व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोण दोषी आहे आपण की आपली जनुके?

कोण दोषी आहे आपण की आपली जनुके?

कोण दोषी आहे आपण की आपली जनुके?

दारूबाजी, समलैंगिकता, लैंगिक स्वैराचार, हिंसा, अपवर्तनाचे इतर प्रकार तसेच मृत्यू यांसाठी जबाबदार असलेली जननिक कारणे शोधून काढण्याचा वैज्ञानिक खूप प्रयत्न करत आहेत. आपल्या कृत्यांसाठी आपण जबाबादार नाही तर आपण केवळ जैविक घडणीचे दास आहोत हे समजल्यास आपल्याला किती बरे वाटेल, नाही का? आपल्या चुकांचा दोष दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्‍तीवर ढकलणे हा मानवी स्वभावच आहे.

जनुके आपल्या दोषांसाठी जबाबदार असल्यास, त्यांच्यामध्ये फेरबदल करून वैज्ञानिक हे वाईट गुण काढून टाकू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. सबंध मानवी जिनोमचे आरेखन करण्यात अलीकडेच मिळालेल्या यशामुळे अशाप्रकारच्या आशा बाळगणाऱ्‍यांना नव्याने प्रोत्साहन मिळाले आहे.

पण ही शक्यता, आपला जननिक वारसा आपल्या सर्व दोषांसाठी व चुकांसाठी जबाबदार आहे, या गृहितकावर आधारलेली आहे. पण वैज्ञानिक गुप्तहेरांजवळ आपल्या जनुकांना आरोपी ठरवण्यासाठी पुरेसा पुरावा सापडला आहे का? या उत्तराचा, आपण स्वतःबद्दल व आपल्या भविष्याबद्दल काय विचार करतो यावर गहिरा परिणाम होईल. परंतु, पुरावा पाहण्याआधी मानवजातीची सुरवात कशी झाली त्याविषयी पाहिल्यास यावर काही प्रकाश पडू शकेल.

सुरवात कोठे झाली?

एदेन बागेतील आदाम व हव्वा या मानवी दांपत्याने पाप कसे केले याविषयी पुष्कळांना आधीच ठाऊक आहे किंवा त्यांनी याविषयी ऐकले आहे. अगदी सुरवातीपासूनच त्यांच्या जनुकांमध्ये काही खोट किंवा रचनात्मक दोष होता का ज्यामुळे त्यांच्या हातून पाप घडले व त्यांनी अवज्ञा केली?

त्यांचा निर्माणकर्ता, यहोवा देव, ज्याची सर्व कृत्ये परिपूर्ण आहेत त्याने पृथ्वीवरील त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती पूर्ण केल्यावर असे म्हटले की, “सर्व फार चांगले आहे.” (उत्पत्ति १:३१, अनुवाद ३२:४) त्याने पहिल्या दांपत्याला आशीर्वाद देऊन फलद्रूप व्हा, पृथ्वी मानवसंततीने व्यापून टाका आणि ती सत्तेत आणा असे म्हटले यावरून त्याला आपल्या कामाबद्दल समाधान वाटले होते हे सिद्ध होते; आपल्या कार्यांबद्दल अनिश्‍चित असलेल्या व्यक्‍तीने असे केले नसते.—उत्पत्ति १:२८.

पहिल्या मानवी दांपत्याविषयी बायबल सांगते: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ति १:२७) याचा अर्थ मानवांचे शारीरिक रूप देवासदृश होते असे नाही कारण “देव आत्मा आहे.” (योहान ४:२४) पण त्याचा असा अर्थ होतो की, मानवांना ईश्‍वरी गुण देण्यात आले होते अर्थात त्यांना योग्यायोग्याची जाणीव आणि विवेक दिला होता. (रोमकर २:१४, १५) तसेच ते स्वतंत्र नैतिक प्राणी देखील होते; एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांना देण्यात आली होती.

तथापि, पहिल्या मानवांना मार्गदर्शनाविना वाऱ्‍यावर सोडण्यात आलेले नव्हते. उलट, अपराधाचा काय परिणाम होईल याची त्यांना ताकीद देण्यात आली होती. (उत्पत्ति २:१७) आणि पुराव्यांवरून हे दिसून येते की, आदामाच्या समोर योग्य-अयोग्य यांच्यात निवड करण्याचा प्रसंग आला तेव्हा त्याला त्या वेळी जे योग्य किंवा फायद्याचे वाटले ते करण्याचे त्याने स्वतः निवडले. त्याने त्याच्या निर्माणकर्त्यासोबतच्या नातेसंबंधाचा किंवा आपल्या निर्णयाचा पुढे काय परिणाम होईल याचा विचार करण्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या अपराधात सामील झाला. त्याने नंतर यहोवाला दोष देण्याचा प्रयत्न केला व म्हटले की देवाने दिलेल्या बायकोने त्याला चूक करायला भाग पाडले होते.—उत्पत्ति ३:६, १२; १ तीमथ्य २:१४.

आदाम आणि हव्वेने पाप केल्यावर देवाने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपल्याला बरेच काही कळून येते. त्याने त्यांच्या जनुकांमधील ‘रचनात्मक दोष’ सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. तर त्यांच्या कृत्यांचा जो परिणाम होईल किंवा त्यांच्या मरणाला जे कारणीभूत ठरेल असे त्यांना सांगितले होते तेच त्याने केले. (उत्पत्ति ३:१७-१९) हा प्रारंभिक इतिहास, मानवी वर्तनावर बराच प्रकाश टाकतो. *

जैविक रचनेविरुद्धचा पुरावा

मानवी रोगशास्त्र व वर्तन यांना कारणीभूत असलेली जननिक कारणे व त्यावरील उपाय शोधण्याचे अवघड काम शास्त्रज्ञ बऱ्‍याच काळापासून करत आहेत. संशोधकांच्या सहा गटांनी दहा वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांना हंटिंग्टन रोगाशी संलग्न असलेल्या जनुकाचा तपास लागला परंतु त्या जनुकामुळे हा रोग का होतो याची त्यांना काहीच कल्पना मिळाली नाही. तथापि या संशोधनाच्या वृत्तात, सायंटिफिक अमेरिकनने हार्व्हर्डचे जीवशास्त्रज्ञ इव्हन बॉलबन यांचे हे शब्द उद्धृत केले की, “वर्तनविषयक विकृतींसाठी जबाबदार असलेल्या जनुकांचा तपास लावणे त्याहूनही अवघड” असेल.

त्यात, मानवी वर्तनासाठी विशिष्ट जनुकांना कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न करणारे संशोधन अयशस्वी ठरले आहे. उदाहरणार्थ, सायकोलॉजी टुडे यात नैराश्‍येसाठी कारणीभूत असलेली जननिक कारणे शोधण्याच्या प्रयत्नांवरील एका वृत्तात म्हटले होते: “प्रमुख मानसिक रोगांवरील रोगपरिस्थितीविज्ञानविषयक माहितीवरून हे स्पष्ट होते की, हे [मानसिक रोग] केवळ जननिक कारणांमुळे घडतात असे म्हणता येऊ शकत नाही.” त्या वृत्तात एक उदाहरण दिले आहे: “१९०५ सालाआधी जन्मलेल्या अमेरिकन लोकांमध्ये, ७५ वर्षे वयापर्यंत नैराश्‍येला बळी पडलेल्यांचे प्रमाण १ टक्का होते. त्यापेक्षा ५० वर्षांनंतर जन्मलेल्या अमेरिकन लोकांमधील ६ टक्के लोक २४ वर्षे वयापर्यंत नैराश्‍येला बळी पडले होते.” त्यामुळे फक्‍त बाह्‍य किंवा सामाजिक कारणांमुळेच इतक्या अल्पावधीत असे नाट्यमय बदल घडून येऊ शकतात असा त्यात निष्कर्ष काढण्यात आला.

या तसेच इतर असंख्य अभ्यासांतून आपल्याला काय कळते? आपल्या व्यक्‍तिमत्वाला आकार देण्यात जनुकांची भूमिका असली तरी इतरही प्रभाव आहेत हे स्पष्ट आहे. एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपले वातावरण; आधुनिक काळात तर वातावरणामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. उदाहरणार्थ, आजचे तरुण लोकप्रिय मनोरंजनाचे कसले प्रकार पाहतात, ऐकतात याविषयी मुलगे मुलगेच राहतील (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले होते की, मुले लहानपणापासून “हाणामारी, गोळीबार, भोसकणे, फाडणे, चिरणे, तुकडे करणे, सोलणे किंवा अधू करणे, यांसारखे हजारो टीव्हीचे कार्यक्रम आणि चित्रपट तासन्‌तास पाहत असले किंवा बलात्कार, आत्महत्या, ड्रग्ज, मद्य आणि दुराग्रहविषयीचे संगीत लहानपणापासून ऐकत असले” तर त्यांच्यामध्ये योग्य नैतिक तत्त्वाची जाणीव निर्माण होणे शक्य नाही.

यावरून स्पष्ट दिसते की, “या जगाचा अधिपती” सैतान, याने मानवाच्या नीच वासनांना पोषक ठरणारे वातावरण निर्माण केले आहे. अशा वातावरणाचा आपल्यावर पडणारा जबरदस्त प्रभाव कोणीही नाकारू शकत नाही.—योहान १२:३१; इफिसकर ६:१२; प्रकटीकरण १२:९, १२.

मानवांच्या त्रासाचे मूळ कारण

आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, पहिल्या मानवी दांपत्याने पाप केले तेव्हापासून मानवांच्या समस्यांना सुरवात झाली. याचा परिणाम? आदामाच्या संततीच्या पिढ्या, आदामाच्या पापासाठी दोषी नसल्या तरी जन्मतःच पाप, अपरिपूर्णता आणि मरण हे त्यांच्या वाट्याला आले आहे. बायबल म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

मनुष्याची अपरिपूर्णता त्याच्याकरता नुकसानच ठरली आहे. परंतु यामुळे नैतिक जबाबदारीतून तो मुक्‍त होत नाही. बायबलमध्ये असे दाखवले आहे की, जीवनाकरता यहोवाने केलेल्या तरतूदींवर जे विश्‍वास करतात आणि देवाच्या दर्जांनुसार आपले जीवन जगतात त्यांना त्याची संमती प्राप्त होईल. आपल्या प्रेमदयेमुळे यहोवाने मानवजातीला सोडवण्याकरता, जणू आदामाने जे गमावले होते ते पुन्हा विकत घेण्याकरता एक प्रेमळ तरतूद केली. ती तरतूद म्हणजे त्याच्या परिपूर्ण पुत्राचे अर्थात येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान; येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६; १ करिंथकर १५:२१, २२.

प्रेषित पौलाने या तरतूदीकरता कृतज्ञता व्यक्‍त केली. तो म्हणाला: “किती मी कष्टी माणूस! मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२४, २५) पौलाला हे ठाऊक होते की, दुर्बलतेमुळे त्याने पाप केले तर येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारे तो देवाकडे क्षमा मागू शकत होता. *

पहिल्या शतकाप्रमाणे, आजही असे अनेकजण आहेत जे पूर्वी वाईट चालीचे होते किंवा ज्यांची स्थिती आशाहीन होती. पण त्यांनी बायबल सत्याचे अचूक ज्ञान घेतले, आवश्‍यक बदल केले आणि आता ते देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास योग्य झाले आहेत. आपल्या जीवनात बदल करण्यास त्यांना सोपे गेले नाही आणि आजही पुष्कळांना हानीकारक इच्छांवर नियंत्रण करावे लागते. परंतु, देवाच्या मदतीने ते सात्विक राहिले आहेत आणि त्याची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटतो. (फिलिप्पैकर ४:१३) देवाला संतुष्ट करण्यासाठी एकाने किती मोठे बदल केले त्याचेच हे उदाहरण पाहा.

एक प्रोत्साहनदायक अनुभव

“मी बोर्डिंगमध्ये असताना, समलिंगी संबंध ठेवू लागलो. मी स्वतः समलिंगी आहे असे मला कधीही वाटले नव्हते. माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता आणि आईवडिलांच्या प्रेमासाठी मी आसुसलेलो होतो. शालेय शिक्षण संपवल्यावर मी बंधनकारक लष्करी सेवेत भरती झालो. माझ्याजवळच्या बराकींमध्ये समलिंगी लोकांचा एक गट होता. मला त्यांच्या जीवनशैलीचा हेवा वाटू लागला आणि मग मीसुद्धा त्यांच्यासोबत सहवास ठेवू लागलो. त्यांच्यासोबत एक वर्ष राहिल्यावर मी स्वतःला समलिंगी समजू लागलो. ‘मी असाच आहे आणि त्याबद्दल मी काही करू शकत नाही,’ असा मी विचार केला.

“मी समलिंगी व्यक्‍तींची भाषा शिकू लागलो, त्यांच्या क्लब्समध्ये जाऊ लागलो जेथे अंमली पदार्थ आणि दारू सर्रास मिळत असे. हे राहणीमान मौजेचे आणि आकर्षक आहे असे मला वरवरून वाटत असले तरी आतून मला घृणा वाटायची. मला मनातून असे वाटत होते की, असले संबंध अनैसर्गिक आहेत आणि फार काळ टिकणारे नाहीत.

“एका लहानशा गावात, मला यहोवाच्या साक्षीदारांचे एक राज्य सभागृह दिसले आणि तेथे सभा चालली होती. मी आत जाऊन भाषण ऐकले तर ते भविष्यातील परादीसमय परिस्थितीविषयी होते. त्यानंतर मी आणखी काही साक्षीदारांना भेटलो आणि मला त्यांनी संमेलनाला यायचे आमंत्रण दिले. मी गेलो आणि तेथे आनंदी कुटुंबे एकत्र मिळून उपासना करत आहेत हे पाहून चकित झालो. मी साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागलो.

“माझ्यासाठी हा संघर्ष होता तरीपण बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी मी आचरणात आणू लागलो. माझे पूर्वीचे अशुद्ध चालचलन मी सोडू शकलो. १४ महिने अभ्यास केल्यावर मी यहोवाला माझे जीवन समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेतला. माझ्या जीवनात पहिल्यांदा मला खरे मित्र मिळाले होते. मला इतरांनाही बायबलमधील सत्य शिकवण्याची संधी मिळाली आहे आणि सध्या मी ख्रिस्ती मंडळीत सेवा सेवक या नात्याने कार्य करत आहे. यहोवाने मला खरोखर आशीर्वादित केले आहे.”

आपणच जबाबदार आहोत

आपल्या दुर्वर्तनाचा सर्व दोष जनुकांवर ढकलल्यामुळे समस्या सुटत नाहीत. असे केल्यामुळे, आपल्या समस्यांवर उपाय काढायला किंवा त्यांच्यावर मात करायला मदत होत नाही, तर सायकोलॉजी टुडे यात म्हटल्यानुसार, “समस्यांचे मूळ कारण असलेली असहाय वृत्ती आपण शिकतो. त्यामुळे या समस्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी त्या वाढण्यास हातभार लागला आहे असे दिसते.”

हे खरे की, आपल्याला अत्यंत शक्‍तिशाली वाईट प्रभावांना तोंड द्यावे लागते, जसे की, आपल्या स्वतःची पापी प्रवृत्ती आणि देवाची आज्ञा मानण्यापासून आपल्याला परावृत्त करणाऱ्‍या सैतानाचे प्रयत्न. (१ पेत्र ५:८) हेसुद्धा खरे आहे की, आपली जनुके विविध मार्गांनी आपल्यावर प्रभाव पाडतात. पण आपण निश्‍चितच असहाय नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना शक्‍तिशाली सहायक आहेत—यहोवा, येशू ख्रिस्त, देवाचा पवित्र आत्मा, त्याचे वचन बायबल आणि ख्रिस्ती मंडळी.—१ तीमथ्य ६:११, १२; १ योहान २:१.

इस्राएल राष्ट्र वचनदत्त देशात जाण्याआधी, मोशेने त्यांना, देवासमोर त्यांची काय जबाबदारी आहे याची आठवण करून दिली व म्हटले: “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.” (तिरपे वळण आमचे.) (अनुवाद ३०:१९, २०) त्याचप्रमाणे आज, प्रत्येक जबाबदार व्यक्‍तीवर देवाची सेवा करण्याविषयी व त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याविषयी व्यक्‍तिगत निर्णय घेण्याचे बंधन आहे. निवड तुमची आहे.—गलतीकर ६:७, ८.

[तळटीपा]

^ परि. 10 सावध राहा! (इंग्रजी) सप्टेंबर २२, १९९६, पृष्ठे ३-८ पाहा.

^ परि. 19 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, पृष्ठे ६२-९ पाहा.

[९ पानांवरील चित्रे]

आदाम आणि हव्वा यांच्या जनुकांमधील दोषामुळे त्यांच्या हातून पाप घडले का?

[१० पानांवरील चित्रे]

प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःच्या निर्णयांकरता जबाबदारी स्वीकारावी का?

[चित्राचे श्रेय]

व्यसनी: Godo-Foto

[११ पानांवरील चित्र]

मानवी वर्तनाला जबाबदार असणारी जनुकीय कारणे शोधण्यात यश मिळालेले नाही

[१२ पानांवरील चित्र]

बायबलमधील नियमांचे पालन केल्याने प्रामाणिक लोकांना बदल करण्यास मदत मिळू शकते