बायझंटियममध्ये चर्च आणि राज्य
बायझंटियममध्ये चर्च आणि राज्य
ख्रिस्ती धर्मसंस्थापकाने, आपले अनुयायी आणि देवापासून दुरावलेले मानवजातीचे जग यांच्यामध्ये काहीच साम्यता नसावी याबाबतीत कोणतीही अस्पष्टता राहू दिली नाही. येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहान १५:१९) आपल्या काळात राजकीय सत्तेचा प्रतिनिधी, पिलात याला येशूने म्हटले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही.”—योहान १८:३६.
“पृथ्वीच्या शेवटापर्यंत” प्रचार करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ख्रिश्चनांना जगिक मामल्यांनी विकर्षित व्हायचे नव्हते. (प्रेषितांची कृत्ये १:८) येशूप्रमाणे, प्रारंभिक ख्रिस्ती राजकारणात भाग घेणार नव्हते. (योहान ६:१५) विश्वासू ख्रिस्ती कधीही अधिकारपदी किंवा व्यवस्थापक पदी नव्हते हे एकदम ठळक दिसत होते. पण कालांतराने ही स्थिती बदलली.
“जगाचे भाग”
सर्वात शेवटच्या प्रेषिताचा मृत्यू झाल्यानंतर काही काळाने धार्मिक पुढाऱ्यांनी आपणहूनच स्वतःबद्दल आणि जगाबद्दल आपला दृष्टिकोन बदलला. ते अशा एका ‘राज्याची’ कल्पना करू लागले जे फक्त जगातच नव्हते तर जगाचाच एक भाग होते. बायझंटाईन साम्राज्यात—बायझंटियम (सध्याचे इस्तंबुल) येथे राजधानी असलेल्या पूर्व रोमन साम्राज्यात—धर्म आणि राजकारण एकमेकांत कसे गुंफलेले होते हे पाहिल्यास आपल्याला बरीच माहिती मिळेल.
परंपरेनुसार धर्माचा पगडा असलेल्या सामाजात, बायझंटियम येथे केंद्रित असलेल्या बायझंटाईन चर्चचा बराच प्रभाव होता. चर्च इतिहासकार पानायोटीस ख्रिस्टू यांनी एकदा असे निरीक्षण केले: “बायझंटाईन लोकांचा असा विश्वास होता की, त्यांचे पृथ्वीवरील साम्राज्य देवाच्या राज्याचे प्रतिरूप होते.” तथापि, सरकाराला हे नेहमीच मान्य नव्हते. त्यामुळे, चर्च आणि राज्य यांच्यात कधीकधी खटके उडत. दि ऑक्सफोर्ड डिक्शनरी ऑफ बायझंटियम यात असे म्हटले आहे: “कॉन्स्टंटिनोपलच्या [अथवा बायझंटियम] बिशपांचे वर्तन सतत बदलत असे; कधी शक्तिशाली शासकाला भिऊन ते अधीनता दाखवत . . . , कधी राजाचे संधीसाधू मित्र बनत . . . , तर कधी राजाला धडधडीत विरोध करत.”
कॉन्स्टंटिनोपलचा धर्मगुरू अर्थात पूर्वेच्या चर्चचा प्रमुख, एक प्रभावशाली व्यक्ती बनला. त्याच्याच हस्ते सम्राटाला गादीवर बसवण्यात येई आणि म्हणून सम्राटाने रूढ मतांचा रक्षणकर्ता व्हावे अशी अपेक्षा त्याच्याकडून करण्यात येई. हा धर्मगुरू धनवान देखील होता कारण चर्चच्या मालकीच्या सर्व संपत्तीवर त्याचेच वर्चस्व होते. सामान्य जनतेवर जितका प्रभाव होता तितकाच
असंख्य मठवासियांवरही अधिकार असल्यामुळे तो शक्तिशाली होता.धर्मगुरू सहसा सम्राटाचा प्रतिकार करू शकत होता. देवाच्या नावाने स्वतःचा अधिकार गाजवून किंवा इतर पद्धतींनी सम्राटांना सत्तेवरून काढून तो त्यांना बहिष्कृत करण्याची धमकी देऊ शकत होता.
राजधानीबाहेर नागरी व्यवस्थापन कमी होऊ लागले तसे बिशप त्यांच्या शहरांमध्ये शक्तिशाली होत गेले; इतके की, ते प्रांतीय सुभेदारांच्या बरोबरीचे बनले ज्यांना ते निवडून देत असत. कोणत्याही न्यायालयीन खटल्यांमध्ये आणि लौकिक व्यवहारांमध्ये चर्च गोवले असले—किंवा काही वेळा चर्चचा काहीही संबंध नसला तरीही बिशप त्यांमध्ये भाग घेत. स्थानीय बिशपांच्या खालचे पाळक आणि मठवासी यांची हजारोंमध्ये असलेली संख्या याला कारणीभूत होती.
राजकारण आणि चर्चमधील अधिकारपद विकत घेण्याची प्रथा
वरती दाखवल्याप्रमाणे, चर्चमधील अधिकारपद आणि राजकारण एकमेकांत पूर्णपणे गुंफलेले
होते. शिवाय, हे बहुसंख्य पाळक आणि त्यांच्या धार्मिक विधींकरता बराच पैसा लागत होता. उच्च श्रेणीतील बहुतेक पाळक श्रीमंतीत राहत होते. चर्चकडे सत्ता आणि धनसंपत्ती गोळा होत गेली तसे चर्चचे दारिद्र्य आणि पवित्रता नष्ट झाली. काही पाळक आणि बिशप पैसे देऊन नियुक्ती मिळवत होते. पाळकांमध्ये वरपर्यंत अधिकारपद विकत घेण्याची प्रथा अगदी सामान्य होती. धनसंपन्न व्यक्तींचे पाठबळ घेऊन पाळक सम्राटासमोर चर्चमधील अधिकारपदासाठी स्पर्धा करत असत.ज्येष्ठ धार्मिक पुढाऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी लाचही दिली जात होती. सम्राज्ञी झोई (सा.यु. ९७८-१०५० च्या सुमारास) हिने आपला पती तिसरा रोमेनस याचा घात करवला आणि तिला आपला प्रेमी आणि सम्राट बनणाऱ्या चवथा मायकल यांच्याशी लग्न करायचे होते तेव्हा तिने धर्मगुरू एलेक्सियस याला तत्काळ आपल्या महालात बोलवून घेतले होते. तेथे पोहंचल्यावर धर्मगुरूला रोमेनस याचा मृत्यू झाल्याची व त्याच्याकडून अपेक्षित असलेली चर्च सेवा याविषयी माहिती मिळाली. त्याच संध्याकाळी चर्चमध्ये गुड फ्रायडेचा विधी साजरा होत असल्यामुळे एलेक्सियस मनापासून राजी नव्हता. परंतु, सम्राज्ञीने दिलेली महागाची बक्षीसे त्याने स्वीकारली आणि तिची विनंती मान्य केली.
सम्राटाला अधीनता
काही वेळा, बायझंटाईन साम्राज्याच्या इतिहासात असे देखील घडले आहे की, सम्राटाने, कॉन्स्टंटिनोपलच्या धर्मगुरूची निवड करण्यासाठी नियुक्ती करण्याच्या वास्तविक अधिकाराचा उपयोग केला. अशा वेळी, सम्राटाच्या मर्जीविरुद्ध कोणीही धर्मगुरू बनू शकत नव्हते किंवा झाल्यास तो जास्त काळ टिकू शकत नव्हता.
सम्राट दुसरा अँड्रानकस (१२६०-१३३२) यांना नऊ वेळा धर्मगुरू बदलावे लागले. यांतील सर्व प्रसंगी, धर्मगुरूच्या अधिकारासाठी सर्वात जास्त नमणारा उमेदवार निवडणे हा हेतू होता. द बायझंटाईन्स या पुस्तकानुसार, एका धर्मगुरूने सम्राटाला असे लेखी दिले की, “त्याच्याकडून अपेक्षित असलेले सर्वात बेकायदेशीर कृत्य देखील करायला आणि [सम्राटाच्या] मर्जीविरुद्ध काहीही न करायला” तो तयार होता. सम्राटांनी राजघराण्यातील राजपुत्राला धर्मगुरू नेमून चर्चवर आपली मर्जी थोपण्याचा दोनदा प्रयत्न केला. सम्राट पहिला रोमेनस याने आपल्या केवळ १६ वर्षांच्या पुत्राला, थिओफिलॅक्ट याला धर्मगुरूचे स्थान दिले.
धर्मगुरू सम्राटाला खूष करण्यात अपयशी ठरल्यास, सम्राट त्याला राजीनामा देण्यास भाग पाडी किंवा धर्माधिकाऱ्यांच्या सभेला त्याला पदावरून काढून टाकण्याची सूचना देई. बायझंटियम या पुस्तकात असे म्हटले आहे: “बायझंटाईन इतिहासात अधिकाधिक, बिशपांची निवड करण्यामध्ये उच्च पदाधिकाऱ्यांचा आणि थेट सम्राटाचाही प्रमुख हात असू लागला.”
धर्मगुरूची साथ असल्यामुळे सम्राट चर्चच्या सभांचेही अध्यक्ष होत असत. ते चर्चासत्रांचे निर्देशन करत, धार्मिक लेख तयार करत आणि बिशपांसोबत वादविवाद करत तसेच पाखंड्यांसोबतही वादविवाद करत, ज्यांच्याकरता शेवटला उपाय होता स्तंभावर मृत्यू. तसेच सम्राट, चर्चने स्वीकारलेल्या नियमांना पुष्टी देऊन त्यांचा अंमलही करत होता. त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांवर राजद्रोहाचा आरोप तसेच चर्च व देवाचे शत्रू असल्याचा आरोप
देखील ते लावत असत. “चर्चमध्ये असे काहीही केले जाऊ नये जे सम्राटाच्या मर्जीच्या किंवा आज्ञेच्या विरोधात आहे,” असे सहाव्या शतकातील एका धर्मगुरूने म्हटले. मेहेरबानीच्या व चलाख सौद्यांच्या इशाऱ्यांना सहज नमणारे दरबारातले गोडबोले, बिशप आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त निषेध कधीच करत नव्हते.उदाहरणार्थ, धर्मगुरू इग्नेशियस (सा.यु. ७९९-८७८ च्या सुमारास) यांनी प्रमुख मंत्री बारदास यांच्या नियुक्तीचा विरोध केला तेव्हा प्रमुख मंत्रींनी प्रतिरोध केला. बारदास यांनी एक कट रचून त्यात इग्नेशियसला गुंतवले आणि राजद्रोहाचा त्यांच्यावर आरोप लावला. अशाप्रकारे धर्मगुरूला अटक करून हद्दपार करण्यात आले. त्यांच्या जागी, मंत्रींनी फोशियसला निवडले; सामान्यांपैकी असलेल्या फोशियसने सहा दिवसांच्या आत चर्चमध्ये धर्मगुरूचे सर्वोच्च पद गाठले. या आध्यात्मिक पदासाठी फोशियसची पात्रता होती का? “अत्यंत महत्त्वाकांक्षी, मगरूर आणि बेजोड राजकारणी कौशल्ये असलेली” व्यक्ती म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
राजकारण साधणारी मतप्रणाली
राजकीय विरोध सहसा रूढ मते आणि पाखंड यांच्या नावाने चालवला जात असे आणि नवीन शिकवणी, इच्छा असल्यामुळे नाही तर राजकीय कारणांमुळे दिल्या जात असत. सर्वसाधारणपणे, एखादी मतप्रणाली देणे किंवा आपल्या मर्जीचे चर्चकडून पालन करवून घेणे हा हक्क सम्राटाकडेच होता.
उदाहरणार्थ, ख्रिस्ताचे स्वरूप यावरून आपल्या दुर्बल व कमकुवत साम्राज्यात फूट पडण्याचा धोका होता तेव्हा सम्राट हिरॅक्लिअसने (सा.यु. ५७५-६४१) मतभेद दूर करण्याचा बराच प्रयत्न केला. मतभेद मिटवण्यासाठी त्याने मोनोथलिटिझम ही नवीन शिकवण सुरू केली. * मग, आपल्या साम्राज्याच्या दक्षिण प्रांतांनी एकनिष्ठ राहावे म्हणून हिरॅक्लिअसने ॲलेक्झांड्रियाचा एक नवीन धर्मगुरू, फेसिसचा सायरस याला नियुक्त केले ज्याने सम्राटाच्या शिकवणुकीला मान्यता दिली. सम्राटाने सायरसला केवळ धर्मगुरू नेमले नाही तर ईजिप्तवर सेनानायक ठरवले; यामुळे स्थानीय शासकांवर त्याचा अधिकार होता. सायरसने काही प्रमाणात छळाचा उपयोग करून बहुतेक ईजिप्तच्या चर्चसंस्थांची मर्जी संपादन केली.
कटू परिणाम
या घडामोडी आणि घटना, येशूच्या प्रार्थनेचा आशय कशाप्रकारे दाखवू शकत होत्या ज्यात येशूने म्हटले की, त्याचे अनुयायी “जगाचे नाहीत”?—योहान १७:१४-१६.
तथाकथित ख्रिस्ती पुढाऱ्यांनी बायझंटिन काळात व नंतर जगाच्या राजकीय व लष्करी कारभारांमध्ये भाग घेतल्याचे कटू परिणाम भोगले आहेत. संक्षिप्तात पाहिलेला हा इतिहास तुम्हाला काय सांगतो? बायझंटिन चर्चच्या पुढाऱ्यांनी देवाची व येशू ख्रिस्ती मर्जी संपादन केली का?—याकोब ४:४.
अशा महत्त्वाकांक्षी धार्मिक पुढाऱ्यांमुळे आणि त्यांच्या राजकीय साथीदारांमुळे खऱ्या ख्रिस्ती धर्माला फायदा झाला नाही. धर्म आणि राजकारण यांच्या अपवित्र मिश्रणाने येशूने शिकवलेल्या शुद्ध धर्माचा विपर्यास केला आहे. आपण इतिहासातून धडा घेऊ या आणि ‘जगाचे भाग बनू नये.’
[तळटीप]
^ परि. 21 मोनोथलिटिझमनुसार, देव आणि मनुष्य असे दोन स्वरूप असतानाही ख्रिस्ताची इच्छा मात्र एकच आहे.
[१० पानांवरील चौकट/चित्र]
“स्वर्गात येरझऱ्या घालणाऱ्या देवासारखा”
धर्मगुरू मायकल सरूलारिअस (१०००-१०५९ च्या सुमारास) यांच्या काळादरम्यानच्या घटना, राज्यकारभारांत चर्च प्रमुखाची काय भूमिका असू शकते व त्यात गोवलेल्या महत्त्वकांक्षा दाखवणाऱ्या एक नमुना आहेत. धर्मगुरूचे पद प्राप्त केल्यावर सरुलारिअसला आणखी वर चढायचे होते. तो मगरूर, गर्विष्ठ आणि हट्टी होता असे त्याच्याबद्दल म्हटले आहे—“स्वर्गात येरझऱ्या घालणाऱ्या देवासारखा तो वागत होता.”
आणखी वरचे पद प्राप्त करण्याच्या इच्छेपोटी सरूलारिअसने १०५४ साली रोममधील पोपसोबत मिळून हा मतभेद सुरू केला आणि सम्राटाला ही फूट मान्य करायला भाग पाडले. विजयी झाल्याच्या आनंदात सरूलारिअसने सहावा मायकल याला गादीवर बसवले आणि त्याला आपली सत्ता मजबूत करायला मदत केली. एका वर्षानंतर, सरूलारिअसने त्या सम्राटाला गादीवरून उतरायला भाग पाडले आणि त्याच्या जागी आयझक कॉमेनस (१००५-१०६१ च्या सुमारास) याला गादीवर बसवले.
धर्मगुरूचे पद आणि साम्राज्य यांच्यातला झगडा वाढत गेला. जनसामान्यांचा पाठिंबा असल्यामुळे सरूलारिअसने धमक्या दिल्या, मागण्या केल्या आणि हिंसेचा मार्ग अवलंबला. एका समकालीन इतिहासकाराने म्हटले: “त्याने सम्राटाच्या पतनाविषयी गलिच्छ, असभ्य भाषेत पूर्वभाकीत केले, ‘अरे मूर्खा, मीच तुला वरपर्यंत पोहंचवले; पण मीच तुला मोडून काढेन.’” परंतु, आयझक कॉमेनेसने त्याला अटक केली, तुरुंगात टाकले आणि इम्ब्रोस येथे हद्दपार केले.
या उदाहरणांवरून दिसून येते की, कॉन्स्टंटिनोपलचे धर्मगुरू किती उपद्रव करू शकत होते आणि सम्राटाचे कशाप्रकारे धाडसाने विरोध करू शकत होते. सहसा सम्राट आणि सैन्य या दोहोंचा प्रतिकार करणाऱ्या कुशल मुत्सद्दींचा राजाला सामना करावा लागत असे.
[९ पानांवरील नकाशा/चित्र]
बायझंटिन साम्राज्याची कमाल हद्द
राव्हेन्ना
रोम
मॅसेडोनिया
कॉन्स्टंटिनोपल
काळा समुद्र
नायसिया
इफिसस
अँटियोक
जेरूसलेम
ॲलेक्झांड्रिया
भूमध्य सागर
[चित्राचे श्रेय]
नकाशा: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[१०, ११ पानांवरील चित्रे]
कॉम्नेनस
तिसरा रोमेनस (डावीकडे)
चवथा मायकल
सम्राज्ञी झोई
पहिला रोमेनस (डावीकडे)
[चित्राचे श्रेय]
कॉम्नेनस, तिसरा रोमेनस, आणि चवथा मायकल: Courtesy Classical Numismatic Group, Inc.; सम्राज्ञी झोई: Hagia Sophia; पहिला रोमेनस: Photo courtesy Harlan J. Berk, Ltd.
[१२ पानांवरील चित्र]
फोशियस
[१२ पानांवरील चित्र]
हिरॅक्लिअस आणि पुत्र
[चित्राचे श्रेय]
हिरॅक्लिअस आणि पुत्र: Photo courtesy Harlan J. Berk, Ltd.; सर्व डिझायन, पृष्ठे ८-१२: From the book L’Art Byzantin III Ravenne Et Pompose