स्वार्थत्यागी वृत्तीने सेवा करणे
जीवन कथा
स्वार्थत्यागी वृत्तीने सेवा करणे
डॉन रेन्डेल यांच्याद्वारे कथित
माझी आई, १९२७ साली मी अवघ्या पाच वर्षांचा असताना मरण पावली. पण तरीसुद्धा तिच्या विश्वासाने माझ्या जीवनावर विलक्षण प्रभाव पाडला. हे कसे शक्य आहे?
सैनिक असणाऱ्या माझ्या वडिलांशी लग्न झाले तेव्हा आई चर्च ऑफ इंग्लंडची कट्टर सदस्या होती. हे पहिल्या महायुद्धाच्या आधी घडले. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले; चर्चच्या व्यासपीठाला नवीन सैनिकांची भरती करण्याचे माध्यम बनवल्याबद्दल माझ्या आईने चर्च अधिकाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. पाळकाने काय उत्तर दिले असावे? “घरी जा, आणि असल्या विषयांवर उगाच डोकं खपवू नको!” पण आईचे समाधान झाले नाही.
१९१७ साली युद्ध जोरात सुरू असताना आई “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” पाहायला गेली. आपल्याला सत्य सापडले आहे अशी खात्री पटल्यामुळे तिने चर्च सोडून दिले आणि ती त्या काळचे बायबल विद्यार्थी, अर्थात यहोवाचे साक्षीदार यांच्या सभांना जाऊ लागली. इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटीत वेस्ट कोकर नावाच्या आमच्या खेड्यापासून सर्वात जवळच्या योविल गावातल्या मंडळीच्या सभांना ती जात होती.
आईने लगेच आपल्या तीन बहिणींनाही या नवीनच सापडलेल्या विश्वासाविषयी सांगितले. माझी आई आणि तिची बहीण मिली किती उत्साहाने सायकलींवरून आमच्या खेड्याच्या आसपासच्या क्षेत्रात जाऊन स्टडीज इन द स्क्रिपचर्स हे बायबल अभ्यासाचे ग्रंथ लोकांना वाटायच्या, हे योविल मंडळीच्या वृद्ध बांधवांनी मला सांगितले आहे. पण दुर्दैवाने आई तिच्या जीवनाचे शेवटले १८ महिने अंथरुणाला खिळून होती. तिला क्षय झाला होता आणि त्या काळात हा एक असाध्य रोग होता.
प्रत्यक्ष जीवनात स्वार्थत्याग
मिली मावशी त्या वेळी आमच्याकडे राहात होती. आईच्या आजारपणात ती तिची सुश्रृषा करायची आणि माझी व जोन
या माझ्या सात वर्षांच्या बहिणीचीही काळजी घ्यायची. आईचा मृत्यू झाला तेव्हा मिली मावशीने स्वखुषीने आम्हा मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. मुलांची जबाबदारी घेणारे कोणीतरी सापडल्यामुळे बाबा खुश झाले आणि मिली मावशीने कायम आमच्याकडेच राहावे यासाठी ते आनंदाने तयार झाले.आम्हाला मिली मावशीचा खूप लळा लागला होता आणि ती आमच्यासोबत राहणार याबद्दल आम्ही आनंदी होतो. पण तिने असा निर्णय का म्हणून घेतला? अनेक वर्षांनंतर मिली मावशीने आम्हाला सांगितले की आईने घातलेल्या पायावर आमच्या भविष्याची इमारत उभी करण्याचे अर्थात जोन आणि मला बायबलचे सत्य शिकवण्याचे कर्तव्य आता आपले आहे असे तिने ओळखले होते आणि हे आमचे वडील कधीही करणार नाहीत हे तिला माहीत होते कारण त्यांना धर्मांत जराही रस नव्हता.
कालांतराने आम्हाला कळले की मिली मावशीने आणखी एक अतिशय खासगी निर्णय घेतला होता. आमची योग्यप्रकारे काळजी घेण्याकरता कधीही लग्न न करण्याचा निर्णय. किती मोठा स्वार्थत्याग! जोन आणि मी तिचे कायम ऋणी आहोत. मिली मावशीने आमच्यावर केलेले संस्कार आणि तिचा स्वतःचा उत्तम आदर्श आम्ही आजपर्यंत विसरलो नाही.
निर्णायक वळणे
जोन व मी आमच्याच खेड्यातल्या चर्च ऑफ इंग्लंडच्या शाळेत जात होतो. आमच्या धार्मिक शिक्षणाविषयी मिली मावशीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला आमची भूमिका ठामपणे सांगितली होती. इतर मुले चर्चला जायची तेव्हा आम्ही घरी जायचो आणि पाळक शाळेत धार्मिक शिक्षण देण्याकरता यायचे तेव्हा आम्ही दोघे वेगळे बसायचो आणि आम्हाला शास्त्रवचने पाठ करायला दिली जायची. याचा मला फार उपयोग झाला कारण ही वचने माझ्या मनात कायमची कोरली गेली.
चौदा वर्षांचा असताना मी शाळा सोडून एका स्थानिक चीज कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून जाऊ लागलो. मी पियानो वाजवायलाही शिकलो आणि संगीत आणि बॉलरूम डान्सिंग माझे आवडते छंद बनले. बायबल सत्य माझ्या मनात मुळावले होते, पण अद्याप मला त्यांनी प्रेरित केले नव्हते. मग १९४० साली मार्च महिन्यात एके दिवशी एका वृद्ध साक्षीदार बहिणीने मला तिच्यासोबत सुमारे ११० किलोमीटर अंतरावरील स्विन्डन येथे एका संमेलनाला येण्याविषयी विचारले. ब्रिटनमधील यहोवाच्या साक्षीदारांवर देखरेख करणारे सेवक अल्बर्ट श्रोडर यांनी जाहीर भाषण दिले. ते संमेलन माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले.
दुसरे महायुद्ध जोरात सुरू होते. हातावर हात धरून किती वेळ बसायचे? असा विचार करून मी योविल राज्य सभागृहात गेलो. मी उपस्थित राहिलो त्या पहिल्याच सभेत रस्त्यावरील साक्षकार्याचा परिचय करून देण्यात आला. मला जेमतेमच ज्ञान होते, पण तरीसुद्धा मी या कार्यात सहभागी होण्याचे ठरवले. मित्र म्हणवणारे काहीजण समोरून जाताना माझी टिंगल करत होते, पण त्यांना खूप आश्चर्यही वाटले.
जून १९४० मध्ये ब्रिस्टल शहरात माझा बाप्तिस्मा झाला. एका महिन्यात मी एक सामान्य पायनियर—पूर्णवेळेचा सुवार्तिक म्हणून नाव नोंदवले. त्यानंतर काही काळानंतर माझ्या बहिणीनेही पाण्यात बाप्तिस्मा घेऊन आपले समर्पण जाहीर केले तेव्हा मला खूप आनंद झाला.
युद्ध काळात पायनियरिंग
युद्ध सुरू झाल्यानंतर एका वर्षानंतर मला सैन्यात भरती करण्यात आले असल्याचे सूचित करणारी कागदपत्रे पाठवण्यात आली. मी लष्करात सहभाग घेण्यास नकार दर्शवण्यासाठी योविलमध्ये आपले नाव नोंदवले आणि त्यामुळे मला ब्रिस्टल येथील न्यायालयापुढे हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. मी जॉन विन याच्यासोबत ग्लॉस्टरशायरमधील सिन्डरफोर्ड येथे आणि नंतर वेल्समधील हेवरफोर्डवेस्ट आणि कार्मार्थेन येथे पायनियरिंग करत होतो. * कार्मार्थेन येथील कोर्टातील एका सुनावणीत मला स्वान्सिया येथील तुरुंगात तीन महिन्यांचा कारावास, शिवाय, १,७२५ रुपयांचा दंडही सुनावण्यात आला. त्या काळात ही रक्कम मोठी होती. दंड न भरल्यामुळे आणखी तीन महिने तुरुंगात राहण्याची शिक्षा मला भोगावी लागली.
तिसऱ्या सुनावणीच्या वेळेस मला असे विचारण्यात आले: “बायबलमध्ये ‘कैसराचे आहे ते कैसराला द्या’ असे सांगितलेले नाही का?” मी उत्तर दिले, “हो, असे सांगितले आहे हे मला माहीत आहे, पण त्या वचनात पुढे असेही म्हटले आहे की ‘जे देवाचे आहे ते देवाला द्या.’ आणि मी हेच करत आहे.” (मत्तय २२:२१, सुबोध भाषांतर) काही आठवड्यांनंतर मी लष्करी सेवेच्या बंधनापासून मुक्त असल्याचे मला पत्राद्वारे कळवण्यात आले.
१९४५ च्या सुरवातीला मला लंडनच्या बेथेल कुटुंबात सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले. पुढच्या हिवाळ्यात, सबंध जगातील प्रचार कार्याची देखरेख करणारे नेथन एच. नॉर व त्यांचे सचिव मिल्टन जी. हेन्शेल यांनी लंडनला भेट दिली. ब्रिटनमधील आठ तरुण बांधवांना मिशनरी प्रशिक्षणाकरता असलेल्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचे निमंत्रण देण्यात आले; मीही त्यांच्यापैकी एक होतो.
मिशनरी नेमणुका
मे २३, १९४६ रोजी फॉई या लहानशा कॉर्निश बंदरावरून युद्धकाळातील लिबर्टी जहाजाने आमचा प्रवास सुरू झाला. बंदराचा अधिकारी कॅप्टन कॉलिन्झ यहोवाच्या साक्षीदारांपैकी होता; आमचे जहाज निघाले तेव्हा त्याने भोंगा वाजवला. साहजिकच इंग्लंडचा समुद्रकिनारा हळूहळू नजरेआड होताना आमच्या सर्वांच्या मनात मिश्र भावना होत्या. अटलांटिक पार करताना समुद्र अतिशय वादळी होता, पण १३ दिवसांनंतर आम्ही सुखरूप अमेरिकेत पोचलो.
ऑगस्ट ४ ते ११, १९४६ दरम्यान संपन्न झालेल्या आठ दिवसांच्या आनंदी राष्ट्रे ईश्वरशासित संमेलनाला उपस्थित राहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ८०,००० प्रतिनिधी त्या संमेलनाला उपस्थित होते; यात ३०२ जण ३२ वेगवेगळ्या देशांतून आले होते. याच अधिवेशनात सावध राहा! * हे नियतकालिक, तसेच, “देव सत्य होवो” हे बायबल अभ्यासाचे साधन देखील उत्साही जमावापुढे प्रसिद्ध करण्यात आले.
१९४७ साली आम्ही गिलियड पदवीधर झालो; बिल कॉप्सन व मला ईजिप्तला नेमण्यात आले. पण तेथे जाण्याआधी मला ब्रुकलिन बेथेलमध्ये रिचर्ड एब्रहॅमसन यांच्याकडून दफ्तर कामाचे अतिशय उत्तम प्रशिक्षण लाभले. आम्ही ॲलेक्झांड्रिया येथे आलो आणि लवकरच मला मध्यपूर्वेतील जीवनाची सवय झाली. पण अरॅबिक भाषा शिकणे हे एक आव्हान होते आणि त्यामुळे चार भाषांतील साक्ष कार्डांचा उपयोग करावा लागे.
बिल कॉप्सन सात वर्षे ईजिप्तमध्ये राहिला, पण मला मात्र पहिल्या वर्षानंतर पुन्हा व्हिसा मिळवता आला नाही आणि त्यामुळे मला देश सोडून जावे लागले. पण मिशनरी सेवेचे ते एक वर्ष माझ्या जीवनातील सर्वात प्रतिफलदायी होते. दर आठवडी २० पेक्षा अधिक बायबल अभ्यास चालवण्याची सुसंधी मला मिळाली आणि त्या दरम्यान जे लोक सत्य शिकले त्यांपैकी काहीजण आजही मोठ्या उत्साहाने यहोवाची स्तुती करत आहेत. ईजिप्तमधून मला सायप्रसला जाण्यास सांगण्यात आले.
सायप्रस—आणि इस्राएल
मी ग्रीक ही नवी भाषा शिकू लागलो आणि स्थानिक पोटभाषेशीही
परिचित होऊ लागलो. काही काळानंतर, ॲन्थनी सायडारस यांना ग्रीसला जाण्यास सांगण्यात आले तेव्हा सायप्रस येथील कामाची देखरेख करण्यास मला सांगण्यात आले. त्या काळात इस्राएलमधील कार्य देखील सायप्रस शाखा दफ्तराच्या देखरेखीखालीच होते. आणि इतर बांधवांसोबत मलाही तेथे असलेल्या मोजक्या बांधवांना वेळोवेळी भेट देण्याचा बहुमान प्राप्त झाला.इस्राएलला पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्ही हायफा येथे एका रेस्टॉरंटमध्ये एक लहानसे संमेलन भरवले; या संमेलनाला ५० ते ६० जण उपस्थित होते. वेगवेगळ्या देशांच्या लोकांचे विभाजन करून आम्ही या संमेलनाचा कार्यक्रम एकूण सहा वेगवेगळ्या भाषांत सादर केला! दुसऱ्या एका प्रसंगी मी जेरूसलेममध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी निर्माण केलेली एक फिल्म दाखवली आणि एक जाहीर भाषण दिले. स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी चांगले वृत्त प्रसिद्ध केले.
त्या वेळी सायप्रसमध्ये जवळजवळ १०० साक्षीदार होते आणि त्यांना आपल्या विश्वासाकरता कडा संघर्ष करावा लागत होता. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाळकांनी चिथावलेले जमाव आमच्या संमेलनात व्यत्यय आणायचे; ग्रामीण भागांत साक्षकार्य करताना लोक दगडं फेकून मारायचे. हा माझ्याकरता नवीनच अनुभव होता. ही दगडं कशी चुकवायची हे मला शिकून घ्यावे लागले! असा हिंसक विरोध असतानाही या द्वीपावर आणखी मिशनऱ्यांना नेमण्यात येणे खरोखर विश्वास बळकट करणारे होते. डेनिस व मेव्हिस मॅथ्युज, तसेच जोन हली आणि बेरिल हेवूड हे माझ्यासोबत फॅमगुस्ता येथे तर टॉम आणि मेरी गुल्डन आणि मुळात सायप्रसची असून लंडन येथे जन्मलेली नीना कॉनस्टान्टी लीमासोल येथे कार्य करू लागली. त्याच दरम्यान बिल कॉप्सन यांनाही सायप्रस येथे पाठवण्यात आले आणि नंतर बर्ट आणि बेरिल वाइसी हे देखील त्यांच्याकडे आले.
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे
१९५७ सालाच्या शेवटी मी आजारी पडलो आणि मिशनरी कार्य मला अर्ध्यातच सोडावे लागले. तब्येत सुधारण्याकरता मी अतिशय जड अंतःकरणाने इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला आणि तेथे मी १९६० पर्यंत पायनियरिंग करत होतो. माझ्या बहिणीने आणि तिच्या पतीने मला त्यांच्या घरात आश्रय दिला पण आता परिस्थिती बदलली होती. जोनला आता अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागत होते. मी नव्हतो त्या १७ वर्षांमध्ये, आपल्या पती व मुलांसोबत तिने आमच्या वडिलांची आणि मिली मावशीचीही खूप प्रेमाने काळजी घेतली होती. आता वडील आणि मावशी दोघेही वृद्ध झाले होते आणि त्यांची तब्येतही खालावली होती. मावशीच्या स्वार्थत्यागी वृत्तीचे अनुकरण करण्याची ही वेळ आहे हे ओळखून मी मावशी आणि वडिलांचा मृत्यू होईपर्यंत माझ्या बहिणीकडेच राहिलो.
इंग्लंडमध्येच स्थायिक होण्याची मला संधी होती. पण काही काळ आराम केल्यानंतर, माझ्या नेमलेल्या स्थानी परत जाण्याचे माझे कर्तव्य आहे असे मला वाटू लागले. काही झाले तरीही, यहोवाच्या संस्थेने मला प्रशिक्षण देण्याकरता बराच पैसा खर्च केला होता. म्हणून १९७२ साली मी स्वखर्चाने सायप्रसला परतलो आणि तेथे पायनियर सेवा करू लागलो.
नेथन एच. नॉर, पुढच्या वर्षी होणाऱ्या अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी आले. मी परत आल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांनी मला सबंध द्वीपावरील मंडळ्यांकरता विभागीय देखरेखे म्हणून नेमण्याची शिफारस केली, आणि हा विशेषाधिकार मला चार वर्षे उपभोगता आला. हे काम काही साधेसुधे नव्हते कारण मला सतत ग्रीक बोलावे लागणार होते.
कठीण परिस्थिती
मी उत्तर सागरपट्टीवरील कीरीन्याच्या पूर्वेकडे काराकूमी नावाच्या खेड्यात पॉल ॲन्ड्रेयू नावाच्या मूळच्या सायप्रसच्या एका ग्रीक भाषिक बांधवासोबत राहात होतो. सायप्रसचे शाखा दफ्तर कीरीन्या पर्वतांच्या दक्षिणेकडील नायकोसिया गावात होते. १९७४ सालच्या जुलै महिन्याच्या सुरवातीला राष्ट्रपती माकारियोस यांना सत्तेवरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा मी निकोसियात होतो आणि तेथे त्यांचा महाल आगीत भस्म होताना मी डोळ्यांनी पाहिला. प्रवास करणे शक्य झाले तेव्हा मी लगेच कीरीन्या येथे आलो; तेथे लवकरच विभागीय संमेलन भरवण्याची तयारी सुरू होती. दोन दिवसांनी मी बंदरावर पहिला बॉम्ब पडल्याचा आवाज ऐकला. वर पाहिले तर आक्रमण करणाऱ्या सैन्याच्या तुकड्यांना टर्कीहून आणणारे असंख्य हेलिकॉप्टर दिसले.
मी ब्रिटिश नागरिक असल्यामुळे टर्कीच्या सैनिकांनी मला निकोसियाच्या शहराबाहेर नेले; तेथे संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी माझी उलटतपासणी घेतली आणि त्यांनी शाखा दफ्तराशी संपर्क साधला. यानंतर मला टेलिफोनच्या आणि विजेच्या गुरफटलेल्या तारांतून वाट काढून सीमेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या निर्मनुष्य घरांपर्यंत कसेबसे चालत जावे लागले. तो अनुभव अतिशय भयानक होता. पण यहोवासोबत माझा संपर्क कधीही तुटू शकत नव्हता! जीवनातील सर्वात कठीण अनुभवातून जाताना प्रार्थनांनी मला तारले.
माझ्याजवळ आता दमडीही नव्हती पण सुदैवाने मी एका सुरक्षित ठिकाणी अर्थात शाखा दफ्तरात होतो. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. काही दिवसांतच आक्रमक सैन्यांनी सायप्रसच्या उत्तरेकडील एक तृतीयांश भागावर कब्जा केला होता. आम्हाला बेथेल सोडून जाणे भाग होते; आम्ही लिमास्सोल येथे आलो. युद्धाच्या कठीण परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या ३०० बांधवांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या एका समितीवर कार्य करण्याची मला संधी मिळाली; यापैकी बरेच बांधव बेघर झालेले होते.
वारंवार नेमणुकीत बदल
जानेवारी १९८१ मध्ये नियमन मंडळाने मला ग्रीसमध्ये जाऊन अथेन्स येथे असलेल्या बेथेल कुटुंबात सामील होण्यास सांगितले. पण त्या वर्षाच्या शेवटापर्यंत पुन्हा मी सायप्रसमध्ये होतो आणि मला शाखा समितीचा संचालक नेमण्यात आले. ॲन्ड्रियास कॉन्डोयिऑर्गिस आणि त्यांची पत्नी मारो यांना लंडनहून पाठवण्यात आले होते; ते मूळचे सायप्रसचे होते आणि त्यांच्यामुळे मला बरेच “साहाय्य व मदत” मिळाले.—कलस्सैकर ४:११, NW.
१९८४ साली थियोडोर जॅरस यांची झोन भेट संपल्यावर मला नियमन मंडळाकडून एक पत्र मिळाले. त्यात इतकेच म्हटले होते: “त्यांची झोन भेट संपल्यावर तुम्ही बंधू जॅरससोबत ग्रीसला जावे.” काहीही कारण सांगण्यात आले नव्हते. पण आम्ही ग्रीसला पोचलो तेव्हा नियमन मंडळाचे आणखी एक पत्र शाखा समितीला वाचून दाखवण्यात आले. त्यात मला ग्रीसच्या शाखा समितीचे संचालक म्हणून नेमण्याविषयी सांगण्यात आले होते.
एव्हाना, ग्रीसमध्ये धर्मत्यागाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या होत्या. तसेच बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करत असल्याचे बरेच आरोपही आमच्यावर होते. दररोज यहोवाच्या लोकांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केले जात होते. या कठीण काळातही विश्वासात पक्के राहिलेल्या बांधवांचा सहवास मला लाभला याचा मला आनंद *
वाटतो! त्यांच्यापैकी काहीजणांच्या प्रकरणांची कालांतराने मानवी हक्कांच्या युरोपीय न्यायालयापुढे सुनावणी झाली; या खटल्यांचे अतिशय आश्चर्यजनक निकाल लागले व त्यामुळे ग्रीसमध्ये प्रचार कार्यावर अनुकूल परिणाम झाला आहे.ग्रीसमध्ये सेवा करताना, मला अथेन्स, थेस्सलोनायका आणि ऱ्होड्स व क्रीटच्या द्वीपांवर संस्मरणीय अधिवेशनांना उपस्थित राहण्याची सुसंधी मिळाली. तेथे मी अतिशय प्रतिफलदायी अशी चार वर्षे आनंदात घालवली पण पुन्हा माझ्या परिस्थितीत बदल होऊ घातला होता. १९८८ साली मला पुन्हा सायप्रसला परतावे लागले.
सायप्रस—नंतर पुन्हा ग्रीस
सायप्रसमध्ये माझ्या अनुपस्थितीदरम्यान बांधवांनी निकोसियापासून दोनतीन किलोमीटरवर असलेल्या नीसू येथे नव्या शाखेकरता तयार इमारती असलेली जागा मिळवली होती. यहोवाच्या साक्षीदारांच्या ब्रुकलिन येथील मुख्यालयाहून आलेल्या कॅरी बार्बर यांनी समर्पणाचे भाषण दिले. आता या द्वीपावर काहीशी शांतीमय परिस्थिती होती आणि मला परत येथे यायला मिळाले याचा मला आनंद वाटला. पण फार काळ मी येथे राहू शकलो नाही.
नियमन मंडळाने ग्रीसमध्ये अथेन्सच्या उत्तरेकडे काही किलोमीटर अंतरावर एक नवे बेथेल गृह बांधण्यास संमती दिली होती. मला इंग्रजी व ग्रीक दोन्ही भाषा अवगत असल्यामुळे १९९० साली नव्या इमारतीच्या प्रकल्पावर कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवकांच्या कुटुंबाकरता मला दुभाषिकाचे काम करण्याकरता बोलावण्यात आले. उन्हाळ्यात सकाळी सहा वाजताच, प्रकल्पावर काम करणाऱ्या बांधकाम कुटुंबासोबत कार्य करण्यासाठी आलेल्या शेकडो ग्रीक स्वयंसेवी बंधू भगिनींचे स्वागत करताना किती आनंद वाटायचा हे अजूनही मला आठवते! त्यांची आनंदी व आवेशी वृत्ती सदैव माझ्या आठवणीत राहील.
ग्रीक ऑर्थोडॉक्स पाळकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी आत घुसून आमच्या कामात व्यत्यय आणायचा प्रयत्न केला पण यहोवाने आमच्या प्रार्थना ऐकल्या आणि आम्ही सुखरूप काम करू शकलो. मी एप्रिल १३, १९९१ रोजी नव्या बेथेल गृहाचे समर्पण होईपर्यंत प्रकल्पावर होतो.
माझ्या प्रिय बहिणीला मदत
पुढच्या वर्षी, मी सुटीसाठी इंग्लंडला माझी बहीण व मेव्हणा यांच्याकडे आलो. पण मी तिथे असतानाच, दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या मेव्हण्यांना दोन हार्टअटॅक आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जोनने माझ्या मिशनरी सेवेदरम्यान मला सतत खूप साहाय्य केले होते. तिने मला प्रोत्साहनाचे पत्र लिहिले नाही असा एकही आठवडा जात नसे. कोणत्याही मिशनरीकरता असा संपर्क एक आशीर्वादच असतो! आता ती विधवा झाली होती आणि तिची तब्येतही तितकी चांगली नसल्यामुळे तिला मदतीची गरज होती. मी काय करावे?
जोनची मुलगी थेल्मा आणि तिचे पती आधीच मंडळीतल्या एका विश्वासू विधवा बहिणीची काळजी घेत होते. ही आमचीच मामेबहीण होती आणि ती मरायला टेकली होती. त्यामुळे बरीच प्रार्थना केल्यावर मी जोनकडेच राहून तिची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात, हे सोपे नव्हते. पण योविलच्या दोन मंडळ्यांपैकी पेन मिल या मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला आहे.
परदेशात मी ज्या बांधवांची सेवा केली होती, ते टेलिफोन व पत्राद्वारे नियमित माझ्यासोबत संपर्क राखतात आणि याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी कधीही ग्रीस किंवा सायप्रसला परतण्याची इच्छा व्यक्त केली तर प्रवासाचे तिकीट तत्काळ येऊन पोचेल याची मला खात्री आहे. पण आता माझे वय ८० वर्षे आहे आणि माझी दृष्टी किंवा माझी प्रकृतीही पूर्वीसारखी राहिलेली नाही. मला पूर्वीसारखे काम करता येत नाही याची खंत वाटते पण बेथेल सेवेदरम्यान मी स्वतःला लावलेल्या अनेक चांगल्या सवयी मला अतिशय उपयोगी ठरल्या आहेत. उदाहरणार्थ, न्याहारीआधी मी न चुकता दैनंदिन वचन वाचतो. तसेच मी लोकांसोबत जुळवून घ्यायला त्यांच्यावर प्रेम करायला शिकलो—यशस्वी मिशनरी सेवेचे हेच गुपीत आहे.
यहोवाच्या स्तुतीकरता वाहिलेल्या मागील जवळजवळ ६० वर्षांकडे वळून पाहताना मी आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो की पूर्णवेळेची सेवा हे सर्वात मोठे संरक्षण आहे आणि यातून सर्वात उत्तम शिक्षण एका व्यक्तीला प्राप्त होते. मी पूर्ण मनाने दावीदाच्याच शब्दांत यहोवाला म्हणू शकतो की: “माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस.”—स्तोत्र ५९:१६.
[तळटीपा]
^ परि. 18 “माझे हृदय कृतज्ञतेने भरून येते” या शीर्षकाखाली टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९७ अंकातील पृष्ठे २५-८ वरील जॉन विन यांची जीवन कथा पाहा.
^ परि. 23 आधी या नियतकालिकाला सांत्वन (इंग्रजी) म्हणत असत.
^ परि. 41 टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९९८ अंकातील पृष्ठे २०-१ आणि सप्टेंबर १, १९९३, (इंग्रजी) पृष्ठे २७-३१; सावध राहा! जानेवारी ८, १९९८, (इंग्रजी) पृष्ठे २१-२, आणि एप्रिल ८, १९९७, पृष्ठे ११-१३ पाहा.
[२४ पानांवरील नकाशे]
ग्रीस
अथेन्स
सायप्रस
निकोसिया
कीरीन्या
फॅमगुस्ता
लिमास्सोल
[२१ पानांवरील चित्र]
१९१५ साली आई
[२२ पानांवरील चित्र]
१९४६ साली ब्रुकलिन बेथेलच्या गच्चीवर गिलियडच्या आठव्या वर्गातील इतर बांधवांसोबत मी (डावीकडून चवथा)
[२३ पानांवरील चित्र]
पहिल्यांदा इंग्लंडला परतल्यावर मिली मावशीसोबत