व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदर्श नेतृत्व जागतिक समस्या

आदर्श नेतृत्व जागतिक समस्या

आदर्श नेतृत्व जागतिक समस्या

तो लेखक व कवी होता. भविष्यासंबंधी अतिशय आशावादी होता. साधारण ९० वर्षांआधी त्याने अशा एका जगाची कल्पना केली “जेथे मनात भीती नसेल, प्रत्येकजण मान उंच करून चालू शकेल; जेथे ज्ञान विनामूल्य प्राप्त होऊ शकेल; जेथे सरहद्दी घालून जगाचे तुकडे पाडलेले नसतील; जेथे प्रत्येक शब्दात सत्याचे प्रतिबिंब असेल; [आणि] जेथे परिश्रमी बाहुंना उत्तरोत्तर परिपूर्णता प्राप्त होत जाईल.”

या लेखकाने एक असा दिवस येण्याची आशा व्यक्‍त केली जेव्हा त्याचा देश आणि सबंध जग अशा एका नव्या जगाची पहाट झालेली पाहील. नोबेल पारितोषिक विजेता असलेला हा कवी आज जिवंत असता तर त्याची घोर निराशा झाली असती. इतकी प्रगती आणि उन्‍नती करूनसुद्धा आज हे जग पूर्वी कधी नव्हते इतके विभाजित झालेले आहे. आणि मनुष्याचे भविष्य देखील फारसे आशादायक नाही.

व्यवसायाने शेतकरी असलेल्या एका माणसाला जेव्हा विचारण्यात आले की त्याच्या देशात अलीकडे विशिष्ट गटांत हिंसाचार का झाला तेव्हा त्याने आपल्या मते याचे एक कारण सांगितले. त्याने म्हटले की “हे भ्रष्ट नेत्यांमुळे घडले.” मानवजात—विसाव्या शतकाचा नैतिक इतिहास (इंग्रजी), या पुस्तकात इतिहासकार जॉनथन ग्लोव्हर यांनी देखील काहीसा असाच दृष्टिकोन मांडला आहे. ते म्हणतात: “हा जातीसंहार [त्याच देशातला] दोन जमातींमधील द्वेषाचा अचानक झालेला उद्रेक नसून आपली सत्ता हातात ठेवू इच्छिणाऱ्‍यांनी तो शिस्तबद्धरीत्या घडवून आणला होता.”

भूतपूर्व युगोस्लाव्हियातील दोन प्रजासत्ताक देशांमध्ये १९९० च्या सुरवातीला युद्धाला तोंड फुटले तेव्हा एक महिला पत्रकार असे म्हणाली: “कित्येक वर्षे आम्ही एकमेकांशी अगदी सलोख्याने राहत होतो आणि आज अशी स्थिती आली आहे की आम्ही एकमेकांच्या तान्ह्या मुलांची कत्तल करत आहोत. आम्हाला हे काय झाले आहे?”

युरोप व आफ्रिकेच्या कित्येक किलोमीटर दूर भारत देश आहे; सुरवातीला उल्लेख केलेल्या त्या कवीचे हे जन्मस्थान. “भारताची एकता टिकून राहू शकेल का?” असे शीर्षक असलेल्या एका व्याख्यानात प्रणय गुप्ते यांनी अशी टिप्पणी केली: ‘भारताच्या अवाढव्य लोकसंख्येपैकी ७० टक्के ३० वर्षांखालील आहेत; पण यांच्याकरता आदर्श ठरू शकतील असे नेतेच नाहीत.’

विशिष्ट देशांत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काही नेत्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची उदाहरणे आहेत. अशारितीने वेगवेगळ्या कारणांमुळे आज जगात आदर्श नेत्यांची कमी भासू लागली आहे, किंबहुना एक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आजची परिस्थिती जवळजवळ २,६०० वर्षांआधी एका संदेष्ट्याने लिहिलेल्या शब्दांची सत्यता पटवून देते. त्याने म्हटले: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

मग, सध्याच्या जागतिक दुःखद परिस्थितीवर काही उपाय नाही का? जेथे मानवसमाजात संघर्ष नसेल, भीती नसेल, जेथे खरे ज्ञान विपुल आणि विनामूल्य असेल आणि जेथे मानवजात परिपूर्णतेकडे वाटचाल करत असेल अशा एका जगात मानवजातीला कोण नेईल?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Fatmir Boshnjaku