व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव कोण आहे?

देव कोण आहे?

देव कोण आहे?

“देव म्हणजे, विश्‍वाचा उच्चतम उगम आणि शक्‍ती व धार्मिक आराधनेचा विषय,” असे द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना म्हणते. एका शब्दकोशात “देव” या शब्दाचा अर्थ, “परमोच्च किंवा सर्वोच्च सत्य” असा सांगण्यात आला आहे. या विस्मयकारी सत्याचा स्वभाव कसा आहे?

देव केवळ एक शक्‍ती आहे की एक खरी व्यक्‍ती? त्याला नाव आहे का? पुष्कळ लोक विश्‍वास करतात त्याप्रमाणे तो तीन मिळून एक व्यक्‍ती अर्थात त्रैक्य आहे का? आपण देवाला कशाप्रकारे जाणू शकतो? या प्रश्‍नांची खरी व समाधानकारक उत्तरे बायबलमध्ये दिली आहेत. खरे तर, ते आपल्याला देवाचा शोध घेण्याचे प्रोत्साहन देऊन म्हणते: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२७.

केवळ एक शक्‍ती की खरी व्यक्‍ती?

देवावर विश्‍वास असणाऱ्‍या पुष्कळ लोकांना वाटते, की देव एक व्यक्‍ती नसून केवळ एक शक्‍ती आहे. उदाहरणार्थ, काही समाजांमध्ये, देवतांना निसर्ग शक्‍तींशी जोडले जाते. विश्‍वाचा आकार आणि पृथ्वीवरील जीवनाचे वैशिष्ट्य यांविषयी विज्ञानाने केलेल्या संशोधनातून मिळालेल्या पुराव्यांचे परीक्षण केल्यावर काहींनी असा निष्कर्ष काढला आहे, की हे सर्व अस्तित्वात यायला एक आदिकारण असलेच पाहिजे. पण, विश्‍वाच्या उत्पत्तीचे कारण असलेली ती एक व्यक्‍ती आहे हे मात्र कबूल करायला त्यांना जड जाते.

परंतु, आदिकारण ठरलेल्या व्यक्‍तीकडे अफाट बुद्धी आहे हे सृष्टीच्या क्लिष्टतेवरून सूचित होत नाही का? बुद्धीसाठी मन असण्याची गरज आहे. सर्व सृष्टीस कारणीभूत ठरलेले सर्वोच्च मन हे देवाचे आहे. होय, देवाला एक शरीर आहे; परंतु ते आपल्यासारखे हाडामासांचे शरीर नव्हे तर एक आत्मिक शरीर आहे. बायबल म्हणते: “जर प्राणमय [हाडामांसाचे] शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरहि आहे.” (१ करिंथकर १५:४४) देवाच्या स्वभावाचे स्पष्टीकरण देताना बायबल म्हणते: “देव आत्मा आहे.” (योहान ४:२४) आत्मिक स्वरूपाचे जीवन आपल्या जीवनापासून खूपच वेगळे असते व मानवी डोळ्यांनी ते पाहता येत नाही. (योहान १:१८) देवाशिवाय, इतर अदृश्‍य आत्मिक प्राणी देखील अस्तित्वात आहेत. ते देवदूत आहेत, अर्थात “देवपुत्र” आहेत.—ईयोब १:६; २:१.

देव एक अशी व्यक्‍ती आहे जिला कोणीही निर्माण केलेले नाही; त्याला आत्मिक शरीर आहे व त्याअर्थी त्याला एक राहण्याचे ठिकाणही आहे. त्याच्या आत्मिक क्षेत्राविषयी बोलताना बायबल आपल्याला सांगते, की स्वर्ग परमेश्‍वराचे ‘निवासस्थान’ आहे. (१ राजे ८:४३) तसेच, बायबलचा लेखक पौल याने म्हटले: की “ख्रिस्त . . . आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.”—इब्री लोकांस ९:२४.

बायबलमध्ये, “आत्मा” हा शब्द वेगळ्या संदर्भातही वापरला आहे. देवाला प्रार्थना करताना स्तोत्रकर्ता म्हणाला: “तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्‍न होतात.” (स्तोत्र १०४:३०) येथे ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो आत्मा, स्वतः देव नसून देव पाठवत असलेली किंवा आपली इच्छा पूर्ण करण्याकरता तो वापरत असलेली त्याची शक्‍ती आहे. या शक्‍तीद्वारे देवाने स्वर्ग, पृथ्वी आणि त्यांवरील सर्व जिवंत गोष्टींना बनवले. (उत्पत्ति १:२; स्तोत्र ३३:६) देवाच्या या आत्म्याला पवित्र आत्मा म्हटले जाते. याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाने मानवांकडून बायबलचे लिखाण करवून घेतले. (२ पेत्र १:२०, २१) म्हणूनच, पवित्र आत्मा ही एक अदृश्‍य कार्यकारी शक्‍ती आहे जिचा उपयोग देव आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी करतो.

देवाचे अनन्यसाधारण नाव

बायबल लेखक अगूर याने अशी पृच्छा केली: “वायु आपल्या ओंजळीत कोणी बांधून ठेविला आहे? जलाशय वस्त्रांत कोणी बांधून ठेविला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय?” (नीतिसूत्रे ३०:४) दुसऱ्‍या शब्दांत अगूर असे विचारत होता, की ‘या गोष्टी ज्या मनुष्याने केल्या आहेत त्याचे नाव किंवा त्याची वंशावळ तुम्हाला माहीत आहे का?’ फक्‍त देवालाच नैसर्गिक शक्‍तींवर नियंत्रण ठेवता येते. ही सृष्टी, देव अस्तित्वात असल्याचा जबरदस्त पुरावा देत असली तरी, ती देवाचे नाव प्रकट करीत नाही. खरे तर, देवाने स्वतः त्याचे नाव प्रकट केले नसते तर आपल्याला कधीच त्याचे नाव माहीत झाले नसते. होय, त्याने त्याचे नाव प्रकट केले आहे. सृष्टीकर्ता म्हणतो: “मी यहोवा आहे आहे; हे माझे नाव आहे.”—यशया ४२:८, पं.र.भा.

देवाचे यहोवा हे अनोखे नाव फक्‍त, मूळ इब्री शास्त्रवचनांतच जवळजवळ ७,००० वेळा आले आहे. येशू ख्रिस्ताने हे नाव लोकांना प्रकट केले आणि सर्वांसमक्ष या नामाची थोरवी गायिली. (योहान १७:६, २६) बायबलच्या शेवटल्या पुस्तकात आपल्याला हे नाव, “हालेलूया” म्हणजे “याहची स्तुती असो” या वाक्यांशाचा एक भाग म्हणून पाहायला मिळेल. “याह” हे “यहोवा” या नावाचे संक्षिप्त रूप आहे. (प्रकटीकरण १९:१-६, NW तळटीप) परंतु, फार कमी आधुनिक बायबल या नावाचा उल्लेख करतात. त्या ऐवजी काही भाषांतरे बहुतेकदा मोठ्या अक्षरांत “प्रभू,” किंवा “देव,” हे शब्द वापरतात. काही विद्वान असे सुचवतात, की ईश्‍वरी नावाचा उच्चार कदाचित याहवे असा असावा.

पण, विश्‍वातील सर्वात महान व्यक्‍तीच्या नावाविषयी इतकी भिन्‍न मते का? या समस्येची सुरवात खरे तर अशा वेळी झाली जेव्हा यहुद्यांनी अंधश्रद्धेमुळे ईश्‍वरी नावाचा उच्चार करायचे सोडून दिले. शास्त्रवचने वाचताना जेव्हा जेव्हा ईश्‍वरी नाव यायचे तेव्हा तेव्हा त्या नावाऐवजी ते “सार्वभौम प्रभू” यासाठी असलेला इब्री शब्द वापरू लागले. बायबल ज्या भाषेत लिहिले होते ती इब्री भाषा स्वरांविना लिहिली जात असल्यामुळे, मोशे, दावीद आणि प्राचीन काळच्या इतरांनी, ईश्‍वरी नावाच्या अक्षरांचा नेमका कसा उच्चार केला, हे निश्‍चित सांगता येणार नाही. परंतु, जेहोवा हा इंग्रजी भाषेतला उच्चार अनेक शतकांपासून वापरला जात आहे आणि आज अनेक भाषांत यहोवा हा उच्चार आज रूढ झाला आहे.—निर्गम ६:३; यशया २६:४, पं.र.भा.

देवाचे नाव प्राचीन इब्री भाषेत कसे उच्चारले जायचे याबद्दल अनिश्‍चितता असली तरी, या नावाचा काय अर्थ होतो हे पूर्णपणे रहस्यमय नाही. त्याच्या नावाचा अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो. अशाप्रकारे यहोवा देव स्वतःची ओळख महान उद्देशकर्ता अशी करून देतो. आपले उद्देश आणि आपली अभिवचने तो खरी बनायला लावतो. हे करण्याचे सामर्थ्य असलेल्या खऱ्‍या देवालाच उचितपणे हे नाव धारण करण्याचा अधिकार आहे.—यशया ५५:११.

यहोवा हे नाव सर्वसमर्थ देवाला इतर सर्व देवतांपासून वेगळे करते यात काही शंका नाही. म्हणूनच, ते नाव बायबलमध्ये अनेकदा आले आहे. बायबलच्या अनेक भाषांतरांत ईश्‍वरी नावाचा प्रयोग करण्यात आलेला नसला तरी, स्तोत्र ८३:१८ [ईझी-टू-रीड भाषांतर] मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे: “त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्‍तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हेही त्यांना कळेल.” आपल्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना असे शिकवले: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) यास्तव, आपण प्रार्थना करताना, त्याच्याबद्दल बोलताना आणि इतरांसमोर त्याची स्तुती करताना त्याच्या नावाचा उपयोग केला पाहिजे.

येशू देव आहे का?

यहोवा देव स्वतः आपल्या पुत्राची स्पष्ट ओळख करून देतो. मत्तयच्या शुभवर्तमान अहवालातील येशूच्या बाप्तिस्म्याची माहिती अशा प्रकारे दिली आहे: “आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७) येशू ख्रिस्त यहोवा देवाचा पुत्र आहे.

तरीपण काही धर्माच्या लोकांचे म्हणणे आहे की येशू देव आहे. काही जण म्हणतात की देव त्रैक्य आहे. या शिकवणुकीनुसार, “पिता देव आहे, पुत्र देव आहे आणि पवित्र आत्मा देव आहे, आणि तरीपण तीन देव नसून एकच देव आहे.” “हे तिघेही सम-चिरकालिक आणि समतुल्य आहेत,” असा विश्‍वास केला जातो. (द कॅथलिक एनसायक्लोपिडिआ) पण हे विश्‍वास बरोबर आहेत का?

ईश्‍वरप्रेरणेने लिहिलेली शास्त्रवचने यहोवा देवाविषयी म्हणतात: “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” (स्तोत्र ९०:२) तो “सनातन” आहे अर्थात त्याला सुरवात किंवा अंत नाही. (१ तीमथ्य १:१७) परंतु, येशू “सर्व उत्पतीत ज्येष्ठ” आणि “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” आहे. (कलस्सैकर १:१३-१५; प्रकटीकरण ३:१४) देवाला आपला पिता असे संबोधून येशूने म्हटले: “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) येशूने असेही म्हटले होते, की काही गोष्टी त्याला किंवा देवदूतांनाही माहीत नव्हत्या, केवळ पित्याला माहीत होत्या. (मार्क १३:३२) शिवाय, येशूने आपल्या पित्याला प्रार्थना देखील केली: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्‍तीव्यतिरिक्‍त आणखी कोणाला तो प्रार्थना करत असावा? आणि येशूने स्वतःचे पुनरुत्थान केले नव्हते तर देवाने त्याला मृतातून उठवले होते.—प्रेषितांची कृत्ये २:३२.

तेव्हा, बायबलनुसार, यहोवा सर्वसमर्थ देव आहे आणि येशू त्याचा पुत्र आहे. येशू पृथ्वीवर येण्याआधी किंवा पृथ्वीवर असताना देवाच्या बरोबरीचा नव्हता; आणि त्याचे पुनरुत्थान झाल्यावर तो स्वर्गात गेला तेव्हाही तो देवाच्या बरोबरीचा झाला नाही. (१ करिंथकर ११:३; १५:२८) आपण पाहिल्याप्रमाणे, त्रैक्याच्या शिकवणुकीत जिला तिसरी व्यक्‍ती म्हटले जाते तो पवित्र आत्मा एक व्यक्‍ती नाही. तर, पवित्र आत्मा देवाची शक्‍ती आहे जिचा उपयोग तो जे काही इच्छितो ते पूर्ण करण्यासाठी करतो. तेव्हा, त्रैक्याची शिकवण ही बायबलची शिकवण नाही. * बायबल म्हणते: “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे.”—अनुवाद ६:४, पं.र.भा.

देवाला आणखी चांगल्याप्रकारे ओळखणे

आपल्याला देवावर प्रेम करायचे असेल व तो ज्या अनन्य भक्‍तीस योग्य आहे ती भक्‍ती त्याला द्यायची असेल तर आपण तो कोण आहे हे आधी माहीत करून घेतले पाहिजे. आपण देवाला चांगल्याप्रकारे कसे ओळखू शकतो? बायबल म्हणते: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) देवाला चांगल्याप्रकारे ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे, त्याने निर्माण केलेली सृष्टी बारकाईने पाहून त्यावर कृतज्ञतेने मनन करणे.

परंतु सृष्टी आपल्याला देवाविषयी सर्वच काही सांगत नाही. उदाहरणार्थ, देव अनोखे नाव असलेली एक खरी आत्मिक व्यक्‍ती आहे हे जाणून घेण्याकरता आपल्याला बायबलचा अभ्यास केला पाहिजे. बायबलचा अभ्यासच खरे तर देवाला चांगल्याप्रकारे ओळखण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. बायबलमध्ये, यहोवा आपल्याला तो कशाप्रकारचा देव आहे हे सांगतो. बायबलद्वारे तो आपल्याला त्याचे उद्देश प्रकट करतो आणि त्याच्या मार्गांचे शिक्षण देतो. (आमोस ३:७; २ तीमथ्य ३:१६, १७) आपण “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत” पोहंचावे जेणेकरून आपल्याला त्याच्या प्रेमळ तरतुदींचा फायदा मिळवता येईल, अशी देवाची इच्छा आहे, ही खरोखर एक आनंदविणारी गोष्ट नाही का? (१ तीमथ्य २:४) तेव्हा, यहोवाविषयी शिकण्याचा आपण हरएक प्रयत्न करू या.

[तळटीप]

^ परि. 19 या विषयाची सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक पाहावे.

[५ पानांवरील चित्रे]

पृथ्वीची निर्मिती करण्याकरता आणि बायबलचे लिखाण करण्यास लोकांना प्रेरणा देण्याकरता देवाने आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग केला

[५ पानांवरील चित्र]

आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र आहे”

[७ पानांवरील चित्र]

येशूने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्‍तीला—देवाला प्रार्थना केली

[७ पानांवरील चित्र]

येशूने लोकांना देवाचे नाव प्रकट केले

[७ पानांवरील चित्र]

आपण देवाला चांगल्याप्रकारे ओळखू शकतो