व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सध्याची सुरक्षा सर्वकाळची सुरक्षा

सध्याची सुरक्षा सर्वकाळची सुरक्षा

सध्याची सुरक्षा सर्वकाळची सुरक्षा

सुरक्षा मिळवणे इतके कठीण का आहे आणि मिळालीच तर ती फार काळ का टिकत नाही? आपल्याला वाटणारी सुरक्षा कल्पनेवर आधारलेली आहे का, अर्थात प्राप्त करण्याजोग्या गोष्टीवर नव्हे तर प्राप्त करण्याची आशा असलेल्या गोष्टीवर? परंतु ही भ्रांती म्हणजे स्वप्नाच्या दुनियेत रमणे.

कल्पनाविश्‍वात रमणारी व्यक्‍ती वास्तविक जीवन आणि त्यातील असुरक्षितपणा मनातून काढून सुंदर, सुरक्षित परिस्थितीचे स्वप्न पाहते आणि स्वप्नाच्या आड येणाऱ्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. परतुं, वास्तविक जगातील समस्यांनी सहसा, सुखी समाधानी जीवनाच्या स्वप्नाचा भंग होऊन स्वप्नात रमलेली व्यक्‍ती खरोखरच्या जीवनाला जागी होते.

लोकांना सुरक्षा वाटणारी एक गोष्ट आपण पाहू या—भौगोलिक ठिकाण. उदाहरणार्थ, मोठे शहर, मोठमोठी आश्‍वासने देईल, सुखचैन, लठ्ठ पगाराची नोकरी, शानदार घर यांची स्वप्ने दाखवील. आपल्याला हवी असलेली सुरक्षा या गोष्टींद्वारे मिळण्याची आशा दिसेल. पण ही आशा वास्तविक आहे का?

ठिकाण—मोठे शहर की मोठी कल्पना?

विकसनशील देशांमध्ये, आकर्षक जाहिरातींद्वारे मोठ्या शहराचे आकर्षण दाखवले जाते. अशा जाहिराती देणाऱ्‍या संघटनांना खरे तर तुमच्या सुरक्षेबद्दल नव्हे तर त्यांच्या विक्रीबद्दल काळजी असते. यश मिळवल्याने सुरक्षा मिळते अशी दृश्‍ये दाखवून ते खऱ्‍या जीवनातल्या समस्या लपवतात. अशाप्रकारे, सुरक्षा म्हणजे त्यांच्या जाहिरातीतले उत्पादन आणि मोठे शहर अशी सांगड बसते.

पुढील उदाहरण पाहा. एका पश्‍चिम आफ्रिकी शहरातल्या अधिकाऱ्‍यांनी ठिकठिकाणी असे फलक लावले ज्यांवर अगदी स्पष्टपणे असे दाखवले होते की, धूम्रपान करणे हे वास्तविकतेत कष्टाच्या पैशांना आग लावण्यासारखे आहे. नागरिकांना धूम्रपानाच्या धोक्यांचा इशारा देण्यासाठी काढलेल्या मोहीमेचा हा भाग होता. पण सिगारेट उत्पादकांनी आणि विक्रेत्यांनी अशा चालबाज जाहिरातींचे फलक लावले ज्यांमध्ये धूम्रपान करणाऱ्‍यांना ऐषारामाच्या व यशाच्या आकर्षक दृश्‍यांमध्ये दाखवण्यात आले होते. शिवाय, एका सिगारेट कंपनीने आपल्या काही कामगारांना आकर्षक पोषाख आणि स्टाईलबाज बेसबॉल कॅप घालून रस्त्यावरील तरुणांना सिगारेटी वाटल्या आणि प्रत्येकाला निदान एक तरी ‘ओढून पाहण्याचे’ प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागातून आलेले अनेक तरुण या चालबाज जाहिरातीच्या पद्धतींविषयी अज्ञानी असल्यामुळे ते लगेच फसले. त्यांना त्याचे व्यसन जडले. ग्रामीण भागांतून आलेले हे तरुण आपल्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा किंवा जास्त पैसा कमवण्यासाठी मोठ्या शहरात सुरक्षा प्राप्त करायला आले होते. पण, ज्या पैशाचा चांगला उपयोग करता आला असता त्याची ते राख करत होते.

फक्‍त व्यापारी, मोठ्या शहरातल्या यशस्वी जीवनाचे चित्रण करत नाहीत. कदाचित, मोठ्या शहरात गेल्यावर पुन्हा आपल्या गावी जायला लाजत असलेले लोक शहरी जीवनाचे गुणगान करू शकतात. आपण शहरात येऊन अपयशी ठरलो असे लोकांना दिसू नये म्हणून मोठ्या शहरात मिळालेल्या तथाकथित संपत्तीची आणि यशाची ते फुशारकी मारतात. परंतु, त्यांच्या ‘स्थितीचे’ जवळून परीक्षण केल्यास, त्यांचे सध्याचे जीवन गावातल्या जीवनापेक्षा फारसे वेगळे नसून शहरातल्या इतर लोकांप्रमाणेच तेही पैसा मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे लक्षात येते.

या मोठ्या शहरांमध्येच, सुरक्षेच्या शोधात आलेले नवीन लोक फसवणाऱ्‍यांच्या जाळ्यात सापडतात. का? कारण त्यांना सहसा चांगल्या ओळखी निर्माण करायला वेळ मिळालेला नसतो आणि घरापासून ते दूर असतात. त्यामुळे त्यांना, भौतिकवादी शहरी जीवनाचे पाश टाळण्याचा सल्ला देणारे कोणी नसते.

जोझ्वे धूम्रपानाच्या जाळ्यात फसला नाही. शिवाय, शहरी जीवनाच्या मागण्या योग्यपणे पूर्ण करण्याची कुवत त्याच्यामध्ये नाही हे त्याला कळून चुकले. त्याच्या बाबतीत तरी, शहराकडून एकच गोष्ट त्याला मिळू शकत होती—मोठी, अपुरी स्वप्ने. त्याच्या लक्षात आले की, शहरामध्ये त्याला खरी सुरक्षा नव्हती; किंबहुना, हे ठिकाणच त्याच्यासाठी योग्य नव्हते. त्याला एकटेपणा आणि कमीपणा वाटू लागला आणि आपण अपयशी ठरलो असे वाटू लागले; मग शेवटी त्याने आपला स्वाभिमान गिळला आणि तो पुन्हा आपल्या गावी परतला.

आपली थट्टा केली जाईल अशी त्याला भीती वाटत होती. उलट, त्याच्या घरातल्या लोकांनी आणि त्याच्या खऱ्‍या मित्रांनी त्याचे मनापासून स्वागत केले. घरातल्या लोकांकडून मिळालेले प्रेम, गावचा परिसर आणि ख्रिस्ती मंडळीतल्या मित्रांची आपुलकी या सर्व गोष्टींमुळे त्याला मोठ्या शहरापेक्षा (जेथे लोकांची स्वप्ने दुःस्वप्ने बनतात) गावातच जास्त सुरक्षित वाटू लागले. त्याच्या वडिलांसोबत शेतात कष्ट केल्याने शहरात मिळणाऱ्‍या मिळकतीपेक्षा तो जास्त कमवत होता हे पाहून त्याला आश्‍चर्यच वाटले.

पैसा—खरी समस्या काय आहे?

पैशाने सुरक्षा मिळू शकते का? कॅनडातील लिझ म्हणते: “तरुणपणी मला वाटायचं की, पैशामुळे सर्व चिंता नाहीशा होतात.” एका श्रीमंत मनुष्याच्या ती प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. आता तिला सुरक्षा मिळाली का? लिझ पुढे म्हणते: “मी लग्न केलं तेव्हा आमचं एक छान घर होतं, दोन गाड्या होत्या; आम्हाला कशाचीच कमी नव्हती; भौतिक गोष्टी, प्रवास, मनोरंजनाच्या बाबतीत तर आम्ही हव्या त्या गोष्टी मिळवू शकत होतो. पण, तरीसुद्धा मला पैशांची चिंता होती.” त्याचे कारण ती पुढे सांगते: “आमच्याजवळ इतकं होतं की काही नुकसान होईल की काय याची मला चिंता वाटायची. उलट, जितकं जास्त आपल्याजवळ असतं तितकंच असुरक्षित वाटू लागतं. पैशानं आमच्या काळज्या किंवा चिंता सुटल्या नाहीत.”

आपल्याजवळ पुरेसा पैसा नाही असे तुम्हाला वाटल्यास, विचार करा, ‘खरी समस्या काय आहे? पैशांची कमी आहे की, पैसे हाताळण्याच्या योग्य पद्धतीची उणीव आहे?’ आपल्या गतकाळाचा विचार करून लिझ म्हणते: “आता मला कळतं की, मी लहान होते तेव्हा माझ्या कुटुंबात पैसा योग्यरीतीने हाताळला जात नव्हता म्हणून आम्हाला समस्या होत्या. आम्ही उधारीवरच सगळं घेत होतो त्यामुळे आमच्या डोक्यावर सतत कर्ज असायचं. यामुळे चिंता निर्माण व्हायची.”

पण आज लिझ आणि तिचा पती पूर्वीइतके श्रीमंत नसले तरी त्यांना जास्त सुरक्षित वाटते. देवाच्या वचनाचे सत्य शिकल्यावर ते पैसा मिळवण्याच्या आकर्षक दाव्यांऐवजी देवाच्या सुज्ञतेकडे कान देऊ लागले: “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.” (नीतिसूत्रे १:३३) बँकेत भरपूर पैसा असण्यापेक्षा त्यांना आपल्या जीवनाला अधिक अर्थ असावा असे वाटत होते. आता, एका दूरच्या देशात मिशनरी या नात्याने लिझ आणि तिचा पती श्रीमंतांना तसेच गरिबांना हे शिकवत आहेत की, लवकरच यहोवा देव संपूर्ण पृथ्वीवर खरी सुरक्षा आणणार आहे. या कार्यामुळे मनाला समाधान आणि स्थैर्य मिळते कारण त्यामागे उदात्त हेतू आणि उच्च मूल्ये आहेत जे पैशाने प्राप्त होत नाही.

एक मूलभूत सत्य लक्षात ठेवा की, भौतिक धनापेक्षा देवाच्या नजरेत धनवान असणे ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. सबंध पवित्र शास्त्रामध्ये भौतिक धनावर नव्हे तर यहोवासोबत चांगला नातेसंबंध असण्यावर जोर दिला आहे आणि हा चांगला नातेसंबंध विश्‍वासाने देवाची इच्छा नित्य करत राहिल्याने टिकवून ठेवता येऊ शकतो. येशू ख्रिस्ताने आपल्याला “देवविषयक बाबतीत धनवान” होण्यास आणि ‘स्वर्गात धन’ साठवण्यास उत्तेजन दिले.—लूक १२:२१, ३३.

पद—तुम्ही कोठे जात आहात?

समाजात मोठे पद मिळवणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग आहे असा विचार करण्याचा मोह तुम्हाला होत असल्यास, स्वतःला विचारा: ‘मोठे पद प्राप्त केलेल्या कोणाकडे खरी सुरक्षा आहे? ती सुरक्षा प्राप्त करण्यासाठी कोठपर्यंत पोहंचावे लागेल?’ यशस्वी कारकीर्दीमुळे सुरक्षितपणाचा फक्‍त भास होऊ शकतो ज्यामुळे निराशा किंवा त्याहून वाईट म्हणजे नुकसान होऊ शकते.

मनष्यांमध्ये नाव कमवण्यापेक्षा देवापुढे चांगले नाव कमवल्याने अधिक सुरक्षा मिळते हे प्रत्यक्ष अनुभवांवरून दिसून येते. फक्‍त यहोवा आपल्याला सार्वकालिक जीवनाचे बक्षीस देऊ शकतो. त्यासाठी, समाजाच्या कोणत्याही नोंदवहीत नव्हे तर देवाच्या जीवनाच्या वहीत आपल्या नावाची नोंद होण्याची गरज आहे.—निर्गम ३२:३२; प्रकटीकरण ३:५.

कल्पना करायचे सोडून वास्तविक दृष्टीतून पाहिल्यावर तुमच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते? भविष्याविषयी तुम्ही प्रामाणिकपणे काय अपेक्षा करू शकाल? कोणीही असे नाही ज्याच्याकडे सर्वकाही आहे. एका सुज्ञ ख्रिश्‍चनाने म्हटल्याप्रमाणे, “मला हे शिकावे लागले की, जीवनात हे आणि ते नव्हे तर हे किंवा ते मिळू शकते.” अंमळ थांबून “बेनिनमध्ये सांगितलेली गोष्ट” ही पेटी वाचा.

आता या प्रश्‍नांची उत्तरे द्या: माझ्या जीवनातील महत्त्वाचा मुक्काम, किंवा ध्येय कोणते आहे? तेथे पोहंचण्याचा सर्वात सरळ मार्ग कोणता आहे? मी वळसा घेऊन असुरक्षित मार्गाने तर जात नाही, आणि मला जे खरोखर हवे आहे व जे वास्तविकतेत मिळणे शक्य आहे ते जरा सोप्या पद्धतीने मिळवता येऊ शकते का?

आध्यात्मिक गोष्टींच्या तुलनेत भौतिक गोष्टींचे फारसे महत्त्व नाही याविषयी सल्ला दिल्यावर येशूने डोळा “निर्मळ” किंवा “एकरोखी” ठेवण्यास सांगितले. (मत्तय ६:२२, तळटीप, पं.र.भा.) त्याने हे स्पष्ट केले की, जीवनामध्ये देवाच्या नावावर व त्याच्या राज्यावर केंद्रित असलेली आध्यात्मिक मूल्ये आणि ध्येये सर्वात महत्त्वाची आहेत. (मत्तय ६:९, १०) इतर गोष्टी कमी महत्त्वाच्या किंवा केंद्रस्थानी नाहीत.

आज अनेक प्रकारचे कॅमरे मिळतात जे आपोआप दूरच्या आणि जवळच्या गोष्टींवर फोकस करतात. तुम्ही अशा कॅमेऱ्‍यांसारखे आहात का? तुमच्या पाहण्यातील प्रत्येक गोष्ट “फोकसमध्ये” (किंवा केंद्रस्थानी) अर्थात महत्त्वाची, इष्ट आणि कल्पनेत साध्य करण्याजोगी असते का? ही गोष्ट काही अंशी जरी खरी असली तर देवाचे राज्य हे ख्रिश्‍चनांसाठी असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट, लक्ष वेधणाऱ्‍या इतर गोष्टींमध्ये सहजगत्या लपून जाऊ शकते. येशूने असा तीव्र सल्ला दिला की, “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३३.

सध्या आणि सर्वकाळाची सुरक्षा

आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःकरता आणि आपल्या प्रिय जनांकरता स्वप्ने पाहिली असतील. परंतु, आपण अपरिपूर्ण आहोत, एका अपरिपूर्ण जगात राहत आहोत आणि आपली आयुमर्यादा सीमित आहे यामुळे वास्तविकतेत आपण मर्यादित गोष्टीच साध्य करण्याची आशा करू शकतो. एका बायबल लेखकाने हजारो वर्षांआधी असे म्हटले: “मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांसच शर्यतीत यश व वीरांसच युद्धांत विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्‍न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.”—उपदेशक ९:११.

काही वेळा जीवनाच्या नित्यक्रमात आपण इतके व्यस्त होऊन जातो की, आपण कोण आहोत आणि खरी सुरक्षा मिळवण्यासाठी आपल्याला नेमकी कशाची गरज आहे ही महत्त्वाची गोष्ट आपण विसरून जातो. प्राचीन काळातील या सुज्ञ शब्दांचा विचार करा: “जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीबद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हाही अविचार आहे. जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्त्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही.” (उपदेशक ५:१०, १२, ईजी-टू-रीड व्हर्शन) होय तुमची सुरक्षा कशात आहे?

तुमची स्थिती जोझ्वेच्या अवास्तविक स्वप्नासारखी आहे तर तुम्ही आपल्यात फेरबदल करू शकाल का? जोझ्वेचा परिवार आणि ख्रिस्ती मंडळीतील मित्रमंडळी ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे तुमच्यावर खरे प्रेम करणारे तुम्हाला निश्‍चित आधार देतील. तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांच्या शहरात राहण्याऐवजी तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांसोबत लहानशा ठिकाणी राहण्यात तुम्हाला अधिक सुरक्षा मिळेल.

तुमच्याजवळ कशाचीही कमी नसल्यास, लिझ आणि तिच्या पतीने केल्याप्रमाणे आपल्या राहणीमानात फेरबदल करून खरी सुरक्षा मिळवण्याच्या माध्यमाविषयी अर्थात देवाच्या राज्याविषयी श्रीमंतांना तसेच गरिबांना शिकवण्यात तुम्ही अधिक वेळ व श्रम खर्च करू शकाल का?

समाजात किंवा नोकरीच्या ठिकाणी वरचे पद प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असल्यास, त्यामागच्या प्रेरणेविषयी तुम्ही प्रामाणिकपणे विचार करू शकता. हे खरे की, काही सुखसोयी असल्यामुळे जीवनात अधिक आनंद मिळू शकतो. परंतु, कायमची सुरक्षा मिळवण्याचे खरे माध्यम अर्थात देवाचे राज्य याला तुम्ही सर्वात महत्त्वाचे स्थान देऊ शकता का? येशूच्या शब्दांची आठवण करा: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) ख्रिस्ती मंडळीतल्या विविध कार्यहालचालींमध्ये तुम्ही स्वतःला गोवले तर तुम्हाला त्या बदल्यात सुरक्षा अनुभवता येईल.

यहोवा आणि त्याच्या राज्यावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्‍यांना आता सुरक्षा मिळते आणि भविष्यातही संपूर्ण सुरक्षा मिळण्याची ते वाट पाहू शकतात. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “मी आपल्यापुढे परमेश्‍वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो; माझा देहहि सुरक्षित राहतो.”—स्तोत्र १६:८, ९.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

बेनिनमध्ये सांगितलेली गोष्ट

ही गोष्ट वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतींनी हजारो वेळा सांगितली आहे. अलीकडे, पश्‍चिम आफ्रिकेतील बेनिन येथे एका वृद्ध गावकऱ्‍याने ही गोष्ट काही तरुणांना ऐकवली.

एक मच्छीमार आपल्या लहानशा होडीने घरी येतो आणि घरी आल्यावर त्याला या विकसनशील देशात काम करणारा एक विदेशी तज्ज्ञ भेटतो. हा तज्ज्ञ मच्छीमाऱ्‍याला विचारतो की तू इतका लवकर घरी का आलास? त्यावर तो उत्तर देतो की, मी जास्त वेळ थांबू शकलो असतो पण माझ्या कुटुंबाकरता पुरेसे मासे मिळाले म्हणून आलो.

“मग तू रिकाम्या वेळेत काय करतोस?” तज्ज्ञ विचारतो.

मच्छीमार: “मी थोडीबहुत मच्छीमारी करतो. माझ्या मुलांबरोबर वेळ घालवतो. दुपार झाल्यावर आम्ही थोडा वेळ झोप काढतो. मग, संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. नंतर, मी माझ्या मित्रांसोबत संगीत वगैरे असं मनोरंजन करतो.”

मध्येच तो तज्ज्ञ म्हणतो: “हे पाहा, मी विद्यापीठातून पदवी मिळवली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय. मला तुला मदत करायची आहे. तू जास्त वेळ मच्छीमारी केली पाहिजेस. मग तुला जास्त पैसा कमवता येईल आणि काही दिवसांनी तुला या लहानशा होडीपेक्षा मोठी बोट विकत घेता येईल. मोठी बोट आल्यावर तू आणखी जास्त पैसे कमवू शकशील आणि पाहता पाहता तुझ्याकडे अनेक बोटी होतील.”

“आणि मग?” मच्छीमार विचारतो.

“मग, कोणा दलालाच्या मदतीने मासे विकण्याऐवजी तू कंपनीसोबत थेट व्यवहार करू शकतोस नाहीतर तू स्वतःचीच एक कंपनी काढू शकतोस. मग तू हे गाव सोडून कोटोनो किंवा पॅरिस किंवा न्यूयॉर्कमध्ये राहून सगळा व्यापार सांभाळू शकतोस. वाटल्यास, तुझा हा व्यापार शेअर बाजारात घालून तू करोडो रूपये कमवू शकतोस.”

“त्याला किती वर्षं लागतील?” मच्छीमार विचारतो.

“लागतील १५-२० वर्षं,” तज्ज्ञ म्हणतो.

“आणि मग?” मच्छीमार विचारतो.

तज्ज्ञ म्हणतो, “अरे, जीवनाची मजा तर तेव्हा सुरू होते. मग तू रिटायर होऊ शकतोस. गजबजलेल्या शहरातून दूर एखाद्या गावात तू राहायला जाऊ शकतोस.”

“आणि मग?” मच्छीमार विचारतो.

“मग काय, तू थोडीबहुत मच्छीमारी करू शकतोस, आपल्या मुलांबरोबर वेळ घालवू शकतोस, दुपार झाल्यावर थोडी झोप काढू शकतोस, कुटुंबाबरोबर जेवण करू शकतोस आणि नंतर मित्रांसोबत मिळून संगीत ऐकू शकतोस.”

[७ पानांवरील चित्रे]

बढती मिळाल्यावर आपण सुरक्षित होऊ का?

[८ पानांवरील चित्रे]

सहख्रिश्‍चनांना तुमच्या सुरक्षेची खरी काळजी आहे