“मला देवाची सेवा करायची होती”
राज्य घोषकांचा वृत्तान्त
“मला देवाची सेवा करायची होती”
‘माझ्या लोकांनो, तिच्यामधून निघा.’ पहिल्या शतकात प्रेषित योहानाने एका देवदूताचे हे पाचारण ऐकले. आपल्या दिवसांत, प्रामाणिक अंतःकरणाच्या लाखो लोकांनी याला प्रतिसाद देऊन खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य अर्थात “मोठी बाबेल” यातून ते बाहेर पडले आहेत. (प्रकटीकरण १८:१-४) यांच्यापैकी आहेत, हायटीमधील विलनर; ते आपला अनुभव पुढीलप्रमाणे सांगतात.
“१९५६ साली, हायटीच्या सेंट मार्क या लहानशा गावातील एका धार्मिक कॅथलिक कुटुंबात माझा जन्म झाला होता. हायटीच्या सेंट मिशेल डी लाटाले येथील एका सेमिनरीसाठी आमच्या गावातील दोघांबरोबर माझी पण निवड करण्यात आली तेव्हा माझ्या कुटुंबाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. मग, १९८० साली पुढील प्रशिक्षणासाठी आम्हाला बेल्जियम येथील स्टॅवलो येथे पाठवण्यात आले. तेथेही आम्ही एका कॅथलिक विद्यापीठात गेलो.
“सुरवातीला पाळक होण्याबद्दल मी खूप उत्साही होतो. एके दिवशी भोजनगृहात आमच्या गटाची देखरेख ज्याच्याकडे होती त्या पाळकानं मला दोन मिनटं थांबायला सांगितलं, कारण त्याला मला काहीतरी सांगायचं होतं. त्यानं मला जे सांगितलं ते ऐकून तर मी सुन्न झालो. त्यानं उघडरीत्या मला सांगितलं, की त्याला माझ्याशी संग करायचा होता! मी त्याला तात्काळ नकार दिला; मी अगदी निराश झालो. याविषयी मी घरच्यांना कळवलं आणि काही महिन्यातच सेमिनरी सोडून दिली; पण माझ्या घरच्यांना हे आवडलं नाही. मी गावातच राहू लागलो आणि दुसऱ्या व्यवसायाचा अभ्यास करू लागलो.
“सेंट मार्कला परतल्यावर, कॅथलिक चर्चवरील माझा भरवसा पूर्णपणे उडाला होता. मला देवाची सेवा करायची होती, पण कशी करावी हे मला समजत नव्हतं. मी ॲडव्हेंटिस्ट चर्चला गेलो, एबनेझर चर्चला गेलो, मॉरमॉन चर्चला गेलो. आधात्मिकरीत्या मला नीट मार्गदर्शन मिळत नव्हतं.
“एके दिवशी मला आठवले, की बेल्जियममध्ये सेमिनरीत असताना मी क्रॅम्पॉन बायबल भाषांतर वाचायचो. त्यात मला देवाचे नाव आढळून आले होते. मग ते नाव घेऊन मी देवाला कळकळीने प्रार्थना करू लागलो की खरा धर्म सापडण्यास मला मदत कर.
“त्यानंतर काही दिवसांतच, यहोवाचे साक्षीदार असलेल्या दोन स्त्रिया आमच्या घराशेजारी राहायला आल्या. त्या शांत, आदरणीय आणि शालीन होत्या. त्यांची जीवनशैली पाहून मी प्रभावीत झालो. एकदा, त्यांच्यापैकी एकीने मला ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मरणोत्सवाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. मला ती सभा खूपच आवडली आणि साक्षीदारांबरोबर बायबलचा नियमितरीत्या अभ्यास करण्याची मी तयारी दर्शवली. सहा महिन्यातच माझी खात्री पटली की मला देवाची सेवा करण्याचा उचित मार्ग सापडला होता. मी यहोवाला माझे जीवन समर्पित करून नोव्हेंबर २०, १९८८ रोजी बाप्तिस्मा घेतला.”
कालांतराने, विलनर यांनी पूर्ण-वेळची सेवा सुरू केली. आज ते मंडळीत वडील यानात्याने कार्य करत आहेत. आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत ते मंडळीत आनंदाने सेवा करत आहेत.
[९ पानांवरील चित्र]
बायबल वाचल्यावर विलनर यांना देवाचे नाव यहोवा आहे हे समजले