व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वॉल्देन्सेस पाखंडापासून प्रोटेस्टंट धर्मापर्यंत

वॉल्देन्सेस पाखंडापासून प्रोटेस्टंट धर्मापर्यंत

वॉल्देन्सेस पाखंडापासून प्रोटेस्टंट धर्मापर्यंत

वर्ष १५४५. दक्षिण फ्रान्सच्या प्रव्हान्समधील निसर्गसुंदर लुबेरॉन येथे धार्मिक असहिष्णुतेच्या भावनेने पेटलेले सैन्य एक भयंकर कामगिरी पूर्ण करायला जमले होते. एक आठवडा रक्‍तपात चालला.

गावे जमीनदोस्त करण्यात आली. गावकऱ्‍यांना बंदिस्त करण्यात आले किंवा ठार मारण्यात आले. संबंध युरोपला हादरवून टाकणाऱ्‍या या हत्याकांडात निर्दयी सैनिकांनी लोकांवर क्रूर अत्याचार केले. सुमारे २,७०० पुरुष ठार झाले, ६०० पुरुषांना जहाजांवर काम करण्यासाठी पाठवण्यात आले आणि स्त्रिया व मुलांवर देखील अनेक अत्याचार करण्यात आले. ही रक्‍तरंजित कामगिरी पार पाडणाऱ्‍या लष्करी अधिकाऱ्‍याचे फ्रेंच राजाने आणि पोपने कौतुक केले.

फ्रान्सचा कॅथलिक राजा फ्रॅन्सिस पहिला याने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार होण्याच्या चिंतेमुळे आपल्या राज्यातील तथाकथित पाखंडांविषयी चौकशी हाती घेतली; एव्हाना धर्म सुधारणेमुळे जर्मनी विभाजित झाले होते. पाखंडाची एक-दोन प्रकरणे मिळण्याऐवजी प्रव्हान्समधील अधिकाऱ्‍यांना धार्मिक विरोधक्यांची अख्खीच्या अख्खी गावे आढळली. हा पाखंड मिटवण्याचा आदेश देण्यात आला आणि याची परिणती १५४५ सालच्या त्या हत्याकांडात झाली.

हे पाखंडी कोण होते? आणि ते अशा हिंसक धार्मिक असहिष्णुतेचे बळी का ठरले?

सुसंपन्‍नतेतून दारिद्र्‌यात

त्या हत्याकांडात ठार करण्यात आलेले लोक १२ व्या शतकात सुरू झालेल्या व युरोपच्या बहुतांश भागात पसरलेल्या एका धार्मिक चळवळीचे सदस्य होते. ज्या पद्धतीने तिचा प्रसार झाला आणि ज्याप्रमाणे ती कित्येक शतके टिकून राहिली यामुळे ही चळवळ धार्मिक मतभेदाच्या इतिहासात निराळी ठरली. बहुतांश इतिहासकारांचे याबाबतीत सहमत आहे की ही चळवळ ११७० सालाच्या सुमारास सुरू झाली. लायॉन्स या फ्रेंच शहरात, वॉदे नावाचा एक धनवान व्यापारी देवाला संतुष्ट कसे करावे हे जाणून घ्यायला फार इच्छुक होता. एका संपन्‍न माणसाने आपली संपत्ती विकून गोरगरिबांमध्ये वाटावी या येशू ख्रिस्ताच्या सल्ल्यामुळे प्रेरित होऊन कदाचित वॉदेने आपल्या कुटुंबासाठी आर्थिक व्यवस्था केली आणि आपली संपत्ती सोडून सुवार्तेचा प्रचार करायला सुरवात केली. (मत्तय १९:१६-२२) लगेच काही लोक त्याचे शिष्य बनले; त्यांना वॉल्देन्सेस या नावाने ओळखले जाऊ लागले. *

दारिद्र्‌य, प्रचार आणि बायबल हेच वॉदेचे सर्वस्व होते. पाळकांच्या सुसंपन्‍नतेचा हा विरोध काही पहिल्यांदाच होत नव्हता. बऱ्‍याच काळापासून, पाळकांचा विरोध करणाऱ्‍यांनी चर्चच्या भ्रष्ट व्यवहारांचा आणि अत्याचाराचा धिक्कार केला होता. पण वॉदे एक सामान्य मनुष्य होता आणि त्याचे बहुतांश शिष्यही सामान्य लोकच होते. त्यामुळे, प्रादेशिक भाषेत अर्थात लोकांच्या बोलीत बायबल असण्याची गरज त्याला का वाटत होती हे स्पष्ट होते. लॅटिन भाषेतील चर्चचे बायबल केवळ पाळकांसाठी असल्यामुळे वॉदेने शुभवर्तमानाच्या व बायबलमधील इतर पुस्तकांचे मध्य फ्रान्सच्या पूर्वेकडील सामान्य लोकांच्या फ्रँको-प्रोव्हेंकल भाषेत अनुवाद करण्याचे काम नेमून दिले. * लायॉन्सचे गरीब, येशूने प्रचारासंबंधी दिलेल्या आज्ञेनुसार लोकांना जाऊन आपला संदेश सांगू लागले. (मत्तय २८:१९, २०) इतिहासकार गेब्रीएल ओडिस्यो म्हणतात की, सार्वजनिक प्रचार कार्यावर त्यांनी जोर दिल्यामुळेच वॉल्देन्सेस लोकांबद्दल चर्चचा दृष्टिकोन बदलला.

कॅथलिकांपासून पाखंडांपर्यंत

त्या काळी, उपदेश देण्याचे कार्य केवळ पाळकांनी करायचे होते आणि एखाद्याला प्रचार करण्याचा अधिकार देणे चर्चच्या हातात होते. वॉल्देन्सेस लोक अडाणी आणि अशिक्षित आहेत असे पाळकांचे मत होते परंतु ११७९ साली, वॉदेने तिसरा पोप अलेक्झांडर याच्याकडून आपल्या प्रचारकार्यासाठी अधिकृत परवानगी काढली. त्याला परवानगी देण्यात आली पण अट अशी होती की त्याने स्थानिक पाळकांकडून संमती मिळवावी. इतिहासकार मॅल्कम लॅम्बर्ट म्हणतात की, “हे जवळजवळ स्पष्ट नकार देण्यासारखेच होते.” लायॉन्सचा आर्चबिशप झाँ बेल्मेन याने सामान्य लोकांना प्रचार करण्याचा अधिकार नाही हे अधिकृतपणे जाहीर केले. वॉदेने प्रत्त्युतरात प्रेषितांची कृत्ये ५:२९ हे वचन सांगितले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” वॉदेने प्रतिबंध जुमानला नाही म्हणून त्याला ११८४ साली चर्चमधून बहिष्कृत करण्यात आले.

वॉल्देन्सेस यांना बिशपच्या अधिकाराखालील लायॉन्स या प्रदेशातून घालवून देण्यात आले आणि शहरातून हाकलून लावण्यात आले तरीही सुरवातीला दिलेला आदेश काही अंशी नावापुरताच होता. पुष्कळ सामान्य लोक वॉल्देन्सेसच्या प्रामाणिकतेचे आणि राहणीचे कौतुक करायचे आणि बिशपांनी देखील त्यांच्याशी बोलणे थांबवले नाही.

इतिहासकार उअन कॅमरन यांच्या मते, वॉल्देन्सियन प्रचारक “निःष्कारण रोमन चर्चचा विरोध” करत नव्हते. त्यांना केवळ “प्रचार करण्याची आणि शिकवण्याची इच्छा होती.” इतिहासकारांच्या मते, त्यांच्याविरुद्ध एकामागोमाग एक बंधनकारक आदेश देऊन त्यांची चळवळ चक्क पाखंडीच ठरवण्यात आली. चर्चने त्यांचा धिक्कार केल्यामुळे शेवटी १२१५ साली वॉल्देन्सेसविरुद्ध चवथ्या लॅटरन चर्च मंडळाने बंदी घोषित केली. याचा त्यांच्या प्रचारकार्यावर काय परिणाम झाला?

गुप्तपणे कार्य

वॉदेचा मृत्यू १२१७ साली झाला आणि छळामुळे त्याचे शिष्य फ्रेंच आल्पाईन दऱ्‍या, जर्मनी, उत्तर ईटली आणि मध्य व पूर्व युरोप या ठिकाणी विखुरले गेले. छळामुळे वॉल्देन्सेस ग्रामीण भागांमध्ये वसती करू लागले आणि यामुळे अनेक भागांमध्ये त्यांचे प्रचारकार्य मर्यादित झाले.

१२२९ साली दक्षिण फ्रान्समधील कॅथरी किंवा आल्बीजेन्सिस लोकांविरुद्ध कॅथलिक चर्चची धर्मयुद्धे संपुष्टात आली. * नंतर त्यांनी वॉल्देन्सेसकडे त्यांचा मोर्चा वळवला. चर्चचा विरोध करणाऱ्‍या कोणाचीही गयावया न करता त्या सर्वांना न्याय मंडळापुढे आणले जाणार होते. या भीतीमुळे वॉल्देन्सेस गुप्तपणे कार्य करू लागले. १२३० सालापर्यंत तर त्यांचा सार्वजनिक प्रचार बंद झाला. ओडिस्यो म्हणतात: “नवीन मेंढरांना शोधण्याऐवजी . . . बाहेरील दबाव आणि छळाविरुद्ध धर्मांतर केलेल्यांचा विश्‍वास दृढ करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले.” ते पुढे म्हणतात: “प्रचारकार्य आवश्‍यक समजले जात होते परंतु त्याची पद्धत पूर्णतः बदलण्यात आली होती.”

त्यांचे विश्‍वास आणि प्रथा

पुरुष व स्त्रिया अशा दोघांनीही प्रचारात सहभाग घेण्याऐवजी १४ व्या शतकापर्यंत वॉल्देन्सेस लोकांमध्ये उपदेशक आणि उपासक असा भेद करण्यात आला होता. केवळ प्रशिक्षित पुरुषच शिकवण्याचे कार्य करीत. या फिरत्या सेवकांना बार्ब्स (अंकल) या नावाने ओळखले जाऊ लागले.

हे बार्ब्स वॉल्देन्सियन कुटुंबांना भेटी देऊन त्यांची चळवळ पसरवण्याऐवजी ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. सर्व बार्ब्सना लिहिता वाचता येत होते आणि त्यांचे सहा वर्षांपर्यंत चालेले प्रशिक्षण बायबलवर आधारित होते. प्रादेशिक भाषेतील बायबल वापरल्यामुळे ते आपल्या कळपांना समजावून सांगू शकत होते. विरोधकही हे कबूल करायचे की, वॉल्देन्सेस आणि त्यांच्या मुलांवर देखील बायबलचा जबरदस्त पगडा होता आणि शास्त्रवचनांतील कित्येक लांबलचक उतारेसुद्धा त्यांना तोंडपाठ होते.

सुरवातीचे वॉल्देन्सेस खोटे बोलणे, पर्गेटरी, मृतांकरता मिस्सा करणे, पाळकांकडे माफी मागणे आणि पापमुक्‍तता, तसेच मरीया आणि “संतांची” उपासना अशा काही गोष्टी मानत नव्हते. तसेच प्रभूचे सांज भोजन किंवा शेवटले भोजन ते वर्षातून एकदाच पाळत होते. लॅम्बर्ट यांच्या मते, त्यांचा धर्म, “खरोखरच सामान्य माणसाचा धर्म होता.”

“दुहेरी जीवनशैली”

वॉल्देन्सेस समाजातील लोकांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध होते. विवाह देखील त्यांच्याच समाजात होत असत आणि यामुळे विशिष्ट वॉल्देन्सियन आडनावे रूढ झाली. परंतु, टिकून राहण्याच्या संघर्षात वॉल्देन्सेस लोकांनी आपली मते जाहीरपणे व्यक्‍त करण्याचे थांबवले. धार्मिक विश्‍वास आणि प्रथा यांसंबंधी गुप्तता ठेवल्यामुळे त्यांचे विरोधक त्यांच्यावर वाटेल ते आरोप करत होते; जसे की, ते सैतानाची उपासना करतात असे म्हणत होते. *

वॉल्देन्सेस लोकांनी या आरोपांचा सामना करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांनी हातमिळवणी केली आणि इतिहासकार कॅमरन यांच्या मते कॅथलिक उपासना पद्धतीचे “जुजबी पालन” केले. पुष्कळ वॉल्देन्सेस लोक कॅथलिक पाळकांकडे पापाची कबुली देत होते, मिस्साविधीला जात होते, पवित्र पाण्याचा वापर करत होते, आणि पवित्र स्थळांनाही भेटी देत होते. लॅम्बर्ट म्हणतात: “पुष्कळशा गोष्टींमध्ये ते आपल्या कॅथलिक शेजाऱ्‍यांसारखेच करत होते.” ओडिस्यो यांनी तर स्पष्टपणे म्हटले की, कालांतराने वॉल्देन्सेस “दुहेरी जीवनशैली जगू लागले.” ते पुढे म्हणतात: “एका बाजूला ते आपल्यातली थोडीबहुत शांती टिकवून ठेवण्यासाठी कॅथलिकांप्रमाणे वागू लागले; दुसऱ्‍या बाजूला, ते आपापसांत अशा काही चालीरीती आणि सवयी बाळगत होते ज्यामुळे त्यांचा समाज निश्‍चित टिकेल.”

पाखंडापासून प्रोटेस्टंट धर्मापर्यंत

धर्म सुधारणेने १६ व्या शतकात युरोपमधील धार्मिक परिस्थितीत एकदम बदल घडवून आणला. असहिष्णुतेचे बळी स्वतःच्या देशात कायदेशीर मान्यता मिळवू शकत होते किंवा अधिक अनुकूल परिस्थितीच्या शोधात दुसऱ्‍या देशात जाऊ शकत होते. अनेक लोक स्थापित धार्मिक कर्मठवादाचा विरोध करू लागले होते त्यामुळे पाखंडाची कल्पना इतकी काही महत्त्वपूर्ण राहिली नाही.

१५२३ साली, सुप्रसिद्ध धर्म सुधारक मार्टिन ल्यूथर याने वॉल्देन्सेस यांचा उल्लेख केला होता. १५२६ साली, वॉल्देन्सियन बार्ब्सपैकी एकाने युरोपमधील धार्मिक घडामोडींची बातमी आल्प्समध्ये आणली. यानंतर, प्रोटोस्टंट समाज आणि वॉल्देन्सेस यांच्यामध्ये काही विचारांची देवाणघेवाण झाली. प्रोटेस्टंट लोकांनी वॉल्देन्सेस लोकांना मूळ भाषेतील बायबलचे फ्रेंचमध्ये भाषांतर करण्यासाठी प्रायोजक होण्याचे प्रोत्साहन दिले. हे बायबल १५३५ साली छापण्यात आले आणि त्याला नंतर ओलिव्हेटान बायबल या नावाने ओळखले जाऊ लागले. पण उपरोधिक गोष्ट म्हणजे, बहुतांश वॉल्देन्सेस लोकांना फ्रेंच भाषा समजत नव्हती.

कॅथलिक चर्चकडून छळ सुरू असताना, पुष्कळसे वॉल्देन्सेस दक्षिण फ्रान्सच्या अधिक सुरक्षित प्रव्हान्स प्रदेशात वसती करू लागले; प्रोटेस्टंट लोकही त्यात सामील होते. या स्थलांतराविषयी अधिकाऱ्‍यांना लगेचच खबर देण्यात आली. वॉल्देन्सेस यांची जीवनशैली आणि आचरण याविषयी अनेक चांगल्या वार्ता असतानाही काही लोकांनी त्यांच्या निष्ठेबद्दल संशय व्यक्‍त केला आणि ते सुव्यवस्थेला धोका आहेत असा त्यांच्यावर आरोप केला. त्यावर मेरिंडोल हुकूम देण्यात आला व या लेखाच्या सुरवातीला वर्णिलेला भयंकर रक्‍तपात घडला.

कॅथलिक आणि वॉल्देन्सेस यांच्यातील संबंध दिवसागणिक बिघडत गेले. वॉल्देन्सेसवर होणाऱ्‍या हल्ल्यांचा प्रतिकार करून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वॉल्देन्सेस लोकांनी शस्त्रधारी हल्ल्यांचा देखील उपयोग केला. या संघर्षामुळे ते प्रोटेस्टंट लोकांचाच भाग बनले. अशाप्रकारे, वॉल्देन्सेस लोक, मुख्य प्रोटेस्टंट धर्मात सामील झाले.

नंतरच्या शतकांमध्ये, फ्रान्सपासून दूरवर असलेल्या उरुग्वे आणि अमेरिकासारख्या देशांमध्येही वॉल्देन्सियन चर्चेसची स्थापना करण्यात आली. तथापि, अनेक इतिहासकार ओडिस्यो यांच्याशी सहमत आहेत की, “वॉल्देन्सियन [चळवळ] धर्मसुधारणेच्या वेळी” प्रोटेस्टंट धर्मामध्ये “शोषून घेण्यात आली” तेव्हाच “तिचा अंत झाला.” खरे पाहता, वॉल्देन्सियन चळवळीचा सुरवातीचा आवेश अनेक शतकांआधीच मालवला होता. तिच्या सदस्यांनी भीतीपोटी बायबल आधारित प्रचार आणि शिकवण्याचे कार्य बंद केले तेव्हाच हे घडले.

[तळटीपा]

^ परि. 7 वॉदे याला वोल्देस, वाल्देझिअस किंवा वॉल्दो या वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते. शेवटल्या नावावरून “वॉल्देन्सेस” ही संज्ञा आली आहे. वॉल्देन्सेस किंवा वॉल्देन्सियन लोकांना पूअर ऑफ लायॉन्स (लायॉन्सचे गरीब) या नावानेही ओळखले जात होते.

^ परि. 8 सन ११९९ मध्ये, ईशान्य फ्रान्समधील मेट्‌झच्या बिशपने तिसरा पोप इनोसंट याच्याकडे तक्रार केली की, लोक प्रादेशिक भाषेतील बायबल वाचत होते व त्यावर चर्चा करत होते. कदाचित हा बिशप, वॉल्देन्सेस लोकांविषयीच बोलत असावा.

^ परि. 15 “कॅथरी लोक—ते ख्रिस्ती हुतात्मे होते का?” हा टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९५, पृष्ठे २७-३० वरील लेख पाहा.

^ परि. 21 वॉल्देन्सेस लोकांची अशी सातत्याने निंदा केल्यामुळे वॉदरी (फ्रेंच शब्द वोदवा यातून) हा शब्द तयार झाला. तो संशयित पाखंडी किंवा सैतानाचे उपासक यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

[२३ पानांवरील नकाशा/चित्र]

वॉल्देन्सेस यांचा प्रभाव असलेली क्षेत्रे

फ्रान्स

लायॉन्स

प्रव्हान्स

लुबेरॉन

स्ट्रासबर्ग

मिलान

रोम

बर्लिन

प्राग

व्हिएन्‍ना

[चित्र]

वॉल्देन्सेस लोक १५३५ सालाच्या ओलिव्हेटान बायबलचे प्रायोजक होते

[चित्राचे श्रेय]

बायबल: © Cliché Bibliothèque nationale de France, Paris

[२०, २१ पानांवरील चित्रे]

वॉदे

दोन वृद्ध वॉल्देन्सियन स्त्रियांना जाळताना

[चित्राचे श्रेय]

पृष्ठे २० आणि २१: © Landesbildstelle Baden, Karlsruhe