व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो

ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो

ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो

“पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”मत्तय २८:२०.

१, २. (अ) शिष्य बनवण्याची आज्ञा देताना पुनरुत्थित येशूने आपल्या अनुयायांना कोणते आश्‍वासन दिले? (ब) येशूने आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीचे कशाप्रकारे क्रियाशीलपणे नेतृत्व केले?

स्वर्गात आरोहण करण्याआधी आपला पुनरुत्थित नेता येशू ख्रिस्त शिष्यांना प्रकट झाला आणि त्याने म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २३:१०, NW; २८:१८-२०.

येशूने आपल्या शिष्यांना केवळ आणखी शिष्य बनवण्याचे जीवनरक्षक कार्यच सोपवले नाही तर त्यांच्या पाठीशी राहण्याचे वचन देखील त्यांना दिले. बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात दिलेला आरंभीच्या ख्रिस्ती धर्माचा इतिहास दाखवून देतो की ख्रिस्ताला देण्यात आलेल्या अधिकाराचा त्याने नव्यानेच स्थापन झालेल्या मंडळीचे नेतृत्व करण्याकरता उपयोग केला. त्याने “सहायक,” अर्थात, पवित्र आत्मा पाठवण्याचे वचन दिले जो त्याच्या अनुयायांना सामर्थ्य आणि मार्गदर्शन देणार होता. (योहान १६:७, NW; प्रेषितांची कृत्ये २:४, ३३; १३:२-४; १६:६-१०) पुनरुत्थित येशूने आपल्या शिष्यांना साहाय्य करण्याकरता आपल्या अधीन असलेल्या देवदूतांचा उपयोग केला. (प्रेषितांची कृत्ये ५:१९; ८:२६; १०:३-८, २२; १२:७-११; २७:२३, २४; १ पेत्र ३:२२) शिवाय सुयोग्य बांधवांच्या एका नियमन मंडळाची व्यवस्था करण्याद्वारेही आपल्या नेत्याने मंडळीला आवश्‍यक मार्गदर्शन पुरवले.—प्रेषितांची १:२०, २४-२६; ६:१-६; ८:५, १४-१७.

३. या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

आपल्या काळाबद्दल, अर्थात ‘युगाच्या समाप्तीच्या काळाविषयी’ काय? आज येशू ख्रिस्त, ख्रिस्ती मंडळीचे कशाप्रकारे नेतृत्व करत आहे? आणि आपण त्याच्या नेतृत्वाच्या अधीन आहोत हे कसे दाखवू शकतो?

धन्याचा विश्‍वासू दास

४. (अ) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासात’ कोणाचा समावेश आहे? (ब) धन्याने या दासाला कशाकरता नेमले आहे?

आपल्या उपस्थितीच्या चिन्हाची भविष्यवाणी देताना येशूने म्हटले: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४५-४७) “धनी” म्हणजेच आपला नेता येशू ख्रिस्त आहे आणि त्याने या पृथ्वीवरील त्याच्या सर्व कारभारांवर “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” अर्थात पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या वर्गाला नेमले आहे.

५, ६. (अ) प्रेषित योहानाला मिळालेल्या एका दृष्टान्तात “सोन्याच्या सात समया” आणि “सात तारे” कशाला सूचित करतात? (ब) “सात तारे” येशूच्या उजव्या हातात आहेत यावरून काय समजते?

प्रकटीकरणाचे पुस्तक दाखवते की विश्‍वासू व बुद्धिमान दास येशू ख्रिस्ताच्या थेट नियंत्रणाखाली आहे. ‘प्रभूच्या दिवसाविषयीच्या’ दृष्टान्तात, “सोन्याच्या सात समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, . . . कोणीएक [प्रेषित योहानाच्या] दृष्टीस पडला. . . . त्याच्या उजव्या हातात सात तारे होते.” योहानाला हा दृष्टान्त समजावून सांगताना येशूने म्हटले: “जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ह्‍या सात मंडळ्या आहेत.”—प्रकटीकरण १:१, १०-२०.

“सोन्याच्या सात समया” १९१४ साली सुरू झालेल्या ‘प्रभूच्या दिवसात’ अस्तित्वात असलेल्या सर्व खऱ्‍या ख्रिस्ती मंडळ्यांना सूचित करतात. पण “सात तारे” काय सूचित करतात? सुरवातीला ते पहिल्या शतकातील मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍या, सर्व आत्म्याने जन्म घेतलेल्या अभिषिक्‍त पर्यवेक्षकांना सूचित करत होते. * हे पर्यवेक्षक येशूच्या उजव्या हातात, अर्थात त्याच्या नियंत्रणात व मार्गदर्शनाखाली होते. होय, येशू त्या संयुक्‍त दास वर्गाचे नेतृत्व करत होता. पण आता मात्र अभिषिक्‍त पर्यवेक्षकांची संख्या कमी आहे. मग ख्रिस्त आज सबंध पृथ्वीवरील यहोवाच्या साक्षीदारांच्या ९३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांचे कशाप्रकारे नेतृत्व करत आहे?

७. (अ) येशू सबंध पृथ्वीवरील मंडळ्यांचे नेतृत्व करण्याकरता नियमन मंडळाचा कशाप्रकारे उपयोग करत आहे? (ब) ख्रिस्ती पर्यवेक्षक पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केले जातात असे का म्हणता येईल?

पहिल्या शतकाप्रमाणेच आजही अभिषिक्‍त पर्यवेक्षकांपैकी सुयोग्य बांधवांचा एक लहानसा गट नियमन मंडळ या नात्याने विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या संयुक्‍त गटाचे प्रतिनीधीत्व करतो. आपला नेता, स्थानिक मंडळीत वडील या नात्याने सेवा करण्याकरता सुयोग्य पुरुषांना नेमण्याकरता या नियमन मंडळाचा उपयोग करतो, मग ते आत्म्याने अभिषिक्‍त असोत वा नसोत. या संदर्भात, यहोवाने येशूला ज्याचा वापर करण्याचा अधिकार दिला आहे, तो पवित्र आत्मा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. (प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३) सर्वप्रथम या पर्यवेक्षकांनी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असलेल्या देवाच्या वचनात दिलेल्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९; २ पेत्र १:२०, २१) या पर्ववेक्षकांची शिफारस आणि नेमणूक प्रार्थना केल्यानंतर आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. शिवाय, नेमलेल्या व्यक्‍ती पवित्र आत्म्याचे फळ उत्पन्‍न करत असल्याचा पुरावा देतात. (गलतीकर ५:२२, २३) त्याअर्थी पौलाचा पुढील सल्ला सर्व वडिलांना तितक्याच जोरदारपणे लागू होतो, मग ते अभिषिक्‍त असोत वा नसोत: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८) या नियुक्‍त पुरुषांना नियमन मंडळाकडून मार्गदर्शन मिळते आणि ते स्वखुषीने मंडळीचे पालन करतात. अशा रितीने, ख्रिस्त आज आपल्याबरोबर आहे आणि मंडळीचे सक्रियपणे नेतृत्व करत आहे.

८. ख्रिस्त आपल्या अनुयायांचे मार्गदर्शन करण्याकरता देवदूतांचा कशाप्रकारे उपयोग करत आहे?

येशू आज आपल्या अनुयायांचे नेतृत्व करण्याकरता देवदूतांचाही उपयोग करत आहे. गहू व निदणाच्या दाखल्यानुसार कापणीची वेळ “युगाची समाप्ती” आहे. ही कापणी करण्याकरता धनी कोणाचा उपयोग करेल? ख्रिस्ताने म्हटले: “कापणारे हे देवदूत आहेत.” त्याने पुढे म्हटले: ‘मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व अडखळविणाऱ्‍यांना व अनाचार करणाऱ्‍यांना त्याच्या राज्यातून जमा करतील.’ (मत्तय १३:३७-४१) शिवाय, ज्याप्रकारे एका देवदूताने फिलिप्पला मार्ग दाखवून त्याला कूशी षंडापर्यंत पोचवले त्याप्रमाणे आजही ख्रिस्त प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधून काढण्याच्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या कार्यात त्यांचे मार्गदर्शन करण्याकरता, आपल्या देवदूतांचा उपयोग करत आहे हे सिद्ध करण्यासाठी भरपूर पुरावा उपलब्ध आहे.—प्रेषितांची कृत्ये ८:२६, २७; प्रकटीकरण १४:६.

९. (अ) ख्रिस्त आज ख्रिस्ती मंडळीचे कोणत्या मार्गांनी नेतृत्व करत आहे? (ब) आपल्याला ख्रिस्ताच्या नेतृत्वापासून फायदा उचलायचा असल्यास आपण कोणत्या प्रश्‍नावर विचार केला पाहिजे?

आज येशू ख्रिस्त नियमन मंडळाच्या, पवित्र आत्म्याच्या व देवदूतांच्या माध्यमाने आपल्या शिष्यांचे नेतृत्व करत आहे हे जाणणे किती दिलासादायक आहे! यहोवाच्या उपासकांपैकी काही जणांचा छळ किंवा इतर कारणांमुळे काही काळ नियमन मंडळाशी संपर्क तुटला तरीही ख्रिस्त त्यांना पवित्र आत्मा व देवदूतांच्या साहाय्याने मार्गदर्शन पुरवेल. पण आपण त्याच्या नेतृत्वाचा स्वीकार केला तरच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. पण आपण ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारतो हे कसे दाखवू शकतो?

“आज्ञेत राहा . . . अधीन असा”

१०. मंडळीतल्या नियुक्‍त वडिलांकरता आपण आदर कसा दाखवू शकतो?

१० आपल्या नेत्याने मंडळीत “मनुष्यरूपी देणग्या” दिल्या आहेत—“कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक” नेमले आहेत. (इफिसकर ४:८, NW; ११, १२) त्यांच्याप्रती आपली मनोवृत्ती व वागणूक, आपण ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारतो की नाही याविषयी बरेच काही प्रगट करते. ख्रिस्ताने नेमलेल्या या आध्यात्मिक पात्रता असलेल्या बांधवांबद्दल आपण ‘कृतज्ञ असणे’ योग्यच आहे. (कलस्सैकर ३:१५) तसेच ते आपल्या आदरास पात्र आहेत. प्रेषित पौलाने लिहिले: “जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” (१ तीमथ्य ५:१७) मग आपण मंडळीतल्या वडीलांप्रती किंवा पर्यवेक्षकांप्रती आपली कृतज्ञता आणि गाढ आदर कशाप्रकारे दाखवू शकतो? पौल उत्तर देतो: “आपल्या पुढाऱ्‍यांच्या आज्ञा पाळा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री लोकांस १३:१७, पं.र.भा.) होय, आपल्याला त्यांच्या आज्ञा पाळण्यास आणि त्यांच्या अधीन असण्यास अर्थात त्यांच्या इच्छेला मान देण्यास सांगण्यात आले आहे.

११. वडिलांना आदर देणे हे आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी दिलेले वचन पूर्ण करण्याशी कशाप्रकारे संबंधित आहे?

११ आपला नेता परिपूर्ण आहे. पण त्याने ज्यांना देणगी म्हणून दिले आहे ते परिपूर्ण नाहीत. त्यामुळे कधीकधी त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. पण तरीसुद्धा आपण ख्रिस्ती व्यवस्थेला निष्ठावान राहणे महत्त्वाचे आहे. किंबहुना, समर्पण व बाप्तिस्म्याच्या वेळी आपण यहोवाला दिलेले वचन पूर्ण करण्यात, मंडळीतल्या आत्म्याद्वारे नियुक्‍त अधिकाराला मान देऊन त्याला स्वेच्छेने अधीन होणे देखील अंतर्भूत आहे. ज्याअर्थी आपण “पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेतो त्याअर्थी आपण जाहीरपणे हे घोषित करतो की आपण पवित्र आत्मा काय आहे हे ओळखतो आणि यहोवाच्या उद्देशांतील त्याच्या भूमिकेचीही आपल्याला जाणीव आहे. (मत्तय २८:१९) तसेच, याचा असाही अर्थ होतो की आपण आत्म्याला सहयोग देतो आणि ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये त्याच्या कार्यात व्यत्यय आणेल असे काहीही करू इच्छित नाही. वडिलांची शिफारस आणि नियुक्‍ती करण्यात पवित्र आत्म्याची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे; मग मंडळीतल्या वडिलांना आपण सहकार्य न दिल्यास आपण विश्‍वासूपणे आपल्या समर्पणानुसार जगत आहोत असे खरेच म्हणता येईल का?

१२. अधिकाराचा अनादर करण्यासंबंधी यहूदाने कोणती उदाहरणे दिली आणि त्यांतून आपण काय शिकतो?

१२ बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत जी आज्ञाधारक व अधीन राहण्याचे महत्त्व पटवून देतात. मंडळीतल्या नियुक्‍त पुरुषांविषयी अपमानास्पद भाषण करणाऱ्‍यांविषयी शिष्य यहुदा याने तीन इशारेवजा उदाहरणे दिली व म्हटले: “त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गांत बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.” (यहूदा ११) काईनाने यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केले आणि जाणूनबुजून आपल्या भावाचा द्वेष करून शेवटी त्याचा खून केला. (उत्पत्ति ४:४-८) देवाने वारंवार बजावले तरीसुद्धा बलामने द्रव्यलोभामुळे देवाच्या लोकांना शाप देण्याचा प्रयत्न केला. (गणना २२:५-२८, ३२-३४; अनुवाद २३:५) कोरहला इस्राएलमध्ये उत्तम जबाबादारी सोपवण्यात आली होती पण त्याने त्यात समाधान मानले नाही. त्याने पृथ्वीवरील सर्वात नम्र असलेला देवाचा सेवक मोशे याच्याविरुद्ध लोकांना चिथावले. (गणना १२:३; १६:१-३, ३२, ३३) काईन, बलाम व कोरह या तिघांवरही संकट कोसळले. ही उदाहरणे किती स्पष्टपणे दाखवतात की यहोवाने ज्यांना जबाबदारीची पदे सोपवली आहेत त्यांचे मार्गदर्शन आपण स्वीकारले पाहिजे आणि त्यांना आदर दिला पाहिजे!

१३. संदेष्टा यशया याने वडिलांच्या व्यवस्थेला अधीन होणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळण्याविषयी भाकीत केले?

१३ आपल्या नेत्याने ख्रिस्ती मंडळीत स्थापित केलेल्या पर्यवेक्षकांच्या उत्तम व्यवस्थेपासून कोण फायदा घेऊ इच्छिणार नाही? या व्यवस्थेपासून होणाऱ्‍या फायद्यांविषयी भविष्यवक्‍ता यशयाने असे भाकीत केले: “पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील. वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य [“त्यांपैकी प्रत्येक जण,” NW] होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” (यशया ३२:१, २) वडिलांपैकी प्रत्येकजण संरक्षण देणारा “आसरा” किंवा “निवारा” होईल असे सांगण्यात आले आहे. अधिकाराला अधीन होणे आपल्याला जड जात असले तरीसुद्धा आपण प्रार्थनापूर्वक मंडळीत देवाने नियुक्‍त केलेल्या अधिकाराला आज्ञाधारक राहण्याचा व अधीन होण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

वडील ख्रिस्ताच्या नेतृत्वाला कशाप्रकारे अधीन होतात

१४, १५. मंडळीत नेतृत्व करणारे आपण ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन आहोत हे कसे दाखवतात?

१४ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने, विशेषकरून वडिलांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाचे अनुसरण केले पाहिजे. पर्यवेक्षकांना किंवा वडिलांना मंडळीत काही प्रमाणात अधिकार सोपवण्यात आला आहे. पण ते मंडळीतल्या लोकांच्या जीवनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करून ‘त्यांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवत’ नाहीत. (२ करिंथकर १:२४) वडील येशूच्या पुढील शब्दांचे पालन करतात: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही.” (मत्तय २०:२५-२७) वडील आपली जबाबदारी पूर्ण करत असताना इतरांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.

१५ ख्रिस्ती लोकांना असे प्रोत्साहन देण्यात आले आहे: ‘तुमच्या अधिकाऱ्‍यांची [“तुमच्यामध्ये नेतृत्व करणाऱ्‍यांची,” NW] आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.’ (इब्री लोकांस १३:७) पण ते नेतृत्व करतात म्हणून असे सांगण्यात आलेले नाही. येशूने म्हटले: “तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय.” (मत्तय २३:१०, NW) वडिलांच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्यास सांगण्यात आले आहे कारण ते आपला खरा नेता येशू ख्रिस्त याचे अनुकरण करतात. (१ करिंथकर ११:१) वडील मंडळीत इतरांशी व्यवहार करताना ख्रिस्तासारखे होण्याचा कसा प्रयत्न करतात याची काही उदाहरणे विचारात घ्या.

१६. येशूजवळ अधिकार असूनही तो आपल्या अनुयायांशी कशाप्रकारे वागला?

१६ येशू अपरिपूर्ण मानवांपेक्षा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ होता आणि त्याला त्याच्या पित्याकडून आणखी कोणाजवळ नसलेला अधिकार देण्यात आला होता तरीसुद्धा आपल्या शिष्यांशी येशू विनयशीलपणे वागला. आपल्या ज्ञानाचा दिखावा करून त्याने आपल्या श्रोत्यांवर दडपण आणले नाही. येशूने आपल्या अनुयायांच्या मानवसुलभ गरजा लक्षात घेतल्या आणि अशाप्रकारे त्यांच्याबद्दल संवेदनशीलता आणि सहानुभूती प्रदर्शित केली. (मत्तय १५:३२; २६:४०, ४१; मार्क ६:३१) त्याने आपल्या शिष्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कधीही त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही आणि त्यांना सहन करता येईल याच्यापेक्षा अधिक भार त्याने त्यांच्यावर कधीही लादला नाही. (योहान १६:१२) येशू “सौम्य व लीन” होता. म्हणूनच, अनेकांना त्याचा सहवास विसावा देणारा वाटायचा यात काही आश्‍चर्य नाही.—मत्तय ११:२८-३०.

१७. वडिलांनी मंडळीतल्या इतरांशी वागताना ख्रिस्ताप्रमाणे विनयशीलता कशी दाखवावी?

१७ जर ख्रिस्ताने विनयशीलता दाखवली तर मग मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍यांनी कितीतरी पटीने अधिक विनयशीलता दाखवली पाहिजे! होय, ते आपल्याला सोपवलेल्या अधिकाराचा कधीही गैरवापर करत नाहीत. तसेच, त्यांनी इतरांवर छाप पाडण्याच्या प्रयत्नात ‘वक्‍तृत्वाचे श्रेष्ठत्व’ दाखवत नाहीत. (१ करिंथकर २:१, २) उलट बायबलमधील सत्य ते अतिशय साध्या व प्रामाणिक पद्धतीने सादर करतात. शिवाय, इतरांकडून कोणत्याही अपेक्षा करताना ते समजूतदारपणा दाखवतात आणि त्यांच्या गरजांप्रती विचारशील असतात. (फिलिप्पैकर ४:५, NW) सर्वांना काही न काही मर्यादा असतात याची जाणीव ठेवून ते आपल्या बांधवांच्या लहानमोठ्या चुका पदरात घेतात. (१ पेत्र ४:८) नम्र आणि सौम्य वृत्तीच्या वडीलांचा सहवास खरोखर विसावा देणारा नाही का? निश्‍चितच आहे.

१८. येशू मुलांशी ज्याप्रकारे वागला त्यावरून वडील काय शिकू शकतात?

१८ येशूकडे येऊन त्याच्याशी बोलायला अगदी कमी दर्जाच्या लोकांना देखील भीती वाटत नसे. ‘बालकांना त्याच्याकडे आणल्याबद्दल’ त्याच्या शिष्यांनी लोकांना दटावले तेव्हा त्याने काय केले? त्याने म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” मग “त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१३-१६) येशू प्रेमळ आणि सहृदय होता, लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. त्यांना त्याची भीती वाटत नसे. अगदी लहान मुलांनासुद्धा त्याच्या सहवासात कसलीच भीती वाटत नसे. वडील याबाबतीत येशूचे अनुकरण करतात; ते इतरांशी प्रेमळपणे व सहृदय वृत्तीने वागतात आणि त्यामुळे लहान मुलांनासुद्धा त्यांची भीती वाटत नाही.

१९. “ख्रिस्ताचे मन” असण्याचा काय अर्थ होतो आणि यासाठी काय करण्याची आवश्‍यकता आहे?

१९ वडील ख्रिस्त येशूचे कितपत अनुकरण करू शकतात, हे त्याला ते किती चांगल्याप्रकारे ओळखतात यावर अवलंबून आहे. पौलाने विचारले: “यहोवाचे मन कोणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे?” पुढे त्याने म्हटले: “पण आपल्याजवळ खिस्ताचे मन आहे.” (१ करिंथकर २:१६, NW) ख्रिस्ताचे मन असण्याचा अर्थ त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीशी आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या प्रत्येक पैलूशी परिचित असणे जेणेकरून विशिष्ट परिस्थितीत त्याने काय केले असते हे आपल्याला माहीत असेल. आपल्या नेत्याला इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला ओळखता आले तर! पण यासाठी शुभवर्तमान वृत्तान्तांचा बारकाईने अभ्यास करणे आणि येशूच्या जीवनाविषयी आणि त्याच्या आदर्शाविषयीची माहिती नियमितरित्या आत्मसात करणे आवश्‍यक आहे. वडील जेव्हा इतक्या जवळून ख्रिस्ताच्या नेतृत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मंडळीतले लोक त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्यास अधिक प्रवृत्त होतात. शिवाय वडील जेव्हा इतरांना आपल्या नेत्याच्या आदर्शाचे आनंदाने अनुकरण करताना पाहतात तेव्हा त्यांना देखील समाधान वाटते.

ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन चालत राहा

२०, २१. प्रतिज्ञात नव्या जगाची वाट पाहात असताना, आपण काय निर्धार करावा?

२० आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाला अधीनता दाखवणे अतिशय महत्त्वाचे आहे. या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत असता आपली स्थिती सा.यु.पू. १४७३ साली मवाबच्या पठारावरील इस्राएल लोकांसारखीच आहे. ते प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते आणि संदेष्टा मोशे याच्याद्वारे देवाने असे घोषित केले: “जो देश ह्‍यांना देण्याची शपथ परमेश्‍वराने ह्‍यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला [यहोशवाला] ह्‍या लोकांबरोबर जावयाचे आहे.” (अनुवाद ३१:७, ८) यहोशवाला त्यांचे नेतृत्व करण्याकरता नियुक्‍त करण्यात आले होते. त्या प्रतिज्ञात देशात जाण्याकरता इस्राएल लोकांना त्याच्या नेतृत्वाच्या अधीन होणे आवश्‍यक होते.

२१ बायबल आपल्याला सांगते: “तुमचा नेता एक आहे. तो ख्रिस्त होय.” केवळ ख्रिस्त आपल्याला प्रतिज्ञात नव्या जगात नेईल जेथे “नीतिमत्त्व वास करिते.” (२ पेत्र ३:१३) तेव्हा, आपण जीवनाच्या सर्व पैलूंत त्याच्या नेतृत्वाला अधीन होण्याचा निर्धार करू या.

[तळटीप]

^ परि. 6 “तारे” याठिकाणी खऱ्‍या देवदूतांना सूचित करत नाहीत. येशूने या अदृश्‍य आत्मिक प्राण्यांकरता असलेली माहिती एका मानवाकडून निश्‍चितच लिहून घेतली नसती. त्याअर्थी, “तारे” मानवी पर्यवेक्षकांना, म्हणजेच मंडळीतल्या वडिलांना सूचित करत असावेत, जे येशूचे दूत आहेत. त्यांची सात ही संख्या देवाने ठरवलेल्या पूर्णतेस सूचित करते.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ताने आरंभीच्या मंडळीचे कशाप्रकारे नेतृत्व केले?

• ख्रिस्त आज आपल्या मंडळीचे कशाप्रकारे नेतृत्व करत आहे?

• मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍यांना आपण का अधीन व्हावे?

• वडील कोणत्या मार्गांनी दाखवू शकतात की ख्रिस्त त्यांचे नेतृत्व करत आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

ख्रिस्त आपल्या मंडळीचे नेतृत्व करतो आणि पर्यवेक्षक त्याच्या उजव्या हातात आहेत

[१६ पानांवरील चित्रे]

“आपल्या पुढाऱ्‍यांच्या आज्ञा पाळा व त्यांच्या अधीन असा”

[१८ पानांवरील चित्र]

येशू प्रेमळ होता, लोकांना त्याची भीती वाटत नसे. ख्रिस्ती वडील त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात