल्याला ‘पूर्ण व सज्ज’ करते. पण ख्रिस्ती धर्मजगताच्या अनुयायांविषयी काय? त्यांच्याजवळही बायबल आहे. एकच पुस्तक काहींना कार्यक्षम सेवक बनवते तर काहींना त्यामुळे काहीच मदत मिळत नाही हे कसे शक्य आहे? बायबलप्रती असलेल्या आपल्या मनोवृत्तीवर हे अवलंबून आहे.

दुर्दैवाने, चर्चला जाणारे बरेचजण बायबलच्या संदेशाला “देवाचे वचन” म्हणून स्वीकारत नाहीत, पण “वास्तविक ते असेच आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) या बाबतीत ख्रिस्ती धर्मजगताचा आजपर्यंतचा इतिहास लांछनास्पदआहे. वर्षानुवर्षे धर्मशास्त्राच्या महाविद्यालयांत अभ्यास केल्यानंतर ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक देवाचे वचन शिकवण्यास योग्य बनतात का? नाही. कारण या सेमनरींमध्ये जाताना तर ते बायबलवर विश्‍वास ठेवत असतात पण पदवी मिळेपर्यंत ते जवळजवळ नास्तिक बनलेले असतात! देवाच्या वचनावरून त्यांचा विश्‍वास उडालेला असतो; त्यामुळे वचनाचा प्रचार करण्याऐवजी ते इतर माध्यमांनी सेवाकार्य करू लागतात; राजकीय विवादांत पक्ष घेणे, सामाजिक विषयांवर उपदेश देणे किंवा मानवी तत्त्वज्ञानाच्या आधारावर उपदेश देणे इत्यादी. (२ तीमथ्य ४:३) याउलट, अस्सल ख्रिस्ती येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करतात.

७, ८. देवाच्या वचनाप्रती येशूची मनोवृत्ती त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा कशी वेगळी होती?

येशूने आपल्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांच्या विचारांचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू दिला नाही. लहानशा गटाला, उदाहरणार्थ त्याच्या प्रेषितांना शिकवताना असो किंवा मोठ्या लोकसमुदायाला शिकवताना असो, तो पवित्र लिखाणांचा उत्तमरित्या उपयोग करत असे. (मत्तय १३:१०-१७; १५:१-११) या शिकवण्याच्या पद्धतीमुळे तो त्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा वेगळा ठरला. धर्मपुढारी, लोकांना देवाच्या गहन ज्ञानात रस घेण्यापासून सतत परावृत्त करत असत. किंबहुना, त्या काळात शास्त्राच्या शिक्षकांची अशी धारणा होती की बायबलचे काही उतारे अतिशय अर्थभरीत असल्यामुळे त्यांची चर्चा केवळ काही विशेष शिष्यांना सोडून इतर कोणासोबतच केली जाऊ नये; आणि तीसुद्धा अगदी हळू आवाजात, डोके झाकून केली जावी. देवाच्या नावाचा उच्चार करण्याच्या संदर्भात हे धर्मपुढारी जसे अंधश्रद्धाळू होते त्याचप्रकारे बायबलच्या विशिष्ट उताऱ्‍यांवर चर्चा करण्यासंबंधी देखील ते जवळजवळ तितकेच अंधश्रद्धाळू होते!

ख्रिस्त त्यांच्यासारखा नव्हता. त्याचा असा विश्‍वास होता की केवळ काही निवडक लोकांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना देखील ‘परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाचे’ ज्ञान मिळणे गरजेचे होते. (तिरपे वळण आमचे.) ज्ञानाचा प्रसार करण्याचा बहुमान विद्वानांच्या कोणत्या एका खास गटाला देण्याचा येशूचा इरादा नव्हता. त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.” (मत्तय ४:४; १०:२७) देवाचे ज्ञान जितक्या लोकांना देता येईल तितक्यांना देण्यासाठी येशू उत्सुक होता.

९. खरे ख्रिस्ती बायबलचा कशाप्रकारे उपयोग करतात?

देवाचे वचन आपल्या शिक्षणाचे केंद्रस्थान असले पाहिजे. उदाहरणार्थ यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात आपण एखादे भाषण देतो तेव्हा बायबलमधून विशिष्ट वचने मोठ्याने वाचून दाखवणे पुरेसे नाही. ती वचने समजावून, त्यांचे सचित्र वर्णन करणे आणि त्यांचे व्यावहारिक महत्त्व सांगणे देखील आवश्‍यक आहे. बायबलचा संदेश छापील पानांवरून उचलून आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या हृदयावर अंकित करणे हा आपला उद्देश आहे. (नहेम्या ८:८, १२) तसेच सल्ला देण्याची किंवा एखाद्याची कानउघाडणी करण्याची गरज पडते तेव्हा देखील बायबलचा उपयोग केला जावा. यहोवाचे लोक निरनिराळ्या भाषा बोलतात आणि ते वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून आलेले आहेत, पण ते सर्वजण या सर्वश्रेष्ठ पुस्तकाचा अर्थात बायबलचा नितान्त आदर करतात.

१०. बायबलचा प्रेरित संदेश आपल्यावर कोणता प्रभाव पाडू शकते?

१० अशाप्रकारे बायबलचा आदरपूर्वक उपयोग केला जातो तेव्हा त्यातील संदेशाच्या सामर्थ्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. (इब्री लोकांस ४:१२) बायबलचा संदेश लोकांना त्यांच्या जीवनात बदल करण्यास, उदाहरणार्थ व्यभिचार, जारकर्म, मूर्तिपूजा, दारूडेपणा, आणि चोरी यांसारखी गैरशास्त्रीय कार्ये सोडून देण्यास प्रवृत्त करतो. या संदेशाने कित्येकांना आपले जुने मनुष्यत्व टाकून देऊन नवे मनुष्यत्व धारण करण्यास मदत केली आहे. (इफिसकर ४:२०-२४) होय, कोणत्याही मानवी विचारांपेक्षा किंवा परंपरांपेक्षा आपण बायबलचा अधिक आदर केल्यास व त्याचा विश्‍वासूपणे उपयोग केल्यास, ते आपल्याला देवाच्या वचनाचे शिक्षक यानात्याने पूर्ण व सज्ज करू शकते.

यहोवाचा आत्मा आपल्याला पात्रता देतो

११. यहोवाच्या पवित्र आत्म्याला “कैवारी” असे योग्यपणे का म्हणण्यात आले आहे?

११ आता दुसरे माध्यम अर्थात यहोवाचा पवित्र आत्मा म्हणजेच त्याची कार्यकारी शक्‍ती आपल्याला पूर्ण व सज्ज होण्याकरता कशाप्रकारे मदत करते यावर आपण चर्चा करू या. यहोवाचा आत्मा या विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍ती आहे हे आपण कधीही विसरू नये. या विस्मयकारी शक्‍तीचा सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या फायद्याकरता उपयोग करण्याची ताकद यहोवाने आपल्या प्रिय पुत्राला दिली आहे. म्हणूनच येशूने पवित्र आत्म्याला “कैवारी” म्हटले. (योहान १६:७) त्याने आपल्या शिष्यांना प्रोत्साहन दिले की त्यांनी यहोवाला त्याचा हा आत्मा देण्याची विनंती करावी आणि अशी खात्री दिली की यहोवा उदारतेने त्यांना तो देईल.—लूक ११:१०-१३; याकोब १:१७.

१२, १३. (अ) आपल्या सेवाकार्यात पवित्र आत्म्याची मदत मिळण्याकरता प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे? (ब) परूशांच्याठायी पवित्र आत्मा कार्य करत नव्हता हे त्यांनी कशाप्रकारे दाखवून दिले?

१२ आपण पवित्र आत्म्याकरता दररोज प्रार्थना केली पाहिजे, खासकरून सेवाकार्यात आपल्याला मदत करण्यासाठी. या कार्यकारी शक्‍तीचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो? पवित्र आत्मा आपल्या मनावर व हृदयावर प्रभाव करून आपल्याला स्वतःत बदल करण्यास आणि जुन्या व्यक्‍तिमत्वाच्या ठिकाणी नवे व्यक्‍तिमत्व धारण करण्यास मदत करू शकतो. (कलस्सैकर ३:९, १०) तो आपल्याला अतिशय हवेहवेसे, ख्रिस्ताने दाखवलेले गुण आत्मसात करण्यास मदत करू शकतो. आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना गलतीकर ५:२२, २३ तोंडपाठ आहे. या वचनांत देवाच्या आत्म्याच्या फळांची यादी दिली आहे. यांपैकी पहिले म्हणजे प्रीती. हा गुण आपल्या सेवाकार्याकरता अत्यावश्‍यक आहे. का?

१३ प्रीती ही एक अतिशय प्रेरणादायी शक्‍ती आहे. यहोवाबद्दल आणि लोकांबद्दल प्रीती असल्यामुळेच खरे ख्रिस्ती सुवार्ता सांगण्यास प्रेरित होतात. (मार्क १२:२८-३१) ही प्रीती नसल्यास, आपल्याला देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याची पात्रता खऱ्‍या अर्थाने मिळालीच नसती. येशू व परुशी यांच्यातला फरक लक्षात घ्या. मत्तय ९:३६ यात येशूविषयी असे म्हटले आहे: “तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” पण परुशांचा सर्वसामान्य लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? ते म्हणत: “हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” (तिरपे वळण आमचे.) (योहान ७:४९) या परुशांना लोकांबद्दल प्रेम तर नव्हतेच पण ते त्यांचा मनस्वी तिटकारा करत होते. यहोवाचा आत्मा त्यांच्याठायी कार्य करत नव्हता हे स्पष्टच आहे.

१४. सेवाकार्यात प्रीती दाखवण्याच्या येशूच्या उदाहरणामुळे आपल्याला कोणती प्रेरणा मिळाली पाहिजे?

१४ येशूला लोकांबद्दल सहानुभूती होती. त्यांच्या व्यथांची त्याला जाणीव होती. त्यांच्याशी केल्या जाणाऱ्‍या दुर्व्यवहाराची त्याला जाणीव होती, ते गांजलेले व पांगलेले, मेंढपाळ नसलेल्या असहाय्य मेंढरांप्रमाणे आहेत हे त्याला माहीत होते. योहान २:२५ आपल्याला सांगते की “मनुष्यात काय आहे” हे येशूला “ठाऊक होते.” निर्मिती करताना यहोवासोबत कुशल कारागीर असल्यामुळे येशूला मानवी स्वभावाचे अंतर्बाह्‍य ज्ञान होते. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) या ज्ञानामुळे त्याची प्रीती द्विगुणीत झाली. अशीच प्रीती नेहमी आपल्या प्रचार कार्यामागची प्रेरणा असो! याबाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटत असल्यास यहोवाच्या पवित्र आत्म्याकरता प्रार्थना करून आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने कार्य करण्याचा आपण प्रयत्न करू या. यहोवा अवश्‍य आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. सुवार्तेच्या प्रचाराकरता सर्वश्रेष्ठ पात्रता असलेल्या ख्रिस्ताचे अधिकाधिक जवळून अनुकरण करण्यास आपली मदत करण्यासाठी यहोवा त्याची ही अजिंक्य शक्‍ती आपल्याकरता पाठवेल.

१५. यशया ६१:१-३ यातील शब्द येशूच्या बाबतीत कशाप्रकारे खरे होते आणि याच शब्दांनी कशाप्रकारे शास्त्री व परूशांचे पितळ उघडे केले?

१५ येशूला ही पात्रता कोठून मिळाली होती? त्याने म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे.” (लूक ४:१७-२१) होय, स्वतः यहोवाने येशूला पवित्र आत्म्याद्वारे नेमले होते. येशूला आणखी कोणत्या शिफारसीची गरजच नव्हती. त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांना पवित्र आत्म्याद्वारे नेमण्यात आले होते का? नाही. तसेच यशया ६१:१-३ यातील शब्द, जे येशूने मोठ्याने वाचून स्वतःवर लागू केले ते पूर्ण करण्याची योग्यता त्यांच्यात नव्हती. ती वचने स्वतः वाचा म्हणजे तुम्हाला दिसून येईल की ढोंगी शास्त्री व परूशी त्यात सांगितलेले कार्य करण्याकरता मुळीच लायक नव्हते. त्यांच्याजवळ दीनांस सांगण्याकरता कोणतेच शुभवृत्त नव्हते. आणि ते बंदिवानांस बंधमोचन किंवा अंधळ्यांस दृष्टी मिळण्याविषयी कोणत्या आधारावर विदित करू शकत होते? आध्यात्मिक अर्थाने तर ते स्वतःच अंधळे आणि मानवनिर्मित परंपरांचे बंदिवान होते! त्यांच्या तुलनेत आपल्याजवळ लोकांना शिकवण्याची पात्रता नाही का?

१६. आज यहोवाचे लोक, सेवक या नात्याने त्यांच्या पात्रतेसंबंधी कोणती खात्री बाळगू शकतात?

१६ ख्रिस्ती धर्मजगताच्या उच्च शिक्षणाच्या पदव्या आपल्याजवळ नाहीत हे खरे आहे. धर्मशिक्षणाच्या सेमिनरींमधून आपल्याला शिक्षण देण्याची नेमणूक मिळालेली नाही हेही कबूल आहे. मग आपल्याजवळ आवश्‍यक पात्रता नाही असे म्हणता येईल का? निश्‍चितच नाही! आपल्याला यहोवाचे साक्षीदार म्हणून स्वतः यहोवाने नेमले आहे. (यशया ४३:१०-१२) आपण त्याच्या आत्म्याकरता प्रार्थना करत असू आणि आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करत असू तर आपल्याजवळ सर्वश्रेष्ठ पात्रता आहे असे आपण म्हणू शकतो. अर्थात अपरिपूर्ण असल्यामुळे, महान शिक्षक असणाऱ्‍या येशूच्या उदाहरणाचे तंतोतंत पालन करण्यात कधीकधी आपण चुकतो. पण तरीसुद्धा यहोवा आपल्या आत्म्याद्वारे त्याच्या वचनाचे शिक्षण देण्याकरता आपल्याला आवश्‍यक पात्रता देतो व सुसज्ज करतो याबद्दल आपण कृतज्ञ नाही का?

यहोवाची संघटना आपल्याला पात्र बनवते

१७-१९. यहोवाच्या संघटनेने तरतूद केलेल्या आठवड्यातील पाच सभांमुळे आपल्याला सेवाकार्याची पात्रता कशाप्रकारे मिळते?

१७ आपल्या वचनाचे शिक्षक होण्याकरता यहोवा ज्या तिसऱ्‍या माध्यमाने आपल्याला सज्ज करतो, अर्थात आपल्याला सेवक होण्याचे प्रशिक्षण देणारी त्याची पृथ्वीवरील मंडळी किंवा संघटना याबद्दल आपण चर्चा करू. त्याची पृथ्वीवरील संघटना आपल्याला सेवक होण्याचे प्रशिक्षण कशाप्रकारे देते? आपल्याला मिळणाऱ्‍या नियमित मार्गदर्शनाचा विचार करा! दर आठवड्यात आपण पाच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो. (इब्री लोकांस १०:२४, २५) मंडळीच्या पुस्तक अभ्यासाकरता आपण लहान लहान गटांत एकत्रित होऊन यहोवाच्या संघटनेकरवी पुरवलेल्या कोणत्याही एका पाठ्यपुस्तकाच्या आधारावर बायबलचा सखोल अभ्यास करतो. तेथे दिलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे आणि आपल्या शब्दांत त्यावर टिप्पणी देण्याद्वारे आपण एकमेकांकडून शिकतो आणि एकमेकांना प्रोत्साहन देतो. तसेच पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आपल्याकडे वैयक्‍तिक लक्ष देऊन मार्गदर्शन करतात. जाहीर भाषण आणि टेहळणी बुरूज यात आपल्याला आणखीन पोषक आध्यात्मिक अन्‍न मिळते.

१८ ईश्‍वशासित सेवा प्रशाला इतरांना कसे शिकवावे याविषयी मार्गदर्शन देण्याकरता तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भाषणांची तयारी केल्यामुळे वेगवेगळे विषय शिकवण्याकरता देवाच्या वचनाचा कसा उपयोग करावा हे आपण शिकतो. (१ पेत्र ३:१५) कधीकधी एखाद्या विषयावर आपल्याला भाषण देण्याची नेमणूक मिळते तेव्हा सुरवातीला तो विषय अगदी ओळखीचा आहे असे वाटते पण नंतर तयारी करताना कित्येक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? बऱ्‍याच जणांना आला आहे. इतरांना एखादा विषय आपण शिकवतो तेव्हा त्या विषयावरील आपले स्वतःचे ज्ञान अधिक पक्के होते. आपल्याला एखादा भाग नेमलेला नसला तरीसुद्धा आपल्याला इतरांना शिकवण्याच्या संदर्भात बरेच काही शिकायला मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यात आपल्याला काही चांगले गुण पाहायला मिळतात आणि त्या गुणांचे कसे अनुकरण करता येईल याचा आपण विचार करू शकतो.

१९ सेवा सभा देखील आपल्याला देवाच्या वचनाचे निपुण शिक्षक बनण्याकरता तयार करण्यात आली आहे. दर आठवडी आपल्याला खास सेवाकार्यासाठी सहायक ठरणारी उत्साहवर्धक भाषणे, चर्चा आणि प्रात्यक्षिके ऐकायला व पाहायला मिळतात. कोणती सादरता वापरावी? सार्वजनिक सेवाकार्यात येणाऱ्‍या खास अडथळ्यांवर कशी मात करावी? आणखी कोणत्या नवीन मार्गाने प्रचार कार्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो? पुनर्भेटी देताना आणि बायबल अभ्यास चालवताना अधिक परिणामकारक होण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (१ करिंथकर ९:१९-२२) अशाप्रकारचे प्रश्‍न सेवा सभेत विचारात घेतले जातात व त्यांवर सविस्तर चर्चा केली जाते. यांपैकी बरेच भाग, आपल्या महत्त्वाच्या कार्याकरता आपल्याला तयार करण्यासाठी पुरवलेले आणखी एक साधन अर्थात, आमची राज्य सेवा यातील लेखांवर आधारित असतात.

२०. सभा व संमेलनांचा पुरेपूर फायदा आपण कशाप्रकारे घेऊ शकतो?

२० या सभांची तयारी करून त्यांना उपस्थित राहण्याद्वारे आणि त्यात शिकलेल्या गोष्टी शिक्षक या नात्याने कार्य करताना उपयोगात आणल्यामुळे आपल्याला बहुव्यापक प्रशिक्षण मिळते. पण एवढेच नव्हे. आपल्याला देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याकरता सुसज्ज करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या मोठ्या सभा अर्थात संमेलने व अधिवेशने देखील असतात. हे सर्व मार्गदर्शन ऐकून त्याचे पालन करण्याकरता आपण किती उत्सुक असतो!—लूक ८:१८.

२१. आपले प्रशिक्षण परिणामकारक ठरले आहे हे कोणत्या पुराव्यावरून शाबीत होते आणि याचे श्रेय कोणाला जाते?

२१ यहोवाने पुरवलेले प्रशिक्षण परिणामकारक ठरले आहे का? वस्तुस्थितींवरून ठरवता येईल. दर वर्षी, शेकडो लोकांना बायबलच्या मूलभूत शिकवणुकी आत्मसात करण्याकरता व देव त्यांच्याकडून करत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मदत दिली जात आहे. आपली संख्या वाढत चालली आहे, पण आपल्यापैकी कोणीही त्याचे श्रेय घेऊ शकत नाही. याविषयी आपण येशूसारखाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे. त्याने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” प्रेषितांप्रमाणेच आपल्यापैकीही बहुतेक जण फार शिकलेले किंवा ज्ञानी नाहीत. (योहान ६:४४; प्रेषितांची कृत्ये ४:१३) आपल्याला मिळणारे यश यहोवावर अवलंबून आहे; तोच प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्याकडे आकर्षित करतो. पौलाने हे अगदी चांगल्याप्रकारे व्यक्‍त केले: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला.”—१ करिंथकर ३:६.

२२. ख्रिस्ती सेवाकार्यात पुरेपूर सहभाग घेण्याकरता आपण अनावश्‍यकपणे निरुत्साहित का होऊ नये?

२२ होय, देवाच्या वचनाचे शिक्षण देण्याच्या कार्यात यहोवा देव सक्रियपणे सहभागी आहे. हे कार्य करण्याकरता आपल्याकडे पुरेशी पात्रता नाही असे कधीकधी आपल्याला भासू शकते. पण आठवणीत असू द्या, की खुद्द यहोवा लोकांना स्वतःकडे आणि त्याच्या पुत्राकडे आकर्षित करतो. तो आपल्याला त्या नवीन लोकांची सेवा करण्याकरता, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि पृथ्वीवरील त्याच्या संघटनेद्वारे आवश्‍यक पात्रता देतो. देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने आपल्याला पूर्ण व सज्ज करण्याकरता यहोवा ज्या सर्व उत्तम गोष्टी पुरवत आहे त्यांचा व्यवहारांत उपयोग करून आपण त्याच्या प्रशिक्षणाला प्रतिसाद देण्याचा सतत प्रयत्न करू या!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• बायबल आपल्याला प्रचार कार्याकरता कशाप्रकारे तयार करते?

• आपल्याला सेवाकार्य करण्याची पात्रता देण्याकरता पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

• सुवार्तेच्या प्रचारकाची पात्रता मिळवण्याकरता यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेने तुम्हाला कोणत्या मार्गांनी मदत केली आहे?

• आपण सेवाकार्यात आत्मविश्‍वासाने सहभाग का घेऊ शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

देवाच्या वचनाचा शिक्षक या नात्याने येशूने लोकांप्रती प्रेम दाखवले