व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे नियम आपल्या हिताचे आहेत

देवाचे नियम आपल्या हिताचे आहेत

देवाचे नियम आपल्या हिताचे आहेत

“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”—स्तोत्र ११९:९७.

१. देवाच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी आजकालच्या लोकांची कशी वृत्ती आहे?

देवाचे नियम पाळण्याची कल्पना आजकालच्या लोकांना रुचत नाही. बऱ्‍याच लोकांच्या मते डोळ्यांनी न दिसणाऱ्‍या श्रेष्ठ अधिकाराच्या अधीन राहणे अर्थहीन आहे. आपला हा काळ नैतिक सापेक्षतेचा आहे, योग्य आणि अयोग्य यांतील भेद अस्पष्ट झाले आहेत आणि नैतिक संदिग्धता वाढत चालली आहे. (नीतिसूत्रे १७:१५; यशया ५:२०) अलीकडेच घेतलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की “बहुतेक अमेरिकन लोक योग्य, चांगले, आणि अर्थपूर्ण काय हे स्वतः ठरवणे पसंत करतात.” अनेक धर्मनिरपेक्ष समाजांतल्या लोकांचीही अशीच विचारसरणी आहे. त्यांना “कडक देव नको. कडक नियम नकोत. आणि नैतिक किंवा इतर बाबतीत खंबीर मते असलेले कडक अधिकारी नकोत.” एका समाज विश्‍लेषकाने असे निरीक्षण केले की आजकाल “चांगले आणि सात्विक आचरण म्हणजे काय हे लोकांनी स्वतः ठरवावे अशी अपेक्षा केली जाते.” त्याने पुढे म्हटले: “कोणत्याही प्रकारच्या श्रेष्ठ अधिकारालाच वास्तविक लोकांच्या गरजांनुरूप आपले कायदेकानून जुळवून घ्यावे लागतात.”

२. बायबलमध्ये नियमाचा पहिला उल्लेख देवाच्या आशीर्वादांशी आणि त्याच्या कृपेशी कशाप्रकारे निगडित आहे?

बरेच लोक यहोवाच्या नियमांच्या महत्त्वाविषयी साशंक असल्यामुळे, त्याचे कायदेकानून आपल्या हिताचे आहेत याविषयी आपण आपला विश्‍वास बळकट करणे गरजेचे आहे. बायबलमध्ये सर्वप्रथम, नियम हा शब्द कोठे आढळतो हे तुम्हाला माहीत आहे का? देवाने काय म्हटले ते आपण उत्पत्ति २६:५ येथे वाचू शकतो: “अब्राहामाने . . . माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळिले.” यहोवाने अब्राहामच्या वंशजांना एक सविस्तर नियमशास्त्र दिले त्याच्या कित्येक शतकांआधी यहोवाने हे शब्द उच्चारले होते. अब्राहामने देवाच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळल्यामुळे देवाने त्याला कोणते प्रतिफळ दिले? यहोवा देवाने अशी प्रतिज्ञा केली: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१८) त्याअर्थी देवाचे नियम त्याच्या आशीर्वादाशी आणि कृपेशी निगडित आहेत हे आपल्याला समजून येते.

३. (अ) एका स्तोत्रकर्त्याने यहोवाच्या नियमाविषयी कोणती भावना व्यक्‍त केली? (ब) कोणते प्रश्‍न लक्ष देण्याजोगे आहेत?

स्तोत्रकर्त्यांपैकी एकाने (बहुधा हा यहुदाचा राजकुमार आणि भावी राजा असावा) नियमांच्या संबंधाने क्वचितच व्यक्‍त केली जाणारी भावना व्यक्‍त केली. त्याने देवाला मनापासून म्हटले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र ११९:९७) हे निव्वळ भावनेच्या भरात काढलेले उद्‌गार नव्हते. तर देवाच्या नियमांतून व्यक्‍त होणाऱ्‍या त्याच्या इच्छेविषयी स्तोत्रकर्त्याने मनःपूर्वक प्रेम व्यक्‍त केले. देवाचा परिपूर्ण पुत्र, येशू ख्रिस्त यानेही अशाचप्रकारच्या भावना व्यक्‍त केल्या. भविष्यवाणीत, येशू असे म्हणत असल्याचे वर्णन करण्यात आले होते: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:९) आपल्याविषयी काय? देवाची इच्छा पूर्ण करण्यास आपल्याला आनंद वाटतो का? यहोवाचे नियम आपल्या उपयोगाचे आणि हिताचे आहेत असा पक्का विश्‍वास आपल्याला आहे का? आपल्या उपासनेत, दैनंदिन जीवनात, निर्णय घेताना आणि इतरांशी व्यवहार करताना आपण देवाच्या नियमांना प्राधान्य देतो का? देवाच्या नियमांवर प्रीती करण्यासाठी आधी हे चांगल्याप्रकारे जाणून घेणे आवश्‍यक आहे की देवाला हे नियम बनवण्याचा आणि ते आपल्याला देण्याचा अधिकार का आहे.

यहोवाला नियम लावून देण्याचा अधिकार आहे

४. नियम देण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार यहोवालाच का आहे?

निर्माणकर्ता या नात्याने सबंध विश्‍वात यहोवालाच एकमेवपणे नियम देण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. (प्रकटीकरण ४:११) संदेष्टा यशया याने म्हटले: “यहोवा आमचा नियमकर्ता आहे.” (यशया ३३:२२, पं.र.भा.) त्याने सजीव आणि निर्जीव सृष्टीला नियंत्रित करणारे काही भौतिक नियम निश्‍चित केले आहेत. (ईयोब ३८:४-३८; ३९:१-१२; स्तोत्र १०४:५-१९) मनुष्य हा देवाची सृष्टी असल्यामुळे तो देखील यहोवाच्या भौतिक नियमांच्या अधीन आहे. अर्थात त्याच्याठायी इच्छा स्वातंत्र्य तसेच तर्कबुद्धीचा वापर करण्याची क्षमता आहे; पण त्याने स्वतःला देवाच्या नैतिक आणि आध्यात्मिक नियमांच्या स्वाधीन केले तरच तो आनंदी राहू शकतो.—रोमकर १२:१; १ करिंथकर २:१४-१६.

५. गलतीकर ६:७ येथे दिलेले तत्त्व देवाच्या नियमांच्या बाबतीत कशाप्रकारे खरे ठरते?

यहोवाच्या भौतिक नियमांविरुद्ध आपल्याला जाता येत नाही याची आपल्याला कल्पना आहे. (यिर्मया ३३:२०, २१) जर कोणी एखाद्या भौतिक नियमाच्या—उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरोधात जायचे ठरवलेच तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचप्रकारे, देवाचे नैतिक नियम देखील अटळ आहेत; त्यांना चुकवण्याचा अथवा ते भंग करण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षा ठरलेली आहे. भौतिक नियमांचा भंग केल्यामुळे ज्याप्रमाणे लगेच परिणाम भोगावा लागतो त्याप्रमाणे या बाबतीत नेहमीच घडत नसले तरीसुद्धा आज न उद्या तो भोगावाच लागतो. “देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७; १ तीमथ्य ५:२४.

यहोवाच्या नियमशास्त्राचा अवाका

६. देवाचे नियम किती व्यापक आहेत?

देवाच्या नियमांचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे मोशेचे नियमशास्त्र. (रोमकर ७:१२) कालांतराने यहोवा देवाने नियमशास्त्राच्या जागी “ख्रिस्ताचा नियम” दिला. * (गलतीकर ६:२; १ करिंथकर ९:२१) ख्रिस्ती या नात्याने आपण ‘स्वातंत्र्याच्या या परिपूर्ण नियमांच्या’ अधीन आहोत; आणि त्यामुळे आपल्याला जाणीव आहे की देवाचे कायदेकानून हे धार्मिक विश्‍वास किंवा औपचारिक विधी यांसारख्या जीवनाच्या विशिष्ट क्षेत्रांपुरतेच मर्यादित नाहीत. त्याचे आदर्श आपल्या जीवनाच्या एकूण एक गोष्टीला लागू होतात; उदाहरणार्थ, कौटुंबिक बाबी, पैशाचे व्यवहार, विरुद्धलिंगी व्यक्‍तींशी आपली वागणूक, ख्रिस्ती बांधवांबद्दल आपली वृत्ती आणि खऱ्‍या उपासनेतील आपला सहभाग.—याकोब १:२५, २७.

७. देवाच्या काही महत्त्वपूर्ण नियमांची उदाहरणे द्या.

उदाहरणार्थ, बायबल म्हणते: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) होय जारकर्म आणि व्यभिचार केवळ “प्रेम प्रकरणे” नाहीत. समलिंगी संभोग ही फक्‍त एक “पर्यायी जीवनशैली” नाही. हा यहोवाच्या नियमांचा भंग आहे. तसेच, चोरी, लबाडी, चहाडी करण्याद्वारेही यहोवाच्या नियमांचा भंग होतो. (स्तोत्र १०१:५; कलस्सैकर ३:९; १ पेत्र ४:१५) याकोबाने फुशारकी मारणाऱ्‍यांना दोषी ठरवले आणि पौलाने आपल्याला बाष्कळ गोष्टी आणि टवाळी न करण्याविषयी ताकीद दिली. (इफिसकर ५:४; याकोब ४:१६) सर्व ख्रिश्‍चनांकरता आचरणासंबंधी असलेले हे सर्व नियम देवाच्या परिपूर्ण नियमात अंतर्भूत आहेत.—स्तोत्र १९:७.

८. (अ) यहोवाचे नियम कशाप्रकारचे आहेत? (ब) “नियम” असे भाषांतरीत केलेल्या मूळ इब्री शब्दाचा काय अर्थ होतो?

यहोवाच्या वचनातील या मूलभूत आज्ञांवरून हेच दिसून येते की त्याचे नियम म्हणजे केवळ कोरड्या, न्यायनिष्ठूर कायद्यांची यादी नाही. तर ते एका संतुलित, फलदायी जीवनाचा आधार आहेत आणि या नियमांचा आपल्या आचरणाच्या सर्व पैलूंवर चांगला परिणाम होतो. देवाचे नियम उभारणीकारक, नीतिशुद्ध आणि उद्‌बोधक आहेत. (स्तोत्र ११९:७२) स्तोत्रकर्त्याने उपयोग केलेला “नियम” हा शब्द तोराह या इब्री शब्दावरून भाषांतरित करण्यात आला आहे. एका बायबल अभ्यासकानुसार: “हा शब्द एका क्रियापदावरून बनवण्यात आला आहे ज्याचा अर्थ दिशा दाखवणे, मार्गदर्शित करणे, निशाण धरणे, पुढे नेम मारणे असा होतो. त्याअर्थी या शब्दाचा . . . अर्थ आचरणाचा नियम असा होतो.” स्तोत्रकर्त्याच्या दृष्टीने नियमशास्त्र म्हणजे देवाची एक देणगी होती. आपणही देवाच्या नियमांबद्दल मनस्वी कदर बाळगून त्यांना आपल्या जीवनाला आकार देण्यास अनुमती देऊ नये का?

९, १०. (अ) आपल्याला विश्‍वासार्ह मार्गदर्शनाची गरज का आहे? (ब) आनंदी व सफल जीवन जगण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे?

यहोवाने निर्माण केलेल्या सर्वांना विश्‍वासार्ह मार्गदर्शनाची गरज आहे. हे मानवांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या येशूच्या बाबतीत व देवदूतांच्या बाबतीतही खरे आहे. (स्तोत्र ८:५; योहान ५:३०; ६:३८; इब्री लोकांस २:७; प्रकटीकरण २२:८, ९) जर या परिपूर्ण व्यक्‍तींना देवाच्या मार्गदर्शनामुळे फायदा होतो तर मग अपरिपूर्ण मानवांना किती जास्त पटीने होईल! मानवी इतिहासावरून आणि आपल्या वैयक्‍तिक अनुभवावरून संदेष्ट्या यिर्मयाच्या या शब्दांची सत्यता आपल्याला पटते: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

१० जर आपण आनंदी आणि सफल जीवन जगू इच्छितो तर आपण देवाचे मार्गदर्शन स्वीकारलेच पाहिजे. शलमोन राजाने, देवाच्या मार्गदर्शनाला न जुमानता स्वतःच्याच मनाप्रमाणे वागणे किती धोकेदायक आहे हे ओळखले होते; त्याने म्हटले: “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.”—नीतिसूत्रे १४:१२.

यहोवाच्या नियमांची कदर बाळगण्याची कारणे

११. देवाचे नियम समजून घेण्याची इच्छा आपण का बाळगावी?

११ यहोवाचे नियम समजून घेण्याची मनःपूर्वक इच्छा बाळगणे अतिशय श्रेयस्कर आहे. स्तोत्रकर्त्याने अशाप्रकारची लालसा व्यक्‍त केली: “माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्‌भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.” (स्तोत्र ११९:१८) आपण देवाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल जसजसे अधिक ज्ञान घेऊ तसतसे यशयाचे पुढील शब्द आपल्याला अर्थभरीत वाटू लागतील: “जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो, तो मीच यहोवा तुझा देव आहे. अहा, तू माझ्या आज्ञा ऐकल्या असत्या तर किती बरे झाले असते!” (यशया ४८:१७, १८, पं.र.भा.) यहोवाची मनःपूर्वक इच्छा हीच आहे की लोकांनी त्याच्या आज्ञांकडे लक्ष देऊन आपल्या जीवनात संकटे टाळावीत आणि जीवनाचा आनंद लुटावा. आपण देवाच्या नियमांची कदर का बाळगली पाहिजे याची काही मुख्य कारणे पाहू या.

१२. यहोवाला आपल्याविषयी असलेल्या ज्ञानामुळे कशाप्रकारे तो सर्वात उत्तम नियमकर्ता ठरतो?

१२ आपल्याकरता सर्वाधिक हिताचे काय हे जाणणाऱ्‍याचे ते नियम आहेत. यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे साहजिकच त्याला मानवांविषयी पुरेपूर ज्ञान आहे हे मानणे तर्कशुद्ध आहे. (स्तोत्र १३९:१, २; प्रेषितांची कृत्ये १७:२४-२८) यहोवा आपल्याला जितक्या चांगल्याप्रकारे ओळखतो तितक्या चांगल्याप्रकारे आपले घनिष्ट मित्र, नातेवाईक इतकेच काय तर आपले आईवडीलसुद्धा आपल्याला ओळखत नाहीत. किंबहुना आपण स्वतःही ओळखत नाही इतक्या चांगल्याप्रकारे यहोवा आपल्याला ओळखतो! आपल्या सृष्टिकर्त्याला आपल्या आध्यात्मिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांची अतुलनीय समज आहे. तो आपल्याकडे त्याचे लक्ष वळवतो तेव्हा त्याला आपल्या रचनेविषयी, आपल्या इच्छांविषयी, आकांक्षांविषयी अगदी अंतर्बाह्‍य ज्ञान असते. आपल्यामध्ये कमतरता आहेत हे यहोवा जाणतो, पण चांगले करण्याच्या आपल्या क्षमतेचीही त्याला जाणीव आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो: “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१४) त्यामुळे, देवाच्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करताना आणि स्वेच्छेने त्याच्या मार्गदर्शनाला अधीन होऊन चालताना आपल्याला आध्यात्मिक सुरक्षितता जाणवते.—नीतिसूत्रे ३:१९-२६.

१३. यहोवाला आपल्या हिताची काळजी आहे याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?

१३ आपल्यावर प्रेम करणाऱ्‍याने दिलेले हे नियम आहेत. देवाला आपल्या कायमच्या हिताची मनापासून काळजी आहे. त्यानेच आपल्याकरता मोठा त्याग करून, त्याचा पुत्र “पुष्कळांच्या खंडणीसाठी” दिला नाही का? (मत्तय २०:२८) ‘तो आपली परीक्षा आपल्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही,’ असे वचन त्यानेच आपल्याला दिलेले नाही का? (१ करिंथकर १०:१३) शिवाय, “त्याला तुमची काळजी आहे” असे बायबलमध्ये आपल्याला आश्‍वासन देण्यात आलेले नाही का? (१ पेत्र ५:७, मराठी कॉमन लँग्वेज) मानवी सृष्टीकरता हितकारक मार्गदर्शन पुरवण्याची प्रेमळ इच्छा यहोवापेक्षा आणखी कोणाला नाही. आपल्याकरता काय चांगले आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद किंवा दुःख देऊ शकतात हे त्याला माहीत आहे. आपण अपरिपूर्ण आहोत आणि चुका करतो तरीसुद्धा, जर आपण धार्मिकतेचा मार्ग धरला तर तो वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याबद्दलचे प्रेम व्यक्‍त करेल आणि शेवटी त्यांमुळे आपल्याला जीवन आणि उदंड आशीर्वाद प्राप्त होतील.—यहेज्केल ३३:११.

१४. देवाचे नियम आणि मानवी कल्पना यांतील एक मुख्य फरक कोणता?

१४ देवाचे अटळ नियम आपल्याला दिलासा देतात. या अंदाधुंदीच्या काळात, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत अस्तित्वात असणारा यहोवा आपल्याकरता एखाद्या अचल दुर्गासारखा आहे. (स्तोत्र ९०:२) त्यानेच स्वतःविषयी असे म्हटले: “मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:६) बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेले यहोवाचे आदर्श, मनुष्याच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्‍या कल्पनांच्या दलदलीसारखे नाहीत; ते पूर्णपणे विश्‍वासार्ह आहेत. (याकोब १:१७) उदाहरणार्थ, कित्येक वर्षे मानसशास्त्रज्ञ मुलांना शिक्षा देऊ नये असा सल्ला देत होते पण नंतर काहींनी स्वतः कबूल केले की त्यांचा हा सल्ला योग्य नव्हता. या विषयावरील जगिक आदर्श आणि मार्गदर्शन वादळात सापडलेल्या नावेप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे कलते. पण यहोवाचे वचन अविचल आहे. कित्येक शतकांपासून बायबलने मुलांना प्रेमाने वळण कसे लावावे याविषयी मार्गदर्शन दिले आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) आपण यहोवाच्या आदर्शांवर पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो कारण ते कधीही बदलणार नाहीत हा किती दिलासा देणारा विचार आहे!

देवाच्या नियमांचे पालन करणाऱ्‍यांना आशीर्वाद

१५, १६. (अ) आपण यहोवाच्या आदर्शांचे पालन केल्यास काय परिणाम होईल? (ब) देवाचे नियम वैवाहिक जीवनात कशाप्रकारे उपयुक्‍त मार्गदर्शन पुरवतात?

१५ आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे देवाने म्हटले: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:११) तितक्याच निश्‍चितपणे आपण म्हणू शकतो, की देवाच्या वचनातील त्याच्या आदर्शांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्यास आपणही खात्रीने सफल होऊ, चांगल्या गोष्टी साध्य करू शकू आणि आनंदी होऊ शकू.

१६ देवाचे नियम यशस्वी वैवाहिक जीवनाकरता कशाप्रकारे उपयुक्‍त मार्गदर्शन देतात हे विचारात घ्या. “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांशी आदरपूर्वक व प्रेमळपणे वागले पाहिजे: “तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) १ करिंथकर १३:४-८ यांत आवश्‍यक असलेल्या प्रीतीचे वर्णन करण्यात आले आहे: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही [“कधी विफल होत नाही,” NW].” ही प्रीती ज्या विवाहात दाखवली जाते तो विवाह कधीही विफल होणार नाही.

१७. मद्याच्या उपयोगासंबंधी यहोवाच्या आदर्शांचे पालन केल्यामुळे कोणते फायदे होतात?

१७ यहोवाचे आदर्श आपल्या हिताचे आहेत याचा आणखी एक पुरावा म्हणजे तो दारुडेपणाचा धिक्कार करतो. इतकेच काय तर ‘अति मद्यपान करण्याबद्दलही’ तो नापसंती दर्शवतो. (१ तीमथ्य ३:३, ८, पं.र.भा.; रोमकर १३:१३) या बाबतीत देवाच्या आदर्शाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांना अती मद्यपानामुळे होणारे किंवा वाढणारे वेगवेगळे आजार होतात. संतुलित असण्याविषयीच्या बायबलमधील सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे “तणाव घालवण्याच्या” नावाखाली अनेकांना अतिमद्यपान करण्याची सवय लागली आहे. फार मद्यपान केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, उदाहरणार्थ, त्या व्यक्‍तीबद्दल आदर न राहणे, कुटुंबात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणे, कुटुंब मोडकळीस येणे, पैशाचा अपव्यय आणि नोकरी जाणे. (नीतिसूत्रे २३:१९-२१, २९-३५) मद्यासंबंधी यहोवाने घालून दिलेले आदर्श खरोखर आपला बचाव करत नाहीत का?

१८. देवाचे नियम आर्थिक बाबींत उपयुक्‍त आहेत का? स्पष्ट करा.

१८ देवाचे आदर्श आर्थिक बाबींसंबंधी देखील उपयुक्‍त शाबीत झाले आहेत. बायबल ख्रिश्‍चनांना प्रामाणिक आणि कष्टाळू असण्याचे प्रोत्साहन देते. (लूक १६:१०; इफिसकर ४:२८; कलस्सैकर ३:२३) या सल्ल्याचे पालन केल्यामुळे अनेक ख्रिश्‍चनांना नोकरीत बढती मिळाली; काहींना असा अनुभव आला की, त्यांच्या कामाच्या ठिकाणी इतरांना नोकरीवरून काढण्यात आले तेव्हा त्यांना मात्र नोकरीवर ठेवण्यात आले. तसेच एक व्यक्‍ती बायबलच्या विरोधात असलेल्या, जुगार, धूम्रपान आणि ड्रग्स यांसारख्या वाईट सवयी टाळते तेव्हा एका दृष्टीने तिला आर्थिक फायदाच होतो. देवाचे आदर्श आर्थिकदृष्ट्या कशाप्रकारे हिताचे आहेत याची इतर उदाहरणे तुम्हाला माहीत असतीलच.

१९, २०. देवाचे नियम स्वीकारून त्यांना जडून राहणे हाच सुज्ञतेचा मार्ग का आहे?

१९ अपरिपूर्ण मानव देवाच्या नियमांपासून आणि आदर्शांपासून सहज भरकटू शकतात. सीनाय पर्वतावरील इस्राएल लोकांचा विचार करा. देवाने त्यांना म्हटले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल.” आणि त्यांनीही देवाला उत्तर दिले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” पण प्रत्यक्षात मात्र ते याच्या अगदी उलट वागले! (निर्गम १९:५, ८; स्तोत्र १०६:१२-४३) पण आपण तसे न करता देवाचे आदर्श स्वीकारून त्यांना जडून राहू या.

२० यहोवाने आपल्याला जीवनात मार्गदर्शन देण्याकरता जे अतुलनीय नियम पुरवले आहेत त्यांना नेहमी जडून राहणे हाच सुज्ञतेचा आणि आनंदी होण्याचा मार्ग आहे. (स्तोत्र १९:७-११) पण हे यशस्वीपणे करण्याकरता देवाची तत्त्वे देखील समजून घेऊन त्यांचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. हाच पुढच्या लेखाचा विषय आहे.

[तळटीपा]

^ परि. 6 ‘ख्रिस्ताच्या नियमासंबंधी’ सविस्तर चर्चेकरता टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९६, पृष्ठे १४-२४ पाहावीत.

तुम्हाला आठवते का?

• देवाचे नियम आपल्या हिताचे आहेत असा विश्‍वास आपण का बाळगू शकतो?

• आपण यहोवाच्या नियमांविषयी मनस्वी कदर का बाळगली पाहिजे?

• देवाचे नियम कोणकोणत्या बाबतीत हिताचे ठरतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

अब्राहामने यहोवाचे नियम पाळल्यामुळे त्याला समृद्ध आशीर्वाद मिळाले

[१५ पानांवरील चित्रे]

आजकालच्या धकाधकीच्या जीवनातील चिंता बऱ्‍याच लोकांना देवाच्या नियमांचे पालन करण्यापासून परावृत्त करतात

[१७ पानांवरील चित्र]

डोंगरावरील एखाद्या दीपगृहाप्रमाणे देवाचे नियम स्थिर आणि अविचल आहेत