व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विकलांगतेचा अंत कसा होणार

विकलांगतेचा अंत कसा होणार

विकलांगतेचा अंत कसा होणार

आंधळे पाहू लागलेत, बहिरे ऐकू लागलेत, मुके आनंदाने बोलू लागलेत आणि लंगडे चालू लागलेत अशी कल्पना करा! येथे आपण वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीची गोष्ट करत नाही तर स्वतः देव मानवांच्या कारभारात हस्तक्षेप करील तेव्हा जे घडेल त्याविषयी बोलत आहोत. बायबल असे भाकीत करते: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३५:५, ६) पण ही विस्मयकारक भविष्यवाणी खरी ठरेल अशी खात्री आपण कशी बाळगू शकतो?

पहिली गोष्ट म्हणजे, येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने सर्व प्रकारचे आजार आणि विकलांगता असलेल्या लोकांना बरे केले होते. शिवाय, त्याच्या बहुतेक चमत्कारांना अनेक लोक—त्याचे शत्रू देखील—साक्षीदार होते. एकदा तर असे घडले की, येशूने एकाला बरे केल्यावर त्याच्या संशयखोर विरोधकांनी त्याला खोटे ठरवण्यासाठी, बरे केलेल्या त्या माणसाची कसून तपासणी केली. पण त्यांची केवढी निराशा झाली कारण असे केल्यामुळे उलट येशूच्या चमत्काराला त्यांनी आणखीनच पुष्टी दिली. (योहान ९:१, ५-३४) येशूने उघडपणे आणखी एक चमत्कार केल्यावर ते निराश होऊन म्हणाले: “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो.” (योहान ११:४७) परंतु सामान्य लोक त्यांच्यासारखे असंवेदनशील नव्हते कारण पुष्कळ जण येशूवर विश्‍वास ठेवू लागले.—योहान २:२३; १०:४१, ४२; १२:९-११.

येशूचे चमत्कार—जागतिक प्रमाणावरील रोगमुक्‍तीची पूर्वझलक

येशूच्या चमत्कारांद्वारे येशू मशीहा आणि देवाचा पुत्र असल्याचे फक्‍त सिद्ध झाले नाही. तर, भविष्यात आज्ञाधारक मानवजातीला सर्व रोगांपासून मुक्‍त केले जाईल यासंदर्भात दिलेल्या बायबलमधील अभिवचनांवर विश्‍वास ठेवण्यासाठी आधार मिळाला. या अभिवचनांमध्ये, यशया ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणी आहे जिचा उल्लेख पहिल्या परिच्छेदात करण्यात आला आहे. यशया ३३:२४ मध्ये देव-भीरु मानवांच्या भावी आरोग्याविषयी असे म्हटले आहे: “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” त्याचप्रमाणे प्रकटीकरण २१:४ यात अशी प्रतिज्ञा आहे: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

येशूची आदर्श प्रार्थना म्हणताना, लोक नियमितपणे या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेसाठी प्रार्थना करतात; ज्यात असे म्हटले आहे: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) होय, देवाच्या इच्छेमध्ये पृथ्वी आणि मानवजातीचाही समावेश होतो. रोगराई आणि विकलांगता यांना काही कारणास्तव चालू दिले असले तरी लवकरच त्यांचा अंत होईल; देवाच्या ‘पादासनावर’ त्यांचे सावट अनंतकाळापर्यंत राहणार नाही.—यशया ६६:१. *

वेदनारहित व विनामूल्य रोगमुक्‍ती

लोकांचा कसलाही आजार येशूने झटपट बरा केला; आणि हे करताना त्यांना कसलीही वेदना झाली नाही किंवा खर्चही द्यावा लागला नाही. साहजिकच, ही खबर वणव्यासारखी लोकांमध्ये पसरल्यावर “लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले.” लोकांचा काय प्रतिसाद होता? मत्तयने हे सर्व प्रत्यक्ष पाहिले; त्याचा अहवाल पुढे म्हणतो: “मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.”—मत्तय १५:३०, ३१.

येशूने ज्यांना बरे केले त्यांना त्याने जमावातून आधीच निवडले नव्हते याची दखल घ्या. ही तोतयांची युक्‍ती आहे. उलट, या त्रस्त लोकांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी ‘त्यांना येशूच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले.’ आता आपण येशूच्या बरे करण्याच्या शक्‍तीची काही विशिष्ट उदाहरणे पाहू या.

अंधत्व: जेरूसलेममध्ये असताना येशूने एका “जन्मांध” मनुष्याला बरे केले. आंधळा व भिकारी म्हणून शहरातले सर्वजण त्याला ओळखत होते. त्यामुळे, त्याला दृष्टी लाभल्यावर त्याला इकडेतिकडे फिरताना लोकांनी पाहिले तेव्हा किती खळबळ माजली असेल याची कल्पना करा! पण, सर्वांनाच या गोष्टीचा आनंद झाला नाही. त्या काळी परुशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या प्रमुख व प्रभावी पंथाचे काही सदस्य, येशूने काही तरी चालबाजी केली हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते कारण या आधी येशूने त्यांचा दुष्टपणा उघडकीस आणल्यामुळे ते चिडलेले होते. (योहान ८:१३, ४२-४४; ९:१, ६-३१) म्हणून त्यांनी बरे केलेल्या मनुष्याची, नंतर त्याच्या पालकांची आणि मग पुन्हा त्या मनुष्याची चौकशी केली. पण परुशांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे उलट येशूचा चमत्कार खरा होता याला त्यांनी नकळत दुजोरा दिला आणि यामुळे त्यांचा तिळपापड झाला. बरा झालेला मनुष्य, या धार्मिक ढोंगी लोकांच्या कुटिलतेने गोंधळून स्वतःच म्हणाला: “जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तर ह्‍याला काही करता आले नसते.” (योहान ९:३२, ३३) त्याने प्रामाणिकपणे व तर्कशुद्धपणे आपला विश्‍वास अशाप्रकारे व्यक्‍त केल्यामुळे परुशांनी “त्याला बाहेर घालविले”; यावरून हे सूचित होते की, त्यांनी एकेकाळी आंधळा असलेल्या मनुष्याला सभास्थानातून बहिष्कृत केले.—योहान ९:२२, ३४.

बहिरेपणा: यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश, दकापलीस येथे येशू होता तेव्हा “लोकांनी एका बहिऱ्‍या-तोतऱ्‍या माणसाला त्याच्याकडे” आणले. (मार्क ७:३१, ३२) येशूने या व्यक्‍तीला फक्‍त बरे केले नाही तर एका बहिऱ्‍या व्यक्‍तीला लोकांमध्ये कसे लाजल्यासारखे होऊ शकते या भावना देखील त्याने ताडल्या. बायबल आपल्याला सांगते की, येशूने त्या बहिऱ्‍या व्यक्‍तीला “लोकांपासून एकीकडे नेऊन” त्याला बरे केले. पुन्हा एकदा, हा चमत्कार पाहिलेले लोक “अतिशय थक्क होऊन” म्हणाले: “त्याने सर्व काही चांगले केले आहे. हा बहिऱ्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्‍ति देतो.”—मार्क ७:३३-३७.

पक्षघात: येशू कफर्णहूम येथे असताना, लोकांनी बाजेवर पडून असलेल्या एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. (मत्तय ९:२) ६ ते ८ वचनांमध्ये काय झाले त्याचे वर्णन दिले आहे. “[येशू] पक्षघाती माणसाला म्हणाला: ‘ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.’ मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.” हा चमत्कार देखील येशूच्या शिष्यांच्या आणि शत्रूंच्या देखत करण्यात आला होता. लक्षात घ्या की, ज्यांची मने द्वेष आणि पूर्वग्रहामुळे दूषित झाली नव्हती त्या येशूच्या शिष्यांनी तो चमत्कार पाहून ‘देवाचे गौरव’ केले.

रोग: तसेच “कोणीएक कुष्ठरोगी [येशूची] विनंती करत त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला म्हणाला, ‘तुझी इच्छा असली तर तू मला शुद्ध करायला समर्थ आहेस.’ तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला, व त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला, व त्याला म्हटले, ‘माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.’ आणि लागलेच त्याचा कुष्ठरोग त्याच्यापासून निघून गेला.” (मार्क १:४०-४२) एक गोष्ट लक्षात घ्या, येशूने कुरकूर करून या व्यक्‍तीला बरे केले नाही तर त्याला त्याचा मनापासून कळवळा आला होता. तुम्ही एक कुष्ठरोगी आहात अशी कल्पना करा. या भयंकर रोगामुळे हळूहळू तुमचे शरीर झिजत चालले आहे आणि समाजातल्या लोकांनी तुम्हाला वाळीत टाकले आहे; परंतु, तुम्हाला या भयंकर रोगापासून काहीही वेदना न होता तत्काळ बरे केले तर तुम्हाला कसे वाटेल? एका कुष्ठरोग्याला चमत्काराने बरे केल्यावर तो “येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला.” त्याच्या भावना आपण समजू शकतो, नाही का?—लूक १७:१२-१६.

इजा: येशूला ताब्यात घेऊन वधस्तंभावर लटकवण्याआधी त्याने एकाला बरे केले; हा त्याचा शेवटला चमत्कार होता. येशूला पकडण्यासाठी लोक आले तेव्हा प्रेषित पेत्राने अविचारीपणे आपल्याजवळील “तरवार . . . उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला.” (योहान १८:३-५, १०) लूकमधील समांतर अहवाल आपल्याला सांगतो की, येशूने “त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.” (लूक २२:५०, ५१) पुन्हा एकदा आपण पाहतो की हे दयाशील कृत्य येशूच्या मित्रांच्या तसेच शत्रूंच्या अर्थात त्याला धरायला आलेल्यांच्या देखत करण्यात आले.

होय, येशूच्या चमत्कारांचे आपण जितके जवळून परीक्षण करू तितकेच त्याचे चमत्कार खरे असल्याचे स्पष्ट दिसून येते. (२ तीमथ्य ३:१६) आधी सांगितल्याप्रमाणे, अशा अभ्यासामुळे आज्ञाधारक मानवांना रोगमुक्‍त करण्याविषयी देवाने दिलेल्या अभिवचनांवर आपला विश्‍वास भक्कम होईल. ख्रिस्ती विश्‍वास हा “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे” असे बायबल त्याचे वर्णन करते. (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस ११:१) यावरून हे स्पष्ट होते की, देव, आंधळेपणाने विश्‍वास करायला किंवा आशा असलेल्या गोष्टी पूर्ण होतील अशी कल्पना करायला नव्हे तर पुराव्यांवर आधारलेला भक्कम विश्‍वास बाळगायला उत्तेजन देतो. (१ योहान ४:१) असा विश्‍वास प्राप्त केल्यावर आपण आध्यात्मिकरित्या अधिक मजबूत, सुदृढ आणि आनंदी होत असल्याचे आपल्या लक्षात येते.—मत्तय ५:३; रोमकर १०:१७.

प्रथम आध्यात्मिकरित्या निरोगी होणे!

शारीरिकरित्या सुदृढ असलेले अनेक लोक दुःखी आहेत. काहीजण आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करतात कारण भविष्याकरता त्यांना आशा नसते किंवा समस्यांमुळे ते दबून गेलेले असतात. खरे पाहता ते आध्यात्मिकरित्या रोगी असतात—देवाच्या नजरेत ही स्थिती शारीरिक दुर्बलतेपेक्षा जास्त गंभीर आहे. (योहान ९:४१) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्चन आणि ज्यून्यरसारखे शारीरिकरित्या विकलांग असलेले अनेकजण आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत. का? कारण ते आध्यात्मिकरित्या सुदृढ आहेत आणि बायबलमधल्या खात्रीशीर आशेमुळे त्यांना स्फूर्ती मिळाली आहे.

मानव या नात्याने आपल्या अद्वितीय गरजेला संबोधून येशू म्हणाला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) होय, आपण प्राण्यांसारखे नाही; आपल्याला फक्‍त शारीरिक गरजा नाहीत. देवाच्या ‘प्रतिरूपात’ आपल्याला निर्माण केलेले असल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक अन्‍नाची अर्थात, देवाविषयी आणि त्याच्या उद्देशात आपले काय स्थान आहे याविषयी तसेच त्याची इच्छा पूर्ण करण्याविषयीचे ज्ञान घेण्याची गरज आहे. (उत्पत्ति १:२७; योहान ४:३४) देवाविषयीचे ज्ञान घेतल्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ लाभतो आणि आध्यात्मिक चैतन्य मिळते. तसेच ते, परादीस पृथ्वीवरील अनंतकालिक जीवनाला आधारभूत ठरते. येशूने म्हटले, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

येशूच्या समकालीन लोकांनी त्याला “बरे करणारा” म्हणून नव्हे तर “गुरूजी” असे संबोधले, हे लक्ष देण्याजोगे आहे. (लूक ३:१२; ७:४०) का? कारण मानवजातीच्या समस्यांवरील कायमस्वरूपी उपायाविषयी अर्थात देवाच्या राज्याविषयी तो लोकांना शिकवत असे. (लूक ४:४३; योहान ६:२६, २७) येशू ख्रिस्ताच्या हाती असलेले हे स्वर्गीय सरकार संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील आणि धार्मिक मानवांना व त्यांच्या पार्थिव घराला पूर्णपणे व कायमचे पूर्ववत करण्यासंबंधी बायबलमधली सर्व अभिवचने पूर्ण करील. (प्रकटीकरण ११:१५) म्हणूनच, येशूने आपल्या आदर्श प्रार्थनेत देवाच्या राज्याच्या येण्याचा संबंध पृथ्वीवर त्याच्या इच्छेप्रमाणे होण्याशी जोडला.—मत्तय ६:१०.

विकलांग असलेल्या अनेकांनी ही प्रेरणादायक आशा जाणून घेतल्यामुळे त्यांचे दुःखाचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले आहेत. (लूक ६:२१) देव फक्‍त आजारपण आणि विकलांगता काढून टाकणार नाही तर मानवी दुःखाचे मूळ कारण म्हणजे पाप हेच तो पूर्णपणे मिटवून टाकील. आधी उल्लेख केलेल्या यशया ३३:२४ आणि मत्तय ९:२-७ या वचनांमध्ये आजारपण आणि आपली पापमय स्थिती यांचा संबंध जोडण्यात आला आहे. (रोमकर ५:१२) पापावर कब्जा करण्यात आल्यावर, मानवजातीला सरतेशेवटी, “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळेल; या मुक्‍ततेत परिपूर्ण मन आणि शरीर देखील समाविष्ट असेल.—रोमकर ८:२१.

ज्यांना चांगले आरोग्य लाभले आहे त्यांना कधीकधी त्याचे इतके मूल्य वाटत नाही. पण विकलांगतेचा कटू अनुभव आलेल्या लोकांचे तसे नसते. आरोग्य आणि जीवन किती मूल्यवान आहेत आणि अचानक व अनपेक्षितपणे सगळे काही कसे बदलू शकते याची त्यांना चांगली जाणीव असते. (उपदेशक ९:११) त्यामुळे, आमच्या वाचकांमधील विकलांग लोक बायबलमध्ये दिलेल्या देवाच्या अद्‌भुत वचनांकडे खास लक्ष देतील अशी आमची आशा आहे. ही वचने पूर्ण व्हावीत म्हणून येशूने स्वतःचा जीव दिला. यापेक्षा जास्त खात्री आपल्याला कोठे मिळू शकेल?—मत्तय ८:१६, १७; योहान ३:१६.

[तळटीप]

^ परि. 6 देवाने दुःखाला परवानगी का दिली आहे यावर सविस्तर माहिती मिळवण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले देव खरोखर आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक पाहा.