व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अंत्यसंस्कारासाठी किंवा लग्न समारंभासाठी चर्चमध्ये उपस्थित राहणे उचित ठरेल का?

कोणत्याही प्रकारे खोट्या धर्मात भाग घेणे यहोवाला पसंत नाही आणि ते आपण टाळलेच पाहिजे. (२ करिंथकर ६:१४-१७; प्रकटीकरण १८:४) चर्चमधील अंत्यविधी ही एक धार्मिक सेवा आहे आणि त्याठिकाणी दिल्या जाणाऱ्‍या उपदेशात साहजिकच आत्म्याचे अमरत्व तसेच सर्व चांगल्या लोकांकरता स्वर्गीय जीवनाचे बक्षीस आहे, अशा शास्त्रवचनात नसलेल्या कल्पनांचे समर्थन केले जाईल. शिवाय, क्रूसाचे चिन्ह करणे, पाळकासोबत प्रार्थनेत सामील होणे अशा प्रथांचाही त्यात समावेश असू शकतो. बायबलच्या शिकवणुकींच्या विरोधातील प्रार्थना आणि धार्मिक विधी यांचाही चर्चमध्ये किंवा इतर ठिकाणी होणाऱ्‍या लग्नसमारंभात समावेश असू शकतो. खोट्या धार्मिक कार्यात भाग घेणाऱ्‍या लोकांमध्ये असताना एखाद्या खऱ्‍या ख्रिश्‍चन व्यक्‍तीला कार्यक्रमात भाग घेण्याच्या दबावाला नकार देणे कठीण होऊ शकते. अशा दबावापासून दूरच राहणे किती सुज्ञपणाचे ठरेल!

परंतु चर्चमध्ये होणाऱ्‍या अंत्यविधीला किंवा लग्नसमारंभाला जाणे टाळता येण्यासारखे नाही असे एखाद्या ख्रिश्‍चन व्यक्‍तीला वाटले तर अशा वेळी काय करावे? उदाहरणार्थ, एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचा पती कदाचित सत्यात नसेल आणि तो तिला अशा प्रसंगांना यायची गळ घालत असेल. अशा वेळी ती केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकते का? पतीच्या मर्जीसाठी ती कदाचित त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेईल परंतु कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यांत ती भाग न घेण्याचा निश्‍चय करेल. किंवा तेथील परिस्थितीत तिच्यावर येणारा भावनिक दबाव ती टाळू शकणार नाही व त्यामुळे कदाचित तिला तिच्या ईश्‍वरी तत्त्वांशी हातमिळवणी करावी लागेल असा विचार करून ती कदाचित त्याच्याबरोबर न जाण्याचाही निर्णय घेईल. जे काही करायचे आहे हे तिने स्वतः ठरवले पाहिजे. अर्थात मनाने खंबीर राहून शुद्ध विवेक राखायची तिची इच्छा असेल.—१ तीमथ्य १:१९.

कोणत्याही धार्मिक कार्यांत भाग घेण्यास, धार्मिक गीते गाण्यास किंवा प्रार्थनेच्या वेळी मस्तक लवण्यास तिच्या विवेकाला पटत नाही हे तिने तिच्या पतीला समजावून सांगितल्यास फायदा होईल. तिने समजावून सांगितल्यावर तो कदाचित असा निष्कर्ष काढेल, की आपल्या पत्नीला सोबत नेल्यामुळे तिच्यावर असा प्रसंग ओढावू शकतो ज्यामुळे कदाचित त्यालाही सर्वांसमोर शरमल्यासारखे होईल. त्यामुळे मग पत्नीवरील आपल्या प्रेमापोटी, तिच्या विश्‍वासांबद्दल आदर म्हणून किंवा सर्वांसमोर लाजिरवाणे होऊ नये म्हणून कदाचित तो एकटेच जाणे पसंत करेल. परंतु तिने आपल्याबरोबर यावे अशी तो गळच घालत असेल तर ती त्याच्याबरोबर जाऊ शकते परंतु तेथील कोणत्याही कार्यात ती भाग घेणार नाही.

धार्मिक स्थानी होणाऱ्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने सहबंधूभगिनींवर कोणता परिणाम होऊ शकतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे आपल्या काही बंधूभगिनींच्या विवेकाला ठेच पोचेल का? मूर्तीपूजेत भाग न घेण्याचा त्यांचा निर्धार कमकुवत होण्याची शक्यता आहे का? प्रेषित पौल आपल्याला सल्ला देतो: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.”—फिलिप्पैकर १:१०.

अंत्यविधी किंवा लग्नसमारंभ आपल्या जवळच्या नातेवाईकाचा असेल तर कुटुंबाकडून अधिकच दबाव येऊ शकतो. काहीही असले तरी, ख्रिश्‍चनांनी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितींत तो किंवा ती असा निष्कर्ष काढेल, की चर्चमध्ये होणाऱ्‍या अंत्यविधीला किंवा लग्नाला, कसलाही भाग न घेता फक्‍त उपस्थित राहण्यात काही वावगे नाही. परंतु, काही वेळा असे होऊ शकते, की अशा प्रसंगांना उपस्थित राहिल्याने होऊ शकणाऱ्‍या फायद्यांपेक्षा स्वतःच्या विवेकाला किंवा इतरांच्या विवेकाला अधिक हानी होऊ शकते. परिस्थिती काहीही असो, ख्रिश्‍चनांनी याची खात्री करावी, की ते जो काही निर्णय घेतील त्यामुळे देवासमोर आणि इतर लोकांसमोर त्यांचा विवेक शुद्ध राहील.