व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्य तुम्हाला किती मोलवान वाटते?

सत्य तुम्हाला किती मोलवान वाटते?

सत्य तुम्हाला किती मोलवान वाटते?

“तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.”—योहान ८:३२.

१. पिलाताने “सत्य” हा शब्द ज्या अर्थाने वापरला आणि येशूने ज्या अर्थाने वापरला त्यात काय फरक होता?

“सत्य काय आहे?” पिलाताने हा प्रश्‍न विचारला तेव्हा तो सर्वसामान्य सत्याविषयी बोलत होता. पण येशूने असे म्हटले होते: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७, ३८) पण येशू पिलाताप्रमाणे सर्वसामान्य सत्याविषयी नव्हे तर देवाकडील सत्याविषयी बोलत होता.

सत्याबद्दल जगाची मनोवृत्ती

२. येशूच्या कोणत्या विधानावरून सत्याचे मोल आपण जाणू शकतो?

पौलाने म्हटले: “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) सत्याविषयीही हेच म्हणता येईल. बायबलवर आधारित असलेल्या सत्याविषयी जाणून घेण्याची संधी मिळूनसुद्धा बरेच लोक जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात. पण हे सत्य किती मोलवान आहे! येशूने म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.”—योहान ८:३२.

३. दिशाभूल करणाऱ्‍या शिकवणुकींविषयी आपण कोणता इशारा लक्षात ठेवला पाहिजे?

प्रेषित पौलाने म्हटले की मानवी तत्त्वज्ञानात आणि परंपरांमध्ये सत्य सापडू शकत नाही. (कलस्सैकर २:८) किंबहुना अशा शिकवणुकी दिशाभूल करणाऱ्‍या असतात. पौलाने इफिसस मंडळीतील ख्रिश्‍चनांना अशी ताकीद दिली की त्यांनी मानवी विचारधारांवर विश्‍वास ठेवल्यास ते “भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे” असे होतील. (इफिसकर ४:१४) आज देवाकडील सत्याचा विरोध करणाऱ्‍यांच्या मतप्रसाराकरवी या ‘भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍त्‌यांना’ बढावा दिला जातो. अशा प्रकारचा मतप्रसार अतिशय धूर्तपणे सत्याचा विपर्यास करून खोट्या माहितीला सत्याचे रूप देतो. अशा कावेबाज दबावांना तोंड देण्याची वेळ आल्यास आपण बायबलचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

ख्रिस्ती आणि जग

४. सत्य कोणाकरता उपलब्ध आहे आणि ज्यांना ते मिळते त्यांची काय जबाबदारी आहे?

जे येशू ख्रिस्ताचे शिष्य बनले होते त्यांच्याविषयी येशूने यहोवाला अशी प्रार्थना केली की “तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) या लोकांना यहोवाची सेवा करण्याकरता आणि त्याचे नाव व राज्य घोषित करण्याकरता समर्पित अथवा वेगळे केले जाणार होते. (मत्तय ६:९, १०; २४:१४) यहोवाचे सत्य सर्वांच्या ठायी नसले तरीसुद्धा जे त्याचा शोध घेतात, मग ते कोणत्याही राष्ट्राचे, जातीचे, किंवा संस्कृतीचे असले तरीसुद्धा त्यांना सत्याची देणगी उपलब्ध आहे. प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

५. ख्रिस्ती लोकांचा सहसा छळ का केला जातो?

ख्रिस्ती लोक इतरांना बायबलचे सत्य सांगतात पण सर्व ठिकाणी त्यांचे स्वागत केले जात नाही. येशूने बजावले होते: “तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) या वचनावर विवेचन करताना आयरिश पाळक जॉन आर. कॉटर यांनी १८१७ साली असे लिहिले होते: “आपल्या प्रचार कार्याद्वारे लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याच्या त्यांच्या [ख्रिस्ती लोकांच्या] प्रयत्नांबद्दल कृतज्ञता वाटण्याऐवजी, त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्‍न होईल आणि लोकांची दुष्कृत्ये उजेडात आणल्यामुळे त्यांचा छळ केला जाईल.” छळ करणाऱ्‍या या लोकांनी “आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली” नसते. आणि यामुळे, “देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करितो; ज्यांनी सत्यावर विश्‍वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल.”—२ थेस्सलनीकाकर २:१०-१२.

६. ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणत्या प्रकारच्या अभिलाषा बाळगू नयेत?

प्रेषित योहानाने या जुलमी जगात राहणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांना असा सल्ला दिला: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. . . . कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” (१ योहान २:१५, १६) “सर्व” असे म्हणताना योहानाने कोणताच अपवाद वगळला नाही. त्यामुळे आपल्याला सत्यापासून दूर नेईल अशा कोणत्याही गोष्टीची आपण चुकूनही अभिलाषा मनात निर्माण होऊ देता कामा नये. योहानाच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. तो कसा?

७. सत्याचे ज्ञान योग्य मनोवृत्तीच्या लोकांना कशाप्रकारे प्रेरित करते?

सबंध जगात, २००१ सालादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी दर महिन्यात ४५ लाखांहून अधिक गृह बायबल अभ्यास चालवले व या अभ्यासाद्वारे लोकांना वैयक्‍तिकरित्या व सामूहिकरित्या देवाच्या अपेक्षांविषयी ज्ञान दिले. परिणामस्वरूप, २,६३,४३१ लोकांचा बाप्तिस्मा झाला. या नव्या शिष्यांना सत्याच्या प्रकाशाचे मोल कळले आणि त्यांनी वाईट संगतीचा आणि या जगात प्रचलित असलेल्या अनैतिक व देवाचा अनादर करणाऱ्‍या वर्तनाचा त्याग केला. बाप्तिस्मा झाल्यापासून ते यहोवाने सर्व ख्रिस्ती लोकांकरता घालून दिलेल्या आदर्शांनुसार जगत आहेत. (इफिसकर ५:५) तुम्हालाही सत्य इतकेच मोलाचे वाटते का?

यहोवाला आपली काळजी वाटते

८. यहोवा आपल्या समर्पणाला कसे लेखतो आणि ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे’ का शहाणपणाचे आहे?

आपण अपरिपूर्ण असून देखील यहोवा कृपाळूपणे आपल्या समर्पणाचा स्वीकार करतो; जणू आपल्याला स्वतःजवळ घेण्याकरता तो वाकतो. अशाप्रकारे तो आपल्याला आपल्या ध्येयांचा व इच्छाभिलाषांचा स्तर उंचावण्यास शिकवतो. (स्तोत्र ११३:६-८) त्याच वेळेस, यहोवा आपल्याला त्याच्यासोबत एक वैयक्‍तिक नातेसंबंध जोडू देतो आणि जर आपण ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटलो’ तर तो आपली काळजी वाहण्याचेही आश्‍वासन देतो. जर आपण असे केले आणि आध्यात्मिकरित्या स्वतःचे संरक्षण केले तर तो आपल्याला वचन देतो की “ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३३.

९. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ कोण आहे आणि या ‘दासाच्या’ माध्यमाने यहोवा कशाप्रकारे आपली काळजी वाहतो?

येशूने आपल्या १२ प्रेषितांना निवडून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीचा पाया घातला; या मंडळीला “देवाचे इस्राएल” म्हणून संबोधण्यात आले. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण २१:९, १४) नंतर तिचे वर्णन, “सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी” या शब्दांतही करण्यात आले. (१ तीमथ्य ३:१५) येशूने त्या मंडळीच्या सदस्यांची ओळख ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आणि “विश्‍वासू व विचारशील कारभारी” या शब्दांत करून दिली. येशूने म्हटले की ख्रिश्‍चनांना “योग्य वेळी शिधासामुग्री” देण्याची जबाबदारी या विश्‍वासू दासावर असेल. (मत्तय २४:३, ४५-४७; लूक १२:४२) अन्‍नाशिवाय एखाद्या व्यक्‍तीची उपासमार होऊन मृत्यू होऊ शकतो. त्याचप्रकारे जर आपण आध्यात्मिक अन्‍न ग्रहण केले नाही तर आपण दुर्बल होऊन आध्यात्मिक अर्थाने मरू शकतो. म्हणून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांची’ तरतूद देखील यहोवाच्या काळजीचाच आणखी एक पुरावा आहे. या ‘दासाच्या’ माध्यमाने मिळणाऱ्‍या सर्व बहुमोल आध्यात्मिक तरतुदींची आपण नेहमी कदर करावी.—मत्तय ५:३.

१०. सभांना नियमित उपस्थित राहणे का महत्त्वाचे आहे?

१० आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्यात वैयक्‍तिक अभ्यास करणे समाविष्ट आहे. तसेच इतर ख्रिश्‍चनांशी संगती करणे आणि मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे देखील यात समाविष्ट आहे. सहा महिन्यांआधी, किंबहुना, सहा आठवड्यांआधी तुम्ही काय खाल्ले होते हे तुम्हाला आठवते का? कदाचित तुम्हाला आठवत नसेल. तरीसुद्धा तुम्ही जे काही खाल्ले त्यामुळे तुम्हाला आवश्‍यक असलेले पोषण मिळाले. आणि त्याचप्रकारचे अन्‍न तुम्ही त्यानंतरही खाल्ले असेल. आपल्या ख्रिस्ती सभांद्वारे पुरवल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाबद्दलही हेच म्हणता येईल. कदाचित सभांमध्ये काय काय सांगण्यात आले याचे बारीक सारीक तपशील आता आपल्याला आठवत नसतील. आणि त्याचप्रकारचे साहित्य कदाचित पुन्हा पुन्हा विचारात घेण्यात आले असेल. तरीसुद्धा, हे आध्यात्मिक अन्‍न आहे आणि आपल्या आरोग्याकरता आवश्‍यक आहे. सभांतून नेहमी आपल्याला उत्तम आध्यात्मिक पोषण आणि तेसुद्धा योग्य वेळी मिळते.

११. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासोबत आपले कोणते कर्तव्य आहे?

११ ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्यावर एक जबाबदारी देखील येते. ख्रिश्‍चनांना ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन देण्याची व एकमेकांकडे लक्ष देण्याची’ आज्ञा देण्यात आली आहे. आपण सर्व ख्रिस्ती सभांची तयारी करतो, त्या सभांना उपस्थित राहतो आणि त्यांत सहभाग घेतो तेव्हा आपला विश्‍वास तर दृढ होतोच पण यामुळे आपण इतरांनाही उत्तेजन देत असतो. (इब्री लोकांस १०:२३-२५) खाण्यापिण्याच्या बाबतीत नखरे करणाऱ्‍या लहान मुलांप्रमाणेच काही जणांना आध्यात्मिक अन्‍नाच्या बाबतीतही सतत प्रोत्साहन द्यावे लागते. (इफिसकर ४:१३) ज्यांना आवश्‍यकता आहे त्यांना या प्रकारचे प्रोत्साहन देणे हे प्रेमळपणाचे लक्षण आहे; यामुळे त्यांना प्रौढ ख्रिस्ती बनणे शक्य होईल. प्रेषित पौलाने त्यांच्याविषयी लिहिले: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.”—इब्री लोकांस ५:१४.

आध्यात्मिकरित्या स्वतःची काळजी घेणे

१२. सत्यात टिकून राहण्याची जबाबदारी मुळात कोणाची आहे? स्पष्ट करा.

१२ विवाह जोडीदार अथवा आईवडील आपल्याला सत्याच्या मार्गात चालत असताना आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतात. तसेच मंडळीचे वडील देखील, आपण त्यांच्या देखरेखीखाली सोपवलेल्या कळपातील सदस्य असल्यामुळे आपल्याकडे लक्ष देऊ शकतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) पण जर सत्यावर आधारित असलेल्या जीवनमार्गावर आपल्याला टिकून राहायचे असेल तर मुळात ही जबाबदारी कोणाची आहे? खरोखर ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि हे केवळ सर्वसाधारण परिस्थितीतच नाही तर खडतर परिस्थितीतही म्हणता येईल. पुढील उदाहरणाचा विचार करा.

१३, १४. एका कोकऱ्‍याच्या उदाहरणावरून स्पष्ट झाल्याप्रमाणे, आपल्याला आवश्‍यक असलेली आध्यात्मिक मदती कशी मिळू शकेल?

१३ स्कॉटलंडमध्ये काही कोकरे एका कुरणात चरत होती. त्यांच्यापैकी एक कोकरू रस्ता चुकून एका डोंगराच्या कडेला गेले आणि खाली असलेल्या खडकाच्या कंगोऱ्‍यावर पडले. त्याला काही ईजा झाली नाही, पण ते घाबरलेले होते आणि त्याला पुन्हा वरती चढता येत नव्हते. त्यामुळे ते बिचारे ओरडू लागले. त्याच्या आईने त्याचा आवाज ऐकला आणि तीसुद्धा ओरडू लागली. शेवटी मेंढपाळाने येऊन त्या कोकराला वर काढले.

१४ काय घडले याकडे नीट लक्ष द्या. कोकरू मदतीसाठी ओरडले, मेंढी देखील त्याच्यासोबत ओरडू लागली आणि यामुळे सावध झालेला मेंढपाळ लगेच मदतीला धावून आला. धोक्याची चाहूल लागताच मदतीची विनंती केली पाहिजे हे एका लहानशा कोकराला आणि मेंढीला कळते, तर मग आपण आध्यात्मिकरित्या अडखळतो किंवा सैतानाच्या जगाकडून अनपेक्षित धोक्यांचा सामना करतो तेव्हा आपणही असेच करू नये का? (याकोब ५:१४, १५; १ पेत्र ५:८) नक्कीच आपण असे केले पाहिजे; आणि जर वयाने लहान असल्यामुळे किंवा सत्यात नवीन असल्यामुळे आपल्याजवळ कमी अनुभव असेल तर आपण असे अधिक केले पाहिजे.

देवाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केल्यामुळे आनंद मिळतो

१५. एक स्त्री ख्रिस्ती मंडळीच्या सभांना येऊ लागली तेव्हा तिला काय जाणवले?

१५ बायबलचे ज्ञान मिळवून सत्य देवाची सेवा करणाऱ्‍यांना त्यामुळे मिळणाऱ्‍या मनःशांतीचे मोल लक्षात घ्या. जीवनभर चर्च ऑफ इंग्लंडची सदस्य असलेल्या एका सत्तर वर्षांच्या स्त्रीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्याची तयारी दाखवली. लवकरच तिला देवाचे नाव यहोवा असल्याचे कळले आणि ती स्थानीय राज्य सभागृहात केल्या जाणाऱ्‍या मनःपूर्वक जाहीर प्रार्थनांनंतर सर्वांसोबत “आमेन” म्हणू लागली. तिने हे भावपूर्ण विधान केले: “क्षुद्र मानवांपासून कितीतरी श्रेष्ठ असे देवाचे चित्र रेखाटण्याऐवजी तुम्ही त्याला अगदी आपल्या सर्वांच्या मध्यात आणता, एखाद्या प्रिय मित्राप्रमाणे भासवता. हे मी याआधी कधीच अनुभवले नव्हते.” सत्याची ही पहिली छाप, कदाचित ही आस्थेवाईक व्यक्‍ती कधीही विसरणार नाही. आपणसुद्धा पहिल्यांदा सत्य स्वीकारले तेव्हा ते आपल्याला किती मोलवान वाटत होते हे कधीही विसरू नये.

१६. (अ) आपण पैसा कमवणे हेच आपल्या जीवनातील मुख्य ध्येय बनवल्यास काय होऊ शकते? (ब) खरा आनंद आपल्याला कसा मिळू शकतो?

१६ बरेच लोक असे मानतात की त्यांच्याजवळ भरपूर पैसा असता तर ते आनंदी असते. पण जर पैसा कमवणे हे आपल्या जीवनातील मुख्य ध्येय आपण बनवले तर आपल्याला “असंख्य मानसिक यातना” सहन कराव्या लागू शकतात. (१ तीमथ्य ६:१०, फिलिप्स भाषांतर) विचार करा, श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात कितीतरी लोक लॉटरीची तिकिटे विकत घेतात, जुगारात पैसा उडवतात, किंवा स्टॉक मार्केटमध्ये उलटसुलट अनुमान लावतात. पण यांपैकी फारच कमी लोकांचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होते. आणि ज्यांना बक्कळ पैसा मिळवण्यात यश येते त्यांनासुद्धा या अचानक मिळालेल्या पैशामुळे आनंद मिळत नाही याची जाणीव होते. उलट, स्थायी आनंद यहोवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने ख्रिस्ती मंडळीला सहकार्य दिल्याने आणि त्याच्या देवदूतांच्या मदतीने मिळतो. (स्तोत्र १:१-३; ८४:४, ५; ८९:१५) आपण असे करतो तेव्हा आपल्याला अनेक अनपेक्षित आशीर्वाद मिळू शकतात. तुमच्या जीवनात असे अनपेक्षित आशीर्वाद आणण्याइतपत सत्य तुम्हाला मोलाचे वाटते का?

१७. प्रेषित पेत्राने शिमोन या कातडी कमावणाऱ्‍याकडे मुक्काम केला यावरून त्याच्या मनोवृत्तीविषयी काय कळून येते?

१७ प्रेषित पेत्राचा एक अनुभव लक्षात घ्या. सा.यु. ३६ साली त्याने शारोनच्या पठाराच्या प्रदेशात मिशनरी दौरा केला. त्याने लोद शहरात मुक्काम केला आणि तेथे त्याने एनेयास नावाच्या पक्षाघात झालेल्या माणसाला बरे केले आणि पुढे यापो नावाच्या बंदर शहरात गेला. तेथे त्याने दुर्कसचे पुनरुत्थान केले. प्रेषितांची कृत्ये ९:४३ आपल्याला सांगते: “तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्‍या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.” या उडत्या उल्लेखावरून आपल्याला त्या शहरातील लोकांची सेवा करताना पेत्राने दाखवलेली अपक्षपाती मनोवृत्ती दिसून येते. ती कशी? फ्रेडरिक फरार नावाचे बायबल विद्वान असे लिहितात: “मौखिक [मोशेच्या] नियमशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्‍याला कातडे कमावणाऱ्‍याच्या घरात राहायला गळ घालणे जवळजवळ अशक्य होते. या व्यापारात निरनिराळ्या प्राण्यांच्या कातड्यांना आणि मृत शरीरांना स्पर्श करणे भाग असल्यामुळे, तसेच या व्यापारासाठी आवश्‍यक असलेल्या साहित्यामुळे नियमशास्त्राच्या कर्मठ अनुयायांना तो अशुद्ध व घृणास्पद वाटे.” शिमोनचे “समुद्राच्या किनाऱ्‍यास” असलेले घर कदाचित त्याच्या कातडी कमावण्याच्या कारखान्याला लागून नसेलही पण तरीसुद्धा फरार- सांगतात, की शिमोन ‘अशा एका व्यापारात गुंतलेला होता जो किळसवाणा समजला जायचा आणि हा व्यापार करणाऱ्‍यांना सहसा समाजात कमी दर्जा होता.’—प्रेषितांची कृत्ये १०:६.

१८, १९. (अ) पेत्राला मिळालेल्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र का विचारात पडला? (ब) पेत्राला कोणता अनपेक्षित आशीर्वाद मिळाला?

१८ कोणताही पूर्वग्रह न बाळगता पेत्राने शिमोनचे अतिथ्य स्वीकारले आणि त्या ठिकाणी पेत्राला देवाकडून अनपेक्षित मार्गदर्शन प्राप्त झाले. त्याला एक दृष्टान्त झाला ज्यात त्याला यहुदी नियमशास्त्रानुसार अशुद्ध मानले जाणारे प्राणी खाण्याची आज्ञा देण्यात आली. पेत्राने आक्षेप घेतला व म्हटले की “निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीहि खाल्ले नाही.” पण तीन वेळा त्याला सांगण्यात आले: “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.” साहजिकच, “आपण पाहिलेल्या दृष्टांताचा अर्थ काय असावा ह्‍याविषयी पेत्र विचारात पडला.”—प्रेषितांची कृत्ये १०:५-१७; ११:७-१०.

१९ आदल्या दिवशी तेथून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कैसरिया येथे राहणाऱ्‍या कर्नेल्य नावाच्या एका विदेशी माणसालाही एक दृष्टान्त झाला होता याची पेत्राला कल्पना नव्हती. यहोवाच्या दूताने कर्नेल्याला, शिमोन नावाच्या कातडी कमावणाऱ्‍याच्या घरात जाऊन पेत्राला शोधून काढण्याकरता सेवकांना पाठवण्याची आज्ञा दिली होती. कर्नेल्याने त्याच्या सेवकांना शिमोनच्या घरी पाठवले आणि पेत्र त्यांच्यासोबत कैसरिया येथे आला. तेथे त्याने कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याला व परिचितांना उपदेश केला. यामुळे, ते सुंता न झालेल्यांपैकी सत्याचा स्वीकार करून राज्याचे वारस या नात्याने पवित्र आत्मा मिळालेले प्रथम विदेशी बनले. या पुरुषांची सुंता झालेली नसूनही पेत्राचे शब्द ऐकणाऱ्‍या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. यामुळे यहुद्यांच्या नजरेत अशुद्ध असलेल्या परराष्ट्रीयांतील लोकांनाही ख्रिस्ती मंडळीचे सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा झाला. (प्रेषितांची कृत्ये १०:१-४८; ११:१८) पेत्राला हा किती असामान्य बहुमान मिळाला. आणि हे शक्य झाले, कारण सत्य त्याला मोलवान वाटत होते आणि यामुळे त्याने यहोवाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिले व तो त्यानुसार वागला!

२०. आपण सत्याला जीवनात प्राधान्य देतो तेव्हा देवाकडून आपल्याला कोणती मदत प्राप्त होते?

२० पौल आपल्याला असे प्रोत्साहन देतो: “आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ४:१५) होय आपण सत्याला जीवनात प्राधान्य दिले व यहोवाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने आपले मार्गदर्शन करू दिले तर सत्य आजही आपल्या जीवनात अवर्णनीय आनंद आणेल. तसेच आपल्या प्रचार कार्यात पवित्र देवदूतही आपल्याला मदत करतात हे विसरू नका. (प्रकटीकरण १४:६, ७; २२:६) यहोवाने आपल्यावर सोपवलेल्या कामात खुद्द देवदूतांचे पाठबळ असण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला आहे! जर आपण विश्‍वासू राहिलो तर आपण सर्वकाळ सत्याचा देव, यहोवा याची स्तुती करू शकू. यापेक्षा अधिक मोलाचे काही असू शकेल का?—योहान १७:३.

आपण काय शिकलो?

• बरेच लोक सत्य का स्वीकारत नाहीत?

• ख्रिश्‍चनांनी सैतानाच्या जगातील गोष्टींकडे कोणत्या दृष्टीने पाहावे?

• सभांच्या संबंधाने आपली मनोवृत्ती कशी असावी आणि का?

• स्वतःची आध्यात्मिकरित्या काळजी घेण्यासाठी आपल्यावर कोणती जबाबदारी आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[[१८ पानांवरील नकाशा/चित्र]

महासमुद्र

कैसरिया

शारोनचे पठार

यापो

लोद

जेरूस

[चित्र]

पेत्र देवाच्या मार्गदर्शनानुसार वागल्यामुळे त्याला अनपेक्षित आशीर्वाद मिळाला

[चित्राचे श्रेय]

नकाशा: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[१३ पानांवरील चित्र]

येशूने सत्याबद्दल साक्ष दिली

[१५ पानांवरील चित्र]

शारीरिक अन्‍नाप्रमाणे आध्यात्मिक अन्‍न आपल्या आरोग्याकरता आवश्‍यक आहे