व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मरणाबद्दलच्या काही गैरसमजुतींचे जवळून परीक्षण

मरणाबद्दलच्या काही गैरसमजुतींचे जवळून परीक्षण

मरणाबद्दलच्या काही गैरसमजुतींचे जवळून परीक्षण

संपूर्ण इतिहासात मानव, मृत्यूच्या अंधकारमय भविष्यासमोर गोंधळलेल्या व घाबरलेल्या स्थितीत राहिला आहे. इतकेच नव्हे तर, खोट्या धार्मिक कल्पना, लोकप्रिय रीतीरिवाज आणि मनात रुजलेले विश्‍वास या सर्वांमुळे लोकांच्या मनात मरणाचे भय आणखीनच वाढत गेले आहे. मरणाचे भय एखाद्या व्यक्‍तीला मानसिकरीत्या अपंग बनवते ज्यामुळे ती जीवनाचा आनंद लुटू शकत नाही, जीवनाला काही अर्थ आहे हा भरवसाच अशा व्यक्‍तीला राहत नाही.

मरणाविषयीच्या असंख्य खोट्या कल्पनांना बढावा देण्यात प्रमुख धर्मच जबाबदार आहेत. परंतु बायबलमधील सत्याच्या प्रकाशात या खोट्या कल्पनांचे परीक्षण करून मरणाविषयी तुमच्या मनात असलेले गैरसमज दूर होऊ शकतात की नाही ते पाहा.

गैरसमज १: मृत्यू जीवनाचा नैसर्गिक अंत आहे.

“मृत्यू . . . आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे,” असे मृत्यू—वाढीचा शेवटला टप्पा (इंग्रजी) नावाचे पुस्तक म्हणते. अशाप्रकारच्या विधानांवरून, मृत्यू सर्व जिवंत प्राण्यांचा सर्वसामान्य, स्वाभाविक अंत आहे, असा लोकांचा विश्‍वास असल्याचे दिसून येते. अशाप्रकारच्या विश्‍वासांमुळे, पुष्कळ लोकांचा मिथ्यावादी व संधीसाधू दृष्टिकोन बनला आहे.

परंतु मृत्यू खरोखरच जीवनाचा नैसर्गिक अंत आहे का? सर्वच संशोधक असा विश्‍वास बाळगत नाहीत. उदाहरणार्थ, मानवाच्या आयुर्मर्यादेचा अभ्यास करणारे एक जैवशास्त्रज्ञ कॅल्विन हार्ले, एका मुलाखतीत असे म्हणाले, की मनुष्य “मरावा या उद्देशाने त्याची घडण झालेली आहे” असा विश्‍वास ते करत नाहीत. प्रतिरक्षावैज्ञानिक विल्यम क्लार्क यांनी असे निरीक्षण केले: “मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग नाही.” तसेच, कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेतील सेमोर बेन्झर विचारपूर्वक म्हणतात, की “वृद्धापकाळ म्हणजे एक घड्याळ नव्हे तर एक परिस्थिती आहे जी बदलण्याची आपण आशा बाळगू शकतो, असे उचितप्रकारे त्याचे वर्णन केले जाऊ शकते.”

शास्त्रज्ञ मानवशरीराच्या रचनेचा अभ्यास करून थक्क होतात. त्यांना दिसून येते, की मानवाला बहाल केलेली संपत्ती व क्षमता ही ७० ते ८० वर्षांच्या आयुर्मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वर्षांपर्यंत मानवाच्या गरजा भागवू शकते. उदाहरणार्थ, मानवाचा मेंदू प्रचंड स्मृती क्षमतेचा आहे, हे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. एका संशोधकाने असा अंदाज लावला, की “जगातील सर्वात मोठ्या पुस्तकालयांत असलेल्या एकूण पुस्तकांत म्हणजे जवळजवळ दोन कोटी खंडांत समावेल इतकी माहिती” आपल्या मेंदूत साठवण्याची क्षमता आहे. काही तंत्रिका शास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे, की एक व्यक्‍ती आपल्या सरासरी जीवनकालात मेंदूच्या एका टक्क्याच्या शंभराव्या भागाइतक्या क्षमतेचा वापर करते. तेव्हा आपल्याला असा प्रश्‍न पडतो, की ‘सरासरी जीवनकालात आपण मेंदूच्या क्षमतेपैकी केवळ एक अत्यल्प अंशच उपयोगात आणतो, तर मग अफाट क्षमता असलेला मेंदू आपल्याला का देण्यात आला असावा?’

शिवाय, मृत्यूच्या वेळी मानव असे अस्वाभाविकपणे प्रतिक्रिया का दाखवतात याचाही जरा विचार करा. बहुतेक लोकांच्या जीवनात, पत्नीचा, पतीचा, किंवा मुलाचा मृत्यू होतो तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात दुःखद अनुभव ठरतो. आपल्या अत्यंत प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर कित्येक वर्षांपर्यंत, लोक मानसिकरित्या अस्वस्थ असतात. मृत्यू नैसर्गिक आहे असे म्हणणाऱ्‍या लोकांनाही, स्वतःच्या मृत्यूमुळे सर्व गोष्टींचा शेवट होईल ही कल्पना स्वीकारायला जड जाते. ब्रिटिश वैद्यकीय मासिक (इंग्रजी) यात ‘एका सर्वसामान्य बौद्धिक धारणेविषयी सांगितले होते; ती म्हणजे सर्वांना शक्य तितके अधिक काळ जगावेसे वाटते.’

मृत्यूबाबत मानवाची प्रतिक्रिया, त्याची अद्‌भुत स्मरणशक्‍ती व ग्रहणशक्‍ती आणि चिरकाल जगण्याची त्याची आंतरिक उर्मी यांवरून हेच स्पष्ट होत नाही का, की त्याला जगण्यासाठी निर्माण करण्यात आले होते? होय, देवाने मानवाला, त्याचा नैसर्गिक मृत्यू व्हावा म्हणून नव्हे तर अनंतकाळ जगण्याच्या आशेसह बनवले होते. पहिल्या मानवी दांपत्याला त्यांच्या भविष्याविषयी देवाने काय सांगितले ते पाहा: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) किती अद्‌भुत व चिरकालिक भवितव्य!

गैरसमज २: देव लोकांना नेतो.

मरायला टेकलेली व मागे आपली तीन मुले सोडून जाणारी एक २७ वर्षीय आई एका कॅथलिक ननला म्हणाली: “आता मला हे सांगू नकोस, की मी मरावं ही देवाची इच्छा आहे. . . . मला असं कोणी सांगितलं तर त्याचा मला खूप राग येतो.” होय, अनेक धर्मांत मृत्यूच्या बाबतीत हीच शिकवण दिली जाते, की देव लोकांना आपल्याजवळ वर नेतो.

मृत्यू आल्याने आपल्याला अतोनात दुःख होते हे माहीत असूनही आपला निर्माणकर्ता आपल्यावर मृत्यू येऊ देतो; इतका कठोर तो आहे का? नाही, बायबलमध्ये सांगितलेला देव असा नाही. १ योहान ४:८ नुसार “देव प्रीति आहे.” येथे, देवाला प्रेम वाटते किंवा देव प्रेमळ आहे असे या वचनात म्हटलेले नाही तर देव प्रीती आहे असे त्यात म्हटले आहे. देवाची प्रीती इतकी गाढ, शुद्ध व परिपूर्ण आहे, त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात, त्याच्या कार्यांत ती इतक्या पूर्णपणे एकरूप आहे, की तो स्वतःच प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे असे त्याच्याविषयी उचितरीत्या म्हटले जाऊ शकते. लोकांवर मृत्यू आणून त्यांना आपल्याकडे नेणारा हा देव नाही.

मृतजन कोठे जातात, त्यांची काय अवस्था असते याबाबतीत खोट्या धर्माने लोकांना गोंधळात टाकले आहे. स्वर्ग, नरक, पर्गेटरी, लिंबो—अशा आकलनापलीकडील किंवा मनात भय उत्पन्‍न करणाऱ्‍या ठिकाणांविषयी सांगितले जाते. परंतु बायबल आपल्याला सरळपणे सांगते, की मृत लोक बेशुद्ध असतात; झोपी गेलेल्या व्यक्‍तीच्या अवस्थेशी आपण त्यांची तुलना करू शकतो. (उपदेशक ९:५, १०; योहान ११:११-१४) त्यामुळे, छान गाढ झोप लागलेल्या व्यक्‍तीबद्दल जशी आपल्याला चिंता वाटत नाही त्याचप्रमाणे, मेल्यानंतर आपले काय होईल याबद्दलची चिंता करण्याची गरज नाही. येशू एका काळाविषयी बोलला होता जेव्हा, “[“स्मृती,” NW] कबरेतील सर्व माणसे . . . बाहेर येतील” व परादीस पृथ्वीवर नव्याने जीवन जगतील.—योहान ५:२८, २९; लूक २३:४३.

गैरसमज ३: देव लहान मुलांना देवदूत बनवण्यासाठी नेतो.

असाध्य रोगग्रस्त लोकांचा अभ्यास करणाऱ्‍या एलिझाबेथ क्यूब्लर-रोस यांनी, धार्मिक लोकांमध्ये असलेल्या आणखी एका सर्वसामान्य धारणेविषयी सांगितले. एका खऱ्‍या घडलेल्या घटनेचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या, की “देवाला लहान मुलं खूप आवडतात म्हणून त्याने जॉनीला स्वर्गात नेलं असं त्या मृत मुलाच्या लहान बहिणीला सांगणं मूर्खपणा आहे.” असे बोलल्याने, देवाविषयी आपण चुकीची छाप पाडतो, जी देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाला व वागणुकीला शोभत नाही. डॉक्टर क्यूब्लर-रोस पुढे म्हणाल्या: “ही मुलगी मोठी झाली तेव्हाही तिच्या मनात देवाबद्दल राग होता; यामुळे, तीस वर्षांनंतर जेव्हा तिचा स्वतःचा लहान मुलगा मेला तेव्हा ती नैराश्‍यामुळे मनोरुग्ण बनली.”

आणखी एक देवदूत मिळावा म्हणून देव एक लहान मूल कशाला नेईल? यावरून असे भासते, जणू त्या मुलाच्या पालकांपेक्षा देवालाच त्या मुलाची जास्त गरज होती. देव मुलांना नेतो ही गोष्ट खरी असल्यास तो निर्दयी, स्वार्थी ठरणार नाही का? पण बायबलमध्ये या धारणेच्या अगदी उलट शिकवण दिली आहे; ते म्हणते: “प्रीति देवापासून आहे.” (१ योहान ४:७) सर्वसामान्य विवेकबुद्धीच्या व्यक्‍तीलाही दुसऱ्‍याचे मूल हिरावून घेण्याची कल्पना अक्षम्य वाटेल मग एक प्रेमळ देव खरोखरच असे कृत्य करेल का?

मग मुले का मरतात? बायबलच्या या प्रश्‍नाचे काही प्रमाणात उत्तर आपल्याला उपदेशक ९:११, [पं.र.भा.] येथे मिळते: “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” आणि स्तोत्र ५१:५ आपल्याला सांगते, की आपण सर्व जन्मतःच अपरिपूर्ण, पापी आहोत व विविध कारणांसाठी आज मृत्यू हा आपला अंतिम परिणाम आहे. कधीकधी तर जन्म होण्याआधीच मृत्यू येतो ज्यामुळे मृत मुले जन्माला येतात. कधीकधी, दुर्घटनांमुळे किंवा अपघातांमुळे मुले मरतात. या परिणामांसाठी देव जबाबदार नाही.

गैरसमज ४: काही लोकांना मेल्यानंतर यातना दिल्या जातात.

पुष्कळ धर्मांत अशी शिकवण दिली जाते, की दुष्ट लोक धगधगत्या नरकात जातील आणि तिथे त्यांना चिरकाल यातना दिल्या जातील. ही शिकवण तर्काला पटण्याजोगी व शास्त्रवचनीय आहे का? मानवाची आयुर्मर्यादा ७० किंवा ८० वर्षे इतकीच आहे. समजा एखाद्याने संपूर्ण आयुष्यभर अतिशय वाईट कृत्ये केलीही असतील तरीसुद्धा त्याला चिरकाल शिक्षा देत राहणे हे न्यायीपणाचे ठरेल का? मुळीच नाही. अल्प जीवनकाळात केलेल्या पापांबद्दल एखाद्याला चिरकाल यातना देत राहणे हा घोर अन्याय ठरेल.

मेल्यावर लोकांचे काय होते हे फक्‍त देव सांगू शकतो आणि त्याने आपले लिखित वचन बायबल यात ते सांगितले आहे. बायबल म्हणते: “[प्राणी] मरतो तसाच [मनुष्यही] मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; . . . सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पती मातीपासून आहे व सर्व पुनः मातीस मिळतात.” (उपदेशक ३:१९, २०) या वचनात धगधगत्या नरकाचा मुळीच उल्लेख नाही. मानव मेल्यावर पुन्हा मातीला मिळतात—ते अस्तित्वविरहीत होतात.

एखाद्याला यातना द्यायच्या असतील तर ती व्यक्‍ती शुद्धीत असली पाहिजे. मग मेलेले लोक शुद्धीत असतात का? पुन्हा एकदा बायबल या प्रश्‍नाचे उत्तर देते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही.” (उपदेशक ९:५) ज्यांना “काहीच कळत नाही” त्या मृतांना कोणत्याही प्रकारची यातना होणे शक्य नाही.

गैरसमज ५: मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा कायमचा अंत.

आपण मेल्यावर आपले अस्तित्व मिटते हे खरे असले तरी, आपल्याला कसलीच आशा नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ईयोब नावाच्या विश्‍वासू मनुष्याला माहीत होते, की मेल्यावर तो अधोलोकात अर्थात कबरेत जाणार आहे. परंतु देवाला त्याने काय प्रार्थना केली ते पाहा: “तू मला अधोलोकात लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेविशील, माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील. तर किती बरे होईल! मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? . . . तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन.”—ईयोब १४:१३-१५.

ईयोबाचा असा विश्‍वास होता, की तो मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिला तर देवाला त्याचे स्मरण राहील आणि उचित समयी देव त्याचे पुनरुत्थान करील. प्राचीन काळातील देवाच्या सर्व सेवकांचा हाच विश्‍वास होता. स्वतः येशूनेही या आशेला पुष्टी दिली व दाखवून दिले, की मृतांचे पुनरुत्थान करण्याकरता देव त्याचा उपयोग करील. येशूच्या तोंडचे हे शब्द आपल्याला ही हमी देतात: “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.

फार लवकर देव सर्व दुष्टाईचा समूळ नाश करून आपल्या स्वर्गीय शासनाखाली एक नवे जग स्थापन करणार आहे. (स्तोत्र ३७:१०, ११; दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४, १६) यामुळे संपूर्ण पृथ्वी परादीस बनेल व या परादीसमध्ये देवाची सेवा करणारे लोक राहतील. बायबलमध्ये म्हटले आहे: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’”—प्रकटीकरण २१:३, ४

भयापासून मुक्‍ती

पुनरुत्थानाच्या आशेचे आणि पुनरुत्थानाची तरतूद ज्याने केली त्याचे ज्ञान घेतल्यामुळे आपल्याला दिलासा मिळू शकतो. येशूने वचन दिले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहान ८:३२) याचा अर्थ, आपण मृत्यूच्या भयापासूनही मुक्‍त होऊ शकतो. केवळ यहोवाच, वृद्धापकाळ आणि मृत्यूची प्रक्रिया थांबवून आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. देवाने दिलेल्या अभिवचनांवर आपण विश्‍वास करू शकतो का? होय, करू शकतो कारण देवाचे वचन नेहमी खरे ठरले आहे. (यशया ५५:११) मानवजातीसाठी देवाचा काय उद्देश आहे याबद्दल तुम्ही आणखी माहिती घ्यावी असे आम्ही तुम्हाला आर्जवतो. तुम्हाला मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

मरणाचे भय एखाद्या व्यक्‍तीला मानसिकरित्या अपंग बनवते ज्यामुळे ती जीवनाचा आनंद लुटू शकत नाही

[७ पानांवरील तक्‍ता]

मृत्यूविषयी असलेले काही सर्वसामान्य गैरसमज शास्त्रवचने काय म्हणतात?

• मृत्यू जीवनाचा नैसर्गिक अंत आहे․ उत्पत्ति १:२८; २:१७;

रोमकर ५:१२

• देव लोकांना त्याच्याकडे नेण्यासाठी ईयोब ३४:१५; स्तोत्र ३७:

त्यांच्यावर मरण आणतो ११, २९; ११५:१६

• देव लहान मुलांना देवदूत स्तोत्र ५१:५; १०४:१, ;

बनवण्यासाठी नेतो․ इब्री लोकांस १:७, १४

• काही लोकांना मेल्यानंतर स्तोत्र १४६:४; उपदेशक

यातना दिल्या जातात․ ९:५, १०; रोमकर ६:२३

• मृत्यू म्हणजे आपल्या ईयोब १४:१४, १५;

अस्तित्वाचा कायमचा अंत․ योहान ३:१६; 

१७:३; प्रेषितांची कृत्ये २४:१५

[८ पानांवरील चित्र]

मृत्यूविषयीचे सत्य समजल्यावर आपण मृत्यूच्या भयापासून मुक्‍त होतो

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

Barrators—Giampolo/The Doré Illustrations For Dante’s Divine Comedy/Dover Publications Inc.