व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका

देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका

देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका

“तुला जे हितकारक ते . . . [यहोवा] तुझा देव तुला शिकवितो.”यशया ४८:१७.

१. निर्माणकर्ता मानवांना कशाप्रकारे मार्गदर्शित करतो?

विश्‍वातील असंख्य रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करताना, आपल्या सभोवतालच्या सृष्टीत दडलेल्या ऊर्जेचे प्रचंड प्रमाण पाहून शास्त्रज्ञ तोंडात बोटे घालतात. आपला सूर्य—एक मध्यम आकाराचा तारा—“१०,००० कोटी हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांतून उत्पन्‍न होईल इतकी ऊर्जा दर सेकंदाला उत्पन्‍न करतो.” आपला निर्माणकर्ता अशा या अजस्र खज्योतींना आपल्या अफाट सामर्थ्याने नियंत्रित आणि मार्गदर्शित करू शकतो. (ईयोब ३८:३२; यशया ४०:२६) मग आपल्याविषयी, अर्थात इच्छास्वातंत्र्य, नैतिक क्षमता, तर्कशक्‍ती आणि आध्यात्मिकतेची कुवत असलेल्या मानवांविषयी काय? आपल्या सृष्टीकर्त्याने आपल्याला कशाप्रकारे मार्गदर्शित करण्याचे निवडले आहे? त्याचे परिपूर्ण नियम व उदात्त तत्त्वे आणि आपला सुप्रशिक्षित विवेक यांच्या समन्वयाने तो आपल्याला प्रेमळपणे मार्गदर्शित करतो.—२ शमुवेल २२:३१; रोमकर २:१४, १५.

२, ३. देवाला कशाप्रकारच्या आज्ञापालनाने आनंद होतो?

आपण निर्माण केलेला बुद्धिमान मानव स्वेच्छेने आपली आज्ञा पाळण्याचे निवडतो तेव्हा देवाला आनंद होतो. (नीतिसूत्रे २७:११) म्हणूनच, विचार न करता, केवळ सांगितलेल्या हुकुमाचे पालन करणाऱ्‍या बुद्धीहीन रोबोटप्रमाणे आपल्याला बनवण्याऐवजी त्याने आपल्याला इच्छा स्वातंत्र्य दिले जेणेकरून आपल्याला योग्य पाऊल उचलण्याचा डोळसपणे निर्णय घेता येईल.—इब्री लोकांस ५:१४.

आपल्या पित्याचे तंतोतंत अनुकरण करणाऱ्‍या येशूने शिष्यांना एकदा म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही.” (योहान १५:१४, १५) प्राचीन काळात, गुलामांना आपल्या मालकाच्या हुकुमाचे पालन करणे भाग होते. पण मैत्री मात्र हृदयाचा ठाव घेणाऱ्‍या गुणांच्या प्रदर्शनाने जोडली जाते. आपण यहोवाचे मित्र बनू शकतो. (याकोब २:२३) परस्पर प्रीतीने या मैत्रीला खतपाणी मिळते. येशूने देवाच्या आज्ञा पाळण्याचा संबंध प्रीतीशी जोडून म्हटले: “ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील.” (योहान १४:२३) आपल्यावर प्रीती असल्यामुळे आणि आपल्याला सुरक्षितपणे मार्गदर्शित करण्याची इच्छा असल्यामुळेच यहोवा आपल्याला त्याच्या तत्त्वांचे पालन करण्याचा आर्जव करतो.

देवाची तत्त्वे

४. तुम्ही तत्त्वांचे कसे वर्णन कराल?

तत्त्व म्हणजे काय? तत्त्वाची व्याख्या, “एक सर्वसामान्य अथवा मूलभूत सत्य: ज्याच्या आधारावर किंवा ज्यातून इतर नियम व सिद्धान्त तयार केले जातात असा बहुव्यापक व मूलभूत नियम, सिद्धान्त अथवा गृहितक.” (वेब्स्टर्स थर्ड न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी) बायबलच्या लक्षपूर्वक अभ्यासावरून असे दिसून येते की आपल्या स्वर्गीय पित्याने जीवनाच्या निरनिराळ्या परिस्थितींना आणि पैलूंना समर्पक असणारे मूलभूत निदेश आपल्याकरता पुरवले आहेत. आणि हे निदेश त्याने आपल्या सार्वकालिक हिताकरता पुरवले आहेत. बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिलेले पुढील शब्द याला दुजोरा देतात: “माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे.” (नीतिसूत्रे ४:१०, ११) यहोवाने पुरवलेली सर्वात महत्त्वाची तत्त्वे त्याच्यासोबतच्या आणि सहमानवांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाशी, आपल्या उपासनेशी आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. (स्तोत्र १:१) या महत्त्वपूर्ण तत्त्वांपैकी काही आपण येथे विचारात घेऊ या.

५. काही मूलभूत तत्त्वांची उदाहरणे द्या.

यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) यासोबतच सहमानवांसोबत आपल्या वागणुकीशी संबंधित असलेली तत्त्वे देखील देवाने पुरवली आहेत; याचे एक उदाहरण म्हणजे सुवर्ण नियम: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२; गलतीकर ६:१०; तीत ३:२) उपासनेच्या संबंधाने आपल्याला अशी आज्ञा करण्यात आली आहे: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांसंबंधाने प्रेषित पौलाने म्हटले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) देवाच्या वचनात इतर असंख्य तत्त्वे आहेत.

६. तत्त्वे नियमांपेक्षा कशी वेगळी आहेत?

तत्त्वे ही क्रियाशील व अत्यावश्‍यक सत्ये असतात आणि सूज्ञ मनोवृत्तीचे ख्रिस्ती ही तत्त्वे प्रिय मानण्यास शिकतात. यहोवाने शलमोनाला असे लिहिण्यास प्रेरित केले: “माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको; ती आपल्या अंतःकरणांत ठेव. कारण ती ज्यांस लाभतात, त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.” (नीतिसूत्रे ४:२०-२२) तत्त्वे नियमांपेक्षा कशी वेगळी असतात? नियम हे तत्त्वांच्या आधारावर बनवले जातात. नियम हे विशिष्ट असतात, ते ठराविक काळापुरते अथवा ठराविक परिस्थितीपुरते असू शकतात पण तत्त्वे मात्र त्रिकालाबाधित असतात. (स्तोत्र ११९:१११) देवाची तत्त्वे कधीही कालबाह्‍य अथवा नष्ट होत नाहीत. संदेष्ट्या यशयाचे प्रेरित शब्द अगदी खरे आहेत: “गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८.

तत्त्वांच्या आधारावर विचार करा आणि वागा

७. देवाचे वचन आपल्याला तत्त्वांच्या आधारावर विचार करण्याचे व वागण्याचे कशाप्रकारे प्रोत्साहन देते?

“देवाचे वचन” आपल्याला वेळोवेळी तत्त्वांच्या आधारावर विचार करण्यास व वागण्यास प्रोत्साहन देते. येशूला नियमशास्त्राचा सार काय असे विचारण्यात आले तेव्हा त्याने केवळ दोन संक्षिप्त विधानांत हा सारांश दिला—एकाद्वारे त्याने यहोवावर प्रेम करण्यावर जोर दिला तर दुसऱ्‍या विधानातून सहमानवांवर प्रेम करण्यावर भर दिला. (मत्तय २२:३७-४०) असे करताना वास्तविकतः येशूने, पूर्वीच मोशेच्या नियमशास्त्रातील मूलभूत निदेशांच्या अनुवाद ६:४, ५ येथे सापडणाऱ्‍या सारांशातील शब्द उद्धृत केले: “आपला देव परमेश्‍वर हा अनन्य परमेश्‍वर आहे; तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” नक्कीच येशूला लेवीय १९:१८ येथील देवाचा निदेश देखील आठवणीत असावा. उपदेशकाच्या पुस्तकाच्या सुस्पष्ट, संक्षिप्त आणि जबरदस्त समारोपाच्या शब्दांत शलमोन राजाने देवाच्या असंख्य नियमांचा सार दिला: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करितांना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.”—उपदेशक १२:१३, १४; मीखा ६:८.

८. बायबलमधील मूलभूत तत्त्वे मनात पक्की बसवणे कशाप्रकारे आपल्याकरता संरक्षण ठरू शकते?

अशी ही मूलभूत तत्त्वे चांगल्याप्रकारे समजून घेतल्यामुळे, अधिक विशिष्ट स्वरूपात असलेले नियम समजून घ्यायला आणि त्यांचे पालन करायला आपल्याला मदत होते. पण जर ही मूलभूत तत्त्वे आपण पूर्णपणे समजून घेतली नाहीत आणि ती स्वीकारली नाहीत तर आपल्याला योग्य निर्णय घेता येणार नाहीत आणि आपला विश्‍वास अगदी सहज डगमगेल. (इफिसकर ४:१४) पण जर ही तत्त्वे आपण मनात आणि अंतःकरणात पक्की बसवलीत तर निर्णय घेताना साहजिकच त्यांचा उपयोग करणे आपल्याला सोपे जाईल. जेव्हा आपण त्यांचा समजूतदारपणे उपयोग करू तेव्हा आपल्याला निश्‍चितच सफलता मिळेल.—यहोशवा १:८; नीतिसूत्रे ४:१-९.

९. बायबलमधील तत्त्वे समजून घेऊन त्यांचे पालन करणे नेहमीच सोपे का नसते?

बायबलमधील तत्त्वे समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे हे ठराविक नियमांचे पालन करण्याइतके सोपे नाही. अपरिपूर्ण मानव असल्यामुळे, सहसा आपण या तत्त्वांच्या आधारावर तर्क करून निर्णय घेण्याची तसदी घेऊ इच्छित नाही. उलट, एखादा निर्णय घेण्याची वेळ येते किंवा दुविधाजनक परिस्थिती येते तेव्हा, काहीतरी सुस्पष्ट नियम असता तर बरे झाले असते असे आपल्याला वाटू शकते. कधीकधी आपण एखाद्या अनुभवी ख्रिस्ती व्यक्‍तीकडून मार्गदर्शन मागायला जातो—कदाचित मंडळीतल्या एखाद्या वडिलांकडे—आणि त्यांनी आपल्या परिस्थितीला लागू होणारा एखादा सुस्पष्ट नियम सांगावा अशी आपण अपेक्षा करतो. पण बायबलमध्ये किंवा बायबल आधारित प्रकाशनांमध्ये त्याविषयी विशिष्ट नियम दिलेला नसेल आणि जरी आपल्याला असा नियम देण्यात आला तरीसुद्धा तो प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीला लागू करता येणार नाही. तुम्हाला आठवत असेल, एका माणसाने येशूला अशी विनंती केली: “गुरुजी, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” येशूने लगेच त्या भावांमधील मतभेद सोडवण्याकरता विशिष्ट हुकूम दिला नाही; उलट त्याने त्याला एक सर्वसामान्य तत्त्व सांगितले: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.” अशारितीने येशूने अशी एक मार्गदर्शक सूचना दिली जी तेव्हा उपयुक्‍त होती आणि आजही आहे.—लूक १२:१३-१५.

१०. तत्त्वांनुरूप वागल्यामुळे आपल्या हृदयातले खरे हेतू कशाप्रकारे दिसून येतात?

१० कदाचित तुमच्या पाहण्यात असे लोक आले असतील जे नियमांचे पालन तर करतात, पण अगदी नाईलाजाने, शिक्षा होण्याच्या भीतीने. पण तत्त्वांचा आदर केल्यास अशी मनोवृत्ती राहात नाही. तत्त्वांचे स्वरूपच असे आहे की जे लोक त्यांच्या अधीन होतात, त्यांना ही तत्त्वे हृदयापासून प्रतिसाद देण्यास प्रेरित करतात. किंबहुना, बहुतेक तत्त्वांचे पालन केले नाही तरीसुद्धा लगेच कोणत्याही प्रकारची शिक्षा मिळत नाही. यामुळे आपल्याला हे दाखवून देण्याची संधी मिळते की आपण यहोवाच्या आज्ञा का पाळतो, आपल्या हृदयाची खरी प्रेरणा काय आहे. योसेफाने पोटीफरच्या पत्नीच्या अनैतिक मागण्या नाकारल्या त्यातून आपल्याला याचे एक उदाहरण पाहायला मिळते. तोपर्यंत यहोवाने जारकर्माविरुद्ध कोणताही लेखी नियम दिलेला नव्हता, शिवाय दुसऱ्‍या पुरुषाच्या पत्नीशी संबंध ठेवल्यास देवाने कोणतीही शिक्षा सांगितली नव्हती. पण देवाने स्थापित केलेल्या विवाहातील विश्‍वासूपणाची तत्त्वे योसेफाला माहीत होती. (उत्पत्ति २:२४; १२:१८-२०) या तत्त्वांचा त्याच्या मनावर कितपत पगडा होता हे त्याच्या उत्तरातून स्पष्ट दिसून येते: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”—उत्पत्ति ३९:९.

११. ख्रिश्‍चनांना कोणकोणत्या बाबींत यहोवाच्या तत्त्वांनी मार्गदर्शित होण्याची इच्छा आहे?

११ आज ख्रिश्‍चनांना वैयक्‍तिक बाबींसंबंधी, उदाहरणार्थ, कोणासोबत संगत ठेवावी, कशाप्रकारचे करमणुकीचे प्रकार, संगीत, किंवा वाचण्याचे साहित्य निवडावे यांसंबंधी निर्णय घेताना यहोवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनानुरूप वागण्याची इच्छा आहे. (१ करिंथकर १५:३३; फिलिप्पैकर ४:८) जसजसे यहोवाबद्दल आणि त्याच्या आदर्शांबद्दल ज्ञान, समज आणि कदर वाढेल, तसतसा आपला विवेक, आपली नैतिक जाणीव आपल्याला कोणत्याही परिस्थितीत, अगदी खासगी बाबींतही देवाच्या तत्त्वांचे पालन करण्यास मदत करेल. देवाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन स्वीकारल्यास आपण देवाच्या नियमांतून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. तसेच, विशिष्ट कायदा न मोडता किती दूरपर्यंत जाता येते हे पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांचे आपण अनुकरण करणार नाही. अशा विचारसरणीने आपण स्वतःचीच फसवणूक करतो, शिवाय ती आत्मघातक आहे याची आपल्याला जाणीव आहे.—याकोब १:२२-२५.

१२. देवाच्या तत्त्वांनी मार्गदर्शित होण्याकरता काय आवश्‍यक आहे?

१२ परिपक्व ख्रिश्‍चन हे ओळखतात की देवाच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी, विशिष्ट विषयासंबंधी यहोवाला कसे वाटते हे जाणून घेण्याची इच्छा असणे आवश्‍यक आहे. स्तोत्रकर्त्याने असे आर्जवले: “अहो परमेश्‍वरावर प्रीति करणाऱ्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा.” (स्तोत्र ९७:१०) देव ज्यांना वाईट समजतो अशा काही गोष्टींची यादी नीतिसूत्रे ६:१६-१९ येथे सापडते: “परमेश्‍वर ज्यांचा द्वेष करितो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे; उन्मत्त दृष्टि, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्‍त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्‍न करणारा मनुष्य, ह्‍या त्या होत.” अशा या मूलभूत गोष्टींसंबंधी यहोवाच्या भावना आपल्या वागणुकीतूनही प्रतिबिंबित व्हाव्यात अशी इच्छा जेव्हा आपल्या जीवनात प्रबल होते, तेव्हा त्याच्या तत्त्वांनुरूप वागण्याची आपल्याला सवय होऊन जाते.—यिर्मया २२:१६.

चांगला हेतू असला पाहिजे

१३. डोंगरावरील प्रवचनात येशूने कशाप्रकारच्या विचारसरणीवर जोर दिला?

१३ तत्त्वे जाणून त्यांचे पालन केल्यामुळे, व्यर्थ, औपचारिक उपासना करण्यापासून आपले संरक्षण होते. तत्त्वांचे पालन करणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे यात फरक आहे. डोंगरावरील प्रवचनात येशूने याचा स्पष्टपणे खुलासा केला. (मत्तय ५:१७-४८) येशूचे प्रवचन ऐकणारे यहुदी होते हे लक्षात घ्या; त्यामुळे त्यांचे आचरण मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुरूप असायला हवे होते. पण खरे पाहता नियमशास्त्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच चुकीचा होता. नियमशास्त्राच्या भावगर्भावर जोर देण्याऐवजी ते त्यातील नियमांवर अधिक जोर देऊ लागले होते. शिवाय, ते आपल्या परंपरांवरच जोर देत होते, किंबहुना देवाच्या शिकवणुकींपेक्षा त्यांना अधिक महत्त्व देत होते. (मत्तय १२:९-१२; १५:१-९) परिणामस्वरूप, सर्वसामान्य लोक तत्त्वांच्या संबंधाने विचार करायला शिकले नाहीत.

१४. येशूने आपल्या ऐकणाऱ्‍यांना तत्त्वांच्या आधारावर विचार करण्यास कशाप्रकारे शिकवले?

१४ याउलट, येशूने डोंगरावरील प्रवचनात नैतिकतेसंबंधी पाच पैलूंचा समावेश केला: क्रोध, विवाह आणि घटस्फोट, वचन देणे, सूड घेणे, आणि प्रीती व द्वेष. या प्रत्येक बाबतीत येशूने तत्त्वाचे पालन केल्यामुळे होणारे फायदे दाखवून दिले. अशारितीने येशूने आपल्या अनुयायांकरता नैतिकतेचा स्तर अधिक उंचावला. उदाहरणार्थ, जारकर्माच्या बाबतीत त्याने आपल्याला असे एक तत्त्व दिले ज्यामुळे केवळ आपल्या कृत्यांविषयीच नव्हे तर आपल्या विचारांविषयी आणि इच्छांविषयीही सावध राहण्यास आपल्याला मदत मिळते; त्याने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्तय ५:२८.

१५. नियमांचे काटेकोर पालन करण्यावर जोर देण्याची न्यायनिष्ठूर प्रवृत्ती आपण कशाप्रकारे टाळू शकतो?

१५ या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की आपण यहोवाच्या तत्त्वांचा उद्देश आणि हेतूगर्भ कधीही विसरू नये. सर्वकाही विधीपूर्वक करून देवाची संमती मिळण्याची तर आपण कधीही अपेक्षा करू नये. अशी मनोवृत्ती किती चुकीची आहे हे दाखवण्याकरता येशूने देवाच्या दयेकडे आणि त्याच्या प्रीतीकडे लक्ष वेधले. (मत्तय १२:७; लूक ६:१-११) बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्यास, आपण बायबलच्या शिकवणुकींच्या पलीकडे जाणाऱ्‍या काटेकोर नियमांच्या लांबलचक यादीनुसार वागण्याचा (अथवा इतरांनी वागावे अशी अपेक्षा करण्याचा) प्रयत्न करणार नाही. उपासनेच्या बाह्‍य स्वरूपापेक्षा देवाप्रती असलेल्या प्रीतीच्या आणि आज्ञापालनाच्या तत्त्वांकडे आपण जास्त लक्ष देऊ.—लूक ११:४२.

आनंदी परिणाम

१६. बायबलमधील काही आदेशांमागे असलेल्या तत्त्वांची उदाहरणे द्या.

१६ यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे हे नियम काही मूलभूत तत्त्वांवर आधारित आहेत याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ख्रिश्‍चनांनी मूर्तिपूजा, लैंगिक अनैतिकता आणि रक्‍ताचा दुरुपयोग टाळला पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) या प्रश्‍नांसंबंधी ख्रिश्‍चनांची भूमिका कशावर आधारित आहे? देव आपल्या अनन्य उपासनेस पात्र आहे; आपल्या जोडीदाराला आपण विश्‍वासू राहिले पाहिजे; आणि जीवन देणारा यहोवा आहे. (उत्पत्ति २:२४; निर्गम २०:५; स्तोत्र ३६:९) ही आधारभूत तत्त्वे समजून घेतल्यामुळे त्याजशी संबंधित असलेले नियम स्वीकारण्यास व त्यांचे पालन करण्यास अधिक सोपे जाते.

१७. बायबलमधील तत्त्वे समजून घेऊन त्यांचे पालन केल्यामुळे कोणते चांगले परिणाम होतात?

१७ ही आधारभूत तत्त्वे ओळखून त्यांचे पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की ही आपल्या हिताकरता आहेत. देवाच्या लोकांना आध्यात्मिक आशीर्वादांसोबत सहसा प्रत्यक्ष जीवनात फायदे प्राप्त होतात. उदाहरणार्थ, जे धूम्रपान टाळतात, नैतिकतेने जीवन जगतात आणि रक्‍ताच्या पावित्र्याचा आदर करतात ते विशिष्ट आजारांना बळी पडत नाहीत. त्याचप्रकारे, देवाच्या सत्यानुरूप जीवन व्यतीत केल्यामुळे आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातूनही फायदे प्राप्त होऊ शकतात. प्रत्यक्ष जीवनात मिळणारे हे फायदे हेच दाखवून देतात की यहोवाचे आदर्श खरोखर मोलवान आहेत आणि ते खरोखर व्यवहारोपयोगी आहेत. पण हे फायदे मिळण्यासाठीच केवळ आपण देवाच्या तत्त्वांचे पालन करू नये. खरे ख्रिस्ती यहोवाच्या आज्ञा पाळतात कारण त्याच्यावर त्यांचे प्रेम आहे, तो त्यांच्या उपासनेस पात्र आहे आणि त्याच्या आज्ञा पाळणे योग्य आहे.—प्रकटीकरण ४:११.

१८. ख्रिस्ती जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपले जीवन कशाने मार्गदर्शित केले पाहिजे?

१८ जीवनात बायबलच्या तत्त्वांचे मार्गदर्शन स्वीकारल्यास आपले जीवन सुधारते आणि यामुळे इतरजणही देवाच्या मार्गाकडे आकर्षित होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनामुळे यहोवाचा गौरव होतो. आपण हे चांगल्याप्रकारे जाणतो की यहोवा खरोखर एक प्रेमळ देव आहे आणि त्याला आपल्या हिताची काळजी आहे. बायबलच्या तत्त्वांनुरूप निर्णय घेऊन आपण त्याचे आशीर्वाद अनुभवतो तेव्हा त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध अधिक घनिष्ट होतो. होय, आपल्या स्वर्गीय पित्यासोबतचा आपला प्रेमळ नातेसंबंध वाढत जातो.

तुम्हाला आठवते का?

• तत्त्व म्हणजे काय?

• तत्त्व नियमांपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत?

• तत्त्वांच्या आधारावर विचार करणे आणि वागणे का फायदेकारक आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चौकट]

घाना येथे विल्सन नावाचा एक ख्रिस्ती राहतो. त्याला सांगण्यात आले होते की काही दिवसांतच त्याला नोकरीवरून कमी केले जाईल. नोकरीवर शेवटच्या दिवशी त्याला कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची खासगी गाडी धुण्याचे काम देण्यात आले. विल्सनला गाडीत काही पैसे सापडले तेव्हा त्याच्या एका वरिष्ठाने त्याला म्हटले की त्याच दिवशी त्याची नोकरी जाणार असल्यामुळे देवानेच त्याला हे पैसे दिले होते. पण प्रामाणिकपणाविषयी बायबलमधील तत्त्वांचे पालन करून विल्सनने ते पैसे डायरेक्टरला परत केले. डायरेक्टरला खूप आश्‍चर्य वाटले आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेच विल्सनला कायमची नोकरी देऊ केली आणि कंपनीत त्याला एक सिनियर सदस्य म्हणून बढती देखील दिली!—इफिसकर ४:२८.

[२१ पानांवरील चौकट]

रूकीया ही साठीत असलेली एक ॲल्बेनियन स्त्री आहे. काही कौटुंबिक मतभेदांमुळे १७ वर्षांपासून ती आपल्या भावाशी बोलत नव्हती. तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली आणि तिला कळून आले की ख्रिश्‍चनांनी इतरांसोबत शांतीने राहिले पाहिजे, त्यांच्याविरुद्ध त्यांनी मनात राग बाळगू नये. तिने रात्रभर प्रार्थना केली आणि शेवटी आपल्या भावाच्या घरी जाण्याचे धैर्य एकवटले. भावाच्या घराच्या दाराजवळ ती आली तेव्हा तिची छाती धडधडत होती. तिच्या भाचीने दार उघडले. रुकियाला पाहून तिला आश्‍चर्य वाटले आणि तिने विचारले: “कोण मेलं? तू इथं कशी काय आलीस?” रुकियाने भावाला भेटायचे आहे असे सांगितले. तिने शांतपणे समजावून सांगितले की बायबलच्या तत्त्वांविषयी आणि यहोवाविषयी शिकल्यानंतर तिला आपल्या भावासोबत समेट करण्याची प्रेरणा मिळाली होती. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याचा आनंद त्या सर्वांनी मिळून साजरा केला!—रोमकर १२:१७, १८.

[२३ पानांवरील चित्र]

मत्तय ५:२७, २८

[२३ पानांवरील चित्र]

मत्तय ५:३

[२३ पानांवरील चित्र]

मत्तय ५:२४

[२३ पानांवरील चित्र]

“त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.”—मत्तय ५:१, २