व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदर्श नेतृत्व आपल्याला कोठे मिळू शकेल?

आदर्श नेतृत्व आपल्याला कोठे मिळू शकेल?

आदर्श नेतृत्व आपल्याला कोठे मिळू शकेल?

बायबल म्हणते, “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४; प्रकटीकरण ४:११) खरा देव यहोवा, आपला निर्माणकर्ता असल्यामुळे तो ‘आपली प्रकृति जाणतो.’ (स्तोत्र १०३:१४) त्याला आपल्या मर्यादांची आणि गरजांची पूर्ण कल्पना आहे. आणि तो एक प्रेमळ देव असल्यामुळे तो आपल्या या गरजा पूर्ण करू इच्छितो. (स्तोत्र १४५:१६; १ योहान ४:८) यात आदर्श नेतृत्वाची आपली गरज देखील समाविष्ट आहे.

भविष्यवक्‍ता यशया याच्याद्वारे यहोवाने असे घोषित केले: “पाहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे.” (यशया ५५:४) आजच्या नेतृत्वासंबंधी निर्माण झालेल्या पेचप्रसंगावरचा उपाय म्हणजे—स्वतः सर्वशक्‍तिमान देवाने नियुक्‍त केलेल्या—या नेत्याची ओळख पटवणे आणि त्याचे नेतृत्व स्वीकारणे. ज्याविषयी भाकीत करण्यात आले तो नेता आणि शास्ता कोण आहे? नेता होण्याकरता त्याच्याकडे कोणती पात्रता आहे? तो आपल्याला कोठे नेईल? आणि त्याच्या नेतृत्वाचा फायदा उचलण्याकरता आपण काय केले पाहिजे?

प्रतिज्ञात नेत्याचे आगमन

जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी देवदूत गब्रीएल दानीएल संदेष्ट्याला प्रगट झाला आणि त्याने त्याला असे सांगितले: “हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्‍त, अधिपति असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताहि नगर, रस्ते व खंदक यांसह बांधितील.”—दानीएल ९:२५.

स्पष्टपणे हा देवदूत दानीएलला यहोवाने निवडलेल्या अधिपतीच्या अर्थात नेता येण्याच्या विशिष्ट वेळेसंबंधीची माहिती देत होता. “अभिषिक्‍त, अधिपति” सा.यु.पू. ४५५ साली जेरूसलेमच्या पुनर्बांधणीची आज्ञा झाल्यापासून ६९ सप्ताहांच्या किंवा ४८३ वर्षांच्या शेवटी येणार होता. * (नहेम्या २:१-८) त्या कालावधीच्या शेवटाला काय घडले? शुभवर्तमान लेखक लूक असे सांगतो: “तिबिर्य कैसर ह्‍याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक [होता] [सा.यु. २९], . . . तेव्हा जखऱ्‍याचा मुलगा योहान ह्‍याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देनेजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला.” त्या वेळी अभिषिक्‍त नेता येण्याची ‘लोक वाट पाहत होते.’ (लूक ३:१-३, १५) लोकांचे जमाव योहानाकडे आले पण योहान प्रतिज्ञात नेता नव्हता.

मग ऑक्टोबर सा.यु. २९ च्या सुमारास नासरेथचा येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यास आला. आणि योहानाने त्याच्यासंबंधी अशी साक्ष दिली: “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” (योहान १:३२-३४) येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो अभिषिक्‍त नेता—मशीहा अर्थात ख्रिस्त बनला.

होय, ज्याच्याविषयी प्रतिज्ञा करण्यात आली होती तो “राष्ट्राचा नेता व शास्ता” येशू ख्रिस्त असल्याचे शाबीत झाले. आणि जेव्हा आपण एक नेता म्हणून त्याच्याकडे कोणकोणते गुण आहेत हे पाहू तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल की त्याचे नेतेपद आजच्या आदर्श नेत्याकडून अपेक्षा केल्या जाणाऱ्‍या गुणांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.

मशीहा—एक आदर्श नेता

आदर्श नेता स्पष्ट मार्गदर्शन देतो आणि आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या लोकांना स्वतःहून समस्या सोडवण्याचे आंतरिक मनोबल आणि सामर्थ्य देतो. २१ व्या शतकातील नेतृत्व: १०० उत्तम नेत्यांशी बातचीत (इंग्रजी), नावाच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, ‘२१ व्या शतकातल्या यशस्वी नेत्याकडून हेच अपेक्षित आहे.’ येशूने आपल्या श्रोत्यांना दैनंदिन समस्यांना तोंड द्यायला किती परिणामकारक पद्धतीने तयार केले! त्याचे सर्वात सुप्रसिद्ध भाषण—डोंगरावरील प्रवचन याचेच उदाहरण घ्या. मत्तय ५ ते ७ अध्याय व्यवहारोपयोगी मार्गदर्शनाने परिपूर्ण आहेत.

उदाहरणार्थ, वैयक्‍तिक मतभेद दूर करण्याविषयी येशूने दिलेला सल्ला लक्षात घ्या. त्याने म्हटले: “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्तय ५:२३, २४) इतरांसोबत शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात पुढाकार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे—किंबहुना हे धार्मिक कर्तव्यापेक्षाही जसे मोशेच्या नियमानुसार जेरूसलेमच्या मंदिरातील वेदीवर दान अर्पण करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा, देवाला ती उपासना स्वीकारणीय ठरणारच नाही. येशूचा सल्ला कित्येक शतकांआधी होता तितकाच आजही व्यवहारोपयोगी आहे.

येशूने आपल्या श्रोत्यांना अनैतिकतेच्या पाशापासून दूर राहण्यासही मदत केली. त्याने त्यांना असा सल्ला दिला: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२७, २८) ही ताकीद किती योग्य आहे! अनैतिक विचारांना मनात थारा देण्याद्वारे व्यभिचाराकडे नेणाऱ्‍या वाटेवर पहिले पाऊल तरी आपण का ठेवावे? येशूने म्हटले की व्यभिचार, जारकर्मे ही हृदयातूनच उत्पन्‍न होतात. (मत्तय १५:१८, १९) तेव्हा, आपल्या हृदयाचे संरक्षण करणे सुज्ञतेचे आहे.—नीतिसूत्रे ४:२३.

डोंगरावरील प्रवचनात आपल्या शत्रूंवर प्रेम करण्यासंबंधी, औदार्य दाखवण्यासंबंधी, भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यासंबंधी आणि अशा इतर अनेक विषयांसंबंधी उत्तम सल्ला सापडतो. (मत्तय ५:४३-४७; ६:१-४, १९-२१, २४-३४) येशूने आपल्या श्रोत्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवण्याद्वारे देवाची मदत मिळवायलाही शिकवले. (मत्तय ६:९-१३) अभिषिक्‍त नेता आपल्या अनुयायांना मानवजातीवर सामान्यपणे येणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्यास समर्थ व तयार करतो.

डोंगरावरील प्रवचनात येशूने सहा वेळा “तुम्ही ऐकले आहे” किंवा “हे सांगितले होते” असा उल्लेख केला; पण मग “मी तर तुम्हाला सांगतो” असे म्हणून त्याने नवीन विचार मांडला. (मत्तय ५:२१, २२, २७, २८, ३१-३४, ३८, ३९, ४३, ४४) यावरून हे सूचित होते की, त्याच्या श्रोत्यांना परुशांच्या मौखिक परंपरांनुसार एका विशिष्ट पद्धतीने वागण्याची सवय होती. पण येशू आता त्यांना एक वेगळा मार्ग—मोशेच्या नियमशास्त्राचा खरा गर्भितार्थ व्यक्‍त करणारा मार्ग दाखवत होता. अशाप्रकारे येशू एक परिवर्तन घडवून आणत होता आणि हे तो आपल्या अनुयायांना स्वीकारायला सोपे जाईल अशा पद्धतीने करत होता. होय येशूने लोकांना आपल्या जीवनात, आध्यात्मिक व नैतिकदृष्ट्या लक्षणीय बदल घडवून आणण्यास प्रवृत्त केले. हीच तर खऱ्‍या नेत्याची ओळख आहे.

व्यवस्थापनाच्या एका पाठ्यपुस्तकात लोकांना बदलणे किती कठीण आहे याविषयी सांगितले आहे. ते म्हणते: “बदल घडवून आणणाऱ्‍याच्या [नेताच्या] अंगी समाजसेवकाची संवेदनशीलता, मानसशास्त्रज्ञाची अंतर्दृष्टी, मॅरथॉन धावपटूचा जोम, बुलडॉगचा चिवटपणा, वैराग्याचे स्वावलंबन आणि संताचा सोशिकपणा असावा लागतो. आणि हे सर्व गुण असूनही यशाची खात्री देता येत नाही.”

“नेतृत्व: गुण आवश्‍यक?” या शीर्षकाखालील एका लेखात असे म्हणण्यात आले, की “नेत्यांना आपल्या अनुयायांकडून जसे वर्तन अपेक्षित आहे, तसे त्यांचे स्वतःचे वर्तन असले पाहिजे.” आदर्श नेता केवळ उपदेश करत नाही तर त्याप्रमाणे वागतो. येशू ख्रिस्ताविषयी हे अगदी खरे होते! होय, आपल्या सोबत्यांना नम्रतेचा उपदेश देण्यासोबतच त्याने त्यांचे पाय धुण्याद्वारे जणू त्यांना याचा वस्तूपाठ दिला. (योहान १३:५-१५) त्याने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आपल्या शिष्यांना केवळ पाठवले नाही तर त्याने स्वतः या कार्यात परिश्रम घेतले. (मत्तय ४:१८-२५; लूक ८:१-३; ९:१-६; १०:१-२४; योहान १०:४०-४२) शिवाय, नेतृत्वाच्या अधीन राहण्यासंबंधी त्याने उत्तम आदर्श मांडला. त्याने स्वतःविषयी असे म्हटले: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही; कारण जे काही तो करितो ते पुत्रहि तसेच करितो.”—योहान ५:१९.

येशूने काय म्हटले व केले याविषयी आतापर्यंत आपण जे पाहिले त्यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते की तो एक आदर्श नेता आहे. किंबहुना आदर्श नेत्यांसंबंधी कोणत्याही मानवी निकषांपेक्षा तो कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. येशू परिपूर्ण आहे. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर त्याला अमरत्व प्राप्त झाल्यामुळे त्याला अंत नाही. (१ पेत्र ३:१८; प्रकटीकरण १:१३-१८) कोणता मानवी नेता ही पात्रता गाठू शकेल?

आपण काय केले पाहिजे?

देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, अभिषिक्‍त नेता येशू ख्रिस्त आज्ञाधारक मानवजातीवर असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करेल. यासंबंधी शास्त्रवचनांत अशी प्रतिज्ञा करण्यात आली आहे: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११) “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४) “देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

आजच्या जगात नेतृत्वासंबंधी पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पण येशू ख्रिस्त लीन जनांचे नेतृत्व करत आहे आणि त्यांना अशा एका शांतीपूर्ण नव्या जगात नेत आहे जेथे आज्ञाधारक मानवजात एकोप्याने यहोवा देवाची उपासना करतील आणि परिपूर्णतेकडे उत्तरोत्तर प्रगती करत जातील. खऱ्‍या देवाविषयी आणि त्याच्या नियुक्‍त नेत्याविषयी ज्ञान घेऊन त्यानुसार वागणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!—योहान १७:३.

कोणत्याही व्यक्‍तीची सर्वात उत्तम प्रशंसा म्हणजे तिचे अनुकरण करणे. मग आपण मानव इतिहासातील सर्वात श्रेष्ठ नेत्याचे, अर्थात येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये का? हे आपण कसे करू शकतो? त्याच्या नेतृत्वाचा स्वीकार केल्यामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो? या व इतर प्रश्‍नांची पुढील दोन लेखांत चर्चा करण्यात येईल.

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या दानीएलच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे १८६-९२ पाहा.

[४ पानांवरील चित्र]

दानीएलाने देवाच्या निवडलेल्या नेत्याच्या येण्याविषयी भाकीत केले होते

[७ पानांवरील चित्रे]

येशूच्या शिकवणुकींनी लोकांना जीवनातील समस्यांना तोंड देण्यास समर्थ केले

[७ पानांवरील चित्र]

येशू आज्ञाधारक मानवजातीला एका शांतीपूर्ण नव्या जगात नेईल