व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?

यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?

यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?

“भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे.”—मलाखी ४:१.

१. मलाखी या व्यवस्थीकरणाच्या अंताचे कशाप्रकारे वर्णन करतो?

अगदी जवळच्या भविष्यात घडणार असलेल्या अद्‌भुत घटनांविषयी भाकीत करण्यासाठी देवाने संदेष्टा मलाखी यास प्रेरित केले. या घटनांचा पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्‍तीच्या जीवनावर परिणाम होईल. मलाखी ४:१ असे भाकीत करते: “पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश किती व्यापक असेल? तो अशा एका झाडासारखा असेल ज्याची मुळे नष्ट झाली आहेत, आणि जे पुन्हा कधीही वाढू शकणार नाही.

२. काही वचनांत यहोवाच्या दिवसाचे कशाप्रकारे वर्णन केले आहे?

पण तुम्ही कदाचित विचाराल, ‘मलाखी संदेष्टा कोणत्या “दिवसाविषयी” भाकीत करत होता?’ हा तोच दिवस आहे ज्याविषयी यशया १३:९ (पं.र.भा.) यात अशाप्रकारे सांगितले आहे: “पाहा, यहोवाचा दिवस येत आहे; तो कठोर आहे, आणि रोष व संतप्त क्रोध यांसहित भूमी ओसाड करायला व तिच्यातून तिच्या पातक्यांचा नाश करायला तो येत आहे.” सफन्या १:१५ त्याचे असे वर्णन करते: “हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.”

“मोठे संकट”

३. “यहोवाचा दिवस” कशास सूचित करतो?

मलाखीच्या भविष्यवाणीच्या मुख्य पूर्णतेत “यहोवाचा दिवस” हा अशा कालावधीस सूचित करतो ज्यात “मोठे संकट” येईल. येशूने याविषयी असे भाकीत केले होते: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्तय २४:२१) या जगावर, खासकरून १९१४ पासून आलेल्या असंख्य संकटांचा विचार करा. (मत्तय २४:७-१२) किंबहुना, दुसऱ्‍या महायुद्धातच पाच कोटींपेक्षा अधिक लोक बळी पडले! पण ‘मोठ्या संकटात’ अशा भयंकर घटना देखील अगदी नगण्य वाटतील. यहोवाच्या दिवसाप्रमाणेच, या मोठ्या संकटाचा देखील हर्मगिदोनात अंत होईल आणि त्या वेळी हे दुष्ट व्यवस्थीकरण संपुष्टात येईल.—२ तीमथ्य ३:१-५, १३; प्रकटीकरण ७:१४; १६:१४, १६.

४. यहोवाच्या दिवसाचा अंत होईल तेव्हा काय घडलेले असेल?

यहोवाच्या त्या दिवसाच्या अंतापर्यंत सैतानाच्या जगाचा आणि त्याच्या सर्व समर्थकांचा संपूर्ण नाश झालेला असेल. सर्वप्रथम, खोट्या धर्माचा नाश होईल. यानंतर सैतानाच्या आर्थिक आणि राजकीय संस्थांवर यहोवाचा न्यायदंड येईल. (प्रकटीकरण १७:१२-१४; १९:१७, १८) यहेज्केल भविष्यकथन करतो: “ते आपले रूपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांस आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्‍वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ति होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.” (यहेज्केल ७:१९) त्या दिवसाविषयी सफन्या १:१४ म्हणते: “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” यहोवाच्या दिवसाविषयी बायबलमध्ये दिलेली माहिती लक्षात घेऊन आपण सदोदीत त्याच्या नीतिमान अपेक्षांच्या सामंजस्यात कार्य करण्याचा निर्धार केला पाहिजे.

५. यहोवाच्या नामाचे भय मानणारे काय अनुभवतील?

यहोवाचा दिवस सैतानाच्या जगाचा कशाप्रकारे नाश करेल हे भाकीत केल्यानंतर मलाखी ४:२ यहोवाचे हे शब्द घोषित करते: “पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यांतल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.” “न्याय्यत्वाचा सूर्य” येशू ख्रिस्त आहे. तो या “जगाचा [आध्यात्मिक] प्रकाश” आहे. (योहान ८:१२) येशूचा प्रकाश रोगमुक्‍त करणारा आहे; पहिल्यांदा तो आध्यात्मिक रोगमुक्‍ती देतो, जिचा आपण आज अनुभव घेत आहोत आणि कालांतराने नव्या जगात आपण पूर्णतः शारीरिक रोगमुक्‍तीचा अनुभव घेऊ. यहोवा म्हणतो त्याप्रमाणे, रोगमुक्‍त झालेले लोक मुक्‍त झालेल्या व आनंदाने उड्या मारणाऱ्‍या ‘गोठ्यांतल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडतील.’

६. यहोवाचे सेवक कोणत्या विजयोत्सवाचा आनंद लुटतील?

यहोवाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांविषयी काय? मलाखी ४:३ म्हणते: “तुम्ही [देवाचे सेवक] दुष्टांस तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” देवाचे मानवी उपासक सैतानाच्या जगाचा नाश करण्यात सहभागी होणार नाहीत. उलट, ते लाक्षणिक अर्थाने, म्हणजे यहोवाचा दिवस सरल्यानंतर त्याच्या विजयोत्सवात सहभागी होण्याद्वारे ‘दुष्टांस तुडवतील.’ तांबड्या समुद्रात फारोच्या सैन्याचा नाश झाल्यानंतर अतिशय मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला होता. (निर्गम १५:१-२१) सैतानाचा व त्याच्या जगाचा मोठ्या संकटात नाश झाल्यानंतर देखील विजयोत्सव साजरा केला जाईल. यहोवाच्या दिवसातून जिवंत बचावलेले आनंदाने जयघोष करतील: “त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.” (यशया २५:९) यहोवाचे सार्वभौमत्व निर्विवादपणे स्थापित केले जाईल आणि या पृथ्वीवर शांतीपूर्ण वस्ती करण्याकरता ती स्वच्छ केली जाईल तो किती परमानंदाचा काळ असेल!

ख्रिस्ती धर्मजगताकडून इस्राएलांचे अनुकरण

७, ८. मलाखीच्या काळातील इस्राएलच्या आध्यात्मिक परिस्थितीचे वर्णन करा.

जे यहोवाची सेवा करतात केवळ त्यांनाच यहोवाची संमती प्राप्त होते, इतरांना ती होत नाही. मलाखीने त्याच्या पुस्तकाचे लिखाण केले तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती. सा.यु.पू. ५३७ साली इस्राएल राष्ट्रातील शेषजन ७० वर्षे बॅबिलोनमध्ये बंदिवासात राहिल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. पण पुढच्या एक शतकात हे पुनर्वसित राष्ट्र पुन्हा एकदा धर्मत्याग व दुष्टपणाकडे वळले. बहुतेक लोक यहोवाच्या नामाचा अनादर करत होते; त्याच्या नीतिमान कायद्यांचे उल्लंघन करत होते; अंधळे, लंगडे व रोगट पशू बलिदानाकरता आणण्याद्वारे त्याचे मंदिर विटाळवत होते; आणि आपल्या तारुण्याच्या पत्नींना सूटपत्र देत होते.

त्यामुळे यहोवाने त्यांना सांगितले: “मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन, आणि जादुगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ यांजवर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची त्वरा करीन, . . . कारण मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:५, ६) तरीसुद्धा, आपल्या वाईट मार्गांतून परत फिरू इच्छिणाऱ्‍या सर्वांना यहोवाने हे आमंत्रण दिले: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.”—मलाखी ३:७.

९. मलाखीच्या भविष्यवाण्यांची सुरवातीला कशाप्रकारे पूर्णता झाली?

या शब्दांची सा.यु. पहिल्या शतकात देखील पूर्णता झाली. यहुद्यांच्या शेषजनांनी यहोवाची सेवा केली होती आणि आता ते आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांच्या एका नव्या राष्ट्रात सामील झाले होते, ज्यात कालांतराने विदेश्‍यांचाही समावेश झाला. पण नैसर्गिक इस्राएलातील अधिकांश लोकांनी येशूला नाकारले. म्हणूनच येशूने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्तय २३:३८; १ करिंथकर १६:२२) सा.यु. ७० साली मलाखी ४:१ येथे भविष्यवाणी केल्याप्रमाणे नैसर्गिक इस्राएलवर “भट्टीसारखा तप्त दिवस” आला. जेरूसलेम आणि त्याच्या मंदिराचा नाश झाला आणि दुष्काळ, सत्तेकरता केलेल्या चकमकी आणि रोमन सैन्यांचे हल्ले यांमुळे दहा लाखांपेक्षा अधिक जिवांची हानी झाली असे सांगितले जाते. पण ज्यांनी यहोवाची सेवा केली ते त्या संकटातून बचावले.—मार्क १३:१४-२०.

१०. सर्वसामान्य लोक आणि ख्रिस्ती धर्मजगताचे धर्मगुरू पहिल्या शतकातील इस्राएल राष्ट्राचे कशाप्रकारे अनुकरणे करतात?

१० सबंध मानवजात आणि खासकरून ख्रिस्ती धर्मजगताने पहिल्या शतकातील इस्राएल राष्ट्राचे अनुकरण केले आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील नेते आणि सर्वसामान्य लोक देखील येशूने शिकवलेल्या देवाच्या सत्यांपेक्षा स्वतःचीच धार्मिक मते अधिक पसंत करतात. आणि यात खासकरून ख्रिस्ती धर्मजगताचे धर्मगुरू दोषास्पद आहेत. ते यहोवाच्या नावाचा वापर करण्यास नकार देतात, इतकेच काय, तर त्यांनी आपल्या बायबल भाषांतरांतून हे नावच काढून टाकले आहे. तसेच, नरकातील सार्वकालिक यातना, त्रैक्य, आत्म्याचे अमरत्व आणि उत्क्रांतीवाद यांसारखे अशास्त्रवचनीय सिद्धान्त शिकवण्याद्वारे ते यहोवाचा अनादर करतात. अशारितीने मलाखीच्या काळातील याजकांप्रमाणे ते यहोवाला जी स्तुती मिळाली पाहिजे ती त्याला देत नाहीत.

११. जगातील धर्म आपण खरोखर कोणाची सेवा करत आहोत हे कशाप्रकारे दाखवून देतात?

११ शेवटला काळ १९१४ साली सुरू झाल्यापासून जगातील धर्मांनी, ज्यात स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे अग्रेसर आहेत, आपण कोणाची सेवा करत आहोत हे स्पष्टपणे दाखवले. दोन्ही महायुद्धांदरम्यान, त्यांनी आपल्या सदस्यांना राष्ट्रीय मतभेदांवरून एकमेकांशी युद्ध करण्याचे आणि असे करताना स्वतःच्याच धर्मातील लोकांचा देखील जीव घेण्याचे प्रोत्साहन दिले. देवाचे वचन यहोवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍या आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्‍यांची स्पष्ट ओळख करून देते: “ह्‍यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीति करीत नाही तोहि नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीति करावी; काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला.”—१ योहान ३:१०-१२.

भविष्यवाणीची पूर्णता

१२, १३. देवाच्या सेवकांनी आपल्या काळात कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या आहेत?

१२ पहिले महायुद्ध १९१८ साली संपुष्टात आले तोपर्यंत यहोवाच्या सेवकांना हे स्पष्टपणे कळून आले की देवाने ख्रिस्ती धर्मजगताचा आणि इतर सर्व खोट्या धर्मांचा धिक्कार केला आहे. तेव्हापासून, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना हे आवाहन करण्यास सुरवात झाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे; आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे.” (प्रकटीकरण १८:४, ५) ज्यांना यहोवाची सेवा करण्याची इच्छा होती त्यांना शुद्ध करण्यास सुरवात झाली जेणेकरून त्यांच्यात खोट्या धर्माचा लवलेशही राहू नये. तसेच, त्यांनी देवाच्या स्थापित राज्याचा सबंध जगात प्रचार करण्यास सुरवात केली; हे काम या व्यवस्थीकरणाचा नाश येण्याआधी संपवायचे होते.—मत्तय २४:१४.

१३ हे मलाखी ४:५ येथील भविष्यवाणीच्या पूर्णतेत होते, ज्यात असे म्हटले आहे: “पाहा, परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यांस तुम्हाकडे पाठवीन.” या भविष्यवाणीची पूर्णता पहिल्यांदा, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या कार्याद्वारे झाली, ज्याच्याकडे एलियाने पूर्वसंकेत केला. योहानाने नियमशास्त्राच्या कराराविरुद्ध केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करणाऱ्‍या यहुद्यांना बाप्तिस्मा दिला तेव्हा त्याने एलियासारखे कार्य केले. यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे योहान मशिहाचा अग्रेसर होता. पण योहानाच्या कार्याद्वारे मलाखीच्या भविष्यवाणीची केवळ पहिली पूर्णता झाली. योहानाची दुसरा एलीया म्हणून ओळख करून देताना, भविष्यातही ‘एलीयासदृश’ कार्य होईल, असे येशूने सुचवले होते.—मत्तय १७:११, १२.

१४. या व्यवस्थीकरणाचा अंत येण्याआधी कोणते महत्त्वपूर्ण कार्य केले जाणे आवश्‍यक आहे?

१४ मलाखीच्या भविष्यवाणीने सांगितले की हे महान एलीयासदृश कार्य “परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस” येण्याआधी घडेल. त्या दिवसाची समाप्ती, वेगाने जवळ येणाऱ्‍या सर्वसमर्थ देवाच्या महान दिवसाच्या लढाईत, अर्थात, हर्मगिदोनात होते. याचा अर्थ, या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीआधी आणि सिंहासनाधिष्ट येशू ख्रिस्ताच्या शासनाधीन, देवाच्या स्वर्गीय राज्याच्या हजार वर्षांच्या राजवटीआधी एलीयासदृश कार्य घडेल. या भविष्यवाणीनुसार, यहोवा या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करेल त्याआधी आधुनिक काळातील एलीया वर्ग, पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या लाखो सह ख्रिश्‍चनांच्या साहाय्याने उत्साहीपणे खऱ्‍या उपासनेच्या पुनर्स्थापनेचे कार्य करतात, यहोवाच्या नावाचा गौरव करतात आणि मेंढरांसमान लोकांना बायबलमधील सत्ये शिकवतात.

यहोवा आपल्या सेवकांना आशीर्वादित करतो

१५. यहोवा आपल्या सेवकांना कशाप्रकारे स्मरणात ठेवतो?

१५ यहोवा आपली सेवा करणाऱ्‍यांना आशीर्वादित करतो. मलाखी ३:१६ म्हणते: “तेव्हा परमेश्‍वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्‍वराने कान देऊन ऐकले, व परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” हाबेलच्या काळापासून देवाने जणू एक स्मरणवही लिहिण्यास सुरवात केली आणि या वहीत ज्यांना सार्वकालिक जीवन प्रदान करण्याकरता स्मरणात ठेवले जाईल अशांची नावे आहेत. यांना यहोवा म्हणतो: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्‍न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.”—मलाखी ३:१०.

१६, १७. यहोवाने आपल्या लोकांना आणि त्यांच्या कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?

१६ यहोवाने खरोखर आपली सेवा करणाऱ्‍यांना आशीर्वादित केले आहे. कसे? एक मार्ग म्हणजे त्याच्या उद्देशांविषयी त्यांची समज उत्तरोत्तर वाढवण्याद्वारे. (नीतिसूत्रे ४:१८; दानीएल १२:१०) दुसरा एक मार्ग म्हणजे त्यांच्या प्रचार कार्याला आश्‍चर्यकारक प्रमाणात सफल करण्याद्वारे. अनेक प्रामाणिक अंतःकरणाचे लोक खऱ्‍या उपासनेत त्यांना येऊन मिळाले आहेत आणि त्यामुळे ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांचा एक मोठा लोकसमुदाय’ बनला आहे. ‘ते उच्च स्वराने म्हणतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.”’ (प्रकटीकरण ७:९, १०) हा मोठा लोकसमुदाय एका आश्‍चर्यकारक पद्धतीने प्रकट झाला आहे आणि आज यहोवाची सक्रियपणे सेवा करणाऱ्‍यांची संख्या सबंध जगातील ९३,००० मंडळ्यांमध्ये साठ लाखांहून अधिक झाली आहे!

१७ यहोवाच्या आशीर्वादाचा आणखी एक पुरावा म्हणजे आज यहोवाचे साक्षीदार सबंध इतिहासातील सर्वाधिक वितरण असलेली बायबल आधारित प्रकाशने प्रकाशित करत आहेत. सध्या, दर महिन्यात टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या १४४ भाषांतून आणि सावध राहा! नियकालिकाच्या ८७ भाषांतून दर महिन्याला नऊ कोटी प्रती प्रकाशित होत आहेत. सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते या १९६८ साली प्रकाशित झालेल्या, बायबल अभ्यासात साहाय्य करणाऱ्‍या पुस्तकाचे वितरण ११७ भाषांत १०.७ कोटींपर्यंत पोचले होते. १९८२ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाच्या १३१ भाषांतून तब्बल ८.१ कोटी प्रती वितरित करण्यात आल्या. तर सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक १९९५ साली प्रकाशित करण्यात आल्यानंतर आतापर्यंत १५४ भाषांतून त्याच्या ८.५ कोटींपेक्षा जास्त प्रती मुद्रित करण्यात आल्या आहेत. १९९६ साली प्रकाशित झालेल्या देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचे सध्या २४४ भाषांत १५ कोटी प्रतींचे वितरण आहे.

१८. आपण विरोध असूनही आध्यात्मिक सुबत्ता का अनुभवतो?

१८ ही आध्यात्मिक सुबत्ता, सैतानाच्या जगापासून सर्वात भयंकर आणि दीर्घकालीन विरोध होऊनही आपण अनुभवली आहे. यावरून यशया ५४:१७ येथील शब्दांची सत्यता पटते, ज्यात म्हटले आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्‍वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्‍वर म्हणतो.” मलाखी ३:१७ येथील शब्दांची सर्वात प्रमुख पूर्णता आपल्यासंबंधानेच होत आहे हे जाणून यहोवाच्या सेवकांना किती सांत्वन मिळते: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधि होतील.”

आनंदाने यहोवाची सेवा करणे

१९. यहोवाची सेवा करणारे, त्याची सेवा न करणाऱ्‍यांपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत?

१९ यहोवाच्या विश्‍वासू सेवकांतील आणि सैतानाच्या जगातील फरक काळाच्या ओघात अधिकाधिक स्पष्ट होत चालला आहे. मलाखी ३:१८ यात असे भाकीत केले आहे: “मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” या अनेक भेदांपैकी एक भेद म्हणजे यहोवाची सेवा करणारे अतिशय आनंदाने त्याची सेवा करत आहेत. याची अनेक कारणे आहेत, पण एक कारण म्हणजे त्यांना असलेली अद्‌भुत आशा. त्यांना यहोवाच्या पुढील शब्दांविषयी पूर्ण खातरी आहे: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत; परंतु जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.”—यशया ६५:१७, १८; स्तोत्र ३७:१०, ११, २९; प्रकटीकरण २१:४, ५.

२०. आपण आनंदी लोक का आहोत?

२० यहोवा आपल्या निष्ठावान लोकांना आश्‍वासन देतो की ते त्याच्या महान दिवशी बचावतील आणि त्यांना नव्या जगात प्रवेश दिला जाईल. या आश्‍वासनावर आपल्याला पूर्ण भरवसा आहे. (सफन्या २:३; प्रकटीकरण ७:१३, १४) काहीजणांचा वृद्धापकाळ, आजारपण, किंवा दुर्घटनांमुळे त्याआधीच मृत्यू झाला तरीसुद्धा, यहोवा वचन देतो की तो त्यांना सार्वकालिक जीवनाकरता पुनरुत्थित करेल. (योहान ५:२८, २९; तीत १:२) आपल्या जीवनात अनेक समस्या व अडचणी असल्या तरीसुद्धा, यहोवाच्या दिवसाची वाट पाहताना या पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक असण्याची आपल्याकडे असंख्य कारणे आहेत.

तुम्ही कसे उत्तर देणार?

• ‘यहोवाचा दिवस’ कशास सूचित करतो?

• जगातील धर्म प्राचीन इस्राएल राष्ट्राचे कशाप्रकारे अनुकरण करत आहेत?

• यहोवाचे सेवक कोणत्या भविष्यावाण्यांच्या पूर्णतेत सहभागी आहेत?

• यहोवाने त्याच्या लोकांना कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील जेरूसलेम ‘तप्त भट्टीसारखे’ जळाले

[२३ पानांवरील चित्रे]

यहोवा आपली सेवा करणाऱ्‍यांच्या गरजा भागवतो

[२४ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या सेवकांना एक अद्‌भुत आशा असल्यामुळे ते खऱ्‍या अर्थाने आनंदी आहेत