त्या प्राचीन जगाचा नाश का झाला?
त्या प्राचीन जगाचा नाश का झाला?
जागतिक प्रलय एक नैसर्गिक आपत्ती नव्हती. तो देवाकडील न्यायनिवाडा होता. त्याविषयी इशारा देण्यात आला होता परंतु बहुतेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. का? येशूने स्पष्टीकरण दिले: “जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी दखल घेतली नाही.”—मत्तय २४:३८, ३९, NW.
प्रगत संस्कृती
काही बाबतीत, जलप्रलयापूर्वीच्या संस्कृतीमध्ये असे काही फायदे होते जे आज आपल्याला नाहीत. जसे की, संपूर्ण मानवजात एकच भाषा बोलत होती. (उत्पत्ति ११:१) यामुळे कलेच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती व्हायला चालना मिळाली असेल ज्याकरता विविध कौशल्ये असलेल्या लोकांना एकत्र मिळून प्रयत्न करायची गरज असते. शिवाय, त्या जमान्यातील लोकांच्या दीर्घायुष्यामुळे शतकानुशतकांपासून शिकलेल्या गोष्टी ते पुढेही शिकू शकत होते.
काहींचा असा दावा आहे की, तेव्हाच्या लोकांचे आयुष्यमान खरोखर तितके जास्त नव्हते व बायबलमधील अहवालात दिलेली वर्षे खरे तर महिने होते. हे खरे आहे का? महललेलचे उदाहरण घ्या. बायबल म्हणते: “महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास यारेद झाला; . . . महललेल याचे एकंदर आयुष्य आठशेपंचाण्णव वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.” (उत्पत्ति ५:१५-१७) एक वर्ष जर एक महिना आहे तर, महललेल पाच वर्षांचा असताना त्याला पुत्र झाला! परंतु हे बरोबर नाही, तर त्या काळचे लोक पहिला पुरुष आदाम याच्या परिपूर्णतेच्या जास्त जवळ होते. त्यांचे आयुष्यमान खरोखरच अनेक शतकांचे होते. या लोकांनी काय साध्य केले?
जलप्रलयाच्या अनेक शतकांआधी, पृथ्वीवरील लोकसंख्या इतकी वाढली होती की, आदामाचा पुत्र काईन याने एक नगर बांधून त्याचे नाव हनोख असे ठेवले. (उत्पत्ति ४:१७) प्रलयापूर्वीच्या काळात, अनेक उद्योग सुरू करण्यात आले होते. “तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे” बनवण्यासाठी लोहाराच्या भट्ट्या होत्या. (उत्पत्ति ४:२२) बांधकाम, सुतारकाम, शिवणकाम आणि शेती यांच्यासाठी या साधनांचा उपयोग होत होता हे निश्चित आहे. पृथ्वीवरील मानवांच्या सुरवातीच्या काळातील अहवालांमध्ये या सर्व उद्योगांचा उल्लेख आला आहे.
या संपादित ज्ञानामुळेच पुढच्या पिढीला धातुविज्ञान, पीक उत्पादन, पशुपालन, लेखन कला आणि ललित कला यांसारख्या खास क्षेत्रांमध्ये प्रगती करता आली. उदाहरणार्थ, युबाल, “तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजविणाऱ्या सर्वांचा मूळपुरुष झाला.” (उत्पत्ति ४:२१) संस्कृतीचा विस्तारित प्रमाणावर विकास झाला. परंतु, सगळे काही एका झटक्यात संपले. कशामुळे?
कशामुळे?
जलप्रलयापूर्वीच्या समाजात हे सर्व फायदे असतानाही त्याची सुरवातच मुळात चांगली नव्हती. त्याचा मूळपुरुष आदाम होता आणि त्याने देवाविरुद्ध बंड केले. काईनाने इतिहासातील सर्वात पहिले नगर बांधले पण त्याने स्वतःच्याच भावाचा खून केला. त्यामुळे दुष्टाई वाढली यात काही नवल नाही! आदामाने आपल्या संततीला वारशात दिलेल्या दोषाचा परिणाम हळूहळू वाढत गेला.—रोमकर ५:१२.
या परिस्थितीला केवळ १२० वर्षांसाठी राहू दिले जाईल असे यहोवाने ठरवले तेव्हा स्पष्टतः परिस्थिती अधिकच वाईट होत होती. (उत्पत्ति ६:३) बायबल म्हणते: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार [होती], त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट [होत्या]. . . . [पृथ्वी] जाचजुलमांनी भरली होती.—उत्पत्ति ६:५, ११.
कालांतराने, नोहाला असे स्पष्टपणे सांगण्यात आले की, देव एक जलप्रलय आणवून सर्व मानवांना नष्ट करील. (उत्पत्ति ६:१३, १७) नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता तरीपण तेव्हाच्या लोकांना यावर विश्वास ठेवायला कठीण जात होते की, त्यांच्याभोवतालचे सर्वकाही नष्ट होईल. (२ पेत्र २:५) फक्त आठ लोकांनी देवाच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले आणि त्यांचा बचाव झाला. (१ पेत्र ३:२०) आज हे आपल्याकरता महत्त्वाचे का आहे?
आपल्याकरता का महत्त्वाचे?
नोहाच्या काळात जशी परिस्थिती होती तशाच परिस्थितीत आज आपण राहात आहोत. दहशतवाद, जातीसंहार, बंदूकधारी लोकांनी कोणताही स्पष्ट हेतू नसताना केलेली सामूहिक हत्या आणि धक्केदायक प्रमाणावर घरांमध्ये होणारी हिंसा अशा अघोरी कृत्यांविषयी आपण रोजच ऐकतो. पृथ्वीवर पुन्हा हिंसा माजली आहे आणि पूर्वीप्रमाणेच जगाला येणाऱ्या न्यायाचा इशारा दिला जात आहे. स्वतः येशूने म्हटले की, तो देवाचा नियुक्त न्यायाधीश या नात्याने येईल आणि मेंढपाळ ज्याप्रमाणे मेंढरांना शेरडांपासून वेगळे करतो तसे तो लोकांना वेगळे करील. त्या वेळी जे लायक नसतील त्यांना “सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल” असे येशूने म्हटले. (मत्तय २५:३१-३३, ४६, सुबोध भाषांतर) परंतु, बायबल म्हणते की या वेळी मात्र लाखो लोक बचावतील अर्थात एकमेव खऱ्या देवाची उपासना करणारा एक मोठा लोकसमुदाय वाचेल. येणाऱ्या जगामध्ये हे लोक कायमस्वरूपाची व अभूतपूर्व प्रमाणात शांती-सुरक्षा अनुभवतील.—मीखा ४:३, ४; प्रकटीकरण ७:९-१७.
लवकरच होणाऱ्या न्यायाविषयी बायबलमध्ये दिलेल्या विधानांची व इशाऱ्यांची अनेकजण थट्टा करतात; पण तो न्याय येईल तेव्हा त्यांना या विधानांची सत्यता पटेल. परंतु, प्रेषित पेत्राने म्हटले की, टीका करणारे हे लोक वास्तविकतेकडे डोळेझाक करत आहेत. त्याने लिहिले: “थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात . . . येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? . . . कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यांतून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली; त्याच्या योगे तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन २ पेत्र ३:३-७.
लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.”—येशूच्या भविष्यसूचक आज्ञेनुसार, आज सबंध जगभरात, येणाऱ्या न्यायाच्या दिवसाविषयी इशारा दिला जात आहे आणि त्यानंतर येणाऱ्या शांतीच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार केला जात आहे. (मत्तय २४:१४) हा इशारा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण सर्वशक्तिमान देव आपले वचन पूर्ण केल्यावाचून राहात नाही.
येणारे जग
येणारा महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेता, मानवजातीचे भविष्य काय आहे? सुप्रसिद्ध डोंगरावरील आपल्या प्रवचनाच्या सुरवातीला येशूने असे वचन दिले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” मग त्याने आपल्या शिष्यांना देवाला अशी प्रार्थना करायला शिकवले: “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ५:५; ६:१०) होय, येशूने स्वतः असे शिकवले की, पृथ्वीवरच विश्वासू मानवजातीकरता एक अद्भुत भविष्य राखून ठेवले आहे. त्याने त्याला ‘पुनरुत्पत्ती’ म्हटले.—मत्तय १९:२८.
त्यामुळे भविष्याकडे आशेने पाहत असताना, थट्टेखोरांमुळे देवाच्या इशाऱ्यावर शंका करायला लागू नका. आपल्या भोवतालची परिस्थिती स्थिर दिसते आणि सध्याचे जग देखील अनेक शतकांपासून चालत आले आहे हे खरे आहे. तरीपण, आपण त्यावर भरवसा करू नये. मानवजातीच्या जगाचा न्याय करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेषित पेत्राने आपल्या पत्राच्या समाप्तीत जे म्हटले त्यातून प्रोत्साहन मिळवा.
“ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? . . . ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा, आणि आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा.” (२ पेत्र ३:११, १२, १४, १८) त्यामुळे, नोहाच्या दिवसात काय घडले त्यापासून शिका. देवाजवळ या. येशू ख्रिस्ताविषयी अधिक ज्ञान घ्या. ईश्वरी भक्ती विकसित करा आणि या जगाच्या अंतातून वाचून शांतिमय जगात जाण्याची निवड केलेल्या लाखो लोकांपैकी एक असा.
[५ पानांवरील चित्र]
प्रलयापूर्वीच्या लोकांना धातुकामाविषयीचे ज्ञान होते
[७ पानांवरील चित्र]
सुंदर भवितव्य राखून ठेवले आहे