व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकाकीपणावर तुम्ही मात करू शकता

एकाकीपणावर तुम्ही मात करू शकता

एकाकीपणावर तुम्ही मात करू शकता

“एकाकी व्यक्‍तीवर वारा वाहतो आणि एकाकी व्यक्‍ती कोमेजून जाते.” आयरिश कवी विल्यम बटलर येट्‌स यांच्या या शब्दांवरून दिसून येते की, एकाकीपणामुळे एक व्यक्‍ती पार उद्‌ध्वस्त होऊ शकते.

एकाकीपणाचा दुःखद अनुभव आपल्याला कधीच आला नाही असे कोणी म्हणू शकेल का? अनेक कारणांमुळे आपल्याला एकाकीपणा वाटू शकतो. परंतु, अविवाहित स्त्रियांना किंवा विधवांना अथवा घटस्फोटित स्त्रियांना वाटणारा एकाकीपणा सर्वात तीव्र प्रकारचा असू शकतो.

उदाहरणार्थ, फ्रान्सस नावाची एक तरुण ख्रिस्ती स्त्री म्हणते: “मी २३ वर्षांची होईपर्यंत माझ्या सर्व मैत्रिणींची लग्नं झाली होती आणि मीच एकटी उरली होते.” * जसजशी वर्षे उलटतात आणि लग्न होण्याची शक्यता कमी होत जाते तसतसा एकाकीपणा वाढत जातो. सध्या चाळीशीत असलेली सॅन्ड्रा म्हणते: “मी अविवाहित राहायचा विचार कधीच केला नव्हता आणि आताही मला संधी मिळाली तर मला लग्न करायला आवडेल.” पन्‍नाशीत असलेली ॲन्जेला म्हणते: “मी लग्न करायचं नाही असं काही ठरवलं नव्हतं पण परिस्थितीच तशी होती. मी ज्या भागात खास पायनियर म्हणून नेमले गेले तेथे मोजकेच अविवाहित बांधव होते.”

अनेक ख्रिस्ती स्त्रिया लग्न न करायचे ठरवतात कारण “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याचा यहोवाचा सल्ला त्या विश्‍वासूपणे पाळतात आणि हे प्रशंसास्पद आहे. (१ करिंथकर ७:३९) काहीजण अविवाहित स्थितीशी बऱ्‍यापैकी जुळवून घेतात पण काहींच्या बाबतीत असे घडते की जशी वर्षे उलटतात तशी लग्न करून मुले होण्याची इच्छा अधिक तीव्र होते. सॅन्ड्रा म्हणते, “मला वैवाहिक सोबती नाही यामुळे माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे आणि सतत ती मला जाणवत राहते.”

आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेणे, अशा काही कारणांमुळे एकाकीपणाची भावना अधिकच वाढू शकते. सॅन्ड्रा म्हणते, “माझं लग्न झालं नव्हतं म्हणून आमच्या वृद्ध आईवडिलांची काळजी मी घ्यावी अशी कुटुंबाची अपेक्षा होती. आम्ही सहा भावंडं असलो तरीही २० वर्षांपासून या जबाबदारीचा सर्वात जास्त भार मीच उचलला. पण जर मला पती असता तर मलाही आधार मिळाला असता आणि जीवन किती सुलभ बनलं असतं.”

फ्रान्ससने एकाकीपणाचे दुसरे एक कारण सांगितले. ती म्हणते: “कधीकधी लोक थेट येऊन विचारतात, ‘तू लग्न का नाही केलंस?’ अशा प्रश्‍नांमुळे मला वाटू लागतं की, माझं लग्न झालं नाही ही माझीच चूक आहे. जवळजवळ प्रत्येक लग्न समारंभात मला हा नकोसा वाटणारा प्रश्‍न विचारला जातो, ‘मग, तू कधी लग्न करतेस?’ मग मला वाटू लागतं, ‘आध्यात्मिक वृत्तीच्या बांधवांना माझ्यात रस नाही म्हणजे कदाचित माझ्यातच आवश्‍यक ते ख्रिस्ती गुण नसतील किंवा मीच इतकी काही सुंदर नसेन.’”

एकटेपणा किंवा एकाकीपणाच्या भावनांवर मात कशी करता येऊ शकते? इतरजण या बाबतीत काही मदत करू शकतात का?

यहोवावर विसंबून राहा

स्तोत्रकर्त्याने गायिले: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) इब्री वचनातील “भार” या शब्दाचा शब्दशः अर्थ “वाटा” असा होतो आणि त्यावरून आपल्या जीवनात आपल्या वाट्याला आलेल्या चिंता व काळज्या हे सूचित होते. इतर कोणाहीपेक्षा यहोवाला या भारांची सर्वात जास्त जाणीव असते आणि ते उचलण्यासाठी तो आपल्याला सामर्थ्य देऊ शकतो. यहोवा देवावर विसंबून राहिल्यानेच ॲन्जेलाला एकाकीपणाच्या भावनांशी संघर्ष करायला मदत मिळाली आहे. आपल्या पूर्ण-वेळेच्या सेवेविषयी बोलताना ती आठवून सांगते: “मी पायनियरींग सुरू केली तेव्हा माझी पायनियर सोबतीण आणि मी सर्वात जवळच्या मंडळीपासून खूप दूर राहात होतो. आम्ही पूर्णपणे यहोवावर विसंबून राहायला शिकलो आणि याचा मला आयुष्यभर फायदा झाला आहे. माझ्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मी यहोवाशी बोलते आणि तो मला मदत करतो. स्तोत्र २३ मुळे मला नेहमी सांत्वन मिळते आणि मी वारंवार ते स्तोत्र वाचते.”

प्रेषित पौलालाही एक मोठा भार उचलावा लागला. निदान तीन वेळा तरी त्याने ‘त्याच्या शरीरातला काटा दूर व्हावा म्हणून विनंती केली.’ पौलाला काही चमत्कारिक मदत देण्यात आली नाही परंतु देवाची अपात्र कृपा त्याला टिकून राहण्यास मदत करील असे वचन त्याला देण्यात आले. (२ करिंथकर १२:७-९) पौलाने समाधानी राहण्याचे रहस्यही ओळखले. त्याने नंतर लिहिले: “हरएक प्रसंगी अन्‍नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्‍न असणे व विपन्‍न असणे, ह्‍यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१२, १३.

आपल्याला निराशा वाटते किंवा एकाकीपणा वाटतो तेव्हा आपण देवाचे सामर्थ्य कसे प्राप्त करू शकतो? पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) सॅन्ड्रा या सल्ल्याचे पालन करते. ती म्हणते: “अविवाहित असल्यामुळे मी पुष्कळदा एकटीच असते. यामुळे मला यहोवाला प्रार्थना करायला पुष्कळ वेळ मिळतो. त्याच्याशी माझं नातं अधिक घनिष्ठ झालंय आणि माझ्या समस्यांविषयी व आनंदांविषयी मी मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकते.” आणि फ्रान्सस म्हणते: “स्वतःच्या जोरावर नकारात्मक विचारांचा सामना करणं सोपं नाही. पण यहोवाकडे मन मोकळं केल्यामुळे मला खूप साहाय्य मिळतं. माझ्या आध्यात्मिक आणि भावनिक हिताची यहोवाला चिंता आहे याची मला खात्री झालीय.”—१ तीमथ्य ५:५.

“एकमेकांची ओझी वाहा”

ख्रिस्ती बंधुसमाजात ओझी एकट्याने वाहवी लागत नाहीत. प्रेषित पौलाने उत्तेजन दिले, “एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.” (गलतीकर ६:२) सह-ख्रिश्‍चनांसोबत सहवास ठेवल्याने उत्तेजनाचे “गोड शब्द” ऐकायला मिळू शकतात ज्यामुळे आपले एकाकीपणाचे ओझे हलके होऊ शकते.—नीतिसूत्रे १२:२५.

इस्राएलचा शास्ता इफ्ताह याच्या मुलीविषयी शास्त्रवचने काय सांगतात ते देखील पाहा. अम्मोनच्या शत्रू सैन्यावर विजय मिळवण्याआधी इफ्ताहाने एक नवस केला होता की, जो कोणी त्याच्या घरातून त्याचे अभिनंदन करायला प्रथम बाहेर पडेल त्याला मी यहोवासाठी देऊन टाकेन. आणि त्याची मुलगीच सर्वात आधी घराबाहेर आली. (शास्ते ११:३०, ३१, ३४-३६) आपल्याला लग्न करता येणार नाही व स्वतःचे कुटुंब असण्याची नैसर्गिक इच्छा त्यागावी लागेल हे माहीत असतानाही इफ्ताहाच्या मुलीने स्वेच्छेने आपल्या पित्याचा नवस पूर्ण केला आणि आपले उर्वरित आयुष्य शिलो येथील मंदिरात घालवले. मग तिच्या या बलिदानाची कोणीच कदर केली नाही का? उलट: “प्रतिवर्षी इस्राएलाच्या कन्यांनी वर्षांचे चार दिवस इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे वर्णन करायला जात जावे अशी इस्राएलात रीत पडली.” (न्यायाधीश ११:४०, पं.र.भा.) होय, आपण एखाद्या व्यक्‍तीची प्रशंसा करतो तेव्हा तिला उत्तेजन मिळू शकते. त्यामुळे, जे खरोखरच स्तुतीयोग्य आहेत त्यांची प्रशंसा करण्यास आपण कधीही विसरू नये.

येशूचे उदाहरणही आपण पाहू या. पुरुषांनी स्त्रियांशी बोलावे अशी यहुद्यांमध्ये प्रथा नव्हती तरीपण येशूने मरीया व मार्थेसोबत वेळ घालवला. कदाचित त्या एकतर विधवा होत्या किंवा त्यांची लग्ने झाली नव्हती. परंतु त्या दोघींनाही आपल्या सहवासातून आध्यात्मिक लाभ मिळावा अशी येशूची इच्छा होती. (लूक १०:३८-४२) आपल्या अविवाहित आध्यात्मिक बहिणींना कोणत्याही आनंदाच्या प्रसंगांत सामील करून आणि त्यांच्यासोबत प्रचारकार्यात जाण्यासाठी व्यवस्था करून आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. (रोमकर १२:१३) अशाप्रकारे त्यांची काळजी घेतल्याची कदर त्यांना वाटते का? एका बहिणीने म्हटले: “माझ्यावर बंधुभगिनींचे प्रेम आहे, त्यांना माझी कदर आहे हे मला ठाऊक आहे पण ते जेव्हा वैयक्‍तिकरित्या माझ्याबद्दल आस्था दाखवतात तेव्हा मला कृतज्ञता वाटते.”

सॅन्ड्रा म्हणते, “आमचं स्वतःचं कोणी नसल्यामुळे आम्हाला आपलेपणाची आणि आध्यात्मिक बंधू-बहिणींच्या कुटुंबाचा भाग होण्याची जास्त गरज भासते.” स्पष्टतः, यहोवा अशा लोकांची काळजी घेतो आणि आपण त्यांना आपलेपणा व प्रेम दाखवतो तेव्हा त्याला सहयोग देत असतो. (१ पेत्र ५:६, ७) अशाप्रकारे दाखवलेली काळजी लपत नाही कारण “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड [यहोवा देव] करील.”—नीतिसूत्रे १९:१७.

“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे”

इतरजण मदत करू शकतात आणि त्यांच्या आधाराने खरोखरच उत्तेजन मिळत असले तरीही “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) परंतु, एकाकीपणाचा भार वाहताना मात्र आपल्या विशिष्ट धोक्यांविषयी सावध असले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण आपल्याच भावनाविश्‍वात राहू लागलो तर एकाकीपणा आपल्यावर विजय मिळवेल. दुसऱ्‍या बाजूला पाहिल्यास, प्रीतीने आपण एकाकीपणावर मात करू शकतो. (१ करिंथकर १३:७, ८) आपल्यातले इतरांना देणे हा आनंद मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे—मग आपली परिस्थिती कशीही असो. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) एक मेहनती पायनियर बहीण म्हणते, “माझ्याजवळ एकाकीपणाविषयी विचार करायला जास्त वेळ नसतो. माझा काहीतरी उपयोग होत आहे आणि मी व्यस्त आहे असं मला वाटतं तेव्हा मला एकटेपणा मुळीच जाणवत नाही.”

शिवाय, एकाकीपणामुळे आपण कोणत्याही अविचारीपणाच्या बंधनात पडणार नाही याबद्दलही सावध असले पाहिजे. उदाहरणार्थ, कोणत्याही परिस्थितीत लग्न करण्याचा अट्टाहास धरून सत्यात नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीशी विवाह केल्याने येणाऱ्‍या बेसुमार समस्यांकडे आणि विशेषकरून अशा बंधनापासून दूर राहा, या शास्त्रवचनातील सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे किती दुःखाची गोष्ट ठरेल! (२ करिंथकर ६:१४) घटस्फोट झालेल्या एका ख्रिस्ती स्त्रीने म्हटले: “एक गोष्ट अविवाहित असण्यापेक्षाही अधिक दुर्दैवाची आहे. ती म्हणजे चुकीच्या व्यक्‍तीशी विवाहित असणे.”

ज्या समस्येवर तोडगा नाही ती समस्या निदान काही काळापुरती तरी सहन करावीच लागते. देवाच्या मदतीने एकाकीपणा सहन करणे शक्य आहे. यहोवाची सेवा करत असताना, आपण आश्‍वस्त राहू या की, एक दिवशी आपल्या सर्व गरजा सर्वात उत्तम मार्गाने पूर्ण केल्या जातील.—स्तोत्र १४५:१६.

[तळटीप]

^ परि. 4 येथे दिलेल्या स्त्रियांची नावे बदलण्यात आली आहेत.

[२८ पानांवरील चित्रे]

इतरांकरता काही करण्याद्वारे आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याद्वारे एकाकीपणावर मात करता येऊ शकते