व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाऱ्‍यापासून आसरा

वाऱ्‍यापासून आसरा

वाऱ्‍यापासून आसरा

युरोपच्या उंचपुऱ्‍या अल्पाईन डोंगरांवर तुम्हाला अल्पाईन रोझ नावाचे एक कणखर झुडूप वाढताना दिसेल. या बुटक्या झुडपाला ऱ्‍होडोडेंड्रॉन असेही म्हटले जाते. हे दाट झुडूप जमिनीला लागूनच वाढत असल्यामुळे, सुसाट्याच्या वाऱ्‍यापासून त्याचे संरक्षण होते. या सुसाट्याच्या वाऱ्‍यामुळे, तापमान कमी होते, हवा आणि जमीन शुष्क होते आणि कधीकधी झुडपेही उपटली जाण्याचा धोका असतो.

परंतु, ही झुडपे खडकांमधील फटींमध्ये वाढत असल्यामुळे कितीही जोरदार वारा वाहत असला तरीही तग धरून उभी असतात. या ठिकाणी पुरेशी माती नसली तरी, खडकांमधील या भेगांमुळे या झुडपाला वाऱ्‍यापासून संरक्षण मिळतेच शिवाय त्याला आपल्यामध्ये पाणीही साठवता येते. जवळजवळ वर्षभर लपलेली ही झुडपे उन्हाळ्यांत जणू काय जिवंत होतात आणि आपल्या लालबुंद फुलांची उधळण करतात ज्यात डोंगर न्हाऊन निघतो.

संदेष्टा यशया याने लिहिले, की देव ‘राजकुमारांना’ नियुक्‍त करेल आणि प्रत्येक राजकुमार “वाऱ्‍यापासून आसरा” असा असेल. (यशया ३२:१, २, NW) राजा ख्रिस्त येशू याच्या मार्गदर्शनाखाली हे आध्यात्मिक राजकुमार किंवा पर्यवेक्षक तणावाच्या किंवा पीडेच्या काळांत न डगमगणाऱ्‍या व स्थिर अशा खडकांप्रमाणे असतील. संकटाच्या वेळी ते विश्‍वसनीय आश्रय देतील आणि गरजू लोकांच्याजवळ असलेल्या देवाच्या वचनांतून मिळणारे आध्यात्मिक पाणी जपून वापरण्यास त्यांना मदत करतील.

छळ, नैराश्‍य किंवा आजारपणाचे वारे एखाद्या ख्रिश्‍चनाला झोडपतात तेव्हा, त्याला आश्रय नसल्यास त्याचा विश्‍वास कमजोर होऊ शकतो. ख्रिस्ती वडील, अशा ख्रिश्‍चनाची समस्या लक्षपूर्वक ऐकून, बायबलच्या आधारावर त्याला सल्ला, प्रोत्साहन व मदत देऊन संरक्षण देऊ शकतात. त्यांचा नियुक्‍त राजा ख्रिस्त येशू याच्याप्रमाणे ‘पांगलेल्या’ लोकांना ते मदत करू इच्छितात. (मत्तय ९:३६) तसेच, खोट्या शिकवणींच्या वाऱ्‍यामुळे हानी पोहंचलेल्या लोकांनाही मदत करण्याची त्यांची मनस्वी इच्छा आहे. (इफिसकर ४:१४) अशाप्रकारची मदत उपयुक्‍त समयी मिळाल्यास ती जीवनरक्षक ठरू शकते.

मिरियम नावाची एक भगिनी म्हणते: “माझ्या जीवनात एक अत्यंत कठीण काळ आला होता. माझे काही जवळचे मित्र सत्य सोडून गेले आणि बरोबर त्या दरम्यानच माझ्या बाबांच्या मेंदूत रक्‍तस्राव झाला. त्यामुळे मी खूप नाराज झाले. माझं नैराश्‍य विसरून जाण्यासाठी मी एका जगीक मुलाबरोबर मैत्री करू लागले. काही काळातच मी माझ्या मंडळीतल्या वडिलांना सांगून टाकलं, की मी सत्य सोडण्याचा विचार करत आहे कारण यहोवा माझ्यासारख्या व्यक्‍तीवर प्रेम करत नाही याची मला पूर्ण खात्री पटली आहे.

“अशा या कठीण प्रसंगी, एका प्रेमळ वडिलांनी मला, मी सामान्य पायनियर सेवक म्हणून सेवा केलेल्या वर्षांची आठवण करून दिली. ते मला म्हणाले, की मी किती विश्‍वासूपणे सेवा करत होते हे पाहून त्यांना नेहमी माझं कौतुक वाटायचं; मग त्यांनी मला कळकळीनं विनंती केली की, मी वडिलांची मदत स्वीकारावी, ज्यामुळे यहोवा अजूनही माझ्यावर प्रेम करतो याची ते मला खात्री करून देऊ शकतील. या खडतर काळात, वडिलांनी प्रेमळपणे माझ्यात घेतलेली आस्था ही, माझ्यावर आलेल्या आध्यात्मिक वादळात ‘आसरा’ देणारी ठरली. एका महिन्यात मी माझ्या मित्राबरोबरचे माझे सर्व संबंध तोडले व तेव्हापासून आतापर्यंत मी सत्याच्या मार्गावरच चालत आहे.”

अशा भरकटलेल्या सहख्रिस्ती बंधूभगिनींना, वडील उचित समयी संरक्षण देतात व हे बंधूभगिनी त्यानंतर आध्यात्मिकरीत्या कसे बहरतात हे पाहून वडिलांना आपल्या प्रयत्नांचे चीज झाल्यासारखे वाटते. “वाऱ्‍यापासून आसरा” असलेले हे बांधव आपल्याला, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत आपण जी आध्यात्मिक मदत उपभोगणार आहोत त्याची आता जणू काय एक झलक देतात.