सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो
सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो
“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो,” असे बायबल म्हणते. (ईयोब १४:१) दुःख आणि त्रास हा सर्व मनुष्यांच्या वाट्याला आला आहे. दररोजचे जीवनही चिंता आणि मनःस्ताप यांपासून सुटलेले नाही. अशा कठीण परिस्थितीला यशस्वीपणे तोंड द्यायला आणि देवासमोर धार्मिक राहायला आपल्याला कोठून मार्गदर्शन मिळेल?
ईयोब नावाच्या एका धनवान पुरुषाचे उदाहरण पाहा; सध्या ज्याला अरेबिया म्हणतात त्या ठिकाणी तो ३,५०० वर्षांआधी हयात होता. या देवभीरु मनुष्याला सैतानाने केवढे पीडिले! त्याचे सर्व प्राण्यांचे कळप ठार झाले आणि त्याची प्रिय मुले देखील मरण पावली. हे होते न् होते तितक्यात, सैतानाने ईयोबाला गळवांसह नखशिखान्त पीडिले. (ईयोब अध्याय १, २) हे संकट आपल्यावर का कोसळत आहे याची ईयोबाला जराही कल्पना नव्हती. तरीसुद्धा, “ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (ईयोब २:१०) “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही,” असे तो म्हणाला. (ईयोब २७:५) होय, ईयोबाच्या सात्विकपणाने त्याला या परीक्षांमधून तारले.
सात्विकपणाची व्याख्या नैतिक योग्यता अथवा पूर्णता अशी केली आहे आणि यामध्ये देवासमोर निर्दोष व निष्कलंक राहण्याचाही समावेश होतो. तथापि त्याचा अर्थ असा नाही की, देवाच्या दर्जांनुसार तंतोतंत वागू न शकणाऱ्या अपरिपूर्ण मानवांनी शब्दांत व कृतींत परिपूर्ण असावे. उलट, मानवी सात्विकपणाचा अर्थ यहोवाला व त्याच्या इच्छेला आणि उद्देशाला संपूर्ण अंतःकरणाने व प्रामाणिकतेने समर्पित असणे असा होतो. ही ईश्वरी भक्ती सरळ जनांना प्रत्येक परिस्थितीत व सर्व वेळी मार्गदर्शित करते. बायबलमधील नीतिसूत्रांच्या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायाचा सुरवातीचा भाग दाखवतो की, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये सात्विकपणा आपले मार्गदर्शन कसे करतो आणि त्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांचीही खात्री देतो. त्यामुळे, तेथे काय नमूद केले आहे हे आपण उत्सुकतेने पाहू या.
सात्विकतेमुळे व्यापारात प्रामाणिकपणा
कायद्याच्या भाषेऐवजी काव्यात्मक भाषेत प्राचीन इस्राएलाचा राजा शलमोन प्रामाणिकपणाच्या तत्त्वावर जोर देत म्हणतो: “खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.” (नीतिसूत्रे ११:१) नीतिसूत्रांच्या पुस्तकातील चार ठिकाणांपैकी हे पहिले ठिकाण आहे जेथे तागडी व वजनांचा उपयोग करून यहोवाने दाखवले आहे की, त्याच्या उपासकांनी आपल्याला व्यवहारात प्रामाणिक असावे अशी त्याची इच्छा आहे.—नीतिसूत्रे १६:११; २०:१०, २३.
खोट्या तागडीचा उपयोग करून—किंवा अप्रामाणिकतेने व्यापार करून सुसंपन्न होणाऱ्यांना पाहून आपल्याला मोह होऊ शकतो. परंतु, तत्त्वाला धरून नसलेल्या व्यापार पद्धतींचा उपयोग करून चांगले व वाईट यांसंबंधी देवाच्या दर्जांना धुडकावून लावण्याची आपण खरोखर इच्छा करू का? सात्विक असल्यास आपण असे करणार नाही. आपण अप्रामाणिकतेचा धिक्कार करतो कारण प्रामाणिकतेचे सूचक असलेल्या खऱ्या वजनांमुळे यहोवा संतुष्ट होतो.
“नम्र जनांच्या ठायी ज्ञान”
शलमोन राजा पुढे म्हणतो: “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतिसूत्रे ११:२) स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची वृत्ती, अवज्ञाकारी मनोवृत्ती किंवा ईर्ष्या यांपैकी कशातूनही प्रदर्शित होणाऱ्या गर्वामुळे नेहमी बदनामीच होते. दुसऱ्या बाजूला पाहता, आपल्या मर्यादा नम्रतेने कबूल करणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. या नीतिसूत्राची सत्यता शास्त्रवचनातील उदाहरणांतून किती स्पष्ट होते!
कोरह या ईर्ष्यावान लेव्याने यहोवाच्या नियुक्त सेवकांच्या अर्थात मोशे व अहरोनच्या अधिकाराच्या विरुद्ध बंडखोरांचा जमाव तयार केला. अशा गर्विष्ठ कृत्याचा परिणाम काय झाला? “पृथ्वीने आपले तोंड उघडून” काही बंडखोरांना “गिळून टाकिले” तर कोरह आणि त्यासोबत इतरजण अग्नीने भस्म झाले. (गणना १६:१-३, १६-३५; २६:१०; अनुवाद ११:६) केवढी ही अप्रतिष्ठा! उज्जाचेही उदाहरण पाहा; त्याने कोश खाली पडू नये म्हणून स्वतःचा मोठेपणा दाखवून कोश हात लांब करून धरला. तो जागीच ठार झाला. (२ शमुवेल ६:३-८) गर्विष्ठपणा टाळणे किती महत्त्वाचे आहे!
नम्र व्यक्ती चूक करते तरीपण तिची अप्रतिष्ठा होत नाही. ईयोब एक उदाहरणशील व्यक्ती होता तरीपण तो अपरिपूर्ण होता. त्याच्यावर आलेल्या परीक्षांमुळे त्याच्या विचारसरणीत एक गंभीर दोष उघडकीस आला. विरोधकांसमोर स्वतःचे समर्थन करताना त्याने काहीशी टोकाची भूमिका घेतली. आपण देवापेक्षा अधिक नीतिमान आहोत असेही त्याने सुचवले. (ईयोब ३५:२, ३) यहोवाने ईयोबाची विचारधारा कशी सुधारली?
पृथ्वी, समुद्र, तारकांनी लुकलुकणारे आकाश, काही प्राणी आणि सृष्टीतील इतर अद्भुत गोष्टींद्वारे यहोवाने ईयोबाला दाखवून दिले की, देवाच्या महानतेच्या तुलनेत मनुष्य अगदीच लहान आहे. (ईयोब, अध्याय ३८-४१) ईयोबाला कशामुळे त्रास होत होता हे यहोवाने आपल्या संभाषणात कोठेही स्पष्ट केले नाही. तशी गरजच नव्हती. ईयोब नम्र व्यक्ती होता. त्याने नम्रतेने आपल्यामधील व देवामधील फरक तसेच आपली अपरिपूर्णता व कमतरता आणि यहोवाची धार्मिकता व शक्ती यांच्यातला फरक जाणला. तो म्हणाला, “मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” (ईयोब ४२:६) ईयोबाच्या सात्विकपणामुळे त्याने स्वेच्छेने सुधारणूक स्वीकारली. आपल्याबद्दल काय? सात्विकपणाने प्रेरित होऊन आपण वाग्दंड किंवा सुधारणूक लागलीच स्वीकारतो का?
मोशे देखील विनयशील आणि नम्र होता. इतरांच्या समस्या सोडवण्याचे काम त्याला पेलत नव्हते तेव्हा त्याचा सासरा, इथ्रो याने त्याला व्यावहारिक सल्ला दिला की, इतर कर्तबगार लोकांना जबाबदारी वाटून दे. स्वतःच्या मर्यादा ओळखून मोशेने सुज्ञपणे हा सल्ला स्वीकारला. (निर्गम १८:१७-२६; गणना १२:३) विनयशील व्यक्ती इतरांना काही अधिकार देण्यास मागेपुढे पाहत नाही किंवा इतर कर्तबगार पुरुषांना योग्य जबाबदाऱ्या सोपवून आपला अधिकार कमी होईल अशीही भीती त्याला वाटत नाही. (गणना ११:१६, १७, २६-२९) उलट, तो त्यांना आध्यात्मिकतेत पुढे प्रगती करायला मदत करण्यास उत्सुक असतो. (१ तीमथ्य ४:१५) हे आपल्या बाबतीतही खरे असू नये का?
‘सात्विकाचा मार्ग नीट आहे’
सात्विकपणामुळे सरळ जनांना नेहमीच धोक्यापासून किंवा संकटापासून संरक्षण मिळत नाही हे ओळखून शलमोन म्हणतो: “सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करितो.” (नीतिसूत्रे ११:३) खरोखर, सात्विकपणा सरळ जनांना अगदी कठीण परिस्थितीतही देवाच्या नजरेत जे योग्य ते करण्यास मार्गदर्शित करतो आणि यामुळे दीर्घकालीन फायदे प्राप्त होतात. ईयोबाने आपला सात्विकपणा मुळीच त्यागला नाही आणि यहोवाने “ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले.” (ईयोब ४२:१२) दुसऱ्यांच्या जोरावर आपला फायदा होत आहे आणि आपली भरभराट होत आहे असे कदाचित कपटी लोकांना वाटेल. परंतु, आज न उद्या त्यांचा फसवेपणा त्यांच्याकरताच नाश ठरेल.
सुज्ञ राजा म्हणतो, “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.” (नीतिसूत्रे ११:४) व्यक्तिगत अभ्यास, प्रार्थना, सभांमधील उपस्थिती आणि क्षेत्र सेवा या गोष्टींमुळे देवाबद्दलचे आपले प्रेम आणि आपली भक्ती वाढते; या गोष्टींना वेळ देण्याऐवजी आपण भौतिक गोष्टींच्या मागे लागलो तर मूर्ख ठरू! आपल्याजवळ गडगंज संपत्ती असली तरीही येणाऱ्या मोठ्या संकटातून ती आपला बचाव करू शकत नाही. (मत्तय २४:२१) फक्त सरळ जनांची धार्मिकता त्यांना तारू शकेल. (प्रकटीकरण ७:९, १४) सफन्याच्या विनंतीकडे लक्ष दिल्याने आपण सुज्ञ ठरू: “परमेश्वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी . . . त्याचा आश्रय घ्या, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा.” (सफन्या २:२, ३) दरम्यान, आपण ‘आपल्या द्रव्याने परमेश्वराचा सन्मान’ करण्याचा निश्चय करू या.—नीतिसूत्रे ३:९.
धार्मिकता अवलंबण्याच्या महत्त्वावर अधिक जोर देऊन शलमोन, निर्दोष लोकांचा परिणाम आणि दुष्टांचा परिणाम यांच्यातला फरक दाखवून म्हणतो: “सात्विकाची धार्मिकता त्याचा मार्ग नीट करिते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. सरळांची धार्मिकता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वर्ततात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयींचा भरवसा नाहीसा होईल. धार्मिक संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो.” (नीतिसूत्रे ११:५-८) निर्दोष व्यक्तीचे स्वतःच्या मार्गात कधीच पतन होत नाही किंवा स्वतःच्याच व्यवहारात तो कधी अडकला जात नाही. त्याचा मार्ग नीट असतो. सरतेशेवटी सरळ जनांना संकटातून वाचवले जाते. दुष्ट लोक शक्तिशाली दिसत असतील परंतु त्यांना सुटकेची कोणतीही आशा नाही.
“नगर उल्लास पावते”
सरळ जनांचा सात्विकपणा आणि दुष्टांचा दुष्टपणा यांचा इतर लोकांवरही परिणाम होतो. इस्राएलचा राजा म्हणतो, “अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करितो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात.” (नीतिसूत्रे ११:९) निंदा, चुगली, अश्लील भाषण किंवा रिकामटेकड्यांचे बोलणे हे इतरांकरता हानीकारक आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, धार्मिक व्यक्तीचे भाषण शुद्ध, विचारशील आणि समंजसपणाचे असते. तो ज्ञानाने मुक्त होतो कारण त्याच्यावर आरोप करणारे खोटे आहेत हे दाखवण्यासाठी त्याला आवश्यक असलेला पुरावा त्याच्या सात्विकपणामुळे मिळतो.
राजा पुढे म्हणतो, “धार्मिकांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो.” (नीतिसूत्रे ११:१०) धार्मिकांना सहसा लोक पसंत करतात आणि त्यांच्यामुळे त्यांचे शेजारी आनंदी असतात. परंतु “दुर्जन” कोणालाच आवडत नाहीत. कोणी दुष्ट मरते तेव्हा सर्वसाधारणपणे लोक त्यांच्याबद्दल शोक करत नाहीत. यहोवा ‘दुर्जनांचा देशातून उच्छेद करील, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन करील’ तेव्हा कोणालाही दुःख वाटणार नाही. (नीतिसूत्रे २:२१, २२) उलट, तेव्हा सगळ्यांना आनंदच होईल कारण ते उरणार नाहीत. पण आपल्याबद्दल काय? आपल्या वागण्यामुळे लोकांना आनंद होतो का याचा विचार आपण केला पाहिजे.
“नगराची उन्नति होते”
पुढे सरळजनांमुळे आणि दुर्जनांमुळे समाजावर पडणाऱ्या परिणामाचा फरक दाखवून शलमोन म्हणतो: “सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नति होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो.”—नीतिसूत्रे ११:११.
सरळ मार्गावर चालणाऱ्या नागरिकांमुळे शांतीचे व भले वातावरण निर्माण होते आणि समाजातील इतरांना ते बोध करतात. अशाप्रकारे, नगराची उन्नती होते अर्थात त्याचा विकास होतो. निंदास्पद, हानीकारक किंवा चुकीच्या गोष्टी बोलणाऱ्यांमुळे अशांती, दुःख, फूट आणि समस्या होत असतात. आणि खासकरून अशा व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर असतील तर हे निश्चित घडते. असे नगर दुःस्थितीत, भ्रष्टाचाराने ग्रस्त आणि नैतिक तसेच कदाचित आर्थिकरित्या लयास जात असते.
नीतिसूत्रे ११:११ येथे दिलेले तत्त्व हे यहोवाच्या लोकांनाही तितकेच लागू होते कारण ते नगरासमान मंडळ्यांमध्ये एकमेकांच्या सहवासात असतात. ज्या मंडळीत आध्यात्मिक मनोवृत्तीच्या लोकांचा—सात्विकपणाने प्रेरित असलेल्या सरळजनांचा—प्रभाव असतो तेथे आनंदी, सक्रिय आणि मदतदायी, देवाला गौरव देणाऱ्या लोकांचा समूह असतो. यहोवा त्या मंडळीवर आशीर्वाद देतो आणि तिची भरभराट होते. पण कुरकूर करणारे, असमाधानी व ज्या पद्धतीने सर्वकाही चालले आहे त्यामध्ये दोष दाखवून त्याविषयी कटुतेने बोलणारे लोक “कडूपणाचे मूळ” असतात जे पसरू शकतात व चांगल्या लोकांनाही दूषित करू शकतात. (इब्री लोकांस १२:१५) सहसा अशा लोकांना जास्त अधिकार आणि मोठेपणा हवा असतो. मंडळीमध्ये अन्याय, जातीय भेदभाव वगैरे गोष्टी आहेत किंवा वडील तशाप्रकारे वागतात अशा खोट्या अफवा ते पसरवतात. त्यांच्या मुखाने खरोखरच मंडळीत फूट पडू शकते. तर मग, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मंडळीमध्ये शांती व ऐक्य राखण्यास हातभार लावणारे आध्यात्मिक लोक बनण्याचा प्रयत्न आपण करू नये का?
आणखी पुढे शलमोन म्हणतो: “जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानितो, तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करितो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करितो, पण ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्ट गुप्त ठेवितो.”—नीतिसूत्रे ११:१२, १३.
जो सूज्ञ नाही किंवा “बुद्धिशून्य” आहे त्याच्यामुळे किती नुकसान होते! त्याच्या तोंडावरचा ताबा सुटल्यामुळे तो निंदा किंवा कुटाळी करू लागतो. असा अहितकर प्रभाव थांबवण्याचा नियुक्त वडिलांनी तातडीने प्रयत्न करावा. सूज्ञ व्यक्ती “बुद्धिशून्य” व्यक्तीसारखी नसते; कोणत्या वेळी शांत राहावे हे तिला कळत असते. ती गुप्त गोष्ट उघड करण्याऐवजी झाकून ठेवते. तोंडावर ताबा नसल्यामुळे नुकसान होऊ शकते हे ओळखून सूज्ञ व्यक्तीच्या “चित्ती इमान वसते.” सहविश्वासूंच्या प्रती तो इमानदार असतो आणि त्यांना धोक्यात टाकणाऱ्या गुप्त गोष्टी इतरांना सांगत नाही. मंडळीकरता हे सात्विक लोक एक आशीर्वाद ठरतात!
निर्दोष लोकांच्या मार्गावर टिकून राहण्याकरता ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ निर्देशनाखाली तयार केलेल्या आध्यात्मिक अन्नाचा यहोवा विपुलतेत पुरवठा मत्तय २४:४५) आपल्या नगरासमान मंडळ्यांमध्ये ख्रिस्ती वडिलांच्या द्वारेही आपल्याला बरीच व्यक्तिगत मदत मिळते. (इफिसकर ४:११-१३) याकरता आपण खरोखर कृतज्ञ आहोत कारण “शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अधःपात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते.” (नीतिसूत्रे ११:१४) काहीही झाले तरी आपण मात्र ‘सात्विकपणे वागत’ राहू या.—स्तोत्र २६:१.
करतो. ([२६ पानांवरील संक्षिप्त आशय]
भौतिक गोष्टींच्या मागे लागून ईश्वरशासित कार्यहालचालींकडे दुर्लक्ष करणे किती मूर्खपणाचे आहे!
[२४ पानांवरील चित्रे]
ईयोब सात्विकपणे वागला आणि यहोवाने त्याला आशीर्वादित केले
[२५ पानांवरील चित्र]
उज्जा आपल्या गर्वामुळे मरण पावला