वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
यहोवाची दया त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते, असे म्हणणे बरोबर आहे का?
हा वाक्यांश पूर्वी वापरण्यात आलेला असला तरी, तो टाळणे उचित ठरेल. कारण त्यावरून असे सूचित होते, की यहोवाची दया, त्याच्या न्यायाची प्रखरता कमी करते अथवा त्यास प्रतिबंध करते; जणू काय न्याय हा कठोर गुण आहे आणि त्यामुळे त्याची दया त्यास नरम करते. पण हे बरोबर नाही.
“न्याय” यासाठी असलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “न्यायदंड” असाही होऊ शकतो. न्याय या गुणाचा धार्मिकता याजशी खूप जवळून संबंध आहे. परंतु, न्याय म्हटले, की बहुतेकदा आपण त्याचा अर्थ कायदा असा लावतो. परंतु धार्मिकतेच्या बाबतीत असे नाही. हे खरे आहे की यहोवा जेव्हा न्याय करतो तेव्हा कधीकधी त्यात दोषी असलेल्यांना शिक्षा देणे समाविष्ट असते, तरीसुद्धा चांगल्यांना तारण मिळवून देण्याची तरतूद देखील त्याच्या न्यायात समाविष्ट असू शकते. (उत्पत्ति १८:२०-३२; यशया ५६:१; मलाखी ४:२) यास्तव, यहोवाचा न्याय इतका कडक आहे की त्याला नरम करण्याची किंवा त्याची प्रखरता कमी करण्याची आवश्यकता आहे असे आपण समजू नये.
“दया” यासाठी असलेला इब्री शब्द, न्यायदंड बजावण्यात आत्मसंयम राखणे याला सूचित करू शकतो. पण तो, दुःखग्रस्त लोकांना आराम देण्याच्या अर्थात सक्रियपणे करुणा दाखवण्याच्या अभिव्यक्तीला देखील सूचित करतो.—अनुवाद १०:१८; लूक १०:२९-३७.
यहोवा देव न्यायी तसेच दयावान देव आहे. (निर्गम ३४:६, ७; अनुवाद ३२:४; स्तोत्र १४५:९) त्याचा न्याय आणि त्याची दया हे दोन्ही गुण परिपूर्ण आहेत आणि ते सुसंगतपणे कार्य करतात. (स्तोत्र ११६:५; होशेय २:१९) दोन्ही गुण एकमेकांना अगदी परिपूर्णरीत्या पूरक आहेत किंवा संतुलित आहेत. म्हणूनच, आपण जर म्हटले, की यहोवाची दया त्याच्या न्यायाची प्रखरता कमी करते तर आपल्याला असेही म्हणावे लागेल, की त्याचा न्याय त्याच्या दयेच्या तीव्रतेला कमी करतो.
यशयाने असे भाकीत केले: “तुम्हांवर कृपा करावी म्हणून यहोवा वाट पाहील, आणि तुम्हांवर दया करावी म्हणून तो उंचावला जाईल; कारण यहोवा न्यायीपणाचा देव आहे.” (यशया ३०:१८, पं.र.भा.) यशया या वचनात दाखवतो, की यहोवा न्यायी असल्यामुळे तो करुणामय कृत्ये करण्यास प्रवृत्त होतो; त्यात असे म्हटलेले नाही की त्याची करुणा त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते किंवा त्यावर प्रतिबंध करते. यहोवा दया दाखवतो कारण तो न्यायी व प्रेमळ आहे.
हे खरे की, बायबलचा एक लेखक याकोब याने असे लिहिले: “दया न्यायावर विजय मिळविते.” (याकोब २:१३ब) परंतु, या संदर्भात याकोब यहोवाविषयी बोलत नव्हता तर तो ख्रिश्चनांविषयी बोलत होता जे दया दाखवतात—उदाहरणार्थ, ते पीडितांना व गरिबांना दया दाखवतात. (याकोब १:२७; २:१-९) अशा दयाळू लोकांचा न्याय करताना यहोवा त्यांच्या वर्तनाची दखल घेतो आणि आपल्या पुत्राच्या बलिदानाच्या आधारावर त्यांना दयाळूपणे क्षमा करतो. अशाप्रकारे, त्यांचे दयाळू वर्तन, प्रतिकूल न्यायावर विजय मिळवते जो कदाचित त्यांना दयाळू न राहण्याबद्दल मिळाला असता.—नीतिसूत्रे १४:२१; मत्तय ५:७; ६:१२; ७:२.
यास्तव, यहोवाची दया त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते असे म्हणणे उचित नाही. यहोवा, दया आणि न्याय या दोन्ही गुणांमध्ये परिपूर्णपणे संतुलन राखतो. यहोवाचे इतर गुण, जसे की प्रेम आणि बुद्धी यांचे परस्परांमध्ये जसे संतुलन आहे तसेच दया आणि न्याय या गुणांच्याबाबतीत देखील संतुलन आहे.