व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्रार्थनेच्या शेवटी “येशूच्या नावाने” असे न म्हणता देवाला प्रार्थना करणे योग्य आहे का?

बायबल दाखवते, की यहोवाला प्रार्थना करू इच्छिणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” तो पुढे असेही म्हणाला: “पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.”—योहान १४:६, १३, १४.

येशूच्या अनोख्या हुद्द्‌याविषयी सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिओलॉजिकल, ॲण्ड एक्लेसिॲस्टिकल लिटरेचर म्हणते: “प्रार्थना ही केवळ देवाला केली पाहिजे आणि तीही मध्यस्थ असलेल्या येशूद्वारे. त्यामुळे, संतांना किंवा देवदूतांना केलेल्या सर्व विनवण्या फक्‍त निरर्थकच नव्हे तर निंदास्पद आहेत. सृष्टीची उपासना, मग ती सृष्टी कितीही श्रेष्ठ असली तरी ती मूर्तीपूजाच आहे; आणि देवाच्या पवित्र नियमशास्त्रात मूर्तीपूजा ही पूर्णपणे निषिद्ध आहे.”

परंतु समजा, एखादे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर ती व्यक्‍ती, “येशूच्या नावाने” असे न म्हणता फक्‍तच “यहोवा बापा, तुझे आभार मानतो,” असे म्हणत असेल तर? हे अनुचित आहे का? नाही. समजा, एका ख्रिस्ती व्यक्‍तीसमोर अचानक धोका उद्‌भवतो आणि ती लगेच “देवा, मला मदत कर,” अशी याचना करते तेव्हा त्या व्यक्‍तीने “येशूच्या नावाने” असे म्हटले नाही म्हणून देव त्या व्यक्‍तीला मदत करण्यास नकार देईल का?

परंतु एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे; ती म्हणजे फक्‍तच मोठ्याने देवाशी बोलणे म्हणजे ती प्रार्थना झाली असे नव्हे. उदाहरणार्थ, काईनाने आपला भाऊ हाबेल याचा वध केल्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा दिल्यानंतर काईन म्हणाला: “हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. पाहा, ह्‍या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे; मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार; आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील, असे होईल.” (उत्पत्ति ४:१३, १४) काईनाने यहोवाला उद्देशून हे उद्‌गार काढले असले तरी, खरे तर तो पापाच्या कडू फळाविषयी कुरकूर करत होता.

बायबल आपल्याला सांगते: “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” क्षुद्र मनुष्याशी आपण बोलतो तसे सर्वोच्च देवाशी आपण बोललो तर आपल्यात नम्रतेची उणीव असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल. (याकोब ४:६; स्तोत्र ४७:२; प्रकटीकरण १४:७) शिवाय, देवाचे वचन येशूच्या भूमिकेविषयी काय म्हणते हे माहीत असून मुद्दामहून येशू ख्रिस्ताला मान्यता न देता प्रार्थना करणे म्हणजे त्याचा अनादर करण्यासारखे आहे.—लूक १:३२, ३३.

याचा अर्थ असा होत नाही, की एका विशिष्ट पद्धतीने किंवा ठरवून दिलेल्या नमुन्यानुसारच प्रार्थना करण्याची अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो. तर, उचित अंतःकरणाने प्रार्थना करणे सर्वात महत्त्वाचे आहे. (१ शमुवेल १६:७) सा.यु. पहिल्या शतकात, कर्नेल्य नावाच्या एका रोमी सेना अधिकाऱ्‍याने, “देवाची नित्य प्रार्थना” केली. कर्नेल्य हा सुंता न झालेला विदेशी मनुष्य देवाला समर्पित नव्हता. त्याने येशूच्या नावाने प्रार्थना केल्याची तितकिशी शक्यता नाही, तरीसुद्धा त्याच्या प्रार्थना ‘देवासमोर स्मरणार्थ आल्या.’ का? कारण, ‘हृदये पारखणाऱ्‍या’ देवाने पाहिले होते, की कर्नेल्य हा “नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा” मनुष्य होता. (प्रेषितांची कृत्ये १०:२, ४; नीतिसूत्रे १७:३) ‘नासोरी येशूचे’ ज्ञान घेतल्यानंतर कर्नेल्यला पवित्र आत्मा मिळाला आणि तो येशूचा बाप्तिस्मा घेतलेला शिष्य बनला.—प्रेषितांची कृत्ये १०:३०-४८.

एकंदरीतच, देव कोणत्या प्रार्थना ऐकतो हे मानवांना ठरवता येत नाही. एखादी ख्रिश्‍चन व्यक्‍ती कधीतरी, “येशूच्या नावाने” असे प्रार्थनेच्या शेवटी न म्हणता देवाशी बोललीच तर, स्वतःला दोषी समजण्याची तिला काही गरज नाही. यहोवा आपल्या मर्यादा जाणतो आणि तो आपल्याला मदत करू इच्छितो. (स्तोत्र १०३:१२-१४) होय, ‘देवाच्या पुत्रावर विश्‍वास’ ठेवून आपण “त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल,” हा भरवसा आपण ठेवू शकतो. (१ योहान ५:१३, १४) परंतु, सर्वांच्या वतीने प्रार्थना करताना खरे ख्रिस्ती, शास्त्रवचनांनुसार यहोवाच्या उद्देशांतील येशूची भूमिका कबूल करतात. आणि त्याच्याद्वारे देवाला प्रार्थना करून ते आज्ञाधारकपणे येशूच्या नावाचा आदर करतात.