ईश्वरी भक्ती आचरल्याचे प्रतिफळ
जीवन कथा
ईश्वरी भक्ती आचरल्याचे प्रतिफळ
विल्यम आयहिनओरिया यांच्याद्वारे कथित
मध्यरात्री बाबा पुन्हा कण्हू लागले तेव्हा मला जाग आली. पोट घट्ट धरून ते जमिनीवर लोळत होते. आई, माझी मोठी बहीण आणि मी त्यांच्याशेजारी बसलो. त्यांचं दुःखणं थांबल्यावर ते उठून बसले आणि उदास चेहरा करून म्हणाले: “या जगात फक्त यहोवाच्या साक्षीदारांनाच शांती आहे.” त्यांचं हे वाक्य ऐकून मी गोंधळून गेलो खरा, पण ते माझ्या मनात राहिलं कारण मी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. बाबांच्या बोलण्याचा काय अर्थ होता हे मला जाणून घ्यायचं होतं.
मी सहा वर्षांचा होतो तेव्हा म्हणजे १९५३ साली ही घटना घडली. मध्य-पश्चिम नायजेरियातील इवोसा या कृषिप्रधान गावात मी राहात होतो; माझ्या वडिलांना ३ बायका आणि १३ मुलं होती; अशा मोठ्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो; सर्व मुलांमध्ये मी दुसरा असलो तरी, माझ्या आईच्या मुलांमध्ये मी थोरला होतो. आम्ही सर्वजण गवताचे छप्पर असलेल्या व मातीनं बांधलेल्या माझ्या आजोबांच्या घरात राहत होतो. घरात, आजी आणि बाबांचे तीन भाऊ आणि त्यांचा परिवार असे आम्ही सर्व एकत्र राहत होतो.
माझ्या लहानपणचे दिवस अतिशय दुःखदायक होते. याला कारणीभूत होता माझ्या बाबांचा आजार. त्यांना पोटाचं दुःखणं होतं जे अनेक वर्षांपर्यंत म्हणजे ते मरेपर्यंत राहिलं. त्यांना नक्की कोणता आजार होता हे आम्हाला माहीत नव्हतं; आम्ही एका आफ्रिकन शेतकऱ्याला परवडतील असे सर्व वैद्यकीय उपचार—जडीबुटी आणि पारंपारिक पद्धतीने उपचार करून पाहिले. बाबांना पोटाचं दुखणं सुरू व्हायचं तेव्हा ते जमिनीवर अक्षरशः लोळायचे आणि आम्ही त्यांच्या शेजारी बसून रडायचो; अनेकदा, आम्ही सकाळी कोंबडा आरवूपर्यंत म्हणजे संपूर्ण रात्रभर असे जागे राहिले आहोत. त्यांच्या दुःखण्यावर उपाय शोधण्यासाठी, आई
आणि बाबा आम्हा सर्व पोरांना आजीजवळ ठेवून कुठं कुठं जाऊन आले.सुरण, कसावा आणि कोला फळं, ही पिकं काढून आम्ही विकायचो. कधीकधी अपुऱ्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून रबर काढण्याचंही काम आम्ही करायचो. आमचं मुख्य अन्न म्हणजे, सुरण. आम्ही, सकाळ, दुपार संध्याकाळ सुरण खायचो. कधीकधी बदल म्हणून आम्ही भाजलेली केळी खायचो.
पूर्वजांच्या उपासनेला आमच्या जीवनात महत्त्वाचं स्थान होतं. काऊरी शिंपले बांधलेल्या काड्यांसमोर आम्ही आमच्या पूर्वजांना नैवेद्य दाखवायचो. भुतांना व चेटकणींना दूर ठेवण्यासाठी बाबा एका मूर्तीचीही उपासना करायचे.
मी पाच वर्षांचा होतो तेव्हा आम्ही, आमच्या गावापासून अकरा किलोमीटर दूर असलेल्या एका शेतमळ्यात तात्पुरतं राहायला गेलो. तिथं बाबांना नारू झाला; त्यांच्या पोटाच्या दुःखण्याबरोबर ही नवीनच पीडा सुरू झाली. त्यांना दिवसा काम करायला जमायचं नाही आणि रात्रीचं पोट दुखायला लागायचं. मलाही टायफसच्या प्रकारात मोडणारा, वालुमक्षिका (सॅण्डफ्ली) आजार झाला. त्यामुळे, आमच्या नातेवाईकांकडून मिळणारा कपडालत्ता, पैसे व अन्न यांवर आमची गुजराण होत होती. अशा हलाखीच्या दिवसांत राहून कुत्र्यासारखं मरण्यापेक्षा आम्ही पुन्हा आमच्या गावी, इवोसात राहायला गेलो. बाबांची इच्छा होती, की त्यांच्या थोरल्या मुलानं, म्हणजे मी, शेती न करता दुसरं काहीतरी चांगलं काम करावं ज्यामुळे जास्त पैसा कमावता येईल. चांगलं शिक्षण घेतल्यास कुटुंबाला आणि माझ्या भावंडांना आर्थिकरीत्या मी वर आणू शकेन, असा त्यांचा विचार होता.
वेगवेगळ्या धर्मांची ओळख
मी माझं शिक्षण आमच्या गावातच सुरू केलं. यामुळे ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांविषयी मला माहीत झालं. १९५० च्या दशकात, पाश्चिमात्य शिक्षणाचा, वसाहती निर्माण केलेल्यांच्या धर्माशी अतूट संबंध होता. मी कॅथलिक प्राथमिक शाळेत जात असल्यामुळे मला रोमन कॅथलिक व्हावं लागलं.
१९६६ साली मी १९ वर्षांचा झालो तेव्हा मला इवोसापासून ८ किलोमीटर दूर असलेल्या इवोहिन्मी गावातील पिल्ग्रीम बॅप्टिस्ट सेकंड्री स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं माझं धार्मिक शिक्षण बदललं. ही एक प्रोटेस्टंट शाळा असल्यामुळे, कॅथलिक पाळक मला संडे मासमध्ये भाग घेऊ देत नसत.
परंतु या बॅप्टिस्ट शाळेतच मी पहिल्यांदा बायबल पाहिलं. मी कॅथलिक चर्चलाच जात होतो पण दर रविवारी कॅथलिक चर्चसेवा संपल्यावर मी स्वतःच बायबल वाचू लागलो. बायबलमधल्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकी मला खूप आवडू लागल्या; ईश्वरी भक्तीनुसार असलेलं एक अर्थपूर्ण जीवन जगण्याची उर्मी माझ्यात निर्माण होऊ लागली. मी जसजसं बायबल वाचत गेलो तसतसं मला धार्मिक पुढाऱ्यांचा दांभिकपणा व अनेक चर्च सदस्यांची अनैतिक जीवनशैली पाहून त्यांची घृणा वाटू लागली. येशू आणि त्याच्या शिष्यांनी जशी शिकवण दिली व ते जसे वागले त्यापेक्षा स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे हे लोक किती वेगळे होते हे मला दिसलं.
काही विशिष्ट घटनांमुळे मला जास्त धक्का बसला. एकदा, मी एका ख्रिस्ती प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये जपमाळ आणायला गेलो होतो तेव्हा मी दुकानाच्या दारावर जूजू ताईत लटवकलेलं पाहिलं. दुसऱ्या वेळी, आमच्या बॅप्टिस्ट शाळेच्या मुख्याध्यापकानं माझ्याशी लैंगिक दुर्व्यवहार करायचा प्रयत्न केला. नंतर मला कळलं, की तो समलिंगी मनुष्य होता आणि पुष्कळ लोकांशी त्याने दुर्व्यवहार केला होता. हे सर्व पाहिल्यावर मी स्वतःशीच विचार केला: ‘ज्या धर्माचे सदस्य आणि पाळकही घोर पातकं करूनसुद्धा सुटतात अशा धर्मांचा देव खरोखर स्वीकार करतो का?’
धर्म बदलणे
पण, मला बायबल मात्र वाचायला आवडायचे म्हणून मी ते वाचत राहिलो. तेव्हा मला, १५ वर्षांपूर्वी बाबांनी काढलेले प्रकटीकरण १४:३) मला स्वर्गात जायची इच्छा असल्यामुळे, बायबलमध्ये सांगितलेली ही संख्या माझा जन्म व्हायच्या आधीच पूर्ण झाली की काय असं मला वाटायचं.
उद्गार आठवले: “या जगात फक्त यहोवाच्या साक्षीदारांनाच शांती आहे.” पण मला भीती वाटायची; कारण, माझ्या शाळेतल्या साक्षीदार विद्यार्थ्यांची टिंगल केली जायची आणि कधीकधी तर शाळेत होणाऱ्या सकाळच्या उपासनेत भाग न घेतल्याबद्दल त्यांना शिक्षा देखील व्हायची. त्यांचे काही विश्वास मला विचित्र वाटायचे. जसे की, फक्त १,४४,००० लोकच स्वर्गात जाणार आहेत यावर माझा विश्वासच बसत नव्हता. (परंतु साक्षीदारांचं वर्तन, त्यांची मनोवृत्ती एकदम वेगळी होती हे स्पष्ट दिसून यायचं. शाळेच्या इतर तरुणांच्या अनैतिक किंवा हिंसक गोष्टींत त्यांचा कधी भाग नसायचा. खऱ्या धर्माचं आचरण करणारे जगापासून वेगळे असतील, असं मी बायबलमध्ये जे वाचलं होतं, त्यासारखेच हे साक्षीदार होते.—योहान १७:१४-१६; याकोब १:२७.
मी आणखी परीक्षण करायचं ठरवलं. १९६९ सालच्या सप्टेंबर महिन्यात मला “सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते” हे पुस्तक मिळालं. दुसऱ्या महिन्यात, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पूर्ण-वेळेच्या सेवकानं, म्हणजे एका पायनियरनं माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. माझा पहिला अभ्यास मला खूपच आवडला, त्यामुळे मी एका शनिवारी रात्री सत्य पुस्तक वाचायला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत एका दमात संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. त्यानंतर मी माझ्या सोबतच्या विद्यार्थ्यांना वाचलेल्या गोष्टी सांगू लागलो. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना वाटलं, की मला मिळालेल्या या नव्या धर्मामुळे मी वेडा झालो आहे. पण मी वेडा आहे की काय हे मला समजत होतं.—प्रेषितांची कृत्ये २६:२४.
मी कुठल्यातरी एका नवीन धर्माचा प्रचार करतोय, ही बातमी माझ्या आईवडिलांपर्यंत पोहंचली. त्यांनी मला ताबडतोब घरी यायला सांगितलं; मला नेमकं काय झालंय हे त्यांना पाहायचं होतं. आणि सर्व साक्षीदार नेमके त्याच वेळी ईलेशमध्ये होणाऱ्या प्रांतीय अधिवेशनासाठी गेल्यामुळे मला मार्गदर्शन देणारं कोणीच नव्हतं. मी घरी गेलो; माझ्या आईनं, नातेवाईकांनी मला अनेकानेक प्रश्न विचारून, माझी टीका करून मला भांबावून सोडलं. मी बायबलमधून जे शिकत होतो त्याचं स्पष्टीकरण मी माझ्या परीनं द्यायचा प्रयत्न केला.—१ पेत्र ३:१५.
माझ्या चुलत्यानं, यहोवाचे साक्षीदार खोटे शिक्षक आहेत, हे मला सिद्ध करून दाखवण्याचा बराच प्रयत्न केला
पण त्यांना जमलं नाही तेव्हा त्यांनी एका दुसऱ्या मार्गानं मला समजवायचा प्रयत्न केला. ते मला म्हणाले: “बघ, तू शिकण्यासाठी शाळेला गेलास. तू जर तुझा अभ्यास सोडून प्रचार करत राहिलास तर तुझं शिक्षण कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा, आधी शिक्षण घे मग या नव्या धर्मात जा.” माझ्या चुलत्याचं बोलणं मला पटलं, म्हणून मी साक्षीदारांबरोबरचा अभ्यास थांबवला.१९७० सालच्या डिसेंबर महिन्यात, पदवीधर झाल्याबरोबर मी थेट राज्य सभागृहात गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी यहोवाच्या साक्षीदारांची एकही सभा चुकवली नाही. १९७१ सालच्या ऑगस्ट ३० रोजी देवाला माझं जीवन समर्पित करून मी बाप्तिस्मा घेतला. यामुळे फक्त माझे आईवडीलच नाही तर आमच्या अख्ख्या समाजालाच धक्का बसला. ते मला म्हणाले, की मी त्यांची निराशा केली होती कारण, इवोसात आणि शेजारपाजारच्या गावातला मीच पहिला विद्यार्थी होतो ज्याला सरकारी स्कॉलरशीप मिळाली होती. पुष्कळ लोकांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. समाजाची सुधारणा करण्यासाठी मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करीन अशी त्यांची आशा होती.
धर्म बदल्याचे परिणाम
माझ्या कुटुंबानं व आमच्या समाजातील वृद्ध मंडळीनं, मी माझा नवीन धर्म सोडून द्यावा म्हणून मला पटवण्यासाठी काही लोकांना माझ्याकडं पाठवलं. त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला आणि मला शापही दिले. ते मला म्हणाले: “तू हा धर्म सोडून दिला नाहीस तर तुझं पुढं काही भलं होणार नाही. तुला नोकरी मिळणार नाही. तुला स्वतःचं घर बांधता येणार नाही. तुला लग्न करून संसार थाटता येणार नाही.”
पण त्यांनी मला दिलेल्या शापांच्या अगदी उलटच घडत गेलं; शाळा संपवून दहा महिनेच झाले होते, की मला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. १९७२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मी वेरोनिका या माझ्या अतिप्रिय पत्नीशी विवाह केला. नंतर, सरकारनं मला कृषी विस्तार प्रतिनिधी म्हणून प्रशिक्षित केलं. मी माझी पहिली कार विकत घेतली, आणि काही दिवसांत स्वतःचं घरही बांधू लागलो. नोव्हेंबर ५, १९७३ रोजी आमची पहिली मुलगी व्हिक्ट्री हिचा जन्म झाला आणि काही वर्षांनी लिडिया झाली, मग विल्फ्रेड झाला, मग जोन झाली. आणि १९८६ साली शेवटी मायका झाला. आमची ही सर्व मुलं आम्हाला अत्यंत मौल्यवान वाटतात; ती यहोवाकडून मिळालेली वरदान आहेत.—स्तोत्र १२७:३.
माझ्या गत जीवनाचा विचार करून सांगू शकतो, की समाजानं मला दिलेले शाप खरं तर आशीर्वादच ठरले. त्यामुळेच मी माझ्या थोरल्या मुलीचं नाव व्हिक्ट्री (म्हणजे, विजय) हे ठेवलं आहे. अलीकडेच, आमच्या समाजानं मला एक पत्र लिहिलं; त्यात म्हटलं होतं, “देवानं तुला आशीर्वादित केलं आहे तेव्हा तू कृपया घरी येऊन आपल्या समाजात होणाऱ्या विकासात भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे.”
ईश्वराच्या मार्गानेच मुलांचे संगोपन करणे
मुलांचे संगोपन करण्याची देवाने दिलेली जबाबदारी भौतिक संपत्तीचा पाठलाग करता करता पूर्ण करणे शक्य नाही हे वेरोनिका व मला माहीत होतं. त्यामुळे आम्ही साधे राहणीमान ठेवून त्यात समाधानी राहण्यास शिकलो आहोत. वेगळ्या पद्धतीनं जीवन जगून, नको ते परिणाम ओढवून घेण्यापेक्षा साधेसुधे जीवन जगणेच आम्हाला आवडते.
आमच्या भागात, एकाच इमारतीत पुष्कळ कुटुंबे राहतात, एकच न्हाणीघर, स्वयंपाकघर वापरतात; ही आमच्याकडची रीत आहे. परंतु सरकारी नोकरीनिमित्तानं मला ज्या ज्या गावात जावे लागले त्या त्या गावात आम्ही स्वतंत्र क्वाटर्समध्ये राहण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारच्या घरांचं भाडं जास्त असलं तरी, यामुळे आमच्या मुलांवर वाईट प्रभाव पडण्याची शक्यता कमी झाली. आम्ही आमच्या सर्व मुलांचे संगोपन एका आध्यात्मिक अर्थानं आरोग्यदायक वातावरणात करू शकलो याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो.
याशिवाय, वेरोनिका गृहिणीच राहिल्यामुळे तिलाही मुलांची अतिशय चांगल्याप्रकारे काळजी घेता आली. माझं काम संपल्यावर, आम्ही कुटुंब मिळून एकत्र काम करायचा प्रयत्न करतो. कोणतंही काम असलं तरी आम्ही ते एकत्र मिळूनच करतो. जसं की, कौटुंबिक बायबल अभ्यास, मंडळीच्या सभांची तयारी, त्यांना उपस्थित राहणं, ख्रिस्ती सेवेत जाणं, मनोरंजन वगैरे.
आम्ही अनुवाद ६:६, ७ मधील सल्ल्याचे पालन करायचा प्रयत्न केला आहे ज्यात पालकांना आपल्या मुलांना फक्त घरातच नव्हे तर हरप्रसंगी शिकवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे, आमच्या मुलांनी साक्षीदार मुलांमध्ये मित्रमैत्रिणी शोधल्या. त्यांच्यासमोर आम्हा दोघांचे उदाहरण आहे; वेरोनिका आणि मी, साक्षीदार नसलेल्या लोकांबरोबर जास्त वेळ घालवत नाही.—नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३.
आमच्याकडून मिळालेले मार्गदर्शन व शिकवण केवळ यांमुळेच आमच्या मुलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला नाही. आमच्या घराचे दार आवेशी ख्रिश्चनांकरता, ज्यांत यहोवाच्या साक्षीदारांतील प्रवासी पर्यवेक्षकांचा देखील समावेश होतो त्यांच्यासाठी नेहमी खुले असायचे आणि आजही आहे. या प्रौढ ख्रिस्ती बंधूभगिनींनी आमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवल्यामुळे आमच्या मुलांना त्यांची आत्म-त्यागी जीवनशैली जवळून पाहण्याची व त्यातून धडा शिकण्याची संधी मिळाली. यामुळे आम्हाला त्यांना आणखी चांगल्याप्रकारे शिकवता आले आणि याचा परिणाम असा झाला, की माझ्या सर्व मुलांनी बायबलचं सत्य स्वीकारलं आहे.
ईश्वरी भक्तीचे प्रतिफळ
आज आम्ही दोघं आणि आमची चार मुलं, पूर्ण-वेळेच्या सेवेत आहोत. मी १९७३ साली पायनियरींग सुरू केली होती. अधूनमधून मला, आर्थिक परिस्थितीमुळे माझी पूर्ण-वेळेची सेवा सोडून द्यावी लागली होती. मला, यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या राज्य सेवा प्रशालेत प्रशिक्षक होण्याचाही बहुमान मिळाला आहे. सध्या मला इस्पितळ संपर्क समितीचा सदस्य (HLC) आणि युहोनमोराचे शहर पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचा बहुमान लाभला आहे.
माझ्या पहिल्या दोन मुलींची व्हिक्ट्री आणि लिडिया यांची लग्नं, उत्तम ख्रिस्ती वडिलांशी झाली आहेत व त्या सुखात आहेत. त्या दोघी आणि त्यांचे पती नायजेरियातील इगेडुमा येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात कार्य करतात. आमचा मोठा मुलगा विल्फ्रेड सेवा सेवक म्हणून कार्य करतो आणि धाकटा मुलगा मायका अधुनमधून साहाय्यक पायनियरींग करतो. १९९७ साली जोननं उच्च माध्यमिक शाळा संपवल्यानंतर सामान्य पायनियरींग सुरू केली.
यहोवा देवाची सेवा करण्यास इतरांना मदत करण्याचा अनुभव हा माझ्या जीवनातला सर्वात फलदायी अनुभव ठरला आहे. मी माझ्या नातेवाईकांतील काही सदस्यांना देवाची सेवा करण्यास मदत केली. माझ्या वडिलांनी यहोवाची सेवा करायचा प्रयत्न केला परंतु अनेक बायका असल्यामुळे त्यांना प्रगती करता आली नाही. लहानपणापासून मला लोकांबद्दल प्रेम वाटायचं. मी दुसऱ्या लोकांचं दुःख पाहतो तेव्हा मला वाटतं, की माझं दुःख काहीच नाही. त्यांना मदत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे हे त्यांना कळतं असं मला वाटतं, म्हणूनच ते माझ्याशी मनमोकळेपणानं बोलतात.
देवाच्या उद्देशाचं ज्ञान घेण्यास मी मदत केलेल्या लोकांपैकी एक तरुण मनुष्य आहे जो बिछान्याला खिळलेला आहे. तो एका विद्युत कंपनीत काम करत होता; एकदा कामावर असताना त्याला इतक्या जोराचा विद्युत झटका बसला की त्याचा छातीपासून खालचा पूर्ण भाग लुळा पडला. तो माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला व तो जे काही बायबलमधून शिकू लागला ते तो स्वीकारू लागला. ऑक्टोबर १५, १९९५ रोजी त्याचा आमच्या घराजवळच्या एका ओढ्यात बाप्तिस्मा झाला; १५ वर्षांतून तो पहिल्यांदाच त्याच्या बिछान्यावरून उठला होता! तो म्हणाला की तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता! आता तो मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करतो.
मी तुम्हाला सांगू इच्छितो, की यहोवाच्या संघटित, समर्पित लोकांबरोबर सेवा करण्याचा ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा मला मुळीच पस्तावा होत नाही. याच लोकांमध्ये मी खरं प्रेम पाहिलेलं आहे. यहोवाच्या विश्वासू सेवकांना सार्वकालिक जीवनाची आशा नसती तरीसुद्धा मला ईश्वरी भक्ती आचारायला आवडली असती. (१ तीमथ्य ६:६; इब्री लोकांस ११:६) याच ईश्वरी भक्तीनं माझ्या जीवनाला आकार दिला आहे आणि मला व माझ्या कुटुंबाला स्थिर, आनंदी व समाधानी बनवलं आहे.
[२५ पानांवरील चित्र]
१९९० साली वेरोनिका व मुलांबरोबर
[२६ पानांवरील चित्र]
वेरोनिका, मुलं आणि आमचे जावई