रस्सलच्या लिखाणांचे प्रशंसक असणारे दोन पाळक
रस्सलच्या लिखाणांचे प्रशंसक असणारे दोन पाळक
यहोवाच्या ख्रिस्ती उपासकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे चार्ल्स टेज रस्सल, यांनी १८९१ साली पहिल्यांदा युरोपला भेट दिली. काही वृत्तांनुसार, त्यांनी इटलीत पीनेरॉलो नगरात मुक्काम केला तेव्हा त्यांची भेट प्राध्यापक दान्येले रीव्हवॉर यांच्याशी झाली. रीव्हवॉर हे वॉल्देन्सिस नावाच्या एका धार्मिक गटात पूर्वी पाळक होते. * पाळक पदाचा त्याग केल्यावरही रीव्हवॉर यांचा वॉल्देन्सिस गटाशी जवळचा संबंध होता. पण ते खुल्या मनाचे होते आणि सी. टी. रस्सल यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले होते.
रीव्हवॉर यांनी १९०३ साली, रस्सल यांच्या द डिव्हाईन प्लॅन ऑफ दी एजेस या ग्रंथाचा इटालियन भाषेत अनुवाद केला आणि स्वखर्चाने त्याचे मुद्रणही करून घेतले. या ग्रंथाची अधिकृत इटालियन आवृत्ती प्रकाशित होण्याच्या कित्येक वर्षांआधी हे घडले. ग्रंथाच्या प्रस्तावनेत रीव्हवॉर यांनी असे लिहिले: “ही पहिली इटॅलियन आवृत्ती आम्ही प्रभूच्या हाती सोपवीत आहोत. यावर तो आपला आशीर्वाद देवो; जेणेकरून, त्यात त्रुटी असल्या तरी त्याच्या अतिपवित्र नामाचे गौरव व्हावे आणि त्याच्या इटालियन भाषिक लेकरांना अधिक भक्तिभावे त्याची सेवा करण्याची प्रेरणा मिळावी. हा ग्रंथ वाचल्यामुळे देवाच्या प्रेमळ योजनेची अगाध समृद्धता, बुद्धिमत्ता आणि ज्ञान यांविषयी ज्या कुणाच्या अंतःकरणात प्रशंसा निर्माण होईल त्याने देवाचेच आभार मानावेत कारण त्याच्याच कृपेने या लिखाणाचे प्रकाशन शक्य झाले आहे.”
रीव्हवॉर यांनी झायन्स वॉचटावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्स प्रेझेन्स याचाही इटॅलियन भाषेत अनुवाद करण्यास सुरवात केली. १९०३ साली ते त्रैमासिक म्हणून प्रकाशित होत होते. याच नियतकालिकाने नंतर टेहळणी बुरूजचे रूप घेतले. प्राध्यापक रीव्हवॉर स्वतः कधीही बायबल विद्यार्थी बनले नाहीत (यहोवाच्या साक्षीदारांना त्या काळात बायबल विद्यार्थी म्हणून ओळखत) पण बायबल विद्यार्थ्यांच्या प्रकाशनांत स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे बायबलच्या संदेशाचा त्यांनी हिरीरीने प्रसार केला.
“माझ्या डोळ्यांवरून खपल्या पडल्यासारखे झाले”
रस्सल यांच्या प्रकाशनांची मनस्वी कदर करणारे आणखी एक वॉल्देन्सियन पाळक होते. त्यांचे नाव जुझेप्पे बांगकेट्टी. जुझेप्पेंच्या वडिलांनी कॅथलिक धर्मातून धर्मांतर केले होते आणि त्यांनी जुझेप्पे यांच्यावर वॉल्देन्सियन संस्कार केले. १८९४ साली जुझेप्पे पाळक बनले आणि त्यांनी एल्बा व सिसिली या बेटांवर ॲप्युलिया व ॲब्रुझी येथे अनेक वॉल्देन्सियन समुदायांची सेवा केली.
रस्सलच्या द डिव्हाईन प्लॅन ऑफ दी एजेस या ग्रंथाची अधिकृत इटालियन आवृत्ती १९०५ साली प्रसिद्ध झाली. बांगकेट्टी यांनी त्यावर अतिशय उत्साही समीक्षा लिहिली होती. ती ला रीव्हीस्ता क्रीस्तीयाना या प्रोटेस्टंट नियतकालिकात प्रकाशित झाली. बांगकेट्टींनी लिहिले: “आमच्या मते, पवित्रशास्त्राचा हितकारक व संतुष्टीदायक अभ्यास हाती घेणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला [रस्सल यांचा ग्रंथ] अतिशय उद्बोधक आणि विश्वासार्ह मार्गदर्शक असल्याचे आढळेल. . . . हा ग्रंथ वाचून काढताच मला जणू माझ्या डोळ्यांवरून खपल्या पडल्यासारखे झाले; देवाकडे नेणारी वाट पूर्वीपेक्षा सरळ आणि सोपी वाटू लागली. पूर्वी जे विरोधाभास वाटायचे त्यातले बहुतेक रोमकर ११:३३.
नाहीसे झाले. एकेकाळी क्लिष्ट वाटणारे सिद्धान्त सुज्ञेय आणि सर्वतोपरी स्वीकारणीय वाटू लागले. पूर्वी अनाकलनीय वाटणाऱ्या गोष्टी सुस्पष्ट झाल्या. ख्रिस्ताद्वारे या जगाच्या तारणाकरता देवाने केलेली अद्भुत योजना माझ्या डोळ्यांसमोर इतकी आश्चर्यकारकपणे स्पष्ट झाली की मला प्रेषित पौलाप्रमाणे असे म्हटल्याशिवाय राहावले नाही: ‘अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!’”—१९२५ साली रेमीझो कुमीनेटी यांनी निरीक्षण केल्याप्रमाणे बांगकेट्टी यांनी बायबल विद्यार्थ्यांच्या कार्याबद्दल “बऱ्याच प्रमाणात सहमती” दर्शवली आणि बायबल सिद्धान्तांवरील त्यांच्या स्पष्टीकरणाविषयी बांगकेट्टी यांना ‘पूर्ण खात्री पटली होती.’ त्यांनीसुद्धा आपल्यापरीने या शिकवणुकींचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
बांगकेट्टी यांच्या लिखाणांवरून हे स्पष्ट होते, की यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे त्यांना देखील बायबलमध्ये शिकवल्यानुसार पृथ्वीवरील पुनरुत्थानावर विश्वास होता. तसेच दानीएलाच्या ७० सप्ताहांच्या भविष्यवाणीत येशूच्या मृत्यूचे वर्ष देवाने आधीच निश्चित केले होते व प्रगटही केले होते असे स्पष्टीकरण देतानासुद्धा ते बायबल विद्यार्थ्यांशी सहमत होते. (दानीएल ९:२४-२७) कित्येकदा त्यांनी आपल्या चर्चच्या शिकवणुकींच्या अगदीच विरोधात असे प्रतिपादित केले की येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी वर्षातून केवळ एकदा आणि “ज्या दिवशी तो येतो केवळ त्याच दिवशी” पाळला जावा. (लूक २२:१९, २०) त्यांनी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त अमान्य केला आणि खऱ्या ख्रिस्ती लोकांनी जगिक युद्धांत भाग घेऊ नये या मताला दुजोरा दिला.—यशया २:४.
एके प्रसंगी, बांगकेट्टी रस्सल यांच्या लिखाणांच्या संदर्भात जे. कॅम्पबेल वॉल नावाच्या एका माणसाशी चर्चा करत होते. वॉल यांच्या टीकेचे उत्तर देताना, बांगकेट्टी यांनी असे म्हटले: “मला खात्री आहे की तुम्ही रस्सल यांच्या ग्रंथाचे सहा खंड वाचले तर तुम्हाला एकप्रकारच्या उत्फुल्ल आणि गहिऱ्या आनंदाचा अनुभव येईल आणि तुम्ही माझे मनापासून आभार मानाल. मी धर्मतत्त्वांचे ज्ञान मिरवीत नाही. पण ही पुस्तके मात्र मी अकरा वर्षांपूर्वी वाचली आणि तेव्हापासून मी दररोज देवाची उपकारस्तुती करतो की त्याने माझ्या समोर हा प्रकाश चमकू दिला आणि सर्वस्वी पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या या लिखाणाच्या माध्यमाने मला मोठे सांत्वन दिले.”
“ऐकले पाहिजे”
दान्येले रीव्हवॉर आणि जुझेप्पे बांगकेट्टी या दोन वॉल्देन्सियन पाळकांनी, बायबल शिकवणुकींवर रस्सल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणांविषयी प्रशंसा व्यक्त केली हे दखल घेण्याजोगे आहे. बांगकेट्टी यांनी लिहिले: “मी तर म्हणतो की आपल्या इव्हॅन्जेलिकल पंथीयांपैकी एकालाही, अगदी आपल्या पाळकांना किंवा धर्मविज्ञानाच्या प्राध्यापकांनासुद्धा सर्व गोष्टींचे ज्ञान नाही. नव्हे, उलट आपल्याला शिकण्यासारख्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत. . . . आपल्याला सर्वकाही समजते असे मानण्याऐवजी, आणि परीक्षण करण्यासाठी काही दिले जाते तेव्हा नको म्हणण्याऐवजी, . . . [आपण] थांबून . . . ऐकले [पाहिजे]. होय, आपण ऐकले पाहिजे.”
दर वर्षी हजारो लोक यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या दारापर्यंत आणलेला राज्य संदेश ऐकतात. बायबलमधील सत्यांची तहान असणारे सबंध जगातील खुल्या मनाचे लोक “चल, माझ्यामागे ये” या येशूच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत आहेत.—मार्क १०:१७-२१; प्रकटीकरण २२:१७.
[तळटीप]
^ परि. 2 फ्रान्समधील लायॅन्स येथील १२ व्या शतकात होऊन गेलेल्या पिएर वॉदे किंवा पीटर वॉल्दो या व्यापाऱ्याच्या नावावरून या गटाचे नाव पडले. वॉल्दो यांना त्यांच्या विश्वासांमुळे कॅथलिक चर्चमधून बहिष्कृत करण्यात आले. वॉल्देन्सेस यांच्याविषयी सविस्तर माहितीकरता टेहळणी बुरूज मार्च १५, २००२ अंकातील “वॉल्देन्सेस—पाखंडापासून प्रोटेस्टंट धर्मापर्यंत” हा लेख पाहा.
[२८ पानांवरील चित्र]
प्राध्यापक दान्येले रीव्हवॉर
[२९ पानांवरील चित्र]
जुझेप्पे बांगकेट्टी
[चित्राचे श्रेय]
बांगकेट्टी: La Luce, April १४, १९२६