व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहा

स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहा

स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहा

“हे देवा, माझे अंत:करण स्थिर आहे माझे अंतकरण स्थिर आहे.”—स्तोत्र ५७:७.

१. आपण दाविदासारखाच आत्मविश्‍वास का बाळगू शकतो?

यहोवा आपल्याला ख्रिस्ती विश्‍वासात स्थिर करू शकतो जेणेकरून त्याचे समर्पित सेवक या नात्याने आपण खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाला जडून राहू शकू. (रोमकर १४:४) त्यामुळे आपणही स्तोत्रकर्त्या दाविदाप्रमाणेच आत्मविश्‍वासाने असे म्हणू शकतो की, “हे देवा, माझे मन स्थिर आहे.” (स्तोत्र १०८:१) आपले अंतःकरण स्थिर असल्यास आपण आपोआपच देवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्यास प्रवृत्त होऊ. आणि त्याच्याच मार्गदर्शनावर व सामर्थ्यावर विसंबून राहिल्याने आपण सचोटीने चालणारे या नात्याने आपल्या निर्धारात आणि विश्‍वासात अढळ आणि खंबीर तसेच, “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” राहू शकू.—१ करिंथकर १५:५८.

२, ३. पौलाने १ करिंथकर १६:१३ येथे दिलेल्या प्रोत्साहनात्मक आदेशांचा काय अर्थ होतो?

प्राचीन करिंथ शहरातील येशूच्या अनुयायांना प्रोत्साहनात्मक आदेश देताना प्रेषित पौलाने म्हटले: “सावध असा, विश्‍वासात स्थिर राहा; मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.” हे आदेश सध्याच्या काळातील ख्रिस्ती लोकांनाही निश्‍चितच लागू होतात. (१ करिंथकर १६:१३) ग्रीक भाषेत हे सर्व आदेश वर्तमान काळात आहेत, त्याअर्थी ते सातत्याने कार्य करत राहण्याचे प्रोत्साहन देतात. या सल्ल्याचा काय अर्थ आहे?

दियाबलाचा विरोध करण्याद्वारे आणि देवाच्या जवळ राहण्याद्वारे आपण आध्यात्मिकरित्या ‘सावध राहू शकतो.’ (याकोब ४:७, ८) यहोवावर विसंबून राहिल्यामुळे आपली एकता कायम राहते आणि ‘ख्रिस्ती विश्‍वासात स्थिर राहण्यास’ आपल्याला मदत मिळते. आपण—ज्यात आपल्या कित्येक भगिनी देखील सामील आहेत—निर्भयतेने राज्याची घोषणा करण्याद्वारे ‘मर्दासारखे वागतो.’ (स्तोत्र ६८:११) आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सामर्थ्याकरता आपण सतत त्याचीच आस धरतो आणि त्याद्वारे आपण ‘खंबीर होतो.’—फिलिप्पैकर ४:१३.

४. ख्रिस्ती या नात्याने बाप्तिस्मा घेण्याआधी आपण काय काय केले?

आपण यहोवाला विनाशर्त समर्पण केले आणि पाण्यात डुंबून बाप्तिस्मा घेण्याद्वारे ते जाहीर केले तेव्हाच आपण खरा विश्‍वास स्वीकारला आहे असे दाखवले. पण बाप्तिस्मा घेण्याआधी आपण काय काय केले? सर्वप्रथम आपण देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेतले. (योहान १७:३, NW) यामुळे आपल्यात विश्‍वास उत्पन्‍न झाला आणि आपण आपल्या पूर्वीच्या दुर्वर्तनाविषयी मनापासून खेद व्यक्‍त करून पश्‍चात्ताप करण्यास प्रवृत्त झालो. (प्रेषितांची कृत्ये ३:१९; इब्री लोकांस ११:६) यानंतर आपण परिवर्तन केले, अर्थात देवाच्या इच्छेनुसार सतत चालण्याकरता आपण पूर्वी करत असलेल्या चुकीच्या प्रथा व सवयींपासून मागे फिरलो. (रोमकर १२:२; इफिसकर ४:२३, २४) यानंतर आपण प्रार्थनेत यहोवाला मनःपूर्वक समर्पण केले. (मत्तय १६:२४; १ पेत्र २:२१) आपण देवाकडे चांगल्या विवेकाची याचना केली आणि त्याला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. (१ पेत्र ३:२१) ही पावले आठवणीत ठेवल्यास आपण सतत आपल्या समर्पणानुसार जगत राहण्याचा आणि स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहण्याचा निर्धार कायम ठेवू शकतो.

अचूक ज्ञान घेत राहा

५. सातत्याने बायबलचे ज्ञान घेत राहणे का महत्त्वाचे आहे?

देवाला केलेली समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता आपण आपल्या विश्‍वासाला पुष्टी देणारे बायबलचे ज्ञान सातत्याने घेत राहिले पाहिजे. आपल्याला देवाचे सत्य पहिल्यांदा समजले तेव्हा आध्यात्मिक अन्‍न घेण्यास आपल्याला किती आनंद वाटायचा! (मत्तय २४:४५-४७) ते आध्यात्मिक “भोजन” आपल्याला अत्यंत रुचकर वाटायचे आणि त्यामुळे आपल्याला उत्तम आध्यात्मिक पोषण मिळाले. पण हे पोषक आध्यात्मिक अन्‍न सातत्याने आत्मसात करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आपल्याला स्थिर अंतःकरण राखता येईल.

६. बायबलच्या सत्याविषयी मनःपूर्वक कृतज्ञता उत्पन्‍न करण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे मदत करण्यात आली असेल?

बायबलचे अधिक ज्ञान मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. हे गुप्त धनाचा शोध घेण्यासारखे आहे—अर्थात हे मेहनतीचे काम आहे. पण “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त होणे हे किती मोठे प्रतिफळ आहे! (नीतिसूत्रे २:१-६) एखाद्या राज्य प्रचारकाने पहिल्यांदा तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास केला तेव्हा त्याने किंवा तिने सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा उपयोग केला असेल. प्रत्येक अध्याय पूर्ण करण्यास बराच वेळ लागला असेल, कदाचित एकापेक्षा अधिक आठवडेही लागले असतील. अध्यायात उल्लेख केलेली वचने वाचून त्यावर चर्चा केल्यामुळे तुम्हाला फायदा झाला असेल. एखादा मुद्दा समजायला कठीण वाटल्यास तो स्पष्ट करण्यात आला असेल. तुमचा बायबल अभ्यास घेणारा उत्तम तयारी करत असेल, देवाच्या आत्म्याकरता प्रार्थना करत असेल आणि त्याने तुम्हाला सत्याविषयी मनःपूर्वक कृतज्ञता बाळगण्यास मदत केली असेल.

७. एक व्यक्‍ती देवाचे सत्य इतरांना शिकवण्यास केव्हा योग्य बनते?

हे सर्व प्रयत्न योग्यच होते कारण पौलाने लिहिले: “ज्याला वचनाचे [“तोंडी,” NW] शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.” (गलतीकर ६:६) ग्रीक भाषेत या वचनातून असे सूचित होते की ज्याला ‘तोंडी शिक्षण मिळाले आहे’ त्याच्या मनात व अंतःकरणात देवाच्या वचनातील शिकवणुकी बिंबवण्यात आल्या आहेत. त्याअर्थी, तुम्ही देखील इतर लोकांना शिकवण्यास योग्य आहात. (प्रेषितांची कृत्ये १८:२५) आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा विश्‍वासूपणे पूर्ण करण्याकरता तुम्ही देवाच्या वचनाचा सातत्याने अभ्यास करण्याद्वारे आपले आध्यात्मिक आरोग्य आणि स्थैर्य कायम राखले पाहिजे.—१ तीमथ्य ४:१३; तीत १:१३; २:२.

आपल्या पश्‍चात्तापाची व परिवर्तनाची आठवण ठेवा

८. नीतिमान आचरण राखणे कसे शक्य आहे?

तुम्हाला सत्य समजले आणि तुम्ही पश्‍चात्ताप केला तेव्हा येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर देवाची क्षमा मिळाल्याची जाणीव झाल्याचे तुम्हाला आठवते का? (स्तोत्र ३२:१-५; रोमकर ५:८; १ पेत्र ३:१८) निश्‍चितच तुम्हाला पूर्वीच्या पापी जीवनाकडे परतण्याची इच्छा नसेल. (२ पेत्र २:२०-२२) इतर गोष्टींसोबत, यहोवाला नियमित प्रार्थना केल्यास तुम्हाला नीतिमान आचरण राखण्यास, आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यास आणि विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहण्यास मदत मिळेल.—२ पेत्र ३:११, १२.

९. पापमय वर्तनापासून मागे फिरल्यानंतर आपण कोणता मार्ग धरला पाहिजे?

पापपूर्ण प्रथा व सवयींपासून मागे फिरून परिवर्तन केल्यानंतर तुमचे अंतःकरण पुढेही स्थिर राहावे म्हणून देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करत राहा. असे समजा, की तुम्ही एका चुकीच्या रस्त्यावरून जात होता, पण विश्‍वासार्ह नकाशा पाहिल्यावर तुम्ही योग्य रस्ता धरला. आता पुन्हा वाट चुकता कामा नये. देवाच्या मार्गदर्शनावर नेहमी अवलंबून राहा आणि जीवनाच्या मार्गावर चालत राहण्याचा निर्धार कायम ठेवा.—यशया ३०:२०, २१; मत्तय ७:१३, १४.

आपले समर्पण व बाप्तिस्मा कधीही विसरू नका

१०. देवाला केलेल्या समर्पणासंबंधी आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

१० तुम्ही यहोवाला प्रार्थनेत समर्पण करून सर्वकाळ त्याची विश्‍वासूपणे सेवा करण्याची प्रतिज्ञा केली हे विसरू नका. (यहूदा २०, २१) समर्पणाचा अर्थ एका पवित्र उद्देशाकरता राखून ठेवणे अथवा वेगळे करणे. (लेवीय १५:३१; २२:२) तुमचे समर्पण तात्पुरत्या ठरावाप्रमाणे किंवा दुसऱ्‍या मनुष्याप्रती असलेल्या वचनबद्धतेप्रमाणे नाही. ते विश्‍वाच्या सार्वभौम शासकाला केलेले कायमस्वरूपी समर्पण होते आणि ते पूर्ण करण्याकरता देवाला आजीवन एकनिष्ठ राहणे आवश्‍यक आहे. होय, आपण “जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो.” (रोमकर १४:७, ८) आपण देवाच्या इच्छेला अधीन होऊन स्थिर अंतःकरणाने त्याची सेवा करतो किंवा नाही यावर आपले आनंदी राहणे अवलंबून आहे.

११. तुमचा बाप्तिस्मा आणि त्याची अर्थसूचकता तुम्ही नेहमी आठवणीत का ठेवली पाहिजे?

११ देवाला केलेल्या मनःपूर्वक समर्पणाला सूचित करणाऱ्‍या बाप्तिस्म्याची नेहमी आठवण असू द्या. तुम्हाला बळजबरीने बाप्तिस्मा देण्यात आला नाही कारण तुम्ही स्वतःहून तो निर्णय घेतला. आता तुमच्या उरलेल्या जीवनात तुमची स्वतःची इच्छा सदैव देवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत ठेवण्याचा तुम्ही निर्धार केला आहे का? तुम्ही देवाकडे चांगला विवेक देण्याची याचना केली आणि त्याला केलेल्या समर्पणाला सूचित करण्याकरता बाप्तिस्मा घेतला. आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याद्वारे तो चांगला विवेक जपा; यहोवाचे समृद्ध आशीर्वाद निश्‍चितच तुमच्यावर राहतील.—नीतिसूत्रे १०:२२.

तुमच्या इच्छाशक्‍तीची भूमिका

१२, १३. आपली स्वतःची इच्छाशक्‍ती समर्पण व बाप्तिस्म्याशी कशाप्रकारे संबंधित आहे?

१२ समर्पण व बाप्तिस्मा यामुळे सबंध जगातील लाखो लोकांना अनेक आशीर्वाद लाभले आहेत. आपण देवाला केलेले समर्पण चिन्हित करण्याकरता पाण्याचा बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या संदर्भात आपण जणू मृतवत होतो पण आपल्या इच्छाशक्‍तीच्या संबंधाने नाही. योग्यरित्या शिक्षण मिळालेल्या व सत्य मानणाऱ्‍यांप्रमाणे आपण स्वतःच्याच इच्छाशक्‍तीचा उपयोग करून देवाला प्रार्थनेत समर्पण केले आणि बाप्तिस्मा घेतला. समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याकरता देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेणे आणि ती पूर्ण करण्याचा स्वेच्छेने निर्णय घेणे आवश्‍यक आहे. (इफिसकर ५:१७) अशारितीने आपण येशूचे अनुकरण करतो; त्याने देखील आपल्या इच्छाशक्‍तीचा उपयोग करून सुताराचे काम करण्याचे सोडून दिले, बाप्तिस्मा घेतला आणि आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार वागण्याकरता स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.—स्तोत्र ४०:७, ८; योहान ६:३८-४०.

१३ यहोवा देवाच्या उद्देशानुसार त्याच्या पुत्राला “दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण” व्हावे लागणार होते. त्यामुळे आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षा विश्‍वासूपणे सहन करण्याकरता येशूला आपल्या इच्छाशक्‍तीचा उपयोग करावा लागला. म्हणूनच त्याने “मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्री लोकांस २:१०, १८; ५:७, ८) आपणही देवाप्रती अशाचप्रकारचे श्रद्धापूर्ण भय बाळगले तर आपल्या प्रार्थना देखील नक्कीच ‘ऐकल्या जातील’ आणि आपण आत्मविश्‍वास बाळगू शकतो की यहोवा आपल्याला त्याचे समर्पित साक्षीदार या नात्याने स्थिर होण्यास मदत करेल.—यशया ४३:१०.

तुम्ही स्थिर अंतःकरण राखू शकता

१४. आपण दररोज बायबल का वाचले पाहिजे?

१४ स्थिर अंतःकरण राखून देवाप्रती आपले समर्पण पूर्ण करण्याकरता तुम्हाला कशामुळे मदत मिळेल? देवाच्या वचनाचे सतत वाढत जाणारे ज्ञान आत्मसात करण्याकरता बायबलचे दररोज वाचन करा. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला असे करण्याचे सतत प्रोत्साहन देत असतात. आपले समर्पण पूर्ण करण्याकरता देवाच्या सत्यात चालत राहणे आवश्‍यक असल्यामुळे अशाप्रकारचे मार्गदर्शन वारंवार दिले जाते. जर यहोवाच्या संस्थेने जाणूनबुजून खोट्या शिकवणुकी स्वीकारल्या असत्या तर यहोवाच्या साक्षीदारांना आणि ज्यांना आपण प्रचार करतो त्या लोकांना बायबल वाचण्याचा सल्ला कधीही देण्यात आला नसता.

१५. (अ) निर्णय घेताना कशाचा विचार केला पाहिजे? (ब) प्रापंचिक काम हे ख्रिस्ती व्यक्‍तीच्या जीवनात दुय्यम स्थानी आहे असे का म्हणता येते?

१५ कोणताही निर्णय घेताना, यहोवाला तुम्ही केलेले समर्पण पूर्ण करण्यास हा निर्णय मदत करेल किंवा नाही याचा अवश्‍य विचार करा. कदाचित हा निर्णय तुमच्या प्रापंचिक कामासंबंधाने असेल. तुमच्या कामामुळे तुम्हाला खऱ्‍या उपासनेत प्रगती करण्यास मदत होईल यादृष्टीने तुम्ही प्रयत्न करता का? समर्पित ख्रिस्ती विश्‍वासार्ह आणि कार्यक्षम असल्याचे बऱ्‍याच अधिकाऱ्‍यांना दिसून आले असले तरीसुद्धा त्यांना असेही आढळते की यहोवाचे साक्षीदार जगात नाव कमावण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले किंवा सर्वात चांगल्या पदासाठी इतरांशी स्पर्धा करणारे नसतात. याचे कारण की पैसा, नाव, प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवणे हे साक्षीदारांचे ध्येय नाही. जे देवाला केलेल्या समर्पणानुसार जगत आहेत त्यांच्याकरता देवाची इच्छा पूर्ण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यापुरती मदत करणारी नोकरी त्यांच्याकरता दुय्यम स्थानी आहे. प्रेषित पौलाप्रमाणे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम ख्रिस्ती सेवाकार्य हेच आहे. (प्रेषितांची कृत्ये १८:३, ४; २ थेस्सलनीकाकर ३:७, ८; १ तीमथ्य ५:८) राज्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना तुम्ही जीवनात प्राधान्य देता का?—मत्तय ६:२५-३३.

१६. अनावश्‍यक काळजीमुळे, जर आपल्याला देवाला केलेल्या समर्पणानुसार जगणे कठीण वाटू लागले असेल तर आपण काय करू शकतो?

१६ सत्य मिळण्याआधी काही व्यक्‍ती जीवनातील वेगवेगळ्या चिंतांमुळे अगदी बेजार झाल्या होत्या. पण त्यांनी राज्याची आशा स्वीकारली तेव्हा त्यांचे हृदय आनंदाने, कृतज्ञतेने देवाबद्दलच्या प्रीतीने भरून गेले! तेव्हापासून त्यांना मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल विचार केल्यामुळे त्यांना यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगण्यास निश्‍चितच मदत होऊ शकते. दुसरीकडे पाहता, काटेरी झाडांमध्ये पडलेल्या बियांची वाढ खुंटते त्याप्रमाणेच, या व्यवस्थीकरणात सर्वसामान्य असलेल्या समस्यांची अनावश्‍यक चिंता केल्यामुळे ‘देवाच्या वचनाची’ वाढ खुंटण्याचा धोका असल्यास काय? (लूक ८:७, ११, १४; मत्तय १३:२२; मार्क ४:१८, १९) तुमच्याविषयी किंवा तुमच्या कुटुंबियांविषयी असे घडत आहे असे तुम्हाला जाणवल्यास आपल्या सर्व चिंता यहोवावर सोपवून द्या आणि अधिक मनःपूर्वक प्रीती व कृतज्ञता बाळगता यावी म्हणून त्याच्याकडे मदतीकरता प्रार्थना करा. त्याच्यावर आपला भार टाकल्यास तो तुम्हाला सांभाळेल आणि त्याची सेवा आनंदाने आणि स्थिर अंतःकरणाने करण्यास साहाय्य करेल.—स्तोत्र ५५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७; प्रकटीकरण २:४.

१७. कठीण परीक्षांना कशाप्रकारे तोंड देणे शक्य आहे?

१७ समर्पण करताना तुम्ही प्रार्थना केली त्याप्रमाणे यहोवा देवाला नियमितपणे प्रार्थना करत राहा. (स्तोत्र ६५:२) चुकीचे पाऊल उचलण्याचा मोह होतो किंवा एखादी कठीण परीक्षा तुमच्यासमोर येते तेव्हा देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार वागा. विश्‍वासाची आवश्‍यकता लक्षात असू द्या कारण शिष्य याकोबाने लिहिले: “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्‍वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.” (याकोब १:५-८) जर एखादी परीक्षा खूपच कठीण वाटू लागली तरीसुद्धा आपण याची खात्री बाळगू शकतो: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.

१८. जर एखादे गंभीर गुप्त पाप, यहोवाला केलेले समर्पण पूर्ण करण्यात अडखळण बनत असेल तर आपण काय करू शकतो?

१८ एखाद्या गंभीर पापामुळे तुमचा विवेक बोचत असेल आणि आपल्या समर्पणाला जागण्याचा तुमचा निर्धार दुर्बल करत असेल तर तुम्ही काय करावे? पश्‍चात्ताप केल्यास, तुम्ही हे जाणून सांत्वन मिळवू शकता की यहोवा ‘भग्न व अनुतप्त हृदय तुच्छ मानणार नाही.’ (स्तोत्र ५१:१७) प्रेमळ ख्रिस्ती वडिलांची मदत घ्या, आणि खात्री बाळगा की ते यहोवाचे अनुकरण करतील आणि तुमच्या स्वर्गीय पित्यासोबत चांगला नातेसंबंध पुन्हा मिळवण्याच्या तुमच्या इच्छेला तुच्छ लेखणार नाहीत. (स्तोत्र १०३:१०-१४; याकोब ५:१३-१५) मग पुन्हा एकवार आध्यात्मिक ताकद आणि स्थिर अंतःकरण परत मिळवल्यावर तुम्ही आपल्या पायांसाठी सरळ वाटा तयार करू शकाल आणि देवाला केलेले समर्पण पूर्ण करणे शक्य आहे हे तुम्हाला कळून येईल.—इब्री लोकांस १२:१२, १३.

स्थिर अंतःकरणाने सेवा करत राहा

१९, २०. आपण केलेल्या समर्पणाची आठवण ठेवून नेहमी चालत राहणे का महत्त्वाचे आहे?

१९ या कठीण काळांत आपण आपल्या समर्पणाला जागण्याचा कसोशीने प्रयत्न करून स्थिर अंतःकरणाने देवाची सेवा करत राहिली पाहिजे. येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) आपण ‘शेवटल्या काळात’ जगत असल्यामुळे अंत कोणत्याही वेळी येऊ शकतो. (२ तीमथ्य ३:१) शिवाय उद्या आपण जिवंत असू किंवा नाही याची आपल्यापैकी कोणालाही खात्री नाही. (याकोब ४:१३, १४) त्यामुळे आपण आजच आपल्या समर्पणानुसार जगत राहणे महत्त्वाचे आहे!

२० प्रेषित पेत्राने आपल्या दुसऱ्‍या पत्रात यावर जोर दिला. त्याने हे स्पष्ट केले की ज्याप्रमाणे जलप्रलयात अधार्मिक लोकांचा नाश झाला त्याचप्रमाणे ‘यहोवाचा दिवस’ येईल तेव्हा लाक्षणिक पृथ्वीचा, अर्थात दुष्ट मानवी समाजाचा नाश होईल. म्हणूनच पेत्राने म्हटले: “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” त्याने त्यांना असेही प्रोत्साहन दिले: “प्रियजनहो, ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहांत सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.” (२ पेत्र ३:५-१७) बाप्तिस्मा झालेली एखादी व्यक्‍ती पथभ्रष्ट झाली आणि स्थिर अंतःकरण कायम ठेवण्यात अपयशी झालेल्या स्थितीत तिचा मृत्यू झाला तर किती दुःखाची गोष्ट ठरेल!

२१, २२. स्तोत्र ५७:७ येथील शब्द दाविदाच्या आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत कशाप्रकारे पूर्ण झाले आहेत?

२१ तुम्ही तुमच्या बाप्तिस्म्याचा आनंदी दिवस नेहमी आठवणीत ठेवला आणि तुमच्या वागण्याबोलण्याने यहोवाचे हृदय आनंदित व्हावे म्हणून त्याला मदत मागितली तर निश्‍चितच तुमच्या समर्पणानुसार जगण्याचा तुमचा निर्धार अधिक पक्का होईल. (नीतिसूत्रे २७:११) यहोवा कधीही त्याच्या लोकांना निराश करत नाही आणि निश्‍चितच आपणही त्याला विश्‍वासू राहिले पाहिजे. (स्तोत्र ९४:१४) शत्रूंच्या दुष्ट योजना निष्फळ करून दाविदाला त्यांच्या हातून सोडवण्याद्वारे यहोवाने दया व सहानुभूती दाखवली. याकरता कृतज्ञ असणाऱ्‍या दाविदाने आपल्या तारणकर्त्यावर असलेले दृढ व अढळ प्रेम व्यक्‍त केले. त्याने एका भजनात कळकळीने म्हटले: “हे देवा, माझे अत:करण स्थिर आहे माझे अंतकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन.”—स्तोत्र ५७:७.

२२ दाविदाप्रमाणे खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देवाप्रती आपली श्रद्धा व भक्‍ती ढळू दिलेली नाही. स्थिर अंतःकरणाने ते आपल्या तारणाचे व संरक्षणाचे श्रेय यहोवाला देतात आणि त्याला आनंदाने स्तुतीगीते गातात. तुमचे अंतःकरण स्थिर असल्यास ते देवावर विसंबून राहील आणि त्याच्या मदतीने तुम्ही आपले समर्पण पूर्ण करू शकाल. होय तुम्ही त्या ‘नीतिमानासारखे’ ठराल जो “वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्‍वरावर भाव ठेवून अढळ [स्थिर] राहते.” (स्तोत्र ११२:६, ७) देवावर विश्‍वास ठेवून आणि त्याच्यावरच पूर्णपणे विसंबून राहण्याद्वारे तुम्ही आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करू शकता आणि स्थिर अंतःकरणाने सतत यहोवाची सेवा करू शकता.

तुम्हाला आठवते का?

• आपण सातत्याने बायबलचे अचूक ज्ञान का घेत राहिले पाहिजे?

• आपण केलेल्या पश्‍चात्तापाची आणि परिवर्तनाची आठवण ठेवणे का महत्त्वाचे आहे?

• आपल्या समर्पणाची आणि बाप्तिस्म्याची आठवण ठेवून चालल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

• स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्याकरता आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती सेवाकार्याला आपल्या जीवनातील प्रमुख कार्य बनवण्याद्वारे, स्थिर अंतःकरणाने यहोवाची सेवा करत राहण्यास साहाय्य मिळेल

[१८ पानांवरील चित्र]

देवाच्या वचनाचे सातत्याने वाचन करून तुम्ही आपले आध्यात्मिक आरोग्य राखत आहात का?