व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या नीतिमत्तेत आनंद माना

यहोवाच्या नीतिमत्तेत आनंद माना

यहोवाच्या नीतिमत्तेत आनंद माना

“जो नीतिमत्ता व दया यांस अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान ही प्राप्त होतात.”—नीतिसूत्रे २१:२१, NW.

१. कशाप्रकारच्या मार्गाक्रमणामुळे आज लोकांना दुःखद परिणाम भोगावे लागतात?

“मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीतिसूत्रे १६:२५) बायबलमधील हे नीतीसूत्र आजच्या जगातल्या बहुतेक लोकांच्या मार्गाक्रमणाचे किती अचूक चित्रण करते! आज लोक केवळ स्वतःच्या नजरेत जे योग्य आहे तेच करू इच्छितात; कधीकधी तर इतरांच्या अत्यावश्‍यक गरजांचीसुद्धा त्यांना पर्वा नसते. (नीतिसूत्रे २१:२) देशाच्या कायदेकानूनांबद्दल आदर वाटत असल्याचे ते वरवर दाखवतात पण संधी मिळताच कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत.—२ तीमथ्य ३:१-५.

२. मानवजातीच्या भल्याकरता कशाची तातडीने गरज आहे?

आपल्या भल्याकरता आणि सबंध मानव समाजाच्या शांती व सुरक्षिततेकरता आपल्याला तातडीने एका अशा कायद्याची किंवा आदर्शाची गरज आहे जो नीतिमान असेल आणि ज्याचा स्वीकार व पालन करण्यास सर्व लोक तयार होतील. साहजिकच, मानव कितीही बुद्धिमान असला तरीसुद्धा, कोणत्याही मानवाने घालून दिलेला कायदा वरील कसोटीवर खरा उतरू शकत नाही. (यिर्मया १०:२३; रोमकर ३:१०, २३) अशाप्रकारचा सार्वत्रिक आदर्श अस्तित्वात असल्यास तो कोठे सापडेल व तो कसा असेल? कदाचित यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे असा आदर्श अस्तित्वात असल्यास तुम्ही आनंदाने त्याचे पालन कराल का?

नीतिमान आदर्शाची गरज

३. सर्व लोक स्वीकारतील आणि सर्व लोकांकरता उपयोगी असेल असा आदर्श पुरवण्याकरता कोण सर्वात योग्य व्यक्‍ती आहे आणि का?

सर्वांनी स्वीकार करण्याजोगा आणि सर्वांकरता फायद्याचा असणारा आदर्श मिळवण्याकरता आपल्याला अशा व्यक्‍तीची मदत घ्यावी लागेल, जिच्यावर जातीय, सांस्कृतिक, आणि राजकीय सीमांचे बंधन नाही आणि जिच्याठायी मानवांसारखी संकोचित दृष्टी आणि इतर मर्यादा नाहीत. अशी सुयोग्य व्यक्‍ती, सर्वशक्‍तिमान निर्माणकर्ता, यहोवा देव याच्याशिवाय आणखी कोणीही असू शकत नाही; यहोवा म्हणतो: “कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.” (यशया ५५:९) शिवाय, बायबल यहोवाचे वर्णन या शब्दांत करते: “तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी [“नीतिमान,” NW] व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) मूळ भाषेत, सबंध बायबलमध्ये आपल्याला “यहोवा नीतिमान आहे” ही अभिव्यक्‍ती वाचायला मिळते. काही भाषांतरांत या अभिव्यक्‍तीचे भाषांतर, “परमेश्‍वर न्यायी आहे” असे करण्यात आले आहे. (निर्गम ९:२७; २ इतिहास १२:६; स्तोत्र ११:७; १२९:४; विलापगीत १:१८) होय, सर्वश्रेष्ठ आदर्शाची आपण यहोवा देवाकडून अपेक्षा करू शकतो कारण तो विश्‍वासू, न्यायी आणि नीतिमान आहे.

४. “नीतिमान” या शब्दाचा काय अर्थ होतो?

स्वतःला इतरांपेक्षा नीतिमान अथवा पवित्र समजणाऱ्‍या लोकांविषयी इतर लोकांचा सहसा नकारात्मक, कधीकधी तर तिरस्कारयुक्‍त दृष्टिकोन असतो. “नीतिमान” या शब्दाचा अर्थ, न्यायी, सरळ, सद्‌गुणी; निर्दोष, निष्पाप; देवाच्या नियमांच्या व तत्त्वांच्या अथवा नैतिकतेच्या सर्वसामान्य आदर्शांच्या चौकटीत राहून वागणारा; योग्यपणे अथवा न्याय्यपणे वागणारा असा होतो. इतकी उत्तम वैशिष्ट्ये असलेला कायदा किंवा आदर्श लाभल्यास तुम्हाला आनंद वाटणार नाही का?

५. बायबलमध्ये नीतिमत्ता हा शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आला आहे याचे वर्णन करा.

नीतिमत्ता या गुणाच्या संदर्भात, एन्सायक्लोपिडिया जुडायका यात असा उल्लेख आहे: “नीतिमत्ता ही केवळ एक वैचारिक संकल्पना नसून सर्व नातेसंबंधांत न्याय्य आणि योग्य कृती करणे यावर अवलंबून आहे.” उदाहरणार्थ, देवाची नीतिमत्ता, त्याची पवित्रता किंवा शुद्धता यांसारखा केवळ एक आंतरिक किंवा व्यक्‍तिगत गुण नाही. तर त्याच्या योग्य व न्याय्य कृतींतून त्याच्या नीतिमत्तेचा स्वभाव प्रकट होतो. यहोवा पवित्र व शुद्ध असल्यामुळे त्याच्या सर्व कृती आणि त्याच्याशी संबंधित असलेले सर्वकाही नीतिमान असते असे आपण म्हणू शकतो. बायबल म्हणते त्याप्रमाणे “यहोवा आपल्या सर्व मार्गांत नीतिमान आणि आपल्या सर्व कार्यांत निष्ठावान आहे.”—स्तोत्र १४५:१७, NW.

६. पौलाने त्याच्या काळातील सत्य न मानणाऱ्‍या काही यहुद्यांविषयी काय म्हटले आणि का?

प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात या मुद्द्‌यावर जोर दिला. सत्याला न मानणाऱ्‍या काही यहुद्यांच्या संदर्भात त्याने असे लिहिले: “त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.” (रोमकर १०:३) या लोकांना ‘देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नाही’ असे पौलाने का म्हटले? त्यांना नियमशास्त्राचे अर्थात देवाच्या नीतिमान आदर्शांचे शिक्षण देण्यात आले नव्हते का? निश्‍चितच. पण त्यांच्यापैकी बहुतेकजण नीतिमत्ता हा एक वैयक्‍तिक सद्‌गुण समजत होते. म्हणजे, इतर मानवांशी आपल्या व्यवहारांत ज्यांचा उपयोग होईल अशा आदर्शाचे पालन करण्याऐवजी केवळ धार्मिक नियमांचे काटेकोर पालन करून नीतिमत्ता संपादन करता येते असा त्यांचा ग्रह होता. येशूच्या काळातील धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे न्याय व नीती यांचा खरा अर्थच त्यांना समजला नव्हता.—मत्तय २३:२३-२८.

७. यहोवाची नीतिमत्ता कशाप्रकारे प्रदर्शित होते?

याच्या अगदी उलट, यहोवाची नीतिमत्ता त्याच्या सर्व व्यवहारांत प्रदर्शित होते आणि ती स्पष्टपणे दिसून येते. जे जाणूनबुजून पाप करतात त्यांच्याकडे साहजिकच तो दुर्लक्ष करत नाही, किंबहुना हा त्याच्या नीतिमत्तेचाच एक पुरावा आहे. परंतु याचा अर्थ तो न्यायनिष्ठूर, कठोर, भीतीदायक आणि ज्याच्या जवळ जाता येत नाही असा देव नाही. उलट, त्याच्या नीतिमान कृत्यांमुळेच मानवजातीला त्याच्या जवळ जाण्याचा आणि पापाच्या भयंकर दुष्परिणामांपासून तारण प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे यहोवाला अगदी योग्यपणे ‘नीतिमान देव आणि तारणकर्ता’ म्हटले आहे.—यशया ४५:२१, NW.

नीतिमत्ता आणि तारण

८, ९. नियमशास्त्रात देवाचे नीतिमत्त्व कशाप्रकारे व्यक्‍त करण्यात आले होते?

देवाची नीतिमत्ता ही तारणाकरता त्याने केलेल्या प्रेमळ तरतूदीशी कशाप्रकारे संबंधित आहे हे समजून घेण्याकरता त्याने मोशेकडून इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्राचा विचार करा. हे नियमशास्त्र नीतिशुद्ध होते यात शंका नाही. आपला मृत्यू होण्याआधी मोशेने इस्राएल लोकांना याची आठवण करून दिली: “हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे त्यातल्यासारखे यथार्थ विधि व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?” (अनुवाद ४:८) कित्येक शतकांनंतर इस्राएलचा राजा दावीद याने असे घोषित केले: “परमेश्‍वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य [“नीतिमान,” NW] आहेत.”—स्तोत्र १९:९.

नियमशास्त्राच्या माध्यमाने, यहोवाने योग्य व अयोग्य काय यासंबंधी आपले परिपूर्ण आदर्श सुस्पष्ट केले. केवळ धार्मिक बाबींसंबंधी नव्हे तर जीवनाच्या सर्व पैलूंत, म्हणजे आर्थिक व्यवहारांत, वैवाहिक संबंधांत, आहार आणि आरोग्य-रक्षण यासंबंधात आणि न्यायिक निर्णयांसंबंधातही इस्राएल लोकांनी काय करावे व करू नये हे नियमशास्त्रात अगदी बारीकसारीक तपशीलांसह स्पष्ट करण्यात आले होते. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍यांविरुद्ध कडक दंड देखील नियमशास्त्रात होते; काही बाबतीत तर मृत्यूदंडसुद्धा देण्याच्या सूचना होत्या. * पण आज काही लोकांचे म्हणणे आहे त्याप्रमाणे, नियमशास्त्रात व्यक्‍त करण्यात आलेल्या देवाच्या नीतिमान अपेक्षा लोकांवर कठोर व त्रासदायक ओझ्याप्रमाणे होत्या का, व त्या त्यांच्या स्वातंत्र्यात व आनंदात बाधा आणणाऱ्‍या होत्या का?

१०. यहोवावर ज्यांचे प्रेम होते त्यांचा त्याच्या नियमांसंबंधी कसा दृष्टिकोन होता?

१० ज्यांचे यहोवावर प्रेम होते त्यांना त्याच्या नीतिमान कायदेकानूनांचे पालन करण्यास आनंद वाटे. उदाहरणार्थ, आपण आधी पाहिल्याप्रमाणे राजा दावीदाने कबूल केले की यहोवाचे न्यायनिर्बंध खरे व नीतिमान आहेत; पण असे कबूल करण्यासोबतच त्याला या न्यायनिर्बंधांविषयी मनस्वी आवड व कृतज्ञता वाटत होती. यहोवाचे नियम व त्याचे विधी यांविषयी त्याने असे लिहिले: “ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्‍या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते.”—स्तोत्र १९:७, १०, ११.

११. नियमशास्त्र हे “ख्रिस्ताकडे पोंहचविणारे बालरक्षक” कशाप्रकारे ठरले?

११ कित्येक शतकांनंतर, पौलाने नियमशास्त्राच्या मूल्याविषयी आणखी एका श्रेष्ठ मुद्द्‌याकडे लक्ष वेधले. गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात त्याने लिहिले: “आपण विश्‍वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोंहचविणारे बालरक्षक होते.” (गलतीकर ३:२४) पौलाच्या काळात, बालरक्षक हा मोठ्या घराण्यातील सेवक किंवा दास असे. मुलांचे रक्षण करणे आणि त्यांना शाळेत पोचवणे हे त्याचे काम होते. त्याचप्रकारे नियमशास्त्राने इस्राएल लोकांचे त्यांच्या अवतीभवती असलेल्या राष्ट्रांतील नीच चालीरीती व धार्मिक प्रथांपासून रक्षण केले. (अनुवाद १८:९-१३; गलतीकर ३:२३) याव्यतिरिक्‍त, नियमशास्त्राने इस्राएल लोकांना त्यांच्या पापमय स्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांना क्षमेची आणि तारणाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. (गलतीकर ३:१९) विविध अर्पणांमुळे खंडणी यज्ञार्पणाकडे संकेत करण्यात आला आणि खऱ्‍या मशीहाची ओळख पटवण्याकरता एक भविष्यसूचक नमुना पुरवला गेला. (इब्री लोकांस १०:१, ११, १२) अशाप्रकारे नियमशास्त्राच्या माध्यमाने यहोवाने आपली नीतिमत्ता व्यक्‍त केली, पण हे त्याने लोकांचे कल्याण आणि त्यांचे सार्वकालिक तारण लक्षात घेऊन केले.

देवाने नीतिमान ठरवलेले

१२. नियमशास्त्राचे काळजीपूर्वक पालन केल्यामुळे इस्राएल लोकांना कोणता फायदा मिळू शकत होता?

१२ यहोवाने पुरवलेले नियमशास्त्र सर्व दृष्टीने नीतिमान असल्यामुळे त्याचे पालन केल्याने इस्राएल लोकांना देवासमोर नीतिमान स्थिती प्राप्त करता येणार होती. इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करणारच होते तेव्हा मोशेने त्यांना याची आठवण करून दिली: “आपण आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.” (अनुवाद ६:२५) या शिवाय, यहोवाने असे अभिवचन दिले होते: “तुम्ही माझे विधि व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यायोगे जिवंत राहील; मी परमेश्‍वर आहे.”—लेवीय १८:५; रोमकर १०:५.

१३. आपल्या लोकांनी नीतिमान नियमशास्त्राचे पालन करावे अशी यहोवाने अपेक्षा करणे अन्यायी होते का? स्पष्ट करा.

१३ दुःखाची गोष्ट म्हणजे राष्ट्र या नात्याने इस्राएल लोकांनी ‘परमेश्‍वरासमोर ही संपूर्ण आज्ञा’ पाळली नाही आणि पर्यायाने ते देवाचे प्रतिज्ञात आशीर्वाद गमावून बसले. त्यांना देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करता आले नाही कारण देवाचे नियमशास्त्र परिपूर्ण होते पण ते अपरिपूर्ण होते. याचा अर्थ देव अन्यायी किंवा अनीतिमान आहे का? निश्‍चितच नाही. पौलाने लिहिले: “तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही!” (रोमकर ९:१४) खरे पाहता, नियमशास्त्र देण्यात आले त्याआधी व नंतरही काही जण, अपरिपूर्ण व पापमय असताना देखील देवाकरवी नीतिमान ठरवण्यात आले. देवाला भिऊन वागणाऱ्‍या या लोकांच्या यादीत नोहा, अब्राहाम, ईयोब, राहाब आणि दानीएल यांचा समावेश आहे. (उत्पत्ति ७:१; १५:६; ईयोब १:१; यहेज्केल १४:१४; याकोब २:२५) मग प्रश्‍न असा उद्‌भवतो की: देवाने या लोकांना कोणत्या आधारावर नीतिमान ठरवले?

१४. बायबल एखाद्या व्यक्‍तीचे “नीतिमान” असे वर्णन करते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?

१४ एखादी व्यक्‍ती “नीतिमान” आहे असे बायबल म्हणते तेव्हा ती व्यक्‍ती पापरहित अथवा परिपूर्ण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर देवाच्या आणि मनुष्यांच्या प्रती असलेली कर्तव्ये पूर्ण करणारी व्यक्‍ती असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, नोहाला “आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य” म्हणण्यात आले कारण “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:९, २२; मलाखी ३:१८) बाप्तिस्मा देणारा योहान याचे आईवडील जखऱ्‍या व अलीशिबा यांच्याविषयी असे म्हणण्यात आले की “ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि पाळण्यात निर्दोष होती.” (लूक १:६) आणि इस्राएली नसणाऱ्‍या कर्नेल्य नावाच्या एका इटॅलियन सेनाधीशाविषयी तो “नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे” असे वर्णन करण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १०:२२.

१५. नीतिमत्त्व कशाशी जवळून संबंधित आहे?

१५ शिवाय, नीतिमत्त्व हे एखाद्याच्या हृदयात काय आहे याच्याशी संबंधित आहे—म्हणजे केवळ देवाने जे सांगितले आहे ते करणे नव्हे, तर यहोवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवणे आणि यहोवाबद्दल व त्याच्या प्रतिज्ञांबद्दल कृतज्ञता बाळगणे व प्रेम वाटणे. बायबल म्हणते की अब्राहामाने “परमेश्‍वरावर विश्‍वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्‍वास परमेश्‍वराने त्याचे नीतिमत्त्व गणिला.” (उत्पत्ति १५:६) अब्राहामाला केवळ देवाच्या अस्तित्वावरच विश्‍वास नव्हता पण ‘संततीविषयी’ देवाच्या प्रतिज्ञेवरही त्याला विश्‍वास होता. (उत्पत्ति ३:१५; १२:२; १५:५; २२:१८) या विश्‍वासाच्या आणि त्याच्या सांमजस्यात केलेल्या कार्यांच्या आधारावर यहोवा अब्राहामासोबत एक नातेसंबंध ठेवून त्याला आणि त्याच्या सोबत इतर विश्‍वासू जनांना, ते अपरिपूर्ण असूनही, आशीर्वादित करू शकला.—स्तोत्र ३६:१०; रोमकर ४:२०-२२.

१६. खंडणीवरील विश्‍वासामुळे काय घडून आले आहे?

१६ शेवटी, मानवांची नीतिमत्ता ही येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावरील त्यांच्या विश्‍वासावर अवलंबून आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांविषयी पौलाने लिहिले: “देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्‍तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.” (रोमकर ३:२४) या ठिकाणी पौल अशांविषयी बोलत होता ज्यांना ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्यात सहवारस होण्याकरता निवडण्यात आले होते. पण येशूच्या खंडणी यज्ञार्पणामुळे इतरही लाखो लोकांकरता देवासमोर एक नीतिमान स्थिती प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली. प्रेषित योहानाला एका दृष्टान्तात ‘कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला दृष्टीस पडला.’ शुभ्र झगे, देवासमोर त्यांच्या शुद्ध व नीतिमान स्थितीचे सूचक आहेत कारण त्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.”—प्रकटीकरण ७:९, १४.

यहोवाच्या नीतिमत्तेत आनंदित व्हा

१७. नीतिमत्ता संपादन करण्याकरता कोणती पावले उचलण्याची गरज आहे?

१७ मानवांना यहोवासमोर नीतिमान स्थिती प्राप्त करता यावी म्हणून त्याने प्रेमळपणे आपला पुत्र, येशू ख्रिस्त दिला असला तरीसुद्धा हा परिणाम काही आपोआप घडून येत नाही. कोणत्याही व्यक्‍तीने खंडणीवर विश्‍वास असल्याचे प्रकट केले पाहिजे, देवाच्या इच्छेनुसार जीवनात आवश्‍यक फेरबदल केले पाहिजेत, यहोवाला आपले जीवन समर्पित करून पाण्यात बाप्तिस्मा घेण्याद्वारे हे सूचित केले पाहिजे. त्यानंतरही त्या व्यक्‍तीने सातत्याने नीतिमत्ता व इतर आध्यात्मिक गुण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वर्गीय पाचारण झालेला एक बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती तीमथ्य याला पौलाने असा सल्ला दिला: “नीतिमत्त्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग.” (१ तीमथ्य ६:११; २ तीमथ्य २:२२) येशूने देखील सातत्याने असा प्रयत्न करण्याच्या गरजेवर भर दिला. त्याने म्हटले: “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” यहोवाच्या राज्यातील आशीर्वाद मिळवण्याकरता कदाचित आपण खूप झटत असू, पण त्याच्या नीतिमान मार्गांचे अनुसरण करण्याचाही आपण तितकाच परिश्रमपूर्वक प्रयत्न करतो का?—मत्तय ६:३३.

१८. (अ) नीतिमत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करणे सोपे का नाही? (ब) लोटच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१८ अर्थात नीतिमत्ता संपादन करण्याचा सतत प्रयत्न करणे सोपे नाही. कारण आपण सर्वजण अपरिपूर्ण आहोत आणि स्वभावतः आपला कल अनीतिमान गोष्टींकडे असतो. (यशया ६४:६) शिवाय आपल्याभोवती सतत असे लोक असतात ज्यांना यहोवाच्या नीतिमान मार्गांची जराही कदर वाटत नाही. आपली परिस्थिती बऱ्‍याच प्रमाणात लोटासारखीच आहे. लोट सदोम नावाच्या अत्यंत अधर्मी शहरात राहात होता. या शहराच्या नाशातून लोटला बचावणे यहोवाला का योग्य वाटले याविषयी प्रेषित पेत्राने खुलासा केला. पेत्राने म्हटले: “तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.” (२ पेत्र २:७, ८) अशारितीने आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःला विचारू शकतो, की ‘आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्‍या अनैतिक कृत्यांना मी मनातल्या मनात मूक संमती देत आहे का? आजकाल लोकप्रिय असलेली हिंसक करमणूक किंवा खेळक्रिडा केवळ मला आवडत नाही अशातला भाग आहे का? की लोट प्रमाणे ही अनीतिमान कृत्ये पाहून माझाही जीव कासावीस होतो?’

१९. देवाच्या नीतिमत्त्वात आनंद मानल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

१९ या भीतिदायक आणि अनिश्‍चितेच्या काळात यहोवाच्या नीतिमत्तेत आनंद केल्याने आपल्याला सुरक्षितता मिळू शकते. “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?,” या प्रश्‍नाचे दावीद राजाने असे उत्तर दिले: “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो.” (स्तोत्र १५:१, २) देवाची नीतिमत्ता संपादन करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याने व त्याच्यात आनंदी झाल्याने आपण देवासोबत एक उत्तम नातेसंबंध राखू शकतो आणि सतत त्याची कृपा व त्याचा आशीर्वाद अनुभवू शकतो. अशारितीने आपल्याला जीवनात समाधान, आत्म-सन्मान आणि मनःशांती मिळू शकते. देवाचे वचन म्हणते: “जो नीतिमत्ता व दया यांस अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान ही प्राप्त होतात.” (नीतिसूत्रे २१:२१) शिवाय, आपण जे न्याय्य व योग्य आहे ते करण्याचा आपल्या परीने होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपले वैयक्‍तिक नातेसंबंध सुधारतात आणि नैतिक व आध्यात्मिक दृष्ट्या आपण अधिक दर्जेदार जीवन जगू शकतो. स्तोत्रकर्त्याने असे घोषित केले: “जे त्यांच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीति आचरितात, ते धन्य!”—स्तोत्र १०६:३.

[तळटीप]

^ परि. 9 मोशेचे नियमशास्त्र किती विस्तृत होते यासंबंधी अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठे २१४-२० वरील “नियमशास्त्राच्या कराराचे काही पैलू” या शीर्षकाखालील लेख पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• नीतिमत्ता म्हणजे काय?

• तारणाचा देवाच्या नीतिमत्तेशी कसा संबंध आहे?

• देव कोणत्या आधारावर मानवांना नीतिमान गणतो?

• आपण यहोवाच्या नीतिमत्तेत कशाप्रकारे आनंद मानू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

राजा दाविदाने देवाच्या नियमांविषयी मनस्वी आवड व्यक्‍त केली

[१६ पानांवरील चित्रे]

नोहा, अब्राहाम, जखऱ्‍या व अलीशिबा आणि कर्नेल्य यांना देवाने नीतिमान गणले. का ते तुम्हाला माहीत आहे का?