व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताचे नेतृत्व तुम्हाला वास्तविक वाटते का?

ख्रिस्ताचे नेतृत्व तुम्हाला वास्तविक वाटते का?

ख्रिस्ताचे नेतृत्व तुम्हाला वास्तविक वाटते का?

“आपणास नेते म्हणवून घेऊ नका कारण तुमचा नेता एक आहे. तो ख्रिस्त होय.”—मत्तय २३:१०, NW.

१. खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा एकच नेता कोण आहे?

मंगळवार, निसान ११. तीन दिवसांनंतर, येशू ख्रिस्ताला ठार मारले जाणार होते. आज तो शेवटच्या वेळी मंदिरात आला होता. तेथे जमलेल्या लोकांना आणि त्याच्या शिष्यांना त्याने एक महत्त्वाची शिकवणूक दिली होती. त्याने म्हटले: “आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास नेते म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे. तो ख्रिस्त होय.” (मत्तय २३:८-१०, NW) येशू ख्रिस्तच खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा नेता आहे.

२, ३. यहोवाचे ऐकल्यामुळे आणि त्याने नियुक्‍त केलेल्या नेत्याचा स्वीकार केल्यामुळे आपल्या जीवनावर कोणता परिणाम होऊ शकतो?

आपण येशूच्या नेतृत्वाचा स्वीकार करतो तेव्हा आपल्याला याचे किती उत्तम परिणाम आपल्या जीवनात पाहायला मिळतात! या नेत्याच्या आगमनाविषयी भाकीत करताना यहोवा देवाने संदेष्टा यशया याच्याद्वारे असे घोषित केले: “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैक्यावाचून व मोलावाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा! . . . माझे लक्षपूर्वक ऐका. आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो. . . . पाहा, मी त्यास राष्ट्राचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे.”—यशया ५५:१-४.

यशयाने पाणी, दूध आणि द्राक्षारस यांसारख्या सर्वसामान्य द्रव्यांची उदाहरणे देऊन हे दाखवले की आपण यहोवाचे ऐकतो आणि त्याने आपल्याकरता नियुक्‍त केलेल्या नेत्याचे व शास्त्याचे अनुकरण करतो तेव्हा आपल्या वैयक्‍तिक जीवनावर त्याचा चैतन्यदायी परिणाम होतो. जणू अतिशय उष्ण दिवशी थंड पाणी प्यायल्याप्रमाणे आपल्याला तजेला मिळतो. तसेच, सत्य व धार्मिकतेकरता आपली तहान भागवली जाते. ज्याप्रमाणे दूध लहान बालकांना ताकद देते आणि त्यांची वाढ होण्यास साहाय्यक ठरते त्याचप्रमाणे ‘वचनरूपी दूध’ आपल्याला शक्‍ती देते आणि देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात आध्यात्मिक वाढ होण्यास हातभार लावते. (१ पेत्र २:१-३) विशेष प्रसंगी द्राक्षारस आनंदात भर घालतो याच्याशी सर्वजण सहमत होतील. त्याचप्रकारे, खऱ्‍या देवाची उपासना करणे आणि त्याच्या नियुक्‍त नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणे यामुळे “अत्यानंद” होतो. (अनुवाद १६:१५) तेव्हा, आपण सर्वांनी, मग आपण तरुण असोत वा वृद्ध, स्त्री असोत वा पुरुष हे दाखवून दिले पाहिजे की ख्रिस्ताचे नेतृत्व आपल्याला वास्तविक वाटते. पण मशीहा आपला नेता आहे हे आपण दैनंदिन जीवनात कशाप्रकारे दाखवू शकतो?

तरुणांनो—‘ज्ञानात वाढत जा’

४. (अ) बारा वर्षांचा येशू वल्हांडणाकरता जेरूसलेमला गेला होता तेव्हा काय घडले? (ब) येशूला १२ वर्षांच्या वयातच कितपत ज्ञान होते?

आपल्या नेत्याने कोवळ्या वयाच्या मुलांकरता ठेवलेला आदर्श लक्षात घ्या. येशूच्या बालपणाविषयी फार कमी माहिती असली तरीसुद्धा एका घटनेवरून आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो. येशू १२ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला वल्हांडणाच्या वार्षिक सणाकरता जेरूसलेमला नेले. या प्रसंगी तो शास्त्रवचनांवर चर्चा करण्यात रमून गेला आणि त्याचे आईवडील चुकून त्याला न घेताच निघून गेले. तीन दिवसांनी जोसेफ व मरीया या त्याच्या काळजीत पडलेल्या आईवडिलांना तो मंदिरात “गुरूजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्‍न करताना सापडला.” शिवाय, “त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले.” कल्पना करा, अवघ्या १२ वर्षांच्या वयात येशू केवळ विचारप्रवर्तक व आध्यात्मिक विषायांवरील प्रश्‍नच विचारू शकत नव्हता तर बुद्धिमत्तापूर्ण उत्तरे देखील देऊ शकत होता! त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेल्या प्रशिक्षणाचा त्याला फायदा झाला असेल यात शंका नाही.—लूक २:४१-५०.

५. वयाने लहान असलेले, कौटुंबिक बायबल अभ्यासाप्रती आपल्या मनोवृत्तीचे कशाप्रकारे परीक्षण करू शकतात?

कदाचित तुम्ही वयाने लहान असाल. तुमचे आईवडील देवाचे समर्पित सेवक असल्यास तुमच्या घरात कदाचित कौटुंबिक बायबल अभ्यासाचा नियमित कार्यक्रम असेल. या कौटुंबिक अभ्यासाविषयी तुमची कशी मनोवृत्ती आहे? पुढील प्रश्‍नांवर विचारपूर्वक मनन करा: ‘माझ्या कुटुंबातील बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेला मी मनापासून सहयोग देतो का? ठरवलेल्या वेळेत व्यत्यय येऊ नये म्हणून मी आपल्यापरीने प्रयत्न करतो का?’ (फिलिप्पैकर ३:१६) ‘अभ्यासात मी उत्साहाने सहभाग घेतो का? योग्य ठिकाणी, मी अभ्यासाच्या साहित्यावर प्रश्‍न विचारतो का व त्याच्या व्यावहारिक महत्त्वाविषयी विवेचन करतो का? आध्यात्मिक प्रगती करत असताना मी “प्रौढांसाठी असलेल्या जड अन्‍नाची” लालसा निर्माण करत आहे का?’—इब्री लोकांस ५:१३, १४.

६, ७. दैनंदिन बायबल वाचनाचा नित्यक्रम कशाप्रकारे मोलाचा ठरू शकतो?

दररोज बायबल वाचण्याचा नित्यक्रम देखील अतिशय मोलाचा ठरू शकतो. स्तोत्रकर्त्याने असे म्हटले: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; . . . तर परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य.” (स्तोत्र १:१, २) मोशेच्यानंतर इस्राएलचे नेतृत्व करणारा यहोशवा ‘नियमशास्त्राच्या ग्रंथाचे रात्रंदिवस मनन करत असे.’ यामुळे त्याला सुज्ञपणे वागण्यास आणि देवाने दिलेले कार्य यशस्वीरित्या पार पाडण्यास मदत झाली. (यहोशवा १:८) आपला नेता, येशू ख्रिस्त याने म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) जर शारीरिक अन्‍न दररोज खाणे आवश्‍यक आहे तर मग आध्यात्मिक अन्‍न नियमितरित्या ग्रहण करणे आणखी कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे आहे!

आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असल्यामुळे १३ वर्षांच्या निकोलने दररोज बायबल वाचण्यास सुरवात केली. * आता ती १६ वर्षांची आहे आणि तिने सबंध बायबल एकदा वाचून पूर्ण केले असून ती आता दुसऱ्‍यांदा ते वाचत आहे. तिची पद्धत अगदी सोपी आहे. ती म्हणते, “मी दररोज काही झाले तरी निदान एक अध्याय वाचते.” दररोज बायबल वाचल्यामुळे तिला कसा फायदा झाला आहे? ती उत्तर देते: “आजच्या जगात वाईट प्रभाव पाडणाऱ्‍या गोष्टींची वाण नाही. दररोज मला शाळेत आणि इतरत्र विश्‍वासाची परीक्षा पाहणाऱ्‍या दबावांना तोंड द्यावे लागते. पण दररोज बायबल वाचल्यामुळे मला या दबावांचा प्रतिकार करण्याकरता प्रोत्साहन देणाऱ्‍या बायबलमधील आज्ञा आणि तत्त्व लगेच आठवण्यास मदत मिळते. यामुळे मला यहोवाच्या आणि येशूच्या जवळ आल्यासारखे वाटते.”

८. सभास्थानाच्या संबंधाने येशूची काय सवय होती आणि लहान मुले त्याचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतात?

येशूला सभास्थानात शास्त्रवचनांचे वाचन चालले असताना ते ऐकण्याची आणि वाचनात स्वतः सहभाग घेण्याची सवय होती. (लूक ४:१६; प्रेषितांची कृत्ये १५:२१) लहान मुलांनी देखील त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे किती चांगले आहे कारण या सभांमध्येही बायबलचे वाचन व त्याचा अभ्यास केला जातो. या सभांविषयी कृतज्ञता व्यक्‍त करताना १४ वर्षांच्या रिचर्डने म्हटले: “मला सभा फार महत्त्वाच्या वाटतात. तेथे मला नेहमी चांगले काय व वाईट काय, नैतिक काय आणि अनैतिक काय तसेच ख्रिस्तासारखे काय आहे, काय नाही याची आठवण करून दिली जाते. मला हे सर्व कटू अनुभवांद्वारे शिकण्याची गरज नाही.” होय, “परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो.” (स्तोत्र १९:७) निकोल देखील दर आठवडी मंडळीच्या पाचही सभांना आवर्जून उपस्थित राहते. तसेच या सभांची तयारी करण्याकरता ती दोन ते तीन तास खर्च करते.—इफिसकर ५:१५, १६.

९. लहान मुले कशाप्रकारे ‘ज्ञानात वाढू शकतात?’

‘एकच खऱ्‍या देवाला आणि ज्याला त्याने पाठवले त्या येशू ख्रिस्ताला ओळखण्याची’ उत्तम संधी तारुण्यात असते. (योहान १७:३) तुम्ही कदाचित अशा मुलांना ओळखत असाल जे कॉमिक्स वाचण्यात, टीव्ही पाहण्यात, व्हिडिओ गेम्स खेळण्यात किंवा इंटरनेट सर्फिंग करण्यात बराच वेळ खर्च करतात. पण आपल्या नेत्याचे परिपूर्ण उदाहरण असताना तुम्ही या मुलांचे अनुकरण का करावे? येशूला बालपणातच यहोवाविषयी ज्ञान घेण्यात आनंद वाटला. आणि यामुळे काय परिणाम झाला? आध्यात्मिक गोष्टींविषयी आवड असल्यामुळे, ‘येशू ज्ञानाने वाढत गेला.’ (लूक २:५२) तुम्हीसुद्धा ज्ञानात वाढू शकता.

“एकमेकांच्या अधीन असा”

१०. कौटुंबिक जीवनात शांती व आनंद असण्याकरता काय सहाय्यक ठरेल?

१० घर हे एकतर शांती आणि समाधानाचे उबदार घरटे किंवा मतभेद व संघर्षाचे रणांगण असू शकते. (नीतिसूत्रे २१:१९; २६:२१) आपण ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारल्यास कुटुंबातली शांती व आनंद द्विगुणित होऊ शकतो. येशूचे उदाहरण हे खरे तर कौटुंबिक संबंधांकरता आदर्श घालून देते. शास्त्रवचनांत आपण वाचतो: “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे . . . पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२१-२५) कलस्सै येथील मंडळीला प्रेषित पौलाने असे लिहिले: “मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे.”—कलस्सैकर ३:१८-२०.

११. एक पती हे कसे दाखवू शकतो की ख्रिस्ताचे नेतृत्व त्याच्याकरता वास्तविक आहे?

११ या सल्ल्याचे पालन करण्याचा अर्थ असा होतो की पतीने कुटुंबात पुढाकार घ्यावा, पत्नीने त्याला एकनिष्ठपणे पाठिंबा द्यावा आणि मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञांचे पालन करावे. पण पुरुषाने त्याच्या मस्तकपदाचा योग्यरित्या वापर केला तरच आनंददायक परिणाम घडून येऊ शकतात. सुज्ञ पतीने त्याचे मस्तक व नेता येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याद्वारे आपल्या मस्तकपदाचा वापर करण्यास शिकून घेतले पाहिजे. (१ करिंथकर ११:३) येशू नंतर ‘मंडळीत सर्वांवर मस्तक झाला असला’ तरीसुद्धा मुळात तो पृथ्वीवर, “सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास” आला होता. (इफिसकर १:२२; मत्तय २०:२८) त्याचप्रकारे, ख्रिस्ती पती आपल्या मस्तकपदाचा उपयोग स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता नव्हे तर आपल्या पत्नीच्या व मुलांच्या, होय सबंध कुटुंबाच्या कल्याणाकरता करतो. (१ करिंथकर १३:४, ५) तो आपले मस्तक येशू ख्रिस्त याच्या ईश्‍वरी गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. येशूप्रमाणे तो सौम्य आणि लीन होतो. (मत्तय ११:२८-३०) त्याच्याकडून चूक झाल्यास, “क्षमा कर” किंवा “तुझे बरोबर आहे” असे म्हणणे त्याला जड जात नाही. अशा उत्तम आदर्शामुळे त्याच्या पत्नीला त्याची “अनुरूप सहाय्यक” व त्याची “सहकारिणी” होणे अधिक सोपे जाते; त्याच्या उदाहरणावरून तिला बरेच काही शिकायला मिळते आणि ती खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत कार्य करू शकते.—उत्पत्ति २:२०; मलाखी २:१४.

१२. मस्तकपदाच्या तत्त्वाला जडून राहण्यास पत्नींना कशामुळे मदत होईल?

१२ पत्नीची जबाबदारी तिच्या पतीच्या अधीन राहण्याची आहे. पण जगिक मनोवृत्तीचा तिच्यावर प्रभाव असल्यास, मस्तकपदाच्या तत्त्वाविषयी तिला हवा तेवढा आदर वाटणार नाही आणि पुरुषाच्या अधीन राहण्याची कल्पना तिला नकोशी वाटेल. पुरुषांनी आपल्या पत्नींवर अधिकार गाजवावा असे बायबलमध्ये कोठेही सांगितले नसले तरीसुद्धा, ते पत्नींना आपापल्या पतींच्या अधीन राहण्याची आज्ञा देते. (इफिसकर ५:२४) शिवाय, बायबल पतींना किंवा पित्यांना कुटुंबाकरता जबाबदार ठरवते; आणि बायबलच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे कुटुंबातील शांती व सुव्यवस्थेत भर पडते.—फिलिप्पैकर २:५.

१३. येशूने मुलांकरता अधीनतेच्या बाबतीत कोणते उदाहरण मांडले आहे?

१३ मुलांना आपल्या आईवडिलांना आज्ञाधारक राहण्यास सांगण्यात आले आहे. या बाबतीत येशूचे उदाहरण अनुकरणीय आहे. १२ वर्षांचा येशू तीन दिवसांनंतर मंदिरात सापडल्याच्या घटनेनंतर “तो [आपल्या आईवडिलांबरोबर] खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला.” (लूक २:५१) मुले त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहतात तेव्हा कुटुंबात शांती आणि सलोखा कायम राहतो. आणि जेव्हा कुटुंबातला प्रत्येक जण ख्रिस्ताच्या नेतृत्वाला अधीन होतो तेव्हा याची परिणती एका आनंदी कुटुंबात होते.

१४, १५. घरात एखाद्या कठीण समस्येला यशस्वीपणे तोंड देण्यात आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१४ घरात कठीण प्रसंग येतात तेव्हासुद्धा त्यांना यशस्वीपणे तोंड देण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे येशूचे अनुकरण करणे आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करणे. उदाहरणार्थ, ३५ वर्षांच्या जेरीने एका किशोरवयीन मुलीची आई लाना हिच्याशी लग्न केले तेव्हा त्यांच्यासमोर अशी एक समस्या आली ज्याविषयी त्या दोघांनीही कल्पना केली नव्हती. जेरी खुलासा करतो: “चांगला कुटुंबप्रमुख होण्याकरता, इतर कुटुंबांत परिणामकारक ठरलेल्या बायबलमधील तत्त्वांचे मलाही पालन करावे लागेल हे मला माहीत होते. पण लवकरच मी ओळखले की मला या तत्त्वांचे अधिक विचारपूर्वक आणि सुज्ञतेने पालन करावे लागणार होते.” त्याची सावत्र मुलगी त्याला, आपल्या आईच्या व आपल्यामध्ये आलेली एक परकी व्यक्‍ती समजत होती आणि त्यामुळे ती त्याचा भयंकर द्वेष करत होती. आपल्या मुलीच्या वागण्यात व बोलण्यात याच मनोवृत्तीचे पडसाद उमटत आहेत हे जेरीला समजून घ्यावे लागले. मग त्याने या समस्येला कशाप्रकारे तोंड दिले? जेरी उत्तर देतो: “लाना व मी ठरवले की आईवडिलांच्या जबाबदारींपैकी शिस्त लावण्याची जबाबदारी निदान सध्या तरी लानाने सांभाळावी आणि त्यादरम्यान मी माझ्या सावत्र मुलीसोबत चांगला नातेसंबंध जोडण्यावर लक्ष केंद्रित करेन. कालांतराने, आमच्या या प्रयत्नांमुळे उत्तम परिणाम दिसून आले.”

१५ घरात कठीण समस्या येतात, तेव्हा कुटुंबातले विशिष्ट सदस्य अमुकप्रकारे का वागतात किंवा बोलतात हे आपण समजून घेतले पाहिजे. तसेच ईश्‍वरी तत्त्वांचे पालन करण्याकरता आपल्याजवळ सुज्ञता असली पाहिजे. उदाहरणार्थ, रक्‍तस्रावाच्या समस्येने पीडित असलेल्या स्त्रीने आपल्याला का स्पर्श केला हे येशूने समजून घेतले म्हणून त्याने सुज्ञतेने आणि सहानुभूतीने तिची समस्या हाताळली. (लेवीय १५:२५-२७; मार्क ५:३०-३४) सुज्ञता आणि समजूतदारपणा हे आपल्या नेत्याचे गुणविशेष आहेत. (नीतिसूत्रे ८:१२) एखाद्या परिस्थितीत तो ज्याप्रमाणे वागला असता त्याप्रमाणे आपण वागलो तर आपण आनंदी होऊ शकतो.

‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटा’

१६. आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व कशाला असले पाहिजे आणि येशूने स्वतःच्या उदाहरणावरून हे कसे दाखवले?

१६ येशूच्या नेतृत्वाचा स्वीकार करणाऱ्‍यांच्या जीवनात कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देण्यात यावे हे येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले. त्याने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) आणि हे कसे करायचे ते त्याने स्वतःच्या उदाहरणातून आपल्याला शिकवले. बाप्तिस्म्यानंतर ४० दिवस उपवास, मनन आणि प्रार्थना केल्यावर येशूवर परीक्षा आली. दियाबल सैतानाने त्याला ‘जगातील सर्व राज्यांची’ सत्ता देऊ केली. त्याने दियाबलाचा हा प्रस्ताव मान्य केला असता तर त्याचे जीवन कसे असते याची जरा कल्पना करा! पण ख्रिस्ताने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याला सर्वाधिक महत्त्व दिले. शिवाय सैतानाच्या जगातील जीवन कितीही चांगले असले तरी ते अल्पावधीचे आहे याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याने लगेच दियाबलाचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि म्हटले: “असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” यानंतर लवकरच येशूने प्रचार करण्यास व असे घोषित करण्यास सुरवात केली की “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ४:२, ८-१०, १७) पृथ्वीवरील उर्वरित जीवनात ख्रिस्ताने देवाच्या राज्याचा पूर्ण वेळेचा उद्‌घोषक या नात्याने कार्य केले.

१७. राज्यासंबंधीच्या गोष्टींना आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

१७ आपण आपल्या नेत्याचे अनुकरण केले पाहिजे आणि लठ्ठ पगाराची नोकरी किंवा करियर यांसारख्या सैतानाच्या जगातील मोहांना जीवनातील ध्येय बनू देऊ नये. (मार्क १:१७-२१) राज्यासंबंधीच्या गोष्टी आपल्या जीवनात दुय्यम बनण्याइतपत जगिक गोष्टींच्या जंजाळात गुंतणे किती मूर्खपणाचे ठरेल! येशूने आपल्याला राज्याचा प्रचार करण्याचे आणि शिष्य बनवण्याचे कार्य सोपवले आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) अर्थात कुटुंबाची जबाबदारी व इतर जबाबदाऱ्‍याही आपल्यावर असतील, पण तरीसुद्धा संध्याकाळचा वेळ तसेच शनिवार-रविवारचा वेळ प्रचाराची व शिकवण्याची ख्रिस्ती जबाबदारी पूर्ण करण्याकरता वापरण्यास आपल्याला आनंद वाटत नाही का? २००१ सेवा वर्षादरम्यान जवळजवळ ७,८०,००० जणांनी पूर्ण वेळेचे सेवक किंवा पायनियर या नात्याने सेवा केली ही गोष्ट किती उत्तेजन देणारी आहे!

१८. सेवाकार्यात आनंदाने सहभाग घेण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळते?

१८ शुभवर्तमानांच्या अहवालांतून एक अतिशय सक्रिय व्यक्‍ती तसेच अतिशय कोमल भावना असलेली व्यक्‍ती असे येशूचे चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. आपल्याभोवती असलेल्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा पाहिल्यावर त्याला त्यांची दया आली आणि त्यांना मदत करण्याकरता तो उत्सुकतेने पुढे आला. (मार्क ६:३१-३४) आपणही लोकांवर असलेल्या प्रेमापोटी आणि त्यांना मदत करण्याच्या प्रामाणिक इच्छेने सेवाकार्यात भाग घेतो तेव्हा ते सेवाकार्य आपल्याकरता आनंददायक ठरते. पण ही प्रामाणिक इच्छा आपण कशी निर्माण करू शकतो? जेसन नावाचा एक तरुण सांगतो, “किशोरवयात असताना मला प्रचारकार्याला जायला आवडत नव्हते.” मग या कार्याकरता तो कशाप्रकारे आवड उत्पन्‍न करू शकला? जेसन उत्तर देतो: “आमच्या घरात, शनिवारची सकाळ नेहमी क्षेत्र सेवेकरता असायची. ही सवय मला उपयोगी पडली कारण मी सेवाकार्यात जितका सहभाग घेतला तितकेच त्यामुळे होणारे चांगले परिणाम पाहायला मिळाले आणि ते अधिकाधिक आनंददायक वाटू लागले.” आपणसुद्धा सेवाकार्यात नियमित आणि परिश्रमी सहभाग घेतला पाहिजे.

१९. ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या संदर्भात आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

१९ ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन झाल्यामुळे विसावा व आनंद मिळतो. आपण त्याच्या नेतृत्वाचा स्वीकार करतो तेव्हा तारुण्य, ज्ञान व सुज्ञतेत प्रगती करण्याचा काळ ठरतो. कौटुंबिक जीवन शांतीदायक व आनंददायक बनते आणि सेवाकार्य देखील आनंद व समाधान देणारे ठरते. तेव्हा आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनातून आणि आपल्या निर्णयांतून ख्रिस्ताचे नेतृत्व आपल्याकरता वास्तविक आहे हे दाखवण्याचा निर्धार करूया. (कलस्सैकर ३:२३, २४) पण येशू ख्रिस्ताने आणखी एका माध्यमाने आपले नेतृत्व करण्याची तरतूद केली आहे—ख्रिस्ती मंडळी. या तरतुदीचा आपण कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीप]

^ परि. 7 काही नावे बदलण्यात आली आहेत.

तुम्हाला आठवते का?

• देवाने नियुक्‍त केलेल्या नेत्याचे अनुसरण केल्यामुळे कोणता फायदा होतो?

• तरुण कसे दाखवू शकतात की ते येशूच्या नेतृत्वाचा स्वीकार करू इच्छितात?

• ख्रिस्ताच्या नेतृत्वाला अधीन होणाऱ्‍यांच्या कौटुंबिक जीवनावर याचा कसा परिणाम होतो?

• ख्रिस्ताचे नेतृत्व आपल्याकरता वास्तविक आहे हे आपल्या सेवाकार्यावरून कशाप्रकारे प्रदर्शित होऊ शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

देवाला आणि आपल्या नियुक्‍त नेत्याला ओळखण्याची उत्तम संधी तारुण्यात असते

[१० पानांवरील चित्र]

ख्रिस्ताच्या नेतृत्वाला अधीन झाल्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद येतो

[१२ पानांवरील चित्रे]

येशूने राज्याला सर्वाधिक महत्त्व दिले. तुम्ही देता का?