व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या अंतःकरणाने व बुद्धीने देवाचा शोध घ्या

आपल्या अंतःकरणाने व बुद्धीने देवाचा शोध घ्या

आपल्या अंतःकरणाने व बुद्धीने देवाचा शोध घ्या

देवाला संतुष्ट करणारा विश्‍वास बाळगण्यासाठी अंतःकरणाचा आणि बुद्धीचाही उपयोग करायला खरा ख्रिस्ती धर्म प्रोत्साहन देतो.

खरे तर, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्त याने “पूर्ण अंतःकरणाने” आणि “पूर्ण जिवाने” त्याचप्रमाणे “पूर्ण मनाने” किंवा बुद्धीने देवावर प्रेम करायला शिकवले. (मत्तय २२:३७) होय, आपल्या उपासनेत आपल्या बौद्धिक क्षमतांचा मुख्य भाग असला पाहिजे.

आपल्या शिकवणींवर विचार करण्यासाठी येशू त्याच्या ऐकणाऱ्‍यांना आमंत्रण देत असे तेव्हा तो सहसा, “तुला/तुम्हाला काय वाटते?” असे विचारत असे. (मत्तय १७:२५; १८:१२; २१:२८; २२:४२) त्याचप्रमाणे, प्रेषित पेत्रानेही सहउपासकांना ‘आपली स्पष्ट वैचारिक क्षमता जागृत करावी’ असे लिहिले. (२ पेत्र ३:१, NW) सर्वाधिक प्रवास केलेला प्रारंभिक मिशनरी, प्रेषित पौल याने ख्रिश्‍चनांनी ‘इंद्रियशक्‍तीचा’ उपयोग करावा आणि “देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे हे . . . समजून घ्यावे” असे त्यांना उत्तेजन दिले. (रोमकर १२:१, २, सुबोध भाषांतर) आपल्या विश्‍वासांचे संपूर्ण आणि काळजीपूर्वक परीक्षण केल्यानेच देवाला संतोषकारक असलेला आणि जीवनातील परीक्षांचा सामना करायला मदत करणारा विश्‍वास ख्रिस्ती बाळगू शकतात.—इब्री लोकांस ११:१, ६.

असा विश्‍वास बाळगायला इतरांना मदत करण्यासाठी प्रारंभिक ख्रिस्ती सुवार्तिकांनी “धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, व त्यांना [जे शिकवले ते] स्पष्टीकरण करून पटवून दिले.” (प्रेषितांची कृत्ये १७:१-३, सुबोध भाषांतर) अशा या तर्कशुद्ध संवादामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांकडून उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला. उदाहरणार्थ, मासेदोनियातील बिरुया शहरात अनेक लोकांनी “मोठ्या उत्सुकतेने [देवाच्या] वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी [पौल व त्याच्या साथीदारांनी समजावलेल्या] अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रेषितांची कृत्ये १७:११) येथे दोन गोष्टी दखल घेण्याजोग्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, बिरुयातील लोक देवाचे वचन ऐकायला उत्सुक होते; दुसरी गोष्ट अशी की, जे काही त्यांनी ऐकले होते ते खरे असावे असे ते धरून चालले नाहीत तर त्यांनी शास्त्रवचनांमध्ये पुन्हा शोध केला. ख्रिस्ती मिशनरी लूक याने बिरुयातील लोकांची नम्रतेने प्रशंसा केली व त्यांना “मोठ्या मनाचे” असे संबोधले. आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत तुम्ही देखील असेच मोठे मन दाखवता का?

बुद्धीचे व अंतःकरणाचे सहकार्य

आधी सांगितल्याप्रमाणे, खऱ्‍या उपासनेत बुद्धी आणि अंतःकरण या दोघांचाही समावेश होतो. (मार्क १२:३०) आधीच्या लेखातील पेंटरच्या उदाहरणाचा पुन्हा विचार करा ज्याने घराला रंग देताना चुकीचे रंग वापरले होते. त्याने आपल्या मालकाच्या सूचना नीट लक्षपूर्वक ऐकल्या असत्या तर त्याने पूर्ण मनाने आणि जिवाने आपले काम केले असते आणि मालकाची स्वीकृती मिळण्याची खात्री बाळगली असती. आपल्या उपासनेच्या बाबतीतही हेच आहे.

येशूने म्हटले, “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील.” (तिरपे वळण आमचे.) (योहान ४:२३) यास्तव, प्रेषित पौलाने लिहिले: “ह्‍यावरून आम्हीहि . . . तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या [“अचूक,” NW] ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे.” (कलस्सैकर १:९, १०) अशाप्रकारचे ‘अचूक ज्ञान’ प्रामाणिक लोकांना आत्मविश्‍वास ठेवून अंतःकरणाने व जिवाने उपासना करायला मदत करते कारण त्यांना “ठाऊक आहे अशाची उपासना [ते]” करतात.—योहान ४:२२.

या कारणास्तव, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये ज्यांनी शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला नाही, म्हणजेच, बालके किंवा नवीन आस्थेवाईक लोक अशांना बाप्तिस्मा दिला जात नाही. येशूने आपल्या अनुयायांवर ही कामगिरी सोपवली: “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) देवाच्या इच्छेविषयी अचूक ज्ञान घेऊनच प्रामाणिक अंतःकरणाचे बायबल विद्यार्थी उपासनेच्या बाबतीत पक्की माहिती मिळवून निर्णय घेऊ शकतात. अशाप्रकारचे अचूक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात का?

प्रभूची प्रार्थना समजणे

बायबलविषयी अचूक ज्ञान असणे आणि फक्‍त वरवरची माहिती असणे यातला फरक पाहण्यासाठी मत्तय ६:९-१३ मधील आमच्या स्वर्गातील पित्या किंवा प्रभूची प्रार्थना या नावाने सर्वसामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेवर आपण विचार करू या.

कोट्यवधी लोक येशूने शिकवलेली आदर्श प्रार्थना चर्चमध्ये म्हणतात. पण किती लोकांना तिचा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे? विशेषकरून, देवाचे नाव आणि त्याचे राज्य यासंबंधी प्रार्थनेच्या सुरवातीला जे म्हटले आहे त्याचा अर्थ किती जणांना शिकवण्यात आला आहे? हे विषय इतके महत्त्वाचे आहेत की येशूने त्यांचा उल्लेख प्रार्थनेच्या अगदी सुरवातीला केला.

ती अशाप्रकारे सुरू होते: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” हे लक्षात घ्या की, येशूने देवाचे नाव पवित्र मानले जावे म्हणून प्रार्थना करायला सांगितले. यामुळे अनेक लोकांपुढे दोन प्रश्‍न उभे राहतात: पहिला, देवाचे नाव काय आहे? आणि दुसरा, ते पवित्र मानण्याची काय गरज आहे?

पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर, मूळ भाषांतील बायबलमध्ये ७,००० पेक्षा अधिक ठिकाणी सापडू शकते. पहिल्यांदा ते स्तोत्र ८३:१८ [तळटीप] येथे सापडते: “म्हणजे तू, केवळ तूच, [“याव्हे”] ह्‍या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” (तिरपे वळण आमचे.) देवाचे नाव यहोवा याविषयी निर्गम ३:१५ म्हणते: “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यान्‌पिढ्या माझे स्मरण होईल.” * पण देवाचे नाव, जे शुद्धता आणि पावित्र्याचा सार आहे ते पवित्र करण्याची काय गरज आहे? कारण मानवी इतिहासाच्या अगदी सुरवातीपासून या नावाची निंदा करण्यात आली आहे, त्यावर कलंक लावण्यात आला आहे.

एदेन बागेत, देवाने आदाम आणि हव्वेला सांगितले की, मना केलेले फळ खाल्ल्यास ते मरतील. (उत्पत्ति २:१७) पण सैतानाने धडधडीतपणे देवाचा विरोध करून म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” आणि अशाप्रकारे, सैतानाने देवावर लबाडीचा आरोप केला. पण सैतान तेवढ्यावरच थांबला नाही. देव तिच्यापासून काही मौल्यवान माहिती लपवून अन्याय करत आहे असे हव्वेला सांगून त्याने देवाच्या नावाची आणखी निंदा केली. तो म्हणाला, “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” केवढी ही निंदा!—उत्पत्ति ३:४, ५.

मना केलेले फळ खाऊन आदामाने आणि हव्वेने सैतानाची बाजू घेतली. तेव्हापासून बहुतेक मानवांनी मुद्दामहून किंवा नकळत देवाचे धार्मिक दर्जे धिक्कारून त्या मूळ निंदेत आणखी भर घातली आहे. (१ योहान ५:१९) लोक अजूनही स्वतःच्या दुःखाकरता देवाला जबाबदार ठरवून त्याची निंदा करतात—मग त्यांच्यावर ओढवलेले दुःख त्यांच्याच वाईट मार्गांचा परिणाम असला तरीही. “माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्‍वराला देतो,” असे नीतिसूत्रे १९:३ म्हणते. (ईजी-टू-रीड व्हर्शन) यावरून, आपल्या पित्यावर खरोखर प्रेम करणाऱ्‍या येशूने त्याचे नाव पवित्र मानले जावे अशी प्रार्थना का केली असावी हे तुम्हाला समजते का?

“तुझे राज्य येवो”

देवाचे नाव पवित्र मानले जावो अशी प्रार्थना केल्यावर येशू म्हणाला: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) या उताऱ्‍याविषयी आपण विचारू शकतो: ‘देवाचे राज्य काय आहे? आणि त्या राज्याचे येणे व देवाची इच्छा पृथ्वीवर पार पडणे यात काय संबंध आहे?’

बायबलमध्ये, “राज्य” या शब्दाचा अर्थ “राजाकरवी शासन” असा होतो. त्याअर्थी, देवाचे राज्य म्हणजे देवाने निवडलेल्या राजाकरवी देवाचे शासन किंवा सरकार. हा राजा दुसरा कोणी नसून पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे—“राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.” (प्रकटीकरण १९:१६; दानीएल ७:१३, १४) येशू ख्रिस्ताच्या हातातील देवाच्या मशीही राज्याविषयी संदेष्ट्या दानीएलाने लिहिले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल,” अर्थात अनंतकाळ टिकेल.—दानीएल २:४४.

होय, देवाचे राज्य पृथ्वीचा संपूर्ण ताबा घेईल आणि दुष्टांचा नाश करून ते “सर्वकाळ टिकेल,” अर्थात अनंतकाळ. अशाप्रकारे, देवाचे राज्य हे असे माध्यम आहे ज्याकरवी यहोवा आपल्या नावाचे गौरव करतो आणि सैतानाने व दुष्ट मानवांनी त्याच्या नावावर लावलेल्या खोट्या आरोपांना मिटवतो.—यहेज्केल ३६:२३.

इतर सर्व सरकारांप्रमाणे देवाच्या राज्यात देखील प्रजा आहे. ती कोण आहे? बायबल उत्तर देते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११) त्याचप्रमाणे येशू म्हणाला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” अर्थात, या लोकांना देवाचे अचूक ज्ञान आहे आणि ते जीवनाकरता आवश्‍यक आहे.—मत्तय ५:५; योहान १७:३.

फक्‍त नम्र, सौम्य आणि देवावर व एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या लोकांनी व्यापलेल्या पृथ्वीची कल्पना तुम्ही करू शकता का? (१ योहान ४:७, ८) हीच तर येशूने प्रार्थना केली; त्याने म्हटले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” येशूने आपल्या अनुयायांना अशाप्रकारे प्रार्थना करायला का शिकवले हे तुम्हाला समजले का? त्याहून महत्त्वाचे म्हणजे, या प्रार्थनेच्या पूर्णतेचा व्यक्‍तिगतरित्या तुमच्यावर कसा प्रभाव पडेल हे तुम्ही पाहू शकता का?

लाखो लोक शास्त्रवचनांवरून वादविवाद करत आहेत

देवाच्या येणाऱ्‍या राज्याची घोषणा करणाऱ्‍या जागतिक स्वरूपाच्या आध्यात्मिक शिक्षण मोहीमेविषयी येशूने भाकीत केले होते. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

जगभरात, सुमारे ६० लाख यहोवाचे साक्षीदार आपल्या शेजाऱ्‍यांना ती सुवार्ता सांगत आहेत. आपल्या इंद्रियशक्‍तीचा उपयोग करून देवाविषयी आणि त्याच्या राज्याविषयी ‘शास्त्रात शोध करून’ अधिक शिकून घेण्यास ते तुम्हाला आमंत्रण देतात. असे केल्याने तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि ‘सागर जसा जलपूर्ण आहे तशाप्रकारे परमेश्‍वराच्या ज्ञानाने परिपूर्ण’ झालेल्या परादीस पृथ्वीवरील जीवनाच्या आशेचा विचार करून तुम्ही देखील उल्लासित व्हाल.—यशया ११:६-९.

[तळटीप]

^ परि. 14 काही विद्वान “यहोवा” ऐवजी “याव्हे” हा अनुवाद जास्त पसंत करतात. परंतु, बायबलच्या बहुतेक आधुनिक अनुवादकांनी आपल्या अनुवादांमध्ये देवाच्या नावाचे कोणतेही रूप ठेवलेले नाही तर त्याऐवजी “प्रभू” किंवा “देव” अशा सामान्य उपाधी घातल्या आहेत. देवाच्या नावाविषयी अधिक माहितीसाठी कृपया सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी) हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले माहितीपत्रक पाहा.

[८ पानांवरील चौकट/चित्र]

थोर शिक्षकाचे अनुकरण करा

येशूने सहसा आपल्या शिक्षणात बायबलवरील विशिष्ट विषयांवर जोर दिला. उदाहरणार्थ, आपल्या पुनरुत्थानानंतर त्याने देवाच्या उद्देशातील स्वतःच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दोन शिष्यांना दिले जे त्याच्या मृत्यूच्या संदर्भात गोंधळलेले होते. लूक २४:२७ म्हणते: “त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्‍यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.”

लक्षात घ्या की, येशूने एक खास विषय निवडला—‘आपणाविषयी,’ म्हणजेच मशीहा—आणि त्याने आपल्या चर्चेत “संपूर्ण शास्त्रांतील” गोष्टींचा उल्लेख केला. अशाप्रकारे, येशूने एखादे कोडे सोडवतात तशी बायबलमधील संबंधित शास्त्रवचने जोडली आणि यामुळे त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक सत्याचे स्पष्ट चित्र दिसू शकले. (२ तीमथ्य १:१३) परिणामस्वरूप, त्यांना केवळ ज्ञानप्रबोधन मिळाले नाही तर त्यांच्या मनावर त्याचा गहिरा प्रभाव पडला. तो अहवाल म्हणतो: “तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, ‘तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?’”—लूक २४:३२.

यहोवाचे साक्षीदार आपल्या सेवाकार्यात येशूच्या पद्धतींचे अनुकरण करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या अभ्यासाची मुख्य साधने म्हणजे देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक. यांमध्ये एकाहून एक बायबलचे विषय आहेत; जसे की, “देव कोण आहे?,” “देव दुःखाला अनुमती का देतो?,” “तुम्हाला खरा धर्म कसा शोधता येईल?,” “हा शेवटला काळ आहे!,” आणि “देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन.” प्रत्येक पाठात अनेक शास्त्रवचने दिली आहेत.

तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल किंवा या व इतर विषयांच्या मोफत गृह बायबल अभ्यासाकरता या पत्रिकेच्या पृष्ठ २ वरील पत्त्यावर लिहायचे असेल तर तुम्ही तसे करू शकता.

[चित्र]

बायबलमधील विशिष्ट विषयांवर जोर देऊन आपल्या विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहंचा

[७ पानांवरील चित्रे]

येशूच्या आदर्श प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला समजला आहे का?

“हे आमच्या स्वर्गातील पित्या. तुझे नाव पवित्र मानिले जावो . . .”

“तुझे [मशीही] राज्य येवो . . .”

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो”