व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागृत राहा, धैर्याने आगेकूच करा!

जागृत राहा, धैर्याने आगेकूच करा!

जागृत राहा, धैर्याने आगेकूच करा!

खास सभांवरील अहवाल

आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसात’ राहात आहोत हे कोणीही आज नाकारणार नाही. यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे ‘शेवटल्या काळातील’ जीवनाच्या दबावांचा आपल्यावर काही परिणाम होत नाही असे नाही. (२ तीमथ्य ३:१-५) पण लोकांना मदतीची गरज आहे हे आपल्याला समजते. त्यांना जागतिक घटनांचा अर्थ समजत नाही. त्यांना सांत्वनाची आणि आशेची गरज आहे. आपल्या सहमानवांना मदत करण्यामध्ये आपली नेमकी काय भूमिका आहे?

देवाने स्थापलेल्या राज्याची सुवार्ता सांगण्याची कामगिरी देवाने आपल्यावर सोपवली आहे. (मत्तय २४:१४) लोकांना हे समजले पाहिजे की, हे स्वर्गीय राज्यच केवळ मानवजातीकरता एकमेव आशेचा किरण आहे. परंतु, आपल्या संदेशाला नेहमीच अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी आपल्या कार्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि बांधवांना छळले जाते. तरीही, आपण माघार घेत नाही. यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून, जागृत राहण्याचा आणि सुवार्ता सांगण्याचे कार्य बंद न करता धैर्याने वाटचाल करत राहण्याचा आपला दृढनिश्‍चय आहे.—प्रेषितांची कृत्ये ५:४२.

ऑक्टोबर २००१ मध्ये भरवलेल्या खास सभांमध्ये हा दृढनिश्‍चय दिसून आला. शनिवार, ऑक्टोबर ६ रोजी, पेन्सिल्व्हानियाच्या वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीची वार्षिक सभा अमेरिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या जर्सी सिटी, न्यू जर्सी येथील संमेलनगृहात भरवण्यात आली. * दुसऱ्‍या दिवशी, चार ठिकाणी अतिरिक्‍त सभा भरवण्यात आल्या; तीन अमेरिकेत आणि एक कॅनडात. *

वार्षिक सभेत आपल्या सुरवातीच्या भाषणात, अध्यक्षांनी, अर्थात, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य सॅम्युएल एफ. हर्ड यांनी स्तोत्र ९२:१, ४ चा उल्लेख करून म्हटले: “आपल्याला उपकार मानले पाहिजेत.” जगभरातून आलेल्या पाच अहवालांमध्ये उपकार मानण्याची कारणे दिली होती.

दूरदूरहून मिळालेले अहवाल

बंधू अल्फ्रेड क्वाची यांनी पूर्वी गोल्ड कोस्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या घानातील प्रचारकार्याच्या प्रगतीविषयी अहवाल दिला. अनेक वर्षे त्या देशात आमच्या कार्यावर बंदी होती. लोक विचारायचे: “बंदी का आणलीय तुमच्यावर? तुम्ही असं काय केलंत?” यामुळे आम्हाला साक्ष द्यायला संधी मिळायची असे बंधू क्वाची म्हणाले. १९९१ साली बंदी काढण्यात आली तेव्हा घानामध्ये ३४,४२१ यहोवाचे साक्षीदार होते. २००१ च्या ऑगस्टमध्ये, एकूण संख्या ६८,१५२ इतकी होती, म्हणजेच ९८ टक्के वाढ. सध्या १०,००० आसनांचे एक संमेलनगृह बांधण्याची योजना आखली जात आहे. स्पष्टतः, घानातील आपले आध्यात्मिक बांधव त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

राजकीय अस्वस्थता असतानाही, आयर्लंडमधील आपले बांधव सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतात आणि त्यांच्या तटस्थ भूमिकेबद्दल लोक त्यांचा आदर करतात. शाखा समितीचे सूत्रसंचालक पीटर अँड्रूज म्हणाले की, आयर्लंडमधील ६ विभागांमध्ये ११५ मंडळ्या आहेत. बंधू अँड्रूज यांनी लिआम नावाच्या एका दहा वर्षांच्या मुलाचा अनुभव सांगितला जो निडरतेने शाळेत साक्ष देतो. लिआमने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल कथांचं माझं पुस्तक हे प्रकाशन त्याच्या वर्गातल्या २५ जणांना आणि त्याच्या शिक्षिकेलाही दिले. लिआमला बाप्तिस्मा घ्यायचा होता आणि त्याला कोणीतरी विचारले की, तू बाप्तिस्मा घ्यायला फार लहान नाहीस का? लिआम म्हणाला: “माझं वय पाहू नका तर यहोवाबद्दल मला किती प्रेम आहे यावरून हे ठरलं पाहिजे. माझ्या बाप्तिस्म्यावरून मला यहोवावर किती प्रेम आहे ते दिसून येईल.” लिआमला मिशनरी व्हायचे आहे.

१९६८ मध्ये, व्हेनेझुएलात सुवार्तेचे ५,४०० प्रचारक होते. पण सध्या ८८,००० पेक्षा अधिक आहेत असे शाखा समितीचे सूत्रसंचालक स्टीफन योहानसन म्हणाले. आणि पुढेही वाढ होण्याची शक्यता आहे कारण २००१ साली २,९६,००० पेक्षा अधिक लोक स्मारक विधीला उपस्थित होते. १९९९ च्या डिसेंबरमध्ये, मुसळधार पावसामुळे घसरण होऊन अंदाजे ५०,००० मरण पावले ज्यामध्ये अनेक साक्षीदारांचाही समावेश होता. एका राज्य सभागृहात तर इतक्या वरपर्यंत चिखल भरला होता की छतापर्यंत फक्‍त अर्धा मीटर जागा मोकळी राहिली होती. ही इमारत सोडून द्यावी असे कोणीतरी सुचवले तेव्हा बांधवांनी उत्तर दिले: “मुळीच नाही! हे आमचे राज्य सभागृह आहे आणि आता आम्ही ते सोडणार नाही.” ते लागलीच कामाला लागले आणि कित्येक टन चिखल, दगड आणि कचरा बाहेर काढला. इमारतीचा कायापालट केल्यावर ती पूर्वीपेक्षाही अधिक देखणी झाली आहे असे बांधवांचे म्हणणे आहे!

फिलिपाईन्समध्ये ८७ भाषा आणि पोटभाषा आहेत असे शाखा समितीचे सूत्रसंचालक बंधू डेन्टन हॉप्किन्सन म्हणाले. गत सेवा वर्षादरम्यान, सेब्वानो, इलोको आणि टगालोग या देशातील तीन प्रमुख भाषांमध्ये संपूर्ण पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर प्रकाशित करण्यात आले. बंधू हॉप्किन्सन यांनी एका नऊ वर्षांच्या मुलाचा अनुभव सांगितला ज्याने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुम्हाला आनंदी बनवणारी सुवार्ता (इंग्रजी), हे पुस्तक वाचले. त्याने शाखेतून इतरही प्रकाशने मागवली आणि वाचली परंतु त्याच्या कुटुंबाकडून त्याला विरोध होता. अनेक वर्षांनंतर, तो वैद्यकीय शाळेत असताना त्याने शाखेशी संपर्क साधला आणि एक बायबल अभ्यास मागितला. १९९६ साली त्याचा बाप्तिस्मा झाला आणि लगेचच तो पूर्ण वेळेच्या सेवेत उतरला. आता तो आपल्या पत्नीबरोबर शाखा दफ्तरात सेवा करतो.

‘प्वेर्तो रिको “साक्षीदारांची निर्यात” करतो,’ असे शाखा समितीचे सूत्रसंचालक रोनल्ड पार्कन म्हणाले. त्या द्वीपावर सुमारे २५,००० प्रचारक आहेत आणि अनेक वर्षांपासून या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. का? कारण अंदाजानुसार, प्वेर्तो रिकोतून दरवर्षी सुमारे १,००० प्रचारक अमेरिकेला “निर्यात” केले जातात; यांतले बहुतेक जण आर्थिक कारणांसाठी परदेशी जातात. बंधू पार्कनने कोर्टाकडून मिळालेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाविषयी सांगितले; तो लुईस नावाच्या एका १७ वर्षांच्या साक्षीदाराविषयी होता ज्याला ल्यूकेमिया झाला होता. लुईसने रक्‍त घेण्याला नकार दर्शवल्यामुळे कोर्टात खटला दाखल करण्यात आला. महिला न्यायाधीशाला त्याच्याशी स्वतः बोलायचे होते म्हणून त्या दवाखान्यात त्याला भेटायला गेल्या. लुईसने त्यांना विचारले: “मी एखादा गंभीर गुन्हा केला असता तर तुम्ही मला प्रौढ मानून न्याय दिला असता पण देवाची आज्ञा पाळण्याच्या बाबतीत तुम्ही मला अल्पवयीन का समजता?” न्यायाधीशाला खात्री पटली की तो प्रौढ असलेला अल्पवयीन असून स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो.

दूरदूरच्या देशांतील अहवालांनंतर अमेरिकेतील शाखा समितीचे सदस्य हॅरल्ड कॉकर्न यांनी यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा करत असलेल्या चौघांच्या मुलाखती घेतल्या. आर्थर बोनो यांनी ५१ वर्षे पूर्ण वेळेची सेवा केली आणि सध्या ते एक्वेदोर शाखा समितीचे सदस्य आहेत. आन्जेलो काटान्झारो यांनी ५९ वर्षे पूर्ण वेळेची सेवा केली आणि यातला बहुतेक वेळ त्यांनी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. रिचर्ड एब्रहॅमसन यांनी १९५३ साली गिलियड प्रशालेतून पदवी प्राप्त केली आणि ब्रुकलिन बेथेलला येण्याआधी २६ वर्षे त्यांना डेन्मार्क येथील कार्याची देखरेख करण्याची संधी प्राप्त झाली. शेवटी, सर्वांना ९६ वर्षे वय असलेल्या कॅरी बाबर यांचा अनुभव ऐकायला आनंद झाला. १९२१ साली बंधू कॅरी बाबर यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांनी ७८ वर्षे पूर्ण वेळेची सेवा केली आणि १९७८ पासून नियमन मंडळाचे सदस्य या नात्याने कार्य केले आहे.

हृदयस्पर्शी भाषणे

वार्षिक सभेत विचारांना चालना देणारी अनेक भाषणे होती. बंधू रॉबर्ट वॉलन यांनी “आपल्या नावाकरता घेतलेले लोक” या विषयावर भाषण दिले. आपण देवाच्या नावाकरता घेतलेले लोक आहोत आणि २३० हून अधिक देशांमध्ये आपण आहोत. यहोवाने आपल्याला ‘भावी सुस्थिती आणि आशा’ दिली आहे. (यिर्मया २९:११) आपण देवाच्या राज्याचा प्रचार करून सांत्वन आणि समाधानाचा सुंदर संदेश देत राहिला पाहिजे. (यशया ६१:१) बंधू वॉलन यांनी शेवटी म्हटले, “आपण दिवसागणिक यहोवाचे साक्षीदार या नावाप्रमाणे जगू या.”—यशया ४३:१०.

कार्यक्रमाच्या शेवटी नियमन मंडळ्याच्या तीन सदस्यांनी दिलेला एक परिसंवाद होता. “सावध असण्याची, स्थिर राहण्याची आणि खंबीर होण्याची हीच वेळ” हे त्या परिसंवादाचे शीर्षक होते.—१ करिंथकर १६:१३.

सर्वात आधी, बंधू स्टीफन लेट यांनी “या शेवटच्या घटकेत जागृत राहा” या विषयावर भाषण दिले. बंधू लेट यांनी म्हटले, शारीरिक निद्रा एक प्रकारची देणगी आहे. त्यामुळे तजेला प्राप्त होतो. परंतु, आध्यात्मिक निद्रा कधीच हितकर नसते. (१ थेस्सलनीकाकर ५:६) मग, आपण आध्यात्मिकरित्या जागृत कसे राहू शकतो? बंधू लेट यांनी तीन आध्यात्मिक ‘गोळ्यांविषयी’ सांगितले: (१) प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. (१ करिंथकर १५:५८) (२) तुमच्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखा. (मत्तय ५:३) (३) बायबलमधील सल्ला मिळतो तेव्हा योग्य प्रतिसाद दाखवा जेणेकरून तुम्ही सुज्ञ व्हाल.—नीतिसूत्रे १३:२०.

बंधू थिओडोर जॅरस यांनी “परीक्षेत स्थिर राहा” या विषयावर हृदयस्पर्शी भाषण सादर केले. प्रकटीकरण ३:१० चा उल्लेख करून बंधू जॅरस यांनी प्रश्‍न विचारला: “हा ‘परीक्षाप्रसंग’ काय आहे?” ही परीक्षा “प्रभूच्या दिवशी” येईल आणि आज आपण त्याच काळात जगत आहोत. (प्रकटीकरण १:१०) या परीक्षेचा मुख्य मुद्दा हाच असेल की आपण देवाने स्थापलेल्या राज्याच्या बाजूने आहोत की सैतानाच्या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या बाजूने आहोत? तो परीक्षाप्रसंग संपेपर्यंत आपल्याला समस्यांना किंवा अडीअडचणींना तोंड देणे भाग आहे. आपण यहोवाला आणि त्याच्या संघटनेला निष्ठावान राहणार आहोत का? बंधू जॅरस म्हणाले की, ‘प्रत्येकाला अशी निष्ठा दाखवावी लागेल.’

शेवटी, बंधू जॉन इ. बार यांनी “आध्यात्मिक व्यक्‍ती या नात्याने खंबीर व्हा” या विषयावर भाषण दिले. लूक १२:२३-२५ चा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, ‘अरुंद दरवाजाने आत जाण्यासाठी’ आपण यत्न केला पाहिजे. अनेकजण यात उणे पडतात कारण ते खंबीर होण्याइतके मेहनती नसतात. प्रौढ ख्रिस्ती होण्याकरता आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूत बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करायला शिकले पाहिजे. बंधू बार यांनी उत्तेजन दिले: “तुम्ही निश्‍चितच हे मान्य कराल की हीच वेळ आहे (१) यहोवाला प्रथम स्थान देण्याची; (२) खंबीर होण्याची; आणि (३) यहोवाची इच्छा करण्याकरता यत्न करण्याची. अशातऱ्‍हेने आपण अंतहीन जीवनाकडे नेणाऱ्‍या अरुंद दरवाजातून आत जाऊ शकू.”

वार्षिक सभा समाप्त होत आली खरी मात्र एका प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे राहून गेले होते: २००२ सेवा वर्षाचे वार्षिक वचन कोणते आहे? दुसऱ्‍या दिवशी या प्रश्‍नाचे उत्तर देण्यात आले.

अतिरिक्‍त सभा

रविवारी सकाळी अतिरिक्‍त सभेचा कार्यक्रम सुरू झाल्यावर सर्वांची उत्सुकता वाढली. सुरवातीला, त्या आठवड्याच्या टेहळणी बुरूज पाठाचा सारांश देण्यात आला, नंतर वार्षिक सभेतील काही ठळक मुद्दे संक्षिप्त सादर करण्यात आले. मग, २००२ वार्षिक वचनावर आधारित असलेले भाषण ऐकायला सर्वजण उल्लासित झाले: “माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्तय ११:२८) हे भाषण, टेहळणी बुरूज, डिसेंबर १५, २००१ अंकात नंतर प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या लेखांवर आधारलेले होते.

त्यानंतर, ऑगस्ट २००१ मध्ये फ्रान्स व इटलीतील “देवाच्या वचनाचे शिक्षक” या अधिवेशनांच्या खास प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले. * शेवटी, त्या दिवसाच्या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ब्रुकलिन बेथेल येथील पाहुण्या वक्‍त्‌यांनी दोन समारोपाची भाषणे सादर केली.

पहिल्या भाषणाचे शीर्षक होते, “या कठीण काळात धैर्याने यहोवावर भरवसा करणे.” वक्‍त्‌याने पुढील मुख्य मुद्द्‌यांवर स्पष्टीकरण दिले: (१) धैर्याने यहोवावर भरवसा ठेवणे देवाच्या लोकांकरता नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी विरोध होत असतानाही धैर्य आणि विश्‍वास प्रदर्शित केला. (इब्री लोकांस ११:१–१२:३) (२) यहोवावर भरवसा ठेवण्याकरता तो योग्य आधार देतो. त्याच्या कृतीद्वारे आणि वचनाद्वारे आपल्याला अशी हमी मिळते की, तो त्याच्या सेवकांची काळजी घेतो आणि त्यांना तो कधीच विसरणार नाही. (इब्री लोकांस ६:१०) (३) खासकरून आज धैर्य आणि विश्‍वास यांची गरज आहे. येशूने भाकीत केल्याप्रमाणे लोक आपला “द्वेष” करतात. (मत्तय २४:९) तग धरून राहण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनावर विसंबून राहिले पाहिजे, त्याचा आत्मा आपल्यासोबत आहे याचा आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे आणि सुवार्ता प्रचार करत राहण्याचे धैर्य असले पाहिजे. (४) उदाहरणांवरून हे दिसून येत आहे की, सध्या आपण विरोधाचा सामना करत आहोत. वक्‍त्‌याने अर्मेनिया, फ्रान्स, जॉर्जिया, कझाकस्तान, रशिया आणि तुर्कमेनिस्तान येथील बांधव कसे तग धरून राहिले आहेत हे सांगितले तेव्हा सगळे हेलावून गेले. होय, धैर्य आणि यहोवावरील भरवसा दाखवण्याची हीच वेळ आहे!

शेवटच्या वक्‍त्‌याने “यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने आगेकूच करणे” या विषयावर भाषण दिले. या भाषणात अनेक समयोचित मुद्दे होते. (१) यहोवाच्या लोकांची आगेकूच सर्वांच्या निर्देशनास येते. आपले प्रचार कार्य आणि आपली अधिवेशने लोकांचे लक्ष आकर्षित करतात. (२) यहोवाने स्थापलेले संघटन एकजूट आहे. सा.यु. २९ मध्ये, “सर्व काही”—स्वर्गीय भवितव्य त्याचप्रमाणे पार्थिव आशा असलेल्यांना—देवाच्या कुटुंबात एकत्र करण्यासाठी येशूचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला. (इफिसकर १:८-१०) (३) अधिवेशने आंतरराष्ट्रीय एकतेची उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मागच्या ऑगस्ट महिन्यात फ्रान्स आणि इटलीत झालेल्या खास अधिवेशनांमध्ये हे अगदी स्पष्ट दिसून आले. (४) फ्रान्स आणि इटलीत एक प्रोत्साहनदायक ठराव संमत करण्यात आला. वक्‍त्‌याने या प्रोत्साहनदायक ठरावातील काही उतारे सांगितले. हा संपूर्ण ठराव खाली दिला आहे.

शेवटल्या भाषणाच्या समाप्तीला पाहुण्या वक्‍त्‌याने नियमन मंडळाकडील एक हृदयस्पर्शी घोषणा वाचून दाखवली. त्यात असे म्हटले होते: “जागृत आणि सतर्क राहून जगातील घडामोडी काय वळण घेतील हे समजण्याची हीच वेळ आहे. . . . तुमच्याबद्दल आणि देवाच्या इतर लोकांबद्दल नियमन मंडळाला प्रेमळ काळजी आहे हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. देवाची इच्छा पूर्ण जिवाने करत राहताना तो तुम्हाला समृद्ध आशीर्वाद देवो.” या कठीण काळात जागृत राहून यहोवाच्या एकजूट संघटनेसोबत धैर्याने आगेकूच करत राहण्याचा सगळीकडे यहोवाच्या लोकांचा दृढनिश्‍चय आहे.

[तळटीपा]

^ परि. 5 वार्षिक सभेचा कार्यक्रम अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यमाने प्रसारित करण्यात आला; त्यामुळे कार्यक्रमाची एकूण उपस्थिती १३,७५७ इतकी होती.

^ परि. 5 या अतिरिक्‍त सभा कॅलिफोर्नियातील लाँग बीच; मिशिगन येथील पोन्टियॅक; न्यूयॉर्कमधील युन्यनडेल; आणि ओन्टारिओतील हॅमिल्टन येथे भरवण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने प्रसारित केलेल्या कार्यक्रमासाठी इतर ठिकाणच्या उपस्थितीसोबत एकूण उपस्थिती १,१७,८८५ इतकी होती.

^ परि. 23 फ्रान्समध्ये पॅरिस, बोर्दो आणि लायॉन्स येथे तीन खास अधिवेशने भरवण्यात आली. इटलीत, एकाच वेळी एकूण नऊ अधिवेशने भरली परंतु अमेरिकेतील प्रतिनिधींना रोम आणि मिलान येथे नेमण्यात आले होते.

[२९-३१ पानांवरील चौकट/चित्रे]

ठराव

ऑगस्ट २००१ मध्ये, “देवाच्या वचनाचे शिक्षक” ही खास अधिवेशने फ्रान्स आणि इटलीत भरवण्यात आली होती. त्या अधिवेशनांमध्ये एक प्रोत्साहनदायक ठराव संमत करण्यात आला. हा ठराव पुढीलप्रमाणे आहे.

“यहोवाचे साक्षीदार या नात्याने, ‘देवाच्या वचनाचे शिक्षक’ अधिवेशनात एकत्र जमलेल्या आपल्या सर्वांना अत्यंत फायदेकारक असलेली शिकवण देण्यात आली आहे. ही शिकवण कोठून येते त्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. ही शिकवण कोणा मानवाकडून नाही. तर प्राचीन काळातील संदेष्ट्या यशयाने ज्याचे वर्णन “[महान] शिक्षक” असे केले त्याच्याकडून आहे. (यशया ३०:२०) यशया ४८:१७ मध्ये [पं.र.भा.] सांगितल्याप्रमाणे यहोवाच्या सूचनेकडे लक्ष द्या: ‘जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो तो मीच यहोवा तुझा देव आहे.’ हे तो कसे साध्य करतो? याचा प्रमुख मार्ग म्हणजे जगातील सर्वाधिक भाषांत भाषांतरित आणि वितरित करण्यात आलेले पुस्तक अर्थात बायबल याच्याद्वारे; त्यात आपल्याला अगदी स्पष्ट शब्दांत असे सांगितले आहे: ‘प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख . . . उपयोगी आहे.’—२ तीमथ्य ३:१६.

“आज, मानवजातीला अशाच फायदेकारक शिकवणीची अत्यंत गरज आहे. असे का म्हटले जाऊ शकते? या जगाच्या बदलत्या, गोंधळवणाऱ्‍या स्थितीबद्दल समंजस लोक काय मान्य करतात? केवळ हेच की: जगाच्या शिक्षण व्यवस्थांमधून कोट्यवधी लोकांनी शिक्षण प्राप्त केले असले तरी दुःखाची गोष्टी अशी आहे की खरी नीतिमूल्ये राहिली नाहीत आणि बरे व वाईट यांतला भेदही लोकांना करता येत नाही. (यशया ५:२०, २१) बायबलबद्दलचे अज्ञान वाढत चालले आहे. तंत्रज्ञानाच्या सौजन्याने, संगणकांद्वारे असंख्य विषयांवर माहिती मिळवणे शक्य असले तरी जीवनाचा उद्देश काय आहे? आपल्या काळातील घडामोडींचा काय अर्थ लावावा? भवितव्याबद्दल काही निश्‍चित आशा आहे का? शांती आणि सुरक्षितता कधी वास्तवात उतरेल का? अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोणाजवळ नाहीत. शिवाय, पुस्तकालयांमध्ये जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील मानवांच्या प्रयत्नांविषयी माहिती देणारी लाखोलाख पुस्तके आहेत. तरीही, मानवजात त्याच त्या चुका करत राहते. गुन्हेगारी वाढत चालली आहे. जे रोग नामशेष झाले असा विचार केला जात होता ते पुन्हा डोकी वर काढू लागले आहेत आणि एड्‌ससारखे रोग तर हाताबाहेर चालले आहे. मोडकळीस येणाऱ्‍या कुटुंबांची संख्या घाबरवून टाकणारी आहे. प्रदूषणाने वातावरण दूषित होत चालले आहे. अतिरेक आणि सामूहिक नाश करणारी हत्यारे, शांती आणि सुरक्षिततेला धोका ठरत आहेत. उपाय नसलेल्या समस्यांचा जणू ढीग होत चालला आहे. या कठीण काळांमध्ये सहमानवांना मदत करण्यात आपली योग्य भूमिका कोणती आहे? मानवजातीच्या या दुःखमय स्थितीचे कारण दाखवणारी आणि केवळ सद्य जीवनात उत्तम मार्ग दाखवणारी नव्हे तर भविष्याकरताही एक निश्‍चित, उज्ज्वल आशा देणारी शिकवण आहे का?

“बायबलमध्ये आपल्याला अशी आज्ञा देण्यात आली आहे की ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; जे काही ख्रिस्ताने आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.’ (मत्तय २८:१९, २०) येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानानंतर त्याला स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार प्राप्त झाला तेव्हा त्याने ही आज्ञा दिली होती. मानवांच्या सर्व कार्यांपेक्षा ही कामगिरी अधिक श्रेष्ठ आहे. देवाच्या दृष्टीत, धार्मिकतेबद्दल उत्सुकता बाळगणाऱ्‍यांच्या आध्यात्मिक गरजांवर केंद्रीत असलेली ही कामगिरी सर्वात महत्त्वाची आहे. ही कामगिरी गंभीर स्वरूपाची आहे असे समजण्यास आपल्याजवळ भक्कम शास्त्रवचनीय कारणे आहेत.

“याकरता आपण आपल्या जीवनात या कार्याला प्रथम स्थान दिले पाहिजे. या जागतिक शैक्षणिक कार्यक्रमाची प्रगती थांबवण्यासाठी अनेक विकर्षित करणारे प्रभाव, अडखळणे आणि धार्मिक व राजकीय गटांकडून विरोध असतानाही देवाच्या आशीर्वादाने व मदतीने हे कार्य पार पाडले जाईल. या कार्यात वाढ होत राहील आणि शेवटी पूर्ण होईल याचा आम्हाला आत्मविश्‍वास आणि भरवसा आहे. आपण अशी खात्री का देऊ शकतो? कारण या व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत देवाने दिलेल्या सेवेत प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासोबत राहील असे त्याने वचन दिले आहे.

“व्याकूळ झालेल्या मानवजातीची ही शेवटची घटका आहे. शेवटचा अंत येण्याआधी आपली सध्याची कामगिरी पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे, यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण अशाप्रकारे ठराव करत आहोत की:

“पहिला: समर्पित सेवक या नात्याने, राज्याच्या कार्यांना आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याचा व आध्यात्मिकतेत प्रगती करण्याचा आपला निश्‍चय आहे. त्याकरता आपल्या प्रार्थना स्तोत्र १४३:१० मधील शब्दांशी सुसंगत आहेत: ‘तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.’ यासाठी आपल्याला उत्तम विद्यार्थी असण्याची, दररोज बायबल वाचण्याचा प्रयत्न करण्याची, व्यक्‍तिगत अभ्यास व संशोधन करण्याची गरज आहे. आपली प्रगती सर्व व्यक्‍तींना दिसून यावी म्हणून मंडळीच्या सभांमध्ये, विभागाच्या संमेलनांमध्ये, प्रांतीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये दिल्या जाणाऱ्‍या ईश्‍वरशासित शिक्षणाची तयारी करण्याचा व त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.—१ तीमथ्य ४:१५; इब्री लोकांस १०:२३-२५.

“दुसरा: देवाकडून शिकवण प्राप्त करण्यासाठी आपण केवळ त्याच्याच मेजावरून खाऊ या आणि भुतांच्या मार्गभ्रष्ट करणाऱ्‍या शिकवणींविषयी बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्‍याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊ या. (१ करिंथकर १०:२१; १ तीमथ्य ४:१) हानीकारक प्रभावांसोबत धार्मिक खोटेपणा, निरर्थक तर्कवितर्क, लज्जास्पद लैंगिक अपवर्तन, अश्‍लील चित्रांचे वेड, अनुचित मनोरंजन आणि ‘सुशिक्षणाच्या नुसार’ नसलेले सर्वकाही टाळण्यासाठी आपण विशेष सावधगिरी बाळगू. (रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ३:२०; १ तीमथ्य ६:३; २ तीमथ्य १:१३) जे हितकर ते शिकवण्यास योग्य असलेल्या ‘मानवरूपी देणग्यांबद्दल’ आदर असल्यामुळे, आपण मनापासून त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करू आणि देवाच्या वचनाच्या शुद्ध आणि धार्मिक असलेल्या नैतिक व आध्यात्मिक दर्जांना उंचावून धरण्यात त्यांना पूर्ण अंतःकरणाने सहयोग देऊ.—इफिसकर ४:७, ८, ११, १२; १ थेस्सलनीकाकर ५:१२, १३; तीत १:९.

“तिसरा: ख्रिस्ती पालक या नात्याने, आपण केवळ शब्दांनी नव्हे तर स्वतःच्या उदाहरणातून आपल्या मुलांना शिकवण्याचा संपूर्ण अंतःकरणाने प्रयत्न करू. त्यांना बालपणापासून ‘तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ असलेली पवित्र शास्त्राची माहिती’ शिकायला मदत करणे याची आपल्याला सर्वाधिक चिंता असली पाहिजे. (२ तीमथ्य ३:१५) आपण हे नेहमी लक्षात ठेवू या की, यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवल्याने ‘त्यांचे कल्याण व्हावे व ते पृथ्वीवर दीर्घायु असावेत,’ हे देवाचे वचन अनुभवण्याची सुसंधी त्यांना मिळेल.—इफिसकर ६:१-४.

“चवथा: चिंता किंवा गंभीर समस्या येतात तेव्हा आपण सर्वात आधी, ‘आपली मागणी देवाला कळवू’ कारण आपल्याला अशी खात्री देण्यात आली आहे की, ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति’ आपले रक्षण करील. (फिलिप्पैकर ४:६, ७) ख्रिस्ताच्या जुवाखाली आल्यामुळे आपल्याला तजेला प्राप्त होईल. देव आपली काळजी करतो हे माहीत असल्यामुळे आपण आपल्या चिंता त्याच्यावर टाकायला मागेपुढे पाहणार नाही.—मत्तय ११:२८-३०; १ पेत्र ५:६, ७.

“पाचवा: यहोवाने आपल्याला त्याच्या वचनाचे शिक्षक होण्याची सुसंधी दिल्यामुळे आपण ‘सत्याचे वचन नीट सांगणारे’ होण्यास नव्याने प्रयत्न करून व ‘आपल्याला सोपविलेली सेवा पूर्ण करून’ त्याचे आभार मानू या. (२ तीमथ्य २:१५; ४:५) यात काय गोवलेले आहे याची चांगली जाणीव असल्यामुळे योग्य जणांना शोधून पेरलेले बीज वाढवण्याची आपली मनःपूर्वक इच्छा आहे. शिवाय, प्रभावीपणे अधिक गृह बायबल अभ्यास चालवून आपण आपली शिकवण सुधारू. यामुळे, ‘सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे’ या देवाच्या इच्छेच्या जास्त सुसंगतेत आपण असू.—१ तीमथ्य २:३, ४.

“सहावा: गत शतकात आणि या शतकातही, अनेक देशांतील यहोवाच्या साक्षीदारांना विविध प्रकारचा विरोध आणि छळ यांचा सामना करावा लागला आहे. पण यहोवाने आपली साथ दिली आहे. (रोमकर ८:३१) त्याचे अटळ वचन आपल्याला आश्‍वस्त करते की, राज्याचा प्रचार आणि शिकवण्याच्या आपल्या कार्यात बाधा आणण्यासाठी, ते कार्य मंदावण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी ‘घडलेले कोणतेहि हत्यार आपल्यावर चालणार नाही.’ (यशया ५४:१७) परिस्थिती अनुकूल असो नाहीतर प्रतिकूल असो, सत्य बोलायचे बंद करू शकत नाही. आपल्या प्रचाराची आणि शिकवण्याची कामगिरी निकडीने पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे. (२ तीमथ्य ४:१, २) सर्व राष्ट्रांतील लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता होता होईल तितकी सांगावी हे आपले ध्येय आहे. अशाप्रकारे, एका धार्मिक नवीन जगात सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी असलेल्या तरतूदीविषयी शिकण्याची संधी त्यांना मिळत राहील. देवाच्या वचनाच्या शिक्षकांचा एकजूट असलेला जमाव या नात्याने आपला थोर शिक्षक, येशू ख्रिस्त याच्या उदाहरणाचे आणि त्याच्या ईश्‍वरी गुणांचे अनुकरण करत राहण्याचा आपला निश्‍चय आहे. हे सर्व आपण आपला महान शिक्षक आणि जीवन दाता, यहोवा देव याला आदर व स्तुती देण्यासाठी करू.

“या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्व . . . लोकांनी ठरावाला संमती दर्शवण्यासाठी होय असे म्हणावे!”

या ठरावातील शेवटला प्रश्‍न फ्रान्समधील तीन अधिवेशनांसाठी जमलेल्या १,६०,००० जणांना आणि इटलीतील नऊ ठिकाणी जमलेल्या २,८९,००० जणांना विचारण्यात आला तेव्हा प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भाषांत होय असा गजर झाला!