व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या प्रेमदयेचा उपभोग घेणे

यहोवाच्या प्रेमदयेचा उपभोग घेणे

यहोवाच्या प्रेमदयेचा उपभोग घेणे

“जो कोणी बुद्धिमान आहे तो ह्‍या गोष्टींकडे लक्ष देईल; आणि यहोवाची प्रेमदया ते सर्व समजून घेतील.”—स्तोत्र १०७:४३, पं.र.भा.

१. बायबलमध्ये “प्रेमदया” हा शब्दप्रयोग पहिल्यांदा कोठे आढळतो आणि या गुणाविषयी कोणत्या प्रश्‍नांवर आपण विचार करणार आहोत?

जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वी अब्राहामाचा भाचा लोट याने यहोवाविषयी असे म्हटले: “तुझी मजवर अपार दया [“प्रेमदया,” NW] झाली आहे.” (उत्पत्ति १९:१९) “प्रेमदया” हा शब्दप्रयोग बायबलमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा आढळतो. याकोब, नामी, दावीद आणि देवाच्या इतर सेवकांनी देखील यहोवाच्या या गुणाची स्तुती केली. (उत्पत्ति ३२:१०; रूथ १:८; २ शमुवेल २:६) किंबहुना, “प्रेमदया” हा शब्द एकवचनी व बहुवचनी रूपात पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) यात जवळजवळ २५० वेळा आढळतो. पण यहोवाची प्रेमदया म्हणजे काय? त्याने भूतकाळात कोणावर ही प्रेमदया दाखवली आहे? आणि आज आपण ती कशी अनुभवू शकतो?

२. “प्रेमदया” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाची व्याख्या करणे इतके कठीण का आहे आणि या शब्दाचा एक योग्य पर्याय कोणता असू शकतो?

बायबलमध्ये “प्रेमदया” हे एका मूळ इब्री शब्दाचे भाषांतर आहे. या इब्री शब्दाच्या इतक्या अर्थछटा आहेत की बहुतेक भाषांत या सर्व अर्थछटा कोणत्याही एका शब्दात सामावणे शक्य नाही. “प्रेम,” “दया,” आणि “विश्‍वासूपणा” हे शब्द त्या मूळ शब्दाचे मर्म पूर्णपणे व्यक्‍त करत नाहीत. पण थियॉलॉजिकल वर्डबुक ऑफ दी ओल्ड टेस्टमेंट यात सांगितल्यानुसार “प्रेमदया” हे अधिक समावेशक भाषांतर, “मूळ हिब्रू शब्दाचा अर्थ बऱ्‍याच प्रमाणात व्यक्‍त करते.” पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर—संदर्भांसहित (इंग्रजी) यात “प्रेमदया” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचे पर्यायी भाषांतर “एकनिष्ठ प्रेम” असे केले आहे.—निर्गम १५:१३; स्तोत्र ५:७; तळटीप, NW.

प्रेम व निष्ठा यांपेक्षा वेगळी

३. ‘प्रेमदया’ आणि ‘प्रेम’ असे भाषांतरीत केलेले इब्री शब्द एकमेकांपासून कशाप्रकारे वेगळे आहेत?

प्रेमदया किंवा एकनिष्ठ प्रेम हे निष्ठा व प्रेम या गुणांशी निगडीत आहे. पण तरीसुद्धा ती या गुणांपेक्षा वेगळी आहे असे म्हणण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. प्रेमदया आणि प्रेम कशाप्रकारे वेगळे आहेत यावर विचार करा. प्रेम हे वस्तूंबद्दल आणि विचारांबद्दल असू शकते. बायबलमध्ये “द्राक्षारस व तेल यांविषयी प्रेम” व “ज्ञानाविषयी प्रेम” असण्याबद्दल सांगितले आहे. (नीतिसूत्रे २१:१७; २९:३, NW) पण प्रेमदया हा शब्द मात्र अमूर्त कल्पनांच्या किंवा वस्तूंच्या संदर्भात नव्हे तर लोकांच्या संदर्भात वापरला जातो. उदाहरणार्थ, निर्गम २०:६ (पं.र.भा.) लोकांच्याच बाबतीत असे म्हणते की यहोवा “हजारांवर प्रेमदया करणारा” आहे.

४. प्रेमदया ही निष्ठेपेक्षा कशी वेगळी आहे?

“निष्ठा” हा शब्द देखील “प्रेमदया” असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दाचा पूर्ण अर्थ व्यक्‍त करण्याकरता पर्याप्त नाही. काही भाषांत “निष्ठा” हा शब्द सहसा कमी दर्जाच्या व्यक्‍तीला श्रेष्ठ पदावरील व्यक्‍तीच्या प्रती असलेल्या भावनेकरता उपयोगात आणला जातो. पण एका संशोधकाने सांगितल्यानुसार, बायबलच्या दृष्टिकोनातून प्रेमदया “सहसा मानवी संबंधांची अगदी उलट बाजू समोर आणते: ज्यात अधिक शक्‍तिशाली व्यक्‍ती दुर्बल, गरजू किंवा तिच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्‍तीच्या प्रती निष्ठा दाखवते.” म्हणूनच दावीद राजाने यहोवाला अशी याचना केली: “तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश पाड; तू आपल्या प्रेमदयेने मला तार.” (स्तोत्र ३१:१६, पं.र.भा.) येथे सर्वशक्‍तिमान देवाला अर्थात यहोवाला, गरजू असलेल्या दावीदावर प्रेमदया किंवा एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची विनंती केली आहे. गरजूंना शक्‍तीशाली व्यक्‍तीवर अधिकार नसल्यामुळे त्यांना दाखवलेली प्रेमदया ही बळजबरीने नव्हे तर स्वखुषीने दाखवली जाते.

५. (अ) देवाच्या प्रेमदयेचे कोणते खास पैलू त्याच्या वचनातून स्पष्ट होतात? (ब) यहोवाच्या प्रेमदयेच्या कोणत्या अभिव्यक्‍ती आपण विचारात घेणार आहोत?

स्तोत्रकर्त्याने म्हटले, “जो कोणी बुद्धिमान आहे तो ह्‍या गोष्टींकडे लक्ष देईल; आणि यहोवाची प्रेमदया ते सर्व समजून घेतील.” (स्तोत्र १०७:४३) यहोवाची प्रेमदया सुटका आणि तारण ठरू शकते. (स्तोत्र ६:४; ११९:८८, १५९) ती संरक्षक असून त्रासांपासून मुक्‍ती देते. (स्तोत्र ३१:१६, २१; ४०:११; १४३:१२) या गुणामुळे पापापासून परत फिरणे शक्य होते. (स्तोत्र २५:७) बायबलमधील विशिष्ट उताऱ्‍यांवर पुनर्विचार करण्याद्वारे आणि काही बायबल वचनांवर लक्ष देण्याद्वारे आपण हे पाहू या की यहोवाची प्रेमदया कशाप्रकारे (१) विशिष्ट कृतींतून व्यक्‍त होते आणि (२) त्याच्या विश्‍वासू सेवकांच्या प्रत्ययास येते.

सुटका—प्रेमदयेची एक अभिव्यक्‍ती

६, ७. (अ) लोटाच्या बाबतीत यहोवाने त्याची प्रेमदया कशाप्रकारे व्यक्‍त केली? (ब) लोटाने यहोवाच्या प्रेमदयेचा केव्हा उल्लेख केला?

यहोवाची प्रेमदया काय साध्य करू शकते हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे यासंबंधीच्या बायबलमधील वृत्तान्तांचे परीक्षण करणे. उत्पत्ति १४:१-१६ येथे आपल्याला अब्राहामचा पुतण्या लोट याच्याविषयी वाचायला मिळते. शत्रू सैन्यांनी लोटला धरून नेलेले असते, पण अब्राहाम त्याची सुटका करतो. यहोवा जेव्हा सदोम या दुष्ट नगरीचा नाश करण्याचे ठरवतो, तेव्हा लोट व त्याचे कुटुंब याच शहरात राहात असल्यामुळे पुन्हा एकदा त्याचा जीव धोक्यात येतो.—उत्पत्ति १८:२०-२२; १९:१२, १३.

सदोमचा नाश होण्याआधी यहोवाचे देवदूत लोट व त्याच्या कुटुंबाला शहराबाहेर नेतात. त्या वेळी लोट म्हणतो: “तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टि झाली आहे; माझा जीव वाचविला ही तुझी मजवर अपार दया [“प्रेमदया,” NW] झाली आहे.” (उत्पत्ति १९:१६, १९) असे बोलल्यावर लोटाने कबूल केले की यहोवाने त्याची सुटका करण्याद्वारे त्याला अनन्यसाधारण प्रेमदया दाखवली होती. या विशिष्ट वृत्तान्तात यहोवाने लोटाची सुटका करून त्याचा बचाव करण्याद्वारे आपली प्रेमदया व्यक्‍त केली.—२ पेत्र २:७.

यहोवाची प्रेमदया आणि त्याचे मार्गदर्शन

८, ९. (अ) अब्राहामाच्या सेवकाला कोणते काम देण्यात आले होते? (ब) सेवकाने देवाच्या प्रेमदयेकरता प्रार्थना का केली आणि तो प्रार्थना करत असताना काय घडले?

उत्पत्तिच्या २४ व्या अध्यायात आपण देवाच्या प्रेमदयेच्या किंवा एकनिष्ठ प्रेमाच्या आणखी एका अभिव्यक्‍तीविषयी वाचतो. हा अहवाल अब्राहामविषयी आहे. अब्राहाम आपल्या सेवकास आपल्या नातेवाईकांच्या देशी जाऊन इसहाक या आपल्या पुत्रासाठी वधू शोधण्यास सांगतो. (२-४ वचने) हे काम तितके सोपे नसते, पण अब्राहामच्या सेवकाला खात्री असते की यहोवाचा देवदूत त्याला योग्य मार्ग दाखवेल. (७ वे वचन) शेवटी तो सेवक ‘नाहोरच्या नगराबाहेर’ (हे ठिकाण हारान किंवा त्याच्या जवळपास असावे) असलेल्या एका विहिरीजवळ येऊन पोचतो; तेवढ्यात तेथे स्त्रिया पाणी भरायला येतात. (१०, ११ वचने) स्त्रियांना येताना पाहून अब्राहामच्या सेवकाला जाणीव होते की निर्णायक घडी आली आहे. पण त्या सर्व स्त्रियांपैकी इसहाकासाठी योग्य असणारी मुलगी तो कशी ओळखणार?

देवाच्या मदतीशिवाय ते शक्य नाही हे जाणून अब्राहामाच्या सेवकाने अशी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धि कर; माझा धनी अब्राहाम याजवर दया [“प्रेमदया,” NW] कर.” (१२ वे वचन) यहोवाने आपली प्रेमदया कशी व्यक्‍त केली? अब्राहामच्या सेवकाने एक विशिष्ट चिन्ह देण्याची विनंती केली, ज्याच्या साहाय्याने त्याला देवाने निवडलेली मुलगी ओळखता येईल. (१३, १४ वचने) त्याने यहोवाला विनंती केल्याप्रमाणेच एका तरुणीने केले. जणू, तिने त्याची प्रार्थना ऐकली होती! (१५-२० वचने) सेवकाला इतके आश्‍चर्य वाटले की तो “अचंबा करून तिजकडे पाहत राहिला.” पण ही सुंदर मुलगी खरोखरच अब्राहामच्या नात्यातली होती का? ती अजूनही अविवाहित होती का? यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे अद्यापही मिळवण्याचे बाकी होते. त्यामुळे, “परमेश्‍वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला.”—१६, २१ वचने.

१०. यहोवाने आपल्या धन्यावर प्रेमदया केली आहे असे अब्राहामाच्या सेवकाने का म्हटले?

१० काही वेळानंतर त्या तरुणीने [अब्राहामचा भाऊ] “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या,” अशी स्वतःची ओळख करून दिली. (उत्पत्ति ११:२६; २४:२४) त्याक्षणी अब्राहामच्या सेवकाला खात्री पटली की यहोवाने त्याच्या प्रार्थनांचे उत्तर दिले होते. अत्यानंदाने, त्याने नमून म्हटले: “माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्‍वर धन्यवादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया [“प्रेमदया,” NW] करण्याचे व त्याजशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्‍वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे.” (२७ वे वचन, पं.र.भा.) अशाप्रकारे मार्गदर्शन पुरवण्याद्वारे देवाने सेवकाचा धनी अब्राहाम यास प्रेमदया दाखवली.

देवाची प्रेमदया सुटका व संरक्षण देते

११, १२. (अ) योसेफाने कोणत्या संकटांना तोंड देताना यहोवाची प्रेमदया अनुभवली? (ब) योसेफाच्या बाबतीत देवाने आपली प्रेमदया कशी व्यक्‍त केली?

११ आता आपण उत्पत्तिच्या ३९ व्या अध्यायावर विचार करू. यात अब्राहामाचा पणतू योसेफ याच्याविषयी वाचतो. योसेफाला गुलाम म्हणून इजिप्तमध्ये विकण्यात आले. पण ‘परमेश्‍वर योसेफाबरोबर होता.’ (१, २ वचने) किंबहुना, योसेफचा इजिप्शियन मालक, पोटीफर देखील या निष्कर्षावर आला की परमेश्‍वर योसेफाबरोबर होता. (वचन ३) पण योसेफाला अतिशय कठीण अशा परीक्षेला तोंड द्यावे लागले. पोटीफरच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या खोट्या आरोपावर त्याला तुरुंगात डांबण्यात आले. (७-२० वचने) तेव्हा, “त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले.”—उत्पत्ति ४०:१५; स्तोत्र १०५:१८.

१२ त्या बिकट परीक्षेतून जाताना काय घडले? “परमेश्‍वर योसेफाबरोबर असून त्याने त्याजवर दया [“प्रेमदया,” NW] केली.” (वचन २१ अ) यहोवाच्या प्रेमदयेच्या एका विशिष्ट कृतीने पुढील घटनांची मालिका सुरू झाली आणि शेवटी योसेफाला त्याच्या संकटांतून सुटका मिळाली. यहोवाने “बंदिशाळेच्या अधिकाऱ्‍याची [योसेफावर] कृपादृष्टि होईल असे केले.” (वचन २१ ब) कालांतराने अधिकाऱ्‍याने योसेफला एका जबाबदार पदावर नेमले. (२२ वे वचन) त्यानंतर योसेफाची भेट एका अशा माणसाशी झाली ज्याने इजिप्तचा राजा फारो याच्याजवळ योसेफाचा उल्लेख केला. (उत्पत्ति ४०:१-४, ९-१५; ४१:९-१४) पर्यायाने राजाने योसेफाला इजिप्तमध्ये आपल्या पाठोपाठचे स्थान दिले; याचा परिणाम असा झाला की इजिप्तमध्ये दुष्काळ आला तेव्हा तो जीवनरक्षक कामगिरी करू शकला. (उत्पत्ति ४१:३७-५५) योसेफाच्या संकटांना तो १७ वर्षांचा असताना सुरवात झाली आणि १२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्याला ती सहन करावी लागली. (उत्पत्ति ३७:२, ४; ४१:४६) पण दुःखाच्या व कष्टाच्या सर्व वर्षांत यहोवा देवाने पूर्णपणे नाश होण्यापासून योसेफाचे संरक्षण केले आणि देवाच्या उद्देशपूर्तीत एक बहुमानाची भूमिका पार पाडण्याकरता त्याचा बचाव केला.

देवाची प्रेमदया कधीही संपुष्टात येत नाही

१३. (अ) स्तोत्र १३६ यात यहोवाच्या प्रेमदयेच्या कोणत्या अभिव्यक्‍तींविषयी आपण वाचतो? (ब) प्रेमदया म्हणजे काय?

१३ यहोवाने, एक राष्ट्र या नात्याने इस्राएली लोकांच्या प्रती वारंवार प्रेमदया दाखवली. स्तोत्र १३६ यात, त्याने आपल्या प्रेमदयेने त्यांना कशाप्रकारे सुटका (१०-१५ वचने), मार्गदर्शन (१६ वे वचन), आणि संरक्षण (१७-२० वचने) पुरवले याविषयी सांगितले आहे. देवाने गतकाळात अनेक व्यक्‍तींवर सुद्धा प्रेमदया केली आहे. एक व्यक्‍ती जेव्हा सहमानवावर प्रेमदया करते तेव्हा ती स्वेच्छेने आपल्या कृत्यांनी त्या व्यक्‍तीची गरज पूर्ण करते. प्रेमदयेविषयी बायबलच्या एका संदर्भग्रंथात असे म्हटले आहे: “ही एक अशी कृती आहे ज्यामुळे जीवनाचा बचाव अथवा संवर्धन होते; दयनीय अथवा दुःखी परिस्थितीत असलेल्या एखाद्या व्यक्‍तीच्या फायद्यासाठी केलेले कृत्य.” एका अभ्यासकानुसार प्रेमदया म्हणजे “क्रियाशील रूपातले प्रेम.”

१४, १५. लोट हा देवाची संमती प्राप्त झालेला सेवक होता असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

१४ उत्त्पत्तीमधील ज्या वृत्तान्तांचे आपण परीक्षण केले आहे त्यातून असे दिसून येते की यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांबद्दल तो खात्रीने आपली प्रेमदया व्यक्‍त करतो. लोट, अब्राहाम, आणि योसेफ वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड देत होते. ते अपरिपूर्ण मानव होते पण यहोवाची संमती प्राप्त झालेले सेवक होते आणि त्यांना देवाच्या मदतीची गरज होती. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता अशा व्यक्‍तींबद्दल प्रेमदया व्यक्‍त करतो हे किती सांत्वनदायक आहे.

१५ लोटाने काही अयोग्य निर्णय घेतल्यामुळे त्याच्यावर संकटे आली. (उत्पत्ति १३:१२, १३; १४:११, १२) पण त्याने काही प्रशंसनीय गुण देखील दाखवले. दोन देवदूत सदोमला आले तेव्हा लोटाने त्यांचा अतिथ्यसत्कार केला. (उत्पत्ति १९:१-३) देवावर विश्‍वास ठेवून त्याने आपल्या दोन जावयांना सदोमचा लवकरच नाश होणार असल्याचे सांगितले. (उत्पत्ति १९:१४) लोटाविषयी देवाचा काय दृष्टिकोन होता हे २ पेत्र २:७-९ वाचल्यावर आपल्याला कळून येते; तेथे आपण वाचतो: “अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्‍याची [यहोवाने] सुटका केली; तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता; भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” होय, लोट नीतिमान होता आणि या वचनानुसार तो भक्‍तिमान होता हे देखील सूचित होते. त्याच्याप्रमाणे आपणही “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” जसजशी वाटचाल करतो तसतसे देवाची प्रेमदया अनुभवतो.—२ पेत्र ३:११, १२.

१६. बायबलमध्ये अब्राहाम व योसेफ यांच्याविषयी कोणते प्रशंसोद्‌गार आढळतात?

१६ उत्पत्तिच्या २४ व्या अध्यायाचे परीक्षण केल्यावर अब्राहामचा यहोवाबरोबर किती घनिष्ट संबंध होता याविषयी जराही शंका राहात नाही. पहिल्या वचनात आपण असे वाचतो की “परमेश्‍वराने अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.” अब्राहामच्या सेवकाने यहोवाला, “माझा धनी अब्राहाम याच्या देवा” असे संबोधले. (१२, २७ वचन) तसेच शिष्य याकोबाने म्हटले की अब्राहामाला ‘नीतिमान ठरवण्यात आले’ आणि त्याला “देवाचा मित्र म्हणण्यात आले.” (याकोब २:२१-२३) हेच योसेफाविषयी खरे आहे. यहोवा व योसेफ यांच्यात असलेल्या घनिष्ट नातेसंबंधाची उत्पत्तिच्या सबंध ३९ व्या अध्यायात प्रकर्षाने जाणीव होते. (२, ३, २१, २३ वचने) शिवाय, योसेफाविषयी शिष्य स्तेफन याने म्हटले: “देव त्याच्याबरोबर होता.”—प्रेषितांची कृत्ये ७:९.

१७. लोट, अब्राहाम व योसेफ यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो?

१७ देवाची प्रेमदया अनुभवणाऱ्‍या ज्या व्यक्‍तींविषयी आपण आता पाहिले आहे त्यांचा यहोवा देवासोबत एक चांगला नातेसंबंध होता आणि त्यांनी विशिष्ट मार्गांनी देवाच्या उद्देशाच्या पूर्तीकरता कार्य केले. त्यांच्या मार्गात कठीण समस्या उद्‌भवल्या, ज्यांना ते आपल्या शक्‍तीने तोंड देऊ शकत नव्हते. लोटाचे जीवन धोक्यात होते, अब्राहामाची वंशावळ पुढे चालेल किंवा नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आणि योसेफाची भूमिका धोक्यात आली. या देवभीरू पुरूषांच्या गरजा केवळ यहोवा पूर्ण करू शकत होता आणि त्याने आपल्या प्रेमदयेच्या कृत्यांनी ते केले. आपल्याला यहोवा देवाच्या प्रेमदयेचा सर्वकाळ अनुभव घेत राहायचा असेल तर आपलाही त्याच्यासोबत घनिष्ट वैयक्‍तिक नातेसंबंध असणे आणि आपण सदोदित त्याची इच्छा पूर्ण करत राहणे आवश्‍यक आहे.—एज्रा ७:२८; स्तोत्र १८:५०.

देवाच्या सेवकांवर त्याची कृपा आहे

१८. बायबलमधील विविध वचने यहोवाच्या प्रेमदयेबद्दल काय सूचित करतात?

१८ यहोवाच्या प्रेमदयेने “पृथ्वी भरली आहे” आणि देवाच्या या अप्रतिम गुणाबद्दल आपण खरोखरच कृतज्ञ आहोत! (स्तोत्र ११९:६४) स्तोत्रकर्त्याच्या या धृपदाला आपणही मनःपूर्वक प्रतिसाद देतो: “अहा, त्याच्या प्रेमदयेबद्दल आणि मनुष्यांच्या संतानांसाठी केलेल्या त्याच्या अद्‌भुत कृत्यांबद्दल मनुष्ये यहोवाची स्तुती करतील तर किती बरे!” (स्तोत्र १०७:८, १५, २१, ३१, पं.र.भा.) आपण आनंदी आहोत कारण यहोवाने त्याच्या सेवकांना संमती देऊन त्यांना वैयक्‍तिक आणि सामूहिकरित्या प्रेमदया दाखवली आहे. प्रार्थनेत, संदेष्टा दानीएल याने यहोवाला असे म्हणून संबोधले की “हे प्रभू, थोर व भयानक देवा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्‍यांशी व तुझ्या आज्ञा पाळणाऱ्‍यांशी तू केलेला करार तू पाळतोस व त्यांच्यावर प्रेमदया करतोस.” (दानीएल ९:४, पं.र.भा.) राजा दाविदाने अशी प्रार्थना केली: “तुला ओळखणाऱ्‍यांच्याकडे तुझी प्रेमदया आणि सरळ हृदयांच्याकडे तुझे न्यायीपण असू देत जा.” (स्तोत्र ३६:१०, पं.र.भा.) यहोवा त्याच्या सेवकांप्रती प्रेमदया व्यक्‍त करतो याबद्दल आपण खरोखर किती कृतज्ञ आहोत!—१ राजे ८:२३; १ इतिहास १७:१३.

१९. पुढील लेखात आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

१९ खरोखर यहोवाचे लोक या नात्याने आपल्यावर विशेष कृपा झाली आहे! देवाने सर्व मानवजातीला दाखवलेल्या प्रेमाचे फायदे अनुभवण्याव्यतिरिक्‍त आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमदयेमुळे, अर्थात त्याच्या एकनिष्ठ प्रेमामुळे मिळणारे आशीर्वाद देखील उपभोगण्याची विशेष सुसंधी मिळाली आहे. (योहान ३:१६) खासकरून गरजेच्या वेळेस आपल्याला यहोवाच्या या मौल्यवान गुणामुळे खूप फायदा होतो. (स्तोत्र ३६:७) पण आपण यहोवा देवाच्या प्रेमदयेचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो? आपण वैयक्‍तिकरित्या हा अप्रतिम गुण प्रदर्शित करत आहोत का? या आणि यांसारख्या इतर प्रश्‍नांची पुढील लेखात चर्चा केली जाईल.

तुम्हाला आठवते का?

• “प्रेमदया” याकरता बायबलमध्ये असलेले पर्यायी भाषांतर कोणते आहे?

• प्रेमदया ही प्रेम आणि निष्ठा यांच्यापेक्षा कशाप्रकारे वेगळी आहे?

• यहोवाने लोट, अब्राहाम व योसेफ यांना कशाप्रकारे प्रेमदया दाखवली?

• यहोवाने गतकाळात ज्याप्रकारे आपल्या सेवकांना प्रेमदया दाखवली त्यावरून आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

देवाने लोटाला कशाप्रकारे प्रेमदया दाखवली हे तुम्हाला माहीत आहे का?

[१५ पानांवरील चित्र]

आपल्या प्रेमदयेमुळे यहोवाने अब्राहामाच्या सेवकाला योग्य मार्ग दाखवला

[१६ पानांवरील चित्र]

यहोवाने योसेफाचे संरक्षण करण्याद्वारे प्रेमदया व्यक्‍त केली