व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गरजवंतांना प्रेमदया दाखवा

गरजवंतांना प्रेमदया दाखवा

गरजवंतांना प्रेमदया दाखवा

“एकमेकांस प्रेमदया दाखवा.”जखऱ्‍या ७:९, Nw.

१, २. (अ) आपण प्रेमदया का दाखवली पाहिजे? (ब) आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

यहोवा देवाचे वचन आपल्याला ‘दयेची [“प्रेमदया,” तळटीप, NW]’ आवड धरण्यास उत्तेजन देते. (मीखा ६:८) आपण असे का करावे हे देखील ते दाखवते. पहिले कारण म्हणजे, “दयाळू मनुष्य [“प्रेमदया दाखवणारा,” NW] आपल्या जिवाचे हित करितो.” (नीतिसूत्रे ११:१७) हे किती खरे आहे! प्रेमदया अथवा एकनिष्ठ प्रेम दाखवणारी व्यक्‍ती इतरांसोबत घनिष्ट प्रेमाचे कायमस्वरूपी नाते जोडू शकते. त्यामुळे आपल्याला निष्ठावान मित्र मिळतील; हा खरोखर अनमोल आशीर्वाद नाही का?—नीतिसूत्रे १८:२४.

शिवाय, बायबल असेही सांगते की “जो न्यायीपण व प्रेमदया यांना अनुसरतो त्याला जीवन, न्यायीपण व सन्मान प्राप्त होतील.” (नीतिसूत्रे २१:२१, पं.र.भा.) होय, प्रेमदया अनुसरल्यामुळे आपण देवाला प्रिय वाटू आणि यामुळे आपल्याला भविष्यातही अनेक आशीर्वाद व सार्वकालिक जीवनही मिळेल. पण आपण प्रेमदया कशाप्रकारे दाखवू शकतो? आपण ती कोणाकोणाला दाखवली पाहिजे? आणि प्रेमदयेने वागणे हे सर्वसामान्य दयाळूपणा अथवा माणुसकी दाखवण्यापेक्षा वेगळे आहे का?

मानवी दया आणि प्रेमदया

३. प्रेमदया आणि माणुसकी यात काय फरक आहे?

मानवी दया, अर्थात माणुसकी आणि प्रेमदया यांत बराच फरक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीशी फारशी ओळख अथवा नाते नसताना देखील त्या व्यक्‍तीशी आपण दयाळूपणे वागतो. ही झाली माणुसकी. पण आपण एखाद्या व्यक्‍तीला प्रेमदया दाखवतो तेव्हा आपोआपच आपण त्या व्यक्‍तीशी एक प्रेमळ नातेसंबंध जोडतो. मानवांनी एकमेकांना दाखवलेल्या प्रेमदयेच्या बायबलमधील काही उदाहरणांत त्या दोन व्यक्‍तींमध्ये आधीपासूनच नातेसंबंध होता. (उत्पत्ति २०:१३; २ शमुवेल ३:८; १६:१७) तर काही उदाहरणांत प्रेमदया दाखवल्यामुळे दोन व्यक्‍तींमध्ये नातेसंबंध जोडला गेला. (यहोशवा २:१, १२-१४; १ शमुवेल १५:६; २ शमुवेल १०:१, २) हा फरक स्पष्ट करण्याकरता आपण बायबलमधील दोन उदाहरणांची तुलना करू; एक मानवांनी आपसात माणुसकी दाखवण्यासंबंधीचे आणि एक प्रेमदया दाखवण्यासंबंधीचे उदाहरण आहे.

४, ५. येथे उल्लेख केलेल्या दोन बायबल उदाहरणांतून माणुसकी आणि प्रेमदया यांतला फरक कशाप्रकारे दिसून येतो?

माणुसकीचे एक उदाहरण एका फुटलेल्या जहाजातून बचावलेल्या लोकांसंबंधी आहे. या लोकांत प्रेषित पौल देखील होता. जहाज फुटल्यावर ते कसेबसे मिलिता बेटावर येऊन पोचले. (प्रेषितांची कृत्ये २७:३७-२८:१) बेटावरील रहिवाशी या दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करण्यास बांधील नव्हते, किंबहुना त्यांचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता; पण तरीसुद्धा त्यांनी या अनोळखी लोकांचे स्वागत केले, आणि अशारितीने त्यांना ‘असाधारण माणुसकीने’ वागवले. (प्रेषितांची कृत्ये २८:२, ७, NW) त्यांचा आतिथ्यसत्कार करण्याद्वारे मिलिता बेटावरील लोकांनी त्यांच्यावर दया केली, पण ती प्रासंगिक होती आणि अनोळखी लोकांप्रती होती. त्यामुळे हे एक माणुसकीचे कृत्य होते.

त्याच्या तुलनेत दावीद राजाने मफीबोशेथला दाखवलेल्या आतिथ्यसत्काराचा विचार करा. मफीबोशेथ दाविदाचा मित्र योनाथान याचा पुत्र होता. दाविदाने मफीबोशेथास सांगितले: “तू नित्य माझ्या पंक्‍तीस भोजन करावे.” अशी व्यवस्था आपण का करत आहोत हे देखील दाविदाने स्पष्ट केले: “तुझा बाप योनाथान ह्‍याच्याकरिता मी तुजवर अवश्‍य दया [“प्रेमदया,” NW] करीन.” (२ शमुवेल ९:६, ७, १३) दाविदाच्या सातत्यपूर्ण आतिथ्यसत्काराला केवळ माणुसकी नव्हे तर प्रेमदया म्हटले आहे, हे योग्यच आहे. कारण आधीपासूनच असलेल्या संबंधाला निष्ठावान राहण्याचा हा एक पुरावा होता. (१ शमुवेल १८:३; २०:१५, ४२) आजही देवाचे सेवक सर्व मानवांशी माणुसकीने वागतात. पण ज्यांच्यासोबत त्यांचा देवाला स्वीकार्य असा संबंध आहे त्यांच्याशी ते सातत्याने प्रेमदयेने अर्थात, एकनिष्ठ प्रेमाने वागतात.—मत्तय ५:४५; गलतीकर ६:१०.

६. मानवांनी एकमेकांप्रती दाखवलेल्या प्रेमदयेची कोणती वैशिष्ट्ये देवाच्या वचनातून दिसून येतात?

प्रेमदयेची आणखी काही वैशिष्ट्ये पाहण्याकरता आपण या गुणाकडे लक्ष वेधणारे बायबलमधील तीन अहवाल विचारात घेऊ या. यांवरून आपल्याला हे दिसून येईल की मानवांनी दाखवलेली प्रेमदया (१) विशिष्ट कृतींतून दिसून येते, (२) स्वेच्छेने दाखवली जाते आणि (३) खासकरून गरजवंतांना दाखवली जाते. शिवाय आपण आज प्रेमदया कशी दाखवू शकतो हे देखील या अहवालांवरून स्पष्ट होईल.

एका पित्याने दाखवलेली प्रेमदया

७. अब्राहामच्या सेवकाने बथुवेल व लाबान यांना काय सांगितले आणि त्याने कोणता महत्त्वाचा मुद्दा मांडला?

उत्पत्ति २४:२८-६७ या वचनांत अब्राहामच्या सेवकाविषयी, याआधीच्या लेखात उल्लेख केलेल्या अहवालाचा उर्वरित भाग आहे. रिबकेला भेटल्यानंतर अब्राहामच्या सेवकाला तिचा पिता बथुवेल याच्या घरी बोलवण्यात आले. (२८-३२ वचने) तेथे त्या सेवकाने अब्राहामच्या पुत्रासाठी नवरी शोधण्यासाठी आपण इथवर कशाप्रकारे आलो हे सविस्तर सांगितले. (३३-४७ वचने) आपल्याला येथवर मिळालेली सफलता ही यहोवाकडून असलेले चिन्ह होते यावर त्याने जोर दिला आणि म्हटले: “माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्‍वर याने मला नीट वाट दाखविली.” (४८ वे वचन) त्या सेवकाला निश्‍चितच अशी आशा असेल की सबंध घटनेची प्रामाणिकपणे इत्थंभूत माहिती दिल्यामुळे बथुवेल व त्याचा पुत्र लाबान यांना या कार्यामागे यहोवाचा हात आहे याविषयी खात्री पटेल. शेवटी सेवकाने म्हटले: “तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने [“प्रेमदयेने,” NW] व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”—४९ वचन.

८. रिबकेसंबंधी बथुवेलची काय प्रतिक्रिया होती?

यहोवाने आधीच अब्राहामला प्रेमदया दाखवली होती. (उत्पत्ति २४:१२, १४, २७) रिबकेला अब्राहामच्या सेवकासोबत जाऊ देण्याद्वारे बथुवेल देखील असेच करण्यास तयार होणार होता का? देवाच्या प्रेमदयेला मानवांच्या प्रेमदयेची साथ मिळणार होती का? की त्या सेवकाचा इतक्या दूरचा प्रवास निष्फळ ठरणार होता? लाबान आणि बथुवेलाने पुढीलप्रमाणे म्हटले तेव्हा अब्राहामच्या सेवकाला हायसे वाटले असेल: “ही परमेश्‍वराची योजना आहे; तुम्हाला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही.” (५० वे वचन) या गोष्टीमागे यहोवाचा हात असल्याचे ओळखून त्यांनी लगेच त्याचा निर्णय स्वीकारला. यानंतर बथुवेलने आपली प्रेमदया व्यक्‍त करून म्हटले: “पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्‍वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” (५१ वे वचन) रिबका अब्राहामच्या सेवकासोबत जाण्यास आनंदाने तयार झाली आणि लवकरच ती इसहाकाची प्रिय पत्नी बनली.—४९, ५२-५८, ६७ वचने.

एका पुत्राने दाखवलेली प्रेमदया

९, १०. (अ) याकोबाने योसेफाला काय करण्याची विनंती केली? (ब) योसेफ आपल्या पित्याशी कशाप्रकारे प्रेमदयेने वागला?

अब्राहामचा नातू याकोब याला देखील प्रेमदया प्राप्त झाली. उत्पत्तिच्या ४७ व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे याकोब तेव्हा ईजिप्तमध्ये राहात होता आणि ‘त्याचा अंतकाळ समीप आला होता.’ (२७-२९ वचने) अब्राहामाला देवाने प्रतिज्ञा केलेल्या देशाबाहेर आपला मृत्यू होणार या विचाराने याकोब व्यथित होता. (उत्पत्ति १५:१८; ३५:१०, १२; ४९:२९-३२) आपल्याला इजिप्तमध्ये पुरले जावे अशी याकोबाची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने आपले शव कनान देशात नेले जावे याकरता व्यवस्था केली. त्याच्या पुत्राचे त्या देशात वजन होते, त्यामुळे याकोबाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याच्यापेक्षा उत्तम व्यक्‍ती आणखी कोण असू शकत होती?

१० अहवाल पुढे म्हणतो: “तेव्हा [याकोबाने] आपला मुलगा योसेफ यास बोलावून आणून म्हटले, तुझी मजवर कृपादृष्टि असेल तर मजशी तू ममतेने [“प्रेमदयेने,” NW] व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस. . . . मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात ठेव.” (उत्पत्ति ४७:२९, ३०) योसेफाने ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि यानंतर काही काळातच याकोबाचा मृत्यू झाला. योसेफ व याकोबाच्या इतर मुलांनी त्याचा देह “कनान देशी नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेताच्या गुहेत त्याला मूठमाती दिली. अब्राहामाने . . . शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा.” (उत्पत्ति ५०:५-८, १२-१४) अशारितीने योसेफ आपल्या पित्याशी प्रेमदयेने वागला.

सुनेने दाखवलेली प्रेमदया

११, १२. (अ) रूथने नामीला प्रेमदया कशाप्रकारे दाखवली? (ब) रूथची प्रेमदया “पहिल्यापेक्षा दुसऱ्‍या खेपेस” कशाप्रकारे अधिक होती?

११ रूथ या पुस्तकात, नामी नावाच्या विधवेला रूथ या तिच्या मवाबी सुनेने कशाप्रकारे प्रेमदया दाखवली हे आपण वाचतो. रूथ देखील एक विधवा होती. नामीने यहुदामधील बेथलेहेमास परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा रूथने प्रेमदया व दृढ निर्धार प्रदर्शित केला व म्हटले: “तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) नंतर रूथने बवाज या नामीच्या वयस्क नातलगाशी लग्न करण्याची तयारी दाखवण्याद्वारे आपली प्रेमदया व्यक्‍त केली. * (अनुवाद २५:५, ६; रूथ ३:६-९) बवाजने रूथला म्हटले: “तू पहिल्यापेक्षा दुसऱ्‍या खेपेस अधिक प्रेमळपणा [“प्रेमदया,” NW] दाखविलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाहि तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.”—रूथ ३:१०.

१२ रूथच्या प्रेमदयेच्या ‘पहिल्या खेपेविषयी’ केलेला उल्लेख तिने आपल्या लोकांना सोडून नामीशी जडून राहण्यासंबंधी होता. (रूथ १:१४; २:११) त्यापेक्षा अधिक प्रेमदया तिने बवाजाशी लग्न करण्याची तयारी दाखवण्याद्वारे या “दुसऱ्‍या खेपेस” प्रदर्शित केली. मुले प्रसवण्याचे वय पार केलेल्या नामीकरता आता रूथ एक वारस पुरवू शकत होती. बवाज व रूथचे लग्न झाले आणि नंतर रूथने मुलाला जन्म दिला तेव्हा बेथलेहेमच्या स्त्रिया म्हणाल्या की ‘नामीला पुत्र झाला आहे.’ (रूथ ४:१४, १७) रूथ खरोखर “सद्‌गुणी स्त्री” होती आणि येशू ख्रिस्ताची पूर्वज होण्याचा बहुमान देण्याद्वारे यहोवाने तिला उत्तम प्रतिफळ दिले.—रूथ २:१२; ३:११; ४:१८-२२; मत्तय १:१, ५, ६.

प्रेमदया कृतींतून व्यक्‍त होते

१३. बथुवेल, योसेफ, आणि रूथ यांनी कशाप्रकारे प्रेमदया प्रदर्शित केली?

१३ बथुवेल, योसेफ आणि रूथ या तिघांनीही कशाप्रकारे आपली प्रेमदया व्यक्‍त केली याकडे तुम्ही लक्ष दिले का? त्यांनी केवळ प्रेमळ उद्‌गारांतूनच नव्हे तर विशिष्ट कृतींद्वारे असे केले. बथुवेलने, “पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे” इतकेच केवळ म्हटले नाही, तर त्याने तिची “रवानगी केली.” (उत्पत्ति २४:५१, ५९) योसेफने केवळ “आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन” असे म्हटले नाही, तर योसेफ व त्याच्या भावांनी, आपल्या पित्याने ‘आज्ञा केली होती त्याप्रमाणे केले.’ (उत्पत्ति ४७:३०; ५०:१२, १३) रूथने देखील “तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन” असे केवळ म्हटले नाही, तर तिने आपल्या लोकांचा त्याग केला व नामीबरोबर ती गेली आणि अशारितीने “त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहंचल्या.” (रूथ १:१६, १९) यहुदामध्ये रूथने पुन्हा एकदा “आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे सर्व काही केले.” (रूथ ३:६) होय इतरांप्रमाणेच रूथची प्रेमदया देखील कृतींतून व्यक्‍त झाली.

१४. (अ) आज देवाचे सेवक कशाप्रकारे आपल्या कृतींतून प्रेमदया व्यक्‍त करतात? (ब) तुमच्या भागातल्या ख्रिश्‍चनांमध्ये केल्या जाणाऱ्‍या अशा प्रेमदयेच्या कोणत्या कृत्यांचा तुम्हाला उल्लेख करता येईल?

१४ आज देवाचे सेवक कशाप्रकारे आपल्या कृतींतून प्रेमदया व्यक्‍त करत आहेत हे पाहून खरोखर आनंद वाटतो. उदाहरणार्थ आपल्या बांधवांपैकी आजारी, दुःखीकष्टी असणाऱ्‍यांना सातत्याने भावनिक आधार देणाऱ्‍यांचा विचार करा. (नीतिसूत्रे १२:२५) किंवा वयोवृद्ध बांधवांना मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याकरता गाडीतून राज्य सभागृहापर्यंत नेणाऱ्‍या कित्येक साक्षीदारांचे उदाहरण घ्या. ८२ वर्षांची ॲना संधिवाताने त्रस्त आहे. तिचे पुढील शब्द कित्येक बांधवांच्या भावना व्यक्‍त करतात: “सर्व सभांना मला बंधू गाडीने नेतात हा यहोवाचाच आशीर्वाद आहे. असे प्रेमळ बंधू व भगिनी दिल्याबद्दल मी त्याचे मनापासून उपकार मानते.” तुम्ही देखील मंडळीच्या अशा कार्यांत सहभाग घेत आहात का? (१ योहान ३:१७, १८) घेत असाल तर तुम्ही याची खात्री बाळगू शकता की तुमच्या प्रेमदयेची अतिशय कदर केली जाते.

स्वेच्छेने व्यक्‍त केली जाते

१५. आपण विचारात घेतलेल्या बायबलमधील तीन वृत्तान्तांवरून प्रेमदयेचे कोणते वैशिष्ट्य अधिक स्पष्ट होते?

१५ आपण विचारात घेतलेले बायबलमधील वृत्तान्त दाखवतात की प्रेमदया ही बळजबरीने नव्हे तर मनापासून आणि स्वेच्छेने दाखवली जाते. बथुवेलने अब्राहामच्या सेवकाला स्वेच्छेने सहकार्य दिले आणि रिबकेनेही असेच केले. (उत्पत्ति २४:५१, ५८) योसेफानेही स्वेच्छेने प्रेमदया दाखवली, यासाठी इतरांना तगादा लावावा लागला नाही. (उत्पत्ति ५०:४, ५) रूथने तर “[नामीबरोबर] जाण्याचा पुरा निश्‍चय” केला होता. (रूथ १:१८) रूथने बवाजकडे जावे असे नामीने सुचवले तेव्हा, मवाबी रूथच्या प्रेमदयेने तिला असे म्हणण्यास प्रवृत्त केले, की “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”—रूथ ३:१-५.

१६, १७. बथुवेल, योसेफ व रूथ यांची प्रेमदया अधिकच अर्थपूर्ण का आहे आणि त्यांना कशामुळे हा गुण प्रदर्शित करण्याची प्रेरणा झाली?

१६ बथुवेल, योसेफ आणि रूथ यांनी दाखवलेली प्रेमदया खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण अब्राहाम, याकोब किंवा नामी हे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याच्या स्थितीत नव्हते. बथुवेलवर आपल्या मुलीला दूरदेशी पाठवण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नव्हते. तो सहज अब्राहामच्या सेवकाला म्हणू शकला असता, की ‘नाही, आमच्या मेहनती मुलीला आम्ही जवळच ठेवू इच्छितो.’ (उत्पत्ति २४:१८-२०) तसेच योसेफावरही त्याच्या पित्याच्या विनंतीनुसार वागण्याचे बंधन नव्हते कारण याकोबाच्या मृत्यूनंतर साहजिकच तो योसेफाला जबरदस्तीने आपली इच्छा पूर्ण करण्यास लावू शकणार नव्हता. नामीने तर स्वतःच रूथला मवाबला परतून तेथे राहण्याचे सुचवले होते. (रूथ १:८) तसेच, वयस्कर बवाजशी लग्न करण्याऐवजी एखाद्या “तरूण” माणसाशी लग्न करण्यास रूथ मोकळी होती.

१७ बथुवेल, योसेफ व रूथ यांनी स्वेच्छेने प्रेमदया दाखवली; त्यांना असे करण्याची मनापासून प्रेरणा झाली होती. राजा दाविदाने आपले कर्तव्य समजून मफीबोशेथवर प्रेमदया दाखवली त्याचप्रमाणे बथुवेल, योसेफ व रूथ यांनीही आपल्या नात्यातील व्यक्‍तींप्रती प्रेमदया दाखवणे ही नैतिक जबाबदारी मानली.

१८. (अ) ख्रिस्ती वडील कशा मनोवृत्तीने ‘कळपाचे पालन करतात?’ (ब) सहविश्‍वासू बांधवांना मदत करण्याविषयी आपल्या भावना एका वडिलांनी कशाप्रकारे व्यक्‍त केल्या?

१८ आजही प्रेमदया हा देवाच्या लोकांची ओळख करून देणारा गुण आहे; यात देवाच्या कळपाचे पालन करणाऱ्‍यांचाही समावेश होतो. (स्तोत्र ११०:३; १ थेस्सलनीकाकर ५:१२) हे वडील किंवा अध्यक्ष त्यांच्या नेमणुकीमुळे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे महत्त्व ओळखतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) पण तरीसुद्धा मंडळीसाठी ते जे काही मेंढपाळकत्वाचे किंवा इतर प्रेमदयेचे कार्य करतात ते “करावे लागते म्हणून नव्हे, तर . . . संतोषाने” करतात. (१ पेत्र ५:२) वडील कळपाचे पालन करतात कारण त्यांच्यावर एक जबाबदारी आहे आणि त्यांना असे करण्याची इच्छा देखील आहे. ते ख्रिस्ताच्या मेंढरांप्रती प्रेमदया दाखवतात कारण त्यांनी असे केले पाहिजे आणि ते असे करू इच्छितात. (योहान २१:१५-१७) एका ख्रिस्ती वडिलाने म्हटले: “मला बांधवांच्या घरी काही खास कारणासाठी नाही तरी, फक्‍त त्यांच्याबद्दल मी विचार करत होतो एवढे त्यांना सांगण्यासाठी भेटी देण्यास आनंद वाटतो. बांधवांना मदत केल्याने मला अतिशय आनंद आणि समाधान मिळते!” बांधवांविषयी कळकळ असलेले जगभरातील वडील या शब्दांशी सहमत आहेत.

गरजवंतांना प्रेमदया दाखवा

१९. या लेखात विचारात घेतलेल्या बायबलमधील वृत्तान्तांवरून प्रेमदयेविषयी कोणती वस्तुस्थिती लक्षात येते?

१९ आपण विचारात घेतलेले बायबलमधील वृत्तान्त आणखी एका वस्तुस्थितीवर जोर देतात; ती अशी की प्रेमदया अशा व्यक्‍तींना दाखवली जावी ज्यांना गरज आहे आणि जे ती गरज पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. अब्राहामला त्याचा वंश पुढे चालवण्याकरता बथुवेलच्या सहकार्याची गरज होती. आपला मृतदेह कनानला नेण्याकरता याकोबाला योसेफाच्या मदतीची गरज होती. आणि एक वारस उत्पन्‍न करण्याकरता नामीला रूथच्या मदतीची गरज होती. या मदतीशिवाय अब्राहाम, याकोब किंवा नामी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते. त्याचप्रकारे आजही प्रेमदया खासकरून गरजवंतांना दाखवली जावी. (नीतिसूत्रे १९:१७) आपण कुलपिता ईयोब याचे अनुकरण केले पाहिजे ज्याने “करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित” यांच्यावर तसेच ‘नाश होण्याच्या लागास आलेल्यावर’ दया केली. ईयोबाने “विधवेचे मन [देखील] आनंदित” केले आणि तो ‘आंधळ्यास नेत्र व लंगड्यास पाय’ असाही झाला.—ईयोब २९:१२-१५.

२०, २१. आपल्या प्रेमदयेची कोणाला गरज आहे आणि आपण सर्वांनी काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

२० खरे पाहता, प्रत्येक ख्रिस्ती मंडळीत ‘करुणा भाकणारे दीन’ आहेत. एकाकीपणा, निरुत्साह, कमीपणाच्या भावना, इतरांकडून पदरी पडलेली निराशा, गंभीर आजारपण किंवा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू यांसारख्या नानाविध कारणांमुळे हे लोक दुःखी असू शकतात. पण कारण काहीही असो, या सर्व प्रिय बंधू व भगिनींच्या गरजा आपण आपल्या स्वेच्छिक आणि सातत्यपूर्ण प्रेमदयेच्या कृत्यांनी भरून काढू शकतो आणि आपण असे अवश्‍य केले पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

२१ तेव्हा आपण सर्वजण यहोवा देवाचे अनुकरण करण्याचा सतत प्रयत्न करू जो ‘प्रेमदयेचा सागर आहे.’ (निर्गम ३४:६, NW; इफिसकर ५:१) आपण खासकरून गरजवंतांकरता, विशिष्ट कृत्यांद्वारे स्वेच्छेने असे करू शकतो. आणि ‘एकमेकांस प्रेमदया दाखवत’ पुढे वाटचाल करताना निश्‍चितच आपण यहोवाचे गौरव करू आणि मोठा आनंद अनुभवू.—जखऱ्‍या ७:९.

[तळटीप]

^ परि. 11 येथे उल्लेख केलेल्या विवाहपद्धतीविषयी सविस्तर माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेला शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १ ला, पृष्ठ ३७० पाहा.

तुम्ही कसे उत्तर देणार?

• प्रेमदया ही माणुसकीपेक्षा वेगळी कशी आहे?

• बथुवेल, योसेफ व रूथ यांनी कशाप्रकारे प्रेमदया दाखवली?

• आपण कशा मनोवृत्तीने प्रेमदया दाखवावी?

• आपल्या प्रेमदयेची कोणाला गरज आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

बथुवेलाने कशाप्रकारे प्रेमदया दाखवली?

[२१ पानांवरील चित्र]

रूथचे एकनिष्ठ प्रेम नामीकरता एक आशीर्वाद ठरले

[२३ पानांवरील चित्र]

मानवी प्रेमदया स्वेच्छेने, विशिष्ट कृतींद्वारे आणि गरजवंतांना दाखवली जाते