व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे

यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे

यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे

‘आपापल्या बंधूचा विश्‍वासघात करू नका.’मलाखी २:१०.

१. सार्वकालिक जीवन मिळण्याकरता आपण काय करावे अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो?

तुम्हाला सार्वकालिक जीवन हवे आहे का? बायबलमध्ये दिलेल्या या आशेवर तुमचा विश्‍वास असेल तर तुम्ही कदाचित म्हणाल, ‘अर्थातच.’ पण देवाने त्याच्या नव्या जगात सार्वकालिक जीवन देण्याची तुमच्यावर कृपा करावी अशी तुमची इच्छा असल्यास तुम्हाला त्याच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. (उपदेशक १२:१३; योहान १७:३) अपरिपूर्ण मानवांकडून अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे का? नाही, कारण यहोवा आपल्याला असे म्हणून प्रोत्साहन देतो: “मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.” (होशेय ६:६) तेव्हा, चुका करण्याची प्रवृत्ती असणारे मानव देखील देवाच्या अपेक्षा अवश्‍य पूर्ण करू शकतात.

२. बऱ्‍याच इस्राएली लोकांनी यहोवाशी कशाप्रकारे विश्‍वासघात केला?

पण सर्वांनाच यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याची इच्छा नसते. होशेयने स्पष्ट केले की कित्येक इस्राएली लोकांनासुद्धा ही इच्छा नव्हती. राष्ट्र या नात्याने त्यांनी देवाच्या नियमांचे पालन करण्याच्या करारात किंवा ठरावात सहभागी होण्याचे कबूल केले होते. (निर्गम २४:१-८) पण, लवकरच त्यांनी त्याचे नियम मोडण्याद्वारे तो “करार मोडिला.” त्यामुळे यहोवाने म्हटले की ते इस्राएली लोक त्याच्याशी “बेइमानपणे वर्तले.” (होशेय ६:७) आणि तेव्हापासून आणखी असंख्य लोक त्याचप्रकारे वागले आहेत. पण यहोवाला अशा विश्‍वासघाताचा वीट आहे, मग तो त्याच्याशी केलेला असो अथवा त्याच्यावर प्रीती करणाऱ्‍या व त्याची सेवा करणाऱ्‍यांशी.

३. या अभ्यासात कशाचे स्पष्टीकरण केले जाईल?

आपल्याला आनंदी जीवन जगायचे असल्यास, विश्‍वासघातासंबंधी आपणही देवाचाच दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. पण देवाला विश्‍वासाघाताचा वीट आहे याकडे लक्ष वेधणारा होशेय हा एकच संदेष्टा नव्हता. याआधीच्या लेखात आपण मलाखीच्या भविष्यसूचक संदेशाच्या बऱ्‍याचशा भागाचे स्पष्टीकरण केले; या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायापासून आपण सुरवात केली. आता आपण या पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायाकडे लक्ष देऊ या आणि हे पाहू या की विश्‍वासघाताविषयी देवाच्या दृष्टिकोनावर आणखी कशाप्रकारे भर देण्यात आला आहे. देवाचे लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून परत आल्यानंतर कित्येक दशकांनंतरच्या परिस्थितीविषयी मलाखी सांगत होता; तरीसुद्धा ही दुसऱ्‍या अध्यायातील माहिती आज आपल्याकरताही अतिशय अर्थभरीत आहे.

दोषास्पद याजक

४. यहोवाने याजकांना काय इशारा दिला?

दुसऱ्‍या अध्यायाच्या सुरवातीला, यहुदी याजकांनी यहोवाच्या नीतिमान मार्गांचा त्याग केल्यामुळे त्याने त्यांची कशाप्रकारे निर्भर्त्सना केली हे आपल्याला वाचायला मिळते. त्याने त्याचे मार्गदर्शन मनावर घेतले नाही आणि आपले मार्ग बदलले नाहीत तर त्यांना भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार होते. पहिल्या दोन वचनांकडे लक्ष द्या: “आता याजकहो, तुम्हास ही आज्ञा होत आहे; सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन.” त्या याजकांनी लोकांना देवाचे नियम शिकवले असते आणि स्वतःही त्यांचे पालन केले असते तर त्यांना आशीर्वाद मिळाले असते. पण देवाच्या इच्छेला तुच्छ मानल्यामुळे त्यांच्यावर शाप येणार होते. त्या याजकांच्या तोंडून निघणारे आशीर्वाद देखील शापात बदलणार होते.

५, ६. (अ) याजक खासकरून दोषास्पद का होते? (ब) यहोवाने कोणत्या शब्दांत याजकांची निर्भर्त्सना केली?

हे याजक सर्वाधिक दोषास्पद का होते? ७ वे वचन याचे कारण काय असावे हे स्पष्टपणे दाखवते: “याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्‍वराचा निरोप्या आहे.” हजार वर्षांआधी देवाने मोशेच्याद्वारे इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांत असे सांगितले होते की ‘यहोवाने कळविलेले सर्व विधी इस्राएल लोकांना शिकवण्याचे’ याजकांचे कर्तव्य होते. (लेवीय १०:११) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, २ इतिहास १५:३ या वचनाच्या लेखकाला असे लिहावे लागले: “बहुत काळपर्यंत इस्राएलांस खऱ्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांस शिकवावयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते.”

मलाखीच्या काळात, म्हणजे सा.यु.पू. पाचव्या शतकात याजकगणाची अद्यापही हीच स्थिती होती. ते लोकांना देवाचे नियमशास्त्र शिकवत नव्हते. तेव्हा या याजकांकडून जाब मागणे रास्तच होते. यहोवाने त्यांच्याविरुद्ध वापरलेल्या जोरदार शब्दांकडे लक्ष द्या. मलाखी २:३ यात असे घोषित करण्यात आले: “मी . . . तुमच्या पर्वणींची यज्ञपशूंची विष्ठा तुमच्या मुखांस फाशीन.” (पं.र.भा.) किती ही लज्जास्पद शिक्षा! पर्वांतील यज्ञपशूंची विष्ठा छावणीच्या बाहेर नेऊन जाळली जायची. (लेवीय १६:२७) पण त्याऐवजी ती विष्ठा त्यांच्या तोंडावर फासली जाईल असे यहोवाने त्यांना सांगितले तेव्हा, त्याला त्यांच्या यज्ञांची आणि ती यज्ञे अर्पण करणाऱ्‍यांची किती घृणा वाटते हे स्पष्टपणे दिसून आले.

७. नियमशास्त्र शिकवणाऱ्‍यांवर यहोवा का क्रोधित झाला?

मलाखीच्या काळाच्या कित्येक शतकांआधी यहोवाने लेवीय याजकांना दर्शनमंडपाची आणि नंतर त्याच्या मंदिराची आणि पवित्र सेवाकार्याची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली होती. हे इस्राएल राष्ट्राचे शिक्षक होते. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली असती तर त्यांना व सबंध इस्राएल राष्ट्राला जीवन व शांती प्राप्त झाली असती. (गणना ३:५-८) पण, लेवीय याजकांना पूर्वीसारखे देवाविषयी भय राहिले नव्हते. त्यामुळे यहोवाने त्यांना सांगितले: “तुम्ही मार्ग सोडून गेला आहा, धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळांस ठोकर खाण्यास तुम्ही लाविले आहे; तुम्ही लेव्याचा करार बिघडविला आहे . . . तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही.” (मलाखी २:८, ९) लोकांना सत्य न शिकवल्यामुळे आणि त्यांच्यापुढे चांगला आदर्श न ठेवल्यामुळे याजकांनी कित्येक इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट व्हायला लावले, आणि त्यामुळे यहोवाचे त्यांच्यावर क्रोधित होणे योग्यच होते.

देवाच्या आदर्शांना जडून राहणे

८. मानवांनी देवाच्या आदर्शांनुसार वागावे अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे का? स्पष्ट करा.

त्या याजकांना सहानुभूती दाखवायला हवी होती, किंवा ते अपरिपूर्ण मानव असल्यामुळे त्यांच्याकडून देवाच्या आदर्शांनुसार वागण्याची अपेक्षा करणे योग्य नव्हते आणि त्यांना क्षमा करायला हवी होती असा आपण विचार करू नये. कारण वास्तवात मानव देवाच्या आज्ञांचे पालन अवश्‍य करू शकतात कारण जे त्यांना करता येणार नाही अशी अपेक्षा यहोवा त्यांच्याकडून करत नाही. कदाचित त्या काळातील काही याजक देवाच्या आदर्शांनुसार वागतही असतील आणि कालांतराने एका याजकाने असे केले याविषयी काहीच शंका नाही. तो होता थोर “प्रमुख याजक” येशू. (इब्री लोकांस ३:१) त्याच्याविषयी खऱ्‍या अर्थाने असे म्हणणे शक्य होते: “त्याच्या मुखात सत्याचे धर्मशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला व त्याने बहुतांस अधर्मापासून वळविले.”—मलाखी २:६.

९. आपल्या काळात विश्‍वासूपणे सत्याचा प्रसार कोणी केला आहे?

तुलना केल्यास, स्वर्गीय आशा असलेल्या ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांनी आता जवळजवळ एका शतकापेक्षा अधिक काळापासून ‘देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण’ म्हणून सेवा केली आहे. (१ पेत्र २:५) बायबलमधील सत्यांचा प्रसार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शिकवलेली सत्ये तुम्ही आत्मसात केली तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अनुभवाने हे जाणवले नाही का, की सत्याचे धर्मशास्त्र त्यांच्या मुखात आहे? त्यांनी अनेकांना खोट्या धार्मिक प्रथांपासून मागे फिरायला मदत केली आहे आणि परिणामस्वरूप आज सबंध जगात असे लाखो लोक आहेत ज्यांनी बायबलमधील सत्ये शिकून घेतली आहेत आणि ज्यांना सार्वकालिक जीवनाची आशा आहे. शिवाय आता यांनाही आणखी लाखो लोकांना सत्याचे धर्मशास्त्र शिकवण्याची सुसंधी आहे.—योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९.

सावध राहण्याची गरज

१०. आपण सावध राहण्याची का गरज आहे?

१० पण सावध राहण्याची गरज आहे. मलाखी २:१-९ यातून शिकायला मिळणारे धडे आपल्या मनात न उतरण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीत कुटिलता आढळणार नाही याबद्दल आपण वैयक्‍तिकरित्या सावध आहोत का? उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू शकतात का? मंडळीतले आपले बंधू व भगिनी आपल्यावर भरवसा ठेवू शकतात का? काही गोष्टी खोट्या आहेत असे सिद्ध करता येत नाहीत पण खरे पाहता त्या दिशाभूल करणाऱ्‍या असतात; आपल्याला अशाप्रकारे चलाखीने बोलण्याची सवय लागण्याची शक्यता आहे. किंवा एखाद्याला बिझनेसच्या व्यवहारांविषयी काही गोष्टी वाढवून सांगण्याचा अथवा काही गोष्टी लपवण्याचा मोह होऊ शकतो. पण यहोवा हे पाहणार नाही का? आणि आपण अशाप्रकारे वागल्यास तो आपल्या ओठांचे स्तुतीयज्ञ स्वीकारेल का?

११. खासकरून कोणाला सावध राहण्याची गरज आहे?

११ आज मंडळ्यांमध्ये शिकवण्याचा विशेषाधिकार ज्यांना मिळालेला आहे त्या सर्वांकरता मलाखी २:७ यात सावधगिरीचा इशारा आहे. यात असे म्हटले आहे की “याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे.” या शिक्षकांवर भारी जबाबदारी आहे कारण याकोब ३:१ सूचित करते त्याप्रमाणे त्यांना “अधिक दंड होईल.” त्यांनी उत्साहाने शिकवले पाहिजे हे खरे आहे पण त्यांची शिकवण सर्वस्वी देवाच्या लिखित वचनावर आणि यहोवाच्या संस्थेकरवी दिल्या जाणाऱ्‍या शिक्षणावर आधारित असली पाहिजे. अशाप्रकारे ते “इतरांना शिकविण्यास योग्य” ठरू शकतील. म्हणूनच त्यांना असा सल्ला देण्यात आला आहे: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:२, १५.

१२. ज्यांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी कशाविषयी काळजी बाळगली पाहिजे?

१२ आपण काळजी न घेतल्यास आपल्या शिकवणुकींत स्वतःच्या आवडीनिवडी आणि मते मिसळण्याचा मोह होण्याची शक्यता आहे. खासकरून, यहोवाच्या संस्थेच्या शिकवणुकींच्या विरोधात असूनही आपल्याच निष्कर्षांविषयी आत्मविश्‍वास बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीकरता हा एक पाश ठरू शकतो. पण मलाखीच्या दुसऱ्‍या अध्यायातून असे दिसून येते, की मेंढरांना अडखळण्याचे कारण बनू शकणाऱ्‍या वैयक्‍तिक विचारांना नव्हे तर देवाकडील ज्ञानाला जडून राहण्याची मंडळीच्या शिक्षकांकडून अपेक्षा केली पाहिजे. येशूने म्हटले: “माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्‍यात त्याचे हित आहे.”—मत्तय १८:६.

विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी विवाह

१३, १४. मलाखीने कोणत्या विश्‍वासघाती वागणुकीकडे लक्ष वेधले?

१३ मलाखीच्या दुसऱ्‍या अध्यायातील १० व्या वचनापासून विश्‍वासघाताविषयी अधिकच सुस्पष्टरित्या सांगितले आहे. मलाखी दोन प्रकारच्या वागणुकींसंबंधी बोलतो ज्यांत तो वारंवार “विश्‍वासघात” हा शब्द वापरतो. पण आपल्या मार्गदर्शक सल्ल्याची सुरवात करण्याआधी तो हे प्रश्‍न विचारतो: “आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांस उत्पन्‍न केले नाही काय? असे असता आम्ही आपआपल्या बंधूचा विश्‍वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडितो बरे?” मग ११ व्या वचनात तो पुढे म्हणतो की इस्राएलने विश्‍वासघात करून “यहोवाचे पावित्र्य” [NW] भ्रष्ट केले आहे. ते असे काय करत होते जे इतक्या गंभीर स्वरूपाचे होते? त्याच वचनात त्यांची एक चूक उघडकीस आणली आहे: त्यांनी “परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला” होता.

१४ दुसऱ्‍या शब्दांत, यहोवाला समर्पित असलेल्या राष्ट्रापैकी असूनही काही इस्राएली लोकांनी यहोवाची उपासना न करणाऱ्‍यांशी विवाह केला होता. हे इतके गंभीर का होते हे आपल्याला संदर्भावरून पाहायला मिळते. १० वे वचन म्हणते की त्या सर्वांचा एकच पिता होता. तो याकोब (ज्याला नंतर इस्राएल हे नाव देण्यात आले) किंवा अब्राहाम किंवा आदाम आहे असे म्हणण्यात आले नव्हते. मलाखी १:६ दाखवते की यहोवा त्यांचा “एकच पिता” होता. इस्राएल राष्ट्राचा त्याच्यासोबत एक नातेसंबंध होता; हे राष्ट्र त्यांच्या पूर्वजांसोबत यहोवाने केलेल्या करारात सामील होते. त्या कराराचा एक नियम असा होता: “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको.”—अनुवाद ७:३.

१५. (अ) काहीजण विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्याविषयी काय सफाई देण्याचा प्रयत्न करतील? (ब) विवाहाच्या विषयावर यहोवा आपले विचार कशाप्रकारे व्यक्‍त करतो?

१५ काहीजण कदाचित असा तर्क करतील: ‘मला आवडणारी व्यक्‍ती खूप चांगली आहे. आज न उद्या कदाचित ती खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करेल.’ अशाप्रकारची विचारसरणी पुढील देवप्रेरित इशाऱ्‍याची सत्यता पटवून देते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) यहोवाचा, त्याची उपासना न करणाऱ्‍या व्यक्‍तीशी विवाह करण्याविषयी कसा दृष्टीकोन आहे हे मलाखी २:१२ यातून स्पष्ट होते: ‘जो मनुष्य असे करितो त्याला परमेश्‍वर नाहीसे करील [“उच्छेद करील,” NW].’ म्हणूनच ख्रिश्‍चनांना “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याचा आग्रह करण्यात येतो. (१ करिंथकर ७:३९) ख्रिस्ती व्यवस्थेत, सत्य न मानणाऱ्‍याशी विवाह करणाऱ्‍याचा “उच्छेद” केला जात नाही. पण सत्य न मानणारी व्यक्‍ती पुढेही सत्यात न आल्यास, देव या व्यवस्थीकरणाचा नाश करेल तेव्हा त्या व्यक्‍तीचे काय होईल?—स्तोत्र ३७:३७, ३८.

आपल्या जोडीदाराला गैरवागणूक देणे

१६, १७. काहींनी कशाप्रकारे विश्‍वासघात केला?

१६ यानंतर मलाखीने दुसऱ्‍या प्रकारच्या विश्‍वासघाती वागणुकीविषयी सांगितले: खासकरून उचित कारण नसताना घटस्फोट देण्याद्वारे स्वतःच्या जोडीदाराला गैरवागणूक देणे. दुसऱ्‍या अध्यायातील १४ व्या वचनात असे म्हटले आहे: “तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्‍वर साक्षी आहे; ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिजबरोबर विश्‍वासघाताने वर्तला आहेस.” आपल्या पत्नींशी विश्‍वासघात करण्याद्वारे यहुदी पतींनी यहोवाच्या वेदीला ‘आसवांनी झाकून टाकले.’ (मलाखी २:१३) गैरशास्त्रवचनीय कारणांवरून घटस्फोट मिळवणारे हे पुरुष कदाचित तरुण किंवा विदेशी स्त्रियांसोबत विवाह करण्याकरता आपल्या तारुण्याच्या पत्नींना सोडून देत होते. आणि भ्रष्ट याजकांनी हा प्रकार चालू दिला! पण मलाखी २:१६ असे घोषित करते: “परमेश्‍वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे.” नंतर येशूनेही हे दाखवून दिले की केवळ अनैतिकतेच्या कारणामुळे घटस्फोट झाला असल्यास निर्दोष जोडीदार पुन्हा विवाह करण्यास मोकळा राहील.—मत्तय १९:९.

१७ मलाखीच्या शब्दांवर गांभिर्याने विचार करा, आणि हे शब्द आपल्या मनात कशाप्रकारे सहानुभूती व दयेची भावना जागृत करतात ते पाहा. मलाखी “तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी” असा उल्लेख करतो. यात सामील असलेल्या प्रत्येक पुरुषाने एका सहउपासक, इस्राएली स्त्रीशी विवाह करून तिला आपली प्रिय सहकारिणी, जीवनसंगिनी म्हणून निवडले होते. विवाह झाला तेव्हा कदाचित तो आणि ती तरुण असतील, पण केवळ काळ ओसरल्यामुळे आणि वय वाढल्यामुळे त्यांच्या विवाहाचा करार संपुष्टात आला असे नाही.

१८. विश्‍वासघातासंबंधी मलाखीचे मार्गदर्शन कशाप्रकारे समर्पक आहे?

१८ त्या प्रश्‍नांसंबंधी देण्यात आलेले मार्गदर्शन आज देखील तितकेच समर्पक आहे. काहीजण केवळ प्रभूमध्ये विवाह करण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करतात हे लज्जास्पद आहे. तसेच, काहीजण आपला वैवाहिक संबंध मजबूत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत नाहीत हे देखील अत्यंत खेदजनक आहे. उलट ते वेगवेगळी निमित्ते सांगून देवाला वीट असलेला मार्ग निवडतात; अर्थात, दुसऱ्‍या व्यक्‍तीशी विवाह करण्याकरता गैरशास्त्रवचनीय कारणांवरून घटस्फोट मिळवतात. असे केल्यामुळे त्यांनी “परमेश्‍वरास कंटाळा आणिला आहे.” मलाखीच्या काळात ज्यांनी देवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केले त्यांची इथपर्यंत विचार करण्याची मजल गेली की यहोवाचा दृष्टिकोन अन्यायी आहे. या अर्थाने ते असे म्हणत होते, “न्याय करणारा देव आहे कोठे?” त्यांची विचारसरणी किती विपर्यस्त होती! आपण या पाशात कधीही पडू नये.—मलाखी २:१७.

१९. पती आणि पत्नी देवाचा आत्मा कशाप्रकारे प्राप्त करू शकतात?

१९ सकारात्मक बाजू पाहिल्यास मलाखी स्पष्ट करतो की काही पती आपल्या पत्नींशी विश्‍वासघात करत नव्हते. त्यांच्यात ‘देवाच्या पवित्र आत्म्याचा थोडा तरी अंश’ होता. (१५ वे वचन) आनंदाची गोष्ट म्हणजे देवाच्या संस्थेत बहुत संख्येने असे पुरुष आहेत जे आपल्या ‘स्त्रियांना मान देतात.’ (१ पेत्र ३:७) ते आपल्या पत्नींवर शारीरिक जाच करत नाहीत, शब्दांद्वारे त्यांचा अपमान करत नाही, नीच लैंगिक कृत्ये करण्याची त्यांच्यावर जबरदस्ती करत नाहीत आणि इतर स्त्रियांशी थिल्लरपणे वागण्याद्वारे अथवा अश्‍लील साहित्य वाचण्याद्वारे त्यांचा अपमान करत नाहीत. शिवाय, देवाला व त्याच्या कायद्यांना निष्ठावान असणाऱ्‍या विश्‍वासू ख्रिस्ती पत्नींची संख्या देखील यहोवाच्या संस्थेत मोठी आहे ही धन्यतेची बाब आहे. देवाला कोणत्या गोष्टींचा वीट आहे हे या सर्व स्त्रीपुरुषांना माहीत असल्यामुळे ते त्याप्रमाणेच विचार करतात व वागतात. सतत त्यांच्याप्रमाणेच वागा, अर्थात ‘देवाची आज्ञा माना’ आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा आशीर्वाद उपभोगा.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

२०. सर्व मानवजातीकरता कोणती वेळ जवळ येत आहे?

२० लवकरच यहोवा या सबंध जगाचा न्यायनिवाडा करेल. प्रत्येक व्यक्‍तीला त्याच्या किंवा तिच्या विश्‍वासांविषयी व वागणुकीविषयी जाब द्यावा लागेल. “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१२) तेव्हा एक अतिशय विचारप्रवर्तक प्रश्‍न उपस्थित होतो: यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल? या मालिकेतील तिसऱ्‍या व शेवटल्या लेखात हा विषय विचारात घेतला जाईल.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

• कोणत्या मुख्य कारणासाठी यहोवाने इस्राएली याजकांची निर्भर्त्सना केली?

• देवाचे आदर्श मानवांकरता पालन करण्यास अतिशय कठीण का नाहीत?

• आपण आज आपल्या शिकवणुकींसंबंधाने काळजी का घेतली पाहिजे?

• कोणत्या दोन प्रकारच्या वागणुकींची यहोवाने खासकरून निर्भर्त्सना केली?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

मलाखीच्या काळात याजकांनी यहोवाच्या मार्गांचा त्याग केल्यामुळे त्यांची निर्भर्त्सना करण्यात आली

[१६ पानांवरील चित्र]

आपण स्वतःच्या आवडीनिवडींचा पुरस्कार करण्याऐवजी नेहमी यहोवाचे मार्ग शिकवण्याची काळजी घेतली पाहिजे

[१८ पानांवरील चित्रे]

आपल्या स्त्रियांना क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट देऊन विदेशी स्त्रियांशी लग्न करणाऱ्‍या इस्राएली पुरूषांची यहोवाने निर्भर्त्सना केली

[१८ पानांवरील चित्र]

आज ख्रिस्ती स्त्रीपुरुष आपल्या विवाहाच्या कराराचा आदर करतात