व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो

यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो

यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो

“त्याचे उपकारस्मरण करून [मी] त्याचा महिमा वर्णीन.”—स्तोत्र ६९:३०.

१. (अ) यहोवा महिमायोग्य का आहे? (ब) आपण उपकारस्मरण करून यहोवाचा महिमा कसा वर्णू शकतो?

यहोवा सर्वसमर्थ देव, सबंध विश्‍वात सार्वभौम आणि सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. त्याचे नाव आणि उद्देश महिमायोग्य आहेत. यहोवाचा महिमा वर्णन करण्याचा अर्थ आपल्या शब्दांतून आणि कृतींतून त्याला मोठेपणा देणे, त्याची थोरवी गाणे आणि गौरव करणे. “उपकारस्मरण” करून त्याचा महिमा वर्णण्याकरता, तो आज आपल्याकरता जे करत आहे आणि भविष्यात जे करणार आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ असणे. यासंबंधी आपली वृत्ती कशी असावी हे प्रकटीकरण ४:११ या वचनात दिसून येते, ज्यात स्वर्गातील सर्व विश्‍वासू आत्मिक प्राणी असे घोषित करतात: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” यहोवाचा महिमा आपण कसा वर्णू शकतो? त्याच्याविषयी शिकून घेण्याद्वारे आणि तो आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण करण्याद्वारे. आपली मनोवृत्ती स्तोत्रकर्त्यासारखीच असली पाहिजे ज्याने असे म्हटले: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.”—स्तोत्र १४३:१०.

२. यहोवाचा महिमा वर्णन करणाऱ्‍यांशी आणि न करणाऱ्‍यांशी तो कसा व्यवहार करेल?

जे यहोवाचा महिमा वर्णतात त्यांना तो मौल्यवान समजतो. म्हणूनच “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ” देतो. (इब्री लोकांस ११:६) आणि हे प्रतिफळ कोणते आहे? येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना असे म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, जे ‘उपकारस्मरण करून यहोवाचा महिमा वर्णतात’ ते “पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) पण “दुष्कर्म्यांना भविष्य नाही.” (नीतिसूत्रे २४:२०, NW) आणि या शेवटल्या काळात यहोवाचा महिमा वर्णणे अत्यंत निकडीचे आहे कारण लवकरच तो दुष्टांचा नाश करून नीतिमान लोकांचा बचाव करेल. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७; नीतिसूत्रे २:२१, २२.

३. आपण मलाखीच्या पुस्तकाकडे का लक्ष दिले पाहिजे?

बायबलमधून आपल्याला यहोवाची इच्छा कळून येते कारण ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आहे.’ (२ तीमथ्य ३:१६) देवाच्या वचनात, यहोवाचा महिमा वर्णन करणाऱ्‍यांना तो कशाप्रकारे आशीर्वादित करतो आणि जे त्याचा महिमा वर्णत नाहीत त्यांना काय होते याचे अनेक वृत्तान्त आढळतात. यांपैकी एक वृत्तान्त संदेष्टा मलाखीच्या काळात इस्राएलमध्ये जे घडले त्यासंबंधीचा आहे. सा.यु.पू. ४४३ च्या सुमारास नहेम्या यहुदाचा अधिपती होता त्या काळात मलाखीने त्याच्याच नावाचे पुस्तक लिहिले. या जोरदार आणि रोमांचक पुस्तकात बरीच माहिती व भविष्यवाण्या आहेत, आणि “जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.” (१ करिंथकर १०:११) मलाखीच्या शब्दांकडे लक्ष दिल्यामुळे, यहोवा या दुष्ट व्यवस्थेचा ज्यामध्ये नाश करेल तो “मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी” आपल्याला तयारी करण्यास मदत मिळेल.—मलाखी ४:५.

४. मलाखीच्या पहिल्या अध्यायात आपले लक्ष कोणत्या सहा मुद्द्‌यांकडे वेधले जाते?

दोन हजार चारशे वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेले मलाखीचे पुस्तक या २१ व्या शतकात आपल्याला यहोवाच्या मोठ्या व भयंकर दिवसाची तयारी करण्यास कसे मदत करते? या पुस्तकातला पहिला अध्याय यहोवाची संमती आणि सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता त्याचा महिमा वर्णिण्यासाठी व उपकारस्मरण करण्यासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्‍या सहा मुद्द्‌यांकडे लक्ष वेधतो. (१) यहोवाचे त्याच्या लोकांवर प्रेम आहे. (२) पवित्र गोष्टींची आपण कदर केली पाहिजे. (३) आपल्याजवळचे जे सर्वोत्तम ते यहोवाला द्यावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (४) खरी उपासना स्वार्थाने नव्हे तर निःस्वार्थ प्रेमाने प्रेरित झालेली असते. (५) देवाला स्वीकृत असलेली सेवा ही एक त्रासदायक औपचारिकता नाही. (६) आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवाला जाब द्यावा लागेल. तर मग मलाखीच्या पुस्तकातील तीन अध्यायांपैकी पहिल्या अध्यायाचे जवळून परीक्षण करून आपण या सहा मुद्द्‌यांचा विचार करू.

यहोवाचे त्याच्या लोकांवर प्रेम आहे

५, ६. (अ) यहोवाने याकोबावर प्रीती का केली? (ब) आपण याकोबाच्या विश्‍वासूपणाचे अनुकरण केल्यास कशाची अपेक्षा करू शकतो?

यहोवाचे प्रेम मलाखीच्या सुरवातीच्या काही वचनांतून अगदी स्पष्टपणे दिसून येते. या पुस्तकाची सुरवातच या शब्दांनी होते: “मलाखीच्या द्वारे इस्राएलास प्राप्त झालेले परमेश्‍वराचे वचन.” पुढे देव म्हणतो: “मी तुम्हावर प्रीति केली.” त्याच वचनात एक उदाहरण देऊन यहोवा म्हणतो: “मी याकोबावर प्रीति केली.” याकोबाचा यहोवावर विश्‍वास होता. कालांतराने यहोवाने याकोबाचे नाव बदलून इस्राएल ठेवले आणि तो इस्राएल राष्ट्राचा पूर्वज बनला. याकोबाचा यहोवावर विश्‍वास असल्यामुळेच यहोवाने त्याच्यावर प्रीती केली. इस्राएल राष्ट्रात ज्यांनी यहोवाबद्दल याकोबासारखीच मनोवृत्ती बाळगली त्यांच्यावरही यहोवाने प्रेम केले.—मलाखी १:१, २.

आपण यहोवावर प्रीती केली आणि त्याच्या लोकांसोबत जडून राहिलो तर १ शमुवेल १२:२२ येथील शब्दांतून आपल्याला सांत्वन मिळू शकते: “परमेश्‍वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” यहोवा आपल्या लोकांवर प्रीती करतो आणि त्यांना प्रतिफळ देतो; शेवटी तो त्यांना सार्वकालिक जीवन देईल. म्हणूनच असे म्हटले आहे: “परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल; म्हणजे परमेश्‍वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.” (स्तोत्र ३७:३, ४) यहोवावर प्रेम करण्यात एक दुसरा मुद्दा देखील अंतर्भूत आहे जो मलाखीच्या पहिल्या अध्यायातून आपल्याला कळून येतो.

पवित्र गोष्टींची कदर बाळगा

७. यहोवाने एसावाचा द्वेष का केला?

मलाखी १:२, ३ येथे आपण वाचतो त्याप्रमाणे “मी याकोबावर प्रीति केली,” असे म्हटल्यावर यहोवा म्हणतो, “[मी] एसावाचा द्वेष केला.” हा फरक का बरे? याकोबाने देवाचा महिमा वर्णिला पण त्याच्या जुळ्या भावाने, एसावाने तसे केले नाही. एसावाला अदोम देखील म्हणण्यात आले. मलाखी १:४ येथे अदोमच्या प्रदेशाला दुष्टतेचा प्रदेश आणि तेथील रहिवाशांवर परमेश्‍वर रुष्ट आहे असे म्हटले आहे. अदोम (म्हणजे “तांबडा”) हे नाव एसावाला देण्यात आले कारण त्याने तांबड्या मसुरीच्या वरणाच्या ऐवजात याकोबाला आपला मोलवान ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. उत्पत्ति २५:३४ म्हणते, “एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला.” प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना सावध राहण्याचे प्रोत्साहन दिले जेणेकरून “कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये.”—इब्री लोकांस १२:१४-१६.

८. पौलाने एसावाची तुलना जारकर्म्याशी का केली?

पौलाने एसावाच्या कृत्यांची तुलना जारकर्माशी का केली? कारण एसावाची मनोवृत्ती असल्यास कालांतराने एक व्यक्‍ती पवित्र गोष्टींविषयी कदर करण्याचे सोडून देण्याची शक्यता आहे. आणि यामुळे जारकर्मासारखी गंभीर पापे घडण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला असे विचारावे: ‘कधीकधी मला माझ्या ख्रिस्ती वारशाच्या—सार्वकालिक जीवनाच्या ऐवजात—मसुरीच्या वरणासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवण्याचा मोह होतो का? कदाचित नकळत मी पवित्र गोष्टी तुच्छ लेखतो का?’ एसाव आपली शारीरिक लालसा भागवण्यास अधीर झाला होता. त्याने याकोबाला म्हटले: “ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २५:३०) दुःखाची गोष्ट म्हणजे देवाच्या सेवकांपैकी काहींनी देखील एका अर्थाने असेच म्हटले आहे: “सन्मानाने विवाहित होईपर्यंत थांबण्याची काय गरज?” कोणत्याही किंमतीवर लैंगिक सुख मिळवण्याची इच्छा एसावाच्या थोड्याशा तांबड्या वरणासारखी बनली आहे.

९. आपण यहोवाविषयी श्रद्धापूर्ण भय कशाप्रकारे मानू शकतो?

नैतिक शुद्धता, विश्‍वासूपणा आणि आपल्या आध्यात्मिक वारशाचा अनादर करण्याद्वारे आपण कधीही पवित्र गोष्टींना तुच्छ लेखू नये. एसावाप्रमाणे असण्याऐवजी आपण विश्‍वासू याकोबाप्रमाणे होण्याचा प्रयत्न करून पवित्र गोष्टींबद्दल मनस्वी कदर बाळगण्याद्वारे सतत देवाचे श्रद्धापूर्ण भय मानू या. हे आपण कसे करू शकतो? यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची काळजी घेण्याद्वारे. हे आपल्याला मलाखीच्या पहिल्या अध्यायातून स्पष्ट होणाऱ्‍या तिसऱ्‍या मुद्द्‌याकडे आणते. तो मुद्दा कोणता?

आपल्याजवळचे सर्वोत्तम यहोवाला देणे

१०. याजक कशाप्रकारे यहोवाच्या मेजाला तुच्छ लेखत होते?

१० मलाखीच्या काळात जेरुसलेमच्या मंदिरात सेवा करणारे यहुदाचे याजक यहोवाला सर्वोत्तम यज्ञ अर्पण करत नव्हते. मलाखी १:६-८ यात असे म्हटले आहे: “मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करितो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे, असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्‍या तुम्हा याजकांस परमेश्‍वर विचारतो.” याजक विचारतात, “आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?” यहोवा त्यांना उत्तर देतो, “तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता.” याजक विचारतात “आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले?” तेव्हा यहोवाने त्यांना सांगितले, “परमेश्‍वराचे मेज तुच्छ आहे; असे तुम्ही बोलता तेणेकरून तुम्ही ते विटाळविता.” या याजकांनी जेव्हा जेव्हा यहोवाच्या मेजावर अंधळे, लंगडे पशू बली चढवले आणि वरून “यात काही दुष्टाई नाही,” [सुबोध भाषांतर] असा दावा केला तेव्हा तेव्हा त्यांनी हे प्रदर्शित केले की त्याचा मेज आपण तुच्छ लेखतो.

११. (अ) अस्वीकरणीय बलिदानांविषयी यहोवाने काय म्हटले? (ब) सर्वसामान्य लोक कोणत्या अर्थाने दोषी होते?

११ यहोवाने मग अशा अस्वीकारणीय अर्पणाविषयी असा तर्क केला: “असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्‍यास देऊन तर पाहा; तो तुजवर प्रसन्‍न होईल काय? अथवा तुजवर त्याची मर्जी बसेल काय”? नाही, त्यांचा प्रांताधिकारी निश्‍चितच अशा अर्पणांनी प्रसन्‍न झाला नसता. मग सबंध विश्‍वाच्या सार्वभौमाकडून अशी दोषपूर्ण अर्पणे स्वीकारण्याची अपेक्षा कशी करता येईल! आणि यात केवळ याजकांचाच दोष नव्हता. ही अर्पणे प्रत्यक्षात तेच सादर करत असल्यामुळे ते यहोवाला तुच्छ लेखत होते हे कबूल आहे. पण सर्वसामान्य लोक निर्दोष होते का? निश्‍चितच नाही! उलट तेच अशी अंधळी, लंगडी आणि रोगट जनावरे निवडून याजकांकडे अर्पण करण्याकरता आणत होते. किती घोर पाप!

१२. यहोवाला आपल्याकडील सर्वोत्तम देण्याकरता आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?

१२ आपण यहोवावर खरोखर प्रेम करतो हे दाखवण्याचा मार्ग म्हणजे यहोवाला आपल्याकडील सर्वोत्तम ते देणे. (मत्तय २२:३७, ३८) मलाखीच्या काळातील भ्रष्ट याजकांप्रमाणे न होता, यहोवाची संस्था आज अतिशय उत्तम बायबल आधारित शिक्षण देत आहे ज्यामुळे आपल्याला देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याद्वारे त्याचे उपकारस्मरण व महिमा वर्णण्यास मदत मिळते. मलाखी पुस्तकातील पहिल्या अध्यायातून स्पष्ट होणारा चवथा महत्त्वपूर्ण मुद्दा याच्याशीच संबंधित आहे.

खरी उपासना स्वार्थाने नव्हे तर प्रेमाने प्रेरित

१३. याजकांच्या कोणत्या कृत्यांवरून ते स्वार्थी असल्याचे दिसून आले?

१३ मलाखीच्या काळातील याजक स्वार्थी, दुष्ट आणि धनलोभी होते. हे आपल्याला कसे कळून येते? मलाखी १:१० (NW) म्हणते: “तुमच्यातला कोण दरवाजे बंद करील? आणि मोबदल्याविना—तुम्ही माझ्या वेदीवर अग्नि पेटवणार नाही. सेनाधीश यहोवा म्हणतो, तुमच्यात मला मुळीच संतोष नाही; तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही.” होय ते स्वार्थी याजक दारे बंद करणे आणि वेदीवर अग्नी पेटवणे यांसाख्या मंदिरातल्या क्षुल्लक कामांसाठी देखील मोबदल्याची मागणी करत होते! साहजिकच त्यांच्या हातच्या यज्ञार्पणांत यहोवाला मुळीच संतोष वाटला नाही!

१४. यहोवाचे साक्षीदार प्रेमाने प्रेरित होऊन कार्य करतात असे आपण का म्हणू शकतो?

१४ प्राचीन जेरूसलेमच्या पापी याजकांचा लोभीपणा आणि स्वार्थीपणा आपल्याला याची आठवण करून देतो की लोभी असणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. (१ करिंथकर ६:९, १०) स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्‍या त्या याजकांच्या वागणुकीवर मनन केल्यास, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे केले जाणारे जागतिक प्रचार कार्य आपल्याला अधिकच कौतुकास्पद वाटू लागते. हे कार्य स्वेच्छेने केले जाते; सेवेच्या कोणत्याही कार्यासाठी आपण कधीच मोबदला मागत नाही. नाही, आपण “फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करत नाही.” (२ करिंथकर २:१७, ईजी टू रीड व्हर्शन) पौलाप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकजण प्रामाणिकपणे असे म्हणू शकतो: “मी आनंदाने देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितली.” (२ करिंथकर ११:७, NW) पौलाने ‘देवाची सुवार्ता आनंदाने सांगितली’ याकडे लक्ष द्या. यावरून आपण मलाखीच्या पहिल्या अध्यायातील पाचव्या लक्ष देण्याजोग्या मुद्द्‌याकडे येतो.

देवाची सेवा त्रासदायक औपचारिकता नव्हे

१५, १६. (अ) यज्ञ अर्पण करण्याविषयी याजकांची कशी वृत्ती होती? (ब) यहोवाचे साक्षीदार आपली अर्पणे कशाप्रकारे सादर करतात?

१५ प्राचीन जेरूसलेममधील अविश्‍वासू याजकांना यज्ञ अर्पण करणे एक त्रासदायक औपचारिकता वाटायची. त्यांच्याकरता ते ओझ्याप्रमाणे होते. मलाखी १:१३ येथे सांगितल्याप्रमाणे देवाने त्यांना म्हटले: “तुम्ही असेहि म्हणता, काय पीडा ही! तुम्ही नाक मुरडिता.” ते याजक देवाच्या पवित्र गोष्टींना नाक मुरडत होते किंवा त्यांना त्या तुच्छ वाटत होत्या. आपण स्वतः त्यांच्याप्रमाणे कधीही होऊ नये म्हणून सतत प्रार्थना केली पाहिजे. उलट १ योहान ५:३ येथील शब्दांतून स्पष्ट होते त्याप्रमाणे आपली नेहमी अशी वृत्ती असली पाहिजे: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”

१६ आपण देवाला आध्यात्मिक अर्पणे सादर करण्यात नेहमी आनंद मानू या. याला कधीही त्रासदायक ओझ्याप्रमाणे समजू नये. या भविष्यसूचक शब्दांकडे आपण नेहमी लक्ष देऊ या: “तुम्ही आपल्याबरोबर वचने घेऊन यहोवाकडे फिरा; त्याला म्हणा, तू सर्व अन्याय दूर कर आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू.” (होशेय १४:२, पं.र.भा.) “आपले ओठ वासरे असे अर्पू” हे शब्द आध्यात्मिक अर्पणांना अर्थात यहोवा व त्याच्या उद्देशांविषयी आपण जी स्तुती वर्णतो त्यास सूचित करतात. इब्री १३:१५ म्हणते: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण [येशू ख्रिस्ताद्वारे] देवाला नित्य अर्पण करावा.” आपण किती आनंदी आहोत की आपली आध्यात्मिक अर्पणे निव्वळ औपचारिकता नव्हेत तर देवाबद्दलच्या आपल्या प्रेमाच्या मनःपूर्वक अभिव्यक्‍ती आहेत! हे आपल्याला मलाखीच्या पहिल्या अध्यायातून शिकण्यासारख्या सहाव्या मुद्द्‌यावर आणते.

प्रत्येकाला जाब द्यावा लागेल

१७, १८. (अ) यहोवाने ‘फसवणाऱ्‍याला’ शाप का दिला? (ब) अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्‍यांनी काय ओळखले नव्हते?

१७ मलाखीच्या काळात राहणारी प्रत्येक व्यक्‍ती आपल्या कृत्यांबद्दल जबाबदार होती आणि आज आपण देखील आहोत. (रोमकर १४:१२; गलतीकर ६:५) त्यानुसार, मलाखी १:१४ म्हणते: “आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करितो; असा फसविणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नामाची भीति धरितात, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” ज्या माणसाजवळ कळप आहे त्याच्याकडे साहजिकच केवळ एक पशू, उदाहरणार्थ एकच मेंढरू नसते. त्याअर्थी त्याच्याकडे पर्यायच नव्हता असे म्हणता येणार नाही. यज्ञासाठी प्राणी निवडताना त्याला अंधळा, लंगडा अथवा रोगट प्राणी निवडणे भाग नव्हते. ज्याअर्थी तो असे दोषपूर्ण प्राणी निवडतो त्याअर्थी हे स्पष्ट होते की तो यहोवाच्या यज्ञार्पणांच्या व्यवस्थेला तुच्छ लेखतो; कारण ज्याच्याजवळ प्राण्यांचा कळप आहे तो निश्‍चितच एखादा निर्दोष पशू निवडू शकला असता!

१८ म्हणूनच यहोवाने अगदी रास्तपणे अशा फसविणाऱ्‍या माणसाला शाप दिला, ज्याच्याजवळ सुयोग्य नर पशू असूनही त्याने अंधळा, लंगडा, किंवा रोगट पशू यज्ञाकरता याजकाजवळ आणला. कदाचित त्याला या जनावराला अक्षरशः ओढत आणावे लागले असेल. पण याजकांपैकी कोणीही देवाच्या नियमशास्त्रातून, अशाप्रकारचे दोषी पशू यज्ञार्पणाकरता उचित नव्हते असे लोकांना सांगितल्याचा कोठेही उल्लेख नाही. (लेवीय २२:१७-२०) कोणत्याही समजदार माणसाला हे कळण्यासारखे होते की अशाप्रकारचे दान प्रांताधिकाऱ्‍याला देण्यास कोणी धजले नसता. पण वास्तवात ते कोणा मानवी प्रांताधिकाऱ्‍याला नव्हे तर सबंध विश्‍वाच्या सार्वभौमाला अर्पण करत होते. मलाखी १:१४ याविषयी असे म्हणते: “‘मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नामाची भीति धरितात,’ असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.”

१९. आपण कशाची आतुरतेने वाट पाहात आहोत आणि सध्या आपण काय केले पाहिजे?

१९ देवाचे निष्ठावान सेवक या नात्याने आपण महान राजा यहोवाचा सर्व मानवजात आदर करेल असा दिवस येण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत. तेव्हा, “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) पण तोपर्यंत, आपण सर्वजण यहोवाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू या आणि त्याद्वारे स्तोत्रकर्त्याचे अनुकरण करू या ज्याने असे म्हटले: “त्याचे उपकारस्मरण करून [मी] त्याचा महिमा वर्णीन.” (स्तोत्र ६९:३०) असे करण्यास आपल्याला मदत करण्यासाठी मलाखी आणखी काही मार्गदर्शन पुरवतो जे आपल्याकरता फायद्याचे ठरू शकते. पुढील दोन अध्यायांत मलाखीच्या इतर भागांकडे आपण लक्ष देऊ या.

तुम्हाला आठवते का?

• आपण यहोवाचा महिमा का वर्णिला पाहिजे?

• मलाखीच्या काळात याजकांचे यज्ञ यहोवाने का नामंजूर केले?

• आपण यहोवाला स्तुतीचे यज्ञ कशाप्रकारे अर्पण करतो?

• खरी उपासना कशामुळे प्रेरित झालेली असावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

मलाखीच्या भविष्यवाणीने आपल्या काळाला सूचित केले

[१० पानांवरील चित्र]

एसावाला पवित्र गोष्टींची कदर नव्हती

[११ पानांवरील चित्र]

याजक व लोक अस्वीकरणीय यज्ञ अर्पण करत होते

[१२ पानांवरील चित्र]

सबंध जगात यहोवाचे साक्षीदार विनामूल्य स्तुतीचे यज्ञ अर्पण करतात