व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टर्टुलियनचा विरोधाभास

टर्टुलियनचा विरोधाभास

टर्टुलियनचा विरोधाभास

‘ख्रिस्ती व्यक्‍ती आणि तत्त्ववेत्ता यांच्यात काय समानता? सत्याला भ्रष्ट करणारा आणि ते शिकवणारा यांच्यात काय साम्य? तत्त्वशाला आणि चर्च यांच्यात काय मेळ?’ हे आव्हानात्मक प्रश्‍न सा.यु. दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या शतकातल्या टर्टुलियन या लेखकाने विचारले होते. “चर्चच्या इतिहासावर व त्याच्या काळातील शिकवणींवर सर्वाधिक लेखन केलेल्यांपैकी एक” असे टर्टुलियनला ओळखले जात होते. धार्मिक जीवनातला एकही पैलू त्याच्या नजरेतून सुटला नाही.

विरोधाभासात्मक किंवा परस्परविरोधी वाटणाऱ्‍या वाक्यांकरता टर्टुलियन सर्वाधिक प्रसिद्ध होता; पुढे अशा वाक्यांची काही उदाहरणे आहेत: “देवाच्या लहानपणातच त्याची महानता आहे.” “[देवाच्या पुत्राच्या मृत्यूवर] विश्‍वास केलाच पाहिजे कारण तो तर्कहीन आहे.” “[येशूला] दफन करण्यात आले आणि तो पुन्हा उठला; ही गोष्ट निश्‍चित आहे कारण ती अशक्य आहे.”

पण टर्टुलियनची फक्‍त वाक्येच विरोधाभासात्मक नव्हती. आपल्या लिखाणांनी सत्याचे समर्थन करावे आणि चर्च व तिच्या शिकवणुकींचा विश्‍वासूपणा उंचावून धरावा हा त्याचा हेतू होता तरीपण वास्तविक पाहता त्याने खऱ्‍या शिकवणुकी भ्रष्ट केल्या. ख्रिस्ती धर्मामध्ये त्याचे प्रमुख योगदान म्हणजे एक सिद्धान्त आहे ज्याच्या आधारावर नंतरच्या लेखकांनी त्रैक्याचा सिद्धान्त विकसित केला. हे कसे घडले ते पाहण्याआधी आपण खुद्द टर्टुलियनविषयी काही माहिती पाहू या.

“तो कधीच कंटाळवाणा नव्हता”

टर्टुलियनच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही. बहुतेक विद्वानांचे असे मत आहे की, त्याचा जन्म सा.यु. १६० साली उत्तर आफ्रिकेच्या कार्थेज येथे झाला. तो खूप शिकलेला होता आणि त्याच्या काळातील प्रमुख तत्त्वज्ञानी विचारधारांविषयी त्याला पूर्ण ज्ञान होते हे स्पष्टच आहे. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे आपल्या विश्‍वासासाठी मरणसुद्धा पत्करायला तयार होते यामुळे कदाचित तो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाला असावा. ख्रिस्ती हौतात्म्याविषयी त्याने असा प्रश्‍न विचारला: “[हौतात्म्याचा] विचार केल्यावर कोण त्याच्यामागील प्रेरणेविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणार नाही? आणि ती जाणून घेतल्यावर कोण आपल्या शिकवणुकी स्वीकारणार नाही?”

तथाकथित ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्यानंतर टर्टुलियन एक सर्जनशील लेखक बनला; त्याला संक्षिप्त, खटकेबाज वाक्ये बनवण्याचे कौशल्य प्राप्त झाले होते. चर्चचे धर्मगुरू (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “तत्त्ववेत्त्यांमध्ये क्वचितच दिसणारी क्षमता [त्याच्यात] दिसून येते. त्याचे लिखाण कधीच कंटाळवाणे वाटत नाही.” एका विद्वानाने म्हटले: “टर्टुलियनला लेखन कौशल्यापेक्षा शब्दांचे दान प्राप्त झाले [होते] आणि त्याच्या कारणमीमांसेपेक्षा त्याची चमकदार वाक्ये समजायला अधिक सोपी होती. कदाचित यामुळे त्याच्या लिखाणांचा अनेकदा उल्लेख केला जातो परंतु लिखाणांतील लांबलचक उताऱ्‍यांचा क्वचितच उल्लेख केला जातो.”

ख्रिस्ती धर्माचे समर्थन

टर्टुलियनचे सर्वात सुप्रसिद्ध लिखाण म्हणजे क्षमा (इंग्रजी); तथाकथित ख्रिस्ती धर्माचे समर्थन करणारे ते सर्वात प्रभावशाली साहित्य मानले जाते. ख्रिस्ती लोक अंधविश्‍वासी गटांच्या हिंसाचाराला वारंवार बळी पडत होते त्या काळादरम्यान ते लिहिण्यात आले होते. टर्टुलियनने या ख्रिश्‍चनांचे समर्थन केले आणि त्यांना दिल्या जाणाऱ्‍या अर्थहीन गैरवागणुकीचा विरोध केला. त्याने म्हटले: “ख्रिस्ती लोक प्रत्येक सामाजिक संकटासाठी व लोकांवर येणाऱ्‍या अरिष्टांसाठी कारणीभूत आहेत असे [विरोधकांना] वाटते. . . . नाईल नदीचे पाणी शेतांना मिळाले नाही, हवामान बदलले नाही, भूकंप झाला, दुष्काळ पडला, मरी आली तर एकच घोषणा ऐकू येते: ‘ख्रिश्‍चनांना टाका सिंहांपुढे!’”

ख्रिस्ती लोकांवर देशद्रोहाचा सहसा आरोप केला जात होता परंतु टर्टुलियनने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, खरे पाहता ते सर्वात विश्‍वसनीय नागरिक होते. सरकार पाडण्यासाठी केलेल्या अनेक प्रयत्नांकडे लक्ष वेधून त्याने आपल्या विरोधकांना आठवण करून दिली की, कारस्थान करणारे ख्रिस्ती नव्हे तर मूर्तिपूजक होते. टर्टुलियनने दाखवले की, ख्रिश्‍चनांना मृत्यूदंड दिल्याने खरे नुकसान राष्ट्राचेच होत असे.

टर्टुलियनचे इतर साहित्य ख्रिस्ती जीवनशैलीच्या संबंधाने होते. उदाहरणार्थ, ऑन द शोज या त्याच्या वर्णनात्मक लिखाणात टर्टुलियनने विशिष्ट मनोरंजनाच्या ठिकाणी, मूर्तिपूजक खेळांसाठी आणि आखाड्यांतील कार्यक्रमांसाठी जाऊ नये असा सल्ला दिला. कदाचित असे काही नवीन मतानुसारी होते जे एकीकडे बायबलचे शिक्षण घेत होते आणि दुसरीकडे मूर्तिपूजक खेळांमध्ये भाग घेत होते व यात त्यांना कसलीही विसंगती वाटत नव्हती. त्यांच्या विचारक्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने टर्टुलियनने लिहिले: “देवाच्या चर्चनंतर सैतानाच्या [चर्चमध्ये] जाणे—आकाशातून राडीत जाणे किती भयंकर गोष्ट आहे.” तो म्हणाला: “जे तुम्ही कृतीत आचरत नाही ते शब्दात स्वीकारू नका.”

सत्याचे समर्थन करता करता सत्य भ्रष्ट केले

टर्टुलियनने प्राक्सियास विरुद्ध (इंग्रजी), या निबंधाची सुरवात अशी केली: “सैतानाने अनेक मार्गाने सत्याशी प्रतिस्पर्धा व त्याचा विरोध केला आहे. काही वेळा सत्याचे समर्थन करून सत्याचा नाश करण्याचा त्याने हेतू बाळगला आहे.” या निबंधातील प्राक्सियास या मनुष्याची स्पष्ट ओळख पटलेली नाही परंतु टर्टुलियनने देव व ख्रिस्तासंबंधी त्याच्या शिकवणींबद्दल शंका व्यक्‍त केली आहे. प्राक्सियास हा सैतानाचा हस्तक असून ख्रिस्ती धर्माला तो भ्रष्ट करण्याचा कावेबाजपणे प्रयत्न करत आहे असे टर्टुलियनचे मत होते.

त्या काळच्या तथाकथित ख्रिश्‍चनांमध्ये एक महत्त्वाचा वादविषय म्हणजे देव आणि ख्रिस्त यांच्यातील संबंध. या ख्रिश्‍चनांपैकी काहींना, खासकरून ग्रीक पार्श्‍वभूमीच्या लोकांना, एकाच देवावरील विश्‍वास आणि तारण व उद्धार करणाऱ्‍याच्या भूमिकेत येशू, यांच्यात मेळ बसवणे कठीण वाटत होते. येशू पित्याचे केवळ वेगळे रूप आहे आणि पिता व पुत्र यांच्यात काही फरक नाही अशी शिकवण देऊन प्राक्सियासने त्यांचा हा गोंधळ दूर करायचा प्रयत्न केला. अन्वयरीतिवाद (मॉडलिझम), या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या सिद्धान्तानुसार देवाने स्वतःला, “निर्मिती करताना आणि नियमशास्त्र देताना पिता, येशू ख्रिस्तामध्ये पुत्र आणि ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र आत्मा” या रूपात प्रकट केले.

टर्टुलियनने दाखवले की, शास्त्रवचनांमध्ये पिता आणि पुत्र यांच्यात स्पष्ट फरक आहे. १ करिंथकर १५:२७, २८ मधील वचन उद्धृत करून त्याने असा तर्क केला: “ज्याने (सर्वकाही) अंकित केले, व ज्याच्या अंकित सर्वकाही झाले—या दोन वेगळ्याच व्यक्‍ती असायला हव्यात.” टर्टुलियनने खुद्द येशूच्या शब्दांकडे लक्ष वेधले: “पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) स्तोत्र ८:५ सारखे इब्री शास्त्रवचनांतील काही भाग वापरून बायबलमध्ये पुत्राच्या “कनिष्ठतेचे” वर्णन कसे केले आहे हे त्याने दाखवले. “त्यामुळे, पिता हा पुत्रापासून वेगळा असून पुत्रापेक्षा थोर आहे,” असा निष्कर्ष टर्टुलियनने काढला. “ज्याअर्थी उत्पन्‍न करणारा एक आहे त्याअर्थी उत्पन्‍न झालेला दुसरा आहे; पाठवणारा एक आहे आणि पाठवलेला दुसरा आहे; बनवणारा एक आहे आणि ज्याच्याद्वारे एक गोष्ट बनवली जाते तो दुसरा आहे.”

पुत्र हा पित्याच्या अधीन आहे असे टर्टुलियनचे मत होते. पण, अन्वयरीतिवादाचा विरोध करण्याच्या प्रयत्नात तो “शास्त्रलेखापलीकडे” गेला. (१ करिंथकर ४:६) टर्टुलियनने दुसऱ्‍या एका सिद्धान्ताद्वारे येशूचे देवपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची चूक केली. त्याने “तीन व्यक्‍तींमध्ये एक दैवी तत्त्व” हा नवीनच सिद्धान्त निर्माण केला. या कल्पनेचा उपयोग करून त्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, देव, त्याचा पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन वेगळ्या व्यक्‍ती एकाच दैवी तत्त्वाचा भाग आहेत. अशातऱ्‍हेने पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याकरता “त्रैक्य” या शब्दाचे लॅटिन रूप वापरणारा टर्टुलियन हा पहिला ठरला.

जगिक तत्त्वज्ञानापासून सावधान

“तीन व्यक्‍तींमध्ये एक दैवी तत्त्व” हा सिद्धान्त टर्टुलियन कशाप्रकारे निर्माण करू शकला? याचे उत्तर त्या मनुष्याविषयीच्या आणखी एका विरोधाभासात, अर्थात तत्त्वज्ञानाविषयी असलेल्या त्याच्या दृष्टिकोनात आढळते. तत्त्वज्ञान हे “मनुष्य व ‘दुरात्म्यांच्या शिकवणी’” आहेत असे टर्टुलियनचे मत होते. तत्त्वज्ञानाच्या आधारे ख्रिस्ती सत्यांचे समर्थन करण्याच्या प्रथेची त्याने उघड उघड टीका केली. त्याने म्हटले, “ख्रिस्ती धर्माचा स्टोइक, प्लेटोनिक आणि तर्कशास्त्रीय भ्रष्ट रूप निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न टाळा.” तथापि, स्वतःच्या कल्पनांशी तत्त्वज्ञान जुळत असल्यास टर्टुलियनने त्याचा सर्रास उपयोग केला.—कलस्सैकर २:८.

एक संदर्भ म्हणतो: “त्रैक्याचा सिद्धान्त विकसित होण्याकरता व व्यक्‍त होण्याकरता ग्रीक कल्पना आणि विचार प्रणालीची गरज होती.” त्याचप्रमाणे, टर्टुलियनचा सिद्धान्त (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “[यामध्ये] कायदेविषयक आणि तत्त्वज्ञानी कल्पनांचा व संज्ञांचा जिज्ञासा निर्माण करील असा समावेश होता. याच्या आधारे टर्टुलियनने त्रैक्याचा सिद्धान्त अशा पद्धतीने मांडला की त्यात अनेक उणिवा आणि कमतरता असूनही निसियाच्या धर्मसभेत कालांतराने सादर केलेल्या सिद्धान्तासाठी तो पाया ठरला.” यास्तव, एकाच परमेश्‍वरात तीन व्यक्‍ती आहेत हा टर्टुलियनचा सिद्धान्त, संपूर्ण ख्रिस्ती धर्मजगतात खोट्या धार्मिक धारणा पसरवण्यात प्रामुख्याने कारणीभूत ठरला.

सत्याचे समर्थन करणाऱ्‍या इतरांवर त्याने सत्याचा नाश करत असल्याचा आरोप लावला. तथापि, दैवी प्रेरणेचे बायबल सत्य आणि मानवी तत्त्वज्ञान एकत्र करून त्यानेही तीच चूक केली ही उपरोधिक गोष्ट ठरली. यामुळे, “फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणांच्या नादी” लागू नये या शास्त्रवचनांमधील इशाऱ्‍याकडे आपण लक्ष देऊ या.—१ तीमथ्य ४:१.

[२९, ३० पानांवरील चित्रे]

टर्टुलियनने तत्त्वज्ञानाची टीका केली मात्र स्वतःच्या कल्पनांचा पुरस्कार करण्यासाठी त्याने त्यांचा उपयोग केला

[चित्राचे श्रेय]

पृष्ठे २९ आणि ३०: © Cliché Bibliothèque nationale de France, Paris

[३१ पानांवरील चित्र]

खरे ख्रिस्ती बायबलमधील सत्य आणि मानवी तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत