व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फिलिपीन्समध्ये टेकड्यांच्या माथ्यांवर देवाचे गौरव

फिलिपीन्समध्ये टेकड्यांच्या माथ्यांवर देवाचे गौरव

फिलिपीन्समध्ये टेकड्यांच्या माथ्यांवर देवाचे गौरव

फिलिपीन्स हे द्वीप राष्ट्र आहे असा तुमचा समज असल्यास तो बरोबरच आहे. परंतु, या देशात उंच उंच डोंगर देखील आहेत. शहरांमध्ये व सखल प्रदेशांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचार कार्य सोपे व परिणामकारक ठरले आहे. परंतु, डोंगराळ भागांची गोष्ट जरा वेगळी आहे.

त्या देशात, एकीकडे उंचपुरे डोंगर तर दुसरीकडे रेताळ किनारपट्ट्या, प्रवालशिला, मच्छीमारांची गावे आणि द्वीपावरील सपाट प्रदेशांतील गजबजलेली शहरे अशी विविधता आढळते. परंतु, हे डोंगर देवाच्या राज्याच्या ‘सुवार्तेच्या’ प्रचारकार्यात देखील अडथळा निर्माण करतात.—मत्तय २४:१४.

फिलिपीन्स बेटे अशा ठिकाणी आहेत जेथे दोन विवर्तनिकी भूपट्ट एकमेकांना भिडतात. या भागातील जमीन वाकल्याने मोठ्या बेटांवर शीघ्रउताऱ्‍याच्या डोंगरकडा निर्माण झाल्या आहेत. फिलिपीन्समधील ७,१०० पेक्षा अधिक बेटे पॅसिफिकच्या अग्नी रिंगणाच्या पश्‍चिम बाजूला वसलेली आहेत. त्यामुळे, तेथे अनेक ज्वालामुखी आहेत; हे ज्वालामुखी देखील या डोंगराळ भूदृश्‍याला कारणीभूत आहेत. अशा कठीण भूप्रदेशामुळे डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्‍या लोकांचा इतर ठिकाणांशी संबंध तुटला आहे. त्यांच्यापर्यंत पोहंचणे मुश्‍किलीचे काम आहे कारण तेथे मोटार गाड्यांसाठी योग्य असलेले रस्ते फार कमी आहेत.

हे सर्व अडथळे असतानाही, ‘सर्व माणसांपर्यंत’ पोहंचण्याची गरज आहे हे यहोवाचे साक्षीदार ओळखतात. (१ तीमथ्य २:४) अशाप्रकारे, फिलिपीन्समधील साक्षीदार, यशया ४२:११, १२ मध्ये दिलेल्या गोष्टींच्या एकमतात कार्य करतात: “सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोश करोत. ते परमेश्‍वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.”

डोंगराळ भागातील लोकांना साक्ष देण्याचे प्रयत्न ५० हून अधिक वर्षांपासून सुरू झाले. दुसऱ्‍या महायुद्धानंतर, मिशनऱ्‍यांनी कार्याचा वेग वाढवण्यात हातभार लावला. अनेक स्थानीय रहिवाशांनी बायबलचे सत्य स्वीकारले आणि बदल्यात डोंगरांवर अधिक उंचावर वसलेल्या गावांमध्ये सत्याचा प्रसार करण्यात मदत केली. यामुळे उत्तम परिणाम प्राप्त झाले. उदाहरणार्थ, उत्तर लुझॉनच्या कॉर्डिलेरा सेंट्रल डोंगरांमध्ये सुवार्तेचे ६,००० हून अधिक प्रचारक आहेत. यातील बहुतेक लोक मूळचे रहिवाशी आहेत; त्यांच्यामध्ये इबालॉय, इफुगाउ आणि कालिंगा या जमातींचे लोक आहेत.

परंतु, डोंगरांवर अजूनही अशी ठिकाणे आहेत जेथे पोहंचणे कठीण आहे. मात्र तेथील लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले नाही. मग या लोकांपर्यंत कसे पोहंचण्यात आले आणि साक्षीदारांना कसा प्रतिसाद मिळाला?

परंपरेच्या जागी खरा विश्‍वास

उत्तरेकडील लुझॉनच्या बेटावर आब्रा प्रांताच्या डोंगराळ भागांमध्ये टिंजियन लोकांची वस्ती आहे. हे नाव कदाचित प्राचीन मलय शब्द टीन्जी अर्थात “डोंगर” यातून आले असावे. किती सुयोग्य नाव! हे लोक स्वतःला आणि त्यांच्या भाषेला इटनेग असेही म्हणतात. ते काबुन्यान नावाच्या दैवताची उपासना करतात आणि त्यांच्या अनेक अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थ, बाहेर जाणारी व्यक्‍ती जर शिंकली तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे वाईट परिणाम टाळण्यासाठी ती व्यक्‍ती काही तास थांबून मग बाहेर जाते.

१५७२ साली स्पॅनिश लोकांनी येथे कॅथलिक धर्म आणला, परंतु टिंजियन लोकांना खरा ख्रिस्ती धर्म शिकवण्यात ते अपयशी ठरले. ज्यांनी कॅथलिक धर्म स्वीकारला त्यांनी काबुन्यानची उपासना आणि आपले पारंपरिक विधी सोडले नाहीत. १९३० च्या दशकात, यहोवाचे साक्षीदार त्या डोंगराळ भागात राज्याच्या संदेशाचा प्रचार करू लागले तेव्हा बायबलमधील अचूक ज्ञान प्रथम या लोकांना ऐकायला मिळाले. तेव्हापासून अनेक टिंजियन लोकांनी ‘टेकड्यांच्या माथ्यांवरून’ यहोवाचे गौरव करायला सुरवात केली.

उदाहरणार्थ, लिंगबाउआन हे त्या भागातील एक सन्मानित जमातीचे प्रमुख होते. टिंजियन संस्कृतीचे विधी, परंपरा पार पाडण्यात ते नेहमी पुढाकार घ्यायचे. “मी प्रत्येक टिंजियन परंपरेचे पालन करत होतो. एखादी व्यक्‍ती ठार मारली गेल्यास दफन केल्यावर आम्ही एक नृत्य करून तास वाजवायचो. आम्ही प्राण्यांचे बळी देखील देत होतो. काबुन्यानवर आमचा विश्‍वास होता आणि मला बायबलच्या देवाची काहीच माहिती नव्हती.” ते स्वतःला कॅथलिक म्हणवून घेत होते तरीपण त्यांची ही गत होती.

एकदा यहोवाच्या साक्षीदारांचे सेवक त्या भागात प्रचाराला आले. लिंगबाउआनशी त्यांची भेट झाल्यावर त्यांनी त्यांना बायबल वाचायला उत्तेजन दिले. ते आठवून सांगतात: “बायबलनेच माझी खात्री पटवली की, यहोवाच खरा देव आहे.” त्यानंतर एका साक्षीदाराने त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास केला आणि लिंगबाउआनने खऱ्‍या देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली जुनी जीवनशैली सोडून दिली, जमातीचा प्रमुख म्हणून असलेले पदही त्यागले; यामुळे स्थानीय पाळकाचा आणि लिंगबाउआनच्या पूर्वीच्या सहकाऱ्‍यांचा रोष त्यांच्यावर ओढवला. लिंगबाउआनने मात्र बायबलमधील सत्यांचे पालन करण्याचा निश्‍चय केला होता. आता ते मंडळीत वडील या नात्याने सेवा करतात.

सात दिवस, सहा रात्र

आब्रातील काही भागांमध्ये आता प्रचाराचे काम फार नियमितपणे चालत असले तरी इतर भाग दूर आहेत आणि तेथे केव्हा तरी साक्ष दिली जाते. काही काळाआधी, यातील एका भागात साक्ष देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ३५ साक्षीदारांचा एक समूह आब्रातील टीनेग या नेमून न दिलेल्या क्षेत्रात प्रचार करायला निघाला; २७ वर्षांपासून येथे साक्ष देण्यात आली नव्हती.

प्रचाराच्या या मोहीमेकरता सात दिवसांचा पायीच प्रवास करण्यात आला. सगळी साधनसामुग्री घेऊन झुलते पूल, खोल नद्या पार करण्याची आणि तासन्‌तास डोंगर कडांवरून चालण्याची कल्पना करा; ही सगळी धडपड, ज्या लोकांना क्वचितच सुवार्ता ऐकायला मिळते त्यांच्याकरता होती! प्रवासाच्या सहा रात्रींमधील चार रात्री आकाशाखाली खुल्या हवेत झोपून काढण्यात आल्या.

या मोहीमेत असलेल्या साक्षीदारांनी आपल्यापुरता अन्‍नाचा साठा घेतला होता तरीपण संपूर्ण प्रवासात पुरेल इतका साठा त्यांना नेता आला नाही. पण खायची त्यांना अडचण नव्हती कारण लोकांनी साक्षीदारांजवळची बायबल आधारित प्रकाशने घेऊन त्या बदल्यात त्यांना अगदी आनंदाने खायच्या वस्तू दिल्या. साक्षीदारांना मासे, हरणाचे मांस आणि भाजी-पाला वगैरे भरपूर मिळाले. अर्थात काही बाबतीत त्यांची गैरसोय झाली तरीपण त्या गटातील साक्षीदारांचे असे म्हणणे होते की, “आम्हाला जे त्याग करावे लागले ते आम्हाला झालेल्या आनंदाने भरून काढले.”

सात दिवसांमध्ये, या सेवकांनी दहा गावांना भेटी दिल्या, ६० पुस्तके, १८६ मासिके, ५० माहितीपत्रके आणि असंख्य पत्रिका वाटल्या. बायबल अभ्यास कसा करायचा हे त्यांनी ७४ लोकांच्या गटांना प्रत्यक्षात करून दाखवला. टीनेग नगरात, स्थानीय अधिकाऱ्‍यांच्या व काही मान्यवर नागरिकांच्या सहमतीने एका मंडळीची सभा भरवण्यात आली आणि त्याकरता ७८ लोक उपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्यांमध्ये बहुतेकजण शिक्षक आणि पोलिस होते. आणखी टिंजियन लोक ‘जयघोश करण्यात’ आणि टेकड्यांच्या माथ्यांवरून यहोवाची स्तुती करण्यात सामील होतील अशी आशा आहे.

सोन्यापेक्षाही उत्तम

फिलिपीन्सच्या दक्षिणेकडे काही बेटे आहेत जेथे स्पॅनिश लोकांना सोन्याच्या खाणी सापडल्या. यामुळे त्या बेटांना मिंडोरो हे नाव पडले; मिना दे ओरो, किंवा “सोन्याची खाण” या स्पॅनिश शब्दांचे हे संक्षिप्त रूप आहे. परंतु, त्या बेटांवर आता सोन्यापेक्षाही उत्तम असे काहीतरी मिळू लागले आहे; आणि ते आहे, खरा देव, यहोवा याची सेवा करू इच्छिणारे लोक.

मिंडोरोच्या जंगलांच्या अगदी आंतरिक भागात मांगयान जमातीचे १,२५,००० स्थानिक लोक राहतात. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असून ते सहसा बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत आणि त्यांची एक वेगळीच भाषा आहे. बहुतेकजण निसर्गाची तसेच अनेक देवांची भक्‍ती करतात आणि निसर्गातील विविध आत्म्यांवर विश्‍वास ठेवतात.

काही वेळा, त्यांना अन्‍न किंवा इतर काही वस्तू कमी पडतात तेव्हा एक-एकटे मांगयान लोक किनारपट्टीच्या भागांमध्ये काम शोधायला येतात. पाइलिंगच्या बाबतीत हेच घडले; तो बटांगान या मांगयान जमातीच्या उप-जमातीतला आहे. तो डोंगरांतील जंगलात आपल्या लोकांबरोबर लहानाचा मोठा झाला होता व बटांगान विश्‍वास व धार्मिक रूढींचे तो पालन करत होता. कमरेभोवती एक कापड हाच बटांगान स्त्रीपुरूषांचा साधा पोषाख आहे. चांगले पीक मिळण्यासाठी बटांगान लोक कोंबडी कापतात आणि तिचे रक्‍त पाण्यात सांडत असताना प्रार्थना करतात.

पण पाइलिंग आता त्या परंपरा पाळत नाही. का बरे? तो खालच्या सखल प्रदेशात गेला तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबांकडे त्याला काम मिळाले. एका कुटुंबाने या संधीचा फायदा घेऊन पाइलिंगला बायबलमधील सत्याविषयी सांगितले. त्याने चांगला प्रतिसाद दिला आणि मानवांकरता व पृथ्वीकरता यहोवाच्या उद्देशाविषयी शिकण्याचे महत्त्व त्याला कळाले. त्यांनी त्याला प्राथमिक शाळेत घातले तसेच त्याच्यासोबत बायबलचा अभ्यासही केला. पाइलिंग २४ वर्षांचा झाल्यावर त्याने यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. वयाच्या ३० व्या वर्षी तो उच्च शाळेतल्या दुसऱ्‍या वर्षात होता आणि त्याने शाळेलाच आपले प्रचाराचे क्षेत्र बनवले. आता त्याला रोलांडो (सखल प्रदेशातील एक नाव) या नावाने बोलवले जाते.

आता तुम्ही रोलांडोला भेटलात तर तुम्हाला नीट पेहरावातील एक हसरा सेवक दिसेल जो मिंडोरोतील एका मंडळीत पूर्ण-वेळेचा प्रचारक आणि सेवा सेवक या नात्याने कार्य करत आहे. रोलांडो अलीकडेच डोंगरातील आपल्या गावात परत गेला; पण, बटांगान लोकांच्या परंपरांमध्ये भाग घ्यायला नव्हे तर बायबलमधील जीवन देणारी सत्ये सांगायला.

राज्य सभागृह मिळवण्यास उत्सुक

बुकिडनॉन (सेबुआनो भाषेत याचा अर्थ “डोंगरांचे लोक” असा होतो) हे प्रांत मिन्डानोच्या दक्षिण बेटावर वसलेले आहे. या परिसरात पर्वत, निदऱ्‍या, नदी खोरे आणि पठारे आहेत. येथील सुपीक जमिनीत अननस, मका, कॉफी, भात आणि केळी यांची लागवड केली जाते. टालांडिग आणि हिगाओनॉन या डोंगरातील जमाती तेथे वस्ती करतात. या लोकांनाही यहोवाविषयी शिकण्याची गरज आहे. अलीकडेच, एका आगळ्यावेगळ्या पद्धनीने टालाकागच्या नगराजवळ ही संधी प्राप्त झाली.

डोंगर चढणाऱ्‍या साक्षीदारांना तिथले वातावरण थंड वाटले परंतु त्यांचे स्वागत फार उबदारपणे करण्यात आले. तेथील लोकांचे म्हणणे होते की ते सर्वशक्‍तिमान देव, पिता यावर विश्‍वास करतात परंतु त्याचे नाव त्यांना ठाऊक नव्हते. आपला बहुतेक वेळ ते जंगलात घालवत असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांशी त्यांची पहिल्यांदाच भेट होत होती. त्यांना, देवाचे नाव व राज्यासंबंधी असलेला त्याचा अद्‌भुत उद्देश यांविषयी सांगण्यात आले. हे ऐकून लोकांना आनंद झाला आणि म्हणून त्यांच्या गावाला पुढे आणखी भेटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर त्या गावी अनेक भेटी देण्यात आल्या. परिणाम असा झाला की, स्थानीय लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या “घरासाठी” एक जागा देऊ केली. साक्षीदारांनी आनंदाने ती स्वीकारली. ही जागा तेथील सर्वात उंच डोंगरावर होती आणि तेथून खालचा रस्ता दिसत होता. लाकूड, बांबू आणि माडाची पाने वापरून बांधकाम करण्यात आले. हे काम पूर्ण करायला तीन महिने आणि दहा दिवस लागले. “यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह” ही पाटी अगदी समोरच लावण्यात आली. कल्पना करा, मंडळी स्थापन होण्याआधीच राज्य सभागृह तयार!

त्यानंतर, पूर्ण-वेळेचे सेवक असलेले एक वडील आणि एक सेवा सेवक तेथे राहायला गेले. शेजारच्या परिसरातील साक्षीदारांच्या साहाय्याने मंडळी स्थापन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. १९९८ सालच्या ऑगस्ट महिन्यात या प्रयत्नाला यश मिळाले. सध्या एक लहानशी मंडळी या राज्य सभागृहाचा उपयोग करून डोंगराळ प्रदेशातील लोकांना बायबलमधील सत्य शिकण्यास मदत करत आहे.

खरोखर यहोवाने, फिलिपीन्समधील इच्छुक सेवकांचा कठीणातल्या कठीण ठिकाणी देखील राज्याचे सत्य पोहंचवण्याच्या कार्यासाठी भरपूर उपयोग करून घेतला आहे. आपल्याला यशया ५२:७ ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, जेथे म्हटले आहे: “जो सुवार्ता सांगतो . . . त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.”

[११ पानांवरील नकाशे]

आब्रा

मिंडोरो

बुकिडनॉन

[चित्राचे श्रेय]

पृथ्वीचा गोल: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[१० पानांवरील चित्रे]

डोंगराळ भागांमध्ये प्रचार करणे म्हणजे तासन्‌तास खाबडखुबड प्रदेशातून प्रवास करणे

[१० पानांवरील चित्र]

डोंगरातील एका ओढ्यात बाप्तिस्मा