अनपेक्षित ठिकाणी सत्य सापडले
राज्य घोषकांचा वृत्तान्त
अनपेक्षित ठिकाणी सत्य सापडले
देवाची इच्छा आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) त्याकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी बायबल व बायबल अभ्यासाकरता सहायक ठरणाऱ्या प्रकाशनांच्या लाखो प्रती छापून वितरित केल्या आहेत. कधीकधी या प्रकाशनांनी प्रामाणिक हृदयाच्या लोकांना अतिशय अनपेक्षित मार्गांनी सत्य आत्मसात करण्यास मदत केली आहे. यासंबंधाने सिएरा लिओन येथील फ्रीटाऊन शहरातील राज्य घोषकांनी पुढील अनुभव कळवला आहे.
उस्मान हा आपल्या कुटुंबात नऊ मुलांपैकी दुसरा मुलगा होता. धार्मिक प्रवृत्तीच्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे उस्मान नियमितपणे आपल्या वडिलांसोबत उपासनेकरता जात असे. पण आपल्या धर्मात नरकाविषयी जे शिकवले जात होते त्याचा विचार करून उस्मान अतिशय अस्वस्थ होत असे. दयेचा सागर असलेला देव दुष्ट लोकांना अग्नीत यातना कशा काय देऊ शकतो याचे त्याला आकलन होत नसे. नरकाच्या शिकवणुकीबद्दल उस्मानला कित्येकांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे काही समाधान झाले नाही.
उस्मान २० वर्षांचा असताना त्याला एकदा कचराकुंडीत अर्धवट लपलेले एक निळे पुस्तक सापडले. वाचनाचा छंद असल्यामुळे उस्मानला राहावले नाही. त्याने ते पुस्तक उचलले आणि नीट पुसले; त्याची नजर पुस्तकाच्या शीर्षकावर गेली—सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते. *
उस्मानला प्रश्न पडला, ‘हे कोणते सत्य असावे?’ त्याने मोठ्या उत्सुकतेने ते पुस्तक आपल्या घरी नेले आणि एका दमात ते वाचून काढले. देवाचे वैयक्तिक नाव यहोवा आहे हे त्याला कळले तेव्हा त्याला किती आनंद झाला! (स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.) उस्मानला हे देखील कळून आले की देवाचा सर्वश्रेष्ठ गुण प्रेम आहे आणि कोणाला अग्नीत यातना देण्याची कल्पना देखील त्याला घृणास्पद वाटते. (यिर्मया ३२:३५; १ योहान ४:८) शेवटी, त्याला वाचायला मिळाले की लवकरच यहोवा पृथ्वीवर एक परादीस आणेल ज्यात लोक सर्वकाळ जगू शकतील. (स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४) एका करुणामय, प्रेमळ देवाने प्रकट केलेले हे किती अद्भुत सत्य! उस्मानने एका अनपेक्षित ठिकाणी सत्य दाखवल्याबद्दल यहोवाचे मनापासून उपकार मानले.
काही दिवसांनंतर काही मित्रांच्या मदतीने उस्मानने यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह शोधून काढले आणि पहिल्यांदा तो एका सभेला उपस्थित राहिला. तेथे त्याने एका साक्षीदाराला त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची विनंती केली. कुटुंबाकडून कडा विरोध झाला तरीसुद्धा उस्मानने सातत्याने आध्यात्मिक प्रगती केली आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. (मत्तय १०:३६) आज तो मंडळीत वडिलाच्या भूमिकेत सेवा करत आहे. कचराकुंडीत सापडलेल्या एका बायबल प्रकाशनामुळे किती आश्चर्यकारक परिणाम झाला!
[तळटीप]
^ परि. 5 १९६८ साली यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.