व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्लोव्हिसचा बाप्तिस्मा फ्रान्समधील कॅथलिक धर्माचे १,५०० वर्षांचे राज्य

क्लोव्हिसचा बाप्तिस्मा फ्रान्समधील कॅथलिक धर्माचे १,५०० वर्षांचे राज्य

क्लोव्हिसचा बाप्तिस्मा फ्रान्समधील कॅथलिक धर्माचे १,५०० वर्षांचे राज्य

“पोपच्या नावाने.” हा संदेश एका फ्रेंच चर्चमध्ये सापडलेल्या एका गावठी बॉम्बसोबत आढळला; १९९६ च्या सप्टेंबर महिन्यात पोप जॉन-पॉल दुसरे तेथे भेट द्यायला येणार होते. मेनलँड फ्रान्सवरील त्यांच्या या पाचव्या भेटीसाठी दाखवलेल्या अतीव विरोधाचा हा नमुना होता. तथापि, त्या वर्षी, फ्रँक राजा क्लोव्हिस याला कॅथलिक धर्म स्वीकारून १,५०० वर्षे पूर्ण झाली होती याचा स्मरणोत्सव साजरा करण्यासाठी पोपसोबत सुमारे २,००,००० लोक रीम्सच्या फ्रेंच शहरात जमले होते. हा राजा कोण होता ज्याचा बाप्तिस्मा फ्रान्सचा बाप्तिस्मा म्हणवला जातो? आणि हा स्मरणोत्सव इतका वादग्रस्त का ठरला?

मावळते साम्राज्य

सा.यु. ४६६ च्या सुमारास क्लोव्हिसचा जन्म झाला; तो सेलियन फ्रँक लोकांचा राजा पहिला चिल्डरीक याचा पुत्र होता. सा.यु. ३५८ मध्ये रोमनांना शरण गेल्यावर या जर्‌मॅनिक टोळीला, सध्या ज्याला बेल्जियम म्हणतात येथे एका अटीवर वसती करायला परवानगी देण्यात आली. ती अट अशी की, त्यांनी सीमेची रक्षा करावी आणि रोमन सैन्यासाठी सैनिक पुरवत राहावे. त्यामुळे, तेथे उदयास आलेल्या गॅलो-रोमन लोकांशी जवळीक वाढल्यामुळे हळूहळू या फ्रँक लोकांमध्ये रोमन संस्कृती पसरली. पहिला चिल्डरीक रोमनांचा मित्र होता आणि तो व्हिसीगॉथ व सॅक्सन टोळ्यांसारख्या इतर जर्‌मॅनिक टोळ्यांच्या आक्रमणांविरुद्ध लढत असे. यामुळे गॅलो-रोमन लोक त्याचे कौतुक करीत.

गॉलचे रोमन प्रांत उत्तरेकडील ऱ्‍हाईन नदीपासून दक्षिणेकडील पायरीनीझ इथवर होती. तथापि, सा.यु. ४५४ मध्ये रोमन जनरल एईशस याचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्रदेशात कोणाचेच राज्य नव्हते. शिवाय, सा.यु. ४७६ मध्ये रोमचा अंतिम सम्राट, रोम्यूलस ऑगसचलस याचा पाडाव झाल्यावर आणि पश्‍चिम भागातील रोमन साम्राज्य संपुष्टात आल्यावर त्या प्रदेशात बरीच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे, गॉल जणू त्याच्या हद्दीतील कोणत्याही टोळ्यांच्या हाती सहज लागणाऱ्‍या पक्व अंजिरासारखे होते. त्यामुळे, आपल्या पित्यानंतर राजपदी आल्यावर क्लोव्हिसने आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास सुरवात केली यात काहीच नवल नाही. सा.यु. ४८६ मध्ये, त्याने सॉयस्सन्स शहराजवळ एका लढाईत गॉलमधील शेवटल्या रोमन प्रतिनिधीचा पराजय केला. या विजयामुळे उत्तरेकडील सॉम नदी आणि मध्य व पश्‍चिमेकडील गॉल येथील ल्वार नदीदरम्यानचे सबंध क्षेत्र त्याच्या नियंत्रणात आले.

गादीवर बसवला जाणारा मनुष्य

फ्रँक लोक इतर जर्‌मॅनिक टोळ्यांप्रमाणे नव्हते; ते अद्याप मूर्तिपूजकच होते. परंतु, क्लोव्हिसने बर्गंडियन राजकन्या क्लटिल्डा हिच्याशी विवाह केल्यामुळे त्याच्या जीवनावर याचा मोठा प्रभाव झाला. स्वतः कॅथलिक धर्माची उत्साही अनुयायी असलेली क्लटिल्डा आपल्या पतीचे धर्मांतर व्हावे म्हणून सतत प्रयत्न करत होती. ग्रेगरी ऑफ टूर्स याने सा.यु. सहाव्या शतकात नोंदलेल्या इतिहासानुसार, सा.यु. ४९६ मध्ये, अलेमान्‍नी टोळीविरुद्धच्या टोलबीक (सुल्पीक, जर्मनी) लढाईत क्लटिल्डाच्या देवाने आपल्याला विजय प्राप्त करून दिल्यास आपण मूर्तिपूजा सोडून देऊ असे क्लोव्हिसने वचन दिले. क्लोव्हिसचे सैन्य पराजित होण्याच्या बेतात असताना अलेमान्‍नी राजा ठार मारला गेला आणि त्याच्या सैन्याने शरणागती पत्करली. परंतु, क्लोव्हिसच्या मते, क्लटिल्डाच्या देवाने त्याला हा विजय प्राप्त करून दिला होता. परंपरेनुसार असे सांगण्यात येते की, सा.यु. ४९६ च्या डिसेंबर २५ रोजी, रीम्स येथील कॅथीड्रलमध्ये “संत” रमीजियसने क्लव्हिसला बाप्तिस्मा दिला. तथापि, काहींच्या मते ही तारीख नंतरची म्हणजे सा.यु. ४९८/९ असण्याची शक्यता आहे.

आग्नेयकडील बर्गंडियन राज्यावर कब्जा मिळवण्यात क्लोव्हिसला यश मिळाले नाही. परंतु, सा.यु. ५०७ मध्ये त्याने पॉयटियर्सजवळ वुये येथे व्हिसीगॉथ लोकांना पराजित करण्यात यश मिळवले; यामुळे नैर्‌ऋत्य गॉलमधील बहुतांश प्रदेश त्याच्या ताब्यात आला. या विजयाची मान्यता म्हणून, पूर्वेच्या रोमन साम्राज्याचा सम्राट अनस्टेझस याने क्लोव्हिसला परराष्ट्र दूत बनवून सन्मानित केले. अशाप्रकारे, इतर सर्व पश्‍चिम राजांपेक्षा तो श्रेष्ठ ठरला आणि त्याचे अधिपत्य गॅलो-रोमन लोकांच्या नजरेत कायदेशीर बनले.

पूर्वेकडील ऱ्‍हाईन नदीच्या काठावरील फ्रँक लोकांच्या क्षेत्रावर कब्जा मिळवल्यावर क्लोव्हिसने पॅरिसला आपली राजधानी बनवले. त्याच्या जीवनाच्या शेवटल्या वर्षांमध्ये, त्याने लेक्स सॅलिका अर्थात लिखित कायदा देऊन आणि चर्च व राज्य यांमधील संबंध स्पष्ट करण्यासाठी ओर्लियन्स येथे चर्च सभा भरवून आपले राज्य बळकट केले. शक्यतो, सा.यु. ५११ च्या नोव्हेंबर २७ रोजी त्याचा मृत्यू झाला तेव्हा गॉलच्या तीन भागांवर तोच एकमेव राजा होता.

द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यानुसार, क्लोव्हिसचे कॅथलिक धर्मात केलेले धर्मांतर, “पश्‍चिम युरोपच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता.” या मूर्तिपूजक राजाने केलेले धर्मांतर इतके महत्त्वपूर्ण का होते? कारण, क्लोव्हिसने एरियन धर्म स्वीकारण्याऐवजी कॅथलिक धर्म स्वीकारला.

एरियन वाद

सा.यु. ३२० च्या सुमारास, ईजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथील एरियस हा पाळक त्रैक्याविषयी वेगळाच दृष्टिकोन सादर करू लागला. पुत्र आणि पिता हे एकच आहेत ही कल्पना एरियसने नाकारली. त्याच्या मते, पुत्र हा देव किंवा पित्याच्या बरोबरीचा असू शकत नव्हता कारण त्याला सुरवात होती. (कलस्सैकर १:१५) पवित्र आत्म्याविषयी एरियसचा असा विश्‍वास होता की, तो एक व्यक्‍ती असला तरीही तो पिता आणि पुत्र या दोघांपेक्षा कनिष्ठ होता. ही शिकवण फार लोकप्रिय झाली; मात्र, चर्चमध्ये याला तीव्र विरोध करण्यात आला. सा.यु. ३२५ मध्ये, नायसियाच्या धर्मसभेत एरियसला हद्दपार करण्यात आले आणि त्याच्या शिकवणींचा धिक्कार करण्यात आला. *

परंतु, हा वादविवाद येथेच संपला नाही. हा सैद्धांतिक वाद सुमारे ६० वर्षे चालला आणि नंतरच्या काही सम्राटांनी एका पक्षाची तर काहींनी दुसऱ्‍या पक्षाची बाजू घेतली. शेवटी, सा.यु. ३९२ मध्ये, सम्राट थिओडोसियस पहिला याने कर्मठ कॅथलिक धर्म आणि त्यासोबत त्रैक्याची शिकवण यांना रोमन साम्राज्याचा शासकीय धर्म ठरवला. यादरम्यान गॉथ लोकांनी युल्फलास नावाच्या जर्‌मॅनिक बिशपद्वारे एरियन धर्म स्वीकारला होता. इतर जर्‌मॅनिक टोळ्यांनीही “ख्रिस्ती धर्माचा” हा प्रकार लगेचच स्वीकारला. *

क्लोव्हिसच्या शासनापर्यंत गॉलमधील कॅथलिक चर्च संकटप्रसंगात होते. एरियन व्हिसीगॉथ लोक, मरण पावणाऱ्‍या बिशपांच्या जागी दुसऱ्‍यांना नेमायला नकार देऊन कॅथलिक धर्म दाबण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय, चर्चमध्ये दोन गट झाले होते आणि एका गटातले पाळक दुसऱ्‍या गटातील पाळकांना रोममध्ये ठार मारत होते. काही कॅथलिक लेखकांनी असे सांगायला सुरवात केली की सा.यु. ५०० मध्ये जगाचा अंत होईल; यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. म्हणून, या फ्रँक विजेता राजाने कॅथलिक धर्मात केलेले धर्मांतर एक शुभ घटना असून ती “संतांच्या नवीन हजार वर्षांच्या युगाचे” सूचक मानण्यात येऊ लागले.

परंतु क्लोव्हिसचे हेतू काय होते? त्याचे हेतू काही अंशी धार्मिक असले तरीही त्याच्या मनात राजकीय हेतू निश्‍चितच होते. कॅथलिक धर्म स्वीकारून क्लोव्हिसने प्रामुख्याने कॅथलिक असलेल्या गॅलो-रोमन लोकांची मर्जी संपादन केली आणि प्रभावशाली चर्च अधिकाऱ्‍यांचा पाठिंबा मिळवला. त्याच्या राजकीय प्रतिस्पर्धींपुढे याचा त्याला निश्‍चित फायदा झाला. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणते की, “गॉलवर त्याने मिळवलेला कब्जा नको असलेल्या एरियन पाखंडींच्या जुलमातून सुटका होती.”

खरा क्लोव्हिस कसा होता?

१९९६ मधील स्मरणोत्सवाच्या प्रस्तावनेत रीम्सचे आर्चबिशप, झरार दीफ्वा यांनी क्लोव्हिस हा “नीट योजलेल्या व जबाबदारीने केलेल्या धर्मांतराचा नमुना” आहे असे म्हटले. परंतु, फ्रेंच इतिहासकार अर्नस्ट लाव्हिस यांनी असे भाष्य केले: “क्लोव्हिसच्या धर्मांतरामुळे त्याचे व्यक्‍तिमत्त्व मुळीच बदलले नाही; शुभवर्तमानातील सौम्य आणि शांतीमय शिकवण त्याच्या हृदयाला भिडली नाही.” आणखी एका इतिहासकाराने म्हटले: “ओडिनचा [नॉर्वेतील एक दैवत] धावा करण्याऐवजी त्याने ख्रिस्ताचा धावा केला आणि स्वतःमध्ये काहीच बदल केला नाही.” कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ती धर्मात केलेल्या तथाकथित धर्मांतरानंतर दाखवलेल्या वर्तनाची आठवण करून देणाऱ्‍या क्लोव्हिसने राज्याधिकारासाठी असलेल्या सर्व प्रतिस्पर्धींचा पद्धतशीरपणे खात्मा करून आपले शासन दृढ केले. त्याने अगदी “दूरच्या नातेवाईकांचाही” नायनाट केला.

क्लोव्हिसच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी अनेक कथा गाजू लागल्या ज्यांमध्ये एका क्रूर योद्धाऐवजी त्याला सन्माननीय संताचे स्थान देण्यात आले. जवळजवळ एका शतकानंतर लिहिलेल्या ग्रेगरी ऑफ टूर्सच्या अहवालात, “ख्रिस्ती धर्म” स्वीकारणारा पहिला रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याच्याशी क्लोव्हिसचा संबंध जोडण्याचा मुद्दामहून प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवाय, बाप्तिस्म्याच्या वेळी तो ३० वर्षांचा होता असे दाखवून, ग्रेगरी, त्याची तुलना ख्रिस्ताशी करण्याचा प्रयत्न करतो.—लूक ३:२३.

नवव्या शतकातही, रीम्सचा बिशप, आंकमार याच्याद्वारे अशा कथा रचल्या जात होत्या. तीर्थयात्रेला येणाऱ्‍या यात्रेकरूंसाठी विविध कॅथिड्रल्सच्या आपापसांत चुरस लागली असताना त्याने आपला पूर्वाधिकारी, “संत” रमीजियस याचे जीवनचरित्र स्वतःच्या चर्चची प्रसिद्धी वाढवण्याच्या आणि ते अधिक सुसंपन्‍न करण्याच्या हेतूने कदाचित लिहिले असावे. त्याच्या अहवालात असे म्हटले आहे की, क्लोव्हिसच्या बाप्तिस्म्याच्या वेळी एका पांढऱ्‍या कबुतराने त्याचा अभिषेक करण्यासाठी तेलाची एक कुपी आणली होती. येशूचा पवित्र आत्म्याने केलेला अभिषेक याला हे स्पष्टपणे सूचित करत होते. (मत्तय ३:१६) अशाप्रकारे, आंकमार याने क्लोव्हिस, रीम्स आणि राजसत्ता यांमध्ये संबंध जोडून क्लोव्हिस हा प्रभूने नियुक्‍त केलेला होता या कल्पनेला बढावा दिला. *

वादग्रस्त स्मरणोत्सव

भूतपूर्व फ्रेंच राष्ट्रपती चार्ल्झ द गॉल एकदा म्हणाले: “माझ्या मते, फ्रान्सचा इतिहास क्लोव्हिसपासून सुरू झाला ज्याला फ्रँक टोळीच्या लोकांनी फ्रान्सचा राजा नेमून फ्रान्सला त्यांचे नाव दिले.” परंतु, सर्वांचेच हे मत नाही. क्लोव्हिसच्या बाप्तिस्म्याच्या १,५०० व्या वाढदिवसाचा स्मरणोत्सव वादग्रस्त होता. १९०५ सालापासून चर्च आणि राष्ट्र अधिकृतपणे वेगळे केलेल्या राष्ट्रात, एका धार्मिक स्मरणोत्सवात राष्ट्र भाग घेत असल्याची अनेकांनी टीका केली. पोपच्या भेटीदरम्यान वापरल्या जाणाऱ्‍या पोडियमचा खर्च देण्याच्या योजनांविषयी रीम्स शहराच्या मंत्रीमंडळाने घोषणा करताच एका संघटनेने हा निर्णय घटनात्मक नाही म्हणून तो कोर्टामध्ये उलटून पाडला. इतरांचे असे मत होते की, चर्च आपला नैतिक व लौकिक अधिकार फ्रान्सवर पुन्हा एकदा थोपवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचप्रमाणे, पुराणमतवादी नॅशनल फ्रंट आणि मूलतत्त्ववादी कॅथलिक गटांचे सूचक म्हणून क्लोव्हिसला नेमल्यामुळे या स्मरणोत्सवात आणखीनच गुंतागुंती निर्माण झाली.

इतरांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्मरणोत्सवाची टीका केली. त्यांचे म्हणणे होते की, क्लोव्हिसने बाप्तिस्मा घेतल्यामुळे फ्रान्स कॅथलिक राष्ट्र बनले नाही कारण हा धर्म गॅलो-रोमन लोकांमध्ये आधीपासूनच सुस्थापित होता. शिवाय त्यांचा असा दावा होता की, त्याच्या बाप्तिस्म्यामुळे फ्रान्स राष्ट्राचा जन्म झाला नाही. त्यांच्या मते, सा.यु. ८४३ मध्ये शार्लमेनचे राज्य विभागले ती फ्रान्सच्या जन्माची योग्य तारीख असून क्लोव्हिस नव्हे तर चार्ल्झ द बॉल्ड हा फ्रान्सचा पहिला राजा होता.

कॅथलिक धर्माची १,५०० वर्षे

“चर्चची थोरली मुलगी” असलेल्या फ्रान्समधील कॅथलिक धर्माची १,५०० हून अधिक वर्षांनंतर आज काय स्थिती आहे? १९३८ सालापर्यंत फ्रान्समध्ये जगातील सर्वाधिक बाप्तिस्मा घेतलेले कॅथलिक होते. आज मात्र फ्रान्स सहाव्या क्रमांकावर असून फिलिपाईन्स आणि अमेरिकेच्या पाठोपाठ आहे. शिवाय, फ्रान्समध्ये ४.५ कोटी कॅथलिक असले तरी त्यांपैकी केवळ ६० लाख लोक नियमितपणे मासला जातात. फ्रेंच कॅथलिकांमध्ये घेतलेल्या एका अलीकडील सर्वेक्षणानुसार ६५ टक्के लोक “लैंगिक विषयांसंबंधी चर्चच्या शिकवणुकींचा स्वीकार करत नाहीत” आणि ५ टक्के लोकांच्या मते येशूला “काहीच महत्त्व नाही.” अशा नकारात्मक मनोवृत्तींमुळे, १९८० साली पोपने फ्रान्सला भेट दिली तेव्हा विचारले: “फ्रान्स, तू बाप्तिस्म्याच्या वेळी दिलेल्या वचनांचे काय झाले?”

[तळटीपा]

^ परि. 12 टेहळणी बुरूज (इंग्रजी), ऑगस्ट १, १९८४, पृष्ठ २४ पाहा.

^ परि. 13 टेहळणी बुरूज, मे १५, १९९४, पृष्ठ ८-९ पाहा.

^ परि. 19 लुई हे नाव क्लोव्हिस यावरून आले असून १९ फ्रेंच राजांना (सतरावा लुई आणि लुई-फिलिप्प यांना सुद्धा) हे नाव देण्यात आले होते.

[२७ पानांवरील नकाशा]

सॅक्सन लोक

ऱ्‍हाईन नदी

सोम नदी

सायस्सन्स

रीम्स

पॅरिस

गॉल

ल्वार नदी

वुये

पॉयटियर्स

पायरीनीझ

व्हिसीगॉथ लोक

रोम

[२६ पानांवरील चित्र]

एका १४ व्या शतकातील हस्तलिखितामध्ये दाखवलेला क्लोव्हिसचा बाप्तिस्मा

[चित्राचे श्रेय]

© Cliché Bibliothèque nationale de France, Paris

[२८ पानांवरील चित्र]

फ्रान्स येथील रीम्स कॅथिड्रलच्या बाहेरील भिंतीवर क्लोव्हिसच्या (मधली आकृती) बाप्तिस्म्याचा पुतळा

[२९ पानांवरील चित्र]

क्लोव्हिसच्या बाप्तिस्म्याच्या स्मरणोत्सवासाठी दुसरे जॉन पॉल यांनी फ्रान्सला दिलेली भेट वादग्रस्त ठरली